आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

साइकिल बड़ी नामी चीज़ है!

  • सायली महाराव
  • 20.06.25
  • वाचनवेळ 15 मि.
sayali

३३ दिवस, सात राज्यं, दोन सायकलस्वार. अरुणाचल ते गुजरात, जवळपास चार हजार किलोमीटरच्या थरारक सायकल प्रवासाचा हा वृत्तान्त.

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेनंतर ना सायकलीला शांत बसावं वाटत होतं, ना मला. डोक्यात सतत राइडचेच विचार. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी राइड प्लॅन करणं शक्यतो टाळतच होते; पण मन काही स्वस्थ बसू देत नव्हतं. पूर्व ते पश्चिम अशी एखादी मोठी राइड करण्याचा विचार डोक्यात येत होता. मोठी राइड करणं म्हणजे परत अगदी शून्यापासून सुरुवात होती. तसा सराव रोजचा सुरूच होता; पण मोठी मोहीम म्हणजे मोठा खर्च. त्याच वेळी एनसीसीचा कॅम्प सुरू होता. माझा ईस्ट-टु-वेस्ट मोहिमेचा विचार मी आमच्या कमांडिंग ऑफिसरांच्या कानावर घातला होता. आणि एक दिवस सरांनी या मोहिमेची फाइल बनवायला सांगितलं. सगळी धावपळ सुरू झाली. रूट, खर्च, वास्तव्याची सोय, या सगळ्याची एक फाइल तयार झाली. मार्ग ठरला- तेजू (अरुणाचल प्रदेश) ते कोटेश्वर (गुजरात). अंतर साधारण ३९०० किमी. मी 'सोलो राइड'ची फाइल केली होती. ते बघून सरांनी मला विचारलं, “एकटी का जातेस?” तेव्हा तो माझा जरासा हट्ट होता- एकटीने जाणं. तरी सरांनी विचार करण्यासाठी वेळ दिला. त्यातच एकदा माझी आणि अभिजितची भेट झाली. अभिजित आणि मी एकाच महाविद्यालयात शिकतो. आम्ही दोघंही एन.सी.सी. द्वितीय वर्षाचे छात्र आहोत. त्याला या नव्या सायकल मोहिमेची कल्पना होती. सहज विषय निघाला आणि बघता बघता तोदेखील या मोहिमेवर यायला तयार झाला. काश्मीर ते कन्याकुमारी राइडच्या वेळेस नंदू चव्हाणांकडून सायकली मिळाल्या होत्या. त्यांना मी या नव्या मोहिमेबद्दल सांगितल्यावर पुन्हा एकदा सायकली द्यायला ते लगेच तयार झाले.

मोहिमेसाठी आम्ही एन.सी.सी.च्या मदतीची वाट बघत होतो; पण ती मदत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं. आम्ही आमचा सायकलिंग सराव सोडून दिवसभर उन्हातान्हात स्पॉन्सरशिप मिळवण्याच्या मागे असायचो. सकाळी सिंहगड रोडवरून काय ती सायकल फेरी करायचो. कॉलेजच्या ग्राऊंडवर नाही तर तळजाईला धावण्याचा थोडाफार सराव व्हायचा. आणखी एक ऑफिसर कर्नल भिल्लवरिया यांनी अजून प्रयत्न सोडले नव्हते. त्यांनी आमची भेट कमांडर जितेंद्र नायर यांच्याशी करून दिली. त्यांच्या प्रयत्नांनी स्पॉन्सरशिपचं काम झालं. सायकलींचं सर्व्हिसिंग, डागडुजी इत्यादी सगळं महत्त्वाचं काम ‘ओझोन व्हेंचर' यांनी करून दिलं. या तयारीदरम्यान आमच्या आई-वडिलांचं आम्हाला कायम पाठबळ होतंच. बघता बघता सगळी तयारी पूर्ण झाली. राइडदरम्यान ‘प्लॅस्टिकमुक्त भारत' व ‘महिला सशक्तीकरण' हे संदेश देण्याचा आमचा उद्देश होता. निघायचा दिवस ठरला १३ डिसेंबर २०१८.

पहाटेच्या विमानाने पुण्याहून आधी दिल्ली गाठायचं होतं. तिथून पुढे अरुणाचलच्या दिशेने जायचं होतं. तयारीदरम्यान दिवस-रात्र झटणारी आमची उत्साही मित्रमंडळी विमानतळावर निरोप द्यायला आली होती. आमच्या कमांडर सरांना आम्ही आधीच भेटून आलो होतो. ‘के-टू' आणि ‘कांचनजंगा' या आमच्या दोन सायकली पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार होत्या. अभिजितसुद्धा विमानाने पहिल्यांदाच प्रवास करत होता. आता पुण्यापासून, आपल्या माणसांपासून एक महिना लांब राहायचं होतं.

सकाळी १० वाजता दिल्लीत पोहोचलो. नाश्ता करून घेतला. लगेचच पुढचं दिब्रुगडचं विमान होतं. दुपारी तीन वाजता दिब्रुगडला उतरलो. दिब्रुरुगड ते तेजू हा प्रवास शिल्लक होता. टॅक्सी केली. ड्रायव्हरला कमीत कमी पैशांत नेण्याची विनंती केली. तिनसुखिया इथे विवेकानंद केंद्र आहे. पुण्याला मोहिमेसाठी मदत करणाऱ्या आमच्या मित्रमंडळींमार्फत केंद्रातले काही संपर्क मिळाले होते. सर्वांचा मिळून ईस्ट-टु-वेस्ट असा एक व्हॉट्‌‍सअप ग्रुप बनवला होता. ग्रुपमध्ये इतरही अनेक सायकलिस्ट, बाइक राइडर्स होते. ग्रुपवर मी आणि अभिजित नियमित अपडेट्स देत होतो. तिनसुखियामध्ये ग्रुपमधली स्थानिक मंडळी भेटायला आली. त्यांना भेटून आमचा थकवा पळूनच गेला. परमिट बनवून घेतलं आणि आम्ही तेजूला निघालो.

संध्याकाळी सातच्या सुमाराला तेजूला पोहोचलो. आता मिट्ट काळोख झालेला होता. तेजूहून १२ किमीवरच्या टाफरागावला जायचं होतं. तिथल्या मुलींच्या शाळेच्या प्राचार्या रिना मॅडमनी आमच्या राहण्याची, जेवणाची सोय केली होती. अरुणाचलच्या जेवणाची चव आपल्या जेवणापेक्षा फार काही वेगळी नव्हती. तो गरम गरम भात, डाळ... त्याला कशाची तोडच नव्हती. आधीच अंधार, त्यात गावातले लाइट गेले. लख्ख चांदण्याचा प्रकाश होताच म्हणा. आम्ही खूप दमलो होतो. आता शांत झोपेची गरज होती.

उगवत्या सूर्याचं राज्य, अरुणाचल प्रदेश, निळं आकाश, मोठी मोठी अनोळखी झाडं, त्यांच्या फांद्यांमधून येणारी कोवळी किरणं, पक्ष्यांची किलबिल... इथेच राहावं असं वाटत होतं; पण सायकल सफारीची अंतिम तयारी करायची होती. दोन्ही सायकलींची जोडाजोड केली. सायकलींमध्ये हवा भरायची होती. आमच्याजवळचा हवेचा पंप अचानक नादुरुस्त झाला. गावात सायकलींमध्ये हवा भरण्याची कुठलीच सोय नव्हती. मग दुपारी जेवून तेजूमध्ये आलो. सगळी दुकानं तपासली आणि कसंबसं हवेचं काम करून घेतलं. पंपही दुरुस्त करून घेतला. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. पोलिस स्टेशनमधून उद्या राइडला सुरुवात करत आहोत असं पत्र घेतलं. त्या दिवशी तेजूमध्येच मुक्काम केला. सकाळी उठून सहा वाजताच निघायचं होतं. आसाममध्ये प्रवेश करायचा होता. पहिल्याच दिवशी १४० किमी अंतर कापायचं होतं.

©

पहाटेचा ४:३० वाजताचा गजर वाजला. आवराआवर करून सायकलच्या पाठीवर एका महिन्याचं ओझं बांधलं आणि आम्ही दोघं आसामला निघालो. सूर्याचा गोळा ढगांआडून डोकावत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवळ. गारठा तर कहरच होता. सूर्यास्तापूर्वी ठरलेलं अंतर पार करायचं असा आमचा प्रयत्न होता. नॅशनल हायवेवरूनच निघालो होतो. डाव्या हाताला रेल्वे ट्रॅक. रस्त्याची जोरदार कामं सुरू होती. रस्त्याचा अगदी लहानसा भाग रहदारीसाठी खुला होता. सूर्यास्त झाला पावणेपाचच्या सुमाराला आणि आमचे १४० किमी पूर्ण झाले संध्याकाळी साडेसात वाजता.

अभिजित फार थकला होता. त्याला चालवतही नव्हतं. अंगात थंडी भरली होती. थोडा तापही वाटत होता. त्याला आरामाची गरज होती. अगदी पहिल्यांदा मलाही असंच झालं होतं, हे ऐकल्यावर त्याला दिलासा मिळाला. मला त्याची किंचित काळजी वाटत होती; पण तो बरा होईल याची खात्रीही होती.

दिब्रुगडच्या विवेकानंद केंद्रातील सगळे लोक अगदी प्रेमळ. त्यांच्याशी छान गप्पा रंगल्या. आमच्या या राइडची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करायची होती. त्यासाठी प्रत्येक राज्यात जिथे थांबू तिथल्या पोलिस स्टेशनचं लेटर घेणं भाग होतं. आसाम पार करण्यासाठी आम्हाला आणखी नऊ दिवस होते. तिथून पुढचं राहण्याचं नियोजन, त्यासाठीचे संपर्क हे काम एकीकडे सुरूच होतं. आसाममधल्या बऱ्याच ठिकाणी व्हीकेव्हीमार्फतच आमची सोय केली गेली होती.

पुढचा टप्पा होता दिब्रुगड ते जोरहाट. अंतर परत एकदा १४० किमी. सकाळच्या थंडीत उठणं फार अवघड व्हायचं. वाटेवरच्या चहाच्या मळ्यांनी दिवसभरात कधीच थकवा आल्याचं जाणवायचंही नाही. रस्त्यावर बराच वेळ कोणीही दिसायचं नाही. दूरदूरवर फक्त चहाचे हिरवेगार मळे. पोपटी, मेंदी रंगाच्या त्या मळ्यांत जाऊन बसावं असं वाटायचं. इथल्या काही गावांत ‘नक्षलवादी लोक आहेत, सांभाळून जा', असा स्थानिकांनी आम्हाला सल्ला दिला होता. वाटेत काही काही लोक कायम हत्यार सोबत घेऊनच फिरताना दिसायचे. भीती वाटायची; पण आम्ही दोघंसुद्धा अगदी कोयते, सुरी सोबत घेऊन राइड करत होतो. ४:३० च्या सूर्यास्ताने मात्र आम्हाला एकूणच फार पळवलं. चौथ्या दिवशी जोरहाट ते काझिरंगा. सकाळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे फारशी चिंता नव्हती. मात्र, तो हलका पाऊस नसून बंगालच्या उपसागरात आलेलं वादळ होतं. अनेक राज्यांना त्याचा फटका बसला. नशिबाने आमच्या फोनला सगळीकडे नेटवर्क होतं. त्या दिवशी पावसातच सायकल चालवली.

आमचे कमांडर सर, लेफ्टनंट सर- सगळ्यांशी एक दिवसाआड बोलणं सुरू असायचं. त्यामुळे त्यांना राइडचे अपडेट मिळत होते. आमचं सोशल मीडिया ‘इन्स्पायर क्रू' सांभाळत होते. फेसबुक, इन्स्टाग्रामवर आमचे रोजचे अपडेट लोकांना पाहायला मिळत होते. काझिरंगा, नवगाव, गुवाहाटी, नलबारी, बोंगाईगाव, अलिपूरद्वारा ही सगळी गावं पार केली. गुवाहाटीमध्ये थंडीने हालाहाल केले होते. या सगळ्या गावांत विकेवीच्या शाळा आहेत, त्यामुळे आमच्या मुक्कामाचा कुठेही प्रश्न उद्भवला नाही. स्थानिक लोक आसामी भाषेत बोलायचे. आम्हाला ते काही समजायचं नाही. आम्ही गमतीगमतीत त्यांच्या भाषेत म्हणून काहीही बोलत मजा करून घ्यायचो.

हळूहळू अभिजित सायकलवर रमायला लागला. दोघंही एकमेकांसोबतच सायकल चालवायचो. कधीच पुढे-मागे जास्त अंतर झालं नाही आमच्यात. आसामला पाऊस, जंगल, चहाचे मळे, बर्फ-डोंगर, सगळं काही बघायला मिळालं. जाता जाता आम्ही तिथल्या चहाच्या कपाच्या प्रेमात पडलो. कधी चहा न पिणारे आम्ही दोघं थंडीमुळे दिवसाला सहा-सात वेळा चहा प्यायला लागलो होतो.

©

२५ डिसेंबर. आज पश्चिम बंगालमध्ये पोहोचणार होतो. अलिपूरद्वारा ते सिलिगुडी हा तब्बल १७५ किमीचा प्रवास होता. तो दिवस आजही आठवला तरी अंगावर काटा येतो. अलीमध्ये बाइक राइडर राकेशला भेटून त्याच्याकडून रस्त्याची माहिती करून घेऊन आम्ही सिलिगुडीच्या दिशेने निघालो. सकाळी पाच वाजता राइड सुरू केली. वाटेवर अगदी काळोख, धुकं. थंडीने नको नको होत होतं. आमच्या दोघांचंही नाक गळत होतं. १३ तासांत ठरवलेलं अंतर पूर्ण केलं. मूळ प्लॅननुसार प. बंगालमधून पुढचे तीन-चार दिवस तरी प्रवास करायचा होता; पण वाटेत विचारत विचारत जाताना आम्ही रस्ता चुकलो आणि बिहारमध्ये शिरलो. आतापर्यंत बिहारबद्दल बरंच काय काय ऐकलं होतं. तिथला माहोल पाहून ते सगळं खरं आहे की काय असंच वाटायला लागलं होतं. किशनगंज, नवबाचिया, बेगुसराई, पटना, सासाराम- सगळी अनोळखी गावं. पण आमचा व्हॉट्सअप ग्रुप परत एकदा मदतीला आला. भराभर निरोप गेले, संपर्क झाले. बेगुसराईला मिलिटरी पोलिसचे एस.पी. प्राणतोशकुमार दास यांची भेट झाली. त्या वेळी त्यांनी बरंच काही सांगितलं- बिहारबद्दल असं का बोललं जातं, खरं बिहार कसं आहे...

पटन्याची हर्षा मिश्रा- तिच्या सायकल राइड, बाइक राइडबद्दल खूप ऐकलं होतं. हर्षा आणि झारखंडची सावित्री मुरमू दोघींनी मिळून २०१७ साली देशभरात २४ हजार किमीची सायकल मोहीम केली होती. घरी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही हर्षाने ही कामगिरी केली होती. पटन्याला पोहोचल्यावर तिला भेटून खूप आनंद झाला. त्या रात्री आमच्या आणखी एका दोस्ताच्या, आशिषच्या घरी मुक्काम केला. रात्री तिथे १०-१२ बाइक रायडर्स खास आम्हाला भेटायला म्हणून आले. मला खूप सर्दी झाली होती. म्हणून आशिषच्या आईने मला झोपताना आवर्जून हळदीचं दूध दिलं. दिवसाची सुरुवात रस्ता चुकून झाली होती; पण चुकलेल्या वाटेवरच आम्हाला ही सारी मंडळी भेटली.

©

बिहारमधून आता उत्तर प्रदेशमध्ये शिरलो होतो. २०१८ साल संपायला एक दिवस शिल्लक होता. दिवसभर सायकल राइडदरम्यान मी आणि अभिजित खूप धमाल करायचो. जोरजोरात गाणी म्हणायचो. वाटेत एखादं तळं किंवा नदी दिसली तर तिथे थांबायचो. एकमेकांवर पाणी उडवायचो, साग्रसंगीत जेवायचो. आमच्या गु्रपवर जेवणाचे फोटो टाकले की बाकीचे म्हणायचे, तिकडे जेवायला-खायला गेला आहात की सायकल राइडला? हवामानामुळे आमच्या मार्गात व्यत्यय येत होतेच. कधी हेडविंडमुळे थांबावं लागलं. कधी रस्ते धुक्यात हरवलेले असायचे. अर्थात उत्तर प्रदेशात आल्यानंतर हळूहळू थंडी कमी होत चालली होती.

नवीन वर्ष वाराणसीमध्ये साजरं करून आम्ही अलाहाबादला निघालो. तेव्हा तिथे कुम्भमेळ्याचं वातावरण होतं. अलाहाबादच्या रस्त्यांमधल्या सगळ्या सार्वजनिक भिंतींवर मोठाली योगी-बाबांची चित्रं, मंत्र लिहिले होते. आता सूर्यास्त साडेपाच वाजता होत होता. त्यामुळे आम्ही निवांत सायकल चालवायचो. २०१९ चा पहिला सूर्यास्त आम्ही अलाहाबादमध्ये पाहिला- गंगेच्या पुलावरून. खाली सर्व कुम्भमेळ्याची तयारी सुरू होती. आमचं नशीब चांगलं, तेव्हा मेळा सुरू झाला नव्हता; नाही तर सायकलवाला बाबा बनूनच घरी परतलो असतो.

आमची गाडी आतापर्यंत सुरळीत मार्गावर होती. सायकलींमध्ये हवा कमी झाली की भरावी लागायची इतकंच. रोज १००-१५० किमी करत करत आतापर्यंत आम्ही २००० कि.मी.च्या वर अंतर काटलं होतं. आता आम्ही एक दिवस सुट्टी घेण्याचं ठरवलं. आम्हा दोघांत बहुतेक वेळा एन.सी.सी.च्या गप्पा व्हायच्या. मुख्य म्हणजे इतक्या दिवसांत आमच्यात एकदाही भांडण झालं नव्हतं. फेसबुक लाइव्हमार्फत प्लॅस्टिकमुक्ती आणि महिला सशक्तीकरणाचे संदेश देणं सुरूच होतं. आतापर्यंत बहुतेक महामार्गांवर दुरुस्तीची कामं सुरू असल्याचंच दिसत होतं. त्यामुळे सायकल चालवणं फारच कठीण जात होतं. आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये गाड्या बाजूने जवळपास घासूनच जायच्या. कधी तरी तर आता ठोकणारच असंच वाटायचं. अलाहाबाद-कानपूर-इटावा-आग्रा या मार्गाने पुढे राजस्थानात शिरायचं होतं. अलाहाबाद सोडलं. त्या रात्री कानपूरच्या अलीकडे एका ठिकाणी मुक्काम करण्याचा विचार होता; पण तिथे तशी कुठलीच सोय झालेली नव्हती. मग काय, कानपूरपर्यंतच्या अंतराचा अंदाज घेतला आणि दुपारी ग्रुपवर मेसेज टाकला- आम्ही कानपूरला जात आहोत. तडक निघालो आणि रात्री आठ वाजता कानपूर गाठलं. एका दिवसात आम्ही थोडंथोडकं नव्हे, तब्बल २१७ कि.मी. अंतर काटलं होतं. आमचाच त्यावर विश्वास बसत नव्हता.

कानपूरमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आम्हाला तिथले प्रसिद्ध बायकर बाबलादा भेटायला आले. ते कडाक्याच्या थंडीत थेट लखनऊहून आले होते. ठिकठिकाणी आमची राहण्याची सोय करण्यात त्यांचाही हातभार लागत होता. त्यांना भेटण्याची इच्छा होतीच. भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला. त्या दिवशी आम्हाला पुन्हा १५० कि.मी. अंतर कापायचं होतं.

पुढचा मुख्य टप्पा होता आग्रा. आग्रा म्हटलं की मला माझा आवडता पेठा आठवतो. आम्हाला आमचे कमांडर सर सारखं ‘कम खाओ' हेच सांगत होते आणि सी.ओ. सर आपुलकीने चौकशी करून पेठा खाण्याची आठवण करून देत होते. आग्य्राला आम्हाला पोहोचायला रात्रीचे आठ वाजले. बाइक रायडर शिवम आम्हाला घ्यायला आले होते. येताना आमच्यासाठी न विसरता पेठा घेऊन आले होते. त्या पानातल्या पेठ्याची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. जरा लांबवर अलगद, मंद धुक्यात ताजमहाल दिसत होता. तो लांबूनच बघण्यात सुख वाटत होतं. उजव्या हाताला आग्रा फोर्ट. आग्रा किल्ल्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आम्ही सायकली तिकडेच वळवल्या. तिथे भर चौकात आम्ही ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणा दिल्या.

आता रोज सकाळी जरा आरामात निघत होतो तरी आग्र्याहून निघालो तेव्हा धुकंच होतं. त्यातच सायकली जोरदार दामटल्या. मात्र, हेडविंडने नको-नको केलं. रस्त्यात आम्ही नेहमी मोठे पेट्रोल पंप शोधायचो. सायकली असल्यामुळे आम्हाला पेट्रोल भरण्याची गरज नव्हतीच; मात्र पोटातलं पेट्रोल कमी करण्यासाठी अधेमध्ये थांबावं लागायचंच. आग्र्याहून पुढे राजस्थानमध्ये शिरून माहवा-मेहंदीपूरमार्गे जयपूर गाठलं. जयपूर-उदयपूर हा मार्ग मला माहिती होता. काश्मीर ते कन्याकुमारी राइडदरम्यान राजस्थानमध्ये हाच मार्ग घेतला होता. आता त्याच वाटेने दुसऱ्यांदा निघाले होते. काश्मीर ते कन्याकुमारी राइडला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं होतं. त्यामुळे मी काही काळ तेव्हाच्या आठवणींत हरवले. जयपूरला रात्री एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या गेस्टहाऊसला मुक्कामाची सोय केलेली होती.

सकाळी उठून, आवरून नसरीबादला निघालो. नसरीबादची जबरदस्त भुर्जी खाल्ली. रात्री मुक्काम बिलवाड्याला होता. तिथून उदयपूर हे राजस्थानमधलं शेवटचं ठिकाण. उदयपूरपासून पुढे गुजरात राज्याच्या सीमेच्या अलीकडचं गाव शामलाजी. शामलाजी मंदिरात मी मागच्या वर्षीच्या राइडच्या वेळीही थांबले होते. हे विष्णूचं मंदिर माझं खूप आवडतं. मंदिरात गरम गरम खिचडी खाल्ली. रात्री आम्ही तिथेच राहिलो. दुसऱ्या दिवशी अहमदाबाद गाठलं. तिथे अनेक रायडर्स, पत्रकार भेटायला आले होते. काही रायडर्स तर पार सुरतहून आलेले होते. त्या गाठीभेटींनी मन भरून आलं. अहमदाबादहून सुरेंद्रनगरला निघालो. उन्हाचा तडाखा आता खूप वाढला होता. रस्त्यात दूरदूरवर काहीही नसायचं. राइडच्या सुरुवातीचा अरुणाचल-आसाममधला गारठा आठवायचा. वाटेत खाल्लेले किती तरी पदार्थ, कुल्हडचा चहा- सगळं आठवायचं.

सुरेंद्रनगर ते शामख्याली १४० कि.मी. जायचं होतं. या रस्त्याला गाड्यांची रहदारी फारच कमी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी मोठी मिठागरं होती. शामख्यालीला आम्ही राहिलो ते एका कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. कंपनीच्या आवारात हिरवी झाडं लावलेली दिसत होती. छोटीशी बागही केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीचे १० कर्मचारी आमच्या बरोबर १० किमी सायकल राइड करणार होते. प्रत्यक्षात निघताना कमीत कमी पन्नास-एक सायकलस्वार जमलेले होते. आम्ही सर्वांनी मिळून गावातल्या बसस्टॉपची साफसफाई केली. गावातल्या हॉस्पिटलमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम केला. राइडचा शेवटचा दिवस आहे आणि निरोपाचे कार्यक्रम सुरू आहेत असंच वाटायला लागलं. तिथले सर्वजणच अगदी नि:स्वार्थीपणे आणि आनंदाने काम करत होते.

आता शामख्याली-नखत्राणा-कोटेश्वर हा शेवटचा टप्पा राहिला होता. शामख्याली ते नखत्राणा हे अंतर जास्त होतं, तरी आम्ही ठरवून ते पूर्ण केलं व नखत्राणा ते कोटेश्वर ही १०० किमी राइड शेवटच्या दिवशी केली. नखत्राणामध्ये बी.एस.एफ.चे कमांडर इंद्रजित यांच्याशी भेट झाली. त्या रात्री आम्ही त्यांच्या मित्राच्या घरी राहिलो. तिथे भेंडीची भाजी-पोळी खाल्ली, ती चव आजही आठवते आहे. इंद्रजित सरांनी आणि मी सात-आठ किमी सायकलही चालवली. कोटेश्वरलाही सरांनी संपर्कासाठी काही फोन नंबर दिले होते. त्यामुळे शेवटच्या मुक्कामीही सगळी सोय व्यवस्थित झाली. मात्र, नखत्राणा-कोटेश्वर हे शेवटचे १०० किमी सर्वांत कठीण गेले- अगदी सुरुवातीच्या १४० कि.मी.पेक्षाही अधिक कठीण. सतत रस्ता चुकल्याचा भास होत होता. काटेरी झाडांच्या, चढ-उताराच्या रस्त्याने पोटात गोळा आला होता. खड्ड्यांनी सायकलचा खुळखुळाच करून टाकला होता. सुनसान रस्ते. वाटेत प्यायला पाणी मिळण्याचीही सोय नव्हती. सूर्य तर आमची मज्जाच बघत होता. नकाशात समुद्र अगदी जवळ असल्याचं दिसत होतं; पण संध्याकाळ होत आली तरी तो समोर येत नव्हता. राइड सुरू झाली तो अरुणाचल प्रदेश आणि इथे हा कच्छचा प्रदेश, केवढा फरक होता दोन्हींत! १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं कोटेश्वर मंदिर अगदी समुद्राकाठी आहे. त्याच्या अलीकडे नारायण सरोवर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. नकाशात ते निळ्या रंगात दिसतं; प्रत्यक्षात ते रखरखीत, कोरडं होतं. तिथून अगदी जवळ समुद्र असेल हे खरंच वाटत नाही. समुद्र दिसला की राइड संपली, असं म्हणत आम्ही समुद्राचा शोध घेत होतो; पण त्याआधी कोटेश्वर मंदिराचा भगवा झेंडा फडकताना दिसला आणि आम्ही हुश्श केलं.

१६ जानेवारी २०१९, संध्याकाळी पाच वाजता आमचा ३३ दिवसांचा हा ‘विदाऊट टायर पंक्चर' प्रवास संपला. समुद्राच्या दर्शनाने जीव शांत झाला. त्या संध्याकाळचा सूर्यास्त आम्ही कोटेश्वर मंदिरातून बघितला. तिथल्या भटजीने सांगितल्याप्रमाणे ते भारतातलं शेवटचं सूर्यास्ताचं ठिकाण.

उत्तर-दक्षिण मोहिमेनंतर आणखी एक मोठी मोहीम पूर्ण केल्याचा आनंद होता. मोहिमेसाठी कितीजणांची मदत मिळाली याला गणतीच नाही. त्यांच्या भरवशावरच तर मी, अभिजित आणि आमच्या सायकली, सारे निर्धास्त होतो. त्या सर्वांबद्दल लिहायचं तर किती तरी पानं भरतील. तरी पुन्हा एकदा नंदू चव्हाण यांचा खास उल्लेख करायला हवा. त्यांनी सायकली दिल्या नसत्या तर पुढचं काहीच शक्य झालं नसतं. मोहिमेत ठिकठिकाणी अनेक बाइक रायडर्स ग्रुप आम्हाला भेटायला आले. आपल्या देशाचे किती वेगवेगळे प्रदेश बघायला मिळाले! पाऊस, ऊन, वारा, थंडी, धुकं यांच्याशी वेगळीच मैत्री झाली. बिहारमधली सरसोची फुलं, आग्य्राचं धुकं, राजस्थानचे घाट... यादी खूप मोठी आहे. आम्ही कधी इतके दमलेलो असायचो की घरच्यांच्या फोनला उत्तर देण्याचंही त्राण नसायचं. त्याचबरोबर चहामुळे येणारी तरतरीही चांगलीच लक्षात आहे. चहाची आता अशी काही सवय लागली की विचारू नका. त्याच चहासोबत हा लेख संपवते. माझी सायकल लवकरच मला परत एकदा हाक देणार आहे हे मला पक्कं माहिती आहे!

(मुशाफिरी, दिवाळी २०१९ मधून साभार )

सायली महाराव | sayalieverest@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Ujjwala Harshe23.06.25
फारच सुरेख लेख ! अगदी पॉझिटिव्ह एनर्जी देणारा ! लेखा बरोबर आम्ही ही प्रवास केला ! पुढच्या सर्व प्रवाशांना शुभेच्छा !

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results