आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

दोन पाय, ७५ दिवस अन्‌‍ १००० किलोमीटर

  • प्रसाद निक्ते
  • 25.10.25
  • वाचनवेळ 29 मि.
prasad nikte

२५ मार्च २०१७. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या सीमा जिथे मिळतात तिथे नंदुरबार जिल्ह्यातल्या भराड नावाच्या एका आदिवासी पाड्यावर मी मुक्कामाला आलोय. केशव पोटले यांच्या घरी. त्यांच्या घरी उतरायचं हे महिन्याभरापूर्वीच ठरलेलं असल्यामुळे त्यांच्या घरी माझं छान स्वागत झालंय; पण तरीही मनात हुरहूर आहेच. कारण उद्यापासून मी महाराष्ट्रातला उत्तर दक्षिण पसरलेला घाटमाथा चालण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. सध्या आखलेल्या मार्गाप्रमाणे साधारण ७५० किलोमीटरचं हे डोंगरदऱ्यांमधलं अंतर सलग आणि एकट्याने चालायचं असं मी ठरवलंय. सुरुवातीचे चार दिवस माझ्यासोबत चालण्यासाठी माझा पत्रकार मित्र सुहास जोशी आलाय. पुढेही अधूनमधून काही मित्रमंडळी एक-दोन दिवस येऊन सोबत चालतील, पण बाकी दोन-अडीच महिन्यांची सलग पायपीट करणार आहे मी एकटाच.

बाकी काही नाही तरी अनुभवांची मोठी शिदोरी या प्रवासात गाठीशी लागेल याची खात्री आहे.

·

मुळात असं अघोरी पाऊल मी का उचललं, या प्रश्नाला माझ्याकडे खरंच उत्तर नाही. घाटमाथा सलग पसरलेला आहे म्हणून त्यावरून सलग चालत जावंसं वाटलं, इतपतच काय ते कारण मी देऊ शकतो. अशी मोहीम आखावी, असा विचार चार-पाच वर्षं मनात घोळत होता. भीमाशंकर, नाणेघाट, गोरखगड असे ट्रेक्स करताना खाली कोकणातून सह्याद्रीच्या पठाराची उत्तर-दक्षिण धावणारी भिंत पाहायला मिळायची. गाडीरस्त्याने कसारा, माळशेज, खंडाळा वगैरे घाटरस्त्यांवरून जाताना ती भिंत सामोरी यायची. एखादा डोंगर पाहिल्यावर जशी त्यावर चढण्याची ऊर्मी येते, तशीच घाटमाथ्याची भिंत पाहून तिच्या काठाने चालत जावं असं मला हटकून वाटायचं. ही भिंत जवळपास महाराष्ट्राच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत पसरलेली आहे. तिचा हा आवाका पाहून ती चालत जाण्याच्या कल्पनेला आव्हानाचं वलयही जोडलं जायचं.

पण त्या भिंतीच्या प्रचंड आवाक्यामुळेच ‘उचलली सॅक आणि लागलो चालायला' असं करता येणार नव्हतं. एक तर मानसिक आणि शारीरिक तयारी असणं गरजेचं होतं. त्यातून खाल्लीच उचल, तरी या उपद्व्यापाला किमान दीड-दोन महिने लागणार होते. नोकरी करत असताना तेवढा वेळ काढणं अवघडच होतं. त्यामुळे विचार मनात आला, की गुगल मॅप्स बघत मोहिमेची कल्पना रंगवणं एवढंच काय ते हातात होतं. मल्टिनॅशनल कंपनीत कॉर्पोरेट नोकरी तशी ठीक चालली होती, पण कामाचं समाधान विशेष मिळत नव्हतं. आपण नेमकं काय साध्य करतो आहोत, असा कॉर्पोरेटमधल्या चाळिशी ओलांडलेल्या बहुधा प्रत्येकालाच भेडसावणारा प्रश्न त्या काळात माझ्याही मनात सतत डोकं वर काढायचा. एकदा त्याचा अतिरेक झाला आणि मी तडकाफडकी नोकरी सोडून दिली. आपल्याला समाधान देईल ते काम करायचं ठरवलं. त्यानंतर वर्षभराने जाणवायला लागलं की आता मात्र आपण मोहिमेसाठी वेळ काढू शकतो. त्यात पंचेचाळिशी जवळ यायला लागली होती. त्यामुळे असलं काही धाडस करायचं तर ते आताच करायला हवं, असं जाणवू लागलं होतं. या साऱ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि एकदाची मनाने उचल खाल्ली.

या टोकापासून त्या टोकापर्यंत घाटमाथा चालत जायचं ठरलं आणि तेव्हाच आपण काय करायला घेतोय याची खऱ्या अर्थाने जाणीव व्हायला लागली. पण आता करायचं तर ठरवलं होतं, त्यामुळे तयारीला लागणं भाग होतं. सुमारे वर्षभर आधी जुजबी सुरुवात झाली. सुहास जोशी माझा पत्रकार मित्र. तोही डोंगरभटक्याच. त्याच्याशी बोललो. त्यानेच या मनातल्या निव्वळ कल्पनेला मोहिमेचं स्वरूप दिलं, टीम बनवली. आणि मग मोहिमेच्या सहा-सात महिने आधी तयारीला खरा वेग आला.

सगळ्यात आधी मार्ग निश्चित करणं गरजेचं होतं. त्यासाठी उगमाचा आणि शेवटाचा असे ठळक बिंदू हवे होते. त्यातला शेवटाचा दक्षिणेकडला बिंदू अगदी सहज मिळाला. कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा यांच्या सीमा जिथे एकत्र येतात तो चोर्ला घाट सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच आहे. पण उत्तरेला मात्र तसं नाही. तिथे सह्याद्री पठाराचा असा कोणता विशिष्ट बिंदू नाही. मग गुगलवर शोधताना समजलं, की सह्याद्री पठारावर नसला तरी नर्मदाकाठी सातपुड्यात एका बिंदूपाशी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमा एकत्र येतात. हे छान झालं. एकसारखे असे दोन बिंदू मिळाले. यामुळे अंतरात बऱ्यापैकी वाढ झाली, पण त्या योगाने सह्याद्रीबरोबरच सातपुडाही मोहिमेत सामील झाला.

आता नेमका मार्ग आखणं गरजेचं होतं. पल्ला मोठा असल्याने मोहिमेची तयारी हे काही एक-दोघांचं काम नव्हतं. सुहास मला पहिल्यांदा ह्रषीकेश यादव यांच्याकडे घेऊन गेला. ९८ साली झालेल्या भारतातल्या पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे ते नेते होते. सह्याद्री तर त्यांना पालथ्या हातासारखा परिचित. त्यांनी आमची कल्पना ऐकली, दोन-तीन नेमके प्रश्न विचारले आणि ते शांतपणे म्हणाले, “ठीक आहे, होईल.” त्या वेळी पहिल्यांदा मला आत्मविश्वास आला. मग अविनाश हरड टीममध्ये आला. मुंबई-पुण्याकडले ट्रेकर्स साल्हेरच्या उत्तरेला जवळपास फिरकत नाहीत. अविनाशला त्या भागाची चांगली माहिती. प्रीती पटेल म्हणजे घाटवाटांची एक्स्पर्ट. त्यामुळे नियोजन करताना तिची चांगलीच मदत झाली. एवढा मोठा टप्पा पायाखाली घालणारच आहोत, तर परिसराचं आणि लोकजीवनाचं शक्य तेवढं ऑडिओ-व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करावं असंही आम्ही ठरवलं होतं. या फोटो डॉक्युमेंटेशनच्या तयारीसाठी राजस देशपांडे झटत होता. स्वप्नाली धाबुगडे सोशल मीडियापासून जिथे लागेल तिथे लक्ष घालत होती. नियोजनाच्या टप्प्यात राहुल मेश्रामचं शिस्तबद्ध काम सुरू होतं. (पुढे दीपाली भोसले, धनंजय मदन, प्रसाद कर्वे यांचं मोठं सहकार्य लाभलं.) त्यामुळे माझा उत्साह तर वाढत होताच, पण निश्चयही ठाम होत होता. सर्वांनी मिळून या मोहिमेला नाव दिलं- वॉकिंग ऑन द एज! या मोहिमेत मी एकटाच सलग चालणार होतो. पण आमच्या या टीममधले काही काही सदस्य अधूनमधून मी ज्या भागात असेन तिथे येऊन मला भेटणार, जमलं तर काही दिवस सोबत चालणार असंही ठरलं. ठरवताना त्याचं काही फारसं वाटलं नाही, पण प्रत्यक्षात चालायला लागल्यावर या मंडळींची भेट हा माझ्यासाठी मोठाच दिलासा असायचा.

सगळ्यात अवघड भाग होता तो घरच्यांच्या मनाची तयारी करण्याचा; पण सुदैवाने तोही फार अवघड गेला नाही. काळजी वाटत असली तरी ती सोसत माझी मोहिमेला जाण्याची वाट त्यांनी मोकळी ठेवली.

नियोजन सुरू झाल्यावर अडचणीही समोर यायला लागल्या. अंतराचा आणि मोहिमेसाठी ठरवलेल्या काळाचा अंदाज बघता दिवसाला वीसेक किलोमीटर चालणं गरजेचं होतं. एवढी चाल चार-सहा दिवसांच्या ट्रेकमध्ये ठीक आहे; पण सलग दोन महिने रोज वीस किलोमीटर चालणं जमेल का? पण करून बघायचं असं ठरलं. जेवणाखाणाच्या बाबतीतही मनात विचार आला, घाटमाथ्यावरल्या डोंगरांतून, गाव-पाड्यांतून भटकताना ज्या घरी जेव्हा जे मिळेल ते खाऊन आपण दोन महिने राहू शकतो का? बघू या. सगळीकडे ‘ओम भिक्षांदेही' करायचं! अर्थात हा मार्ग गावागावांतून जाणारा असेल याची काळजी आम्ही घेत असलो, तरीही कधी तरी एकट्याने डोंगरावर किंवा जंगलात अडकण्याची शक्यता डावलून चालणार नव्हतं. त्यामुळे फॅमिली फ्रेंड असलेल्या डॉक्टर केतकी रानडेने वेगवेगळ्या डाळींपासून स्वतः घरी बनवलेले चविष्ट ‘इमर्जन्सी पॅक्स' सोबत ठेवायचं ठरलं. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी पाठीवर वजन घेऊन ठाण्यातल्या येऊरच्या टेकडीवर चढ-उतार करत दिवसाला १५ किलोमीटर चालण्याचा सराव सुरू होता.

अशी वेगवेगळ्या आघाड्यांवर तयारी चालू होती. मुलीचं बारावीचं वर्ष असल्यामुळे तिची परीक्षा झाल्यावर २५ मार्चला ठाण्याहून निघायचं ठरलं होतं. तयारीच्या गडबडीत दिवस झपाझप सरत गेले आणि मोहिमेचा दिवस उजाडला. चालण्याची सुरुवात सातपुड्यात होणार होती. भराड नावाचं गाव. महिनाभर आधी ‘रेकी'साठी तिथे जाऊन आलो होतो. गाव म्हणजे अंतरा-अंतरावर पसरलेल्या घरांचा पाडाच. तिथे रस्ता नाही, वीज नाही. तिथले भिल्ल आदिवासी अगत्यशील. आधीच्या भेटीत तिथल्या केशव पोटोल्यांशी ओळख झाली होती. २५ मार्चला येणार याची त्यांना कल्पना देऊन ठेवली होती. त्यांनी ती तारीख लक्षातही ठेवली होती. टीमचे तीन सदस्य माझ्यासोबत भराडला आले होते. पैकी सुहास चार दिवस सोबतीला असणार होता.

·

त्यानुसार आम्ही २५ तारखेला केशव पोटल्यांसमोर जाऊन उभे ठाकलो. तिथे आमचं छान स्वागत झालं. असाच अनुभव पुढचे पाच दिवस सातपुड्यात येत राहिला. बाहेरून कुणी येणं हे त्यांच्यासाठी अप्रूप होतं. सरदार सरोवर धरणासाठी सर्व्हे वगैरे करायला येणारी सरकारी मंडळी किंवा नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते सोडले तर इतर कुणीच कधी त्या खेड्यांमध्ये फिरकत नाही. त्यामुळे गावातले लोक कोण आलंय ते बघायला आणि गप्पा मारायला आम्ही उतरलेलो असू त्या घरी जमा व्हायचे.

मला सातपुडा नवीन होता. लोकजीवन आणि निसर्गही. सातपुड्याचा हा भाग म्हणजे एकमेकांना लागून असलेल्या टेकड्या. शहरात एकमेकांना खेटून इमारती असतात तशा. मात्र, या परिसरात झाडी अजिबात नाही. मोहाची आणि आंब्याची झाडं सोडली तर बाकी परिसर रूक्ष. सगळीकडे रखरखाट. वस्तीपासून लांब रानात थोडी झाडी दिसायची, पण तीही बहुतेक सगळी पानगळीची. होळी नुकतीच झालेली, त्यामुळे अजूनही झाडांवर पालवी नव्हती. दिवसा तोबा ऊन. याच काळात राज्यात उष्णतेची लाट आलेली. त्यामुळे त्या टेकड्यांची तीव्र चढ-उतार करताना माझी दमछाक व्हायची. विश्रांतीसाठी बसावं, तर नावालाही सावली नाही. त्यातल्या त्यात एखाद्या झाडाची इंचांमध्ये मोजता येईल एवढी सावली पाहून समाधान मानावं लागायचं.

या भागात पावसाळ्याव्यतिरिक्त काहीच पिकत नाहीत. पावसाळ्यातही पिकतं ते फक्त ज्वारी, मका आणि डाळी. बाजारच्या गावाला जाऊन भाज्या विकत आणणं न परवडणारं. त्यामुळे जेवणात भाज्याच नाहीत. भाकरी आणि घट्ट डाळ हेच जेवण. अतिशय चविष्ट. पण आपल्याला एवढ्या प्रमाणात डाळी खायची सवय नसते. त्यामुळे पाच दिवसांनी सातपुड्यातून बाहेर पडताना अपचन झालंच. पोटात अन्नाचा कण टिकेना. चालत राहणं तर भाग होतं. मोहीम सुरू होऊन आठवडा नाही होत तर हे असं! आता पुढे कसं होणार? दर दोन-चार दिवसांनी हवा, पाणी, खाणं सगळं बदलत राहणार. कसा निभाव लागेल... असे विचार सुरुवातीलाच मनात येऊ लागले. पण मला फक्त अपचन झालं होतं. पोटात दुसरा काही बाऊ नव्हता. त्यामुळे अक्कलकुव्याला एक दिवस आराम केला आणि पोटाला पूर्ण विश्रांती दिली. पोट लगेच ताळ्यावर आलं. सुदैवाने त्यानंतर एकदाही पोटाचा किंवा इतर कुठलाही त्रास झाला नाही.

prasad nikte

सातपुडा आणि सह्याद्री पठार यांच्यामध्ये सपाटीचा सखल भाग आहे. हे तापीचं खोरं. सातपुड्यातून बाहेर पडल्यावर पुढचे दोन दिवस मला उत्तरेला सातपुड्याची रांग आणि दक्षिणेला सह्याद्रीच्या पठाराचा उंचवटा दोन्ही एकाच वेळेस दिसत होते. हळूहळू सातपुड्याची रांग लहान आणि पुसट होत गेली. सह्याद्रीचं पठार जवळ येऊ लागलं. चालताना ती अधूनमधून पुसट होत जाणारी रांग मी मागे वळून पाहायचो. एके ठिकाणी रस्ता एका छोट्या टेकडीच्या रांगेला ओलांडून जात होता. मी त्या लहानशा खिंडीतून पलीकडचा उतार चालून पुढे गेलो. आठवण झाली तेव्हा मागे वळून पाहिलं, तर सातपुड्याची रांग टेकडीमागे अदृश्य झालेली. मनाला चुटपूट लागली.

या सखल भागातही उष्णता खूप होती. वाटेत तशीच पानगळीची जंगलं. बऱ्यापैकी रखरखाट. पण त्याचंही एक वेगळंच सौंदर्य. निसर्गातल्या एकान्ताचा आनंद घेत असताना हळदाणी गावापाशी सह्याद्रीचं पठार अगदी निकट आलं. त्या भागातही मी पूर्वी कधी गेलो नव्हतो; पण सह्याद्रीचे ते कातळकडे, त्यावरची झाडी वगैरे पाहून ओळखीच्या परिसरात आल्यासारखं वाटलं. तिथला एक घाट चढून मी पठाराच्या वर पोचलो. पण त्या भागात सह्याद्री पठार टप्प्याटप्प्याने चढतं, त्यामुळे कसारा, खंडाळा भागात दिसते तशी पठाराची कड पुढले काही दिवस लागली नाही. मोहिमेच्या नावाप्रमाणे ‘वॉकिंग ऑन द एज' अजून सुरू होत नव्हतं. त्याला खरी सुरुवात झाली ती इगतपुरीच्या दक्षिणेला कुलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुरुंगवाडी गावापासून.

इथून पुढचा कोयनानगरपर्यंतचा परिसर अगदी सगळाच्या सगळा परिचयाचा नसला तरी साधारण माहितीचा होता. अर्थात बऱ्याचदा चौकशी करूनच नेमका मार्ग माहिती करून घ्यायला लागायचा. कधी कधी स्थानिक गाइडही बरोबर घ्यावा लागायचा. कारण अमुक आणि तमुक अशा दोन ठिकाणी भले मी किंवा आमच्या टीमपैकी कोणी तरी जाऊन आलंही असेल. पण या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या घाटमाथ्यावरून सलग कसं जाता येतं याची माहिती बहुतेक वेळा मला नसायची. त्यामुळे रोज सकाळ झाली की पुढच्या मार्गाची वाट विचारणं, गरज असेल तिथे गाइड म्हणून कोण बरोबर येऊ शकतं का याची शोधाशोध करणं सुरू व्हायचं. वाट सोपी असेल तर मी एकट्यानेच चालायचो. पण तेव्हाही वाट आडरानातली असेल तर सतत वाटेवर लक्ष ठेवत, दोन वाटा फुटल्या तर अंदाज घेत पुढे जायला लागायचं. दर संध्याकाळी गावात मुक्काम पडला की राहण्या-जेवण्याची सोय शोधणं हेही एक मोठं काम होतं. शिवाय दुपारच्या वेळेलाही खायला मिळतं का पाहावं लागायचं. टीमपैकी कुणी तरी भेटायला किंवा सोबत चालायला असायचं तेव्हा मला मोठा आधार वाटायचा. पण एकटा असताना या सगळ्याचा मानसिक शीण बराच यायचा. आणि शारीरिक शीण तर येत होताच. शुद्ध हवा आणि साध्या भाकरी-भाताच्या ‘हेल्दी' आहारामुळे रात्रीच्या झोपेनंतर सकाळी ताजातवाना झालेलो असायचो. पण तरीही महिनाभर चालल्यानंतर शारीरिक शीणही जाणवायला लागलाच.

·

साधारण मे महिन्याच्या अखेरीला मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर मात्र शारीरिक आणि मानसिकही थकवा वाढल्याची जाणीव होऊ लागली. एक तर हा परिसर मला नवा होता. इथे जंगलं दाट. डोंगरांच्या रांगा आडव्या येत. त्यामुळे पुढचा मुक्काम शोधायला बऱ्याचदा गाइड लागायचा. पण आता पावसाळा जवळ आलेला. लोकांची शेतीच्या कामाची गडबड. ते काम सोडून विनाकारण भटकणाऱ्या माझ्यासोबत यायला कोण तयार होणार? त्यात जिथे बऱ्याच काळापासून रस्ते आहेत, तिथे या पायवाटांची फारशी माहिती तरी कुणाला असणार? पैसे मिळणार असले तरीही एवढी पायपीट करण्याची कुणाचीच तयारी नसल्याने मला दोन-तीन वेळा जागीच अडकून पडतो की काय असं वाटत होतं. सुदैवाने मार्ग निघत गेले; पण त्यामुळे मानसिक ताण वाढत चालला होता. कारण पावसाळा तोंडावर आला होता. अधेमधे त्याचा प्रसादही चांगलाच मिळाला होता. त्यामुळे दिवस मोडत गेले आणि पाऊस लागला तर एवढी पायपीट करूनही मोहीम थोडक्यासाठी सोडून द्यावी लागणार की काय, या निराशेने मला घेरलं. शेवटचे तीन-चार दिवस फारच कठीण गेले. स्थानिकांनी दिलेले अंतराचे अंदाज सारखे पुढे-मागे व्हायचे. शरीर थकलेलं, मन शिणलेलं. त्यात पावसाचं सावट.

मोहीम संपण्याच्या पाच दिवस आधी एक विचित्र मानसिक अवस्था अनुभवायला मिळाली. आधीचे चार दिवस सुहास सोबतीला होता; पण दुसऱ्या दिवशी त्याला परतावं लागणार होतं. त्यामुळे पुढची अगदी शेवटच्या टप्प्यातली चाल मला एकट्यानेच चालायची होती. पुढच्या मार्गाविषयी नेमकी माहिती हातात नव्हती. पाऊस यायचा तेव्हा तुफान पडायचा. त्या भागात जंगली हत्ती आणि अस्वलांचा वावर आहे हे माहिती होतं. धो धो पावसात आणि धुक्यात लांबचं दिसत नाही, त्यामुळे धोका जास्त. रात्री सुहासबरोबर जेवलो आणि अचानक मन अस्वस्थ झालं. आता आपण दिवसाला २०-२५ किलोमीटर कसे चालणार? जेवणार कुठे? राहणार कुठे? पुढला मार्ग कोण सांगणार? काही कळेना. ज्या गोष्टी मी गेले दोन महिने रोजच्या रोज करत आलो होतो त्याच गोष्टी आपल्याला कशा जमणार, अशा अनाकलनीय काळजीने मला व्यापून टाकलं होतं. त्या काळजीची तीव्रता इतकी प्रचंड होती की मी रात्री तासभर अस्वस्थपणे फेऱ्या घालत राहिलो. या प्रकाराला काय म्हणतात माहीत नाही. मी आपलं त्याला ‘लास्ट लॅप सिंड्रोम' असं नाव देऊन टाकलं.

सुदैवाने ही काळजी अनाठायी ठरली. बरीचशी चाल रस्त्याने होती. काही टप्पे अगदी सुनसान होते. पाऊस अधूनमधून झोडपत होता, पण तरी गोष्टी सुरळीत होत गेल्या. सात जूनला मी तिलारीनगरहून निघून कणकुंबी गावात पोचलो. डोळ्यांत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी मोहीम संपणार होती. सकाळीच बायको-मुलगी आणि माझ्या टीममधले सहकारीही कणकुंबीला येणार होते. तसा आणखी ११ किलोमीटरचा टप्पा बाकी होता. पण एकदा का सकाळी ही मंडळी भेटली की मी निवांत होणार होतो. खूप दमलो होतो. पण आता फक्त शेवटचा टप्पा काय तो बाकी होता. शिवाय टीम गाडी घेऊन येणार असल्याने पाठीवरची सॅकही मला बाळगायची गरज नव्हती. कुणकुंबी गावात जिथे जेवायला-राहायला मिळालं ते घरही छान होतं. थोडी हुरहुर होतीच. पण सकाळच्या ओढीने मी शांत झोपलो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ जून २०१७ ला संध्याकाळी चार वाजता गोव्याला बेळगावशी जोडणाऱ्या चोर्ला घाटात माझी मोहीम पूर्ण झाली.

·

या मोहिमेतून मला काय मिळालं, तर अनुभवांचं डबोलं! विशेषतः आपलं मन वेगवेगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जातं, त्याचे प्रतिसाद कसे असतात ते त्या मनाला सामोरं राहून पाहता आलं.

पांढरपेशा मध्यमवर्गीय घरात वाढलेलो असल्याने कुणाहीसमोर कधी लाचार न होण्याचं बाळकडू लहानपणापासूनच अंगात भिनलेलं. ‘वेळ आली तर उपाशी राहीन, पण कुणाकडे भीक मागणार नाही' असा आपला मध्यमवर्गीयांचा स्वाभिमान. पण खरं सांगू? जोपर्यंत तुम्ही अन्नासाठी किंवा आसऱ्यासाठी कुणावर अवलंबून नसता तोवरच हा ताठा टिकतो. परिस्थिती बदलली की तो स्पिरिटसारखा कधी हवेत उडून जातो समजतसुद्धा नाही.

बहुतेक ठिकाणी मला स्थानिकांनी प्रचंड मदत केली, खाऊ-पिऊ घातलं, निवारा दिला; पण तीन-चार ठिकाणी अशीही परिस्थिती आली, की तिथे माझं स्वागत तर सोडाच, पण ‘हा इथून टळला तर बरं' अशी वागणूक मिळाली. अर्थात यात त्या स्थानिकांकडे काहीच दोष नाही. वाढलेले केस आणि दाढी, मळकट कपडे, कळकट शरीर आणि हातात जाड सोटा, अशा वेशात मी उपटसुंभासारखा त्यांच्यासमोर उभा ठाकल्यावर त्यांना माझ्याबद्दल संशय येणं साहजिकच होतं.

संध्याकाळ झालेली आहे. आता जंगलातून पुढे जाणं शक्य नाही. या माणसाला आपण टळायला हवे आहोत. तो काही उघडपणे आपल्याला हाकलत नाहीये, पण त्याच्या वागण्यातून स्पष्ट समजतंय. ‘बघा, पुढे विचारा कुणाला तरी', असं तो म्हणतोय. अशा वेळी काय करायचं? कधी लाचारी दाखवायची. ‘दादा, मला इथे बाहेर कोपऱ्यात जागा दिलीत तरी चालेल,' अशी विनवणी करायची. एका अर्थी, नव्हे, सगळ्याच अर्थी मी मागितलेली ही भीकच.

लाचारीने भागलं नाही तर लोचटपणा करायचा. नंदुरबार जिल्ह्यात एक शहरवजा ठिकाण होतं. अगदी बकाल. रेल्वे स्टेशन नवं कोरं आणि स्वच्छ होतं. पण माझ्याकडे कॅमेरा, मोबाइल, थोडे पैसे वगैरे असल्यामुळे तिथे झोपणं मला जिकिरीचं वाटलं. (गावांमध्ये किंवा पाड्यांमध्ये असं कधीच कुठे वाटलं नाही). आता काय करायचं, या विचारात असताना मला स्टेशनच्या पाठच्या बाजूला एका डॉक्टरांची पाटी दिसली. म्हटलं, त्यांच्याकडे प्रयत्न करू.

एक तर शहरभागात कुणीच अनोळखी माणसाला उभं करत नाही. त्यात मी अंधारायच्या सुमारास अशा अवतारात डॉक्टरांकडे थडकलो. तरी त्यांनी मला प्यायला पाणी दिलं. थोड्या गप्पाही मारल्या. पण ‘मला इथे राहायला देता का?' या प्रश्नावर काही उत्तरच येईना. मग आमचा एकमेकांशी जणू बुद्धिबळाचा डाव सुरू झाला. त्यांची रणनीती अशी, की याला उत्तरच दिलं नाही तर तोच नकार समजून हा मनुष्य निघून जाईल. माझी रणनीती म्हणजे लोचटपणा. त्यातून डॉक्टरही पांढरपेशे सज्जन गृहस्थ. त्यामुळे मी अवतारात असलो तरी व्यवस्थित वागणाऱ्या, बोलणाऱ्या आणि सुशिक्षित वाटणाऱ्या माणसाला ‘चल, नीघ इथून' असं म्हणण्याआड त्यांचा सभ्यपणा येत होता. तोच त्यांचा ‘वीक पॉइंट' आहे हे हेरून मी लोचटपणा चालूच ठेवला. माझ्यासाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे माझ्याकडे वेळच वेळ होता. मी तास-दोन तास तिथे ठिय्या मारल्यामुळे आता डॉक्टरांना नातवामार्फत दवाखान्यालगतच्या घरातून जेवायला हजर व्हायची वॉरंटवर वॉरंट मिळत होती. शेवटी माझा लोचटपणा जिंकला, त्यांचा सभ्यपणा हरला. ते पाच मिनिटं आत गेले. बाहेर येऊन पाण्याचा तांब्या हातात देऊन म्हणाले, “हात धुऊन घ्या आणि जेवायला या.” मग जेवण झालं. आता झोपायचं कुठे? त्यांच्या घराला बाहेरून गच्चीत जाणारा जिना होता. त्यांनी एक मळकी पथारी माझ्या हातात ठेवली आणि ते म्हणाले “तुम्ही वरच झोपा; म्हणजे सकाळी लवकर सहाबिहाला निघायचं असेल तर तुम्हाला बाहेरच्या बाहेर जाता येईल. थोडक्यात काय, तर ‘सकाळी सहाच्या आत इथून चालते व्हा.' ठीक आहे. एवढं केलं हेच त्यांचे मोठे उपकार होते. मी सुशिक्षित वगैरे दिसत असल्यामुळे डॉक्टरांनी सभ्य भाषाही अजिबात सोडली नव्हती; पण लोचटपणा करणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याला निरुपाय म्हणून कोणी भीक घालतं तेव्हा त्याला काय वाटत असेल याची झलक मला त्या दिवशी डॉक्टरशेजारी बसून जेवताना आणि गच्चीवर झोपताना मिळाली. परिस्थिती विपरीत असेल तर स्वाभिमान वगैरे काही नसतं. मी पहाटे साडेपाचचा गजर लावून झोपलो आणि सहा वाजायच्या आत त्यांच्या पथारीची घडी दाराजवळ ठेवून तिथून निघालो.

याही पलीकडे अगदी थेट शब्दांत ‘आपण यांना इथे थांबायला नको आहोत' असंही ऐकायला मिळालं. भीमाशंकरच्या अलीकडे आहुपे गावात मी एका गृहस्थांकडे जरा पाणी प्यायला टेकलो होतो. घरची परिस्थिती बेताची. उन्हाळा असल्यामुळे त्यांना पाणी लांबवरून आणायला लागत होतं. त्या घरातल्या तरुण मुलाने मला प्यायला पाणी दिलं. तो मुंबईला कामाला होता आणि बहिणीच्या लग्नासाठी गावाला आला होता. माझ्याशी गप्पाही मारत होता. आता बहुतेक इथे आपल्याला वस्तीसाठी निवारा मिळेल अशी आशा मला वाटायला लागली होती. थोड्या वेळाने त्याची बहीण आणि आई लांबवरून पाण्याचे हंडे घेऊन आल्या. आई जरा त्रागा करणारी बाई होती. हंडे दारातच ठेवून ‘बाई बाई ीीी, जीव गेला माझा पाणी आणून! आधीच सकाळपासून पाय दुखतोय,' असं तिचं बोलणं चाललं होतं. घरच्यांच्या हे सवयीचं असावं. थोड्या वेळाने आत गेल्यावर तिने मुलाला माझ्याविषयी विचारलं असावं. मी चालत आलोय वगैरे त्याने तिला सांगितलं आणि तिला तो म्हणाला, “पाणी दे पाहुण्याला हातपाय धुवायला.” त्यावर ती बाई आतून वसकन ओरडून म्हणाली, “इथे माझा जीव जातो पाणी आणून! शिजवायला पुरत नाही पाणी, त्याला कुठून देऊ? जाऊ दे, मरू देत त्याला!” मी सॅक उचलली आणि त्या तरुण मित्राचा निरोप न घेता बाहेर पडलो.

स्वतःबद्दल काही सकारात्मक गोष्टीही या प्रवासात जाणवल्या. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात आणल्यास आपण स्वतःला किती ताणू शकतो याची जाणीव. या पायी प्रवासात खात्रीने सांगता येणारी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे अनिश्चितता. सगळंच अनिश्चित. बऱ्याच ठिकाणी नेमका मार्ग कसा आहे हे माहिती नसायचं. मार्ग माहीत नसल्यामुळे अंतरांचे नेमके अंदाज यायचे नाहीत. त्यामुळे वेळ किती लागेल याची खात्री नाही. कधी कुठे मुक्काम करायला लागेल, तिथे सोय होईल का, ती कशी असेल हे सगळंच अनिश्चित. याचा शारीरिक आणि मानसिक ताण यायचाच. विशेषतः शेवटच्या टप्प्यात. दोन महिन्यांहून अधिक चालून शरीर थकलेलं होतं. रोजच्या रोज या अनिश्चिततेतून मार्ग काढून मनही थकलेलं. शेवटची अंतरं संपता संपत नव्हती. अगदी उद्विग्न अवस्था व्हायची. पण गंमत म्हणजे त्या शारीरिक आणि मानसिक थकव्यातही मोहीम सोडून द्यावी, असा विचार क्षणासाठीही मनात आला नाही. मोहीम सुरू होण्याआधी मात्र मी याची खात्री देऊ शकलो नसतो.

शरीर आणि मन थकलेलं असताना पायपीट चालू ठेवणं हे पूर्ण मनावरच अवलंबून असतं. पण मन ताब्यात असतानाही शरीरच धोक्यात येण्याचा एक जीवन-मरणाच्या सीमेजवळ नेणारा प्रसंगही अनुभवायला मिळाला. काही योगायोगांमुळे त्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि काही योगायोगांमुळेच त्यातून बाहेरही पडलो.

नाणे घाटाजवळ पूर म्हणून एक गाव आहे. तिथल्या पुरातन देवळामुळे ते कुकडेश्वर म्हणूनही ओळखलं जातं. एका संध्याकाळी तिथे पोचलो. तुकाराम दिवटे तिथले प्रगतिशील शेतकरी. त्यांच्या घरी त्यांनी माझी अतिशय चांगली सोय केली. सकाळी निघताना त्यांच्या बायकोने बरोबर चटणी-भाकरीही बांधून दिली. पूर गावालगतची खिंड ओलांडली की आंबोली गाव. तिथे एक डोंगर चढला की कोकणात उतरणारा दऱ्या घाट सुरू होतो. कोकणात न उतरता दक्षिणेकडे अजून वर चढलं की ढाकोबाचा डोंगर. त्यापलीकडे दुर्ग. हा परिसर ट्रेकर्सच्या वर्तुळात बऱ्यापैकी परिचयाचा. पण मी तोपर्यंत कधीच तिथे गेलो नव्हतो. त्यामुळे तिथला नेमका भूगोल मला माहीत नव्हता. म्हणून स्थानिकांना वाट विचारत होतो. कधीही पुढल्या मार्गाची माहिती मिळवताना मी कमीत कमी दोन वेगळ्या ठिकाणी मिळालेली माहिती बऱ्यापैकी जुळली तरच ती ठाम असं धरायचो. या वेळी पूर गावात, आंबोलीत आणि तिथून दऱ्या घाटापर्यंत येणाऱ्या गाइडने दिलेल्या माहितीने माझा असा समज झाला, की ढाकोबाचा डोंगर चढून पुढे गेलं की दुर्गची वस्ती लागेल. इथे लोकांच्या ‘पुढे जाणं'चा अर्थ मी काढला होता, की डोंगरसपाटीवरून सरळ.

आंबोलीत आधी कुणी गाइड म्हणून यायलाच तयार नव्हतं. शेवटी एक तरुण मुलगा दऱ्या घाटाच्या वर पुढल्या वाटेला लावून देईपर्यंत यायला तयार झाला. वर सपाटीचीच चाल असल्याने मीही याला तयार झालो. ठरल्याप्रमाणे घाटाच्या वर थोड्या अंतरापर्यंत तो आला. तिथून वर जाणारी वाट दिसत होती आणि आता डोंगराची सपाटीही फार उंच राहिली नव्हती. पाण्याच्या चार बाटल्यांपैकी दोन शिल्लक होत्या. दुपारचे अडीच-तीन वाजले होते. म्हणजे दिवस बऱ्यापैकी हातात होता. उरलेली वाट खड्या चढाची होती. अधेमधे वळणं होती, कोरडे ओढे होते. त्यामुळे वाट नीट पाहत, खात्री करत जात होतो. हवेत प्रचंड उष्मा होता. त्यामुळे पाठीवरचं १२-१३ किलोचं वजन घेऊन चढताना सारखं विश्रांतीसाठी थांबावं लागत होतं. पाणी प्यावं लागत होतं. चार-सव्वाचारला एकदाचा सपाटीला लागलो. हुश्श झालं.

डोंगराचा पसारा मोठा होता. त्याचे दोन पाख मला दिसत होते. समोरच्या पाखावर दूरवर टेकाडाचा उंचवटा आणि त्यावर घरं, कसलासा टॉवर असं दिसत होतं. उजवीकडच्या दुसऱ्या पाखावर घरासारखं काही तरी दिसत होतं. दोन पाखांमधे दरी होती. दरीच्या पलीकडच्या बाजूला थोडं खालच्या अंगाला धनगरांच्या घरासारखं एक घर वाटत होतं. हे मला सगळ्यात जवळ होतं. म्हणून मी त्या दिशेने निघालो. आता जवळ एकच पाऊण लिटरची बाटली उरली होती. पंधरा-वीस मिनिटं चालल्यावर वाट गर्द झाडीत शिरली. तिला फाटे फुटायला लागले. नेमकी कुठली वाट त्या धनगराच्या घराकडे जाते ते कळेना. थोडा वेळ शोधाशोध करूनही खात्रीलायक रस्ता न कळल्यामुळे मी मागे फिरलो. त्यामुळे थोडं लांब असलं तरी आता त्या पहिल्या पाखावर दिसणाऱ्या टेकाडाकडे जाण्याशिवाय इलाज नव्हता. कारण तिथली वाट सरळसोट आणि उघडी होती.

परत फिरून त्या दिशेला लागलो. वाटेत दरीमध्ये उतरणारे कोरडे ओहोळ होते. त्यामुळे वाट डोंगराच्या कडेने, त्यांना वळसा घालत जात होती. पाहून वाटलं त्यापेक्षा अंतर खूप जास्त होतं. प्रचंड तहान लागत असल्याने जवळचं पाणी आता संपलं होतं, पण तरी आसपास मिळणारे संकेत चांगले होते. वाटेवर शेण पडलं होतं. गुरांच्या पायांचे ठसे होते. रानातून येणाऱ्या वाटा माझ्या वाटेला मिळत होत्या. वाट वस्तीच्या दिशेने जातेय अशी खात्री होत होती. ते टेकाडही लांबवर दिसत होतं. त्यामुळे पाण्याशिवायही उरलेलं अंतर रेटून नेऊ असं वाटत होतं.

पण एका ठराविक अंतरानंतर मनात शंका यायला लागली. मोठी झालेली वाट पुन्हा अरुंद व्हायला लागली होती. तिला वाटा फुटायला लागल्या होत्या. मनात एक शक्यता आली आणि धस्स झालं. आता दर पाच-दहा मिनिटांनी बसावंसं वाटत होतं. असाच थोडा वेळ पुढे चालल्यावर लक्षात आलं की मघाशी मनात डोकावून गेलेली शंका खरी ठरली आहे. मला दिसणारं ते टेकाड आणि आत्ता मी उभा होतो त्यामध्ये एक भली मोठी दरी होती! आधी वाटलं होतं तसं हे पठार त्या टेकाडापर्यंत सलग गेलेलंच नव्हतं. ते टेकाड दरीपलीकडच्या डोंगरावर होतं. ते दृश्य पाहिल्यावर अवसानच गळालं. मग मी वाटेवरलं शेण काठीने ढोसून पाहिलं. ते कोरडं ठक्क होतं. म्हणजे बऱ्याच काळात गुरंही इथून गेलेली नव्हती. आणि मला एकदम जाणवलं, आपल्याला फक्त गुरांचे ठसे दिसले होते, माणसांची पावलं दिसलीच नव्हती. डोकं सुन्न झालं.

थोडं पुढे जाऊन त्या दरीकडला कडा तपासला. अगदी तीव्र उतारावरून खाली जाणाऱ्या ढोरवाटाच फक्त दिसत होत्या. या वाटेने जाण्यात मोठा धोका होता. तो पत्करणं शहाणपणाचं नव्हतं. म्हणजे आता चालत आलेलं सगळं अंतर फिरून उलटं जाण्याला पर्याय नव्हता. आणि ते धनगराचं वाटलेलं घर तरी आता त्या झाडीतल्या वाटेने सापडणार का? जिथून गाइडबरोबर आलो त्या खालच्या आंबोली गावात जायचीही शक्यता नव्हती. कारण एक तर अंतर खूप होतं. वाटेतच अंधार झाला असता. आणि मुख्य म्हणजे गाइडने मला ज्या वाटेने आणलं तिथे पंधरा-वीस फुटांचा एक रॉक पॅच होता. त्यात पाय ठेवायला व्यवस्थित खोबणी असल्याने गाइडबरोबर चढताना विशेष काही वाटलं नव्हतं. पण त्या रॉकपॅचला खाली पूर्ण एक्सपोजर होतं. उतरताना धोका जास्त. त्यामुळे दमलेल्या अवस्थेत तिथून एकट्याने सॅक घेऊन उतरणं खूपच धोकादायक होतं.

म्हणजे आता ते धनगराचं घर शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. सूर्य कलायला लागला होता. घशाला पार कोरड पडली होती. डोळे कोरडे झाल्यासारखे वाटत होते. लघवी एकदम पिवळी आणि जळजळणारी झाली होती. तीही जराशीच. डीहायड्रेशनचे सगळे संकेत मिळत होते. थोडं चालायचो, बसायचो. कधी जांभळाची, करवंदीची पानं चावून ओलावा मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. असाच चालत डोंगराच्या दोन पाखांमधल्या दारापाशी आलो. अचानक माणसाचा आवाज आला. हे खरं की भास? काही मिनिटांनी पुन्हा आवाज ऐकू आला. मग कड्याजवळून आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर त्या दरीपलीकडे थोडं खालच्या बाजूला पुन्हा ते धनगराचं घर दिसलं. नीट न्याहाळल्यावर तिथे दोन मनुष्याकृतीही दिसल्या. मी ओरडून आवाज द्यायचा प्रयत्न केला, पण आवाजच फुटेना. तरी प्रयत्न करून ओरडलो. शेवटी त्यातल्या एकाचं लक्ष गेलं. तिथे कसा येऊ, असं मी पुन्हा ओरडून विचारलं. तो हातवारे करत ‘दरीला असा वळसा घालून या' असं सांगत होता बहुतेक. पण मधलं अंतर बरंच जास्त होतं. त्याचे हातवारे मला नीट कळत नव्हते. मी पुन्हा ओरडलो, “मी अडकलोय.. मला न्यायला या.” पण त्या माणसाने पुन्हा आधीचेच हातवारे केले. मग पुढे काहीच हालचाल दिसेना. तो माझ्याकडे बघतोय की त्याच्या कामाला लागला हे मला समजेना.

आता त्या झाडीत शिरण्याशिवाय पर्याय नव्हता. एवढाच दिलासा, की आता मी आणि ते घर एकाच दरीच्या अल्याड-पल्याड होतो. त्यामुळे दरीचा रेफरन्स न सोडता कड्याच्या बाजूने वळसा घालत गेलो की मी निश्चितपणे त्या घराच्या आसपास पोचणार होतो. पण ते घर थोडं खालच्या बाजूला असल्याने त्या भागात पोचल्यावर घरासाठी नेमकं कुठून खाली उतरायचंं हे शोधायलाच लागणार होतं. आणि ते ठिकाण वरून नेमकं लक्षात येईल का याची खात्री नव्हती. आता शरीराची स्थिती आणखी बिकट झाली होती. पावलंही धड पडत नव्हती. हळूहळू अर्धा तास चालल्यावर आता जवळच कुठे तरी खालच्या बाजूला ते घर असणार असा अंदाज आला. भोवताली दाट झाडी होती. एवढ्यात थोड्या अंतरावर एका झाडात मला हालचाल दिसली. निरखून पाहिलं तर लाल रंगाचा टी-शर्ट दिसल्यासारखा वाटला. तो हिरडा वेचण्याचा हंगाम होता. त्यामुळे पूर-आंबोली वगैरे परिसरातही रानात हिरडा गोळा करणारी बरीच मंडळी भेटायची. त्यामुळे ही व्यक्तीदेखील हिरड्यासाठीच आलेली असणार हे लक्षात आलं. माणसाची चाहूल लागल्यावर त्या क्षणी काय वाटलं ते मला सांगता येणार नाही. मी तिथेच अंग सोडून गुडघ्यावर बसलो आणि ‘ओ दादा, ओ दादा' अशा हाका मारायला लागलो. तो माणूस झाडावरून उतरला. थोडा साशंकपणे माझ्याकडे आला. जवळ आल्यावर मला काही तरी विचारू लागला. पण मी ‘सगळं नंतर सांगतो. आधी मला पाणी द्या, पाणी द्या,' असा धोशा लावला. शेवटी माझ्याकडच्या रिकाम्या बाटल्या घेऊन तो खालच्या वाटेने गेला. मला दिसत होतं त्याच घराची ही वाट होती. मी त्याच्या चाहुलीकडे कान ठेवून आडवा पडून राहिलो. पाच-दहा मिनिटांनी तो पाणी घेऊन आला. जवळपास दीड लिटर पाणी मी घटाघटा प्यायलो.

पलीकडून दिसणारा झाप म्हणजे काही त्याचं राहतं घर नव्हतं. तो माणूस खालच्या भिवाडे गावातला. डोंगरावर रानात गुरं सोडायला किंवा असं हिरडा गोळा करायला येतात तेव्हा दिवसभरासाठी असावा म्हणून बांधलेला तो तात्पुरता निवारा होता. आता सूर्य थोड्याच वेळात पूर्ण अस्तावला असता. मला तिथे पोचायला पंधरा-वीस मिनिटं जरी उशीर झाला असता तरी तो माणूस आणि मला त्या घरापाशी दिसलेले दोघंजण डोंगर उतरून त्यांच्या घरी निघून गेले असते. अगदी काठापर्यंत आलेलं प्रकरण योगायोगाने भेटलेल्या त्या माणसामुळे निभावलं. सकाळी पूर गावातून मजेत निघालो तेव्हा त्या दिवशी असं काही होईल याची कल्पना नव्हती. तसंच, आता आपलं काही खरं नाही असं वाटायला लागल्यावर कुणी तरी माणूस भेटेल आणि तो पाणी पाजेल याचीही आशा नव्हती. पण या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्या खऱ्या.

·

शारीरिक धोक्याचा नसला तरी मला आतून पार हादरवणारा एक प्रसंग पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर राजगड-तोरणा किल्ल्यांच्या परिसरात घडला. सह्याद्री पठाराच्या अगदी काठावरच्या भागातून चालत संध्याकाळी पाचच्या सुमारास मी सिंगापूर गावात पोचलो होतो. या परिसरातून कोकणातला रायगडही छान दिसतो. सकाळच्या अंदाजाप्रमाणे मी सिंगापूरला मुक्काम करणार होतो; पण तिथे पोचल्यावर टीमच्या सदस्यांशी फोनवर बोलणं झालं आणि पुढला मार्ग थोडा बदलायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी ह्रषीकेश यादव आणि स्वप्नाली धाबुगडे हे टीम सदस्य चार दिवस संगतीने चालण्यासाठी पुढल्या एका गावात मला भेटणार होते. दुसऱ्या दिवशी तिथे पोचायचं तर आज मला अजून थोडी मजल मारून केळद गावापर्यंत जाणं भाग होतं. हे सगळं ठरून निघाल्यावर केळदच्या वाटेवरच अंधार होणार हे निश्चित होतं. पण रस्ता व्यवस्थित होता आणि स्थानिकांनीही ‘जा निश्चिंतपणे' असा निर्वाळा दिला होता. त्यामुळे निघालो.

परिसर अतिशय नयनरम्य होता. त्या भागात दिसणाऱ्या सह्याद्रीच्या कड्यांना आणि एकापाठी एक पसरलेल्या डोंगररांगांच्या दृश्याला तोड नाही. त्यातून हा परिसर आपल्या इतिहासाने भारलेला. ज्यासाठी ही पायपीट करायला घेतली त्याविषयी भरून पावलो असं वाटायला लावणारं समाधान अनुभवत मी सह्याद्री पठाराच्या काठाने चाललो होतो. थोड्या वेळाने सांजावलं. डावीकडे थोडे दूरवर राजगड आणि तोरणा दिसत होते. खाली कोकणात रायगड-लिंगाणाचा परिसर दिसत होता. वाटेत कुसूरपेठ म्हणून गाव लागलं. पंधरा-वीस स्थानिक मंडळी जमली होती. बरेचसे तरुण. मोठं पातेलं चुलाण्यावर ठेवलं होतं. बोकडाचं जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. त्यांनी जेवायला थांबायचा आग्रह केला. पण यापुढे त्यांचा स्वयंपाक होणार कधी आणि मी जेवणार कधी? मला केळदला जाण्याची घाई असल्यामुळे मी थांबलो नाही.

थोडं पुढे गेल्यावर रस्त्याला तीव्र उतार होता. तो उतरून पुढे आलो आणि अचानक पाठून ‘ओ मामा, थांबा!' अशी एका बाईची हाक आली. मी जिथून उतरून आलो होतो तिथे उंचावर ती मला दिसत होती. तिच्या बरोबर दहा-अकरा वर्षांची एक मुलगी होती. बाईने तिला दंडाला धरलं होतं. मी जागेवरूनच ‘काय झालं' म्हणून विचारलं. ‘थांबा. बोकडाचं जेवण बनवतायत. जेवून घ्या,' असं ती म्हणायला लागली. मी म्हटलं, “नको ताई. मला केळदला पोचायचंय.” त्यावर ‘आता कुठे जाताय केळदला? खूप लांब आहे. रात्र होईल. रहा इथेच,' असा तिचा आग्रह चालू होता. मी पुन्हा ‘नको' म्हणून वळलो आणि चालायला लागलो. तेव्हा ‘ओ थांबा, थांबा' असं ती ओरडायला लागली. मी वळून पाहिलं. वेड लागल्यासारखं धावत, त्या मुलीला आपल्याबरोबर पळवत ती माझ्या दिशेने येत होती. त्या उतारावर संधिप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर माझ्या दिशेने धावत येणारी तिची अंधुक काळसर आकृती मी आयुष्यात कधी विसरणार नाही.

काही क्षणांतच ती मुलीला घेऊन माझ्यापर्यंत पोचली आणि पुन्हा आग्रह करायला लागली. आता तिचा आग्रह थोडा आक्रमक झाला होता. आता मला वेगळीच भीती वाटायला लागली. मी बाहेरचा माणूस. तोही अशा अवतारात. तिथे संध्याकाळी अंधारायला आलेलं असताना ही बाई मोठ्यामोठ्याने माझ्याशी बोलतीये, हे पाहून कुणाचा गैरसमज झाला असता तर लोकांनी मला झोडूनच काढलं असतं. तिचा तो आग्रहही आता मला विचित्र वाटायला लागला होता. आता हिच्यापासून त्वरित लांबच जायला पाहिजे, असं काही तरी इंट्युशन होऊ लागलं. मी पुढे काहीही न बोलता वळून ताडताड चालायला लागलो.

दहा-बारा पावलं पुढे गेलो आणि आता निवळलेल्या स्वरात त्या बाईचे शब्द माझ्या कानावर पडले. “ओ मामा, हिला घेऊन जाता का?” माझ्या छातीत धस्स झालं. त्या बाईला ती मुलगी मला विकायची होती! आतापर्यंतच्या प्रवासात बाहेरच्या लोकांनी लहान मुलं पळवणं, विकत घेऊन जाणं अशा प्रकारांविषयी मी ऐकलं होतं. एका ठिकाणी गावात शिरल्यावर स्थानिकांनी माझी संशयाने कसून चौकशी केली होती. नंतर खात्री पटल्यावर त्यांच्यातल्याच एकाने ‘रागावू नका, पण मुलं पळवण्याच्या घटना कधीमधी घडतात म्हणून आम्हाला संशय आला होता,' असा खुलासाही केला होता. किंवा कधी कुठल्या घरी एखाद्या लहान मुलाची गंमत करायला ‘तो काठीवाला बाबा तुला विकत न्यायला आलाय. त्या मोठ्या पिशवीत घालून घेऊन जाणारे तुला,' असं तिथलं कुणी म्हटल्याचं ऐकलं होतं. त्या विनोदावर घरच्या इतर मोठ्या माणसांबरोबर मी हसलोही होतो; पण त्या संध्याकाळी त्या बाईचे पाठून कानावर पडणारे शब्द ऐकून मी आतून पार हादरून गेलो. चालताना बराच वेळ पाठी वळून ती बाई येत नाहीये ना याची खात्री करून घेत होतो. आता जवळजवळ अंधार झाला होता. एरवी असं कातरवेळी चालताना थोडं नर्व्हस वाटलं असतं. पण तेव्हा ती बाई मागून येत नाहीये याचंच मला हायसं वाटत होतं. चांगले दोन-तीन किलोमीटर गेल्यावरच मी चालण्याचा वेग कमी केला. पुढे त्या केळद गावात एका ठिकाणी मुक्कामाची चांगली सोय झाली. हात-पाय धुतले, त्यांनी दिलेला चहा प्यायलो तेव्हा कुठे छातीतली धडधड कमी झाली. मग विचार आला, की या प्रकाराविषयी जाणून घ्यायला त्या बाईला चार प्रश्न विचारायला हवे होते. ती मुलगी तिची कोण? ती तिला का विकतीये? विकून तिला किती पैसे मिळतील? पण त्या परिस्थितीत मी इतका हादरलो होतो की तिथून लांब जाण्याशिवाय कुठलाच विचार माझ्या मनात आला नाही.

·

अडीच महिन्यांच्या भटकंतीत गाठोड्यात बांधून आणलेल्या अनुभवांमधले हे काही नमुने. मनावर कायमचे कोरले गेलेले. आजही ते क्षण जसेच्या तसे आठवतात आणि तेव्हा जाणवलेल्या भावना पुन्हा त्याच उत्कटतेने उसळतात. असे वेगळे, विचित्र अनुभव अधूनमधून येत राहिले; पण सलगपणे मिळालेला अनुभव म्हणजे माणसांच्या चांगुलपणाचा. या मोहिमेत मला किती चांगली माणसं भेटली याची गणतीच नाही. पूर्णपणे अनोळखी आणि अनाहूतपणे त्यांच्या दारात थडकलेल्या एका बाहेरच्या माणसाला त्यांनी खाऊ-पिऊ घातलं, आसरा दिला. मला पुढल्या मार्गाविषयी नीट समजावून सांगितलं. कधी योग्य वाटेला लागेपर्यंत स्वतः चालत बरोबर आले. काहीजण तर मी तिथून पुढे गेल्यावर दोन-तीन आठवडे अधूनमधून फोन करायचे. मी बऱ्याचदा मोबाइल रेंजच्या बाहेर असायचो. कधी तरी त्यांना माझा फोन लागायचा. याचा अर्थ माझी चौकशी करण्यासाठी ते सतत अधूनमधून माझा नंबर लागतो का हे पाहत असणार. एका रात्रीसाठी वस्तीला थांबलेल्या तिऱ्हाइताची इतकी आपुलकीने चौकशी!

मोहीम पूर्ण झाल्यावर ‘आपण हे करू शकलो' याचं समाधान खूप मोठं होतं, पण त्याचबरोबर समाधान होतं एवढ्या लोकांचा चांगुलपणा पाहायला मिळाल्याचं.

स्वतःकडे, जगाकडे आणि जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन त्यामुळे निश्चितच विस्तारला.

(अनुभव, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)

प्रसाद निक्ते







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

hemant01.11.25
This book is available on Kindle. https://shorturl.at/5pCR1

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results