मोहिदेपूर हे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तेराशे लोकवस्तीचं गाव. गावात पाय ठेवताच सामोरी येतात ती कुडाची घरं, चार ताटवे उभी करून त्यावर टीन टप्पर टाकून तयार केलेल्या झोपड्या. कच्चे रस्ते. तीस-पस्तीस घरांची वस्ती. घराघरांतून दिसणाऱ्या अठराविश्वे दारिद्य्राच्या खुणा. गावात ‘नाथजोगी' या जमातीची वस्ती. नाथजोगी, डवरी गोसावी, भराडी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा समाज भटक्या जमातीत मोडतो. साठ वर्षांहून अधिक काळ या जमातीचं या परिसरात वास्तव्य आहे. त्यामुळे या पंचक्रोशीत या समाजाच्या नावानेच हे गाव ओळखलं जातं.
नाथजोगी ही नागपंथी भिक्षेकरी जमात. यांची वस्ती पुणे, सोलापूर, सातारा, खानदेश, विदर्भ, मराठवाडा या परिसरात विखुरलेली. सुरुवातीपासून यांची बोलीभाषा मराठी. बहुतेक चालीरीती मराठा-कुणबी समाजाप्रमाणेच. फक्त मर्तिकप्रथा प्रेत पुरण्याची. ओसाड जागेवर ही जमात स्वत: गाव वसवत असल्याने वस्तीत सात आसरा ग्रामदेवता म्हणून दगडांचा देव उभा करतात. प्रेत पुरल्यावरही त्या जागेवर दगड उभा करून त्याला शेंदूर फासतात. बहिरोबा, जानाई, जोखाई, खंडोबा ही या समाजाची दैवतं.
गावोगावी जाऊन विविध सोंगं घेऊन हे लोकांची करमणूक करून भिक्षा मागतात. भिक्षा शक्यतोवर कोरडीच घेतात. अनेक भिक्षेकरी माळकरी आहेत. ते शेगाव-पंढरपूरची यात्राही करतात. आपल्या गरिबीच्या फाटक्या विश्वातही लोप पावत चाललेल्या लोककलेच्या अनेक प्रकारांचं जतन-संवर्धन करण्याचं महत्त्वाचं काम या समाजाने केलं आहे. त्यांची नवी पिढी आता शिकू लागली आहे. भटक्या-विमुक्त प्रवर्गात मोडत असूनही या दुर्लक्षित, उपेक्षित समाजाकडे सरकारचं पाहिजे तेवढं लक्ष गेलं नाही. शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपतींनी भराडी समाजाकडे गुप्तहेराचं काम दिलं होतं, याचा या समाजाला आजही अभिमान आहे. महाराष्ट्रात यांची लोकसंख्या लाखापेक्षा जास्त नाही. गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी प्रदेशांतही बहुरूप्यांची वस्ती आहे. यांच्यापैकी काही बहुरूपीपणाशिवाय शेती, शेतमजुरी, वेतकाम यांसारखे व्यवसायही करतात.
नागपूरमध्ये मारले गेलेले बहुरूपी ज्या गावचे होते ते हे मोहिदेपूर गाव. ते गट ग्रामपंचायतीमध्ये येतं. गावची गट ग्रामपंचायत पळशी सुपो. गावात सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा. एकही बांधीव मंदिर गावात नाही. गावात प्रवेश करताच उघड्या चौथऱ्यावर गावच्या सात आसरांचे दगड दिसतात. दगडांवरील शेंदूर उडालेला. याच आसरांना मरीमायचा चौथरा म्हणून ओळखलं जातं. रोज या मरीमायच्या दगडांचं दर्शन घेणारा सुपडा मगन नागनाथ (वय वर्षे २८), हसनराव दादाराव सोळंके (वय वर्षे ३०), पंजाबराव भिकाजी शिंदे (वय वर्षे २८) या तीन तरुण बहुरूप्यांना नागपूरच्या कळमना परिसरातील जमावाने संशयामुळे दगडांनी अक्षरश: ठेचून मारलं. या तीन बहुरूप्यांबरोबर असलेला त्यांचा अजून एक सहकारी पंजाबराव लक्ष्मण सोळंके (वय वर्षे ३५) या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. या घटनेने मोहिदेपूर गाव हादरून गेलं आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेची महाराष्ट्रात वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या पलीकडे विशेष दखल कुणी घेतली नाही. समाजमन किती संवेदनाहीन झालं आहे याचाच हा पुरावा. पण या घटनेच्या निमित्ताने त्या घटनेपलीकडे जाऊन या समाजाच्या आयुष्यात डोकावलं की दिसते ती अस्थिरता, दारिद्य्र अधिकच विषण्ण करणारं आहे.
मोहिदेपुरातील भराडी समाज पिढ्यान् पिढ्या बहुरूप्याचं सोंग घेऊन भिक्षा मागतो. गावातील सत्तर टक्के लोक भूमिहीन. त्यामुळे उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नाही. अठराविश्वे दारिद्य्र पाचवीला पुजलेलं. कुटुंबाच्या पोटाची खळगी भरायची तर लोककला सादर करून भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नाही. या गावातील बहुरूपी वर्षातील बराच काळ गाव सोडून त्यांच्यातील कला सादर करून भिक्षा मागण्यासाठी दूरवर भटकत असतात. अकोला, नागपूर, मुंबई, गोवा, पुणे, औरंगाबाद, सोलापूर अशा अनेक शहरांत आणि त्या शहरांलगत असलेल्या खेडेगावांत जात असतात. पावसाळ्यामध्ये सारे परत गावी येतात. वणवण भटकून जमा केलेल्या किडूकमिडूक पुंजीतून कुटुंबाची गुजराण करतात. थोडीफार शेतीची कामं करतात, शेतांवर मोलमजुरी करतात. ही कामं संपली, की दसऱ्यानंतर पुन्हा बहुरूप्याचं सोंग घेऊन नवनव्या गावांमध्ये कला सादर करण्यासाठी चालू लागतात.
बहुरूपी सोंगांचा चार-पाचजणांचा एक गट असतो. कधी कधी हा गट मोठाही असतो. देवीचा फोटो गळ्यात अडकवून भिक्षा मागणं याला ते ‘देवी मागणं' असं म्हणतात. काही रामलीला करतात, काहीजण हनुमानाचं सोंग घेतात, काहीजण वासुदेवाचा वेष करून, पिंगळ्याचा पेहराव घालून भिक्षा मागतात, तर काहीजण चेहऱ्याला भरपूर रंग लावतात, त्यातही पावडर अधिक थापतात; पान खाऊन ओठ लाल करतात नि साडी घालून लैला-मजनूचं सोंग करतात. वेगवेगळ्या व्यावसायिकांचंही सोंग घेतात. कोणी डॉक्टर, पोलिस, वकील, शिक्षकाचं किंवा शेटजी-भटजीचंही पात्र रंगवतात. किंगरी, चौंडक, खंजेरी, नाल, संबळ इ. पारंपरिक वाद्यांवर गाणी म्हणून दारोदार भिक्षा मागतात. कोणी धान्य देतं, कोणी आटा देतं, कोणी वस्तू देतं, कोणी पैसा देतं. दिवसभरात वणवण फिरून कधी शंभर-सव्वाशे तर कधी दोनशे रुपयेसुद्धा जमतात, कधी कधी काहीच मिळत नाही. शहरं वाढत चालली. लोकांकडे पैसाही बऱ्यापैकी आला, पण त्याचबरोबर मनोरंजनाची साधनं वाढली. गावाच्या छोट्या रचनेमध्ये टिकून असलेलं इतर समाजांसोबतचं नातं तुटलं. त्यामुळे शहरांमध्ये कला सादर करण्यासाठी येणारे बहुरूपी शहरवासीयांना परके वाटू लागले. आपली कला पाहायला त्यांना वेळ नाही हे लक्षात आल्यावर कला मागे पडू लागली आणि फक्त भिक्षेसाठी हात पुढे होऊ लागला. त्यामुळे आता कॉलनी किंवा अपार्टमेंटच्या परिसरात बहुरूप्यांना प्रवेश नसतो. हे बहुरूपी मग गरीब वस्तीत, खेडोपाडी जातात. हास्यविनोद, चेष्टा-मस्करी करून घरधन्याला खूष करतात, घरधनिणीला भरभरून आशीर्वाद देतात आणि दान मागतात.
असंच दान मागण्यासाठी ३ मे २०१२ला मोहिदेपुरातून पंधरा-वीस बहुरूपी नागपूरला गेले. पालं टाकून गावाच्या बाहेर त्यांनी वस्ती केली. त्यांच्यापैकी काही सावनेरला गेले तर काही नागपूरच्या गल्लीबोळांत फिरून लोकांचं मनोरंजन करून भिक्षा मागू लागले. ९ मेच्या सकाळी चेहऱ्यावर पावडर, लाली, गंध यांची रंगरंगोटी करून, अंगावर साडी चढवून सुपडा मगन नागनाथ, हसनराव दादाराव सोळंके, पंजाबराव भिकाजी शिंदे, पंजाबराव लक्ष्मण सोळंके हे चार बहुरूपी रिक्शात बसले. ऑटोवाल्याला म्हणाले, “आम्हाला जवळपासच्या गरीब वस्तीत घेऊन चल.,” ऑटोवाला नागपूरच्या कळमना भागात बहुरूप्यांना घेऊन आला. खाली उतरून ऑटोवाल्याचे पैसे देऊन या बहुरूप्यांनी वस्तीत प्रवेश केला नाही तोच संतप्त जमाव ‘पकडा साल्यांना...' म्हणत त्यांच्यावर चाल करून आला. हा काय प्रकार आहे हे न समजल्यामुळे चारही बहुरूपी जीव मुठीत घेऊन पुढे धावू लागले. जमाव त्यांच्या मागे. नवीन वस्ती. धड रस्ते-गल्ल्या माहीत नाहीत... पाठीमागून संतप्त जमावाचा दगड-विटांचा वर्षाव.... साडी नेसल्याने त्यांना जोरात पळताही येत नव्हतं. चारहीजण जमावाच्या तावडीत सापडले. जमावाने त्यांना खूप बदडलं, दगडधोंड्यांनी मारलं. “आम्ही चोर नाही, आम्हाला का मारताय? आम्हाला सोडा, आमच्यावर दया करा,” अशी हात जोडून विनवणी ते त्या जमावाला करत होते; परंतु संशयाने पछाडलेला जमाव काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. कोणी तरी पोलिसांना फोन केला. दहा-पंधरा मिनिटांमध्येच पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत दोघांनी प्राण सोडला होता. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून इतर दोघांना बाहेर काढलं, पोलिस व्हॅनमध्ये टाकलं. जमावाने पोलिस व्हॅनवरच हल्ला केला. व्हॅनमधून पंजाबराव शिंदे याला ओढून बाहेर काढलं व दगडांनी ठेचून मारलं. पंजाबराव सोळंके पोलिस व्हॅनमध्ये होता. त्यालाही व्हॅनमध्ये घुसून लोखंडी सळईने मारलं, पोटामध्ये सळई खुपसली. हतबल पोलिसांच्या डोळ्यांदेखत ही मारहाण सुरू होती. जमावाच्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या पंजाबराव सोळंके याने स्वत:च भेदरलेल्या अवस्थेत त्या घटनेचं वर्णन केलं.
पण हे नेमकं का घडलं? कळमना परिसरातले रहिवासी असे क्रूर का बनले?
मध्यरात्रीनंतर अंगाला ऑइल चोपडलेले भामटे येतात आणि महिला-मुलींवर अतिप्रसंग करतात, चोऱ्या करतात, अशी अफवा नागपूरच्या कळमना परिसरात पसरली होती. झोपडपट्ट्या असलेल्या या भागातील रहिवासी गेल्या दोन आठवड्यांपासून कमालीच्या दहशतीखाली वावरत होते. रात्री-बेरात्री या परिसरात अनोळखी व्यक्ती दिसल्यास तिला बदडण्यातही येत होतं. घरात घुसून हे भामटे महिलांवर कसे अत्याचार करतात त्याच्या कहाण्या तिखट-मीठ लावून सांगितल्या जात होत्या. त्यामुळे साडी नेसून वस्तीत आलेले हे बहुरूपी म्हणजे त्याच टोळीतील लोक असले पाहिजेत, असा संशय वाटल्याने जमावाने मागचा-पुढचा विचार न करता, कोणतीही चौकशी न करता आपली मर्दुमकी दाखवली. मुळात साडी नेसून आलेल्या व्यक्ती या किंकर (तृतीयपंथी) नाहीत तर चांगले जवान पोट्टे आहेत, हे समजल्याने संतप्त झालेला जमाव अधिकच चेकाळला आणि पराकोटीला गेलेल्या या संशयामुळे आपली व आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी घेतलेलं परंपरागत बहुरूप्याचं सोंग त्यांच्या केवळ अंगावरच बेतलं नाही तर त्यांना यमसदनी घेऊन गेलं. खऱ्या बहुरूप्यांना आपला जीव हकनाक गमवावा लागला.
सगळं गावच आकंठ दु:खात बुडालेलं. दोन दिवस गावातील चुली बंद. गावात शोकसभा भरते. भरल्या कंठाने सर्वचजण घटनेचा निषेध नोंदवितात. ‘आमच्या बहुरूपी बांधवांनी असं काय पाप केलं?' असा सवाल प्रत्येकजण करतोय. कोणाशी काय बोलावं, काही सुचत नाही. घटना कशी घडली, हा समाज अद्याप इतका मागे का, याबाबत जाणून घेण्यासाठी समाजाचे कामधंदे, रोजगार, शिक्षण, सामाजिक सुधारणा याबाबत गावातील तरुणांशी संवाद साधला. या दुर्दैवी घटनेनंतर गावातील तरुण पिढीच्या डोळ्यांत एकीकडे आपल्या बहुरूपीपणाच्या जगण्याची चीड, संताप आणि लाजही दिसत होती, तर दुसरीकडे अर्धवट शिक्षणामुळे गावात काही काम नसल्यामुळे पोटापाण्यासाठी या धंद्याशिवाय पर्यायही नाही, अशी अस्वस्थ करणारी भावनाही होती.
हत्या झालेल्या बहुरूप्यांच्या दारात खाट टाकून बसलो. येणारे-जाणारे जिल्ह्यातील राजकारणी नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते कोरडी सहानुभूती दाखवत होते. काहींनी प्रत्यक्ष आर्थिक मदत दिली तर काहींनी मदतीचं आश्वासन दिलं. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुरूपी सुपडा मगन नागनाथ सर्वांत तरुण होता. सुपडाचं घर कुडाचं. त्यावर मोजून सहा टिना. घरात अठराविश्वे दारिद्य्र. हे बीपीएल कार्डधारी कुटुंब. सुपडाच्या घरात त्याची आई, चार बहिणी. त्यांच्यापैकी दोन बिनलग्नाच्या. सुपडा गेल्याने त्याची आई कामिनीबाईंचा जगण्याचा आधारच तुटला आहे. त्यात भर म्हणून मारल्या गेलेल्यांमध्ये त्यांच्या मुलीचा नवरा हसनरावही. कामिनीबाई आक्रोश करत सुपडाची कहाणी सांगू लागतात...
“सुपडा लहान होता तवाच त्याचा बा वारला... चार बहिणींना हा एकुलता एक भाऊ. भिक्षा मागायले जातो म्हणाला... आपल्या पोटाची सोय होईन... सख्ख्या बहिणीच्या मालकासोबत नागपूरला गेला... दोनच महिन्यांपूर्वी त्याचं लगीन झालेलं... पाऊस पडायले सुरू होण्यापूर्वी पंधरा दिवसांत परत येईन म्हणून गेला... पोरगाही गेला अन् पोरीचं कुकूबी पुसलं गेलं... घरात आता कर्ता माणूसच उरला नाय... मायबापहो, कुणी सांगंन का, आम्ही काय गुन्हा केला?”
सुपडाची पत्नी अनिता जेमतेम विशीतली. संसारवेलीवर फूल फुलण्याआधीच ती विधवा झाली. सुन्न अवस्थेत ती पडून आहे. सुपडाच्या हत्येमुळे त्याचा परिवारच उघड्यावर पडला आहे. “औंदा पाऊसपाणी सुरू व्हायच्या आधी गळक्या घराला डागडुजी करू, असं सुपडा म्हणायचा...” असं म्हणून त्याची आई पुन्हा हंबरडा फोडते. दोन्ही हातांनी कपाळावर मारून घेते. “माव्हं नशीबच फुटकं... मी कोणाले कशाले दोष देऊ...?” असं म्हणून पुन्हा पुन्हा रडत राहते. त्या मातेच्या आर्त किंकाळ्यांनी मन कासावीस होतं. त्याहूनही अस्वस्थता येते ती या समाजाचं अस्थिर, असुरक्षित जगणं पाहून.
सुपडा नागनाथची मोठी बहीण संगिता ही हसनराव सोळंकेची बायको. हसनरावला चार मुलं. घरात वृद्ध आई. हसनरावच्या जाण्याने हे कुटुंबही उघड्यावर पडलं आहे. चिल्लीपिल्ली ‘बाबा-बाबा' म्हणून रडताहेत. ‘मपल्यासाठी बाबा शाळंचा ड्रेस आण्णार हाये.... माह्यासाठी बाबा पाटी आण्णार हाये...' ही कधी काळी बापाने पोरांना दिलेली आश्वासनं या चिल्ल्यापिल्ल्यांच्या तोंडून ऐकताना गलबलून येतं. या चिल्ल्यापिल्ल्यांची आई संगिता पती गेल्याचं आणि लाडाचा भाऊही गेल्याचं दु:ख घेऊन वेड्यापिशासारखी बडबडते आहे, पोरांच्या तोंडावरून हात फिरवत ‘उद्याले यांना मी नाय बहुरूपी बनवणार...' असं उद्वेगाने म्हणतेय. एका घरातील रडण्याचा आवाज थांबला की दुसऱ्या झोपडीतून रडण्याच्या आर्त किंकाळ्या कानी येत राहतात.
पंजाबराव शिंदे या तरुणाच्या कुटुंबाची अवस्था वेगळी नाही. कदाचित याहूनही बिकट. ‘झोपडी' या शब्दालाही लाजवेल असं त्याचं छोटंसं पाल. त्यात त्याची पत्नी सयाबाई आपल्या दोन लहानग्या मुलींना जवळ घेऊन डोक्याला हात लावून सुन्नावस्थेत बसलेली. जवळच त्याचे वृद्ध आई-वडील. आजूबाजूच्या बायका जवळ बसलेल्या. घरात एकच शांतता. या कुटुंबाला साधं दारिद्य्ररेषेखालचं रेशनकार्डही मिळालेलं नाही. कारण जेव्हा प्रत्यक्ष पाहणी झाली तेव्हा पंजाबरावचं कुटुंब भिक्षा मागण्यासाठी बाहेरगावी गेलं होतं. त्यामुळे कार्डासाठी त्यांची नोंदच करून घेण्यात आली नाही... पंजाबरावांच्या बायकोला- सयाबाईला दिवस गेलेत... “ती तीन महिन्यांची पोटुशी हाये” कोणी तरी बाई गर्दीतून माहिती पुरवते. आजूबाजूच्या बायका सयाबाईला धीर देऊन सांगताहेत- “बये, पोटातल्या पोराकडं ध्यान दे... बघ, तुव्हा पंजाबच तुझे पोटी जन्मा येईल!”
प्रत्येक कुटुंबाची हादरवून टाकणारी कहाणी... ऐकून मन अक्षरश: सुन्न झालेलं.
बहुरूपी चोर नाहीत. पंचक्रोशीत कोणत्याही चोरीचा गुन्हा त्यांच्यावर नाही. दोन-तीन महिन्यांतून गावाकडे परत यायचं, भिक्षा मागून आणलेले पैसे आणि धान्य कुटुंबासाठी वापरायचं, महिना-पंधरा दिवस घरी राहिल्यावर पुन्हा बहुरूप्याचं सोंग घेण्यासाठी नव्या शहरात पालं टाकायची, हा या लोकांचा वर्षभराचा दिनक्रम. त्यांच्या बायका गावाकडेच राहून घर सांभाळतात. पुरुषांसोबत नव्या शहरात, नव्या वस्तीत शक्यतो त्या जात नाहीत. गावात राहून म्हशी सांभाळायच्या हा या महिलांचा मुख्य धंदा. भाकड म्हैस विकत घ्यायची, तिला खाऊ-पिऊ घालायचं व ती गाभण झाल्यावर चांगल्या किमतीला विकायची. गावात पाण्याची टंचाई. त्यात बहुतेकांकडे जमीन नाही. त्यामुळे या पाळीव जनावरांसाठी स्वत:च्या मालकीचा चारा नाही. मग पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या शेतातील, बांधावरच्या गवतावर या महिलांना अवलंबून राहावं लागतं.
सोंग करून भिक्षा मागणं आता समाजाने थांबवलं पाहिजे असं गावातील काही तरुणांना वाटतंय. एम.ए.,डी.एड.पर्यंत शिक्षण घेतलेला याच समाजातला भावलाल रामलाल सनसे हा तरुण शिक्षकाची नोकरी करतो. गावातील काही तरुण भावलालकडे बघून ‘बहुरूपी बनायचं नाही', असा निश्चय करून शिक्षण घेत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये गेल्यावर बहुरूप्यांच्या पोरांना डोक्यावरचे बायकांसारखे वाढवलेले लांब केस कापावे लागतात. उद्या नोकरी नाही व कामधंदाही होणार नाही म्हणून बरेच बहुरूपी त्यांच्या पोरांना कॉलेजमध्ये शिकायला पाठवत नाहीत. ‘घरी शेती नाय... पाणी नाय... मग बरा आहे आपला लोककलेचा धंदा. पोटाले तर मिळते,' अशी भावना काही बहुरूपी बोलून दाखवतात.
गावाचं सरपंचपद भराडी समाजाकडेच आहे. रमेश साहेबराव शिंदे हा बहुरूपी समाजाचा तरुण गावचा सरपंच आहे. गावात तरुणांसाठी या परिसरात काही कामधंदे सुरू व्हावेत असं त्यांना तीव्रतेने वाटतंय. गावातील महिलांसाठी त्यांनी बचतगट सुरू करून त्यांना काही शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. गावातील कित्येक तरुणांना नोकरीचं आकर्षण आहे; पण शिक्षणाअभावी ते शक्य नाही. पोटासाठी नाइलाज म्हणून साडी नेसून बहुरूप्याचं सोंग त्यांना घ्यावं लागतं. सोंग घेऊन जगण्याचा आता वीट आला आहे, अशीही प्रतिक्रिया वय झालेले काही बहुरूपी देत होते. एक बहुरूपी म्हणाला, “ज्यांच्या दारात भिक्षा मागायला जातो त्यांना माय-माऊली म्हटल्याशिवाय आम्ही भिक्षा मागत नाय. पण आताचा समाज साडी घातलेल्या लैला-मजनूच्या रूपातील बहुरूप्यांना किंकर समजतो. सुशिक्षित म्हणवणारी माणसं नको त्या अश्लील काँमेंट्स बहुरुप्यांवर करतात.”
“शासनाने बहुरूप्यांना लोककलावंताचं ओळखपत्र द्यावं, समाजाचं चांगल्या तऱ्हेने पुनर्वसन व्हावं,” अशी मागणी सरपंच रमेश शिंदे करतात.
जुन्या रूढी-परंपरेत अडकलेला हा दुर्लक्षित भटका समाज खऱ्या अर्थाने अनाथ आहे. या अनाथांना खऱ्या नाथांची (नेतृत्वाची) गरज आहे, असं वाटून गेलं.
गावातील संतोष शिंदे या तरुणाची भेट झाली. तो कला शाखेत तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. तो म्हणाला, “काही लोकांनी संशयित चोर म्हणून आमच्या लोकांना मारलं; पण लोककलेचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या एकालाही या घटनेचा जाहीर निषेध करावासा वाटला नाही. नावाजलेला एकही लोककलावंत किंवा अभ्यासक बहुरूप्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आला नाही. कोणालाच कसं काही वाटत नाही? सारा समाजच बथ्थड झालाय का?”
संतोष शिंदेच्या या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नव्हतं.
“शासनाने आमच्या समाजाकडे पूर्ण दुर्लक्षच केलं आहे. गावात साठ टक्क्यांहून अधिक लोक दारिद्य्ररेषेखालचं जीवन जगतात, पण मोजून वीस कुटुंबांकडेच बीपीएल कार्ड आहे. जुनं रेशनकार्ड बदलून मिळण्याच्या नावाखाली आज अनेकांकडे नवीन रेशनकार्डच नाही. तालुक्याला जाऊन ॲफिडेव्हिट करून नवीन रेशनकार्ड काढावं लागतं. खूप कुटाणे करावे लागतात. आमच्या गरीब, अशिक्षित लोकांना यातलं काही समजत नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ येते. कित्येक वेळा आमच्यातले काही बहुरूपी चार-चार महिने गाव सोडून बाहेर भिक्षा मागत असतात. नेमका त्याच वेळी दारिद्य्र सर्व्हे झाला की त्यांची नोंद कोणी करून घेत नाही. त्यामुळे नियमात बसत असूनही अनेकांना बीपीएलचं कार्ड मिळत नाही अशी परिस्थिती आहे.” यावर त्याचा तोडगाही तो सुचवतो : “आमच्या समाजाने आता बदलायला पाहिजे, साडीवर भिक्षा मागणं बंद केलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. त्यातून तरी किमान हा समाज काही प्रमाणात बाहेर येऊ शकेल.” त्याच्या तळमळीचं कौतुक वाटतं, पण हे दुष्टचक्र थांबणार कसं कळत नाही.
गावातील ज्येष्ठ लोककलावंत श्रावण गणपत सोळंके यांची भेट झाली. वय नव्वदीच्याही पुढे. डोळे थकलेत पण कान शाबूत. हातात किंगरी वाजविण्याची कला. तुकडोजी महाराजांसोबत खंजेरी व किंगरी वाजविल्याचं ते अभिमानाने सांगतात. जुन्या आठवणींची पुरचुंडी सोडून त्यात रमतात. बहुरूप्यांना समाज कसा डोक्यावर घेत होता, त्यांच्यातल्या कलेची कशी कदर होत होती, लोकही भरभरून पस्तुरीचं दान कसं द्यायचे... चार महिने दान मागितलं की आठ महिने पुरायचं, इतकी दानत लोकांमध्ये होती. आता बहुरूप्यांकडे भिकाऱ्याच्या नजरेने बघतात याचं वाईट वाटतं... असं बरंच काही बोलून दाखवतात. त्यांच्या बोलण्यामुळे आपण प्रश्नाच्या खोलात जाऊ लागतो; पण उत्तर मात्र सापडतच नाही.
बोलता बोलता श्रावण बाबाजींनी घरातून किंगरी आणली, किंगरीची तार लावून त्यावर घुंगराची काठी अलवार फिरवत ‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला... मुँह मोड़ चला, दिल तोड़ चला, बड़ा धोखेबाज निकला....' ही धुन वाजवताच मी सहज म्हटलं, “व्ही. शांतारामच्या ‘दो-आँखे बारह हाथ'मधलं संध्यावर चित्रित झालेलं हे गाणं लताबाईंनी गायलं आहे.” बाबाजी म्हणाले- “व्वा, क्या बात है! मग बाबाजींनी तुकडोजींचं भजन किंगरी आणि खंजेरीवर गाऊन दाखवलं.
बहुरूपी अनेक पात्रांचं सोंग करून दाखवतात. देवराव बाबुराव सोळंके हा असाच हरहुन्नरी बहुरूपी. कधी तंट्या भिल्ल, राधा गवळण, गर्भवती स्त्री, बाळंतीण, रडणारं लहान मूल, लैला-मजनू अशी अनेक सोंगं घेण्यात एक्स्पर्ट. देवराव सांगू लागतो... “साडी घालून आम्ही घरोघरी कशा गमतीजमती, थट्टामस्करी करतो-” बहुरूप्यांचं एक प्रसिद्ध गीतच त्याने गाऊन दाखवलं.
लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला...
मावशीबाई तुम्ही लग्नाला चला...
त्याचे हावभाव पाहून मला हसायला येतं, पण रोजच्या कामाच्या रगाड्यात हे ऐकत बसायला कुणाकडे वेळ आहे, हा प्रश्नही मनात उमटतोच.
“आम्ही बहुरूपी अशी अनेक विनोदी गाणी म्हणतो. ती म्हणताना त्यातील आशय जिवंत करण्यासाठी निरनिराळी वेशांतरं करतो. या भूमिकांना साजेसा अभिनयही करतो आणि आवाजातही चढउतार करून घेतलेलं सोंग यथायोग्य वठवतो. कधी पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाजही काढतो. आमच्या मनोरंजनात्मक कलेवर खूष होऊन शेर-सव्वाशेर शिधा, धान्य लोक देत असत. आता दोन-पाच रुपयांपेक्षा जास्त दानत लोकांमध्ये दिसत नाही,” अशी खंतही देवराव सोळंके याने बोलून दाखवली.
वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकणारा संजय हसनराव चव्हाण हा या वस्तीतील तरुण कविता करतो, ब्रेकडान्सही करतो. त्याने कॉलेजमध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत. त्याच्याशी गप्पा मारत मारत वस्तीच्या बाहेर आलो. तो म्हणाला, “आमचा समाज जर एकसंध नि संख्येने मोठा असता तर या घटनेनंतर सारा महाराष्ट्र राजकीय नेत्यांनी दोन दिवस बंद केला असता. सर्वत्र निषेधाचे ढोल वाजले असते. पण आमचा समाज कोणाच्याही राजकीय सोयीचा नसल्याने एकाही राजकीय पक्षाला या घटनेचं मनापासून काहीच वाटलं नाही. प्रशासन थोडंही जागं झालं नाही. कुणाच्याही अंगावर साधा ओरखडासुद्धा उमटला नाही याचं खूप वाईट वाटतं...”
त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. त्यावर मी त्याला एवढंच म्हणालो, “कविता करतोस ना? तुझी ही तळमळ कवितांमध्ये मांड. तुझी कविताच तुझ्या प्रश्नांना उत्तरं देईल....”
मला मनापासून वाईट वाटत होतं, की आपण त्याला त्याच्या प्रश्नांची खरी उत्तरं नाही देऊ शकत. इथे रूपांची हत्या होते- खरे बहुरूपी मारले जातात आणि रोज चेहऱ्यांवर खोटे मुखवटे घातलेले लोक राजरोसपणे समाजात वावरत असतात. मुखवट्यांच्या आड लपलेल्या खोट्या बहुरूप्यांना आपण कधी ओळखणार? या खोट्या बहुरूप्यांना ठेचून मारण्याची खरी हिम्मत समाजामध्ये कधी येणार? म्हणतात ना-
जिनकी दीवारें शिकिस्था थी वे दर अच्छे लगे
जाने क्यों सैलाब को मिट्टी के घर अच्छे लगे
किस कदर गिर चुका है मियारे शिरका वरियत...
शर पसंत अपराधकों बहुरूपीयों के सर अच्छे लगे...
अपराध्यांवर यथावकाश पोलिसी कारवाई होईल, बहुरूप्यांचे हकनाक गेलेले जीव मात्र पुन्हा परत येणार नाहीत. पण यातून दिवसेंदिवस संवेदनाहीन होत चाललेला आपला समाज व तेवढंच बथ्थड झालेलं शासन काही बोध घेणार आहे का? की पुन्हा काही काळानंतर अशाच घटना आपल्या समाजात घडत राहणार? स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही गावकुसाबाहेरच्या या भटक्या समाजाला आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणार आहोत की नाही?
(अनुभव, जून २०१२मधून साभार)
