
दिल्लीतून एक पत्र जारी झालं आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसला एक नवा कॅप्टन मिळाला. या कॅप्टनचं नाव हर्षवर्धन सपकाळ. हे नाव जाहीर झालं आणि बहुतेकांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कोण हे हर्षवर्धन सपकाळ?
विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेत बदल होणं स्वाभाविक होतं. तसे संकेतही मिळत होते. नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवलाही होता. पण नेहमीच्या ढिसाळ शैलीने काँग्रेसवाले घोळ घालत राहिले. नवा प्रदेशाध्यक्ष तुलनेने तरुण असावा असा एक मतप्रवाह होता आणि त्यानुसार कोल्हापूरचे सतेज पाटील, सांगलीचे विश्वजित कदम आणि लातूरचे अमित देशमुख अशी तीन नावं प्रामुख्याने चर्चेत होती. आणखीही काही नावं होती; पण या तिघांना दिल्लीतून विचारणा झाली असं म्हणतात.
कोणत्या कारणांमुळे ही तीन नावं मागे पडली याच्या वेगवेगळ्या वदंता आहेत. मात्र यातील सतेज पाटील यांचा गांभीर्याने विचार झाला असं सूत्र सांगतात. त्यांचा कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील दबदबा, संस्थात्मक-आर्थिक ताकद, तसंच मतदार व पक्षातील लोकांची स्वीकारार्हता पाहता ते प्रदेशाध्यक्ष होतील, असं वाटत होतं. प्रत्यक्षात त्यांचंही नाव बाजूला राहिलं आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर झालं.
महाराष्ट्राच्या राजकारणात घराण्यांना मोठं महत्त्व आहे. पूर्वी ही घराणेशाही फक्त काँग्रेस पक्षात होती. पुढे इतर पक्षांना सत्ता मिळत गेली, तसतशी घराणेशाही इतर पक्षांमध्येही शिरली आणि स्थिरावली. शिवाय सत्ता इतर पक्षांकडे जातेय असं पाहून काँग्रेसमधील अनेक घराणी अन्य पक्षांमध्ये विशेषत: भाजपमध्ये गेली. राजकीय घराण्यांकडे पिढीजात आलेली ताकद, प्रभाव आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क असतं. सहकारी वगैरे संस्था ताब्यात असतात. ती चालवणारी आणि लोकांना जोडून घेणारी यंत्रणा असते. त्यामुळे राजकारणात ओळख निर्माण करण्याची निम्मी अधिक लढाई आधीच पार झालेली असते. त्यामुळे पक्षांचा; विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकारच्या पक्षांचा कल घराणेशाहीतून आलेल्या नेत्यांना निवडणुकीतील तिकिटं, संघटनेतील पदं आणि प्रदेशाध्यक्ष वगैरेसारखी महत्त्वाची पदं देण्याकडे असतो.
पण यंदा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रथेला फाटा देऊन काँग्रेसच्या एकनिष्ठ आणि सच्च्या कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष केलं. अर्थातच या नेमणुकीमागे राहुल गांधींची भूमिका महत्त्वाची असणार हे उघड आहे. काही दिवसांपूर्वी मी या पोर्टलवर एक लेख लिहिला होता. त्यात राहुल गांधी यांनी पक्षाचा क्रूस एकट्याच्या खांद्यावर घेतला आहे आणि ते एकटेच लढायला निघाले आहेत असं म्हटलं होतं. (वाचा - विधानं वादग्रस्त ; शिवाय राजकारण शून्य) जोपर्यंत त्यांच्यासारख्या लढाऊ तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या-नेत्यांना बळ देऊन ते पक्षात महत्त्वाची पदं देत नाहीत, तोवर काँग्रेस पक्ष उठून उभा राहू शकत नाही, असं म्हटलं होतं. काँग्रेसचा कायापालट करून त्याला आपल्या उद्दिष्टांसाठी लढण्यास सक्षम करायचं असेल तर तळमळीच्या, तळागाळातून येणाऱ्या, बहुजन-मागास समाजातील कार्यकर्त्यांना मोठी महत्त्वाची पदं नि जबाबदाऱ्या द्याव्या लागतील, असं म्हटलं होतं. या म्हणण्याची सही सही पूर्तता हर्षवर्धन यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमून झाली आहे.

हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या सत्ताबाज लोकांपैकी नाहीत. ते विदर्भ-मराठवाडा सीमेवरील बुलडाण्यातले तळमळीचे कार्यकर्ते आहेत. ते निव्वळ निवडणुकीचं राजकारण करणारे कार्यकर्ते नाहीत. सामाजिक भान असणारे, वैचारिक निष्ठा बाळगणारे, अभ्यासू आणि विविध परिवर्तनवादी चळवळींशी जोडलेले कार्यकर्ते आहेत. महात्मा गांधींना जसा काँग्रेस कार्यकर्ता हवा होता, तसा हा कार्यकर्ता आहे. या हिऱ्यावर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची धुरा सोपवली हे विशेषच म्हणायचं. एरवी मोठा पराभव झाला की पक्ष सोपे मार्ग अवलंबतात आणि बुडणारा काडीचा आधार शोधतो तसे निर्णय करतात. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष खरोखरच संकटात असताना त्यांनी जनतेमध्ये फारशी राज्यव्यापी ओळख नसणाऱ्या एका कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, हे आश्चर्य वाटण्याजोगंच आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यव्यापी ठसा वगैरे नसला तरी हा काही कच्चा खिलाडी नाही. १९८० पासून ते स्थानिक पातळीवर सक्रिय राजकारणात आहेत. ते त्यावर्षी पहिल्यांदा बुलडाण्याच्या जिल्हा परिषदेत निवडून गेले. पुढे १९९६ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वात तरुण जि. प. अध्यक्ष होण्याचा मान त्यांच्याकडे जातो. २००९ च्या विधानसभेसाठी त्यांचं नाव बरंच चर्चेत होतं, पण त्यांना तिकिट मिळालं नाही. २०१४ मध्ये मात्र मिळालं आणि ते लीलया निवडून आले. त्यांची निवडणूक जनतेनेच लढवली आणि त्यांना जिंकून आणलं. त्यांच्यासाठी कार्यकर्ते चहाचीही अपेक्षा न ठेवता काम करतात म्हणे! त्यांची केवळ प्रतिमाच ‘स्वच्छ' नाही, तर ते खरोखरच स्वच्छ आहेत, असं त्यांच्या जवळचे लोक छातीठोकपणे सांगतात. अशा प्रकारचे लोक राजकारणात किती शिल्लक असतील? हर्षवर्धन त्यातले एक असणार!
हर्षवर्धन यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते गेल्या चाळीस-पन्नास वर्षांतील काँग्रेसच्या चाकोरीतले नाहीत. एका दमात फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेऊन पुढे वाट्टेल ते बोलणारे ते वाचाळ नेते नव्हेत. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बाबा आमटेंचं आनंदवन इथपासून ते मेधा पाटकरांपर्यंत ते अनेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्या तोंडी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, साने गुरुजी, गांधी-विनोबा ही नावं असतात. देश-समाज-महाराष्ट्र यांची काळजी त्यांच्या बोलण्यात असते. शेतकरी-मागास-आदिवासी हे त्यांच्या प्राधान्यक्रमावर असतात. कुपोषण-शिक्षण-शेती आणि जातिधर्मांतली तेढ हे त्यांच्या काळजीचे विषय असतात. ते भरपूर वाचत असतात. अभ्यास करत असतात, मुद्द्याचं बोलत असतात. असा नेता काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून मिळाला हे त्यांचं नशीबच. अन्यथा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे वाचणारे-अभ्यास करणारे-मुद्द्याचं बोलणारे नेते काँग्रेसमध्ये विरळाच. हर्षवर्धन यांच्यामुळे काँग्रेसचं हे रूप बदललं तर खऱ्या अर्थाने या पक्षाचा कायापालट होईल.

हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातील इनिंग युवक काँग्रेसमधून सुरू झाली. पण युवक काँग्रेस म्हटल्यानंतर जी प्रतिमा आपल्या मनात तयार होते, त्याला अगदीच विसंगत त्यांचं वागणं बोलणं आहे. २००९मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही तेव्हा त्यांनी बंडखोरी करावी असं सोबत्यांना वाटत होतं. पण ते पक्षनिष्ठ राहिले. २०२४च्या लोकसभा-विधानसभेत मित्रपक्षाला जागा सुटली त्यामुळे त्यांचं तिकिट हुकलं, पण ते पक्षनिष्ठ राहिले. ते काँग्रेसच्या विविध कामात गुंतून राहिले. पक्षाच्या वतीने कार्यकर्ते घडवण्याची जी व्यवस्था राहुल गांधींचे निकटचे सहकारी सचिन राव यांच्यामार्फत चालते, त्यात ते सक्रिय राहिले. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, ओरिसा येथील निवडणुकांत निरीक्षक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. काँग्रेसच्या सर्वोच्च काँग्रेस कमिटीत सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘भारत जोडो'च्या आयोजनात ते राहुल यांच्यासोबत राहिले. महाराष्ट्रातली सर्वांत मोठी सभा त्यांनीच शेगाव इथे भरवली होती. सध्या ते ‘राजीव गांधी पंचायती राज संघटन'चे प्रमुख म्हणून काम करत आहेत. राहुल यांचे विश्वासू सहकारी ही तर त्यांची ओळख आहेच.
त्यांच्या नेमणुकीमुळे खुद्द काँग्रेसजनांमध्ये आश्चर्याची लहर उमटली आहे. काँग्रेसअंतर्गत राजकारणाची समीकरणं आता बदलणार हे या आश्चर्याच्या धक्क्याचं खरं कारण असणार. थंड पडलेला, गटातटांत विभागलेला, शहर-गाव पातळीपर्यंत चिरफाळ्या उडालेला, राजकारणाला कोणतंही तात्विक अधिष्ठान न उरलेला, व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षहित बाजूला ठेवून तडजोडी करणाऱ्या आणि संधी मिळताच अन्य पक्षांत जाण्याची वाट पाहणाऱ्या लोकांनी भरलेला पक्ष असं महाराष्ट्रातील काँग्रेसचं आजचं स्वरूप आहे. अशा पक्षाचा सामना भाजप-शिंदेसेना-अजितदादा राष्ट्रवादी या तीन खमक्या पक्षांशी आहे. नेहमीच्या जातीय समीकरणांच्या बेरीज-वजाबाकीने आणि राजकीय जोडाजोडीने ही लढाई यशस्वी होऊ शकत नाही, हे उघड आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत स्थान मिळू न शकलेले त्यांच्यासारखेच पण तरुण निष्ठावान कार्यकर्ते शोधून, त्यांना वाव देऊन, त्यांच्यामार्फत लोकांमध्ये जाऊन, त्यांचे प्रश्न उचलून, लढवून पक्षाला संघर्षशील बनवणं आणि त्यातून नवा लोकाभिमुख पक्ष उभा करणं हे या नूतन काँग्रेस प्रदेशाध्यक्षासमोरचं आव्हान असेल.
आव्हान अवघड तर आहे, पण त्याला हर्षवर्धन सपकाळसारखा कार्यकर्ताच भिडू शकतो, हेही खरं आहे.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.