
“मी, हर्षवर्धन वसंतराव सपकाळ भारतीय संविधानाच्या प्रति कटिबद्धता व्यक्त करीत छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडेोजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वसा घेऊन सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी व पोशिंदा शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून व त्यांना स्मरून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो, की मी विधानसभेत आमदार म्हणून..... जय जगत!”
एखाद्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला शोभेल अशा शब्दांमध्ये काँग्रेसचा तरुण आमदार जेव्हा विधानभवनात आमदारकीची शपथ घेतो तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर एकवटल्या जातात. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांची नावं आपले राज्यकर्ते रोजच तोंडी लावायला घेत असतात. आपल्या सर्वांनाच आता या तोंडदेखलेपणाची सवय झाली आहे. परंतु आमदार हर्षवर्धन सपकाळ मात्र याला अपवाद ठरतात. राजकारणात सक्रिय राहूनही समाजकारण करणारं हे एक वेगळंच रसायन आहे.
२०१४ च्या मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि चौरंगी लढत असतानाही हा ‘भला माणूस' बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आला. भल्या भल्या मातब्बर उमेदवारांवर मात करत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पक्षालाच विश्वास नसलेली सीट अलगद निवडून आणली. सपकाळ यांची स्वच्छ प्रतिमा, रोखठोक कार्यशैली, विकासात्मक राजकारण, जातिधर्मांच्या पल्याड जाऊन सातत्याने घेतलेली सच्ची धर्मनिरपेक्षतेची भूमिका आणि ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतच्या कार्याचा प्रदीर्घ अनुभव यामुळेच त्यांचा विजय पक्का झाला. सपकाळ यांचा हा प्रवास समजून घेण्याजोगा आहे.
सपकाळ यांचा जन्म बुलडाणा शहरात ३१ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील वसंतराव सपकाळ हे ग्रामविकास विभागामध्ये, तर आई भानुमती सपकाळ या महिला व बालकल्याण विभागात पदाधिकारी होत्या. घरात दोन बहिणींसोबत लाडात वाढलेला हा ‘बंटी'. सपकाळ यांचं घरातलं ‘बंटी' हेच नाव कॉलेजपर्यंत मित्रपरिवारात रूढ झालेलं होतं. बुलडाण्याच्या जिजामाता महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. खेळ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. कॉलेजमध्ये असताना ते काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय होते. क्रीडांगण गाजवण्याची जुनी सवय असल्याने बी.कॉम. झाल्यावर त्यांनी बी.पी.एड. केलं. कबड्डी हा त्यांच्या आवडीचा खेळ. त्यासाठी सपकाळ यांनी ‘जय मातृभूमी' व्यायामशाळा सुरू केली. दिवसाचे तेरा तास हा पठ्ठ्या मैदानावरच खेळत असायचा.
बुलडाणा शहरात भारत विद्यालय नावाची एक प्रयोगशाळा दिवाकरभय्या आगाशे या शिक्षणतज्ज्ञ व्यक्तीने सुरू केली होती. त्यांच्याच गुरुकुंज प्राथमिक विद्यालयात सपकाळ यांचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. आगाशे सर सपकाळ यांनाही स्वतःच्या मुलाप्रमाणेच मानत. दहावी-बारावी झाल्यावर सपकाळ अनेकदा आगाशे सरांकडे जात. त्यांच्यासोबत बोलत, चर्चा करत. त्यातूनच सरांच्या समाजवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. नोकरी करण्याऐवजी पूर्णवेळ समाजकार्य करावं, अशी खूणगाठ सपकाळ यांनी बांधली. पण नोकरी नसेल तर लग्न कसं होणार, हा प्रश्न होता. त्यामुळे किमान मुलीकडच्यांना सांगण्यासाठी काही तरी काम शोधणं सपकाळ यांना गरजेचं होतं. त्यांनी काम शोधलं तेही स्वतःच्या पिंडाला साजेसंच. त्यांनी पुण्याच्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मला पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचं आहे; त्यासाठी मला दरमहा काही मानधन मिळेल का, अशी विचारणा त्यांनी केली. तिथेही कार्यकर्त्यांची गरज होतीच. मग सामाजिक कृतज्ञता निधीला फंड गोळा करून देण्यासाठी सपकाळ डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे डॅडी देशमुख यांच्यासोबत ‘विच्छा माझी पुरी करा' या नाटकाच्या प्रयोगांसाठी बुलडाणा, अकोला, अमरावतीच्या परिसरात फिरले. त्यामुळे कॉलेजचं शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना बाहेरचं जग दिसू लागलं. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्यांची ऊठबस सुरू झाली.
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट या गावाजवळील उमाळा या गावी सपकाळ यांच्या वडिलांची १२ एकर शेती होती. नोकरी नाही, तर किमान शेती करून बघू, असं ठरवून त्यांनी शेतीत लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याच सुमारास वयाच्या २८ व्या वर्षी नांदेडच्या सुशिक्षित कुटुंबातील वर्षा जाधव (आता मृणाल सपकाळ) यांच्यासोबत सपकाळ यांचं लग्न झालं.
याच सुमाराला सपकाळ यांच्या आयुष्यात आणखी एक घडामोड घडली. कॉलेजमध्ये ते यूथ काँग्रेसमध्ये सक्रिय होते. कॉलेज संपल्यावरही त्यांचा संघटनेशी आणि पक्षाशी जवळून संबंध होता. त्यातल्या त्यात खासदार मुकुल वासनिक यांच्याशी त्यांचं घनिष्ठ नातं तयार झालं होतं. बुलडाणा हा मुकुल वासनिक यांचा खासदारकीचा बालेकिल्ला. १९८० पासून २००५ पर्यंत ते सतत आलटून पालटून या मतदारसंघातून निवडून येत. वासनिक यांच्या आग्रहापोटी सपकाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले. आश्चर्य म्हणजे या पहिल्याच निवडणुकीत ते निवडून आले, आणि वासनिक यांच्या प्रेमापोटीच अवघ्या २८ व्या वर्षी, १९९६ साली ते बुलडाणा जिल्हा परिषदेचेे अध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला. त्यांची आई महिला काँग्रेसची सदस्य होती, पण ते वगळता काँग्रेसच्या राजकारणाशी कुटुंबाचा फारसा संबंध नव्हता. पण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सपकाळ यांना मात्र राजकारणाची गोडी लागली.
जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर सपकाळ यांनी लगेचच कंबर कसली. त्यांनी पहिला उपक्रम हाती घेतला तो जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून फिरायला सुरुवात केली. जिल्ह्याच्या शैक्षणिक दर्जाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांच्या असं लक्षात आलं, की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चौथीच्या मुलाला दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही, सातवीच्या मुलाला पाचवीचं गणित सोडवता येत नाही. ही गोष्ट आहे ‘प्रथम' संस्थेने राज्यात सर्वेक्षण करून असर'चे अहवाल सादर करायला लागण्यापूर्वीची. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी शाळांमध्ये सातत्यपूर्ण नैदानिक चाचण्या घेण्याचा प्रयोग केला. १९९८ साली साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात प्राचार्य राम शेवाळकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिक्षकांसाठी एक भव्य कार्यशाळा आयोजित केली. अमरावती विभागाचे तत्कालीन आयुक्त सुमित मलिक यांना हा गुणवत्तावाढीचा उपक्रम खूपच भावला. त्यांनी पुढे संपूर्ण अमरावती विभागात नैदानिक चाचण्या घेतल्या. पुढे शिक्षण विभागाचं या प्रयोगाकडे लक्ष गेलं आणि गुणवत्तावाढीचे असे अनेक प्रयोग राज्यात सुरू झाले. एखाद्या राजकारणी व्यक्तीने सुरू केलेला शैक्षणिक प्रयोग राज्यभर स्वीकारला गेल्याचं हे उदाहरण विरळाच म्हणावं लागेल.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सपकाळ यांनी राबवलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे जिल्ह्यातील कुपोषण शून्यावर आणण्याचा. कुपोषण म्हटलं की मेळघाट-धारणीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. पण बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे दोन तालुकेही आदिवासीबहुल आहेत. अजूनही या भागातील अनेक गावांना बारमाही रस्ता नाही, पिण्याचं शुद्ध पाणी नाही, रोजगाराच्या संधी नाहीत की चांगली आरोग्यसुविधा नाही. दरवर्षी या परिसरातील शंभरपेक्षा जास्त मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडत होती. ही बाब सपकाळ यांना समजली तेव्हा त्यांनी आपल्या कामाचा मोर्चा आदिवासी क्षेत्राकडे वळवला. बालविवाह, दोन मुलांमधील कमी अंतर, सकस अन्नाचा अभाव आणि काही प्रमाणात व्यसनाधीनता, अशा अनेक कारणांमुळे या भागात कुपोषण अधिक असल्याचं सपकाळ यांच्या लक्षात आलं. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी त्यांनी ‘कुपोषणमुक्त बुलडाणा जिल्हा' हे अभियान राबवलं. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता सपकाळ यांनी स्वतः कार्यकर्त्याप्रमाणे या तालुक्यांमध्ये भटकायला सुरुवात केली. गावकऱ्यांशी बोलून, त्या त्या गावातले प्रश्न समजून घेऊन ते कामाला लागले. गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली. आदर्श ग्राम योजनेसाठी गावोगावच्या तरुणांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित करून खेडी आतून-बाहेरून स्वच्छ करण्याची मोहीम त्यांनी उघडली. त्यासाठी अनेक गावांना स्पर्धांच्या निमित्ताने लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी उभारून दिला. तरुणांमधील व्यसनाधीनतेच्या विरोधात प्रबोधनाची मोठी चळवळही सपकाळ यांनी उभारली. त्यातून कुपोषणाचा टक्का हळूहळू कमी होत गेला. या भागात सपकाळ यांचा संपर्क तयार झाला. गावागावांत कार्यकर्ते, मित्र उभे राहिले.
या दोन तालुक्यांपासून सुरू झालेली ही चळवळ पुढे बुलडाणा शहरातही फोफावली. साने गुरुजी कथामालेअंतर्गत शाळाशाळांमधून मूल्यसंस्काराचं बीजारोपण करण्याचा प्रयत्न सपकाळ यांनी सातत्याने केला. तरुणांमध्ये देशप्रेम व धर्मनिरपेक्षता वृद्धिंगत होऊन आजचा तरुण निर्व्यसनी राहावा यासाठी त्यांनी ‘आम्ही घडू देशासाठी' या नावाने पाच-पाचशे युवकांची भव्य निवासी शिबिरं आयोजित करण्यास सुरुवात केली. अनेक वर्षं त्यांनी हा उपक्रम चालवला. या शिबिरांमुळे नव्या पिढीला राष्ट्रीय स्तरावरील अनेक विचारवंत मार्गदर्शक म्हणून लाभले. या सगळ्या चळवळींतून त्यांचं घरही अलिप्त नव्हतं. बुुलडाणा शहरातील भिल्ल समाजाची मुलं स्वत:च्या घरी रोज संध्याकाळी अभ्यासासाठी आणून बसवली. प्रा. मृणाल यांनी या मुलांना दररोज मोफत शिकवून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली. मोठ्या मेहनतीनंतर या भिल्लवाड्यातून दोन मुली दहावी पास झाल्या. या मुलींच्या कौतुकामुळे इतरही मुलं शिक्षणासाठी पुढे येऊ लागली.
सपकाळ जिल्हा परिषदेमध्ये असताना त्यांनी सर्वप्रथम १९९८ पासून मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा शासकीय जन्मोत्सव सुरू करण्याची प्रथा सुरू केली. त्यानंतर पुढे इतरत्रही शासकीय स्तरावर दरवर्षी तीन जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येऊ लागला. सोबतच संत चोखामेळा यांच्या जन्मगावी संत चोखामेळा जन्मोत्सवाची सुरुवातही त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षीय कारकिर्दीतच केली.
जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात स्वतःचा खिसा भरण्याऐवजी माणूस जोडण्याचं काम केल्यामुळे सपकाळ यांना प्रेम करणारी हजारो माणसं सोबतीला मिळत गेली. २००९ मध्ये या मंडळींनी सपकाळ यांच्याकडे आग्रह धरला, ‘दादा, आता विधानसभा लढवायची!' सपकाळ यांनी लोकांच्या प्रेमापोटी अर्ज भरला; पण पक्षाने तिकीट दिलं नाही. मात्र, पक्षशिस्त मानून कोणी सांगण्याच्या आधीच त्यांनी अर्ज मागे घेतला आणि ‘व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा' हा विचार प्रत्यक्षात आणला. त्यांची पक्षनिष्ठा बघून त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीत घेण्यात आलं. या कमिटीने त्यांना राष्ट्रीय युवक काँग्रेसचं प्रभारीपद देऊ केलं. दिल्लीतील त्यांच्या कार्यशैलीची चुणूक पाहून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना राजीव गांधी पंचायत राज संघटनेचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिलं. जिल्हा परिषदेमध्ये असताना पंचायत समिती स्तरावरचा अनुभव इथे त्यांच्या कामी आला. देशपातळीवर ग्रामस्वराज्याची संकल्पना विषद करताना महात्मा गांधी, विनोबा भावे, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यावरील त्यांचा दांडगा अभ्यास उपयोगी पडला.
त्यांच्या या कामामुळे २०१४ साली त्यांना बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळालं आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे देशभरात मोदी लाट असतानाही ते निवडून आले. त्यांच्या निवडणुकीला अनेकांनी उत्स्फूर्त पैसे जमा करून दिले. सुदामकाका देशमुख यांच्याप्रमाणे त्यांच्या मित्रपरिवाराने चहाचा एक घोटही न घेता त्यांचा प्रचार केला. नोट व व्होट एकत्र मिळवणारा हा उमेदवार कुतूहलाचा विषय झाला होता. जनतेनेच त्यांना ‘भला माणूस' अशी उपाधी दिली. गोरगरिबांमध्ये मनापासून वावरणाऱ्या या व्यक्तीचे फोटो त्यांची प्रचार टीम नव्हे; तर सर्वसामान्य माणसं सोशल मीडियावर टाकत होती. त्यामुळे हा भला माणूस घराघरांत पोहाचला. आणि एवढं सारं करूनही किंवा जिंकण्यासाठी जे गरजेचं ते करणं कटाक्षाने टाळूनही हर्षवर्धन सपकाळ भरघोस मतांनी निवडून आले, हे त्यांच्या कामाचं श्रेय आणि आपली लोकशाही अजूनही पूर्ण सडलेली नाही याचं द्योतकच म्हणावं लागेल.
‘मी कमिशन खाणार नाही आणि खाऊ देणार नाही' असं वचन सपकाळ यांनी निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलं होतं. ते पाळण्याचा प्रयत्न करतच त्यांचं काम सुरू आहे. शिक्षणसंस्था हे पैसा कमावण्याचं साधन बनता कामा नये म्हणून त्यांनी स्वत:ची शैक्षणिक संस्था उभारली नाही. आमदार म्हणून सपकाळ यांचं कामही लक्षणीय आहे. आधी प्रश्न समजून घ्यायचा, तो कसा सोडवता येऊ शकतो, तो सोडवणं कसं महत्त्वाचं आहे, त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचा पूर्वअभ्यास करूनच ते विधानसभेत बोलत. त्यामुळे ते बोलू लागले की भल्या भल्या मंत्र्यांना हा माणूस आपल्याला नक्की अडचणीत आणणार असं वाटू लागे. उत्तम कबड्डीपटू असल्यामुळे कोणता डाव कसा टाकायचा याचं बाळकडू आपल्याला मैदानातील लाल मातीनेच शिकवल्याचं ते सांगतात.
राज्य आणि काही प्रमाणावर देशपातळीवरही सपकाळ आता सक्रिय झाले आहेत. पक्षनिरीक्षक म्हणून ते गुजरात-राजस्थानच्या विधानसभा-लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झाले होते. तसंच २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तिथल्या ४० मतदारसंघांत ते पक्षनिरीक्षक म्हणूनही कार्यरत होते; पण हे काम करत असतानाच त्यांच्या मतदारसंघात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरू असलेलं त्यांचं काम थंडावलेलं नाही. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तो आदिवासींसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांतून आदिवासी बांधवांशी त्यांची नाळ जोडली गेली. तेव्हापासून गेली २० वर्षं दरवर्षीची दिवाळी ते कोणत्या ना कोणत्या आदिवासी पाड्यावर साजरी करतात. आदिवासींच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी विचारपूर्वक मार्ग काढले आहेत आणि ते यशस्वी करून दाखवले आहेत.
जिल्ह्यातील आदिवासींचं सावकारांकडून प्रचंड आर्थिक शोषण होत असल्याचं लक्षात आल्यावर आदिवासी शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्ती देण्यासाठी स्वत:च्या कार्यकर्त्यांमार्फत सावकारमुक्त गाव हा विशेष कार्यक्रम सपकाळ यांनी राबवायला सुरुवात केली. शेतकऱ्यांची लूट करणारे जे अनेक घटक आहेत त्यात बियाणं आणि औषधं पुरवणाऱ्या दुकानदारांबद्दल आपल्याला फारसं ऐकायला मिळत नाही. विदर्भ- मराठवाड्याच्या काही भागांत हे दुकानदारच आता सावकार झाले आहेत. बियाणं खरेदी करताना अनेकदा शेतकऱ्यांकडे, विशेषतः आदिवासींकडे रोख पैसा नसतो. त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन हे दुकानदार त्यांना पेरणीआधी बियाणं उधार देतात, तसंच औषधं आणि कीटकनाशकंही उधारीवर दिली जातात. पण अनेकदा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आणि अधिक किमतीची औषधं त्यांच्या गळ्यात बांधली जातात. खरं तर हे दुकानदार म्हणजे कोणी तज्ज्ञ नव्हेत, पण आपली उत्पादनं खपवण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. औषधाने कीड गेली नाही, तर ‘तुमचं औषध मारताना काही तरी चुकलं असेल' असं म्हणत स्वतःची जबाबदारी झटकतात. शेवटी पीक निघतं तेव्हा बियाणं आणि कीटकनाशकांचं भरमसाट बिल तयार होतं. ते व्याजासकट वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक या दुकानदारांनाच विकण्यासाठी भाग पाडलं जातं. अनेकदा ही विक्री बाजारभावापेक्षाही कमी किमतीला होते. अशिक्षित शेतकरी हिशोब न तपासताच पीक विकून मोकळे होतात.
जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यांच्या अतिदुर्गम भागातील काही आदिवासी गावांमध्ये सपकाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लुटीचंं हे चक्र तोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सपकाळ यांनी त्यासाठी शेतकऱ्यांची सोसायटी बनवली. ही सोसायटी बियाणं आणि औषधांची एकत्रित खरेदी करते. ठोक भावाने एकत्रित खरेदी झाल्यामुळे बाजारापेक्षा कमी किमतीला बियाणं आणि औषधं मिळतात. तसंच कोणती औषधं कधी आणि किती मारायला हवीत याचं मार्गदर्शनही केलं जातं. त्यामुळे औषधांचा वापर कमी होतो आणि पीकही चांगलं येतं. सपकाळ यांची भूमिका अशी, की बाजारभावावर शेतकऱ्यांचं नियंत्रण नाही, पण किमान उत्पादनखर्च कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. त्यापुढे जाऊन मालाची एकत्रित विक्री करण्याचा प्रयोगही या सोसायटीने सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. व्यापाऱ्यांना कापूस व इतर पिकं एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मिळाल्यावर भावही थोडा जास्त मिळतो आहे. या दुर्गम भागातील रस्ते-वीज-पाणी-शिक्षण आदी प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
त्यांच्या कामाचा गाभा हा त्यांच्या मतदारसंघातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा असला, तरी इतरही अनेक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक कामांमध्ये सपकाळ यांचा सक्रिय सहभाग असतो. पुस्तकमैत्री बालवाचनालयाच्या मुलांसोबत दरवर्षी लहान मूल बनून ते बालदिन साजरा करतात. मतदारसंघात सार्वजनिक ग्रंथालयं समृद्ध झाली पाहिजेत, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रं सुरू झाली पाहिजेत, मतदारसंघातील प्रत्येक शाळा डिजिटल झाली पाहिजे, ग्रामीण विभागात आरोग्ययंत्रणा सक्षम असली पाहिजे, अशा विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. प्रसिद्धीपासून स्वत:ला दोन हात दूर ठेवणारा, समग्र वामनदादा कर्डक साहित्य प्रकाशित करण्याचा आग्रह धरणारा, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य पुनर्प्रकाशित करण्याचा आग्रह धरणारा, मराठी साहित्य-भाषा-संस्कृती याविषयीचे प्रश्न लावून धरणारा हा अभ्यासू कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातील विधायक प्रश्नांवर तर बोलतोच; परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांवरही विधानसभेत अभ्यासपूर्ण व वेळप्रसंगी आक्रमक मांडणी करून प्रश्न सोडवण्यावर भर देत असतो हे विशेष.
टी.सी.वर स्वत:च्या मुलांची जात ‘माणुसकी' व धर्म ‘भारतीय' असं अट्टहासाने लिहायला भाग पाडणारा हा कार्यकर्ता आपल्या खासगी जीवनातही माणुसकीला प्राधान्य देत आला आहे. देशाला आज धर्मनिरपक्षतेची गरज आहे, हे पटवून देण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघातील सर्व गावं संविधान साक्षर करण्याचं काम सपकाळ यांनी शिरावर घेतलं आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीला भारतीय संविधानाच्या १००० प्रती सपकाळ यांनी मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक बुद्धविहारामध्ये, प्रत्येक ग्रंथालयामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये स्वत:च्या पैशाने विकत आणून भेट दिल्या. ‘आपला विकास आपल्याच हाती' हे सूत्र आपल्याला संविधानानेच बहाल केलं आहे. त्यामुळे संविधान समजून घेणं आणि त्याप्रति आदर बाळगणं हे आपलं कर्तव्य असल्याचं ते मनापासून बोलत असतात.
अर्थात एखादा सामाजिक कार्यकर्ता कितीही चांगलं काम करू द्या, परंतु निवडणूक जिंकता येणं हे आता एक वेगळं तंत्र झालं आहे. युवकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणं, भावनात्मक आवाहनांवर त्यांना सतत प्रेरित करणं, त्यांच्या गाड्या-घोड्यांसाठी पेट्रोल-पाण्याची व्यवस्था करणं, तोरणदारी व मरणदारी सातत्याने हजेरी लावणं, कोणत्याही जयंती उत्सवात डीजे लावणं, महागड्या बक्षिसांच्या दहीहंडीचं आयोजन करणं आणि या सगळ्यांतून स्वतःची एक समाजाभिमुख छबी तयार करत राहणं असा सध्याचा काळ आहे. तत्त्वहीन राजकारणाकडे भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. वैचारिक बांधिलकी जपून विकासकामांना प्राधान्य देण्यापेक्षा तुम्ही जनतेचे भावनात्मक प्रश्न इमोशनल ब्लॅकमेलिंगने हाताळू शकता का याला आता महत्त्व प्राप्त झालं आहे. यामुळेच सपकाळ यांचा गेल्या विधानसभेमध्ये पराभव झाला आणि जातीय भावनिक राजकारणाला यश आलं. परंतु जातीय राजकारण हे कायम टिकत नसतं, विचार करणाऱ्या व्यक्ती पुन्हा पुन्हा पुढे येतात आणि पुन्हा एकदा दिशा देणारं नेतृत्व स्वीकारलं जातं ही भारतीय लोकशाहीची खासियत आहे.
आज काँग्रेस पक्षाकडे अभ्यासू आणि सक्रिय व्यक्तींचा दुष्काळ आहे. अशा वेळी पं. जवाहरलाल नेहरू यांना अपेक्षित असणारा पुरोगामी-समाजवादी विचारांचा हा तरुण नेता विशेष उठून दिसतो आहे. बाबा आमट्यांच्या आनंदवनाशी नातं सांगणारा, मेधा पाटकरांच्या पर्यावरण चळवळीशी जुळवून घेणारा, डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्र अंनिसचा बिल्ला छातीवर लावणारा, स्वत:ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दारूबंदीच्या चळवळीतील एक सैनिक समजणारा, आजन्म खादीचा पुरस्कार करणारा हा युवा नेता राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तरुण पिढीसाठी आदर्श आहे.