
गडचिरोलीतल्या दुर्गम रानात आदिवासी आणि वंचितांसाठी या जोडप्याने ग्रामविकासाचं एक रोपटं लावलं- ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. त्याविषयी..
कुरखेडा. नागपूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवरचं गडचिरोली जिल्ह्यातलं गाव.पण प्रत्यक्षात तिथे पोचता पोचता मानवी वस्तीपासून दूर जंगलात निघाल्याची जाणीव होते.रस्त्याच्या दुतर्फा जंगलझाडी नि अधूनमधून दिसलं तर एखादं गाव.नक्षलवाद्यांच्या रेड कॉरिडॉरची साक्ष देणारी शांतता. १९८२ साली डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख हे जोडपं इथे आलं तेव्हा हा प्रदेश किती दुर्गम असेल, याचा आजही अंदाज लावता येईल असा रस्ता. पण आज हे गाव देशाच्या सामाजिक नकाशावर उठून दिसतंय. पुणे-मुंबई, दिल्ली, बंगळुरू,हैदराबाद अशा अनेक ठिकाणांहून अनेक विद्यार्थी-संशोधक-अभ्यासक इथे येतात. कशासाठी? डॉ. गोगुलवार आणि शुभदाताई यांच्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेने वंचित समाजांसाठी उभारलेलं काम पाहण्यासाठी.
संस्थेच्या आवारात शिरलं की एक फलक आपलं स्वागत करतो -‘लोगों के पास जाओ,उनके ज्ञान को प्रस्थान बिंदू मानो,उनके ज्ञान पर विश्वास करो,उनके साथ काम करो,अच्छा काम वह माना जायेगा जब काम पूरा होने पर लोग कहे - ये हमने किया है!'
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'च्या कामाची दृष्टी अन् सार या विचारांमध्ये एकवटलंय.
गडचिरोलीतील कंवर आणि गोंड जमातीत ९१ टक्क्यांहून अधिक लोक आजही दारिद्य्ररेषेखाली आहेत. ७५ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला. ९३ टक्के लोकांचं वास्तव्य खेड्यात. पण लागवडीखालची जमीन अत्यल्प. हंगामी भातशेती व वनौपज हे उदरनिर्वाहचं प्रमुख साधन. त्यामुळे कामाच्या शोधातल्या हंगामी स्थलांतराला पर्याय नाही. हा नक्षलवादाच्या दृष्टीने संवेदनशील असा रेड कॉरिडॉर असल्याने रस्त्यांचं आणि पोलिस-एसआरपीएफचं जाळं पसरलेलं दिसतं; पण सरकारी यंत्रणेची आणि विकासयोजनांची वानवा. त्याच वेळी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या संस्थेच्या कामाचा ठसा इथल्या गावागावात जाणवतो.
डॉ. गोगुलवार-शुभदाताई यांच्या घरात समोरच्याच बाजूला एक तसबीर दिसते. त्यामध्ये एक खेडूत महिला दिसते. कोण ही? सुरुवातीला दवाखान्यात बाळंतपण करण्यासाठी आदिवासी राजी नसायचे तेव्हाची, म्हणजे १९९२च्या आसपासची गोष्ट. तेव्हा संस्थेने बालमृत्यू रोखण्यासाठी खेड्यातल्याच काही महिलांना प्रशिक्षित केलं होतं. पण या बायांवर लोकांचा विश्वास नव्हता. बाळंतपणं आपली आपलीच केली जायची. पण एकदा एका गावात जन्मानंतर तान्ही मुलगी रडेना. सर्वांना वाटलं बाळ मेलं. म्हणून ते पुढच्या तयारीला लागणार एवढ्यात गावातली प्रशिक्षित महिला पुढे झाली. तिने बाळाला तोंडाने श्वास दिला आणि बाळात प्राण आले. त्या घटनेवेळी काढलेला फोटो डॉ. गोगुलवार आणि शुभदाताई यांच्या घरात आजही आहे. या जोडप्याने प्राणतत्त्व ओतलेल्या अशा हजारो कहाण्या कुरखेडा परिसरात सापडतील. एरवी वंचितांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक साहजिक नैराश्य-त्रागा जाणवतो. पण समाज कसा मागासलेला आहे, शोषण-दमण किती भीषण आहे याची रडकहाणी हे दोघं सांगत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम निर्मळ हास्य दिसतं. आजवरचा त्यांचा प्रवास खडतर होता. पुढचाही तसाच असणार आहे. पण तरीही शांतपणे मार्गक्रमण करत राहण्यावर त्यांचा विश्वास आहे.
या प्रवासाची सुरुवात झाली १९८१ साली. त्यावर्षी डॉ. गोगुलवार आणि शुभदाताई ठरवून भेटले. दोघांच्याही घरून लग्नाचा दाब सुरू झाला होता. या दोघांना लग्न करायचं होतं; पण आपला जोडीदार ध्येयवादी असावा अशी दोघांचीही अपेक्षा होती.
डॉ. गोगुलवार मूळ चंद्रपूरचे. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार छावणीत सहभाग घेतलेला. बाबांची कुष्टरुग्णांची सेवा पाहून ते भारावले होते. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांनी भामरागडमध्ये आदिवासींसाठी काम सुरू केलं होतं. तसंच काम आपणही करावं,असं डॉ. गोगुलवार यांच्या मनात होतं. जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीतही ते सक्रिय होते. त्यांच्या वडिलांना मात्र त्यांचं सामाजिक कामांमध्ये रमणं तितकसं रुचत नव्हतं.
त्या काळी डॉ. अभय बंग,डॉ. उल्हास जाजू आणि डॉ. अनंत फडके यांनी वर्ध्यात मेडिको फ्रेंड सर्कल (एमएफसी)या गटाची स्थापना केली होती. या विचारपीठावर प्राथमिक आरोग्य सेवांची गरज आणि वैद्यकीय सेवेतील रुग्णकेंद्री-लोकोपयोगी विचारांची देवाण-घेवाण व्हायची. या व्यासपीठाशी संलग्न असल्यामुळे डॉ. गोगुलवार यांचा समाजकार्याचा निग्रह अधिक पक्का झाला. ‘एमएफसी'मुळे सार्वजनिक आरोग्याबाबतचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला.
दरम्यान,डॉ. अभय बंग यांनी वर्ध्यात ‘चेतना विकास संस्था'स्थापन केली. ही संस्था जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून कार्यरत होती. संस्था गावांतील महिलांमार्फत आरोग्य जागृतीही करत होती. डॉ. गोगुलवार यांनी दीड वर्ष या संस्थेत योगदान दिलं. कार्यानुभव घेतला. पुढे डॉ. अभय व राणी बंग उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी डॉ. गोगुलवारांनाही पोस्ट ग्रॅज्युएशनचा सल्ला दिला; पण खेड्यात साधा डॉक्टरही नसतो. त्यामुळे आपण ग्रामीण भागातच वैद्यकीय सेवेला वाहून घ्यायचं या विचाराने त्यांनी उच्चशिक्षणाचा विचार केला नाही.
इकडे शुभदाताईंच्या मनातही विचारांचा कल्लोळ होता. त्यांचं कुटुंब जमीनदार ब्राह्मण देशमुखांचं. घरातलं वातावरण कर्मठ. पण घरच्यांचा विरोध पत्करून त्यांची आई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेविका समिती'त सामील झालेली. बंडखोरीचा तोच वारसा शुभदाताईंकडे आला. त्यांचे आजोबा घरी खूप पुस्तकं आणत. त्यातल्या साने गुरुजींच्या पुस्तकांचा प्रभाव शुभदाताईंवर पडला. त्याच काळात सेवादलातल्या मैत्रिणी मिळाल्या आणि त्यांच्या सोबतीने शुभदाताईं स्वतंत्र विचार करू लागल्या. आपण घरातून बाहेर पडावं, स्वतंत्रपणे राहवं,समाजासाठी काम करावं,असं त्यांच्या मनात चाललेलं होतं. त्यांनी घरी जाहीर करून टाकलं,‘मी आंतरजातीय लग्न करणार. माझ्या लग्नात हुंडा दिला जाणार नाही.' त्यावेळी नागपूरमध्ये नुकताच एम.एस.डब्ल्यू.चा अभ्यासक्रम सुरू झालेला. तिथे शुभदाताईंनी प्रवेश घेतला. शिक्षण आवडत होतं,पण फक्त सामाजिक अन्याय-शोषण,बदलांचे मार्ग याबाबत पुस्तकात वाचून नि लेक्चर्स ऐकून समाधान मिळेना. त्यामुळे शुभदाताई कॉलेजला दांडी मारून शहरातल्या मोर्चे-निदर्शनात भाग घेऊ लागल्या. या काळात त्यांनी ‘बांधकाम व लाकूड कामगार संघटने'चं काम समजून घेतलं.
एम.एस.डब्ल्यू.चा अभ्यासक्रम संपत आला तसा घरून पुन्हा लग्नाचा लकडा सुरू झाला. याच दरम्यान शुभदाताईं जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत सक्रिय झाल्या होत्या. वाहिनीतल्या मित्रांनी तिला डॉ. गोगुलवार यांचं नाव सुचवलं. शुभदाताईंची धाकटी बहीण साधना हिलाही डॉ. गोगुलवार यांच्याबद्दल माहिती होती. तिनेही या भेटीला दुजोरा दिला. अशा रीतीने डॉ. गोगुलवार आणि शुभदाताईंची भेट झाली. पहिल्याच भेटीमध्ये दोघांनाही आपला मार्ग एकच असल्याची जाणीव झाली अन् त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. १९८२ मध्ये त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि हे दोघे थेट गडचिरोलीच्या वडसा तालुक्यात पोचले.
या काळात गडचिरोलीत सामाजिक उलथापालथ सुरू होती. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेलगत नक्षली आंदोलन मूळ धरत होतं. पण त्याचबरोबर लोकशाहीवर विश्वास असलेल्या चळवळीही जोर धरत होत्या. नारायणसिंह उईके हे या भागातील जुने आदिवासी नेते. त्यांच्या शब्दावर परिसरातले हजारो आदिवासी जमत. सुखदेवबाबू उईके हे त्यांचे शिष्य. सुखदेवबाबू ‘जागृत आदिवासी संघटने'च्या माध्यमातून जोरदार काम करत होते. आदिवासींना जमीन हक्क, शिक्षण, सन्मान मिळवून देण्यासारख्या प्रश्नांवर ही संघटना काम करत असे. मोहन हिराबाई हिरालाल (मोहन हि.हि.), मोहन मुत्तेलवार नि डॉ. गोगुलवार-शुभदाताईही हे संघटनेशी जोडल्या गेल्या.
मोहन हि. हि. हे डॉ. गोगुलवार यांचे संघर्ष वाहिनीतील मित्र. एकप्रकारे गुरूमित्र. या मित्रांनी गडचिरोलीत आरमोरी तालुक्यात ‘आपण आपला मार्ग शोधू!' ही मोहीम सुरू केली. तरुणांनी खेड्यात जावं,प्रश्न-समस्यांचा अभ्यास करावा, त्यावरची उत्तरं शोधत आपापला जीवनप्रवास करावा असं या मोहिमेचं स्वरूप. त्यातून डॉ. गोगुलवार-शुभदाताईंसाठी आपला मार्ग शोधण्याचीच एक पायवाट गवसली.
‘आपण आपला मार्ग शोधणाऱ्या'या मित्रांनी पहिला प्रश्न हाती घेतला तो रोजगार हमी योजनेचा. राज्यात रोहयो १९७८ मध्ये सुरू झाली असली तरी गडचिरोलीत त्याची माहिती पोहचली नव्हती. रोहयोतून काम मिळण्यासाठी गरजूंनी तलाठी कार्यालयात अर्ज दिला की त्यानंतर १५ दिवसांत त्यांना काम मिळणं अपेक्षित असतं. मागणी करणाऱ्या मजुरांना काम मिळालं नाही,तर काम मिळेपर्यंत दर दिवसाचा एक रुपया बेरोजगार भत्ता हा कायद्याने मजुरांचा हक्क होता. पण याची माहितीच नसल्यामुळे लोकांना ना काम मिळत होतं, ना बेरोजगार भत्ता. ‘आपण आपला..' मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम व लाकूड कामगार संघटनेच्या माध्यमातून ही माहिती गरजूंपर्यंत पोहचवायला सुरुवात केली. त्यासाठी योजनेची माहिती पत्रकं गावोगावी वाटण्यात आली. ही मोहीम इतकी प्रभावी ठरली की लोक जथ्याने तलाठी कार्यालयात जमून कामाची मागणी करू लागले. तलाठी भांबावले. ते गर्दीला सांगू लागले,‘अशी काही योजनाच नाही!' माहिती लपवणं-दिशाभूल करणं असा पवित्रा सरकारी यंत्रणा नेहमी वापरते. तेच इतेही घडत होतं.
वेगवेगळ्या गावांतून मोठ्या प्रमाणावर लोक येऊ लागल्याने तलाठ्यांनी पोलिसांना बोलावलं. लोकांनी आपल्या कार्यालयाला घेराव घातल्याची तक्रार केली. पोलिस आल्यावर लोकांनी त्यांना सांगितलं, आम्हाला फक्त आमच्या अर्जाची पोच हवी आहे. ते ऐकून पोलिसही नरमले. तलाठ्याला पोचपावती देणं भाग पडलं. या आंदोलनामुळे डॉ.गोगुलवार-शुभदाताईंचा सत्याग्रह आणि कायद्याच्या ज्ञानावरील विश्वास वाढला.
या आंदोलनामुळे मजुरांना रोहयोअंतर्गत कामं मिळू लागली. पण ही कामं दूरच्या गावी काढली जात. त्यामुळे मजुरीतला बराचसा भाग गाडीभाड्यावरच खर्च होत असे. खरंतर या योजनेतील नियमांनुसार मजुरांना कामाच्या ठिकाणापर्यंत नेणं-आणणं ही प्रशासनाची जबाबदारी होती, अन्यथा मजुरांना प्रवास भत्ता मिळणं अपेक्षित होतं. संघटनेने ही माहितीदेखील लोकांपर्यंत पोचवली. योजना राबवणारे सरकारी कर्मचारी अशिक्षित मजुरांना फसवत. मजुरीची रक्कम मोजताना घोळ घालत. संघटनेने मजुरी कशी मोजायची याचं सोपं गणित प्रशिक्षणात शिकवलं. यामुळे संघटनेला मजुरांचा पाठिंबा मिळू लागला. काम वाढलं. कुरखेडा, आरमोरी भागातही ही मित्रमंडळी मजुरांना संघटित करू लागली.
रोहयोबाबत माहिती देण्यासाठी गावोगाव शिबिरं व्हायची. या शिबिरात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होत. कामांची मागणी करण्यासाठी निघालेल्या मोर्चातही महिला आघाडीवर असत. पण भाषणं मात्र पुरुषांचीच होत. हे पाहून एकदा मोहन हि. हि. यांनी जाहीर सभेत शुभदाताईंना भाषण करायला सांगितलं. महिलांनाही सभेत बोलायची हिंमत आली पाहिजे, हा त्यामागचा हेतू होता. हे ओळखून शुभदाताईंनी काही महिलांना उभं केलं आणि त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही जणू मजूर-आदिवासी महिलांची प्रकट मुलाखतच होती. या घटनेमुळे रोहयो कामांतले महिलांचे प्रश्न कळले. आपल्याही मागण्यांचा विचार केला जाऊ शकतो,याची जाणीव महिलांना झाली. त्यांच्या मागण्याही पुढे येऊ लागल्या. रोहयोचं काम पुरुष मजुरांच्या टोळीला मिळायचं. अंगमेहनतीचं काम महिला करणार नाहीत असा समज होता. पण वडसा तालुक्यातील एका गावात महिलांना कामाची गरज होती. या गावातले पुरुष मार्केट यार्डात हमालीला जात. त्यामुळे त्यांना रोहयो कामाची गरज नव्हती. या महिलांनी स्वतंत्रपणे काम देण्याची मागणी केली. शुभदाताईंसारख्या महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याने गडचिरोलीत पहिल्यांदाच रोहयोतून महिलांनाही काम मिळालं.
डॉ.गोगुलवार-शुभदाताई या दोघांचंही काम जोरात सुरू असतानाच त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आलं. सुखदेवबाबू उइके यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण डॉ. गोगुलवार-शुभदाताई, मोहन हि. हि. आणि मोहन मुत्तेलवार यांचं म्हणणं मात्र वेगळं होतं. या चौघांनीही आधीपासून संसदीय राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं ही मंडळी जागृत आदिवासी संघटनेपासून दूर झाली. मोहन हि. हि. यांनी धानोरा हे कार्यक्षेत्रं निवडून ‘वृक्षमित्र' नावाची संस्था स्थापन केली. मोहन मुत्तेलवारांनी पारंपरिक औषधांचा शोध आणि प्रसारासाठी मालेवाडा येथे ‘लोक स्वास्थ परंपरा संवर्धन समिती'या नावाने काम सुरू केलं. तर डॉ. गोगुलवार-शुभदाताईंनी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ची स्थापना केली. प्रत्येकाने आपला आपला मार्ग शोधला होता. सुरुवातीपासून मनात असलेल्या सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा त्यांनी पक्का केला होता.
आदिवासी समाजासोबत काम करताना डॉ.गोगुलवार-शुभदाताई यांना जाणवलेला एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे महिलांना समाजात सन्मान का मिळू नये. त्या शोधात ही मंडळी दारूबंदीच्या चळवळीत सहभागी झाली. शुभदाताई गावोगावच्या बैठका घेत. अशाच एका बैठकीत महिलांनी दारूमुळे कुटुंबात होणाऱ्या समस्या सांगायला सुरुवात केली. व्यसनांमुळे कित्येकींचे संसार मोडकळीस आले होते. नवरा मारझोड करतो,कर्ज झालं अशा अनेक समस्या महिलांनी सांगितल्या. शुभदा म्हणतात,“या महिलांनी एक विशेष मुद्दा मांडला. सरकार दारूबंदीचा प्रचार करतं. पण दारूच्या दुकानांचं लायसनही सरकारच देतं? हे कसं?”
ग्रामीण महिलांनी दारूच्या समस्येवरील मुळावरच बोट ठेवलं होतं. ही समस्या केवळ उपदेशातून सुटणार नाही,हे स्पष्ट होतं. त्यानंतर गावोगाव दारूच्या प्रश्नावर बैठका सुरू झाल्या. नवऱ्याच्या नशेमुळे बायकांना होणारा त्रास शुभदाताईंनी या काळात जवळून पाहिला. डॉ.अभय बंग यांनी या अनुभवाला अभ्यासाची बैठक देऊन दारूवरील खर्चाचं गणित उलगडून दाखवलं. दारूमुळे गरिबीत पडणारी भर महिलांच्या लक्षात आली. त्यातून गडचिरोलीत दारूबंदीचं आंदोलन उभं राहिलं. गडचिरोलीतून दारूबंदीची मागणी करणारं पहिलं निवेदन कुरखेडा तालुक्यातून गेलं. ते महिला कार्यकर्त्यांच्या वतीने शुभदाताईंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. अर्थातच सरकारने काही लगेच दखल घेतली नाही. खूप चिवट लढा द्यावा लागला. तेव्हा कुठे १९९२ मध्ये गडचिरोलीत दारूबंदी झाली. महिलांच्या मागणीमुळे राज्यात झालेली ही पहिलीच दारूबंदी.
त्याच दरम्यान डॉ. गोगुलवार यांनीही एका महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रत केलं होतं. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात डॉक्टरांचं प्रमाण कमी होतं. बाहेरचे डॉक्टरही तिथे जाण्यास उत्सुक नसत. त्यामुळे लोक नाइलाजाने बोगस डॉक्टरांच्या आश्रयाला जात किंवा पूर्वापार चालत आलेल्या वैदू किंवा भगताला दाखवत. पैशापायी पैसे खर्च होत आणि रोग समूळ बरा होतच नसे. उलट औषधांवरचा सततचा खर्च वाढून शेवटी त्याची झळ खिशालाही बसत असे. एरवी वैदू म्हटलं की एमबीबीएस डॉक्टर त्याच्यावर फुली मारणार हे ठरलेलं असतं. पण वास्तवाचा अभ्यास करणं व योग्य उत्तर शोधणं ही डॉ. गोगुलवार यांची वृत्ती असल्याने त्यांनी या प्रश्नाचा माग घेत गावोगाव फिरती सुरू केली. ते वैदूंच्या भेटी-गाठी घेऊ लागले, तसं त्यांच्या लक्षात आलं की वेगवेगळ्या गावात निरनिराळ्या औषधांची माहिती असलेले वैदू आहेत.कुणी काविळीवर, तर कुणी सर्पदंशावर इलाज करतो. कुणाला महिलांच्या आजारांची जाण आहे, तर कुणी जुलाब-पोटदुखीसारख्या आजारांवरच्या जडीबुटीचा जाणकार आहे. वैदूंचं हे ज्ञान गुरूशिष्य परंपरेवर आधारलेलं. गुरूकडून ज्ञान संपादन करण्यासाठी शिष्याला कष्ट घ्यावे लागत असत. औषधी वनस्पती शोधत जंगलात तंगडतोड करावी लागत असे. गुरूचा विश्वास बसल्यानंतरच तो आपलं ज्ञान शिष्याला देत असे. त्यामुळे आपल्याकडच्या औषधांची माहिती दुसऱ्यांना देण्याची वैदूंची तयारी नसे.
हे लक्षात आल्यावर डॉ.गोगुलवार यांनी वडसा आणि कुरखेडा तालुक्यातल्या वैदूंच्या पुन्हा एकदा भेटी घेतल्या. या वैदूंचा विश्वास संपादन केला. वैदूंकडच्या औषधी वनस्पतींचे उपयोग आयुर्वेदाच्या कसोटीवर तपासले. त्यानंतर कोणत्या आजारावर कोणत्या वनस्पतीचं मूळ,खोड,पानं उपयोगी ठरतात,याचं प्रमाणीकरण करण्याचं किचकट आणि प्रचंड काम त्यांनी अंगावर घेतलं. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. ही माहिती पुस्तिकेत संकलित करून प्रकाशित केली आणि गावोगावच्या बचत गटातील महिलांना त्यांनी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याआधी वैदूंकडचं ज्ञान मुख्यत: आदिवासी पुरुषांपुरतंच मर्यादित होतं. ते या प्रयत्नांमुळे महिलांकडे आलं. जुन्या काळी घरात साध्या आजारांवरच्या उपचारांसाठी घरोघरी आजीचा बटवा असे. त्यात काही घरगुती औषधं असत. त्याच संकल्पनेत संशोधित वनौषधींची भर घालून डॉ. गोगुलवार यांनी घरात उपयोगी पडणाऱ्या औषधांची पेटी विकसित केली. स्थानिक पातळीवर ही औषधं लोकप्रिय करण्यात पुढाकार घेतला.‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने प्रशिक्षित केलेले वनौषधी तज्ज्ञ गावागावांत-पाड्यापाड्यांवर जाऊन इतरांना प्रशिक्षित करू लागले.
आजही ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी' विविध वनौषधींचं उत्पादन करून ते विविध संस्था आणि उपचारकर्त्यांना पुरवतं. एका एमबीबीएस डॉक्टरने केलेला हा विरळा प्रयोग असावा. आधुनिक-ॲलोपथी ज्ञानाची आढ्यता सोडून लोकपरंपरेचं महत्त्व ओळखून लोकांचं ज्ञान लोकांसाठी खुलं करण्यात डॉ. गोगुलवार यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चं आणखी एक उल्लेखनीय काम म्हणजे आदिवासी विभागात उभारलेली बचत गटांची चळवळ. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या देशात बचत गटांची चळवळ जोर धरू लागली. त्याकाळी पुणे जिल्ह्यात सुधा कोठारी आणि वर्ध्यात सुमनताई बंग यांनी बचत गटांचं काम सुरू केलं होतं. आजही कुठला नवा विचार गडचिरोलीत पोचायला अंमळ उशीरच लागतो. पण शुभदाताईंमुळे त्या काळातच बचत गटांची चळवळ गडचिरोलीत रुजली आणि फोफावलीही. शुभदाताई एक गमतीशीर अनुभव सांगतात,“गडचिरोलीला आलेले बँक अधिकारी या बदलीकडे ‘पनिशमेंट पोस्टिंग' म्हणून बघत. इथे काय काम असणार,असा त्यांचा दृष्टिकोन असे. पण आदिवासी पेहरावातील महिलांची बँकेतील गर्दी पाहून ते चाट पडत. इतक्या संख्येने महिला या भागात बँकेत येत असतील,याची त्यांना कल्पना नसे.” गडचिरोलीत आजही प्रत्येकी दोनपैकी एक महिला बचत गटाची सदस्य आहे. महाराष्ट्राच्या इतर आदिवासी भागांपेक्षा हे प्रमाण बरंच जास्त असावं. पैसे बचतीची सवय नसल्याने कायम तंगीत राहणाऱ्या आदिवासींमध्ये ती सवय रुजली. अर्थव्यवस्थेत दीनवाणा-दुबळा मानल्या गेलेल्या आदिवासी समाजाची क्रयशक्ती वाढली, याचं श्रेय निश्चितच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'च्या कामाला जातं.
या चळवळीचं आणखी एक वेगळेपण म्हणजे ती केवळ सरकारचं एक धोरण म्हणून नव्हे; तर मातीतून तरारली आहे. आदिवासींच्या जीवन संवर्धनाच्या गरजेतून बहरली आहे. त्याचं झालं असं की ‘नॅशनल सिल्क बोर्ड' ही शासकीय संस्था रेशम उत्पादनाचे आधुनिक मार्ग रुजवू पाहत होती. गडचिरोलीलगतच्या चंद्रपूरमधील जंगलात काही जमाती रेशम शेती करत असत. ‘नॅशनल सिल्क बोर्ड'ने ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'वर आधुनिक रेशीमशेतीची जबाबदारी टाकली.
गडचिरोलीतील ढीवर जमातीचे लोक अर्जुन व येन वृक्षांवर रेशीम कीटक वाढवतात.जंगलातल्या या वृक्षांना या जमाती पूजनीय मानतात. एकुणातच या जमातींचं जंगलाशी जैवं नातं आहे. पण ब्रिटिशांनी जंगलांवरील स्थानिकांचे हक्क नाकारले आणि त्यांच्या नशिबी दारिद्य्र आणि अन्यायाचं जगणं आलं. रेशीम उत्पादक जमातींसोबत काम करताना हीच सरकारी बेजबाबदार वृत्ती डॉ.गोगुलवार यांनी पाहिली. वनखात्याने जंगलात बांबू आणि साग वृक्षांची जोरकस लागवड सुरू केली. त्यासाठी अर्जुन आणि येन या औषधी गुणधर्माच्या आणि रेशीम उत्पादनासाठी आवश्यक झाडांची कटाई सुरू झाली. त्यामुळे ढीवर जमातीची उपजीविकाच धोक्यात आली. डॉ.गोगुलवार यांनी ही वृक्षतोड थांबवण्यासाठी शासकीय कार्यालयांना पत्र लिहिली. पण प्रतिसाद शून्य. मग डॉ. गोगुलवार यांच्या प्रेरणेतून हे आदिवासीच वृक्षतोडीविरोधात उभे राहिले. त्यासाठी त्यांनी केलेली निदर्शनंही वैशिष्टपूर्ण होती. हजारो आदिवासी स्त्री-पुरुष अर्जुन वृक्षाची रोपं घेऊन जंगलात जमले. वनखात्याने जिथे बांबूची लागवड केली होती, तिथे अर्जुनाचं रोप लावलं जाऊ लागलं. वनखात्याच्या लोकांनी जबरदस्तीने ही लागवड बंद पाडायचा प्रयत्न केला. पण लोकांनीच त्यांना अर्जुन वृक्षाचं महत्त्व पटवलं. अधिकाऱ्यांनी माघार घेतली.
या आंदोलनात ढीवर जमातीचे तरुण अग्रेसर होते. या लोकांना मासेमारी आणि रेशीम उत्पादनातून फारच कमी उत्पन्न मिळायचं. त्यामुळे ही मंडळी सावकारांकडून कर्ज घेत. रेशमांचे किडे झाडावर वाढवणं, त्यातून रेशीम येणं ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यातून उत्पन्न मिळेपर्यंत या मंडळींवर व्याजाचा डोंगर चढे. त्यामुळे ही जमात कायम कर्जबाजारी होती. या काळात नाबार्डनं बचत गटांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली होती. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने नाबार्डच्या सहकार्यातून ढीवर जमातींचे बचत गट स्थापन केले. छोटी कर्जं अल्प व्याजदरात मिळू लागल्याने या समुदायांना खूपच दिलासा मिळाला. तिथूनच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'च्या बचत गट चळवळीने वेग घेतला.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चं काम असं विविध क्षेत्रात पथदर्शी ठरलंय. लोकशाही रुजवणं हे त्यांच्या कामातलं सूत्र प्रकर्षाने जाणवतं. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने बचत गटांना सशक्त केलं, त्यासोबतच ग्रामसभांनाही बळ दिलं. गडचिरोलीत तेंदूपत्ता, हिरडा, बांबू, मोह, मध अशा विविध वनौपजांचं समृद्ध जंगल आहे. पण या वनौपजांवर समृद्ध झाले ते व्यापारी आणि दलाल. आता २००६चा ‘वन अधिकार कायदा' आल्यानंतर गावाच्या हद्दीतल्या जंगलाचं संवर्धन आणि व्यापाराचे हक्क ग्रामसभांना मिळाले. मोहन हि. हि. आणि देवाजी तोफा यांच्या नेतृत्त्वाखाली गडचिरोलीतल्याच मेंढा लेखा गावाने स्वशासनाचा प्रयोग यशस्वी केला. आपल्या मित्रमंडळींचा हा अनुभव सोबत घेऊनच ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'देखील कुरखेडा आणि कोरची तालुक्यातील ८० ग्रामसभा सशक्त करत आहे.
गडचिरोलीतील गावांना आपल्या संपत्तीची जाणीव करून देण्यात आणि त्याचं आर्थिक फायद्यात रूपांतर करण्यात डॉ. गोगुलवार यांचं मोठं योगदान आहे. पूर्वी आदिवासी पारंपरिकरीत्या जंगलातून मध गोळा करत. त्यासाठी मधाची पोळी जाळली जात. त्यासोबत मधमाशाही मरत. डॉ. गोगुलवारांनी अन्य संस्था आणि तज्ज्ञांची मदत घेऊन मध संकलनाची योग्य पद्धत रुजवली. त्याचप्रमाणे या भागात लोक घरच्याघरी साळीतून तांदूळ वेगळा काढत. त्यासाठी एक लाकडी यंत्र असायचं. या यंत्राला ढेकी म्हणतात. ढेकीतून कांडलेला हातसडीचा तांदूळ हल्ली लोकप्रिय आहे. कारण या तांदळात स्टार्च आणि जीवनसत्वं असतात. पण जागोजागी राईस मिल आल्याने ढेकीने तांदूळ कांडण्याची पद्धत लोप पावली. डॉ. गोगुलवारांनी हातसडीच्या तांदळाचं महत्त्व गावकऱ्यांना पटवलं. आयआयटीच्या तज्ज्ञांनी ढेकीसदृश, पण कष्ट वाचवणारं यंत्र विकसित केलं. या यंत्रातून कांडलेल्या तांदळाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तर ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने प्रयत्न केलेच, पण हा तांदूळ स्थानिकांनी आहारात घ्यावा यासाठीही जनजागृती केली. तंत्रज्ञान आणि परंपरांचा मेळ घालून लोकांना आर्थिक स्वावलंबी बनवणं हे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चं खास वैशिष्ट्य.
डॉ. अभय बंग यांनी २००१ ते २००७ या काळात माता व बालमृत्यू रोखण्यात पथदर्शी ठरलेला ‘अंकुर प्रकल्प' विविध संस्थांमार्फत राबवला. खेड्यातील महिलांना नवजात अर्भकांची काळजी घेण्याचं प्रशिक्षण देण्याची आणि बालमृत्यूंचं मुख्य कारण असलेला न्युमोनिया शोधून मुलांच्या घरीच त्याच्या उपचारांची सोय करणारी यंत्रणा या प्रयोगाने रुजवली.‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने कोरची तालुक्यातील ३० गावांमध्ये हा प्रकल्प राबवला. त्यातून बालमृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटवण्यात यश मिळवलं. हा प्रयोग ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने स्वतंत्रपणे चंद्रपूर आणि नागपूरमधील शहरी वस्त्यांतही रुजवला आहे.
ग्रामीण भागातील विकलांगांचं पुनर्वसन हे देखील असंच एक दुर्लक्षित क्षेत्र. आदिवासी भागातले प्रश्न कितीही गंभीर असले तरी तिथेदेखील अस्थिव्यंग, अंध, मतिमंद, कुष्टरूग्ण, सिकलसेल ॲनिमियाचे रुग्ण आणि त्यांचे प्रश्नही असतातच. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांत अशा अनेकविध विकलांगांचं संघटन उभारलं आहे. विकलांग बांधवांना एकट्याच्या बळावर अपंगत्वाचं प्रमाणपत्रं मिळवणं, तसंच सरकारी योजना,पेन्शन आणि इतर सवलतींचा लाभ मिळवणं कठीण जातं. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'ने बांधलेल्या संघटनेमुळे विकलांग सामूहिक शक्तीच्या जोरावर आपले हक्क मिळवू लागलेत.
तीनशे ग्रामपंचायती आणि साडेसातशे गावांमध्ये या संघटनेचा विस्तार आहे.
ग्रामीण भागातील महिलांचा स्वाभिमान जागवणं,कौटुंबिक अत्याचारांविरोधात त्यांना उभं करणं हे जिकिरीचं काम. गेली तीस वर्षं शुभदाताई हे काम करताहेत. अशी कामं कधी कधी उलटूही शकतात. एका महिलेला तिचा नवरा मारहाण करत असे. ती शुभदाताईंकडे मदतीला आली. शुभदाताईंनी नवऱ्याला समजावून पाहिलं. पण छळ थांबेना. मग पोलिसांत तक्रार दिली गेली. पोलिसांच्या भीतीनं त्या माणसाने आत्महत्या केली. स्थानिक राजकीय पुढाऱ्याने शुभदाताईंमुळेच तो माणूस मेला, असा गवगवा केला. पण त्यावेळी आदिवासी महिलाच शुभदाताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शुभदाताई नसत्या तर त्या बाईचं जगणं मुश्कील होतं, हे महिलांनीच एकत्र येऊन पोलिसांना सांगितलं. अशा अनेक अटीतटीच्या प्रसंगातून तावून सुलाखून डॉ. गोगुलवार आणि शुभदाताईंनी हे काम उभं केलं आहे.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चा वटवृक्ष एवढा बहरल्यावर डॉ. गोगुलवारांच्या सुरुवातीला नाराज असणाऱ्या वडिलांनाही आपला मुलगा वाया गेला नाही, याची जाणीव झाली. त्यांनीच या जोडप्याला कुरखेड्यात घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली. याच घराच्या प्रांगणात ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चा संसार उभा आहे. दररोज कार्यकर्ते इथे येतात. इथेच विविध प्रशिक्षणं पार पडतात. स्थानिक प्रश्नांवर विचारविनिमयासाठी गावोगावचे लोक जमतात.‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी'चा वर्धापनदिन इथले आदिवासी मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्या दिवशी इथे जणू सणाची रौनक असते. या कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी वेशातील महिला, युवक, विकलांग,ज्येष्ठ स्वखर्चाने जमतात. गाणी गातात. नाचतात. घोषणा देतात. सुदूर रानात बहरलेलं सुराज्याचं,एकमेकांवरील प्रेम अन् विश्वासाचं हे सुंदर रूप डॉ. गोगुलवार आणि शुभदाताई समाधानाने पाहत राहतात.
प्रशांत खुंटे | prkhunte@gmail.com
प्रशांत खुंटे हे मुक्त पत्रकार असून समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांचे अभ्यासक आहेत.