प्लॅस्टिकच्या भस्मासुरावर मात करण्यासाठी सकारात्मक उपाय शोधलेल्या डॉ. मेधा ताडपत्रीकर यांची कामगिरी दुहेरी आहे. एकतर त्यांचे सहकारी शिरीष फडतरे यांच्यासमवेत प्लॅस्टिकपासून इंधन बनवण्याचं यंत्र तयार केलं आहे आणि दुसरं म्हणजे प्लॅस्टिक कचरा निर्मुलनासाठी ते मोठ्या प्रमाणावर लोकजागृती करत आहेत.
प्रश्न : आपण इंग्लंडमधल्या प्रतिष्ठित विद्यापीठात एमबीए (मार्केटिंग) केलेलं आहे. भारतात आल्यावर आपला मार्केटिंग कन्स्टिंगचा व्यवसायही व्यवस्थित चालू होता. मग अचानक प्लॅस्टिक कचऱ्याच्या विषयात हात घालावा असं का वाटलं?
उत्तर : ‘अचानक' हा शब्द महत्त्वाचा आहे कारण अपघातानेच मी या क्षेत्राकडे ओढली गेले. तसं पाहता मला कुटुंबातून सामाजिक कामाची कोणतीच पार्श्वभूमी नाही. एकदा मी आणि शिरीष (फडतरे) एक अभयारण्य पहायला गेलो होतो. तर तिथे हरीण मरून पडलेलं असल्याचं कळलं. आम्हाला वाटलं की वाघानं मारलं असेल. प्रत्यक्षात त्या हरिणाच्या पोटात प्लॅस्टिक सापडलं. खरंतर मजा म्हणून आम्ही अभयारण्यात गेलो होतो पण येताना खूप अस्वस्थ होऊन आलो. नंतरचे काही दिवस खूप बेचैनीत गेले. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मुक्या प्राण्यांचे जीव जाण्यापासून ते महापूरापर्यंतच्या आपत्ती निर्माण होत असतील तर त्यावर ‘कोणीतरी' काहीतरी केलं पाहिजे, असं सतत वाटत होतं. पण एकाक्षणी वाटलं की ते ‘कोणीतरी' आपणच का नाही? तिथून आमचा या क्षेत्रातला प्रवास सुरू झाला.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी झाली?
एकदा एका मित्राकडे मी आणि शिरीष पार्टीसाठी गेलो होतो. तिथे एकाने ग्लासामधला बर्फ उचलून शेजारच्या टीपॉयवर ठेवला. तर लगेचच या बर्फाचं पाणी झालं. ते पाहून मनात विचार आला की जर पाण्याचा बर्फ आणि बर्फाचं पुन्हा पाणी होत असेल तर प्लॅस्टिकच्या बाबतीत हे का शक्य होणार नाही?
जर पेट्रोकेमिकल्सपासून प्लॅस्टिक बनत असेल तर वापरून झालेल्या प्लॅस्टिकपासून पुन्हा पेट्रोलियम पदार्थ का नाही तयार करता येणार?
माझ्या दृष्टीने हा आमच्यासाठी ‘युरेका क्षण' होता. आम्ही दोघंही इंजिनिअर नाही. आम्हाला कसलाही संशोधनाच्या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव नाही. पण मूळची वाचनाची आवड असल्याने आम्ही मिळेल ते वाचू लागलो. विज्ञानक्षेत्रातल्या मित्रांशी जमेल तसं बोलू लागलो. पण हाताने प्रयोग करून बघितल्याशिवाय स्वस्थ बसवेना.
कोणत्या स्वरूपाचे प्रयोग केले? मूळात प्रयोगांची सुरुवात कशी झाली?
खरं सांगायचं तर सामान्यज्ञान वापरलं. आधी माझ्या घरातल्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकरमध्ये प्लॅस्टिक भरलं आणि खाली गॅस पेटवला. तर चक्क छोटा स्फोट झाला. कुकरचं झाकण थेट छतापर्यंत उडालं. पण आम्ही चिकाटी सोडली नाही. कुकरची शिट्टी बाजूला काढली. मग जिथून वाफ बाहेर जात होती तिथे एक नळी बसवली. हा प्रयोग काही काळ चालूच ठेवला. मग अचानक एका टप्प्यावर त्या नळीद्वारे काळसर पाणी येऊ लागलं. मग एका प्रयोगशाळेत नेऊन तपासलं. तर ते हायड्रोकार्बन होतं. त्या क्षणापासून आम्हाला पुढची वाट स्पष्ट दिसू लागली.
याच्यानंतर प्लॅस्टिकपासून इंधन बनवण्याचं यंत्र कसं तयार केलं.
शिरीषची चित्रकला आधीपासूनच चांगली आहे. त्यानं ऑटोकॅडच्या मदतीनं एक डिझाइन तयार केलं. ते डिझाइन म्हणजे प्रेशर कुकरचा मोठा अवतार होता. एका फॅब्रिकेशन युनिटमधून आम्ही तसं मशीन बनवून घेतलं. एका मित्राच्या कारखान्याच्या आवारात ते बसवलं. त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. प्लॅस्टिकपासून मिळालेलं ते केमिकल डिझेलमध्ये किंवा फर्नेस ऑईलमध्ये मिसळून वापरणं शक्य झालं. हे मशीन पाहण्यासाठी दुरदुरून लोक येऊ लागले. माध्यमांनी तर आमच्या प्रयोगाला खूप उचलून धरलं.
हे करताना काही अडचणी आल्या का?
हो तर. सुरुवातीलाच आमच्या आनंदावर विरजण ओतणारी अडचण उभी ठाकली. एकदा एक तज्ज्ञ आमचं यंत्र पहायला आले होते. त्यांच्यामते प्लॅस्टिकपासून इंधन तयार होणं चांगलं असलं तरी त्या प्रक्रियेत तयार होणारा वायू मात्र प्रदूषणाला हातभार लावणारा आहे. आम्ही घाबरून गेलो. कारण पर्यावरणासमोरची एक समस्या सोडवावी म्हणून काम करताना ही नवीच समस्या समोर आली. मग काही काळ उत्पादन बंद ठेवलं. पण एकदा तो मशिनमधून बाहेर पडणारा वायू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. तेव्हा लक्षात आलं की त्यात एलपीजी सदृश घटक होते. त्यावर एक जनरेटर सुरू करून पाहिला तर वीजनिर्मिती होऊ लागली. याचा अर्थ मूळ मशीन चालवण्यासाठी उर्जा म्हणून या वायूचा उपयोग करणं शक्य होतं आणि प्रदूषणाचा धोकाही टळणार होता. मग मात्र वेगानं उत्पादन सुरू केलं जे आजपर्यंत चालू आहे.
तुमची मार्केटिंगची पार्श्वभूमी असल्याने इंधनाची विक्री करणं सोपं गेलं असणार. पण इतका प्लॅस्टिकचा कचरा कसा मिळवला?
माझ्या लक्षात आलं की प्लॅस्टिक कचऱ्याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची गरज आहे. मग आम्ही पुण्यातल्या सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांशी बोलायला सुरुवात केली. प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं महत्त्व आणि त्यासाठी एकूणातच कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची गरज याविषयी मी सांगत असे. तर एक पुणेकर म्हणाले, “अहो, आम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करून देतो, पण तो माणूस पुन्हा मिसळतो त्याला आम्ही काय करणार?” त्यावर मी सहजच म्हटलं, “पुढच्यावेळी प्लॅस्टिकचा कचरा वेगळा केलात की कळवा. मी घेऊन जाईन.” त्यावर काही दिवसांनी खरंच त्या गृहस्थांनी मला फोन केला आणि कचरा घेऊन जायला सांगितलं. मीही शब्द दिल्याप्रमाणे रिकामी पोती घेऊन गेले आणि प्लॅस्टिकचा कचरा भरून आणला. त्या दिवसापासून आमचं प्लॅस्टिक कचऱ्याचं संकलन सुरू झालं आणि पुढे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं.
या प्लॅस्टिक कचरा संकलनाचा अनुभव कसा आहे?
एका शब्दात सांगायचं तर बोलका आहे. म्हणजे आम्हाला कचरा गोळा करताना आपल्या समाजाची अनेक रूपं दिसत असतात. वर सांगितल्याप्रमाणे, एका सोसायटीचा कचरा मी घेऊन आले तर शेजारच्या सोसायटीतून फोन आला की, “त्यांचा कचरा नेलात तसा आमचाही न्या.” मग त्यांचाही कचरा आणला. त्यानंतर मॉडेल कॉलनी, कोथरुड, कर्वेनगर, लुल्लानगर आणि विमाननगर करत संकलन क्षेत्र वाढतच गेलं. पुढे इतर गावांमधूनही फोन येऊ लागले. याचा अर्थ असा की प्लॅस्टिक कचऱ्यापासूनच्या धोक्याचं गांभीर्य लक्षात आलेला एक वर्ग आहे. आमचं बहुतेक ठिकाणी स्वागत होत होतं पण काहीजण मात्र ‘एवढे शिकलेले असूनही कचरा गोळा करण्याचं काम का करता?' असा हेटाळणीयुक्त प्रश्न विचारायचे. अर्थात त्या टीकेचा विचार न करता आम्ही सतत काम वाढवतोच आहोत. कचरा संकलन सोपं जावं म्हणून आता तर आम्ही गाड्याही विकत घेतल्या आहेत.
आता सध्या आपलं काम कोणत्या टप्प्यावर आहे?
आता आम्ही या यंत्रांच्या निर्मितीचं युनिट सुरू केलं आहे. ही यंत्रं आम्ही देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या, सरकारची विविध खाती, हाऊसिंग सोसायट्या किंवा धार्मिक स्थळांना विकतो. ग्राहकांच्या गरजांप्रमाणे यंत्रांच्या आकारातही बदल करतो. आज सर्वांत लहान यंत्र शंभर किलो प्लॅस्टिक कचऱ्याचं इंधन बनवतं तर सर्वांत मोठं पाच टनांचं आहे. कोणालाही देशात हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर हे यंत्र, तीन हजार स्क्वेअर फूट जागा आणि प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी गाडी एवढी सामुग्री लागते. तीन ते चार जणांचं मनुष्यबळ पुरतं. आमच्या यंत्रातून तयार होणारं इंधन ५१ रुपये लिटर दराने विकलं जातं. त्याचा उपयोग जनरेटर, बॉयलर, ट्रॉलर आणि इतर इंजिनांसाठी होतो.
या कामात आपाल्याला आजवर चांगलं यश मिळालं आहे आणि अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आता या सगळ्याकडे आपण कसं पाहता?
केवळ यंत्रांची निर्मिती करणं आणि विक्री करणं एवढा मर्यादित हेतू माझ्या मनात नाही. लोकांची मानसिकता बदलणं हेच ध्येय आहे. प्लॅस्टिकने आपल्याला समाज म्हणून आळशी बनवलं आहे. पूर्वी आपण भाजी आणायला जाताना कापडी पिशवी नेत असू किंवा दूध आणताना भांडं किंवा बरणी नेत असू. आता ते कोणाच्या डोक्यातही येत नाही. गरज असो वा नसो सरसकट प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात. त्यातूनच प्लॅस्टिक कचरा वाढत राहतो. प्लॅस्टिकचे उपयोग खूपच आहेत पण त्यापासूनचा घातक परिणामांचा विचारही गरजेचा आहे. एका बाजूला व्यापक जागृती आहे दुसरीकडे प्लॅस्टिक ते इंधन या व्यवसायाची इंडस्ट्री उभी राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यातून प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटेलच पण करोडोंची उलाढाल होईल आणि लाखो लोकांना रोजगार मिळेल.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
