आम्ही कोण?
ले 

मधुजाल पाकिस्तानी विषकन्यांचं (आणि विषपुत्रांचंही)!

  • रवि आमले
  • 24.05.25
  • वाचनवेळ 7 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
honey trap header

मादक तरुणींचा मधाळ सापळा रचायचा. त्यात एखाद्याला पुरेपूर अडकवायचं. मग त्याच्याकडून हवी ती माहिती काढायची. त्यासाठी त्याला प्रसंगी ब्लॅकमेल करायचं. हा ‘हनी ट्रॅप’ - मादक मदनिकांचं मधुजाल. पाकिस्तानने त्याला आधुनिकतेचा साज चढवला. त्याद्वारे आपल्याकडच्या अनेकांना गळाला लावलं. आपलं हेर बनवलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ‘रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट एस्टॅब्लिशमेन्ट - इंजिनिअर्स’चे संचालक प्रदीप कुरूलकर हे त्यातलेच. सध्या तुरुंगाची हवा खात असलेला, बुटिबोरीतील ‘ब्राह्मोस एरोस्पेस’मधील ‘हायड्रॉलिक-न्यूमॅटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विंग’चा प्रमुख निशांत अगरवाल हा त्यातलाच. मोठी यादी आहे अशांची. त्यातील अलीकडचं नाव - ज्योती मल्होत्रा. ही यूट्यूबर. तीसुद्धा ‘हनी ट्रॅप’ तंत्राची बळी ठरल्याचं सांगण्यात येतंय. ती काय, किंवा काही वर्षापूर्वी हेरगिरीप्रकरणी शिक्षा झालेली माधुरी गुप्ता काय, यांच्यात आणि इतरांच्यात एकच फरक. त्या विषकन्यांऐवजी विषपुत्रांच्या शिकार ठरल्या होत्या.

विषकन्या. विशाखादत्तच्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकाने प्रसिद्ध केलेली ही संकल्पना. भारतीय हेरगिरीच्या इतिहासातील एक प्रचंड लोकप्रिय दंतकथा. लहानपणापासून कणाकणाने विष भरवून वाढवलेल्या या सुंदरी. त्यांचा वापर राजकीय हत्यांसाठी केला जाई, अशी ही कथा. चाणक्य तथा कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तिचा उल्लेख आहे असं सांगितलं जातं. वस्तुतः कौटिल्य अर्थशास्त्रात विषाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तसंच हेर म्हणून स्त्रियांचा कसा वापर केला जात असे, हेही त्यात सांगितलेले आहे. पण विषकन्येचा उल्लेख त्यात नाही. तो येतो मुद्राराक्षसात. त्यात चंद्रगुप्त मौर्याचा वध करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विषकन्येला चाणक्य पर्वतक राजाकडे पाठवतात. तिच्याशी संबंध आल्याने त्या राजाचा मृत्यू होतो आणि चंद्रगुप्ताचा मार्ग निष्कंटक होतो. हीसुद्धा एक दंतकथाच. कारण असा कुणी पर्वतक राजा नव्हताच मुळी. एकंदर जिच्या नुसत्या श्वासाने माणसं मरत, जिच्या केवळ चुंबनाने यमलोकास जात अशा विषकन्या ही केवळ कवीकल्पनाच आहे.

पण आजच्या काळात खऱ्याखुऱ्या विषकन्याही असतात. त्या असतात शत्रूपक्षाला भुलवणाऱ्या, त्याच्याकडून गुप्त माहिती काढून घेणाऱ्या, प्रसंगी त्याची हत्या करणाऱ्या स्त्रीहेर. चाणक्य जेव्हा अशा हेर-तरुणींचा उल्लेख करतात तेव्हा तो असतो केवळ ‘हनीट्रॅप’बद्दलचा. यात मोहक तरूणींबरोबरच रुबाबदार पुरुषांचाही वापर करण्यात येतो. माधुरी गुप्ता पाकिस्तानातील दूतावासात सेकंड सेक्रेटरी म्हणून काम करीत असताना त्यांना जमशेद ऊर्फ जीम नामक आयएसआयच्या तरुण हेराने भुलवलं होतं. ताज्या ज्योती मल्होत्रा प्रकरणातील तथ्यं अद्याप धूसर आहेत. पण कयास असा, की पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयातील दानिश नामक अधिकाऱ्याने तिला गळाला लावलं. या दोघींबाबत हा हनी ट्रॅप प्रत्यक्ष भेटींद्वारे लावला गेला. के. व्ही. उन्नीकृष्णन यांच्याबाबतीतही असंच झालं होतं.

चेन्नईच्या रॉच्या मिशनचा तो प्रमुख होता. त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवलं अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने. १९८१ साली कोलंबोत असताना त्याला अमेरिकी कौन्सुलेटमधील एका अधिकाऱ्याने हेरलं. त्याच्याशी मैत्री केली. उन्नीचा रंगेल बाहेरख्याली स्वभाव त्याच्या लक्षात येताच त्याने त्याचा फायदा घेतला. काही महिलांशी त्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी खास प्रयत्न केले. यानंतर उन्नीकृष्णन भारतात आला. १९८५ मध्ये एके दिवशी त्याला एका अमेरिकी हवाईसुंदरीचा दूरध्वनी आला. तिने सांगितलं, की अमेरिकी कौन्सुलेटमधील त्या अधिकाऱ्याने तिला त्याचा दूरध्वनी क्रमांक दिला होता. भारतात कधी एकटं वाटलं तर उन्नीला फोन कर असं त्या अधिकाऱ्याने सांगितल्याचं ती म्हणाली. तिच्या बोलण्याने उन्नी हुरळून गेला. तो तिला चेन्नईतून मुंबईला जाऊन भेटला. मग हळुहळू त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. एके दिवशी तिने त्याला सिंगापूरला नेलं. तिथे एका हॉटेलात ते एकत्र राहिले. सीआयएने गुप्त कॅमेऱ्यात त्यांची नको त्या अवस्थेतील छायाचित्रं टिपली गेली. नंतर ती दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं. माहितीच्या बदल्यात पैसे देण्याचं आमिषही दाखवण्यात आलं. उन्नी त्यांना सामील झाला. भारताच्या श्रीलंकेतील शांतीप्रयत्नांना आलेल्या अपयशात त्याचा मोठा हात होता म्हणतात.

माहिती-तंत्रज्ञान प्रगतीमुळे आता हनी ट्रॅपकरीता अशा प्रकारे प्रत्यक्ष संपर्काची आवश्यकता कमी झाली आहे. आता उगवल्या आहेत आभासी विषकन्या. याकरीता पाकिस्तानने मोठी सायबर फौज तयार केलेली आहे. त्यात त्याला चीनकडून तंत्रसाह्य मिळतंच, पण त्याचबरोबर तुर्कीएचीही मोठी मदत मिळते आहे. नुकत्याच झालेल्या भारत-पाक संघर्षात तुर्कीएने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स दिले. त्यामुळे आपण चिडून तुर्कीएवर बहिष्कार टाकलेला आहे. खरं तर तो यापूर्वीच टाकायला हवा होता. याचं कारण सुमारे सात वर्षांपूर्वी तुर्कीएने या ड्रोन्सहून भयंकर असं अस्त्र पाकिस्तानला दिलं होतं. २०१८ मध्ये पाकिस्तान आणि तुर्कीए यांच्यात एक द्वीपक्षीय करार झाला होता. ‘सायबरगुन्हेविषयक सहकार्य करार’ हे त्याचं दाखवण्याचं नाव. परंतु त्याच्या आडून पाकिस्तानात उभारण्यात आली सायबर आर्मी. खास करून तुर्कीएवर लक्ष ठेवत असलेल्या ‘नॉर्डिक रिसर्च अँड मॉनिटरिंग नेटवर्क’ या संस्थेने केलेल्या गौप्यस्फोटानुसार या सायबर आर्मीचं लक्ष्य होतं भारत आणि अमेरिका. या करारात सहभागी असलेले तुर्कीएचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मोठ्या डिंगा मारल्या होत्या. हे झालं तुर्कीएचं. चीननेही पाकिस्तानला याबाबत साह्य केलेलं आहे. २०१८मध्ये पाकिस्तान आणि चीनने भारतातील लष्करी अधिकारी आणि जवानांना हनी ट्रॅप करण्यासाठी खास ‘मोड्युल’ तयार केलं आहे. कराची आणि बांगलादेश अशा दोन ठिकाणांवरून त्याचं काम चालतं. त्याचे परिणाम आपल्याला येथे वेळोवेळी दिसतच आहेत.

या विषकन्या कशा प्रकारे काम करतात, एखाद्याला हनीट्रॅप कसं केलं जातं, हनीट्रॅपमध्ये अडकणारे नेमके कोणत्या प्रकारचे लोक असतात या सगळ्याचा रीतसर अभ्यास झालेला आहे. ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटर’च्या ‘स्ट्रॅटेजी अँड सिक्युरिटी इन्स्टिट्यूट’मधील प्रोफेसर पॉल कॉर्निश हे या विषयातील तज्ज्ञ. ते सांगतात, दोन प्रकारची मानसिकता असलेले लोक हनीट्रॅपचे लक्ष्य असतात. एक म्हणजे - प्रेम, माया यांपासून वंचित आणि म्हणून त्यासाठी आतूर असलेले. दुसरे म्हणजे - कोणत्याही प्रकारचे नियम-कायदे आपल्याला लागूच होत नाहीत असा समज असलेले, वर्चस्ववादी मानसिकता असलेले लोक. विषकन्यांना बळी पडतात ते प्रामुख्याने आत्मविश्वासाचा अभाव असलेले, स्वतःला असुरक्षित समजत असलेले, मनात कटुता असलेले आणि प्रेमळपणाची आस असलेले. वर्चस्ववादी, अतिआत्मविश्वास असलेल्या व्यक्तींचे स्वतःबद्दल अनेक गैरसमज असतात. त्यांना वाटत असतं की अन्य कोणाहीपेक्षा ते अधिक चांगल्या पद्धतीने संकटांचा सामना करू शकतात, नियोजन करू शकतात. असे लोकही विषकन्यांच्या जाळ्यात अडकतात.

हे जाळं टाकण्यापूर्वी अर्थातच त्या व्यक्तीचा, त्याच्या स्वभावाचा, वर्तनाचा पुरेपूर अभ्यास केला जातो. त्यासाठी इंटरनेटवरील विविध संकेतस्थळं आणि समाजमाध्यमं यांनी मोठीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. तिथे आपल्या प्रत्येक हालचालीची नोंद ठेवली जाते. आपल्या पोस्ट्स, लाईक्स, कॉमेन्ट्स यावरून आपल्या स्वभावाचा, आवडी-निवडींचा अंदाज बांधला जातो. तो कोणत्या ‘सुरस आणि चमत्कारिक’ संकेतस्थळांवर रमतो, कोणत्या चित्रफिती पाहतो, काय वाचतो हे सारं पाहिलं जातं. आपल्या मोबाईलमधील अनेक ‘ॲप्स’ हेही एक प्रकारे आपल्यावर पाळतच ठेवत असतात. त्यांच्या माध्यमातून आपली माहिती जमा केली जात असते. त्यातून मग हे सायबर हेर त्यांचे लक्ष्य नक्की करतात, त्यांच्यावर विषकन्यांचं अस्त्र सोडतात.

अनेकांना हेही समजत नसतं, की या विषकन्याही आभासीच असतात. इस्लामाबादमधील आबपारा भागात आयएसआयचं मुख्यालय आहे. तेथे बसलेला कोणी लांब दाढीवाला संगणकतज्ज्ञ हाच विषकन्येचा मोहक अवतार धारण करून मदनबाण सोडत असतो. प्रदीप कुरूलकर यांना अडकवणाऱ्या तरुणीचं नाव झारा गुप्ता. ती त्यांना एकदाही भेटलेली नाही. भेटू या म्हणायची, पण भेटली नाही. निशांत अगरवालला अडकणारी तरुणी होती सेजल कपूर. ‘वायुभवन’मध्ये जॉईंट डायरेक्टर (पॅरा ऑपरेशन्स) अरुण मारवाह यांना ऑनलाइन भेटल्या होत्या त्या किरण रंधावा आणि महिमा पटेल. या सगळ्याच आभासी होत्या. सेजल कपूर ही त्यातली एक ‘यशस्वी’ हॅकर मानावी लागेल. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत तिने तब्बल ९८ भारतीयांना गळाला लावलं होतं. लष्कर, वायुसेना, नौसेना, अर्धसैनिक बलं, तसंच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलिस अशांचा त्यात समावेश होता. हे सारे तसे राष्ट्रप्रेमी नागरिकच. कदाचित त्यातील अनेकांच्या व्हाट्सॲपवर तिरंग्याचा डीपीही असेल. तथाकथित राज्यद्रोह्यांविरोधात ते ट्विप्पण्याही करत असतील. फेसबुकवर पाकिस्तानविरोधात पोस्टही लिहित असतील आणि असं असूनही ते पाकिस्तानच्या आयएसआयला मदत करत होते.

मधुजालाच्या या सर्व कहाण्या चटकदार आहेत. पण त्यातून एक समाज म्हणून आपलं चारित्र्य काय आहे हे कळतं. त्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य माणसांना या कहाण्या काही धडेही देतात. आपल्या मनावर एक चित्र कोरलेलं असतं. पाकिस्तानसाठी हेरगिरी करतात ते त्यांचे धर्मबांधवच. ते तेवढे देशद्रोही. त्यांच्या निष्ठा केवळ धर्मापायी. हे सगळे तद्दन गैरसमज आहेत. वास्तव फारच कटू आणि भीषण असतं. गेल्या काही वर्षांतील हेरगिरीच्या, हनीट्रॅपच्या घटना पाहिल्या तर आपल्या या समजुतीत फार मोठे घोटाळे आहेत हे दिसून येईल. लैंगिक आणि आर्थिक लोभापायी देश विकायला तयार होणाऱ्यांमध्ये हिंदूही आहेत आणि मुसलमानही. यातील कोणी अजाणता विषकन्यांचे शिकार बनलेले असतील. कोणी धनाच्या मोहाचे बळी ठरलेले असतील. पण त्यांच्याकडे नेहमीच एक पर्याय होता - फितुरी न करण्याचा, गद्दारी न करण्याचा. तो त्यांनी स्वीकारला नाही, हे स्पष्टच आहे. खरं तर कोणत्याही पर्यायातला एक पर्याय देश विकणं हा असतो, तेव्हा तो कोणतीही किंमत देऊन नाकारायचा असतो. तिथे चुकलात तर तुरुंगवास आहेच. पण त्याच बरोबर कपाळावर कधीही न मिटणारा देशद्रोहाचा शिक्का बसणार आहे. हा या कहाण्यांचा दुसरा धडा आहे.


रवि आमले | ravi.amale@gmail.com

रवि आमले मुक्त पत्रकार असून, त्यांची ‘रॉ’ व ‘परकीय हात’ ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results