
2023च्या मे महिन्यापासून मणिपूरमध्ये अस्वस्थता आहे. मैतेई आणि कुकी या दोन जमातींमध्ये हा संघर्ष चालू आहे आणि त्यात आजपर्यंत अडीचशेहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत आणि किमान 60 हजार लोकांना राहत्या जागेवरून पलायन करावं लागलं आहे. या संघर्षात दोन्ही जमातींना फटका बसला आहे. या दोन जमातींच्या संघर्षाला वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्यात बरीच गुंतागुंत आहे. ती सोडवण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारांची आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री बिरेन सिंग ही जबाबदारी पार पाडण्यात कमालीचे अपयशी ठरल्याची भावना मणिपूरमध्ये आणि इतरत्रही आहे. या संघर्षात बिरेन सिंग तटस्थपणे काम करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवायला कुकी लोक तयार नाहीत. या परिस्थितीत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून त्यांचा राजीनामा घेण्याची राजकीय कृती करायला हवी होती. पण तसं काही घडलेलं नाही. केंद्र सरकार योग्य ती पावलं उचलत आहे, अशी ग्वाही दिल्लीहून दिली जाते खरी, पण मणिपूरमधील परिस्थिती निवळायला तयार नाही.
मणिपूरमधील संघर्ष थांबावा, परिस्थिती निवळावी, दोन समाजांमधील कटुता कमी व्हावी, ज्या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू झाला त्या मुद्द्यांवर सामंजस्याने चर्चा व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होण्याची नितांत गरज होती. मात्र मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या कार्यशैलीमुळे राज्यात असं काही घडलं नाही. अखेरीस त्यांना कशामुळे उपरती झाली माहीत नाही; पण मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यात भाषण करताना त्यांनी नागा जमातीच्या नेत्यांना या संघर्षात मध्यस्थी करण्याचं आवाहन केलं. कुकी लोक हे प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीय असल्याने त्याच धर्मातील नागा लोकांचं ते ऐकतील, अशी त्यामागची धारणा असावी. त्यांच्या या आवाहनाला नागा नेते कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागेल. पण या संघर्षात समंजस भूमिका घेणाऱ्या कुणा मध्यस्थाची गरज आहे, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली ही चांगली गोष्ट आहे. ते आवाहन करून आपण हा प्रश्न सोडवण्यास असमर्थ आहे, अशी अप्रत्यक्ष कबुली ते देत आहेत, ही गोष्ट वेगळी.
मैतेई-कुकी संवादासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला दरवाजा किलकिला केला असताना आणखी एक प्रयत्न केंद्र सरकारकडून होत असल्याचं पुढे आलं आहे. गेल्या महिन्यात आसाम रायफल्स या भारताच्या निमलष्करी दलातर्फे मणिपूरमधील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम राबवायला सुरुवात झाली आहे. मैतेई, कुकी आणि नागा अशा मणिपूरमधील तीनही जमातींमधील 1900 पोलिस अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. यात सुमारे 1300 पोलिस मैतेई समाजाचे आहेत, तर 350 व 260 पोलिस अनुक्रमे नागा आणि कुकी समाजाचे आहेत. या तीनही समाजातील पोलिसांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी, त्यांच्यातील मणिपुरी अन् भारतीय असल्याचीही भावना बळकट व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. आपली वचनबद्धता आपापल्या जमातीशी नव्हे तर राज्य व देशासाठी असली पाहिजे, हे बिंबवण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे.
या प्रयत्नाचा परिणाम आणि उपयोग किती होतो, हे आज सांगता येत नाही. परंतु प्रयत्न सुरू झाला आहे एवढं खरं.
ईशान्य भारतातील माध्यमांमध्ये कुकी-मैतेई सामंजस्याविषयीच्या एका उदाहरणाचीही सध्या चर्चा आहे. इम्फाळ या मणिपूरच्या राजधानीपासून 25 किलोमीटर अंतरावरील ‘नीडी होम ॲकॅडमी' ही शिक्षण संस्था प्रकाशात आली आहे आणि आशेचा किरण बनली आहे. ही संस्था 2004 मध्ये डॉ. चान्स रामन आणि आर. अंगम या नागा जोडप्याने सुरू केली आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावं या हेतूने या दोन प्राध्यापकांनी ही शाळा सुरू केली आहे. 50 विद्यार्थी आणि 5 शिक्षक यांच्यासह सुरू झालेल्या या शाळेत आज 632 विद्यार्थी आणि 42 शिक्षक आहेत. हे विद्यार्थी आणि शिक्षक वेगवेगळ्या जमातींचे आहेत. अर्थातच त्यांत संघर्षरत असलेल्या कुकी आणि मैतेई समाजातीलही आहेत.
या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे 30 एकरांच्या शाळेच्या आवाराबाहेर मैतेई-कुकी संघर्ष आणि ताण असताना शाळेत मात्र या दोन समाजाचे विद्यार्थी परस्परविश्वासाने एकमेकांसोबत वावरत आहेत. 2023 च्या मे महिन्यात राज्यात हिंसाचार सुरू झाल्यानंतर दोन्ही समाजातील अनेक पालकांनी आपापल्या मुलांना शाळा सोडून घरी नेलं. त्यातून पटसंख्या कमीही झाली; पण शाळा सुरू राहिली आणि विद्यार्थी गुण्यागोविंदाने सोबत राहिले. शिक्षकांमध्येही अस्वस्थता आणि अविश्वास होता. पण संस्थाचालकांनी धीर दिल्याने शिक्षक शाळेत टिकून राहिले. आज ही शाळा कुकी-मैतेई सहकार्याचं प्रतीक बनते आहे. या शाळेचा आदर्श घेऊन दोन समाजांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी, असा मतप्रवाह त्यामुळे पुढे येतो आहे.
राजकीय प्रश्नांवर राजकीय स्तरावरच उत्तर शोधावं लागतं हे खरं आहे. पण त्या स्तरावर प्रश्न सुटत नसल्यास लोकांनाच सूत्रं हाती घ्यावी लागतात. कारण अशा प्रश्नांमध्ये होरपळून निघतात ती सामान्य माणसंच.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.