
अझरबैजानने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन दिल्याने हा देश आपल्याकडे अचानक प्रकाशझोतात आला आहे. काय आहे हे अझरबैजान प्रकरण? काही काळ या देशाच्या राजधानीत, बाकूमध्ये राहिलेल्या भारतीय तरुणीने करून दिलेली ओळख.
पाऊस पडतोय. खूप थंडी आहे. सगळं गार गार झालंय. आज बाकूमधला माझा शेवटचा दिवस. काहीही हातात न घेता मी बाहेर पडलेय. पाऊस पडतोच आहे आणि मला खूप आवडतो आहे. शांत-निवांत. रस्त्यावर कुणीच नाही. काही दुकानांत निर्हेतुक चक्कर मारून मी एका ठिकाणी आडोशाला थांबते. समोर कबुतरांची शाळा भरली आहे... मोठ्ठा वर्ग! भिजतायत मॅड! पण मी पण अशीच मॅड नाही का? हा जो वास येतोय ना मातीचा, तो मला माझ्या बालपणीच्या अंगणातल्या पावसाची आठवण करून देतोय. अगदी तोच वास, तसाच पाऊस! मी पण तीच! काहीच बदललेलं नाही. नाहीच बदलणार... एक छोटासा मुलगा धावत येतो आणि कबुतरांची शाळा आकाशात उडते. इकडचं आकाश वेगळं असेल का? का माझ्या घरावरच्या आकाशासारखंच असेल, तसंच असेल? मला खात्री आहे. आणि ही माती पण तश्शीच असेल. काय वेगळं असणार? माणसं पण तीच आहेत. त्यांचं प्रेम जाणवलंय मला या दोन वर्षांत...
अझरबैजान- श्रीमंती जिथे वसते असा जगातला छोटासा देश. पेट्रोलचा देश. उद्याचा देश. ‘बाकू इज नेक्स्ट दुबई' अशी जाहिरात केली जाते हल्ली. साय-फाय मूव्हीमधल्या वाटाव्यात अशा इथल्या उत्तुंग इमारती, अत्याधुनिक पद्धतीचं आर्किटेक्चर, काचेच्या कल्पनातीत आकाराच्या वास्तू, झगमगाट! या देशात मी दोन वर्षांहून अधिक काळ काढला. इथला वरवरचा चकचकाट बघून झाल्यानंतर मग मी खरा अझरबैजान शोधू लागले आणि सापडत गेला एक वेगळाच देश. गरिबीशी लढणारा साधा, कळकट-मळकट पण खरा देश. तर त्या अझरबैजानविषयी थोडंसं...

हा ॲन्टिक विकणारा अझेरी माणूस. महा उत्साही. कोणी पाहुणे आले की त्यांना मी आवर्जून याच्या दुकानात आणते. याचं दुकान म्हणजे लाखो गोष्टी. त्यात पुस्तकं, हँडिक्राफ्ट्स, नाणी, पेनं, म्युझिक तबकड्या, शाली, पेंटिंग्ज, जुनी ज्वेलरी, काहीही मिळू शकतं. जुने फोटो, लोकांनी एकमेकांना पाठवलेली कार्ड्स, बिअर मग्ज, हस्तलिखितं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लोकांनी एकमेकांना पाठवलेली पत्रं आहेत याच्याकडे. दुकानात गेलं की तो पहिलं तुम्हाला बसायला जागा करेल आणि मग खजिन्यातून एकेक गोष्टी काढत राहील. एकीकडे जुन्या डिस्कवर ‘राजकप्पू'ची (राज कपूर) गाणी सुरू होतील खास तुमच्यासाठी. दुकानातली एक भिंत मेडल्सनी भरलेली. यात खरेखुरे, महायुद्धाच्या वेळी वापरलेले बिल्ले आहेत. एखादा हिटलरच्या वेळचाही सापडलाय. पत्रांचा संग्रह तर भन्नाटच. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारणारी ती पत्रं. मला रशियन वाचता येत नाही, त्यामुळे त्या पत्रांत काय लिहिलंय ते समजत नाही. एका पिवळ्या पडलेल्या, जीर्ण झालेल्या पत्रावर कुठे तरी अश्रूंचा डागही दिसतो. एक काटा सरसरून जातो अंगावरून. मोबाइल, व्हॉट्सॲप नसतानाच्या त्या काळात आपले लोक सुखरूप, खरं तर जिवंत आहेत ना हे बघायला काळजीने पाठवलेली ती नाजूक पत्रं...
तेवढ्यात लिंबाच्या फोडी घातलेला अझेरी चहा येतो तुमच्यासाठी. आता बसून गप्पा मारायच्या. त्या माणसाला थोडं थोडं इंग्लिश येतं. संवाद करायला तेवढं पुरेसं आहे. मग तो त्याने कुठून कुठून काय काय गोळा केलं हे सांगतो. मी राजकप्पूला भेटलेली नाहीये म्हणून वैतागतो. गमतीशीर आहे प्रकरण. मी काही जुनी कार्ड्स, चित्रांची प्रिंट्स विकत घेते; त्यावर तो आणखी दोन-तीन कार्ड्स अशीच हातात ठेवतो. नको नको म्हणत असताना त्याने ‘बाय' म्हणताना तोंड गोड करण्यासाठी बखलावा आणलेला असतो. त्याला वस्तुविक्रीपेक्षा माणसं जोडण्यात खूप आनंद. अशा काही जागा असतात, जिथे गेलं की घरी जाऊन आल्यासारखं वाटतं. हे दुकान ही त्यातलीच एक जागा. दर काही दिवसांनी पाय तिथे वळतातच.

गाला माझ्याकडे काम करते. तिला बाकूची लेडी डायना म्हणायला हरकत नाही. कित्ती ती सुंदर, शांत, आनंदी! मी मुंबईहून इथे परत आले की ती धावत भेटायला येते आणि दोन्ही हात गळ्यात टाकून घट्ट मिठी मारते. ब्लू आय लायनर लावणाऱ्या या सुंदर चेहऱ्यामागे गरिबीची धग आहे. मला माहीत नव्हतं हे. एकदा तिच्या बुटांकडे लक्ष गेलं. कडाक्याच्या थंडीत तिने फाटके बूट घातले होते. अझरबैजानमधले हे दोन टोकांचे सामाजिक, आर्थिक स्तर. चकाकणाऱ्या जगात आकाशाला भिडणाऱ्या इमारतींखाली छोटी, उदास, कळाहीन घरं आहेत. तिथल्या आज्या संध्याकाळी पेपर नॅपकिन विकायला सब-वेमध्ये बसतात. इतक्या सुंदर, गोड आज्या... त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं. पण हेही खरं, की इथे एकही भिकारी नाही बघितला दोन वर्षांत. बाकूबाहेर बिना मार्केट आहे. एकदा तिथे गेले होते. हा मुंबईनजीकच्या उल्हासनगरसारखा भाग. परत येताना एक आजी दिसली. हातगाडीवर द्राक्षं आणि काही फळं विकत होती. फारशी विक्री झाली नसावी. एका चढावरून ती गाडी ढकलत निघाली होती. तिला दम लागत होता. मी टॅक्सीसाठी थांबलेले. तिच्याकडे गेले आणि द्राक्षं द्यायला सांगितली. खाणाखुणा करून तिला मी काय हवं ते सांगत होते; पण तिला काही बोध होत नव्हता. मग एक भाजीवाला मदतीला आला. ती आजी खूप कमी भावात द्राक्षं विकत होती. मी अर्धा किलो घेतली, पैसे दिले. तेवढ्यात मी बोलावलेली टॅक्सी आली म्हणून मी पटकन निघाले. आजीकडून सुटे ‘कपिक' परत घ्यायचे राहिले. अझेरी भाषेमध्ये ‘कपिक' म्हणजे पैसे . मी गाडीत बसतेय तोवर तो भाजीवाला पळत आला आणि त्याने २० कपिक मला दिले. मी ‘साव' (थँक यू) म्हणेतोवर आजी स्वतःच धापा टाकत धावत आली. काय झालं हे बघायला मी गाडीतून उतरले, तर तिने माझ्या हातात द्राक्षांचा एक घोस ठेवला. गोंधळून मी का ते विचारलं, तेव्हा बरोबरचा भाजीवाला म्हणाला, ‘तुम्हाला १०० ग्राम कमी दिले गेले चुकून.' मी गुपचूप ते पैसे आणि द्राक्षं घेतली. नको म्हणू शकले नाही, कारण तो तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता.
एकदा बाहेरून टॅक्सीने घरी आल्यावर लक्षात आलं की माझी पर्स हरवली आहे. कुठे ते कळलंच नव्हतं. आम्ही आपले शोधतोय. ज्या हॉटेलमध्ये खायला गेलो तिथेही शोधलं, पण पर्स काही मिळाली नाही. माझा पासपोर्ट पण होता त्यात. मी पुरती टेन्स. परत घरी आलो तर आधीच आमचा टॅक्सीवाला वाट बघत थांबलेला माझी पर्स घेऊन !
बाकू मॉडर्न आर्किटेक्चरकरता प्रसिद्ध. या लोकांनी कमालीच्या इमारती बनवल्या आहेत. भन्नाट. गगनचुंबी. काचेच्या. वेगवेगळ्या ॲबस्ट्रॅक्ट आकारांच्या. बाहेरून चकचकीत असलेल्या या इमारतींच्या आत जरासं डोकावलं तर वाड्यासारख्या जुन्या वास्तू दिसतात. रंगहीन, कळाहीन, पण इतिहासाची साक्ष देणाऱ्या. इथल्या खऱ्या रहिवाशांची ही जुनी घरं. तुटकेफुटके लाकडी जीर्ण जिने, मधल्या चौकात बसायला बाकडी, जुन्या गवती खुर्च्या, इमारतीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दोरी बांधून वाळत घातलेले कपडे आणि गप्पा मारणारे वयस्कर लोक. एकीकडे हातांनी शिवणकाम, भरतकाम चालूच असतं. भोवती लहान पोरं खेळत असतात. हां, पण या गेटच्या बाहेर आलात की तीच इमारत बाहेरून चकचकीत, काचेची, नवीन कोरी. तिथे गुच्ची, प्राडा किंवा तत्सम मोठ्या ब्रँड्सनी शोरूम्स थाटलेल्या. कोणाला खरं वाटेल? त्या भिंतीमागच्या वस्तीचे रंग उडालेले असतील, पण तिथे बेगडी रंग नाहीत. तिथे चकचकाट नाही. तिथे कधी कधी रोजच्या पोटापाण्याची पण भ्रांत आहे. पण ते जग साधंसुधं आहे आणि खरं आहे.
अशाच आधुनिक इमारतींच्या जंजाळात एक ठिकाण आहे. मला आवडत नाही ते अजिबात. कारण तिथे गेलं की खूप वाईट वाटतं. पण सांगते त्याबद्दल. तर तिथे पार्श्वभूमीला अशाच मोठमोठ्या, अत्याधुनिक गगनचुंबी इमारती आहेत आणि त्यांच्या पायथ्याशी एक बेंगरूळ वस्ती आहे. तिथली बरीचशी घरं पडलेली, मोडकळीस आलेली, वीज नसलेली. करड्या रंगाची ही दुनिया. वरच्या रंगीत जगाचा इथे मागमूसही नाही. काहीसं धारावीसारखं... बऱ्याच वेळेला ते कॅमेऱ्यात पकडायचा मोह व्हायचा; पण काही तरी मागे रोखायचं मला... काय होतं ते, कोण जाणे!
मॉल्स आले तरी इथे अजून बाजार संस्कृतीही आहे. बाजाराला इथे ‘बाजार'च म्हणतात. इथल्या बाजारात मी बऱ्याच वेळा जाते. ताज्या, शेतातून उपटून आणलेल्या भाज्या. रसरशीत फळं. एक विभाग चीजचा, एक मांसाहारी लोकांसाठी खास... आणि या बाजारातल्या खास भाजीवाल्या आज्या. यात एक लोणची विकणारी आजी आहे. सुरकुत्यांनी भरलेला चेहरा, वडाच्या खोडासारखा. तिच्या अंगावर रेषा उमटल्यात. काळाच्या रेषा. ती अशी ओढून जवळ बसवते मला. मग तिच्या भाषेत बोलणं सुरू होतं. इथे काकडी, टोमॅटो, भाज्या, आवळे, फळं, सगळ्यांचं लोणचं करतात. मुरब्बा म्हणतात त्याला. आपला मुरंबा, यांचा मुरब्बा. हे लोक ‘हवा', 'दवा', 'मरीज़', 'दरवाज़ा', 'दुवा', 'मुहब्बत', 'दिल', 'हिसाब' हे शब्द आपण वापरतो त्याच अर्थाने वापरतात. हां, तर ही आजी... ती काही मुरब्बे उघडते आणि मला चव घ्यायला लावते. हवा-नको प्रश्न नसतो. आणि तिच्या त्या प्रेमाने ओथंबलेल्या हाताला नाही म्हणायची हिम्मतही नसते माझ्यात. माझ्या आवडीचा इकडच्या गावठी फळांचा मुरब्बा विकत घेऊन मी निघताना ती मायेने चेहऱ्यावरून हात फिरवते. मला माझी आजी भेटल्यासारखं वाटतं. अनेकदा काहीही घ्यायचं नसताना फक्त तिचा तो मायेचा स्पर्श अनुभवायला मी जाते तिथे वारंवार.
या वयस्कर बायका जुन्या पद्धतीच्या रशियन फ्रॉकमध्ये असतात. फ्रॉकचे हात फुग्यासारखे असतात. एक मोठा स्कर्ट आणि त्यावर दुसरा छोटा स्कर्ट, त्यावर एक खिसा; त्यात त्यांचे पैसे, रुमाल इत्यादी. डोक्यावर एक छानसं टोपडं. खरोखर ते टोपडंच असतं; छोट्या बाळांना बांधतात तसं, झालर लावलेलं. काहीजणी टोपड्याऐवजी शाल घेतात. त्यांच्याबरोबर असतात पोट सुटलेले आजोबा. पॅन्टला खांद्यावरून येईल असा बेल्ट लावलेला असतो. खास रशियन पद्धतीची कॅप. छोटीशी मिशी आणि भलं मोठ्ठं हास्य. चार वाजले की हे आजोबा लोक त्यांच्या त्यांच्या कट्ट्यावर गोळा होतात. मग त्यांचे खास अझेरी खेळ बाहेर निघतात. डॉमिनो म्हणतात त्याला. कसलासा सोंगट्यांचा खेळ. बाजारात, बिल्डिंगच्या खाली, दुकानाबाहेर, बागेत, समुद्रावर, कुठेही हे लोक तासन्तास खेळत बसतात. त्यात आज्ज्यांना प्रवेश नाही. आज्ज्या बसतात विणकाम करत, एकीकडे भाजी विकत किंवा शिवणकामाच्या एखाद्या नमुन्याबद्दल बोलत. संध्याकाळी लहान मुलं यांच्याकडेच असतात. इथे अजून कुटुंबसंस्था टिकून आहे. लहान पोरांबरोबर आजी-आजोबा बागेत किंवा समुद्रावर दिसतात. लाल लाल गोबऱ्या गालांची ही लोकरीच्या गुंड्यासारखी पोरं म्हणजे कोबीच्या जाडजूड गड्ड्यांसारखीच दिसतात. हे सगळं बघायला मला खूप आवडतं.

माझ्या घराजवळच एक आर्ट मटेरियलचं दुकान आहे. त्याची मालकीण एक धिप्पाड, जाडजूड रशियन बाई आहे. डोक्याबरोबर कापलेले केस. पुरुषी शर्ट आणि पॅण्ट. हिला हसता येत नसावं बहुतेक. कायम गंभीर. आवाजही घोगरा. एकदा मी हिच्या दुकानात काही ब्रश आणि रंग विकत घेतले. काउंटरवर जाऊन तिला विचारलं, 'किंमत?' उत्तर आलं, 'आज ठु मारे फास ख्या है?' पर्समधून डोकं काढून चमकून बघितलं, तर मॅडम ‘दीवार' सिनेमा बघत होत्या- ‘हमिता बच्च'चा. तिच्या मागे लॅपटॉपवर चालू होता पिक्चर आणि बाईसाहेब फुल रंगात आलेल्या. “मेरे पास मन्नत है...” मी म्हणाले. (मन्नत- अझेरी रुपये) पुढचा संवाद हसण्यात बुडून गेला. तर सांगायचं असं, की इथे हे बॉलिवुड प्रेम फारच आहे. त्यांना डायलॉग पाठ असतात, हीरो-हिरॉइन माहीत असतात; पण ते सगळे जुने. राजकप्पू आणि मिथुन चकरबोरती हे खास लाडके. मग शारुखान. हिरॉइन मात्र फक्त हेमा मालिनी. आणि खबरदार जर तुम्हाला ‘जिमी जिमी' गाणं येत नसेल तर... रागावतात ते! हिंदुस्तानी असून आमच्या मिथुनचं ‘जिमी जिमी' माहीत नाही? (कदाचित मग टॅक्सीवाले एखादा मन्नत जास्त पण घेतील... काय सांगावं!) ही बॉलिवुडची साथ सगळ्या वयोगटांत पसरली आहे. मजा वाटते. हल्लीच्या पिढीला ‘कभी खुशी कभी गम' फार आवडतो. टॅक्सीत बसलं की टॅक्सीवाले विचारतात, 'हिंदुस्तानी? पाकिस्तानी?' आणि आपण ‘हिंदुस्तानी' म्हटलं की ‘जिमी जिमी' सुरू होतंच. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे हिंदी गाण्यांच्या सीडीज पण असतात. मग खास त्या तुमच्यासाठी लावल्या जातात. टॅक्सीवाला रंगेल असेल तर तो गातोच बरोबर. चित्रपट हा पण एक धागाच नाही का दोन संस्कृतींचं मिलन करणारा?
इथे चहा पिणं हा एक समारोह असतो, आणि तो दररोजचा असतो. अझेरी चहा हे एक वेगळं प्रकरण आहे. संध्याकाळी चार-पाच वाजण्याच्या सुमारास लोक चहा प्यायला टी-रूम्समध्ये गोळा होतात. मग चंदेरी रंगाच्या नक्षीदार कपातून चहा पेश केला जातो. त्याच्याबरोबर एक-दोन साखरेचे तुकडे. कधी गुलाबपाणी. फारच अगत्यशील टी-हाऊस असेल तर मग मिठाई पण. या चहात दूध नसतं पण लिंबाची फोड जरूर असते. प्रयोगच करायचे असतील तर बडीशेप, लवंग, दालचिनी, गुलाबाच्या पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या घालून चहा मिळतो. पीच, पेर, ब्लू बेरी, रेड बेरी यांचाही चहा मिळतो. जास्वंदाचा चहा इथे फेमस आहे. मला स्वतःला थोडंसं गुलाबपाणी शिंपडलेला चहा आवडतो. त्याचा वेड लावणारा मंद दरवळ नाकात जातो. जोडीला चहा दुकानाचा मालक, किंवा मालकीण बडबडी असेल तर बघायलाच नको. मग तुर्की मिठाई पण समोर येते. घराघरांमध्येही हा चहा असाच प्रेमाने एकत्र प्यायला जातो. त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात.

एकदा फिरत फिरत मी ‘इचेरी शेहेर'मधल्या एका चहाच्या दुकानात गेले. ‘इचेरी शेहेर' हा इथला जुना भाग. तिथे जुने राजवाडे, वस्तुसंग्रहालयं, आर्ट गॅलरीज, कार्पेटची आणि इथल्या हस्तकलेच्या वस्तू मिळणारी दुकानं आहेत. फार फार सुंदर भाग आहे हा. वेगळ्याच जगात असल्यासारखं वाटतं तिथे. तर तिथल्या टी-हाऊसमध्ये बरेच वयस्कर आजोबा आले होते. दुकानदाराने चहा आणून दिला. मग हळूहळू त्यांची गाणी सुरू झाली. मी कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसले होते. तो त्यांचा नेहमीचा अड्डा असावा. सगळेच रंगात यायला लागले होते. कुणी गात होतं, तर कुणी पायाने ताल धरत होतं. मग हॉटेल मालकिणीने कमंचा काढला. हे इथलं तंतुवाद्य, आपल्या एकतारीसारखं. एका आजोबानी कमंचा वाजवायला सुरुवात केली. पाच वाजलेले. थंडीचे दिवस. काळोख पडायला लागला होता. हॉटेल मालकिणीने मोठमोठ्या मेणबत्त्या पेटवल्या. सगळं वातावरण वेगळंच झालेलं होत. कॅमेऱ्यात पकडता येणारं नव्हतं. एकेक आजोबा उठून खास अझेरी स्टाइलमध्ये नाच करायला लागले. ज्यांना उठता येत नव्हतं ते बसूनच जोशपूर्ण टाळ्या वाजवत होते. आता कोणी आजोबा राहिलेले नव्हते. सगळे तरुण जवान झालेले. कदाचित त्यांच्या तरुणपणीचं गाणं वाजवत होते ते. हास्य, टाळ्या, नृत्य... नुसता ऊत आला होता. मला खरं तर शेजारच्या ‘हार्ड रॉक कॅफे'मध्ये पण डोकावायचं होतं. पण ही मैफिल सोडून?... शक्यच नव्हतं! कदाचित ‘हार्ड रॉक कॅफे'मध्ये पण अशी मजा होत नसेल. फक्त दोन-तीन मन्नत किमतीच्या चहाच्या बदल्यात मला मेजवानी मिळाली होती.
एकीकडे शांततेत, साधेपणात हे लोक जीवन व्यतीत करत असतात; तर त्याच वेळी समाजाचा दुसरा भाग छानछोकीत, गजबजाटात रंगलेल्या दुनियेत हरवलेला दिसतो. वर म्हटल्याप्रमाणे समाजाचे गरीब आणि श्रीमंत हे दोनच स्तर. इथे मध्यमवर्ग नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दरी फार मोठी. श्रीमंत घरांतल्या स्त्रिया डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत रंगलेल्या असतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. पाच-सहा इंच उंच बूट. यच्चयावत युरोपियन गोष्टी उपलब्ध. पण यांचा शृंगार मात्र खास अझेरीच. अति कोरलेले डोळे, खोटे केस, खोट्या भुवया, भडक रंगाच्या लिपस्टिक्स, फॅशनेबल ड्रेस आणि हातात महागड्या ब्रॅण्डच्या पर्सेस. या कधी गाडीतून खालीच उतरत नसतील असं वाटतं. इथल्या स्त्रिया सुंदर असतात, वादच नाही, पण त्याबरोबर ती सजावट त्यांना काहीसा कृत्रिम लुक देते. लहान मुलींनाही लवकरच मोठ्या करून टाकते. चकचकीत टोप्या, पँट्स , बूट, घड्याळं- सगळं चकचकीत नाही तर खडेजडित. कपडे मग तसेच, चकाकणारे.

पुरुष फक्त चारच रंग वापरताना दिसतात. गडद निळा, पांढरा, काळा आणि करडा. इस्लामिक देश असला तरी इथे फारसे पुरुष दाढी ठेवत नाहीत. जे ठेवतात त्यांच्या दाढ्या फॅशनेबल असतात. डोक्यावर एक विशिष्ट प्रकारची (‘फुलों के रंग से'मधल्या देव आनंदची) कॅप आणि तोंडात सतत सिगारेट. धूम्रपान हे इथे राष्ट्रीय व्यसन आहे. प्रदूषण असेल तर ते या सिगारेट्सचंच.
इथे अत्तरांची दुकानं पावलोपावली असतात. जगभरातले आणि खास अझेरी पर्फ्युम्स इथे मिळतात. बाहेर मुली पर्फ्युम्सच्या स्ट्रिप्स घेऊन उभ्या असतात. त्याचा वास आवडला तर आत जायचं. सगळे सब-वे, मॉल्स, दुकानं, सगळं सगळं पर्फ्युममय झालेला असतं.
अत्तर, चहा, हुक्का, गालिचे आणि ताक या पाच बिंदूंवर आधारलेली ही संस्कृती. मी पहिल्यांदा इथे आले तेव्हा बऱ्याच तरुण मुलांना मॉलमध्ये बाटलीतून काही तरी पांढरं द्रव्य पिताना बघितलं. फास्ट फुड चेन्समध्ये पण तेच. पण ते ताक असेल असं मला स्वप्नातही वाटलं नाही. ताक इथल्या सर्व वयोगटांतील लोकांचं आवडतं पेय. हॉटेलमध्ये जेवायला गेलं आणि ताक मागवलं नाही असं होत नाही. या ताकाला ‘आयरान' म्हणतात. ताकाचे फ्लेवर्स मिळतात, त्यात पुदिना फार लोकप्रिय. आपल्याकडे मठ्ठा असतो, त्याच्याचसारखा. लहान मुलांसाठी चॉकलेट फ्लेवर ताक पण मिळतं. आणि हो, इथे सूप म्हणून कढी मिळते.
इथे ‘मंगल' म्हणजे वांगं. तर या मंगलचं सलाड मिळतं. पहिल्यांदा इथे आलो तेव्हा एकदा हॉटेलमध्ये गेलो. मेनूकार्ड तर वाचता येत नव्हतं. वेटरला थोडं थोडं इंग्रजी येत होतं. त्याला म्हटलं, इकडची खास डिश आण. भारत सोडून दोन महिने झालेले आणि घरगुती खाण्याची इच्छा खूप होत होती. वेटरने ‘मंगल सलाड' समोर आणलं. ते पाहून आम्ही चक्रावलो आणि मनापासून आनंदलोही. ते सलाड म्हणजे आपल्या वांग्याचं भरीत. बरोबर गरमागरम पाफ्ड लवाश, अगदी भाकरीसारखा. अन्न खरंच माणसाला जवळ आणतं. वाटतं, एकाच बिंदूपासून सुरू झालंय हे विश्व. कढी आणि मंगल सलाडने मला कधीच याची खात्री करून दिली आहे. आत्ता बाहेर शून्य डिग्री तापमान असेल, पाच वाजताच सगळं काळोखून गेलं असेल, तरी माझ्या घरी बनणाऱ्या मंगल सलाडने मी कधीच मुंबईत पोहोचलेले असते. एक सांगायचंच राहिलं, इथे सलाडमध्ये शेपू आवर्जून देतात. लोक शेपू कच्चा खातात.
पाचवा केंद्रबिंदू म्हणजे गालिचे. हातमागावर विणले जातात. या लोकांच्या बोटांत ही किमया आनुवंशिक असते. अफाट काम असतं ते. बाकूमध्ये कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यालगत बुलवार नावाचा एक भाग आहे, मुंबईतल्या क्वीन्स नेकलेससारखा. या बुलवारवर इथल्या कार्पेट्सचं एक म्युझियम आहे. शहरातला हा सगळ्यांत सुंदर भाग.
समुद्राची माझी ओढ तशी आधीपासूनचीच. पण इथे आल्यावर घराची खिडकी उघडली की जो समुद्राचा १० किमीचा पट्टा दिसतो, तेव्हा फक्त एवढंच वाटतं, हे सारं बघायला मिळतंय मला... भाग्यवान आहे मी! संध्याकाळी या बुलवारवर लोक जॉगिंग करायला, पळायला, फिरायला, गप्पा मारायला, लहान मुलांना फिरवायला जातात. इथल्या टीनएजर्समध्ये स्केट्स फार लोकप्रिय आहेत. ही सुदृढ, सुंदर मुलं आपल्या शेजारून स्केट्सवरून जातात तेव्हा त्यांच्या त्या विजेच्या चपळाईचं कौतुक तर वाटतंच; पण त्यांना वाढायला, फुलायला एवढी जागा आहे याचा हेवाही वाटतो. चालण्याच्या ट्रॅकच्या बाहेर स्केट्सचा ट्रॅक, त्याबाहेर लहान मुलांसाठी खेळायला जागा, बाजूला कॅफेज, त्याच्या बाहेर सुंदर फुलझाडांचा पट्टा. तिथे बहुधा प्रेमी युगुलं जग विसरून बसलेली. आणि त्याबाहेर मग सायकल ट्रॅक. एवढं सगळं असलं तरी कमालीची शांतता. फक्त समुद्राचाच काय तो आवाज. तो डोळे मिटून ऐकायचा आणि हे जग असंच सुंदर राहू दे असा विचार करायचा... हळूहळू सूर्य बुडतो. कारंज्यातले दिवे सुरू होतात, ते नाचू लागतात. दूरच्या जहाजांवरचे दिवे दिसायला लागतात. सगळं आणखी शांत शांत होतं. मग लोक घरी पांगतात, पण मी बसून राहते... रात्रीचा समुद्र खूप सुंदर वाटतो. मित्रासारखा जवळचा वाटतो. त्याच्या पाण्यावर आता फ्लॅग स्क्वेअरचे दिवे तरंगत असतात... आकाशात चंद्र उगवलेला असतो... छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात फार आनंद देऊन जातात... छान वाटतं.
... आजही मी तशीच बसले आहे. दिवस कधीच बुडाला आहे. बाकूमधला आज माझा शेवटचा दिवस आहे!