
ती गल्लीच्या कोपऱ्यावर लहान-लहान मुलींबरोबर खेळत होती.
तिची आई तिला चाळीमध्ये शोधत होती. किशोरीला आपल्या खोलीत बसवून आणि बाहेरवाल्याला चहा आणायला सांगून ती चाळीच्या तीनही मजल्यांवर जाऊन आपल्या मुलीला शोधून आली होती. पण ती कुठे मेली होती कुणास ठाऊक. संडासाच्या जवळ जाऊनही तिने आवाज दिला होता. “सरिता...ए सरिता...” पण ती संडासमध्ये नव्हतीच आणि तिची पोटाची काही तक्रार नव्हती हे तिला माहिती होतं. औषधाविनाच तिला बरं वाटू लागलं होतं.
ती गल्लीच्या कोपऱ्यावर जिथं कचऱ्याचा ढीग पडला होता तिथं लहान- लहान मुलांबरोबर खेळत होती. तिला कशाचीच चिंता नव्हती.
तिच्या आईला मात्र चिंता वाटत होती. ती किशोरीला आपल्या खोलीत बसवून आली होती. किशोरी म्हणत होता- “तीन सेठ बाहेर बाजारात मोटरगाडी घेऊन उभे आहेत.”... सरिता कुठे गायब झालीय... मोटरगाडीवाले सेठ दररोज थोडेच येतात... महिन्यातून एकदोन मोठी गिऱ्हाईकं किशोरी घेऊन येतो ही त्याची मेहरबानीच आहे. नाहीतर जिथं पानाच्या पिचकाऱ्या आणि जळणाऱ्या बिड्यांच्या एकत्रित वासाने किशोरीचा जीव गुदमरतो तिथं सेठ लोक कसे येणार?... किशोरी हुशार आहे. तो कुणालाच घरापर्यंत आणत नाही तर, सरिताला कपडे वगैरे बदलायला लावून तो बाहेर घेऊन जातो. तो त्या लोकांना सांगतो की, “साहेब, आजकाल दिवस मोठे वाईट आलेयत. पोलिस सारखे मागावरच असतात. आत्तापर्यंत धंदा करणाऱ्या दोनशे मुली पकडल्या गेल्या आहेत. कोर्टात माझ्यावरतीही एक केस चाललीय....म्हणून खूप जपून चालावं लागतं...”
सरिताच्या आईला खूप राग आलेला होता. ती जिन्यावरून खाली उतरली तेव्हा जिन्याच्या पायथ्याशी रामदेई बिड्यांची पानं कापत बसली होती.
सरिताच्या आईनं विचारलं- “तू सरिताला पाहिलंस कुठं? कुठं मेलीय कुणास ठाऊक! ती आज मला भेटूच दे. मारून मारून तिची हाडं खिळखिळी करते की नाही ते बघ....एवढी घोडी झालीय; पण सारा दिवस मुलांमध्ये खेळत असते...”
रामदेई बिड्यांची पानं कापत होती. तिने सरिताच्या आईला काहीच उत्तर दिलं नाही. ती तशीच बडबडत रामदेईच्या जवळून निघून गेली. प्रत्येकवेळी असंच होतं. तिला दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी सरिताला शोधावं लागत होतं आणि ती जिन्याजवळ दिवसभर पेटीसमोर ठेवून बिड्यांना लाल आणि पांढरा दोरा गुंडाळत बसलेल्या रामदेईला असंच सगळं बोलत असे.
ती अजून एक गोष्ट चाळीतील स्त्रियांना उद्देशून सांगत असे- “मी तर माझ्या सरिताचं लग्न एखाद्या नोकरदार माणसाशी लावून देणार आहे... म्हणून तर मी तिला काहीतरी शीक असं म्हणत असते. जवळच म्युनिसिपाल्टीनं एक शाळा काढलीय. त्यात सरिताचं नाव घालावं असा मी विचार करतेय. हिच्या वडिलांना आपली मुलगी खूप शिकावी असं वाटत होतं...” यानंतर ती दीर्घ उसासा टाकून आपल्या मेलेल्या नवऱ्याचा किस्सा सांगत असते. तिचा नवरा रेल्वेत कामगार होता. त्या चाळीतील स्त्रियांना तो किस्सा पाठच झालेला होता.
सरिताच्या आईचं जाऊ द्या. जर रामदेईला विचारलं असतं की, सरिताच्या वडिलांना मोठ्या साहेबाने शिवी दिल्यावर काय झालं तर रामदेईनेदेखील झटकन सांगितलं असतं की, “सरिताच्या बापाच्या तोंडाला फेस आला होता.” तो साहेबांना म्हणाला “मी तुमचा नोकर नाहीये-सरकारचा नोकर आहे मी. तुम्ही माझ्यावर अधिकार गाजवू शकत नाही. जर तुम्ही मला पुन्हा शिवी दिलीत तर मी जबडा तोडून टाकीन तुमचा...”मग काय साहेब रागावले आणि त्यांनी अजून एक शिवी हासडली. त्यावर सरिताच्या बापाने साहेबाच्या मानेवर असा फटका मारला की, त्याच्या डोक्यावरची हॅट दहा फुटांवर जाऊन पडली. त्याच्या नजरेसमोर दिवसा तारे चमकले. पण तो मोठाच माणूस होता. पुढे होऊन त्याने सरिताच्या बापाच्या पोटात फौजी बुटाने अशी लाथ मारली की, सरिताचा बाप रक्तच ओकला आणि तिथंच रेल्वेलाईनजवळ पडून त्याने प्राण सोडला...सरकारने साहेबावर खटला चालवला आणि साहेबांना सरिताच्या आईला पाचशे रुपये द्यायला लावले...पण तिच्या आईचं नशीब वाईट. तिला सट्ट्याचा नाद लागला आणि पाच महिन्यांत तिने सगळे पैसे उडवले.
सरिताच्या आईच्या तोंडावर हा किस्सा नेहमी असे. पण हा किस्सा खरा आहे यावर कुणाचाही विश्वास नव्हता. चाळीत राहणाऱ्या कुणालाही सरिताच्या आईविषयी सहानुभूती वाटत नव्हती. कदाचित सगळ्यांची स्थिती दयनीय असल्यामुळे असे असेल, पण कुणीच कुणाचा मित्र नव्हता. त्या चाळीमध्ये राहणारे सगळेजण दिवसा झोपत असत आणि रात्री जागत असत. रात्री त्यांना जवळच्याच मिलमध्ये कामाला जायचं असे. त्या चाळीमध्ये सगळेजण अगदी जवळजवळ राहात होते. पण कुणालाही एकमेकांबद्दल आस्था नव्हती.
सरिताची आई आपल्या जवान मुलीला धंदा करायला लावते हे सगळ्यांना माहीत होतं. जेव्हा ती म्हणे की, “माझ्या मुलीला दुनियादारीतलं काही कळत नाही...” तेव्हा कुणीही तिला खोटं ठरवण्याच्या फंदात पडत नसे. कुणाचंही भलंवाईट चिंतण्याची त्यांना सवयच नव्हती. बस एकदाच असं झालं होतं की, सकाळी सकाळी सरिताला तुकारामने नळाजवळ छेडलं होतं आणि त्यावरून सरिताची आई तुकारामच्या बायकोच्या नावाने खूप ओरडली होती... “ह्या मेल्या टकल्याला तू सांभाळत का नाहीस?... माझ्या मुलीकडे वाईट नजरेनं पाहणारे याचे डोळे फुटतील...एखाद्या दिवशी मी या टकल्याला चपलेने मारून मारून ढिला करून टाकीन. बाहेर त्याला काहीही धंदे करू देत. इथं त्याला चांगल्या माणसासारखंच राहावं लागेल... मी काय म्हणतेय ते ऐकतेयस् ना?”
तुकारामची तिरळी बायको साडी नेसता नेसता बाहेर आली होती- “खबरदार, एक शब्द तोंडातून बाहेर काढशील तर... चुडेल मेली... ही तुझी सरिता हॉटेलच्या पोरांबरोबर आँखमिचौली खेळते ते आम्ही पाहत नाही? तू आम्हांला काय आंधळं समजतेस...सरिता दररोज नटून थटून बाहेर कुठं जाते हे आम्हाला माहीत नाही असं वाटतं तुला... मोठी आलीय इज्जतवाली. जा इथून तोंड काळं कर...” मग सरिताच्या आईनेही तिला ठणकावलं होतं-“आणि तो तुझा यार...घासलेटवाला...दोन-दोन तास त्याला खोलीत बसवून काय रॉकेलचा वास घेत असतेस?''
तुकारामच्या त्या तिरळ्या बायकोच्या संबंधातील अनेक भानगडी प्रसिद्ध होत्या. घासलेटवाला येतो आणि ती त्याला घरात घेऊन दरवाजा बंद करून घेते ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत होती. सरिताची आई आणि ती यांच्यातील अबोला फार दिवस टिकत नाही. एके रात्री सरिताच्या आईने तुकारामच्या बायकोला अंधारात कुणाशीतरी लाडंलाडं बोलताना पकडलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिने सरिताला एका जंटलमन माणसाबरोबर मोटारीत बसलेलं बघितलं होतं. यावरून मग दोघींमध्ये समझोता झाला होता.
सरिताची आई तोंडाने बडबडत सरिताला इकडेतिकडे शोधत होती. तेवढ्यात समोरून तुकारामची बायको आली, सरिताच्या आईने तिला विचारलं-“तू सरिताला कुठं पाहिलंस?''
तुकारामच्या बायकोने तिरळ्या डोळ्यांनी गल्लीच्या कोपऱ्याकडे पाहिलं-“तिथे कचऱ्याच्या पेटीजवळ मुलींबरोबर खेळतेय.” मग तिने हळू आवाजात विचारलं-“आत्ताच किशोरी वर गेला होता. तुला भेटला का?''
सरिताच्या आईने इकडे तिकडे पाहत हळूच म्हटलं-“त्याला मी वर बसवून आलेय...पण सरिता मेली वेळेवर गायब होते. ती कसला विचारच करीत नाही. दिवसभर खेळत राहते...” असं म्हणून ती घाईघाईने सरिता खेळत होती त्या दिशेला निघाली. ती मुतारीजवळ पोहोचली तेव्हा तिला पाहून सरिता उठून उभी राहिली.
सरिताच्या चेहऱ्यावर नाराजी होती. तिच्या आईने तिचा दंड पकडत रागारागाने म्हटलं...“चल. घरी तडफड. तुला तर खेळण्याशिवाय काहीच सुचत नाही.” मग रस्त्याने जाताना तिच्या आईने तिला हळू आवाजात सांगितलं-“किशोरी बऱ्याच वेळापासून येऊन बसलाय. एका गाडीवाल्या सेठला घेऊन आलाय. तू पळत पुढे जा आणि घाईघाईने तयार हो आणि ऐक तुझी ती निळी जॉर्जेटची साडी नेस...हे बघ, तुझे केस खूपच विस्कटलेत....तू तयार हो. मी तुझे केस विंचरून देईन.”
कुणी गाडीवाला सेठ आलाय हे ऐकून सरिता खूष झाली. तिला सेठशी काही घेणं देणं नव्हतं. तिला गाडीमध्ये रस होता. मोटरगाडीमधून हिंडायला तिला खूप आवडत असे. गाडी फर्राटे मारत जेव्हा मोकळ्या रस्त्यावरून धावत असे तेव्हा चेहऱ्यावर हवा लागून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असत. गाडीत बसल्यावर तिला हवेत चक्कर मारल्यासारखं वाटत असे. आपण बगळा झालोय आणि रस्त्यावरून उडत चाललोय असं तिला वाटे.
सरिताचं वय जास्तीत जास्त पंधरा वर्षांचं असावं. पण ती तेरा वर्षांच्या मुलीसारखी दिसत असे. तिला स्त्रियांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं बिलकुल आवडत नसे. ती सगळा दिवस लहान-लहान मुलींमध्ये खेळण्यात दंग असे. त्या खेळांमध्ये काहीच अर्थ नसे.
सरिता सुंदर नव्हती. तिचा रंग सावळा होता. मुंबईच्या हवेमुळे तिचा चेहरा नेहमीच कोमल दिसत असे. तिच्या पातळ ओठांवर नेहमीच हलकीशी थरथर जाणवत असे. वरच्या ओठांच्यावर नेहमीच घामाचे दोनचार थेंब जमा झालेले असत. तिची प्रकृती ठणठणीत होती. घाणीत राहून देखील तिचं शरीर सुडौल होतं. तारुण्याचा हल्ला तिच्यावर तीव्रतेनं झालाय असं वाटत होतं. रस्त्याने उड्या मारत फिरताना ती आपला मळकट घागरा हाताने वर पकडत असे. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा तिच्या पायांकडे वळत असत. तिचे पाय नुकताच रंधा मारलेल्या सागवानाच्या लाकडाप्रमाणे चमकत असत. तिच्या पोटऱ्यांवर अजिबात केस नव्हते...तिचे केस लांबसडक आणि दाट होते आणि त्याला खोबरेल तेलांचा गंध येत असे. आपल्या केसांच्या लांबीवर ती नाराज असे. खेळताना तिला केसांची वेणी खूप त्रासदायक वाटत असे. त्यामुळे तिला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या केसांवर ताबा ठेवावा लागत असे.
सरिताचं मन सगळ्या विवंचनांपासून मुक्त होतं. दोन्ही वेळा तिला खायला- प्यायला मिळत होतं. तिची आईच घरातलं सगळं काम करीत असे. सरिता सकाळी दोन बादल्या पाणी भरून ठेवत होती आणि संध्याकाळी दिव्यामध्ये एक पैशाचं तेल भरून आणत असे. कित्येक वर्षांपासून ती हे काम न चुकता करीत होती. दररोज संध्याकाळी सवयीने तिचा हात पैसे ठेवलेल्या पेल्याकडे जाई आणि मग ती दिवा उचलून खाली जाऊ लागे.
कधीकधी महिन्यातून चार-पाच वेळा किशोरीसेठ लोकांना घेऊन येत असे. त्यांच्याबरोबर एखाद्या हॉटेलात किंवा अंधाऱ्या ठिकाणी जाताना ती सहलीला गेल्याप्रमाणे आनंदात जात असे. तिने या बाहेर जाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे कधी लक्ष दिलं नाही. ती समजत होती की, इतर मुलींच्या घरी देखील किशोरीसारखी माणसं येत असणार आणि रात्री वरळीला थंडथंड बाकड्यावर किंवा जुहूच्या ओल्या वाळूत जे काही आपल्याबरोबर होतं ते त्या सगळ्यांबरोबर होत असणार. एकदा ती आपल्या आईला म्हणाली देखील होती की, “आई, शांताही आता मोठी झालीय...तिलाही माझ्याबरोबर पाठवत जा ना. हे सेठ लोक मला अंडी खायला देतात. शांतालाही अंडी खूप आवडतात.” आणि यावर तिच्या आईने गोलमाल उत्तर दिलं होतं. “हो हो...तिलाही कधीतरी तुझ्याबरोबर पाठवीन...तिची आई पुण्यावरून परत तर येऊ दे.” आणि दुसऱ्याच दिवशी शांताला तिने संडासच्या बाहेरच ही खुषखबरी ऐकवली होती-“तुझी आई पुण्यावरून आल्यावर सगळं काही ठीक होईल...तू देखील माझ्याबरोबर वरळीला येशील-” मग तिने काल रात्रीची घटना शांताला एखादं स्वप्नं सांगावं तशी सांगितली होती. ती घटना ऐकून शांताला आपल्या शरीरात छोटे छोटे घुंगरू वाजत असल्याप्रमाणे वाटलं होतं. ती सरितापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. सगळं ऐकूनही तिचं समाधान झालं नव्हतं. तिने सरिताचा हात पकडत म्हटलं होतं-“चल खाली जाऊयात. तिथे बोलू.” मग त्या दोघी मुतारीच्या जवळ गिरधारी मारवाड्याने खोबऱ्याच्या वाट्या सुकायला टाकल्या होत्या, तिथे बसून शरीरात थरथर पैदा करणाऱ्या गोष्टी करत राहिल्या होत्या.
साडीच्या पडद्याआड सरिताने निळी जॉर्जेटची साडी नेसली. साडीच्या मऊ स्पर्शानेच तिला गुदगुल्या होत होत्या. गाडीतून प्रवासाची कल्पनाच तिच्या मनात पक्ष्यांप्रमाणे फडफडत होती. यावेळचा सेठ कसा असेल आणि तो कुठे घेऊन जाईल असे प्रश्न तिच्या मनात येतच नव्हते.
घाईघाईने तिने जॉर्जेटची साडी नेसली. निऱ्या नीट करीत ती क्षणभरासाठी किशोरीच्या समोर उभी राहिली-“किशोरी मागून साडी नीट आहे ना? आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहताच ती जपानी लिपस्टिक ठेवलेल्या मोडक्या बॉक्सकडे वळाली होती. एक धुवट आरसा तिने खिडकीच्या गजामध्ये अडकवला आणि मग तिने आपल्या गालावर पावडर फासली. मग ओठांवर लिपस्टिक लावून ती जेव्हा तयार झाली तेव्हा तिने किशोरीकडे कौतुकाच्या अपेक्षेने पाहिलं. निळी साडी, ओठाला लाल रंगाची लिपस्टिक आणि सावळ्या चेहऱ्यावर गुलाबी रंगाची पावडर लावलेली सरिता खेळण्यातील बाहुलीसारखी दिसत होती. अशी खेळणी दिवाळीमध्ये खेळण्याच्या दुकानात उठून दिसतात.
इतक्यात तिची आई येऊन पोहोचली. तिने घाईघाईने सरिताचे केस विंचरून दिले आणि म्हटलं-“हे बघ बेटा, चांगलं चांगलं बोलायचं....ते जे काही सांगतील ते ऐकायचं. ती मोठी माणसं आहेत...मोटरगाडी त्यांची स्वत:ची आहे.” मग किशोरीकडे वळत म्हणाली-“तू हिला लवकर घेऊन जा. बिचारे कितीतरी वेळेपासून वाट पाहत असतील.”
दुसऱ्याच क्षणी किशोरी आणि सरिता गाडीमध्ये होते.
बाहेर बाजारात कारखान्याच्या भिंतीजवळ एक पिवळ्या रंगाची मोटरगाडी ‘यहाँ पेशाब करना मना है।' ह्या बोर्डाजवळ उभी होती आणि त्यात तीन हैदराबादी तरुण आपल्या नाकावर रुमाल धरून किशोरीची वाट पाहात होते. ती भिंत खूप लांबवर गेलेली होती आणि सगळीकडंच लोकांनी घाण केल्यामुळे गाडी दुसरीकडे उभी करणं शक्यच नव्हतं.
गाडीच्या स्टेअरिंगवर बसलेल्या तरुणाला किशोरी दिसला तेव्हा तो आपल्या दोघा मित्रांना म्हणाला-“तो आला बघा. तो किशोरी आणि...” त्याने गल्लीच्या वळणावर नजर रोखली-“अरे, ही तर अगदीच छोटी मुलगी आहे. तुम्ही बघा ना. अरे यार, ती निळ्या साडीतली...” आणि जेव्हा किशोरी आणि सरिता गाडीजवळ पोहोचले तेव्हा मागच्या सीटवर बसलेल्या तरुणांनी दोघांच्यामध्ये ठेवलेल्या हॅटस् उचलल्या आणि गाडीत जागा केली. किशोरीने पुढे होऊन गाडीचं मागचं दार उघडलं आणि उत्साहाने सरिताला आत ढकललं. दरवाजा बंद केल्यावर स्टेअरिंगवर बसलेल्या तरुणाला किशोरी म्हणाला-“माफ करा. जरा उशीरच झाला...ही बाहेर आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. म्हणून...!”
त्या तरुणाने वळून सरिताकडे पाहिलं. मग तो किशोरीला म्हणाला-“ठीक आहे...पण..” त्याने खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि हलक्या आवाजात विचारलं-“आरडाओरड तर करणार नाही ना?”
किशोरीने छातीवर हात ठेवत म्हटलं-“सेठ माझ्यावर भरवसा ठेवा.”
त्या तरुणाने खिशातून दोन रुपये काढले आणि किशोरीच्या हातात कोंबले-“जा ऐश कर!”
किशोरीने सलाम केला आणि त्या तरुणाने गाडी स्टार्ट केली.
संध्याकाळचे पाच वाजले होते.
मुंबईच्या रस्त्यावर गाड्यांची, ट्रामची, बसची आणि लोकांची गर्दी होती. सरिता त्या दोन तरुणांच्या मध्ये घुसून बसलेली होती. ती सारखी सारखी आपल्या मांड्या जवळ घेऊन त्यावर आपले हात ठेवत होती...काहीतरी म्हणता म्हणता थांबत होती. ती गाडी चालवणाऱ्या तरुणाला....‘सेठ गाडी वेगात चालवा ना! नाहीतर माझा जीव गुदमरेल' असं म्हणू इच्छित होती.
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. पुढच्या सीटवरचा तरुण गाडी चालवत राहिला आणि मागच्या सीटवर बसलेले ते दोघे तरुण दोन कोपऱ्यात बसून, एक तरुण मुलगी आपल्याजवळ बसलेली आहे आणि काही काळासाठी ती आपलीच आहे, न घाबरता आपण तिची छेडछाड करू शकतो ह्या भावनेमुळं मनात निर्माण झालेली आतुरता लपवण्याचा प्रयत्न करत होते.
गाडी चालवणारा तरुण-किफायत-दोन वर्षांपासून मुंबईत राहात होता आणि सरितासारख्या अनेक मुली दिवसाच्या उजेडात आणि रात्रीच्या अंधारात त्याने पाहिलेल्या होत्या. त्याच्या या पिवळ्या रंगाच्या गाडीतून अनेक रंगांच्या-वंशाच्या मुली आलेल्या होत्या. त्यामुळे तो बेचैन नव्हता. हैदराबादवरून आलेल्या मित्रांपैकी शहाब नावाच्या तरुणाला जिवाची मुंबई करायची इच्छा होती. त्याच्यासाठीच त्याने किशोरीकडून सरिताला बोलावून आणलं होतं. दुसरा मित्र अन्वर जरा सज्जन होता त्यामुळे माझ्यासाठीही एक मुलगी आण असं तो आपल्या मित्राला सांगू शकत नव्हता.
किफायतने सरिताला यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. किशोरीने खूप काळानंतर नवी मुलगी काढून आणलेली होती. नवी असूनही त्याने अजून सरितामध्ये फारसा रस दाखवलेला नव्हता. कदाचित तो एकावेळी एकच काम करू शकत असावा म्हणून गाडी चालवता चालवता तो सरिताकडे लक्ष देऊ शकत नसावा.
शहर मागे पडलं आणि गाडी शहराजवळच्या वस्तीमधील रस्त्यावरून जाऊ लागली तेव्हा सरिता एकदम आनंदली. आत्तापर्यंत तिने स्वत:ला दाबून ठेवलं होतं. पण थंड हवेच्या झोतामुळे आणि गाडीच्या वेगामुळे तिला एकदम उत्तेजित झाल्यासारखं वाटू लागलं. तिच्या शरीरात जणू वीज संचारली आणि ती दोन्ही बाजूंच्या पळणाऱ्या झाडांकडे धावत्या नजरेनं बघू लागली.
आता शहाब आणि अन्वरही जरा सैलावले होते. शहाब तिला आपली मालमत्ताच समजत होता. त्यामुळे त्याने हळूच एक हात तिच्या कमरेभोवती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरिताला गुदगुल्या झाल्या आणि ती अन्वरच्या अंगावर कोसळली. मग तिच्या हसण्याचा आवाज गाडीच्या खिडकीतून दूरवर जात राहिला. शहाबने पुन्हा एकदा तिच्या कमरेकडे हात नेला तर ती पुन्हा फुटली. हसून हसून तिचे प्राण कंठाशी आले. अन्वर कोपऱ्यात पडून राहिला आणि आपल्या तोंडात लाळ जमा करण्याचा प्रयत्न करीत राहिला.
शहाब एकदम रंगात आला. किफायत म्हणाला-“वल्लाह, मोठी फटाकडी मुलगी आहे ही.” असं म्हणत त्याने सरिताच्या मांडीला चिमटा काढला.
सरिताने याच्या उत्तरात अन्वरचा कान धरला. तो जवळ असल्यामुळे तिला ते शक्य झालं असावं. त्यांच्या खिदळण्याने गाडी भरून गेली.
किफायत सारखा मागे वळून बघत होता. त्याला समोरच्या छोट्या आरशात सगळं काही दिसत होतं. त्यांना साथ देण्यासाठी त्याने गाडीचा वेग वाढवला.
सरिताला गाडीमध्ये पुढे जाऊन बसावं असं वाटू लागलं. ती पुढच्या सीटवर झुकली होती. शहाबने तिला छेडलं तर तिने किफायतच्या गळ्यात हात टाकले. किफायतने तिच्या हातावर आपले ओठ टेकले. तिच्या शरीरात वीज लहरली आणि ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. बसल्या बसल्या ती किफायतच्या टायशी खेळू लागली.
“तुमचं नाव काय?” तिने किफायतला विचारलं.
“माझं नाव?” किफायत म्हणाला- “माझं नाव किफायत आहे.” असं म्हणत दहा रुपयांची नोट त्याने सरिताच्या हातात सरकवली.
सरिताला त्याच्या नावाशी फारसं काही घेणंदेणं नव्हतं. तिने ती दहा रुपयांची नोट आपल्या चोळीत खुपसली. आणि लहान मुलीप्रमाणे खूश होत ती म्हणाली-“तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा हा टाय खूपच छान आहे.” त्याक्षणी सरिताला प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटत होती. जे काही वाईट असेल ते चांगलं होऊ दे असंच तिला वाटत होतं... गाडी वेगात पळू दे आणि प्रत्येक वस्तूंचं बगळ्यात रूपांतर होऊ दे... असं तिला वाटलं. एकदम तिला गावंसं वाटू लागलं. तिने किफायतचा टाय सोडला आणि ती गाऊ लागली- तुम्हीने मुझको प्रेम सिखाया
सोए हुए हृदयको जगाया...
काहीवेळ ती फिल्मी गीत गात राहिली. मग अचानक मागच्या सीटकडे वळली आणि अन्वरला गप्प बसलेलं बघून म्हणाली- “तुम्ही गप्प का बसला आहात? काहीतरी बोला, गाणं म्हणा...” असं म्हणून ती पुन्हा मागच्या सीटवर गेली. मग शहाबच्या केसांतून बोटं फिरवू लागली. “चला आपण दोघं गाऊ. देविकाराणीने गायलेलं गाणं तुम्हाला आठवतंय?.. मैं बन की चिडिया बन के बन बन डोलु रे...देविकाराणी किती चांगलीय!” तिने आपले दोन्ही हात हनुवटीखाली टेकवले आणि डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली- “देविकाराणी आणि अशोककुमार जवळजळ उभे होते. देविकाराणी म्हणत होती- “मैं बन की चिडिया बन के बन बन डोलू रे... आणि अशोककुमार म्हणत होता...तुम्ही म्हणा ना!...” सरिताने गाणं म्हणायला सुरुवात केली... “मै बन की चिडिया...”
शहाबने आपला भसाडा आवाज त्यात मिसळला आणि द्वंद्वगीत सुरू झालं. किफायतने हॉर्न वाजवून त्यांना साथसंगत केली. सरिताने टाळ्या वाजवून ताल धरला. सरिताचा बारीक सूर, शहाबचा फाटका आवाज, हॉर्नचा पों पों असा ध्वनी, हवेचा सन सन असा आवाज आणि गाडीच्या इंजिनची फडफड ह्या सगळ्याचा मिळून जणू एक ऑर्केस्ट्राच झाला.
सरिता आनंदात होती. शहाब खूश होता. किफायत मजेत होता. या सगळ्यांना आनंदात बघून अन्वरलाही आनंद झाला. आपण स्वत:ला उगीचच अलिप्त ठेवलं म्हणून त्याला मनातल्या मनात वाईट वाटलं. त्याच्या अंगातही सळसळ आली आणि तो त्या तिघांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तयार झाला.
गाता गाता सरिताने अन्वरच्या डोक्यावरची हॅट काढून घेतली आणि आपल्या डोक्यावर ठेवली. आपल्या डोक्यावर हॅट कशी दिसते हे पाहण्यासाठी सरिता पुन्हा मागच्या सीटवरून पुढच्या सीटवर गेली आणि गाडीच्या पुढच्या छोट्या आरशात बघू लागली.
आपण गाडीत बसल्यापासूनच हॅट घालून बसलो होतो का हे अन्वर आठवू लागला.
सरिताने किफायतच्या जाड मांडीवर एक चापट मारली आणि म्हणाली- “जर तुमची पँट आणि शर्ट मी घातला आणि टाय लावला तर मी साहेब दिसेन?”
यावर काय बोलावं हे किफायतला कळेना. तो अन्वरला सहज म्हणाला-
“अन्वर तू खरचंच मूर्ख माणूस आहेस.”
किफायतने सरिताला विचारलं-“तुझं नाव काय?”
“माझं नाव?” सरिताने हॅटची फित आपल्या हनुवटीखाली सरकवत म्हटलं- “माझं नाव सरिता आहे!”
शहाब मागच्या सीटवरून म्हणाला-“सरिता तू मुलगी नाहीसच, तू फुलझडी आहेस.”
अन्वरही काही म्हणू इच्छित होता. पण तो काहीच म्हणू शकला नाही.
सरिताने उंच स्वरात गायला सुरुवात केली. “प्रेम नगर मे बनाऊंगी घर मैं...”
किफायत आणि शहाबला ही गाडी आयुष्यभर अशीच चालत राहावी असं वाटू लागलं.
अन्वर विचारच करत होता...तो मूर्ख नाहीतर काय आहे...
“प्रेमनगर मे बनाऊंगी घर मैं....” या गाण्याचे तुकडे हवेत उडत होते.
सरिताचे केस सैलसर वेणीमध्ये गुंफले होते ते मोकळे सुटले. काळा धूर हवेमुळे विखुरला जावा त्याप्रमाणे ते विखुरले होते... ती खूष होती.
शहाब खूष होता. किफायत आनंदात होता आणि अन्वर खुषी जाहीर करण्याच्या विचारातच गढला होता.
गीत संपलं तर जोराने पडणारा पाऊस एकदम थांबल्यासारखं क्षणभर वाटलं. किफायत सरिताला म्हणाला- “दुसरं एखादं गाणं गा...”
सरिताने गाणं सुरू केलं. “मोरे अँगना में आये आली...मै चाल चलू मतवाली...”
गाडीही मतवाली चालीनंच चालत होती.
शेवटी रस्त्याची सारी वळणं संपली आणि समुद्रकिनारा आला.
दिवस बुडत होता आणि समुद्रावरून येणारी हवा थंडावा निर्माण करीत होती.
गाडी थांबली. सरिताने आपल्या डोक्यावरची हॅट उतरवून सीटवर ठेवली आणि ती गाडीचं दार उघडून बाहेर आली. मग तिने किनाऱ्यावरून पळायला सुरुवात केली.
किफायत आणि शहाबसुद्धा पळू लागले.
खुल्या वातावरणात,समुद्राच्या किनाऱ्यावर, ताडाच्या उंच उंच झाडांच्या तळाशी ओल्या वाळूत नेमकं आपल्याला काय हवंय हेच सरिताला कळत नव्हतं. या वातावरणात मिसळून जावं असंही तिला वाटत होतं. समुद्रात विरून जावं...इतकं उंच जावं की झाडाचे शेंडे वरून बघता यावेत. किनाऱ्यावरच्या वाळूतील ओलावा आपल्यामध्ये भरून घ्यावा आणि मग...मग...तीच गाडी असावी, तेच हवेत उंच उडणं, तोच जोराचा वारा आणि तोच हॉर्नचा ‘पों पों असा निरंतर वाजणारा आवाज...ती खूप खूष होती.
तीनही हैदराबादी तरुण किनाऱ्यावरच्या ओल्या वाळूत बसून बिअर पिण्याची तयारी करू लागले तेव्हा सरिताने किफायतच्या हातून बाटली हिसकावून घेतली-“थांबा, मी ग्लास भरते...'असं म्हणून तिने बिअर ग्लासमध्ये ओतली तर फेसच फेस झाला. हा प्रकार बघून ती चेकाळली. सावळ्या रंगाच्या त्या द्रव्यात तिनं आपलं बोट बुडवलं आणि तोंडाने चोखलं. चव कडवट लागल्याने तिने तोंड वेडंवाकडं केलं.
किफायत आणि शहाब खदखदा हसू लागले. अन्वर देखील हसत होता.
बिअरच्या सहा बाटल्या काही फेस होऊन वाळूत निसटल्या. तर काही त्या तिघांच्या पोटात रिचवल्या गेल्या.
सरिता गात होती.
अन्वरने सरिताकडे एकदा रोखून पाहिलं. त्याला वाटलं की, ती बिअरपासूनच बनलेली आहे. तिचे सावळे गाल समुद्राच्या ओलसर हवेमुळं ओले झाले आहेत...ती खूप आनंदात आहे...हे बघून अन्वर देखील रंगात आला. समुद्राच्या सगळ्या पाण्याची बिअर व्हावी आणि आपण अन् सरिताने त्यात डुंबावं असं त्याला वाटू लागलं.
सरिताने रिकाम्या झालेल्या बाटल्या एकमेकांवर आपटल्या त्यातून आलेला आवाज ऐकून ती जोरजोराने हसू लागली. किफायत, शहाब आणि अन्वरदेखील हसू लागले.
हसता हसता सरिता किफायतला म्हणाली-“चला गाडी चालवूया.”
सगळेजण उठून उभे राहिले.
रिकाम्या बाटल्या ओल्या वाळूवर तशाच पडून राहिल्या आणि ते पळत पळत गाडीत जाऊन बसले.
मग पुन्हा जोराची हवा लागू लागली. तसाच हॉर्न पों पों वाजू लागला.
सरिताचे केस काळ्या धुराप्रमाणे तसेच विखुरले...गाण्याचा सिलसिला पुन्हा सुरू झाला.
गाडी हवेमध्ये एखाद्या बाणाप्रमाणे जात राहिली आणि सरिता गात राहिली. ती मागच्या सीटवर शहाब आणि अन्वरच्या मध्ये जाऊन बसली होती. अन्वर डुलक्या घेत होता. तिनं शहाबच्या केसांतून बोटं फिरवायला सुरुवात केली. बघता बघता तो झोपी गेला. मग तिने आपला मोर्चा अन्वरकडे वळवला, तर तो आधीच झोपी गेला होता. ती दोघांच्यामधून उठून पुढच्या सीटवर किफायतच्या जवळ जाऊन बसली आणि हळू आवाजात म्हणाली-
``मी तुमच्या दोन्ही मित्रांना झोपवून आलेय. आता तुम्हीही झोपा.”
किफायत हसत म्हणाला-“मग गाडी कोण चालवेल?''
सरिताही हसत म्हणाली-“ती आपली आपली चालत राहील.”
किशोरीने सरिताला जिथे गाडीत बसवलं होतं ते ठिकाण आलं. ‘यहॉं पेशाब करना मना है।” अशी पाटी असलेली भिंत आली.
सरिता म्हणाली-“बस् इथं थांबवा गाडी.”
गाडी थांबली. किफायत काही म्हणण्यापूर्वीच सरिता गाडीतून उतरली. तिने त्याला सलाम केला आणि ती आपल्या गल्लीकडे चालू लागली.
किफायत स्टेअरिंगवर हात ठेवून सरिताकडे पाहत होता आणि सगळी संध्याकाळ मनातल्या मनात पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात सरिता थांबली. वळली. पुन्हा त्याच्याकडे येऊ लागली. जवळ आल्यावर तिने चोळीतून दहा रुपयांची नोट काढली आणि किफायतजवळ सीटवर ठेवली.
(अनुभव, मार्च २००७च्या अंकातून साभार)
चित्र: रेश्मा बर्वे