आम्ही कोण?
ले 

फॅन्टसी स्पोर्ट्स : करोडपती होण्याचे फसवे ‘ड्रीम’ ?

  • मन्सूर मुल्ला
  • 16.04.25
  • वाचनवेळ 7 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
gaming app

१६ वर्षांच्या आकाशला (नाव बदलले आहे) क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. भारतीय क्रिकेट संघाच्या सर्व टूर्नामेंट तो बघायचाच. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) म्हणजे तर क्रिकेटची मेजवानीच. कोरोना काळापासून शाळा-कॉलेजेसमध्ये रोजच्या शिकवण्यात मोबाईलचा वापर वाढल्यामुळे घरच्यांनी त्याला मोबाईल घेऊन दिलेला. आयपीएल बघताना त्याला सतत स्पोर्ट्स फॅन्टसी ॲपच्या जाहिराती दिसत होत्या. त्याची भुरळ पडून त्याने त्यावर खेळायला सुरुवात केली. मोबाईलवर ऑनलाईन पेमेंटचीदेखील सोय होतीच. मग पन्नास-साठ रुपयांच्या क्षुल्लक रकमेवरून खेळाची सुरुवात झाली. कधी तो थोडे पैसे जिंकत तर कधी हरत होता. नुसती क्रिकेट मॅच बघत बसण्यापेक्षा त्या बरोबरीने स्पोर्ट्स फॅन्टसी ॲपवर खेळण्यात त्याला अधिक मजा येऊ लागली. हळुहळु त्याला रोज त्या ॲपवर खेळल्याशिवाय चैन पडेनासं झालं. काही पैसे जिंकल्यावर ते जिंकत राहण्यासाठी खेळत राहायचं आणि पैसे हरल्यावर ते परत मिळवण्यासाठी खेळत राहायचं असं चक्र सुरू झालं. शेवटी एकदा तो १५ हजार रूपये हरला. तेव्हा त्याला एकदम जाग आली. आपण आई-वडिलांचे १५ हजार रुपये हरून बसलोय या दडपणाखाली त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून तो कसाबसा वाचला. पुढे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं गेलं.

३३ वर्षांचा रवी (नाव बदललं आहे) असेच ३५ लाख रुपये गमावून बसला. त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत त्याची चिठ्ठी सापडल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वाचवलं आणि व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. या ॲप्समुळे कुणाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं, काहींना कर्जबाजारीपण आलं, काहींनी नैराश्यातून स्वतःचा जीवही गमावला.

या आणि अशा बातम्या आपण सर्रास वाचतो, बघतो, ऐकतो. आत्महत्या करायला गेलेल्यांच्या बातम्या होतात. पण या खेळांमध्ये बुडलेल्या लोकांची संख्या याहून कितीतरी अधिक आहे.

याच्या उलट बातम्यासुद्धा कधीतरी वाचनात येतात.एका सर्वसाधारण घरात वाढलेला कामगाराचा मुलगा, फॅन्टसी ॲपवर एक कोटींची रक्कम जिंकला. कुणी पन्नास लाखांचं बक्षीस पटकावलं वगैरे. यातून हे लक्षात येतं की, सध्या भारतामध्ये अशा फॅन्टसी ॲप्सचा बोलबाला आहे. झटपट पैसे कमावण्याचा एक सोपा मार्ग म्हणून अनेक तरुण, बेरोजगार इतकंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही अशा ॲप्सची भुरळ पडली आहे. भारतात फॅन्टसी स्पोर्ट इतके लोकप्रिय कसे झाले? अशा फॅन्टसी स्पोर्ट मधून खरंच रातोरात श्रीमंत होणं शक्य आहे का? यातून फसवणूक होते का?

या सगळ्याची सुरुवात कुठून झाली?

२००८ मध्ये आयपीएल सुरू झालं. झटपट क्रिकेटचा आविष्कार एका नव्या रुपात भारतीयांच्या भेटीला आला. स्टेडियममधील आकर्षक रोषणाई, लिलावात महाग किंमतीत विकले गेलेले दिगग्ज देशी-विदेशी खेळाडू, शाहरुख खान, प्रीती झिंटासारखे संघाचे सेलेब्रिटी मालक, प्रत्येक संघाच्या जर्सीवर दिसणारे मोठमोठे ब्रँड,स्पॉन्सर्स आणि भडक जाहिरातबाजी. आयपीएल भारतात सुरू झालं ते ग्लॅमरचं एक वलय घेऊनच! पाठोपाठ पैसा आला नाही तरच नवल.

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या ड्रीम इलेव्हन या प्लॅटफॉर्मची सुरुवात देखील २००८ मधेच झाली. पाठोपाठ असे अनेक प्लॅटफॉर्म सुरू झाले. भारतामधलं क्रिकेटचं मोठं मार्केट, भारतीयांची क्रिकेटबद्दलची आस्था आणि झटपट पैसे कमावण्याचं आकर्षण या तिन्ही गोष्टी या प्लॅटफॉर्मवर जुळून आल्या. भारतातल्या अशा फॅन्टसी स्पोर्टसची संख्या आजघडीला १२० च्या पुढे पोहोचली आहे. यातले निवडक प्लॅटफॉर्म आज प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

फॅन्टसी स्पोर्टमधली बडी धेंडं आणि त्यांची पोच

Dream11, My11Circle आणि MPL सारख्या प्लॅटफॉर्म्सनी भारतातल्या लाखो वापरकर्त्यांना आपलंसं केलं आहे. स्मार्टफोनचा वाढता वापर, आकर्षक बक्षिसं, कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची संधी यामुळे हे ॲप्स कमी कालावधीतच लोकप्रिय झाले. सध्या भारतात १३ कोटींपेक्षा अधिक फँटसी स्पोर्टस वापरकर्ते आहेत, म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ८-१०टक्के ! आणि ही संख्या दरवर्षी वाढतच आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार ९५ टक्के भारतीयांकडे खर्चायला पैसे नाहीत, पण दुसरीकडे या ॲपवर असणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मात्र लक्षणीय दिसते. दिग्गज खेळाडू आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार अशा प्लॅटफॉर्म्सची जाहिरात करताना दिसतात. अशा चेहऱ्यांचा वापर करून ते लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होताना दिसतात. क्रिकेटसोबतच फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल इतकंच नाही तर कबड्डीचा सामनादेखील या फॅन्टसी गेममध्ये खेळता येतो!

भारतातील फॅन्टसी स्पोर्टस सेक्टरने २०२३ मध्ये ११ हजार कोटी तर २०२४ साली ८८०० कोटींची गंगाजळी मिळवली. यातील काही प्लॅटफॉर्म्सनी भारतात युनिकॉर्नचा दर्जा मिळवला आहे. म्हणजे त्यांचे बाजारमूल्य एक बिलियन डॉलर पेक्षाही जास्त झाले आहे. यातील एका कंपनीने भल्यामोठ्या ब्रँड्सना मागे टाकत भारतीय क्रिकेटसंघाचं मुख्य प्रायोजकत्वदेखील मिळवलंय. त्यामुळे साहजिकच अशा प्लॅटफॉर्मना अधिष्ठान प्राप्त झालं आहे.

कंपन्या मालामाल आणि सामान्य माणूस देशोधडीला

सट्टेबाजी अथवा जुगार हा पूर्णतः नशिबाचा खेळ आहे, त्यामुळे तो ‘गेम ऑफ चान्स’ मध्ये गणला जातो. अशा गेम्सवर भारतात ‘सार्वजनिक जुगार कायदा १८६७’ नुसार बंदी आहे. भारतात ‘गेम ऑफ चान्स’वर बंदी आहे मात्र ‘गेम ऑफ स्किल’वर नाही असं सांगणारे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. फॅन्टसी गेम्स हे ‘गेम ऑफ स्किल’मधे गणले जातात. अशा गेम्समधे तुमची मानसिक क्षमता, खेळाची समज, गेम खेळण्याचा सराव या गोष्टींचा समावेश होतो. थोडक्यात हा कौशल्याधारित खेळाचा प्रकार आहे असं सांगितलं जातं.

हे गेम खेळण्याची पद्धतही सोपी आहे. दोन संघातील कोणते खेळाडू उत्तम कामगिरी करू शकतात याचा अंदाज बांधून एक आभासी संघ बनवायचा. या गेम्समध्ये अनेक फॅन्टसी इव्हेंट्स एकाचवेळी सुरू असतात. प्रत्येक इव्हेंटची एक ठराविक प्रवेश फी असते आणि त्यातली बक्षिसाची रक्कमसुद्धा ठरलेली असते. ११ रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंत ही प्रवेश फी असू शकते. या गेमचे स्वतःचे काही नियम असतात आणि गुण देण्याची पद्धत स्पष्ट केलेली असते. सामन्यत: ज्याचा संघ कामगिरीच्या जोरावर जास्त गुण मिळवेल त्यांची क्रमवारी निश्चित होते. एक व्यक्ती वेगवेगळ्या संघानिशी एकाच इव्हेंटमध्ये पुन्हापुन्हा उतरू शकते. इव्हेंटनुसार प्रतिस्पर्धी संख्या बदलत जाते. अगदी कमी पैसे भरून जास्तीची रक्कम जिंकण्याची संधी असल्यामुळे जास्तीत जास्त संघ बनवून जिंकण्याची शक्यता वाढवता येईल असं कुणालाही वाटू शकतं. त्यामुळे जास्तीचे पैसे भरून अशा इव्हेंट्समध्ये वापरकर्ते सहभागी होतात.

फक्त म्हणायला ‘गेम ऑफ स्किल’!

आपली जिंकण्याची शक्यता किती आहे याचा गणितीय अभ्यास सहसा कुणी करत नाही आणि वापरकर्ते पुन्हापुन्हा यामध्ये पैसे गुंतवत राहतात. यातल्या काही गेम्समध्ये जिंकण्याची शक्यता ०.००१% पेक्षाही कमी असते. हा सांगायला ‘गेम ऑफ स्किल’ असला तरी त्यात खेळणाऱ्याची अंतःप्रेरणाच महत्वाची भूमिका बजावते. कोणता खेळाडू कोणत्या दिवशी कसा खेळेल याचं आकड्यांच्या माध्यमातूनही अनुमान बांधणं कठीण असतं. बहुतांशी वापरकर्ते अशा शास्त्रीय भानगडीत न पडता आंधळेपणानेच पैसे गुंतवतात असं दिसतं. करोडपती होण्याची स्वप्नं, सुरुवातीला मिळालेल्या यशामुळे आणखी पैसे जिंकण्याची हाव वाढत जाणे, तर कधी सतत पैसे गमावल्यामुळे जिंकण्याची भूक वाढत जाणे अशा कारणांनी माणूस यात अडकतच जातो.

स्पर्धा आणि रोख बक्षिसांची लालसा वापरकर्त्यांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरते. आपला संघ जिंकतो की नाही हे प्रत्यक्ष सामना बघत सतत तपासून पाहिलं जातं. हाच थरार मेंदूमध्ये डोपामिन निर्माण करतो, ज्याचा प्रभाव जुगाराच्या व्यसनासारखाच काम करतो आणि डोपामिनची हीच कीक वापरकर्त्यांना सतत या गेम्सकडे पुन्हा पुन्हा खेचून आणते आणि पैसे गुंतवायला भाग पाडते.

थेट फसवणूक नाही पण...

या फॅन्टसी गेम्समधून थेट फसवणूक होते असं आपण म्हणू शकत नाही, मात्र जिंकण्याची शक्यता इथे फारच कमी असते. या गेम्समधून पैसे कमावण्यासाठी काहीजण आडमार्गाचाही वापर करायला जातात. तिथे मात्र त्यांची थेट आणि हमखास फसवणूक होते. टेलिग्राम, फेसबुक आणि व्हाट्सएपवर असे स्कॅमर्स पैसे घेऊन वापरकर्त्यांना ‘सर्वोत्तम संघ’ विकतात. पण खात्रीलायक ‘सवोत्तम संघ’ असं काहीच नसतं आणि इथेच वापरकर्त्यांची फसवणूक होते.

सरकार काय करतंय?

हे गेम्स केंद्र आणि राज्यांना मोठा महसूल मिळवून देतात. कोणत्याही एका इव्हेंटवर २८% GST तर विजेत्याच्या एकूण जिंकलेल्या रकमेवर ३०% TDS वसूल केला जातो.

शिवाय फॅन्टसी स्पोर्ट्सवर सरकारचे थेट नियंत्रण नाही. हे प्लॅटफॉर्म्स फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स (FIFS) या सेल्फ रेग्युलेटिंग बॉडीकडून मान्यताप्राप्त असतात.

असं असलं तरी राज्यांना गेमिंगबद्दलचा स्वतंत्र कायदा करण्याची मुभा असल्यामुळे बऱ्याचश्या राज्यांमध्ये ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगला बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उडीसा, नागालँड, सिक्कीम या राज्यांचा समावेश होतो. नागरिकांची होणारी लुबाडणूक आणि तरुण मुलांना अशा ॲप्सचं व्यसन लागणं हा चिंतेचा विषय असल्यामुळे या राज्यांनी असा निर्णय घेतला आहे. परंतु यामुळे या राज्यांच्या सीमावर्ती भागात ब्लॅक मार्केटच्या माध्यमातून लोक हे गेम्स खेळतात. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक वाढते. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मात्र या ॲप्सना कायदेशीर परवानगी आहे.

फँटसी स्पोर्ट्स ॲप्स मनोरंजनाचं प्रभावी साधन असलं, तरी त्याचं अंधानुकरण घातक ठरू शकतं. सरकारी हस्तक्षेप हा मुद्दा असला तरी वापरकर्त्यांनी स्वतःसाठी मर्यादा आखल्या पाहिजेत.

मन्सूर मुल्ला

मन्सूर थिंक बँक युट्युब चॅनलमध्ये कम्युनिटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे







प्रतिक्रिया लिहा...

आडवा छेद

migration

जागतिक स्थलांतरितांमध्ये भारतीय सर्वाधिक, पण त्यांच्याबद्दलचे अभ्यास मात्र तुटपुंजे

ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेतील आणि त्यानिमित्ताने जगभरातील भारतीय स्थलांतरितांचा व...

  • गौरी कानेटकर
  • 16.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
ambedkar jayanti

बाबासाहेब, आपल्या भारतात दलितांवरचे अत्याचार वाढतच आहेत...

भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना लागू होऊन ...

  • मृदगंधा दीक्षित
  • 14.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
electric car

भारतापुढचा नवा पेच : खत महत्त्वाचं की इलेक्ट्रिक गाड्या?

‘अन्न‌’ विरुद्ध ‌‘इंधन‌’ हा जुना रंगलेला वाद, तो अद्याप शमलेला नाही. कारण पेट्रोलचा भडका कमी क...

  • मुकुंद कुलकर्णी
  • 11.04.25
  • वाचनवेळ 3 मि.

Select search criteria first for better results