आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

सामाजिक विषयांना न्याय देणारा संवेदनशील कलाकार - अनुप जत्राटकर

  • जयश्री देसाई
  • 28.04.26
  • वाचनवेळ 7 मि.
anup jatratkar

अनुप जत्राटकर. निपाणीसारख्या कर्नाटकातल्या छोट्या गावात मराठी घरात जन्मलेला मुलगा. कळायला लागल्यापासून शिक्षक आई व प्राध्यापक वडिलांनी त्याला वाचनाची आवड लावली. ज्या वयात मुलं खेळण्यांसाठी हट्ट करतात, त्या वयात अनुप पुस्तकांच्या जगात रममाण असायचा. वयाच्या अवघ्या आठव्या-नवव्या वर्षी त्याने पहिली कविता लिहिली. अकराव्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक कै. दया पवार यांनी त्याला बालकवी या किताबाने पुरस्कृत केलं. मोठेपणी कोण होणार असं विचारलं की त्याचं एक उत्तर ठरलेलं असे- ‘मला पिच्चर काढायचा आहे.’ ऐन विशीत जावेद अख्तर यांच्या हस्ते त्याचा जनकवी असा गौरव झाला.

चौथीत असताना अनुपने पहिलं नाटक लिहिलं. एकांकिका किंवा नाटक काय असतं याची त्याला तेव्हा काहीही माहिती नव्हती. पण त्याने सवंगड्यांच्या सोबत घराच्या अंगणात ते नाटक सादर केलं. गल्लीतील लोकांनी तिकीट काढून ते नाटक पाहिल्याची आठवण तो सांगतो.

पुस्तक वाचल्यावर व त्यावर आपलं चिंतन लिहिल्यावर वडिलांकडून ‘आंबोळी’ मिळते या लालसेपोटी सुरू झालेला त्याचा लेखन-वाचनाचा प्रवास पुढे कविता, कथा, ललितलेख, एकांकिका, नाटक, चित्रपट लेखन अशा विविध अंगांनी बहरत गेला. देवचंद महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या अर्जुन मासिकासाठी अनुपने कौरवांच्या बाजूने एक लेख लिहिला. हा लेख वाचून अगदी संस्थापकांपर्यंत सूत्रं हलवली गेली. अनुपवर ‘कारणे दाखवा’ नोटीस काढून चौकशी बसवण्यात आली. सलग तीन दिवस चाललेल्या या चौकशीत अनुपने स्वतः वाचलेल्या २५-३० पुस्तकांचे संदर्भ स्पष्ट करत आपली भूमिका मांडली. अखेर तो लेख मासिकात छापला गेला. याच काळात त्याने रामायण, महाभारत, कुराण, गुरु ग्रंथसाहिब यांसह चारही वेदांचं वाचन केलं होतं.

इंग्रजी विषयात पदवीचं शिक्षण घेत असताना जागतिक साहित्याची कवाडं त्याच्यासाठी खुली झाली. देश-विदेशातील साहित्यिक, तत्त्वज्ञांची पुस्तकं वाचत असताना त्याचा व्यासंग वाढत गेला व वैचारिक बैठक पक्की झाली.

हेही वाचा - मातीतला सिनेमा बनवणारा सचिन सूर्यवंशी

अनुपच्या स्वभावातला संयतपणा त्याच्या कलाकृतींमधूनही दिसून येतो. 'शिकार' हा अनुपचा पहिला लघुपट. बी.ए.ला असताना एक दिवस गच्चीत फेऱ्या मारताना या लघुपटाचा विषय त्याला सुचला. गच्चीतील बल्बजवळ एक किडा फिरत होता, त्याच्यावर एक मोठा किडा लक्ष ठेवून होता, या दोघांवर एक पाल लक्ष ठेवून होती. मोठ्या किड्याने छोट्या किड्याला भक्ष्य केल्याक्षणी पालीने मोठ्या किड्याला खाऊन टाकलं. अन्नसाखळीचं हे नैसर्गिक उदाहरण बघून त्याला ‘शिकार’ची कथा सुचली. त्यादरम्यान वाघांच्या शिकारीच्याही बातम्या येत होत्या. त्याचा संदर्भ घेऊन एका गोष्टीच्या माध्यमातून अनुपने हा विषय मांडला.

लग्नसमारंभात वापरल्या जाणाऱ्या कॅमेऱ्याने त्याने शूटिंग केलं. प्रकाशयोजनेचं काही शिक्षण नसताना शॉट व्यवस्थित यावेत यासाठी त्याने वेगवेगळे जुगाड केले. याच काळात तो स्टोरी बोर्डदेखील तयार करायला शिकला. निपाणी भागात त्याने आपल्या लघुपटाचा प्रीमिअर शो केला. पुढे काश्मीर समस्येवर वाचा फोडणारा ‘हॅपी इंडिपेन्डन्स’, पाणी समस्येवर बोलणारा ‘डब्ल्यू’ व बाप-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा ‘समर’ असे जवळपास ३२ लघुपट त्याने केले.

पंचगंगा नदीच्या उगमापासून प्रवास करत त्याने 'पंचगंगाः अ जर्नी फ्रॉम संगमा टू संगमा' हा माहितीपट केला. याला महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार प्राप्त झाला. विविध सामाजिक विषय व व्यक्ती यांच्या जीवनावर त्याने २८ माहितीपट केले आहेत.

२०१२ साली अनुपला टायफॉईड झाला. यानंतर सतत आजारपणामुळे तो जवळपास आठ महिने घरीच होता. या काळात फारशी कामं मिळेनाशी झाली. तेव्हा त्याने SET, NET करून प्राध्यापकी करायचा निर्णय घेतला होता. पण अचानक एका रात्री त्याला एक संहिता सुचली. त्याने तत्काळ ती लिहून काढली व हा शेवटचा एक लघुपट करायचा असं ठरवलं- स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘द प्रॉमिस’. देशभरातील महोत्सवांतून त्याला २५ नामांकनं आणि १४ पुरस्कार लाभले. त्यामध्ये नवी दिल्ली येथील दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मिळालेल्या 'स्पेशल मेन्शन' पुरस्काराचाही समावेश आहे. या लघुपटाने अनुपचा आत्मविश्वास तर परत आलाच, शिवाय पुन्हा एकदा कामांचा ओघ सुरू झाला.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्याभोवती मानव गुरफटून गेला आहे, या गोष्टींच्या हव्यासापोटी मानव आपल्या जगण्यातला समतोल हरवून बसला आहे, या विषयावर त्याने ‘इफिफनी ऑफ गॅलिलिओ’ हा लघुपट केला. हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या फेरीत निवडला गेला होता. या लघुपटाचा सिक्वेल देखील त्याने 'स्मोकिंग झोन' या नावाने तयार केला. लघुपटाचा सिक्वेल करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न असावा. लघुपटांचे प्रीमिअर, त्यांच्या राइट्सची विक्री व सीडीज बनवणाराही अनुप पहिलाच निर्माता असावा.

anup jatratkar

लघुपट व माहितीपट बनवत असताना त्याचं सिनेमाचं वेड काही जात नव्हतं. या काळात त्याने काही सिनेमांच्या कथा, पटकथा लिहिल्या. त्याने निपाणीच्या आपल्या घरी ‘एजे मल्टिमीडिया स्टुडिओ’ उभा केला आहे. अनेक चित्रपटांच्या एडिटिंग व रेकॉर्डिंगची कामं इथून चालतात.

हे सर्व करत असताना स्वतःच्या चित्रपटाचं स्वप्न तो उराशी बाळगून होता. वेळोवेळी त्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहून त्याने त्या निर्मात्यांना ऐकवल्या. कथा आवडल्या तरी कुणी पैसे लावायला तयार होत नव्हतं. पण आपल्याला ‘पिच्चर करायचा आहे’ हे अनुपचं निश्चित होतं. २०११ साली त्याने त्याची पहिली पटकथा लिहिली. 'डोंगरापल्याड' असं त्या सिनेमाचं नाव. स्व. यशवंत भालकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते. पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याचं काम पूर्ण झालं नाही.

२०१७ पर्यंत अनुपने वेगवगेळ्या सिनेमांच्या कथा लिहिल्या, पण त्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. म्हणून अनुपने स्वतःच सिनेमा करायचं ठरवलं. 'शिकार' लघुपटाचाच सिनेमा करूया असं आधी ठरलं. पण आर्थिक गणित बसेना म्हणून एक साधी कथा करण्याचं नक्की झालं. अनुपचा सहकारी सुंदर कांबळे याने अनुपला त्यानेच लिहिलेल्या एका गोष्टीची आठवण करून दिली. आणि 'गाभ'चा प्रवास सुरू झाला.

२०१९ मध्ये सिनेमाची गाणी रेकॉर्ड केली गेली. २०२० च्या फेब्रुवारीत शूटिंग सुरू झालं. पण कोविड आला. २०२१ मध्ये पुन्हा काम सुरू झालं, पण दुसर्या लॉकडाऊनचा अडसर आला. शेवटी २०२२मध्ये सिनेमा पूर्ण होऊन सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं. देश-विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवांत पुरस्कार घेऊन जून २०२४ ला ‘गाभ’ सर्वत्र प्रदर्शित झाला. कान्स महोत्सवात २०२३ मध्ये प्रीमिअर झालेला ‘गाभ’ हा एकमेव मराठी सिनेमा होता.

अनुपचं आतापर्यंतचं काम सामाजिक भाष्य करणारं आहे. विशेष म्हणजे त्याचे लघुपट, चित्रपट नायिकाप्रधान असतात. आणखी किती दिवस आपण नायिकांना गरीब, अन्याय सहन करणारी, नायकाकडे मदत मागणारी, अशा भूमिकेत दाखवणार आहोत, असं त्याचं म्हणणं आहे.

हेही वाचा - उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन देणारा अवलिया - स्वप्नील पाटील

२०१६ साली शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदीचा विषय चर्चिला गेला तेव्हा त्याने 'येस, आय ब्लीड' हा माहितीपट केला. महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलणाऱ्या या माहितीपटाचं देखील विविध स्तरातून कौतुक झालं. आजही शाळा, महाविद्यालयांमध्ये तो दाखवला जातो.

नुकताच त्याने 'वणवा' नावाचा एक लघुपट केला आहे. भारतात सध्या ११ डिटेन्शन कॅम्प उभारण्याचं काम सुरू आहे. या विषयावर हा लघुपट आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

२०२० साली अनुपचा 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' हा पहिला एकांकिका संग्रह प्रकाशित झाला. या पहिल्याच एकांकिका संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. पुढे याची दुसरी आवृत्ती देखील आली. जीवनाचं तत्त्वज्ञान शोधायला घर, संसाराचा त्याग करून बाहेर पडलेल्या सिद्धार्थाची बायको यशोधरा हिची भूमिका या एकांकिकेतून त्याने मांडली आहे. या संग्रहातील कंकाली या एकांकिकेचे देखील अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत. चित्रपट, निर्मिती व लेखन यासह अनुप सध्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या फिल्म मेकिंग कोर्ससाठी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. या कोर्सचा अभ्यासक्रम तयार करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आपल्याला चांगले चित्रपट निर्माते तयार करायचे असतील त्यांना शिकवावं देखील लागेल, आपल्याकडचं ज्ञान त्यांना दिलं नाही तर त्यांना ते कसं कळणार, असं त्याचं म्हणणं आहे. या कोर्सच्या माध्यमातून तो कोल्हापूर व आसपासच्या ग्रामीण भागातील तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन करतो आहे. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही त्याची नवी ओळख आहे. तसंच तो निपाणीच्या आपल्या स्टुडिओत व्हिडीओज, शॉर्टफिल्म्स, डॉक्युमेंटरीज इत्यादीसाठी इंग्रजी सबटायटल्स देण्याचं काम करतो.

भविष्यात विविध विषयांवर सिनेमे करण्याचं त्याचं ध्येय आहे. येणारा प्रत्येक दिवस काहीतरी सकारात्मक घेऊन येतो हे त्याच्या जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. त्याची शिकण्याची वृत्ती सदैव जागृत आहे.

जयश्री देसाई | jayashridesai2493@gmail.com

जयश्री देसाई या मुक्त पत्रकार असून त्यांना कला व साहित्य विषयातील मुशाफिरीत विशेष रस आहे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results