
"माणसाचं आयुष्य अगदीच बेभरवशाचं झालं आहे. पुढच्या क्षणाची देखील शाश्वती कुणी देऊ शकत नाही. जे आहे ते आता आहे- उद्या, परवा किंवा काही महिन्यांनी असं काही नाही. मला माझ्या अवतीभवती दिसणाऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्या सांगत असताना समाजाप्रती असणारी बांधिलकी जपायची आहे. या गोष्टी सांगताना त्यांच्यातील भाबडेपणा, प्रामाणिकपणा मला जपायचा आहे. कोणत्याही झगमगटाशिवाय अगदी ओघवत्या शैलीत त्या सादर करायच्या आहेत. यासाठी उच्च प्रतीच्या साधनांची किंवा काही विशिष्ट संधीची वाट बघण्यात मला राम वाटत नाही. म्हणूनच उपलब्ध साधनांमध्ये संधी निर्माण करून काम करण्यात मी जास्त रमतो आहे. मला जे सांगायचं आहे ते मी लोकांसमोर ठेवतो आणि पुन्हा नव्या कामासाठी सज्ज होतो. गेल्या काही वर्षांत हे कसब मला खूप छान जमलं आहे. परिणामी मी एक शांत, समाधानी आयुष्य जगतो आहे." दोन फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय पुरस्कारविजेते लेखक, दिग्दर्शक व निर्माते सचिन सूर्यवंशी बोलत होते.
सचिन सूर्यवंशी यांचा जन्म कोल्हापूरचा. वडील शिक्षक, त्यांची बदलीची नोकरी, त्यामुळे सचिन यांची जडणघडण एका विशिष्ट अशा ठिकाणी झाली नाही. वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचं शिक्षण झालं. शाळेत नेहमी पहिला नंबर, इतर उपक्रमांमध्ये अग्रेसर, विविध स्पर्धांमध्ये बक्षिसं, त्यामुळे लहानपणापासूनच हुशार व अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ते ओळखले जायचे.
दहावीनंतर विज्ञान शाखेत पदवी घेऊन एखाद्या नोकरीत आपला मुलगा स्थिरावेल, अशी त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण सचिन यांना वेगळेच वेध लागले होते. त्यांना चित्रकलेची आवड होती. मात्र शाळेत कलेच्या तासाला भूगोल किंवा इतिहास शिकवणारे शिक्षकच यायचे. त्यामुळे कलेचं वेगळं शिक्षण घेता येऊ शकतं, कलाक्षेत्रात करिअर करता येऊ शकतं, याची त्यांना कल्पनाच नव्हती.
दहावीनंतर एका मित्राकडून त्यांना कोल्हापुरातील कलानिकेतन महाविद्यालयाची माहिती मिळाली. त्यांनी तिथे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण घरच्यांनी नकार दिला. सचिन यांनी घरच्यांच्या समाधानासाठी भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर मात्र नोकरीचा पर्याय बाजूला ठेवून त्यांनी जाहिरातक्षेत्रात शिरण्याचा निर्णय घेतला. घरच्यांची नाराजी पत्करून ग्राफिक डिझायनिंग, कलादिग्दर्शन शिकायला सुरुवात केली. जाहिरातक्षेत्रात काम करत असताना त्यांनी स्वतःच्या आवडीखातर स्पेशल इफेक्स्टस, ॲनिमेशन, साउंड डिझायनिंग, फिल्म एडिटिंग याचं शिक्षण घेतलं. जोडीला ते भरपूर पुस्तकं वाचत असत.
तेव्हा सिनेमाचा विचार त्यांच्या डोक्यातही नव्हता. एका जाहिरात कंपनीत सलग ७-८ वर्षं काम केल्यांनतर मात्र त्यांना जाणीव झाली, की आपल्याला जाहिरातक्षेत्रात काम करायचं नाहीय, सिनेमा करायचा आहे. पण त्यांना ज्या प्रकारचा सिनेमा करायचा होता, तो तर कुणीच करताना दिसत नाहीय, हे देखील त्यांना जाणवलं.

या काळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून त्यांची जागतिक सिनेमाशी गट्टी झाली. जगभरात अनेक ठिकाणी असे सिनेमे तयार होत असल्याच्या भावनेने त्यांचा आत्मविश्वास वाढला. आणि आपण सिनेमा करायचा हे त्यांनी नक्की केलं.
त्यांनी तत्काळ नोकरीवर पाणी सोडलं आणि एका सिनेमाची तयारी सुरू केली. एक संहिता लिहिली. साध्या कॅमेऱ्यावर शूटिंग करायचं ठरवलं. सिनेमातील भूमिकांसाठी कलाकार निश्चित झाले. आणि नेमका त्यांचा एक मोठा अपघात झाला. ७-८ ठिकाणी हाडं फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना दीड महिना घरी बसावं लागलं. सिनेमासाठी जमवलेले पैसे उपचारावर गेले व सिनेमा कागदावरच राहिला.
पण सचिन एवढ्याने शांत बसणारे नव्हते. तब्येत सुधारताच ते दुसऱ्या एका सिनेमाच्या कामाला लागले. त्यासाठी त्यांनी दोन वर्षं संशोधन केलं. पण यावेळेस वडिलांचं निधन झालं. पुन्हा घरच्या जबाबदारीमुळे काम थांबलं. दोन वर्षांनी पुन्हा कामाला सुरुवात झाली. ३-४ वर्षं संशोधन करून त्यांनी एक कथा लिहिली, अनेक निर्मात्यांना ती ऐकवली. पण कुणालाच ती आवडली नाही. असा बराच वेळ निघून चालला होता.
दरम्यानच्या काळात उदरनिर्वाहासाठी वर्षातले काही दिवस ते जाहिरातीचं काम करत असत. यामध्ये कोल्हापूरमधील ‘फुटबॉल महासंग्राम’चं काम त्यांच्याकडे असे. या स्पर्धांसाठी हजारो फुटबॉलप्रेमी कोल्हापुरात जमतात, हे इतर शहरांतील लोकांना पटत नाही, हे त्यांना दिसलं. म्हणून या विषयावर काहीतरी करावं अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली.
त्याबद्दल त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या फुटबॉल खेळाडूंची आर्थिक स्थिती, फुटबॉलवरचं त्यांचं प्रेम, कोल्हापुरात या खेळाची सुरुवात कशी झाली, त्यात कशी सुधारणा होत गेली, हळूहळू तो खेळ कसा समृद्ध होत गेला व आजतागायत कशा पद्धतीने तो जपला जात आहे, अशी सर्व माहिती त्यांना मिळाली. करायचा होता सिनेमा, पण ही गोष्ट सुद्धा सांगितली पाहिजे, असं त्यांना वाटू लागलं. राजकीय महत्वाकांक्षांसाठी या खेळाडूंचा होणारा वापर थांबला पाहिजे, त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा हा कोल्हापूरचा खेळ प्रकाशझोतात आला पाहिजे, अशी भावनाही त्यामागे होती. अखेर सचिन यांनी सिनेमा बाजूला ठेवला आणि ‘सॉकर सिटी’ हा कोल्हापूर फुटबॉलवरील माहितीपट बनवला.
निर्माता न मिळाल्यामुळे सिनेमा राहून गेला, पण या माहितीपटाचं काम पैशांसाठी अडून राहिलं नाही. माहितीपटाशी संबंधित सर्वांनीच एकही पैसा न घेता काम केलं. एका मित्राच्या आयफोनवर हा माहितीपट चित्रित झाला. जगभरात या माहितीपटाचं कौतुक झालं. यामुळे सचिन यांना आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे दुसऱ्या एका सिनेमाच्या कामासाठी ते मुंबईहून पुन्हा कोल्हापूरमध्ये आले. पण तेव्हा कोरोनाने धुमाकूळ घातला. नाइलास्तव घरी बसावं लागलं. ज्या सिनेमासाठी ते कोल्हापुरात आले होते, त्या टीमसोबतच त्यांनी ‘वारसा’ हा आणखी एक माहितीपट करायचा ठरवला होता. पण लॉकडाऊनमुळे ते सुद्धा शक्य झालं नाही.

‘वारसा’ या माहितीपटातून कोल्हापुरातील काही घराण्यांनी जपलेली शिवकालीन युद्धकला लोकांपर्यंत पोहोचवण्याची सचिन यांची इच्छा होती. या युद्धकला आता हळूहळू नाहीशा होत आहेत. गड-किल्ले संवर्धनासाठी ज्या मोहिमा राबवल्या जातात, त्याप्रमाणे या कलाही जपल्या पाहिजेत; शाळा महाविद्यालयांमध्ये या खेळांसाठी वेगळे गुण दिले पाहिजेत, हा विचार त्यांना पुढे आणायचा होता. त्यांनी याबाबतचा अभ्यास केला असता अधिक सखोल माहिती मिळू लागली. लोकांशी संवाद साधताना त्यांचं या कलेप्रती समर्पण व प्रेम त्यांना अधिक जाणवू लागलं. पुन्हा एकदा सिनेमा बाजूला ठेवून त्यांनी हा माहितीपट तयार केला.
‘सॉकर सिटी’ व ‘वारसा’ या दोन्ही माहितीपटांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ‘वारसा’ला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. माहितीपटांची सर्वत्र चर्चा झाली. पण ‘या साऱ्याचं श्रेय माहितीपटांत बोलणाऱ्या लोकांच्या प्रामाणिकपणाचं आहे,’ असं सचिन अगदी नम्रपणे सांगतात.

‘स्वानंदाचं रूपांतर सामाजिक आनंदा’त व्हावं म्हणून ते सिनेमाकडे वळले. पण निर्माता मिळत नाही म्हणून ते निराश होऊन पुन्हा जाहिरातींकडे वळले नाहीत. आपणहून आलेल्या सिनेमांच्या काही संधी सुद्धा त्यांनी स्पष्टपणे नाकारल्या. ‘मला जी गोष्ट सांगायची आहे ती मलाच सांगायची आहे, मी जिथे राहतो, जिथे घडलो तिथली गोष्ट मीच सांगितली पाहिजे. दुसरा कुणी येऊन ती सांगणार नाही,’ या भावनेतून उपलब्ध साधनांमध्ये सिनेमा करायचं त्यांनी ठरवलं आहे. चित्रपटांच्या माध्यमातून आपलं म्हणणं जसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचवणं, यावर त्यांचा भर आहे. ‘यश, अपयश, प्रसिद्धी या सगळ्याशी मला काही घेणंदेणं नाही,’ असंही ते आवर्जून सांगतात.
लवकरच त्यांचा एक सिनेमा येऊ घातला आहे. आणखी काही सिनेमांच्या कथा त्यांच्याकडे तयार आहेत. ‘मला माझ्या भागातल्या माणसांच्या गोष्टी सांगत राहायच्या आहेत. या दोन्ही माहितीपटांनी मला आत्मविश्वास दिला आहे,’ असं ते अगदी ठामपणे सांगतात. ‘तुम्हाला काही करायचं असेल तर त्यासाठी बाहेरून प्रेरणा घेण्याची गरज नसते. ती तुमच्या आतून यावी लागते. मला माझ्या आजवरच्या प्रवासाने हेच शिकवलं आहे,’ असं ते म्हणतात.
जयश्री देसाई | jayashridesai2493@gmail.com
जयश्री देसाई या मुक्त पत्रकार असून त्यांना कला व साहित्य विषयातील मुशाफिरीत विशेष रस आहे