आम्ही कोण?
ले 

नेताजींची भूमिका आणि माझी स्वप्नपूर्ती

  • सचिन खेडेकर
  • 25.09.25
  • वाचनवेळ 14 मि.
sachin khedekar

शाळेत इतिहास शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी अलीकडच्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचा वेगवेगळ्या टप्प्यांवर परिचय होत होता. परकीय अमलाला त्यांनी ज्याप्रकारे, ज्या पद्धतींनी लढा दिला होता ते समजून येत होतं. त्यातली काही नावं, लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमुळे परिचित होती. काही अगदीच नवी होती. त्या सगळ्या प्रवासात असंच नव्याने कानावर पडलेलं नाव होतं आझाद हिंद सेनेचं!

शालेय परीक्षेत ‘एका वाक्यात उत्तर द्या' असा प्रश्न असे. ‘आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली?' याचं उत्तर पुस्तकी भाषेत दिलं जायचं- ‘आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली.' अशा प्रश्नोत्तरांमधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची तोंडओळख झाली. त्यांचा सखोल परिचय झाला, त्यांनी उभारलेल्या लढ्याचा अवाका लक्षात आला असं मी नाही म्हणणार, पण किमान ही माहिती तरी मनात उतरली.

माझ्यासाठी शाळा संपली आणि सोबत इतिहासाचा अभ्यासही. कारण पुढच्या शिक्षणासाठी तो विषय मी निवडलेला नव्हता. काळाच्या ओघात शालेय पुस्तकांतून भेटलेले इतिहासकालीन हीरो जसे दूर जातात, एक ऐकलेलं नाव यापलीकडे त्यांच्याशी कुठलंही नातं उरत नाही, तसंच माझं झालं. पुस्तकातली बहुतेक मंडळी माझ्यासाठी परकी झाली. त्यांचा माझ्या जगण्याशी कोणताही थेट आणि नियमित संबंध उरला नाही.

या परिस्थितीत उलथापालथ झाली ती मी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस- द फरगॉटन हीरो' या चित्रपटात केलेल्या नेताजींच्या भूमिकेमुळे. श्याम बेनेगल यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आज या चित्रपटाबद्दलच थोडं बोलणार आहे.

या चित्रपटामुळे कलावंत म्हणून माझी अनेक स्वप्नं पूर्ण झाली. सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक चांगला अभिनेता आसुसलेला असतो. श्याम बेनेगल यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकासोबत काम करण्याचं आव्हान पेलावं असं आतून वाटत असतं. दीर्घकाळ स्मरणात राहील अशा आणि नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळ्या चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा असते. बोस चित्रपटामुळे माझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. इतकंच नाही, तर आयुष्यात अनेक मोठी स्वप्नं बघण्याचं बळ मला या चित्रपटामुळे मिळालं. २००३ साली या चित्रपटाच्या प्रक्रियेचा मी भाग झालो. पाहता पाहता या घटनेला ३० वर्षं पूर्ण झाली. या लेखाच्या निमित्ताने मागे वळून बघताना मी थोडंसं स्मरणरंजन करतो आहे. खोटं कशाला सांगू, ‘बोस'चा तो सगळा प्रवास आठवताना मला छान वाटतं आहे.

sachin khedekar

२००२चा मे महिना मला आजही स्पष्ट आठवतो आहे. ‘पैसा मारो परमेश्वर' नावाच्या गुजराथी चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं. प्रसिद्ध कॅमेरामन राजन कोठारी चित्रीकरण करत होते. श्याम बेनेगलांसारख्या नामांकित दिग्दर्शकांसोबत त्यांनी भरपूर काम केलेलं होतं. जेवणाच्या सुट्टीत सहज म्हणून मी त्यांना श्यामबाबूंच्या नवीन चित्रपटाविषयी विचारलं. तेव्हा त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर बेनेगल चित्रपट बनवणार असल्याचं सांगितलं. मी उघडपणे बोललो नाही, पण अशा चित्रपटात अभिनयाची संधी मिळावी असं माझ्या मनात होतंच. राजन कोठारी यांचं वेगळेपण असं, की मी न सांगताच माझी इच्छा त्यांच्या लक्षात आली.

विशेष म्हणजे नंतर मुंबईत मला ते श्यामबाबूंकडे घेऊन गेले. त्यापूर्वी मी एक-दोन वेळा किशोर कदमबरोबर श्यामबाबूंच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पण त्यांची आणि माझी ओळख अशी नव्हती. या खेपेस सहज म्हणून चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार आहेत याविषयी चौकशी केली तर कळलं, की सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेसाठी तोवर कलावंत नक्की झालेला नव्हता, पण परेश रावल आणि राज बब्बरसारख्या कलावंतांचा विचार चालू होता.

इथे आपला काही निभाव लागणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर काही दिवसांनी राजन कोठारी यांचा फोन आला. नेताजींच्या भूमिकेसाठी मी स्क्रीन टेस्टची तयारी करावी असं त्यांचं मत होतं. भूमिका मिळेल याची मला खात्री नव्हती, पण मनात आशा पल्लवित झाली होती. त्यामुळे मी लगेच कामाला लागलो. तेव्हाचा प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी माझा मित्र होता. (‘होता' असं म्हणायचं कारण, आता तो हयात नाही.) त्याच्याकडे जाताना मी सुभाषबाबूंची एक कादंबरी घेऊन गेलो. त्या कादंबरीच्या मुखपृष्ठावर त्यांचा एक फोटो होता. त्या फोटोतल्यासारखा मी दिसलो पाहिजे म्हणून मी आणि जगदीश कामाला लागलो. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातल्या एका अद्भुत प्रवासाला सुरुवात झाली. तसा अनुभव मी त्यापूर्वी घेतलेला नव्हता.

“नेताजी दिसायचं असेल तर आधी मिशी काढावी लागेल.” जगदीशने मला स्पष्टच सांगितलं. तो बोलून मोकळा झाला; पण माझ्यासाठी तसं करणं सोपं नव्हतं. एक तर मी आजच्यापेक्षा वीस वर्षांनी लहान होतो. शिवाय त्या काळी मिशी राखणं भारी मानलं जायचं. पण सुभाषबाबू करण्याचं स्वप्न माझ्यावर स्वार झालेलं असल्याने जरा जड अंत:करणाने का होईना पण मी मिशी काढून टाकली. माझा मेकअपमन बहादूरदादाने सुभाषबाबूंसारखा गोल फ्रेमचा चष्मा मिळवला. नेताजी वापरत असत त्या सूटला ‘ब्रिचर्स सूट' म्हणतात. एका कपडेपटवाल्याकडून एका दिवसात आम्ही तसा सूट शिवून घेतला. त्याशिवाय धोती-कुर्ता असे कपडेही पैदा केले. मग एका सकाळी फोटोशूट करण्यासाठी आम्ही थेट दक्षिण मुंबईत गेलो. परीक्षेला जाताना अभ्यासू मुलं करतात तशी तयारी मी केली होती.

sachin khedekar

त्या भागात ब्रिटिशकालीन मुंबईच्या बऱ्याच खुणा आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर फोटो काढावेत असं माझं आणि जगदीशचं बोलणं झालं होतं. तसा तो रविवारचा दिवस असल्याने त्या भागातल्या कार्यालयांना सुट्टी होती. पण शेवटी मुंबई असल्याने वर्दळ होतीच. त्यामुळे बहादूरने गाडीत बसूनच माझा मेकअप केला. मी कसेबसे कपडे बदलले. मग जहांगीर आर्ट गॅलरी, झोराष्ट्रीयन बँकेचा रस्ता आणि वेगवेगळ्या इमारतींसमोर मला उभं करून जगदीशने वेगवेगळ्या कोनांतून माझे फोटो काढले. बरीच तांत्रिक करामत करून जगदीशने त्या फोटोंच्या आठ बाय दहा इंचाच्या रंगीत प्रती तयार केल्या. त्या काळी ई मेल किंवा व्हॉट्सअपसारखी ऑनलाइन संपर्काची साधनं आजच्याइतकी प्रचलित नव्हती. त्यामुळे आम्ही वेळ न दवडता चंदन गोस्वामी म्हणजे राजन कोठारींच्या सहायकामार्फत ते फोटो श्यामबाबूंकडे पाठवून दिले.

माझे फोटो श्यामबाबूंच्या पसंतीस आले असावेत. त्यामुळे मला स्क्रीन टेस्टसाठी ताडदेवला बोलावण्यात आलं. पण प्रत्यक्षात तिथे नेताजींच्या वेषभूषेत माझं मॉकशूट करण्यात आलं. त्यात मी दिसतो कसा यापेक्षा मी नेताजींच्या भूमिकेत वावरतो कसा हे पाहण्यात आलं. त्यानंतर मात्र माझी त्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

अगदी त्या क्षणापासून मला श्यामबाबूंच्या वेगळेपणाची आणि दिग्दर्शक म्हणून असलेल्या स्वतंत्र शैलीची ओळख व्हायला लागली. तोपर्यंत मी १५-१७ वर्षं अभिनय केलेला होता. त्यामुळे माझी पाटी कोरी नव्हती. तिच्यावर आधीच्या भूमिकांचे ठसे होते. अशा अभिनेत्यासोबत काम करणं हे दिग्दर्शकासाठी नेहमीच कठीण असतं. कारण आधीच्या भूमिकांचे ठसे शक्य तेवढे पुसायचे असतात. जमेल तेवढी पाटी कोरी करायची असते. तरच त्यावर नव्या भूमिकेचे रंग भरता येतात. श्यामबाबू ही प्रक्रिया कशी करतात हे समजून घेण्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो.

त्यानंतरच्या पहिल्याच भेटीत श्यामबाबूंनी माझा अंदाज चुकवला. मला वाटलं होतं, की त्या भेटीत ते मला नेताजींचं व्यक्तिमत्त्व समजावून सांगतील; पण संपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी नेताजींचा साधा उल्लेखही केला नाही. उलट, तो विषय सोडून बाकी अनेक विषयांवर ते बोलले. आम्ही अगदी मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्या दिवशी मला पुरेसा उलगडा झाला नाही, पण नंतर लक्षात आलं, की ती त्यांच्या कामाची पद्धत होती. अभिनेत्याबरोबर गप्पा मारत व्यतीत केलेली एक चांगली संध्याकाळ त्या अभिनेत्याला भूमिकेच्या अधिक जवळ घेऊन जाते अशी त्यांची धारणा होती. त्यांच्याच शब्दांत सांगायचं,तर ‘ॲन इव्हिनिंग वेल स्पेन्ट विथ ॲन ॲक्टर इज अ ब्रीफिंग ऑफ द रोल!'

त्या भूमिकेसाठी माझं नेताजी दिसणं आणि असणं असं दोन्ही खूप महत्त्वाचं होतं. आपल्या चित्रपटसृष्टीत कधीच ऐकू न येणारी गोष्ट मी त्या वेळी ऐकली- त्या भूमिकेसाठी एक वर्षभर माझी तयारी करून घेतली जाणार होती. ती पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. आधी सांगितल्याप्रमाणे मी तोवर चित्रपट आणि मालिकांतून अनेक भूमिका केलेल्या होत्या, पण वर्षभराची तयारी हा प्रकार मला काही झेपेना. माझ्या तोवरच्या अनुभवाप्रमाणे मला वाटत होतं, की एवढं करायची काय गरज आहे? चित्रीकरण सुरू झालं की मी मेहनत करून शिकत जाईनच की सगळं! पण श्यामबाबू, बीइंग श्यामबाबू, त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांच्या ठामपणाचा अर्थ मला हळूहळू उलगडत गेला.

sachin khedekar

एखाद्या भूमिकेचा अभ्यास करणं म्हणजे काय हे मला त्या एका वर्षाने शिकवलं. माझा नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा भाग होता. त्यासाठी तेव्हाचा भारत, ब्रिटिश राजवट, स्वातंत्र्य चळवळ, काँग्रेसची भूमिका, नेहरू-गांधी आदी नेत्यांचं नेतृत्व, जागतिक परिस्थिती इथपासून ते महायुद्धाच्या तपशिलांपर्यंत सगळी पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक होतं. या भवतालाच्या पार्श्वभूमीवर नेताजींचं व्यक्तिमत्त्व आणि त्याचे पैलू छोट्या छोट्या तपशिलांसकट लक्षात घ्यायचे होते. नेताजींचं बालपण भुवनेश्वरला गेलं. प्रचंड श्रीमंत बंगाली कुटुंबाचा वारसा त्यांना लाभला होता. त्या काळातल्या इतर अनेक कुटुंबांप्रमाणे हे बोस कुटुंबही सुशिक्षित, सुसंस्कृत आणि घरंदाज इतमामाचं होतं. नेताजी स्वत:ही अत्यंत हुशार आणि तैलबुद्धी होते. त्यांचं अर्धं आयुष्य युरोपात गेलेलं असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भारतीय मूल्यं आणि युरोपियन सभ्यता यांचा मिलाफ होता. अर्थात आमच्या चित्रपटात १९३९ ते १९४५ हा फक्त सहा वर्षांचा कालखंड दाखवण्यात येणार होता. त्यामुळे त्या सहा वर्षांतले सुभाषबाबू मला पडद्यावर साकारायचे होते; पण श्यामबाबूंच्या पद्धतीप्रमाणे मला सुभाषबाबूंच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कलकत्त्याचाही (तेव्हा कोलकाता झालेलं नव्हतं) अभ्यास करायचा होता.

क्षमा झैदी आणि अतुल तिवारी यांनी आमच्या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यासाठी त्यांनी भरपूर संदर्भग्रंथांपासून ते नेताजींच्या बर्लिन रेडिओवरच्या भाषणांपर्यंत अनेक गोष्टींचा अभ्यास केला होता. माझ्या वाचनासाठी त्यांनी त्यातली ३५ ते ३८ पुस्तकं निवडली होती. त्यांतल्या महत्त्वाच्या पानांवर खुणा केलेल्या होत्या. ती पुस्तकं वाचणं, वाचलेल्याचं आकलन करून घेणं आणि गरजेप्रमाणे नोंदी करणं हे काम माझ्याकडून अपेक्षित होतं. सोबतीला खुद्द श्यामबाबूंची शिकवणी होतीच.

चित्रपट ही दीर्घकाळ टिकणारी कलाकृती असल्याने ती संदर्भ-पुराव्यांसह अस्सल असलीच पाहिजे असा श्यामबाबूंचा आग्रह होता. त्यामुळे ते माझ्यामध्ये सुभाषबाबू मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी ते मला अनेक चर्चासत्रांना बरोबर न्यायचे. तिथली भाषणं आणि चर्चा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. त्या चर्चांमधला श्यामबाबूंचा सहभाग तर मला केवळ थक्क करणारा होता. त्यांचा जागतिक राजकारणाचा सखोल अभ्यास होता. मुख्य म्हणजे त्याचे धागेदोरे सध्याच्या परिस्थितीशी जोडून दाखवण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. ते सगळं मी लक्षपूर्वक ऐकायचो, त्यावर विचार करायचो. या सगळ्यातून मी खूप काही शिकत होतो.

विशिष्ट पाश्चात्त्य हेल काढत बोललेलं अस्खलित इंग्रजी हे सुभाषबाबूंच्या व्यक्तिमत्त्वाचं रुबाबदार वैशिष्ट्य होतं. तसं इंग्रजी बोलता येणं हे माझ्यासाठी आव्हान होतं. कारण माझं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात, मराठी माध्यमात झालेलं होतं. शिवाय चित्रपटसृष्टीमध्ये इंग्रजी बोलता बोलता हळूच हिंदीचा आधार घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे कर्ता-कर्म-क्रियापद-काळ न चुकता इंग्रजी बोलणारे फार कमी आहेत. शिवाय माझ्या इंग्रजी बोलण्याला मराठीची ढब होतीच. पर्यायाने पुन्हा एकदा माझ्या जिभेवरची भाषेची पाटी कोरी करून तिला पाश्चात्त्य इंग्रजीचं वळण लावणं क्रमप्राप्त होतं. त्यासाठी मला इंग्रजीची शिकवणी लावण्यात आली. मला इंग्रजी शिकवण्याचं काम शेरनाज पटेल यांच्याकडे होतं.

प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी टोकाचं आग्रही असणं आणि त्यासाठी अखेरच्या बिंदूपर्यंत काम करणं म्हणजे काय असतं याचं प्रात्यक्षिक मी या चित्रपटाच्या काळात दररोज पाहत होतो. नेताजींचं दिसणं हुबेहूब होण्यासाठी काय नाही केलं या लोकांनी? या लोकांनी म्हणजे श्यामबाबू, विक्रम गायकवाड आणि पिया बेनेगल यांनी. त्यात विक्रमकडे अर्थातच माझ्या मेकअपची जबाबदारी होती. फोटोप्रमाणे नेताजींचा चेहरा गोल होता. त्यामुळे माझा चेहरा गोल दिसण्यासाठी माझ्या हनुवटीवर काम करण्याची गरज होती. त्यासाठी विक्रमने एक रबराची हनुवटी बनवली. रोज मेकअप सुरू करण्याआधी ती मला लावावी लागायची. दाढी लावायची असली तरी आधी ती हनुवटी लावायची आणि मग त्यावर दाढी लावायची. शिवाय ती हनुवटी काढताना फाटायची. त्यामुळे रोज नवी हनुवटी बनवली जायची. विक्रमच्या लक्षात आलं, की माझ्या दोन्ही भुवया जुळलेल्या आहेत. मग त्याने थ्रेडिंग करून दोन्ही भुवयांच्या मधला कपाळावरचा भाग स्वच्छ केला. माझा चेहरा जास्तीत जास्त नेताजींच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. अरे हो, आणखी एक सांगायचं राहिलं. चेहऱ्यावर काम करण्यासाठी विक्रमशिवाय डॉ. जमना पै यांचीही महत्त्वाची भूमिका होती. ‘नेताजी हे गर्भश्रीमंत असल्याने त्यांचे गाल रिच दिसले पाहिजेत' असं श्यामबाबूंचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी मला डॉ. पै यांच्याकडे पाठवलं होतं. कारण माझा चेहरा जरासा पिवळसर होता. डॉ. पै यांनी मला दहा-बारा वेळा फेशियल केलं.

sachin khedekar

मेकअपइतकीच वेषभूषाही महत्त्वाची होती. नेताजींनी अनेक वेळा वेषांतरही केलेलं होतं. त्यामुळे सेनापतींच्या वेषातल्या नेताजींप्रमाणेच मोहंमद झियाउद्दिन, इन्शुरन्स एजंट, झियाउद्दिन खान किंवा अर्बन पठाण अशा वेगवेगळ्या रूपांतल्या नेताजींसाठीही वेषभूषा तयार करायची होती. ते काम पिया बेनेगलने केलं. पण या सगळ्या गोष्टी श्यामबाबूंच्या कसोटीला उतरणं हा फार मोठा टप्पा होता. साधं बुटाचं उदाहरण पहा. नेताजी वापरत तसे हुबेहूब बूट बनवून घेण्यासाठी आम्ही कलकत्त्यात बरीच मगजमारी केली. एकेका दुकानात जाऊन मापं देऊन आणि फोटोतले बूट दाखवून वाट बघत बसायचो. हवे होते तसे बूट मिळेपर्यंत बराच प्रयास करावा लागला.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही कलकत्त्यात घालवलेले दिवस तर मी कधीच विसरू शकत नाही. सुरुवातीला तिथे माझ्या निवडीला विरोध झाला होता. कारण आपल्या मराठी लोकांप्रमाणेच बंगाल्यांचीही अस्मिता टोकदार असते. त्यामुळे नेताजींच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्याचा विचार होणं ते सहनच करू शकत नव्हते. एवढ्या मोठ्या बंगालमधून एक बंगाली नट मिळू नये म्हणजे काय, हे श्याम बेनेगल स्वत:ला समजतात तरी कोण, वगैरे वगैरे. तिथले पत्रकार तर माझ्याकडे रागानेच बघत होते. त्याचं माझ्या मनावर दडपण येत होतं आणि त्यामुळे मग श्यामबाबूंच्याही.

कलकत्त्यामधल्या एलिगन रस्त्यावर नेताजी भवन या नेताजींच्या घरात आम्ही चित्रपटाचा मुहूर्त केला. आता त्या घराचं रूपांतर नेताजींच्या वस्तुसंग्रहालयामध्ये केलेलं आहे. तिथे आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या पगाराच्या स्लिप्सपासून नेताजींच्या आवडत्या पेनापर्यंत अनेक गोष्टी ठेवलेल्या आहेत. नेताजींचे पुतणे शिशिर बोस आणि त्यांच्या पत्नी कृष्णा बोस (मेंबर ऑफ पार्लमेंट) यांनी ते वस्तुसंग्रहालय खूप प्रेमाने जोपासलं आहे. त्यांचा मुलगा हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. या वस्तुसंग्रहालयाजवळ नेताजींचं एक स्मारक उभं केलेलं आहे. त्यावर ‘एतिहाद', ‘कुर्बानी' आणि ‘एतमाद' असं लिहिलेलं आहे. तिथेच एका भल्या पहाटे आम्ही चित्रपटाचा मुहूर्त केला. तेव्हा मी कृष्णा बोस यांना वाकून नमस्कार केला. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यावर माझ्या नेताजी दिसण्याविषयी मला खात्री पटली.

प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झालं तेव्हाची माझी मन:स्थिती शब्दांत वर्णन करण्यापलीकडची होती. तसं पाहता तोवर एक चांगला अभिनेता अशी माझी ओळख तयार झाली होती. नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन अशा तीनही माध्यमांत मी वैविध्यपूर्ण भूमिका साकार केल्या होत्या, पण तोवर कधी आलं नव्हतं इतकं दडपण मला नेताजी करताना आलं होतं. विचार करता माझ्या लक्षात आलं, की ते दडपण नेताजी करण्याचं होतंच, पण त्याहीपेक्षा श्यामबाबूंच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचं होतं. ‘अंकुर', ‘चरणदास चोर', ‘निशांत' किंवा ‘मंथन'सारखे मैलाचा दगड ठरलेले अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. कोणत्याही चित्रपटाचं यश हे दिग्दर्शक आणि कलावंताचे एकमेकांशी सूर कसे जुळतात यावर अवलंबून असतं. श्यामबाबू हे वलयांकित दिग्दर्शक होतेच, पण वर्षभराच्या तयारीच्या काळात मला त्यांच्या आग्रही स्वभावाचं दर्शन घडलेलं होतं. साधा नेताजींचा चष्मा नक्की करायचा तरी दहा प्रकारचे चष्मे नाकारत त्यांनी अकरावा फायनल केला होता. अशा दिग्दर्शकासोबत सीन्स करण्याचा अनुभव कसा असेल याचा अंदाज मला येत नव्हता. प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू झाल्यानंतर मात्र मला श्यामबाबूंमधला दिग्दर्शक खऱ्या अर्थाने उलगडायला सुरुवात झाली.

sachin khedekar

प्रत्येक सीनच्या आधी आणि रीटेकच्या दरम्यान नटाशी चर्चा करणं आणि तेव्हा त्याला भूमिका समजावून सांगणं श्यामबाबूंना मंजूर नव्हतं. त्यांचा सगळा भर पूर्वतयारीवर होता. म्हणून चित्रीकरण सुरू होण्याआधी एक वर्ष त्यांनी मला सर्व विषयांचं प्रशिक्षण दिलं. ते विषय मला अवगत झाल्याची खात्री झाल्यावरच चित्रीकरणाच्या तारखा निश्चित केल्या. त्यांच्या मते प्रमुख भूमिकेतल्या अभिनेत्याची परिपूर्ण तयारी हा चित्रपटाचा पाया असतो. तो मजबूत असेल तर वरची इमारत नीट उभी राहते. या पूर्वतयारीप्रमाणेच ते कलावंताच्या मन:स्थितीला खूप महत्त्व देणारे होते. दररोज सकाळी ते ब्रेकफास्ट करताना माझ्याशी गप्पा मारायचे; पण त्या गप्पा त्या दिवशीच्या माझ्या सीन्सविषयी नसायच्या, तर माझी झोप नीट झाली आहे ना, घरच्यांशी फोन झाला आहे ना, वगैरे गोष्टी ते बोलायचे. त्यातून त्यांना माझ्या त्या वेळच्या मन:स्थितीचा अंदाज यायचा. हे सगळं झाल्यावर प्रत्यक्ष सीन चालू असताना मात्र ते सेटवर फार बोलायचे नाहीत. कॅमेऱ्यासमोर काहीही लपत नाही याचं भान मात्र देत राहायचे. त्यांच्या मते कोणत्याही कलाकाराने कॅमेऱ्यासमोर हातचं राखून अभिनय केला किंवा जरा जरी खोटेपणा केला तरी त्याचा परिणाम संपूर्ण चित्रपटाच्या अस्सलपणावर होतो. या बाबतीत इतके जागरूक दिग्दर्शक भारतात तरी कमी आहेत असं मला वाटतं.

आज वीस वर्षांनंतर मी या चित्रपटाचा विचार करतो तेव्हा मनात प्रश्न येतो, की नेताजींच्या भूमिकेने मला काय दिलं? माझ्यात कोणती भर घातली? चित्रपट करण्यापूर्वीचा मी आणि चित्रपटानंतरचा मी यात कुठला गुणात्मक फरक पडलाय का? आणि माझ्या लक्षात येतं- चित्रपट करताना भाषा, अचूकता, सजगता, परिपूर्णता या सगळ्या संकल्पनांचा थेट अनुभव तर मला आलाच, ज्यात नेताजींइतकंच श्यामबाबूंचंही श्रेय आहे. मात्र, या सगळ्यापलीकडे जाणारा आणि मनात रुतून बसलेला नेताजींचा एक गुण म्हणजे समर्पण! हाती घेतलेल्या कार्याप्रति असलेली विनाशर्त संपूर्ण समर्पितता!

मला वाटतं, आपल्या सगळ्यांसाठी दोन भूतकाळ असतात. एक स्वत:चा, केवळ वैयक्तिक असा भूतकाळ, तर दुसरा आपण ज्या समाजात, ज्या समूहाबरोबर जीवन व्यतीत करत असतो त्या समाजाचा एकत्र मिळून असलेला भूतकाळ. हे दोन्ही भूतकाळ काही अंशी एकमेकांत मिसळलेले असतातच, पण सहसा समांतर वाहत राहतात. हा चित्रपट करण्यापूर्वी माझ्या भूतकाळात नेताजी नव्हते. समाजाच्या भूतकाळात ते असले तरी त्यांच्याशी माझा कुठलाही विशेष अनुबंध नव्हता. आम्ही एकमेकांपासून अंतरावरून त्रयस्थपणे जात होतो.

मात्र, या भूमिकेमुळे असा धागा जोडला गेला ज्यातून सामूहिक भूतकाळातला हा अद्भुत कालखंड माझ्या वैयक्तिक भूतकाळाचादेखील भाग झाला. त्यातून माझ्या व्यक्तित्वात भर घातली गेली. आकलनात समृद्धी आली. दृष्टिकोनाला वेगळी परिपक्वता लाभली. माझ्या पुढच्या वाटचालीत दीपस्तंभाप्रमाणे याचा अपरिहार्य प्रकाश पडत राहणार हे नक्की!

सचिन खेडेकर







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

अक्षय अवधानी29.09.25
एका भूमिकेकडे पाहताना नेहमीच्या पठडीबाहेरचा विचार करणे हे एखाद्या दिग्दर्शकाला आणि अभिनेत्याला त्याचे वेगळेपण देते...... आणि ह्याची मांडणी देखील उत्तम प्रकारे ह्या लेखामधून केली आहे. पुढील पिढीतील होतकरू अभिनेते व दिग्दर्शकांसाठी प्रेरणादायी ठरेल हा लेख

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results