
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २६७ व्या पोपची निवड प्रक्रिया सुरू होती तेव्हा दोन चित्रपटांची आठवण झाली. २०१९ सालचा टू पोप्स आणि २०२४ सालचा कॉनक्लेव. दोन्ही चित्रपटांचा विषय पोपची निवड हाच होता.
कॉनक्लेव या ताज्या चित्रपटातील मुख्य किरदार आहे कार्डिनल थॉमस लॉरेन्स. चित्रपट सुरू होताना एक बिशप हातात एक ब्रीफकेस घेऊन जाताना पाठमोरा दिसतो. ब्रीफकेस अशी काही दिसते, बिशपची चाल अशी काही दिसते की त्या ब्रीफकेसमधे काही तरी महत्त्वाचं असणार, हे लक्षात येतं. काय असेल? स्फोटक कागदपत्रं? बॉम्ब? कार्डिनल बॉम्ब घेऊन का फिरेल? पण हल्ली काही सांगता येत नाही. त्यामुळे चित्रपटात रहस्य आहे असं सुरुवातीपासून वाटू लागतं.
हे ही वाचा - पोपपदी होणार का भारतीय दलित कार्डिनलची निवड?
तो बिशप असतो कार्डिनल थॉमस लॉरेन्स. तो व्हॅटिकनकडे निघाला असतो. त्याला डीन या नात्याने पोपची निवडणूक पार पाडायची असते. आपल्याला चित्रपटभर लॉरेन्स दिसत असतो. खूप दूरवर छोटासा दिसतो आणि चालत येत येत समोर येतो तेव्हा पडदा व्यापतो. उलटंही होतं. चालत चालत दूर जातो तेव्हा पिटुकला होत जातो. चिंतातूर असतो तेव्हा त्याच्या कपाळावरच्या आठ्या मोजता येतात. चिडून डोक्यावरची टोपी काढतो त्यावेळी त्याचा राग नाकावर दिसतो. ढसाढसा रडताना दिसतो. लॉरेन्सच्या चेहऱ्यावर भावनांच्या चलाख छटा दिसतात. आनंद, राग, दुःख, कसा जिंकलो..
लॉरेन्स हेच एक रहस्य असतं. तो म्हणतो की त्याला पोप व्हायचं नाहीये, एकदाची निवडणूक पार पडली की तो निवृत्त होणारेय आणि रोम सोडून जाणारेय. प्रतिस्पर्धी कार्डिनलची कुलंगडी शोधायला दिवंगत पोपच्या सीलबंद खोलीत जातो. म्हणतो की पोप होण्यासाठी आवश्यक आध्यात्मिक तयारी त्याच्यामधे नाही. प्रतिस्पर्धी काळ्या कार्डिनलचं कुलंगडं बाहेर पडतं तेव्हां त्याला सांगतो की तू स्पर्धेतून बाहेर जा. कार्डिनल आल्डो सांगतो की तू महत्त्वाकांक्षी आहेस, तुला पोप व्हायचंय म्हणून तू भानगडी करतोयस. लॉरेन्स उद्वेगानं मान हलवतो, नाकारतो. मग आल्डो विचारतो की तुला पोप व्हायचं नव्हतं तर पोप झालो तर कोणतं नाव धारण करू हे तू का लिहून ठेवलंस? लॉरेन्स बोलत नाही.
चित्रपटात कार्डिनल लोकांचे आपसातले मतभेद दिसतात. कार्डिनल लोकांचे पाय मातीचे असतात हे लक्षात येतं. पोप कार्डिनल लोकांवर लक्ष ठेवतात, त्यांची बँक खाती तपासत असतात हे आपल्याला कळतं. पोपनीही पापं केलेली असतात, कोणी पोप नाझी विचारांचा असतो, कोण फॅसिस्टांना मदत करतो, कोण पोप बिशपांचे सेक्स घोटाळे माहीत असूनही गप्प रहातो. पोपच्या वर्तनातल्या फटी कार्डिनलांना माहीत असतात, तरीही ते गप्प बसतात.
ख्रिस्त माणूस होता. पापक्षम होता. बिशपही माणसंच असतात. पापक्षम, पापी असू शकतात. चर्च ही शेवटी माणसांनी घडवलेली माणसांची संस्था आहे. माणूस म्हणून जे काही असतं ते चर्चमधे असणार. या चित्रपटात ते दिसतं. पण चित्रपटाची मांडणी अशी की चर्चचे दोष दाखवण्याचा आपला उद्देश नाही असंही दिग्दर्शक वारंवार दाखवत असतो.
लॉरेन्स हा माणूस काय आहे, तो पोप होईल की नाही अशी उत्कंठा आपल्याला चित्रपटभर असते. शेवटी तिसरंच काही तरी होतं. ज्याच्याबद्दल कोणाला काही माहीत नाही असा अफगाणिस्तानातला कार्डिनल अचानकच निवडणुकीत प्रकट होतो. त्याला पोपनी आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलेलं आहे, हेही कार्डिनलांना माहीत नसतं. हा उत्तराधिकारी एक भाषण करतो. शांतता, सर्व धर्मांत सलोख्याचे संबंध असले पाहिजेत असं सांगतो. पोप होतो.
म्हटलं तर ही चर्चची गोष्ट आहे. म्हटलं तर कुठल्याही संस्थेतल्या अंतर्गत राजकारणाची आणि एका चलाख माणसाची गोष्ट आहे. चित्रपटात कार्डिनल दिसतात. कॉर्पोरेट बोर्डासारखं वातावरण. रस्सीखेच. एक गोष्ट हलकेच लक्षात येते. चर्चचं भव्यपण, चर्चमधली कलाकुसर इत्यादी गोष्टी कमी दिसतात. निवडणूक प्रक्रियाच दाखवली जाते, ती अगदी देखणी केलीय.
२०१९ साली टू पोप्स हा चित्रपट पडद्यावर आला होता. त्यात निवृत्त होणारा आणि पोपपदी प्रवेश करणारा अशा दोन पोपमधील वैचारिक संवाद दाखवला होता. देव, देवाने साक्षात्कार देणं, देवाचं मार्गदर्शन, देव पापाला क्षमा करत नाही, पापींना क्षमा करतो असे अनेक तरल मुद्दे त्या चित्रपटात होते. पोप माणूस किती गोड असू शकतो ते त्या चित्रपटात दिसलं. दोघांमधे मतभेद असतात. पण दोघांचं एकमेकावर प्रेम असतं, श्रद्धा असते असं त्या चित्रपटात दिसतं.
लॉरेन्सची भूमिका राल्फ फीन याने केलीय. घारे, भेदक डोळे. लॉरेन्स कधी खलनायक वाटतो, कधी प्रामाणिक वाटतो, कधी त्याच्या डोक्यात काय चाललंय ते कळत नाही. चेहरा फार जवळून दिसणं डेंजरस असतं. त्यात नट उघडा पडतो. फीनचा लॉरेन्स आपल्याला सतत गोंधळात टाकतो.
चित्रपटात घटना घडतात, माणसं दिसतात, माणसांचे समूह दिसतात. प्रत्येक वेळी वेगळं संगीत योजलेलं आहे. काही तरी घडणार आहे, काही तरी लोच्या आहे असं संगीत आपल्याला वारंवार सांगतं. डोळे मिटून चित्रपट पाहिला तर त्यातल्या संगीताची गंमत कळते.
धर्म, चर्च, ख्रिस्त हे विषय दीड अब्ज ख्रिस्तींच्या दृष्टीने भावनांना हात घालणारे असतात. हॉलिवूड तो विषय सतत हाताळत असतं. क्वचितच स्कॉरसेसेचा दि लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राईस्टसारखा धाडसी चित्रपट ख्रिस्ताला एक माणूस म्हणून चितारतो, वादळ होतं. सामान्यतः ख्रिस्ती माणूस असे चित्रपट चित्रपट म्हणून पहातो, चर्चही चित्रपटाचं चित्रपट मोल समजून घेतो. हाही चित्रपट पाहून ख्रिस्ती लोक किंवा चर्च खवळलं नाही, त्यांनी चित्रपटाचा रसिक म्हणून स्वीकार केला.
(https://www.niludamle.com/ वरून साभार)
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.