जगातला सगळ्यात कमी अटेन्शन स्पॅन असलेला प्राणी कोणता? आजवरच्या संशोधनातून असं मानलं जातं होतं की गोल्डफिशचा अटेन्शन स्पॅन सगळ्यात कमी म्हणजे केवळ नऊ सेकंद असतो. गोल्डफिश म्हणजे फोकस नसण्याचं प्रतीकच जणू. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये मनुष्यप्राण्याने तंत्रज्ञानाच्या आधारे एवढी ‘प्रगती' केली आहे, की आपला अटेन्शन स्पॅन गोल्डफिशपेक्षाही कमी म्हणजे आठ सेकंद झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी कॅनडामध्ये एक सर्वेक्षण केलं गेलं. त्या सर्वेक्षणात स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांचा सरासरी अटेन्शन स्पॅन फक्त आठ सेकंद असल्याचं नोंदवण्यात आलं. सर्वेक्षण कॅनडातलं असलं तरी आपल्याकडची परिस्थिती अर्थातच यापेक्षा वेगळी नाही. दोन-चार सेकंद इकडे-थतिकडे. प्रश्न जसा आपला अटेन्शन स्पॅन किती सेकंदाचा आहे हा आहे, तसाच एकाच विचारात डुंबून राहण्याचं माणूस म्हणून असलेलं आपलं वेगळेपण आपण झपाट्याने हरवत चाललो आहोत की काय याचाही आहे. याचं क्रेडिट जसं स्मार्टफोन्स आणि तत्सम गॅझेट्सना जातं, तसंच कमीत कमी अटेन्शन स्पॅनकडे वाटचाल करण्याच्या आपल्यातल्या महत्त्वाकांक्षेलाही जात असावं का?
याचे पुरावे आपल्या रोजच्या जगण्यात इतस्ततः पसरलेले आहेत. वाचनाचं उदाहरण घ्या. आपलं बरंचसं वाचन आता फोनवरच होतं. (प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचण्याऐवजी स्क्रीनवर वाचल्यामुळे आपल्या मेंदूचं काय होतं याबद्दलही संशोधनं सुरू आहेतच. उदा. स्क्रीनवर वाचत असताना आपली काँक्रीट मेमरी काम करत असते, पण ॲबस्ट्रॅक्ट मेमरी मात्र काहीशी ढिली पडलेली असते. म्हणजे काय, तर स्क्रीनवर वाचलेल्या मजकुरातील तारखा वगैरेंचे तपशील लक्षात राहतात, पण संकल्पनांचं आकलन होणं, त्यामागची प्रक्रिया समजणं अशा गोष्टी कागदावर वाचतानाच जास्त चांगल्या रीतीने होतात, असं आता समोर येतं आहे. अर्थात ज्यांचा जन्मच ‘स्क्रीन रीडिंग'च्या जमान्यात झालाय त्यांचं प्रकरण आणखी वेगळं असणार! पण ते असो.)
स्क्रीन विरुद्ध कागदावरचं वाचन हा मुद्दा तूर्त बाजूला ठेवू या. स्क्रीनवर का होईना, लोक वाचत असतात. फोनमध्ये डोकं घालून बसलेल्या माणसांचं कशाचं ना कशाचं वाचनच चाललेलं असतंच की! मित्रमंडळींच्या मेसेजसबरोबर व्हॉट्सॅप आणि फेसबुकवरून स्रवणारे माहितीचे तुकडे, असं या वाचनाचं स्वरूप असतं. पण त्यातल्या एखाद्या माहितीबद्दल डोक्यात विचार सुरू होऊन त्याच्या खोलात जाण्याची संधी त्यांना मिळते का? एक तुकडा वाचेपर्यंत दुसऱ्या ठिकाणचं नोटिफिकेशन वाजतं. दुसरं कोणी ऑनलाइन आलेलं असलं की त्याच्याशी बोलण्याच्या नादात आधीच्या माहितीचे विचार डोक्यातून समूळ उखडले गेलेले असतात. किंवा, एखादी मेल त्या अकांउटमध्ये ओढून घेते, की माणूस बाकी सारं विसरून तोच रस्ता चालायला लागतो. शिवाय, काहीही वाचलं की ते मेंदूने प्रोसेस करून त्याचे अर्थ लागण्याआधी आपल्याला ती माहिती पुढे इतरांकडे ढकलण्याची घाई असते. तशी अघोषित सक्तीच वाटते आपल्याला. फोनवरच्या आपल्या मुशाफिरीत आपण एका विषयाच्या किती खोलात जातो वगैरे लांबच; त्या विषयात किती मिनिटं रमतो, हाही संशोधनाचा विषय आहे.
हे फक्त हातात फोन असतानाच घडतंय असंही नव्हे. कोणत्याही कामासाठी कॉम्प्युटर उघडून समोर बसल्यावर काय काय घडतं बघा. तिथेही मध्ये मध्ये डोकावणाऱ्या अडथळ्यांची वानवा नाही. अगदी काहीच नाही म्हटलं तरी कुठली तरी न्यूजसाइट बघावीशी वाटते. अमेझॉन/फ्लिपकार्टवरून काही तरी ऑर्डर करायचं असल्याची आठवण होते. एकदा का एखाद्या वेबसाइटवर गेलं की त्या दलदलीत फसून आत आत जात राहणं फारसं अवघड नसतं. तुमचा इंटरनेटवरचा व्यवहार तपासून तुम्हाला दाखवल्या जाणाऱ्या नाना जाहिराती, शंभरशेसाठ ब्रेकिंग न्यूज आणि तशाच असंख्य गोष्टी माणसाच्या मेंदूचा ताबा घेतात. डोक्यातले विचार ज्या दिशेने भरकटत राहतात, त्या दिशेला वाहवत नेण्यासाठी ही गॅझेट्स उत्सुकच असतात, किंवा ती त्यासाठीच बनवली गेलेली असतात. माणूस आपसूक त्यांच्या जाळ्यात फसत जातो- फसलोय याची जाणीवही न होता.
मग काय, वाऱ्यावर एखादं भिरंभिरं भेलकंडावं तसा आपला मेंदू भिरभिरत राहतो. ज्यांना याची जाणीव होतेय ते सावरताहेत, या जाळ्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करताहेत. पण बहुतेकांची अवस्था विनोबांच्या गीताईत म्हटल्याप्रमाणे ‘इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे। त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी॥' अशी होऊन गेली आहे.
अशा माणसांची ओळख लवकरच डी-फोकस्ड स्पेशीज अशी होणार की काय?
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
