आम्ही कोण?
काय सांगता!  

सोमनाथ मंदिरः गांधी, पटेल, नेहरू काय म्हणाले होते?

  • गौरी कानेटकर
  • 10.01.26
  • वाचनवेळ 3 मि.
somnath temple conflict

गझनीच्या मोहम्मदाने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर हल्ला केला त्याला हजार वर्षं झाल्यानिमित्त सध्या हे मंदिर चर्चेत आहे. ‘सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण करण्यास पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा विरोध होता. त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाही सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला जायला विरोध केला होता’, असं सतत सांगितलं जात असतं. मात्र मंदिर उभारणीबाबत वल्लभभाई पटेलांची भूमिका काय होती, याबाबत मात्र काहीही बोललं जात नाही. खरंतर भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे मंदिर उभारणीसाठी सरकारने खर्च करू नये, असं पटेल आणि नेहरू या दोघांचंही मत होतं.

मंदिर उभारणीचा घटनाक्रम आणि गांधीजींचं म्हणणं

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून सोमनाथ मंदिराच्या पुनर्उभारणीची चर्चा सुरू झाली होती. गुजरातमधील काँग्रेसचे नेते कन्हय्यालाल मुन्शी त्याकामी आघाडीवर होते. स्वातंत्र्यानंतर नोव्हेंबर १९४७मध्ये सरदार वल्लभभाई पटेल, मुन्शी आणि इतर काही नेत्यांनी महात्मा गांधींची भेट घेऊन सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाबाबत चर्चा केली. ‘सोमनाथ मंदिर पुन्हा उभं राहिलंच पाहिजे, पण ते सरकारी निधीतून नव्हे तर सर्वसामान्य जनतेने उभ्या केलेल्या पैशांवर उभं राहिलं पाहिजे’, हे त्यांचं पूर्वीपासूनचं म्हणणं गांधीजींनी त्यावेळी पुन्हा एकदा सांगितलं. सरकार धर्मनिरपेक्ष राहावं, यासाठी ही भूमिका गरजेची होतीच, पण त्याचबरोबर हिंदू समाजाला मंदिर उभारणीसाठी सरकारी कुबड्यांची गरज काय, असा त्यांचा सवाल होता. सरदार पटेलांचंही तेच म्हणणं असल्यामुळे सोमनाथ मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. कन्हय्यालाल मुन्शी त्याचे अध्यक्ष होते. आपल्या काकासाहेब गाडगीळांनीही मंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

सरदार पटेलांचा निर्धार

या घडामोडींनंतरही मंदिरासाठी सरकारी निधी मिळावा, यासाठी मुन्शी यांचे प्रयत्न सुरूच राहिले. त्याबद्दलची चर्चा कानावर आल्यानंतर गांधीजींनी सरदार पटेल यांच्याकडे पत्राद्वारे चौकशी केली असता सरदार पटेल यांनी ‘मी हयात असेपर्यंत कोणत्याही मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून निधी दिला जाणार नाही’, असं गांधीजींना कळवलं होतं. पुढे सौराष्ट्र सरकारने सोमनाथ मंदिरासाठी पाच लाख रुपयांचा निधी दिला. सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू या दोघांनाही ते मान्य नव्हतं. त्याबाबत दोघांनीही नाराजी व्यक्त केली होती. मंदिराची उभारणी पूर्ण होण्याआधीच वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं.

नेहरूंचा विरोध नेमका कशाला?

सरकारने पुढाकार घेऊन मंदिर उभारणी करण्याला नेहरूंचा विरोध होता. २० जुलै १९५० रोजी कन्हय्यालाल मुन्शींना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘सरकार म्हणून आपण मंदिर उभारणी करता कामा नये. एकदा तशी सुरुवात झाली की सगळेच धर्म आपल्याकडे तशी मागणी करू लागतील. तसंच सध्याची देशाची आर्थिक परिस्थिती आणि राहण्यायोग्य घरांची टंचाई पाहता मंदिरासाठी एवढा मोठा प्रकल्प राबवणं मला अगदीच अप्रस्तुत वाटतं.’ अर्थात नेहरूंचं मत असं असलं तरी मंदिर उभारण्यात त्यांनी आडकाठी आणली नाही.

somnath temple conflict

राजेंद्र प्रसादांच्या उपस्थितीत उद्घाटन

पुढे मंदिर उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनप्रसंगी कन्हय्यालाल मुन्शी, तसंच नवानगरच्या जामसाहेबांनी (दिग्विजयसिंग जडेजा) राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. राजेंद्र प्रसाद यांनी पं. नेहरूंना पत्र लिहून कार्यक्रमाला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि जावं का, अशी विचारणा केली होती. त्यावर नेहरूंनी सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे जाणं आपल्याला पटत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण तुम्ही शब्द दिला असेल तर तुम्ही जा, असंही ते नंतर म्हणाले होते. ११ मे १९५१ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला राजेंद्र प्रसाद उपस्थित राहिले होते.

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Kavita Amol Pawar10.01.26
आजमितीला जे चालू आहे त्याच्या किती विरुद्ध चित्र आहे हे.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results