आम्ही कोण?
लेखमालिका : स्मार्ट‘फोनी'करणाच्या नोंदी

आ व्हेल, मुझे मार!

  • गौरी कानेटकर
  • 17.04.26
  • वाचनवेळ 3 मि.
smartphones

ब्ल्यू व्हेल नावाच्या कुठल्याशा मोबाइल गेमच्या जाळ्यात अडकून मुंबईतल्या एका मुलाने आत्महत्या केली. दुसरा एक मुलगा मोबाइलवर गेम (बहुतेक ब्ल्यू व्हेलच) खेळता खेळता ‘चुकून' एका बसमध्ये बसून भलत्याच गावाला जायला निघाला होता. कँडी क्रश गेम खेळण्याचं व्यसन लागल्याने एका बाईचं झोपेचं,जेवण्या-खाण्याचं, पोटाच्या भुकेचं भान हरपलं आणि शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

खरं तर मोबाइलग्रस्तांच्या अशा घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. मग त्याबद्दल नव्याने कशाला बोलायचं? मुद्दा फक्त अशा व्यसनाधीनांचा नाही. त्या बिचाऱ्यांना जेव्हा आपण व्यसनात गुरफटलोय याचा शोध लागत असेल तेव्हा कधी ना कधी उपचारांच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होत असेल किंवा दुर्दैवाने त्याआधी संपतही असेल.. पण कोणत्या ना कोणत्या विळख्यात अडकू इच्छिणाऱ्यांचा एक मोठा जथ्था ‘आ व्हेल मुझे मार' म्हणत धावतो आहे त्याचं काय? हे असं धावण्यामागचं कारण काय असावं? आपल्या आयुष्यात अशी कोणती पोकळी आहे जी आपल्याला आपलं शांत-सुरळीत आयुष्य सोडून या मोबाइल नावाच्या व्हेलला फशी पडण्यासाठी प्रवृत्त करते आहे?

हेही वाचा - भारतात ऑनलाईन गेमिंगचं भविष्य काय ?

प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक मार्ग असतो, घर असतं, नोकरी-धंदा असतो. काही स्वप्नं असतात, काही महत्त्वाकांक्षा असतात. आणि या सगळ्यातून आनंदाचे छोटे छोटे क्षण मिळवण्यासाठीही माणूस वेळ काढत असतो. कधी छंदांमधून, कधी स्वतःपलीकडच्या कामात रमून, तर कधी आणखी कशातून.. या सगळ्या चक्रातून जात असताना माणसं मोबाइल गेम्ससारख्या विरंगुळ्याकडे का वळतात? या सगळ्याचा ताण घालवण्यासाठी? की जगण्याला हेतूच नसल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी? एकदा का मोबाइल हातात घेतला की वास्तवातल्या चिंतांशी फारकत घेऊन समाधिअवस्था अनुभवायलाच सुरुवात होते की!

अर्थात आपण जे काही करतो त्यामागचं एक कारण आपल्या आसपासचं जग तसं करतं हे असतंच. पीअर प्रेशर ही गोष्ट केवळ शाळकरी मुलांनाच नव्हे, तर साठी-सत्तरीतल्या आजी-आजोबांनाही खाऊन टाकणारी ठरते. जशी एखादी फॅशन येऊन धडकली की प्रत्येक माणूस त्या फॅशनशी सुसंगत (म्हणजे थोडक्यात बँडवालेच की!) दिसायला धडपडू लागतो, तसंच हेही. आसपासचे लोक फार्मव्हिले खेळायला लागले की आपण फार्मव्हिले खेळतो. लोक कँडी क्रशकडे वळले की तो गेम खेळून बघतो. आज हा, उद्या आणखी कुठला. आपण हे करावं का, आपल्याला तेवढा वेळ आहे का, यापेक्षा अधिक चांगलं काही करता येण्याजोगं नाही का, वगैरे प्रश्न पडण्याआधी आपल्या वेळेचा आणि नंतर आपलाही त्या गेमने ताबा घेतलेला असतो. या वर्तनाला व्यसनोत्सुक नाही तर काय म्हणणार?

हेही वाचा - फॅन्टसी स्पोर्ट्स : करोडपती होण्याचे फसवे ‘ड्रीम’ ?

माणसांच्या सोशलायझेशनचे संदर्भबिंदू व्हॉट्सॅपचे जोक्स, मोबाइल गेम्स आणि फेसबुक अपडेट्स असू लागले की याहून वेगळं काय घडणार?

(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results