आम्ही कोण?
ले 

डिजिपिन : तुमचा नवा डिजिटल पत्ता

  • नीलेश बने
  • 01.07.25
  • वाचनवेळ 3 मि.
nilesh bane digipin header

समजा तुम्हाला युनिक फीचर्सला एखादं पत्र पाठवायचं असेल किंवा एखादं कुरियर करायचं असेल तर तुम्हाला ते ८, अमित कॉम्प्लेक्स, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे ३० या पत्त्यावर पाठवावं लागेल. पण आता एवढा मोठा पत्ता लिहायची गरजच नाही. तुम्ही फक्त युनिक फीचर्स, डिजिपिन- 4FP-494-FL84 एवढं लिहिलंत तरीही ते पत्र सहज मिळून जाईल. काय आहे हे डिजिपिन? त्याचा उपयोग काय?

भारत स्वतंत्र झाला, पुढे तो प्रजासत्ताक झाला तेव्हाही भारतात पत्र पाठवण्यासाठी पिनकोड नावाची व्यवस्थाच नव्हती, हे ऐकून आपल्यातील अनेकांना आश्चर्य वाटेल. पण १९७२ मध्ये श्रीराम भिकाजी वेलणकर या मराठी माणसाने देशाला पिनकोड नावाची व्यवस्था दिली. आज हा पिनकोड आपल्या पत्त्त्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याकाळी पत्रावर लिहिलेलं अक्षर वाचता येत नसल्याने पत्रे नीट पोहचत नसत, म्हणून ही व्यवस्था जन्माला आली होती. पण आता या पिनकोडचं अधिक अचूक डिजिटल व्हर्जन म्हणजे डिजिपिन अस्तित्वात आलाय.

या नव्या डिजिपिनची गरज का पडली? याचं कारण पुन्हा पिनकोडप्रमाणेच आहे. पूर्वी पिनकोड नव्हता तेव्हा थेट शहराचं किंवा गावाचं नाव शेवटी लिहून पत्र पाठवलं जायचं. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अशी अनेक पत्रे गुगलवर उपलब्ध आहेत. पण शहर, त्यातील भाग हा खूप मोठा भूप्रदेश असायचा. त्यात निश्चित पत्ता शोधणं अवघड जायचं. त्यामुळे पिनकोड हा प्रत्येक भागातील पोस्ट ऑफिसचा युनिक नंबर ठरला. त्यामुळे ते पत्र त्या पोस्ट ऑफिसपर्यंत तरी सहज पोहचायचं.

आज शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे एका पिनकोडमध्ये बराच मोठा भूभाग येतो. त्यामुळे पत्त्यातील इतर खाणाखुणा बारकाईने लिहाव्या लागतात. दुसरीकडे जीपीएसमुळे आज फक्त एका क्लिकवर अचूक ठिकाणी पोहोचता येणं शक्य आहे. त्यामुळेच पोस्ट विभागाने जीपीएसचा उपयोग करून घेत डिजिपिन ही नवी व्यवस्था लोकांपुढे आणली आहे. भारतीय टपाल विभागाने IIT हैदराबाद आणि ISRO च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) यांच्या सहकार्याने ही यंत्रणा विकसित केली आहे.

या डिजिपिनसाठी संपूर्ण देशाची चार चौरस मीटरच्या तुकड्यात विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक तुकड्याला एक युनिक असा अल्फान्युमरिक (अक्षरे आणि अंकांनी मिळून बनलेला) क्रमांक दिला गेलाय. चार चौरस मीटर म्हणजे अगदी कोणत्याही इमारतीची अचूक जागा एका क्रमांकावर सापडू शकते. त्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्याचा डिजिपिन माहिती असेल, तर तिथे (प्रत्यक्ष किंवा पत्र) पोहचणं शक्य होणार आहे.

ही सुविधा फक्त पोस्टासाठी किंवा कुरियर कंपन्यांसाठी फायद्याची ठरेल असं नाही. तर आपत्कालीन व्यवस्था, भाषेची समस्या आणि डिजिटलायझेशनसाठीही ही यंत्रणा फायद्याची ठरणार आहे. उदाहरणार्थ रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला दिलेल्या डिजिपिनच्या जागी अचूक पोहचता येईल. दुसरं म्हणजे एखाद्या डिजिपिनवर आज काय आहे, याआधी काय होतं याचा डेटा तयार होईल. तसंच प्रत्येक जागेसाठी एक युनिक नंबर असल्याने त्याचं हस्तांतरण कसं झालंय, हेही भविष्यात शोधता येईल.

ग्रामीण भागात जिथे पत्ता शोधणं हे आजही जिकरीचं काम आहे, तिथे हा डिजिपिन खूप मदत करू शकेल. तसंच ऑफलाइन पद्धतीनेही हा डिजिपिन वापरता येत असल्याने, ज्या भागात रेंज नाही किंवा अगदी दुर्गम भागातही या यंत्रणेमुळे अचूक पोहचणं शक्य होईल. जिथे आज काहीही नाही, अशा रिकाम्या जागांचाही एक डिजिपिन असेल त्यामुळे तिथे काही सुविधा पोहचवायची असेल, तर तेही या यंत्रणेमुळे शक्य होईल. तसंच यात कोणाचंही नाव किंवा अन्य माहिती नसल्याने गोपनीयताही पाळली जाईल.

आता आपल्या पत्त्याचा डिजिपिन कसा शोधायचा हे समजून घेऊ. तुम्हाला फक्त https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या साइटवर जाऊन, तिथल्या नकाशावर तुमचा पत्ता शोधायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या पत्त्याचे अक्षांश, रेखांश माहिती असतील (जे गुगल मॅप वापरून आपल्याला सहज शोधता येतात) तर ते टाकूनही आपल्याला आपला अचूक डिजिपिन मिळू शकतो. तुमचा हा डिजिपिन बरोबर आहे का, तेही तुम्ही याच साइटवर तपासून घेऊ शकता.

आज जीपीएसमुळे आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अनेक सुविधांमुळे अचूक पत्ता शोधणं अवघड उरलेलं नाही. पण या डिजटल व्यवस्थेला एका युनिक क्रमांकाशी जोडून भारतानं ऑफलाइन व्यवहारातही अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशातील लाखो लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. शेवटी डेटा ही एकविसाव्या शतकातील शक्ती आहे. ती समजून घेतली तर अचूक ठिकाणी पोहचणं अवघड नाही.

नीलेश बने | neeleshbane@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

विकास 02.07.25
Multy storied च्या फ्लैट्स che काय ?

सुहास वसंतराव पाटील 02.07.25
खूपच उपयुक्त माहिती अगदी सहज समजेल अशा शब्दांत मांडली आहे.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results