आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

सोशल मीडियाचा कार्बन फुटप्रिंट

  • मेघश्री दळवी
  • 28.07.25
  • वाचनवेळ 3 मि.
meghashree part seven

सोशल मीडिया ही आजच्या जगातली एक सर्वव्यापी गोष्ट आहे. त्याचे फायदे आहेत तसेच तोटेही. पण या सुसाट गाडीला रोखणं आता जवळजवळ अशक्य आहे.

ट्विट्स, मीम्स, रील्स या सगळ्या गदारोळात सोशल मीडियामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं का, याकडे लक्ष जात नाही. ‘पेपरलेस' म्हणून डिजिटल तंत्रज्ञानाचं कौतुक होतं, पण त्यानेही पर्यावरणावर भार येतो. आपण वापरलेली मोबाइलसारखी साधनं किंचित तापतात आणि वातावरणात उष्णता फेकतात. डिजिटल सिग्नल्स वाहून नेताना वीज खर्च होते. सोशल मीडियावरचे सगळे संवाद, फाइल्स, फोटो, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स साठवून ठेवण्यात किती तरी ऊर्जा लागते. गुगल ड्राइव्ह, क्लाऊड असा उल्लेख होत असला तरी या साऱ्या डेटा सेंटर्ससाठी जमिनीवर जागा लागते. निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शीतकरण लागतं. त्याचं नियंत्रण करणारी यंत्रणा, तिचं स्वत:चं कार्बन उत्सर्जन, देखरेख करणारी माणसं, अशी संसाधन वापराची साखळी वाढत जाते.

सोशल मीडियाच्या वापरामुळे किती कार्बन वातावरणात सोडला जातो याचं, म्हणजे त्याच्या कार्बन फुटप्रिंटचं मोजमाप नियमितपणे होतं. २०२२ मधल्या एका अभ्यासानुसार सोशल मीडियाच्या १० प्लॅटफॉर्म्सपैकी प्रत्येक प्लॅटफॉर्म प्रत्येक दिवशी पाच मिनिटं वापरल्यास वर्षाला माणशी २० किलो कार्बन वातावरणात सोडला जातो. जगात अंदाजे साडेचार अब्ज माणसं सोशल मीडिया वापरतात, असा एका पाहणीचा अंदाज आहे. म्हणजे दरवर्षी ९० अब्ज किलो कार्बन झाला. अर्थात आपण दिवसाला फक्त ५० मिनिटं सोशल मीडिया वापरत नाही. दुसऱ्या एका अभ्यासानुसार हा आकडा सरासरी अडीच तास आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा कार्बन फुटप्रिंट किती तरी जास्त असेल. पर्यावरणाची एवढी हानी करून आपण कोणत्या दर्जाची माहिती कशासाठी इकडून तिकडे पाठवतो, विनाकारण परत परत प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये साठवतो, हा प्रश्न आहेच. सध्या जगावर ऊर्जेच्या संकटाची टांगती तलवार आहे. त्यामुळे ‘कॉप’ सारख्या परिषदांमध्ये ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात सोशल मीडियाचा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यावाचून गत्यंतर नाही.

त्यासाठी तंत्रज्ञान काय मदत करेल हे बघता येईल. ठराविक काळ स्क्रीन वापरून झाला की स्क्रीन आपोआप बंद करणारी ॲप्स उपलब्ध आहेत. सोशल मीडियासाठी बहुतांशी मोबाइल किंवा टॅबचा वापर होतो. त्यांचे उत्पादक साधनांचं तापमान नियंत्रित करण्यासाठी झटत आहेत. त्यांचा विजेचा वापरदेखील कमीत कमी व्हावा, बॅटरी कार्यक्षम असावी यासाठी संशोधन सुरू आहे. सौर ऊर्जेचा वापर थेट चार्जिंगसाठी करता आला तर कार्बन फुटप्रिंट आणखी घटवता येईल.

दुसरीकडे सोशल मीडिया सेवा देणारं तंत्रज्ञान अधिक पर्यावरणस्नेही करायचे प्रयत्न सुरू आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे डेटा सेंटर्समधल्या शीतकरण व्यवस्थेसाठी सर्वांत जास्त ऊर्जा लागते. मायक्रोसॉफ्टने २०१८ साली समुद्रात खोलवर डेटा सेंटर ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला. चहुबाजूला पाणी असल्याने तिथे तापमान नियंत्रणासाठी ३० टक्के कमी ऊर्जा लागली. त्यामुळे बरीचशी डेटा सेंटर्स वॉटरप्रूफ करून समुद्रात उभारता येतील. जवळ तरंगते सौर फार्म्स असतील तर डेटा सेंटर्स सौर ऊर्जा वापरतील.

इंटरनेट उपलब्ध झाल्यापासून लहानथोर त्याचा मनसोक्त वापर करत आहेत. भारतातल्या गुडमॉर्निंग व्हॉट्सॲप मेसेजेमुळे इंटरनेट संथ होत चालल्याचा एक अहवाल काही वर्षांपूर्वी आला होता. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा किती कार्यक्षम आहेत याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. एकूणच, इंटरनेटच्या इन्फ्रास्ट्रक्चरची पर्यावरणीय दृष्टीने ऑडिट करण्याची वेळ आली आहे. त्यातून काही तोडगे निघू शकतील. यंत्रणा कार्यक्षम करून कार्बन फुटप्रिंट थोडा घटवता येईल.

पण हे सारे मार्ग पुरे पडले नाहीत तर सोशल मीडियावर कडक निर्बंध येऊ शकतात. त्यातून येणारा डेटा साठवून ठेवण्यावर मर्यादा येऊ शकतात. कदाचित व्हिडिओ स्ट्रीमिंगवरही बंधनं येतील. या सगळ्या उपायांनी सोशल मीडियाचा कार्बन फुटप्रिंट कमी होईल का? याचं उत्तर देणं कठीण असलं तरी त्यासाठी प्रयत्न करणं बरंचसं आपल्याच हातात आहे.


मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Sunil29.07.25
खरंय... फार मोठा प्रॉब्लेम आहे हा.. व्हॉट्सॲप वर गुड मॉर्निंग, देव देवता, धार्मिक उत्सव, आरोग्य सल्ले याबाबत मेसेजेस पाठविणाऱ्यांवर 28 टक्के जीसटी लावला तर काही तरी फरक पडेल. मेडिकल एमर्जेन्सी, रोटी रोजी आणि इतर आवश्यक मेसेजेस साठी करातून सवलत द्यावी.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results