
एखाद्या देशातली लोकशाही किती प्रगल्भ आहे ते तपासण्याचे अनेक निकष आहेत. वेळच्या वेळी आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या जातात का, समाजातली विविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकशाहीचे विविध स्तंभ कटिबद्ध आहेत का, किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कितपत आहे, अशा काही निकषांच्या साहाय्याने लोकशाहीचं स्वरूप जोखता येतं. लोक आपल्या देशावर आणि सरकारवर जाहीरपणे टीका करू शकतात का, हा एखाद्या समाजातलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य जोखण्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थेवर टीका वेगवेगळ्या प्रकारे करता येते. केस थोडे अधिक पांढरे झालेल्या बुद्धिवादी वर्गाने जगावर एखादं गंभीर संकट कोसळल्यासारखा चेहरा करून, चष्मा लावून आणि शक्य झालं तर दाढीही वाढवून परिस्थितीचं परखड विश्लेषण केलं तर ते विद्यापीठं, चर्चासत्रं, संमेलनं वगैरे ठिकाणी ऐकलं जातं. वर्तमानपत्रं, टीव्ही वाहिन्या वगैरे ठिकाणीही अशा लोकांना ‘प्राइम टाइम डिबेट'मध्ये बोलावणी येतात. मग त्यांची टीका अगदी सरकारविरोधी जरी असली तरीही प्रगल्भ लोकशाहीच्या नावाखाली ती बऱ्याचदा सहनही केली जाते. अर्थात, अशा गंभीर चर्चांना लाभणारा श्रोता-प्रेक्षकवर्गही तसा मर्यादितच असतो. कारण जनसामान्यांना अशा चर्चा रटाळ आणि डोक्यावरून जाणाऱ्या वाटण्याचीच शक्यता अधिक असते. याउलट, सूर्याखालची कोणतीच गोष्ट पवित्र न मानणारा, सभ्यतेचे निकष लावले तर खूप खालच्या पातळीवरचा ठरेल इतका ग्राम्य, प्रसंगी तुच्छतावादाकडे (सिनिसिझम) झुकेल इतपत जळजळीत विनोद करण्याचं धाडस जर लोकशाहीत कुणी दाखवलं, तर परिस्थितीने पिडलेला सामान्य माणूस चार घटका करमणुकीसाठी तरी विशेष चव घेत ते चघळेल अशी शक्यता वाढते. विखारी वाटू शकेल अशा कमरेखालच्या विनोदाद्वारे सामाजिक-राजकीय टीका कुणी जाहीरपणे करतं का, आणि केली तर लोकांकडून आणि सरकारकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहिलं, तर कधी कधी देशातल्या लोकशाहीच्या मर्यादा अधिक नेमकेपणाने समजून घेता येतात ते त्यामुळेच. पाश्चात्त्य लोकशाहीमध्ये असं स्वातंत्र्य पुरेपूर घेतलं जातं. अगदी राष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे अशा प्रात:स्मरणीय व्यक्तींपासून ते सध्याच्या राष्ट्रप्रमुखांपर्यंत किंवा धर्मगुरूंपर्यंत कुणीही त्यातून सुटत नाही. असे विनोद करण्याची आणि स्वत:वर केलेले असे विनोद झेलण्याची संस्कृती जर एखाद्या देशात रुजली असेल तर ते सुदृढ लोकशाहीचं एक लक्षण आहे. आपल्याकडची परिस्थिती पाहिली तर असं दिसतं, की खासगीत बोलताना सामान्य माणसं आपली विनोदबुद्धी चौखूर उधळतात आणि त्यासाठी सभ्यतेचे निकषही सहज सोडून देतात. पूर्वी सांगोवांगीतून पसरणारे असे विनोद आजकाल व्हॉट्सॲप-फेसबुक-ट्विटरवरूनही व्हायरल होत असतात. अर्थात, बऱ्याचदा असंही दिसतं, की जी बाजू आपल्याला आवडत नाही, केवळ त्याच बाजूवर लक्ष्य साधणारे विनोद लोक शेअर करत राहतात. आपल्याकडचं राजकीय संभाषित (पॉलिटिकल डिस्कोर्स) पाहिलं तर मात्र असं जाणवतं, की जे लोक खासगीत किंवा जाहीरपणे विरोधी बाजूबद्दल जहाल शेरेबाजी करत असतात ते स्वत:च जेव्हा अशा विखारीपणाचे लक्ष्य होतात तेव्हा मात्र ते एवढ्या-तेवढ्याशा कारणावरून आपल्या भावना भडकवून घेतात आणि तत्परतेने त्याचं भांडवल करतात. राजकीय भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रकारांना त्रास देण्याचे काही प्रकार आपल्याकडे अगदी अलीकडेच घडून गेले आहेत. किंवा, ‘ऑल इंडिया बॅकचोद' या (नावापासूनच आपल्या सभ्यपणाची जाहिरात करणाऱ्या) कार्यक्रमालाही महाराष्ट्र सरकारच्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं होतं.
सध्याच्या ह्या परिस्थितीत विनोदातून भारतावर आणि भारतीयांवर सडेतोड टीका करणारा एक नवा कार्यक्रम अलीकडे चर्चेत येऊ लागला आहे. आपल्या लोकशाहीच्या नावाने बोंबा ठोकण्याचं त्याचं उद्दिष्ट ‘ऐसी तैसी डेमोक्रसी' (ऐतैडे) या कार्यक्रमाच्या नावातूनच स्पष्ट जाणवतं. ‘स्टॅन्ड-अप कॉमेडी' आणि अधूनमधून काही गाणी, अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम रंगमंचावर सादर केला जातो. रीतसर तिकिटं लावून भारताच्या विविध महानगरांत आणि अगदी दुबईसारख्या पुष्कळ भारतीय रहिवासी असलेल्या परदेशी शहरांतही त्याचे खेळ होतात. विशी ते चाळिशीत मोडणाऱ्या नागर उच्चमध्यमवर्गीयांत तो हळूहळू लोकप्रिय होतो आहे. शिवाय, सध्याच्या पद्धतीनुसार यूट्यूबवर त्यातले काही भाग पाहता येतात. फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडियामधूनही सातत्याने ताज्या घडामोडींवर तिखट पोस्ट्स टाकून कार्यक्रम ख्यातकीर्त होतो आहे. उदाहरणार्थ, एफटीआयआय किंवा जेएनयूसारख्या ‘देशद्रोही' संस्था करदात्यांच्या पैशांवर चालतात ह्याविषयीची तक्रार करणं समाजातल्या एका गटात सध्या फॅशनेबल झालेलं दिसतं. त्याउलट, सरकारने कोणत्या गोष्टींवर पैसा खर्च करायला हवा याविषयीच्या ह्या गटाच्या मतांबद्दल विरोधी गटाला आक्षेप असतात. नव्या आर्थिक वर्षासाठीच्या बजेट सादरीकरणाचा मुहूर्त साधून ‘ऐतैडे'ने ह्या प्रश्नावरची आपली खुसखुशीत टिप्पणी सोशल मीडियावर सोडून दिली आणि लगोलग ती व्हायरलही झाली. इन्कमटॅक्स रिटर्न भरताना करदात्याला जो फॉर्म-१६ सादर करावा लागतो त्यात काही नवे रकाने टाकलेला हा फॉर्म होता. आपण भरत असलेल्या कराचा सरकारने कसा विनियोग करावा हे सांगण्याची मुभा त्यात करदात्याला दिलेली आहे. त्यातले उपलब्ध पर्याय असे आहेत :
१. जेएनयू, एफटीआयआय
२. आयआयटी, आयआयएम
३. विजय मल्ल्याच्या सुटकेखातर
४. अंबानी, अडानींना सवलती
५. महान पण मृत व्यक्तींचे पुतळे
६. महान पण जिवंत व्यक्तींचे पुतळे
७. चांगली लघुरूपे (ॲक्रोनीम) घडवण्यासाठी
८. वकिलांच्या शिक्षणासाठी
९. पहलाज निहलानींच्या व्हिडिओंसाठी
एकाच दगडातून त्यांनी किती पक्षी मारले आहेत ते ताज्या घडामोडींमध्ये रस घेणाऱ्या कुणालाही सहज कळेल. किंवा, कार्यक्रमाच्या शीर्षकगीतातच ‘भारत माता की जय'सारख्या सदाहरित वादांचा संदर्भ आहे-
डेमोक्रसी माता तेरी सदा ही जय हो!
साँप के मुँह में छछुंदर जैसी
निगली जाये न उगली जाये
ऐसी तैसी डेमोक्रसी!
मंचावर सादर होणाऱ्या ‘ऐतैडे'च्या कार्यक्रमात तिघंजण भाग घेतात. त्यांपैकी राहुल राम हा पन्नाशीतला आहे. गटातला वयाने सगळ्यात ज्येष्ठ असणारा राहुल भारतीय रॉक संगीताच्या रसिकांना सुपरिचित आहे. ‘इंडियन ओशन' नावाच्या विख्यात रॉक गटात तो १९९१ पासून गिटारवादक आहे. ‘लॅक फ्रायडे' आणि ‘गुलाल'सारख्या काही नावाजलेल्या चित्रपटांमध्ये वादक, गायक किंवा संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्याने नाव कमावलेलं आहे. शिवाय, त्याच्याकडे पर्यावरणातली पीएच.डी. आहे आणि १९९०-९५ या काळात तो ‘नर्मदा बचाओ आंदोलना'त सक्रिय होता. ‘ऐतैडे'चा दुसरा सदस्य वरुण ग्रोव्हर अद्याप तिशीत आहे. मूळचा आयआयटी इंजिनियर असलेला वरुण ‘गँग्ज ऑफ वासेपूर' आणि ‘आँखों देखी'सारख्या कल्ट चित्रपटांचा गीतकार आणि ‘ मसान'चा पटकथाकार म्हणून समकालीन हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना परिचित आहे. ‘दम लगा के हैशा'चा गीतकार म्हणून त्याला नुकताच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. गटाचा तिसरा सदस्य संजय राजौरा (ऊर्फ ‘अर्बन टुच्चा') चाळिशीतला आहे. उत्तर प्रदेशातल्या एका लहान गावामध्ये शेतकरी कुटुंबात वाढलेला संजय नंतर सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. बुलंदशहर ते सॅन फ्रान्सिस्को व्हाया दिल्ली फिरून आल्यामुळे कदाचित त्याला शहरी आणि ग्रामीण भारतातल्या विसंगती स्पष्ट दिसतात. ह्याच विसंगती मग त्याच्या विनोदांसाठी कच्चा माल पुरवतात.
विनोद करायला ह्या त्रिकुटाला पाहिजेत तितके विषय मिळतील अशीच सध्याची परिस्थिती आहे. मात्र, एका विषयाचा समाचार घेताना इतर विषयांवरही हात धुऊन घेण्यात त्यांची हातोटी आहे. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे ही कादंबरी त्यातल्या बोल्ड वर्णनांमुळे आपल्याकडे चांगलीच लोकप्रिय झाली, पण कादंबरीवर बेतलेल्या चित्रपटावर पहलाज निहलानींच्या सेन्सॉर बोर्डाने इतकी कात्री चालवली की चित्रपट आपल्याकडे प्रदर्शितच होऊ शकला नाही. ‘ऐतैडे'मधली त्यावरची टिप्पणी : ‘ह्या चित्रपटातला सेक्सच जर काढून टाकला तर शिल्लक काय उरणार? हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे, की ‘सोनिया गांधींचं आडनावच काढून टाका!' किंवा फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेमधून सेक्स काढून टाकल्यानंतर तो भारतात प्रदर्शित झालासुद्धा. फक्त नाव बदलून. नाव होतं- ‘प्रेम रतन धन पायो!'
आजकाल आपल्याकडे ‘फादर्स डे'सारखे दिवस साजरे करण्याची फॅशन आहे. त्यावर ‘ऐतैडे' म्हणतात : ‘ज्याला बघावं तो सोशल मीडियावर टाकतोय, हॅविंग बेस्ट डिनर विथ द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड. अरे मूर्खांनो, तुमच्या बापाला जर तुम्ही बेस्ट डॅड म्हणताय तर तुलनेसाठी तुमचा सॅम्पल साइझ' नक्की काय आहे? किती बाप आहेत तुम्हाला? आणि तुम्हा सगळ्यांचेच बाप जर बेस्ट असतील, तर इथे आपल्या देशाची जे मारतायत ते नक्की कोणाचे बाप आहेत?'
भारतीय संस्कृतीतल्या अनेक कालबाह्य परंपरांवर ते सणसणीत टीका करतात. उदाहरणार्थ, ‘वंश पुढे चालला पाहिजे' असा हट्ट जेव्हा पालक आपल्या मुलांपाशी करतात तेव्हा ‘मुलंच तुमची म्हातारपणची काठी असतात' असा दावा केला जातो. त्यावर ‘ऐतैडे'ची टिप्पणी : भारतीय आई-बाप मुलं कसली जन्माला घालतात, ते तर म्युच्युअल फंड जन्माला घालतात. किंवा, मी कुणी चंद्रगुप्त मौर्य थोडाच आहे की माझा वंश पुढे चालायला हवा?' कदाचित हे पुरेसं वाटलं नाही म्हणून मग पुढे ‘वंश चालावा म्हणून राजीव गांधींनी दिला ना मुलाला जन्म, पण काय दिवा जन्माला घातला ते सगळ्या जगाला दिसतंय', असं म्हणत नेहरू-गांधी घराण्याच्या भकासभीषण भविष्यावरही ते घसरतात आणि प्रेक्षागृह गडाबडा लोळतं.
एकंदरीत, राजकारण्यांवर (आणि त्यातही पंतप्रधानांवर) टीका करताना तर त्यांचा उत्साह दुथडी भरून वाहू लागतो. नुकत्याच झालेल्या मोदींच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्याचा एक फोटो कुणी तरी फोटोशॉप करून सोशल मीडियावर टाकला होता. त्यामुळे मोदींची बदनामी होते असा दावा करत भाजपने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली. त्यावर ऐतैडे : ‘हां, बरोबरच आहे. पंतप्रधानांना फोटोशॉप करून सोशल मीडियावर टाकण्याचा हक्क फक्त पीआयबीलाच आहे ना!' (चेन्नईतल्या पुरादरम्यान पंतप्रधान विमानातून पुराची पाहणी करत आहेत असा एक फोटोशॉप फोटो खुद्द ‘प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो'नेच त्यांच्या अधिकृत ट्विटर पानावर टाकला होता आणि त्यावर गदारोळ होताच काढून टाकला होता, त्याचा संदर्भ ह्याला आहे.)
त्यांच्या या चौफेर माऱ्यातून कोणताही राजकीय पक्ष सुटत नाही. यमुनेच्या तीरावर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे नुकत्याच भरवलेल्या सांस्कृतिक मेळ्यावर पर्यावरणवाद्यांनी टीका केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मेळ्याला भेट दिली होती. ह्यावर ऐतैडे'ने म्हटलं, ‘केजरीवाल केवळ दिल्लीतल्या मोटारींसाठी आपला ‘ऑड-इव्हन' फॉर्म्युला वापरतात असं नव्हे; त्यांचं व्यक्तिमत्त्वच ऑड-इव्हन आहे. ऑड तारखेला ते पर्यावरणप्रेमी असतात आणि इव्हन तारखेला ते यमुनेला दूषित करणाऱ्यांना पाठिंबा देतात.'
विनोद जहाल करण्यासाठी खालची पातळी गाठायचा दांडगा उत्साह त्यांच्याकडे आहे. प्रसंगी त्यासाठी एखाद्याच्या शारीरिक व्यंगालाही लक्ष्य केलं जातं. ‘ट्रिपल तलाकच्या परंपरेचा कोणताही पुनर्विचार केला जाणार नाही', असं वक्तव्य नुकतंच ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड'ने केलं होतं. त्या बातमीसोबत एका वेबसाइटवर काही मुल्लामौलवींचा मानेला पट्टा लावलेला फोटो होता. ‘ऐतैडे'ने हा फोटो रीट्विट करताना सोबत असा मथळा दिला : ‘चचांना आपली मानही धड पेलवत नाहीए, मग सगळ्या इस्लामची जबाबदारी कशी काय पेलवणारे?'
हे कमरेखालचे वार काहींना कदाचित अश्लाघ्य वाटतील, पण अशा झणझणीत औद्धत्याद्वारेच ते तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहेत. ‘ऑल इंडिया बॅकचोद'च्या कार्यक्रमांतली ‘फक' वगैरे शब्दांची पखरण पाहता त्यांना असांसदीय शब्दांचं पराकोटीचं आकर्षण आहे असं वाटतं. ‘ऐतैडे'ला ‘चुतियापा'सारख्या रांगड्या शब्दांचं वावडं अजिबात नाही, पण ते त्याचा मर्यादित आणि नेमका वापर करतात. अर्थात, सोशल मीडियावर असे जहाल विनोद करणारे ते एकटे नाहीत. ‘ड्रंक विनोद मेहता', अनऑफिशियल सुब्रह्मण्यम स्वामी' अशा अनेक माध्यमांतूनही ते होत असतात. पण बऱ्याचदा असं दिसतं की एका विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या विरोधातलेच विनोद तिथे चालतात. ‘ऐतैडे'च्या टारगट प्रॅक्टिससाठी मात्र कुणीच पवित्र नाही. सध्या डाव्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला कन्हैयाकुमारही त्यांच्या माऱ्यातून सुटत नाही.
‘ऐतैडे'ची भाषा हिंग्लिश आहे. गटाचे सदस्य उच्चशिक्षित आहेत. त्यांचा प्रेक्षकवर्गही शहरी, तरुण, उच्चपदस्थ आणि उच्चवर्गीय आहे. १९९०च्या दशकात जे आर्थिक उदारीकरण झालं त्यामुळे भारतात अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या. उत्तम इंग्रजी येणाऱ्या शहरी उच्चशिक्षित वर्गाला ह्या संधींचा सर्वाधिक फायदा मिळाला. पूर्वीचा मध्यमवर्ग त्यांद्वारे उच्च आर्थिक वर्गात पोहोचला. नव्या युगातल्या ह्या नवश्रीमंतांचा वेश आणि एकंदर बाह्यरूप स्मार्ट झालं खरं, पण ते आणि त्यांचा सांस्कृतिक परिसर अद्यापही पारंपरिक विचारांपासून पूर्णपणे फारकत घेऊ शकलेला नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती, जातपात-पत्रिका-मुलगी वगैरे रीतसर पाहून आईवडिलांच्या पसंतीने ठरवून केलेली लग्नं, वंशाच्या दिव्यासाठीचा आग्रह, अशा एकोणिसाव्या शतकातल्या गोष्टी त्यांच्या परिसरात एकविसाव्या शतकातही आहेत. त्याविषयीची त्यांची स्थिती ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी असते. कारण परंपरेचा त्रास तर होतो, पण त्याविरुद्ध उघड बंड पुकारण्याची त्यांची हिंमत नसते आणि इच्छाही तितकीशी प्रबळ नसते. कारण पारंपरिक व्यवस्थेचे फायदेही त्यांना व्यवस्थित उपटायचे असतात. मात्र, अशा कारणांमुळेच ‘ऐतैडे'च्या विनोदांना ह्या प्रेक्षकवर्गाकडून आणि सोशल मीडियामधूनही मनापासून दाद मिळते.
जागतिकीकरणानंतरच्या जगात वाढल्यामुळे जगभरातल्या, किंवा खरं सांगायचं तर अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव ह्या तरुणांवर पडलेला असतो. त्यामुळे स्टॅन्ड-अप कॉमेडी आणि अधूनमधून गिटार वाजवत गायलेली गाणीबिणी हा प्रकार त्यांना आवडतो. खरं तर नौटंकी, वग किंवा तत्सम पारंपरिक माध्यमांमधून केलेली बोचरी राजकीय प्रहसनं आणि ग्राम्य विनोदाचा हात धरून केलेली प्रखर सामाजिक टीका भारतीयांना नवीन नाही. पण इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या आणि कॉस्मॉपॉलिटन महानगरांतून वाढलेल्या ह्या प्रेक्षकवर्गाचा त्या लोकपरंपरांशी दूरान्वयानेही संबंध असेल असं त्यांच्याकडे पाहून वाटत नाही. भारतातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि सांस्कृतिक दांभिकतेवर हा वर्ग चिडलेला मात्र असतो. कारण प्रगत राष्ट्रांमध्ये भारत गणला जाणं ही खरं तर त्यांची मानसिक गरज आहे. एका प्रगत राष्ट्राचे आपण नागरिक असणं हा आपला हक्कच आहे असा त्यांचा समज आहे. मात्र, सत्तरच्या दशकातले ‘अँग्री यंग मेन' ज्याप्रमाणे जग बदलण्यासाठी रस्त्यावर उतरत तसं काही ह्या लोकांना अजिबातच करायचं नाहीय. ते फार तर मेणबत्ती मोर्चे काढतात, आणि तेसुद्धा क्वचितच, म्हणजे आरुषी हत्याकांड किंवा निर्भया बलात्कार प्रकरणासारख्या एखाद दुसऱ्याच मुद्द्यावर. त्यांच्या गलेलठ्ठ पगारांच्या नोकऱ्या आणि त्याबरोबर येणारी प्रगत राष्ट्रांना साजेलशी त्यांची ब्रॅन्डेड लाइफस्टाइल ह्या सगळ्यामध्ये भारतातले ‘देशी' राजकारणी किंवा जनसामान्यांच्या मनाला हात घालणारं त्यांचं राजकारण वगैरे कुठे बसत नाही. म्हणून त्या सगळ्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काहीसा तुच्छतेचा असतो. ‘ऐतैडे'च्या विनोदांसाठी हे समीकरण अर्थातच उपयोगी पडतं. शिवाय, काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आलं, किंवा उद्या ते जाऊन आणखी कुणी सत्तेवर आलं तरीही ह्या लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये काहीही फरक पडणार नसतो. त्यामुळेच ‘ऐतैडे' मांडत असलेले मुद्दे कितीही ग्राह्य असले, त्यांचा विनोद कितीही बोचरा असला, तरीही त्यांचा प्रेक्षकवर्ग पाहता समाज बदलायचं त्यांचं ध्येय नाही हे अगदी स्पष्ट आहे.
त्यांच्या ह्या मर्यादा मान्य करूनही ‘ऐतैडे'कडे लक्ष ठेवावंच लागेल. डावी-उजवी बाजू न घेता ते सामाजिक-राजकीय विसंगतींवर बोट ठेवतात हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण. सभ्य समाजात रुचिहीन किंवा खालच्या पातळीच्या मानल्या जाणाऱ्या शैलीतून ते अगदी लोकप्रिय नेत्यांसकट सर्वांवर सातत्याने आणि चिकाटीने कमरेखाली वार करत राहतात हे आणखी एक कारण. लोकशाहीचा आव आणत हळूहळू हुकुमशाही भारतात पाय रोवू पाहते आहे, असं मत सध्या काही उदारमतवादी वर्तुळांत व्यक्त होऊ लागलं आहे. ह्याउलट, असं मत व्यक्त करणाऱ्या वर्तुळांच्या राजकीय हितसंबंधांना सध्याच्या सरकारमुळे बाधा आली म्हणून त्यांना असे शोध लागतायत, अशी बोंब त्यांचे विरोधक मारत आहेत. ते असाही दावा करत आहेत, की असहिष्णुता पूर्वी होती तेवढीच आताही आहे. ‘ऐतैडे'सारख्या अभिव्यक्तीला आतापर्यंत मिळत राहिलं तसं मोकळं अवकाश पुढेही मिळत राहील का ते तपासत राहणं ह्या परस्परविरोधी दाव्यांच्या चौकटीत महत्त्वाचं आहे. समाजाच्या सर्व थरांत अशा अभिव्यक्ती जितक्या फुलत राहतील तितकं ते भारतीय लोकशाहीला सुदृढ करणारं ठरेल.