आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

माणसं अशी का वागतात?

  • सुचेता कडेठाणकर
  • 23.11.25
  • वाचनवेळ 14 मि.
anger

आपण सज्जन असतो. आपण सर्व नियम आणि सर्व कायदे पाळतो. सहसा कारणाशिवाय कोणावर आवाज चढवून बोलत नाही. आपला मुद्दा पटवून द्यायचा असला तरीही आपण कसोशीने स्वतःवरचा ताबा जराही सुटू न देता समोरच्या व्यक्तीशी वाद घालतो. असा वाद घालतानादेखील समोरची व्यक्ती आणि आपल्यामध्ये केवळ मतभेद आहेत, वैर नाही याची पूर्ण जाणीव आपल्याला असते. आपण प्राप्तिकर किंवा इतर कोणताही कर वेळेत भरतो. आपण पोलिसांना घाबरतो किंवा मानतो. किंबहुना आपण कायद्याला मानतो. बेकायदा कृत्य आपल्या हातून नकळतदेखील होत नाही. आपण सर्व बिलं वेळेत भरतो. रहदारीचे सर्व नियम पाळतो. कधी तरी आपण खोटं बोलतो, पण त्यामुळे इतर कोणाचं नुकसान सहसा होत नाही. खोटं बोलण्याचं मुख्य कारण स्वतःची चूक लपवणं हे असतं, दुसऱ्याला इजा पोहोचवणं हे नाही.

वर वर्णन केलेल्या मनुष्यप्रकारामध्ये मी मोडते. त्यामुळे समाजामध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून राहण्यासाठी मी लायक आहे असं मी मानते किंवा मानत होते.

तरीही काही महिन्यांपूर्वी मी धडधडीत खोटं बोलले. का बोलले मी खोटं? स्वतःचा झालेला अपमान लपवण्यासाठी. स्वतःच्या झालेल्या सणसणीत अपमानाची आणि त्यामुळे अक्षरश: मिळालेल्या चपराकीची सल मनामध्ये इतकी खोलवर रुतून बसली होती, की मला तो अपमान विसरण्यासाठी इतरांशी खोटं बोलावं लागलं. आणि मग अगदी आजपर्यंत लोकांना सांगितलेली ती खोटी गोष्टच खरी आहे, असं मी बेमालूमपणे मानत आले. आज जवळजवळ चार महिन्यांनंतर या गोष्टीचा मला विचार करावासा वाटला आणि त्याचं थोडंसं पृथक्करण करण्याचं बळ मी जमवू शकले.

मी काय सांगितलं?...

त्या दिवशी सकाळी मी सायकल घेऊन माझ्या दोन सहकाऱ्यांबरोबर सिंहगडावर गेले होते. साधारणपणे दहाच्या सुमारास आम्ही सिंहगडावरून परत आलो. परत येताना माझी सहकारी मैत्रीण आणि माझ्यामध्ये खोदून ठेवलेल्या रस्त्याबाबत चर्चा झाली. रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहनांना होणारा अडथळा, रस्ता खोदून ठेवण्यासाठी कायम निवडली जाणारी चुकीची वेळ, सायकलस्वारांना न मिळणारा मान अशा अनेक गोष्टींबद्दल बोलत बोलत आम्ही परत येत होतो. माझं घर येण्यापूर्वी तीनशे मीटर अंतरावर दुसरा रस्ता घेऊन माझी मैत्रीण निघून गेली आणि मी माझ्या घराच्या दिशेने निघाले. घराच्या रस्त्यावर खोदकाम सुरू होतं. मागून येणाऱ्या एका कारच्या हॉर्नमुळे डावीकडे वळताना सायकलवरून माझा तोल गेला आणि मी जोरात रस्त्यावर डाव्या बाजूला पडले. माझ्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जबर मार लागला आणि त्यामुळे काळे-निळे ओरखडे पडून चेहरा चांगलाच सुजला.

खरं काय झालं?...

माझं घर येण्यापूर्वी तीनशे मीटर अंतरावर दुसरा रस्ता घेऊन माझी मैत्रीण निघून गेली आणि मी घराच्या दिशेने निघाले. मी सुखरूप घरी परत आले. घरी परत आले तेव्हा घरातली मंडळी आपापल्या कामास रवाना झालेली होती. म्हणजे मी घरी परत आले तेव्हा मला कोणीही बघितलेलं नव्हतं.

यानंतर एका तासाने मी पुन्हा घराबाहेर पडले आणि पोस्टात काही कामासाठी गेले. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच पोस्टाच्या खिडकीपाशी अंमळ जास्तच रांग होती. वर वर्णन केलेल्या पठडीमधल्या माझ्या स्वभावानुसार मी रांगेत जाऊन उभी राहिले. माझ्या पुढे सात लोक उभे होते. रांगेत सोन्याच्या जाड जाड साखळ्यांची माळ, वाढलेली दाढी, पांढरा कुर्ता, हातात मोठ्ठं कडं घालून मोबाइलवर सतत बोलत असणारा एक इसम होता. रांगेतल्या सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात मोबाइलवर त्याचं बोलणं सुरू होतं. तितक्यात त्याच्या खिशात असलेल्या दुसऱ्या मोबाइलवर त्याच्या कुठल्याशा साहेबांचा फोन आला. (पहिला फोन बंद करताना ‘थांब रे, सायबांचा फोन आहे' असं त्याने सांगितलं म्हणून मला हे कळालं.) तर त्याने दुसऱ्या फोनवर बोलायला सुरुवात केली. बोलणं जरा खासगी असावं, म्हणून तो रांगेच्या बाहेर गेला आणि आपली पत्नी आणि मुलगा यांना त्याने रांगेत थांबवलं. इथपर्यंत सगळं नीट सुरू होतं. रांगेत आल्यानंतर या इसमाच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाला स्वतःच्या वडिलांची रांगेतली कमतरता भरून काढावीशी वाटली असावी. रांगेत उभ्या असणाऱ्या एकेका व्यक्तीच्या शेजारी जाऊन तिच्या पर्सला हात लावणं, एखादीची ओढणी खेचणं असे उद्योग त्याने सुरू केले. यावर कोणी काहीच बोललं नाही. कारण सुरुवातीला कोणालाच याचा त्रास झाला नाही. त्यानंतर मात्र आपल्या या उद्योगांनी लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्याचा आपला प्रयत्न सफल होत नसल्याचं लक्षात आल्यावर या छोट्या मुलाने पुढची पायरी गाठली. हा मुलगा माझ्या शेजारी आला आणि माझ्या उजव्या हाताच्या कोपराला त्याने जोरात बारीक चिमटा काढला. अचानक असं झाल्यामुळे मी दचकले आणि त्याला केवळ हाताने ‘असं करू नये' अशा अर्थाचा इशारा केला. त्याने चिमटा काढला तेव्हा माझ्या हातातली माझी पर्स खाली पडली. ती उचलण्यासाठी मी खाली वाकले, तोच हा मुलगा पुन्हा माझ्या शेजारी आला आणि त्याने माझ्या पाठीत त्याच्या सर्व शक्तीनीशी दणका घातला. मुलगा पाच-सहा वर्षांचाच असला तरीही त्याने मारलेल्या त्या दणक्यातली शक्ती अफाट होती. त्याच्या वयाकडे पाहता त्याला याबाबत काही बोलण्यात अर्थच नव्हता. त्याच्या मातु:श्री यावर आपल्या मुलाला काही बोलतील अशा अपेक्षेने मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा दिसलं, की आपल्या मुलाच्या या कर्तृत्वाकडे मातु:श्री कौतुकमिश्रित नजरेने पाहत होत्या. आता माझा ताबा सुटला आणि मी या छोट्या मुलाच्या आईला मुलाकडे लक्ष द्यावयास सांगितलं. यावर कुठल्याशा सीरियलमधल्या अभिनेत्रीने आपला संवाद म्हणावा अशा थाटात त्याच्या आईने मला उत्तर दिलं, “लहान आहे तो.... सो इट्स ओकेऽऽऽ.. चिल!” आपली आई आपलीच बाजू घेते आहे म्हटल्यावर या मुलाने पुन्हा येऊन माझ्या उजव्या हाताला चिमटा काढला. मी परत एकदा त्याच्या आईला याबाबत सांगितल्यावर मला काहीही कळण्याच्या आत ही माउली माझ्या समोर आली आणि तिने चक्क माझ्या कानाखाली भडकावली आणि मला जोरात ढकलून जमिनीवर पाडलं. इतकं करून ती थांबली नाही. मला हा प्रकार पचनी पडण्यापूर्वीच तिने माझे केस तिच्या हातात पकडून पुन्हा एकदा तीन-चार वेळा माझा गाल आणि कानशील काळी-लाल पडेपर्यंत मला मारलं. लाथादेखील मारल्या. हे सगळं बघून फोनवर बोलत असलेले तिचे यजमान इकडे आले. त्यांनीही काहीही कळून घेण्याचा प्रयत्न न करता मला एक-दोन लाथा मारल्या. “जास्तच बोलत होती ही बाई... दाखवून दिलं तिला मी कोण आहे ते!” असं स्वतःच्या नवऱ्याला सांगत ही माउली स्वतःचा सुपुत्र आणि यजमान यांना घेऊन तिथून चालती झाली.

माझा डावा गाल या मारामुळे चांगलाच सुजला, काळा-निळा झाला. बोटांचे वणही गालावर उठले होते. वर सांगितलेला हा सगळा प्रकार अवघ्या दहा मिनिटांच्या आत घडून संपलेला होता. रांगेत असलेले लोक अर्थातच या प्रकारात मध्ये पडले नाहीत. हे त्रिकोणी कुटुंब मात्र आपण कोण आहोत हे दाखवून दिल्यानंतर दुसऱ्या क्षणी तिथून निघून गेलेलं होतं. ते गेल्यानंतर आजूबाजूचे लोक माझ्याभोवती गोळा झाले. कोणी तरी मला पाणी प्यायला दिलं. ‘काय माणसं असतात नाही? काहीही चूक नसताना बिचारीला मार खावा लागला,' असे सहानुभूतीचे उद्गार माझ्या आजूबाजूला मला ऐकू येत होते. खूप संताप आला होता. आधी स्वतःचा. मी कशाला त्या बाईंना बोलायला गेले म्हणून, मी काहीही करू शकले नाही म्हणून, ती अचानक निघून गेल्यामुळे मी तिच्याबद्दल कुठेही तक्रार करू शकत नाही म्हणून. नंतर आजूबाजूच्या लोकांचा, कोणी काहीच बोललं नाही याचा. आणि मुळात त्या कुटुंबाचा. अनेक कारणांसाठी. माझी अवस्था कशी झाली असेल त्या वेळी! मी त्या वेळी स्वतःला बघू शकत नव्हते. पण आता चार महिन्यांनी हा प्रसंग मी सिनेमात पाहावा तसा पाहते- वाइड अँगल लेन्समधून, कॅमेरा खाली ठेवून.. तेव्हा वाटतं, माझे डोळे लाल झालेले असणार, आवाज थरथरत असणार. माझे पाय पण थरथरत असणार...

आपणसुद्धा तिथून पळ काढावा, असं मला तेव्हा क्षणभर वाटलं होतं; पण स्वतःला सावरत मी परत एकदा रांगेत उभी राहिले. माझ्या पुढच्या काही सज्जन लोकांनी मला रांगेत त्यांच्या पुढे जाऊ देण्याची तयारी दाखवली; पण मी नकार देत माझ्या जागी थांबून राहिले. त्या वेळी तिथून निघून जाणं किंवा तिथे थांबण्याचा वेळ कमी करणं मला जास्तच अपमानास्पद वाटलं असावं. त्या वेळी मनात झालेल्या विचारांच्या गर्दीची कल्पनाच करता येत नाही. का मारलं तिने मला? काय चुकीचं बोलले किंवा वागले मी? माझ्या कुठल्याशा बोलण्याचा तिला इतका जास्त राग आला की तिने सरळ उठून मला बेदम मारावं? (‘बेदम मार' ही वाचायला अतिशयोक्ती वाटली तरी त्यामध्ये किंचितही अतिशयोक्ती नाही. कारण घरी येऊन स्वतःचा चेहरा मी आरशात बघितला तेव्हा मला त्या माराच्या तीव्रतेची कल्पना आली होती.) कोणत्याही रागाचं उत्तर ही बाई असंच देत असेल का? स्वतःच्या मुलाचं वागणं तिला खरंच योग्य वाटलं होतं म्हणून तिने मला असं उत्तर दिलं, की कोणी तरी आपल्या मुलाची चूक आपल्याला दाखवून देत आहे याचा तिला राग आला? याचा अर्थ कोणीही हिची चूक हिला कधीच दाखवून द्यायची नाही? किंबहुना, लोकांनी सतत आपल्याला घाबरून असावं, आपण म्हणजे ‘टेरर' अशीच स्वतःची ओळख तिला आवडत असावी. किंवा खरं म्हणजे तिच्या वस्तीत, लोकांत तिची नि तिच्या नवऱ्याची तशीच ओळख असावी. ‘आपल्याला काही बोलायची कोणाची टाप नाही' या तिच्या स्वतःबद्दलच्या कल्पनेला मी तिची चूक दाखवून देऊन धक्का लावला असणार. म्हणून स्वतःची ओळख अधोरेखित करण्यासाठी तिने ‘टेरर' दाखवून दिली असणार. आणि तिच्या या कार्याचा तिला आणि तिच्या यजमानांना जबर अभिमानही वाटत असणार. त्या वेळी मी तिच्यावर उलटा हात उगारू शकले असते का? शक्तीचा विचार केला, तर हो, नक्कीच. मग मी का नाही उलट मारलं? कारण मी हतबुद्ध झाले होते. माझी शक्ती मला या खेळातसुद्धा वापरता येऊ शकते, हे मला सुचलंच नाही. मी प्रतिकार जरूर केला पण प्रतिवार मात्र नाही केला. माझा सज्जनपणा मला नडला का? असेल कदाचित. चित्रपटांमध्ये दाखवतात तशी गुंडगिरी, दादागिरी, भाईगिरी आता आपल्या इतक्या जवळ, इतक्या निकट येऊन पोचली आहे का? म्हणजे ती खरीच असते तर! आजवर मला असं कोणी मारलं होतं का? छे! कधीच, कोणीच नाही. असा रस्त्यावर मार खाण्याचा, किंबहुना असा मार खाण्याचाच माझा हा अगदीच पहिला-वहिला अनुभव होता. मग ती बाई मारायला इतकी सरावलेली होती का? एखाद्याला मारायचं असेल, किंवा खरं सांगायचं तर बुकलायचं असेल तर त्यासाठी सराव असायलाच हवा. नाही तर नेमकं कुठे पकडून कुठे मारलं की कमी शक्तीत, कमी कष्टांत जास्त मार बसतो आणि मार खाणाऱ्या मनुष्याला सहजपणे प्रतिवारही करता येत नाही याचा अंदाज प्रथमच केलेल्या मारामारीमध्ये येणं शक्यच नाही. आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारची मारा-मारी करण्यासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या किती तंदुरुस्त आहात किंवा किती धाडसी आहात हे उपयोगाचं नसतं. हा खूप वेगळा खेळ आहे आणि त्यासाठी एका विशिष्ट प्रकारची वृत्ती आणि अनुभव असावा लागतो. म्हणजे ती नक्कीच अनुभवी होती. तिच्या भाषेवरून आणि मुख्य म्हणजे नंतरच्या तिच्या कृत्यावरून ती ‘गुंड' प्रकारात मोडणारी होती यात शंकाच नाही. तिचं संपूर्ण कुटुंबच तसं होतं. तरीही हे पोस्टाच्या रांगेत बरे थांबले होते! समाजात जबाबदार नागरिक म्हणून राहायला बिलकुल लायक नसलेल्या लोकांची जी वर्णनं माहिती होती, त्याच वर्णनात बसणारं हे कुटुंब होतं हे नक्की. माझ्या मनात त्या वेळी आलेले विचार साधारण अशा प्रकारचे होते.

हेही वाचा - क्षुल्लक कारणांवरून माणसं संतापतायत का?

हा संपूर्ण प्रकार घडून चार-पाच महिने झाले. मी कुटुंबीयांना आणि माझ्या मित्रमंडळींना काय स्टोरी सांगितली हे सुरुवातीला सांगितलंच आहे. मला परिचित असलेल्या जगाशी त्या दिवशी माझा सामना एकदम संध्याकाळी झाला. मी सायकलवरुन पडले आणि मला मार लागला यावर सर्वांचा विश्वासही बसला. कारण माझ्या ‘आऊटडोअर' उपक्रमांमध्ये असे दुखापतीचे प्रसंग यापूर्वीही आलेच होते. काही मित्रांनी थट्टेने ‘कोणी तुझ्या श्रीमुखात भडकावली का?' असं विचारलं. पण त्यांना मी तितकंच थट्टेचं उत्तर देत उडवून लावलं. आणि त्यानंतर मी स्वतःसुद्धा खोटी सांगितलेलीच स्टोरी खरी मानून चालायला लागले. हा प्रसंग कमी त्रासदायक करण्याचा हा एक मार्ग होता.

या सगळ्या प्रसंगांवरून मी मात्र एका वेगळ्याच वाटेवर विचार करू लागले. हा विचार आहे आत्मकेंद्री व्यवस्था आणि समाजकेंद्री व्यवस्थेचा. भारतीय किंबहुना आशियाई व्यवस्था ही समाजकेंद्री आहे असं म्हणतात. त्याविरुद्ध पाश्चिमात्य व्यवस्था ही व्यक्तिकेंद्री आहे. एखाद्या समूहामध्ये राहताना दोन अनोळखी व्यक्तींमध्ये येणाऱ्या संबंधांना एक संदर्भ या व्यवस्थांमुळे मिळतो. भारतीय लोक ज्या पद्धतीने समूहात वावरतात आणि पाश्चात्त्य लोक ज्या पद्धतीने समूहात वावरतात, यामध्ये हा मूलभूत फरक दिसतो. व्यक्तिकेंद्री व्यवस्थेमधून येणारी व्यक्ती समूहात वावरताना स्वतःचे निर्णय स्वतः घेते, त्या निर्णयांची जबाबदारीही स्वतःच घेते आणि समूहाशी केवळ ‘स्वतः' या नात्यानेच संवाद साधते. समाजकेंद्री व्यवस्थेमधून येणारी व्यक्ती मात्र समूहामध्ये वावरताना कायम कोणत्या एका दुसऱ्या समूहाची घटक किंवा प्रतिनिधी म्हणून वावरते. तिने घेतलेल्या निर्णयांवर तिच्या समूहाच्या विचारांचा पगडा असतो. तसेच तिने घेतलेल्या निर्णयांचा तिच्या समूहावर काय परिणाम होईल याचा विचार ही व्यक्ती स्वतःचा विचार करण्यापूर्वी करते. पाश्चिमात्यांच्या तुलनेत आपलं महत्त्व सिद्ध करताना आपण कायम आपली कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यांचं कौतुक करतो आणि त्यांच्या व्यक्तिकेंद्री व्यवस्थेवर टीका करतो. व्यक्तिकेंद्री व्यवस्थेमध्ये मनुष्य हा स्वार्थी असतो, असा समज समाजकेंद्री व्यवस्थेमध्ये राहणारे आपण करून देतो आणि घेतो.

याच दोन व्यवस्थांचा विचार मी थोडासा वेगळ्या पद्धतीने केला तेव्हा मला नेमकं उलटं चित्र दिसलं.

प्रथम समाजकेंद्री व्यवस्थेचा विचार करू. या व्यवस्थेचा विचार मांडताना ‘आपण' असा केलेला उल्लेख म्हणजे समाजकेंद्री व्यवस्थेत समाजाला महत्त्व देणारे लोक असा आहे.

एखादी वाईट, समाजविघातक घटना घडत असताना आपण बघ्याची भूमिका घेतो तेव्हा आपण व्यक्तिकेंद्री असतो की समाजकेंद्री? आपण तेव्हा व्यक्तिकेंद्री (स्वार्थी या अर्थाने. कारण व्यक्तिकेंद्री समाज स्वार्थी असल्याचा आपला समज) बनतो. आणि याचं मूळ आपल्या समाजकेंद्री संस्कारांमध्ये आहे. आपण बघ्याची भूमिका घेतो, कारण आपण तेव्हा केवळ स्वतःचा विचार करत नाही. आपण तेव्हा आपल्या कुटुंबाचाही विचार करतो. आपण बघे असतो, तेव्हा आपण एक व्यक्ती म्हणून बघे नसतो. आपण आपल्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून बघे असतो. आणि म्हणूनच आपण एखाद्या भनगडीत पडलो तर आपले आई-वडील, शेजारी, नातेवाईक, मित्र यांच्यात आपली प्रतिमा काय होईल याचा विचार करून आपण बघे होतो. म्हणजे त्या वेळी आपण फक्त स्वतःच्या प्रतिमेचा विचार करतो आणि एका अर्थाने व्यक्तिकेंद्री बनतो. समाजकेंद्री व्यवस्थेचा भाग असणाऱ्या आपल्या समाजामध्ये अनेक लोक ट्रॅफिकचा सिग्नल सहजपणे कसा मोडतात? कर बेमालूमपणे कसा चुकवतात? कायद्याच्या पळवाटा कशा काढतात? वीज चोरून कशी वापरतात? अखेरीस आपण ज्या समूहाचा भाग आहोत त्या समूहाचंच नुकसान आपल्या या वागण्यामुळे आपण करत आहोत, याची जाणीव आपल्याला नसते? नसते. कारण आपला समूहच आपल्या रक्षणासाठी समर्थ आहे, ही त्या समूहामधून आलेली ताकद असं काम करायला आपल्याला बळ देते. (वर सांगितलेल्या प्रसंगामधील महिलेलादेखील हे बळ किंवा पाठबळ तिच्या समूहाकडूनच आलं होतं आणि म्हणूनच ती बेधडकपणे असा हिंसाचार करू शकली.)

याचाच अर्थ समाजकेंद्री व्यवस्थेमधून येणारे आपण समाजाचा विचार कमी करतो, असा होत नाही का?

आता व्यक्तिकेंद्री व्यवस्थेचा विचार करू. या व्यवस्थेचा विचार मांडताना ‘मी' असा केलेला उल्लेख मी म्हणजे लेखक असा नसून, व्यक्तिकेंद्री समाजव्यवस्थेत स्वतःला महत्त्व देणारी कोणतीही व्यक्ती असा आहे.

मी नियम पाळते, मी कायदे मानते, समाजात वावरताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये असा आग्रह धरते. मी सगळे नियम का पाळते? वाहतुकीचे नियम असोत, कर भरणे, बिले भरणे या संदर्भातले असोत किंवा इतर कोणतेही. माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की मला या कोणत्याही बाबतीत दुसऱ्यांकडून काहीही ऐकून घ्यायला आवडत नाही. ‘काय राव, तुम्ही शिकले-सवरलेले लोक असून सिग्नल मोडता?' हे पोलिसांच्या तोंडचं वाक्य, किंवा गाडी चुकीची पार्क केली म्हणून बोलायला मिळाल्यामुळे वॉचमनच्या चेहऱ्यावरचा आनंद ... असे प्रसंगच मी येऊ देत नाही. याहूनही मोठं कारण असं, की अशा प्रसंगात सापडल्यावर ‘बघा ना काही होतंय का... करून टाका काही तरी तडजोड...' अशा अर्थाची वाक्यं माझ्या तोंडून येत नाहीत आणि ती म्हणणं मला खूप त्रासदायक वाटतं. म्हणून मी सर्व ठिकाणचे सर्व नियम पाळते. हे सगळं मी स्वार्थी विचाराने करते. म्हणजे त्यामागे केवळ ‘माझा' विचार असतो. अशा प्रकारांमुळे मला होणारा त्रास मला टाळायचा असतो. या अर्थाने मी व्यक्तिकेंद्री आहे. कारण अशा प्रकारे समूहात वावरताना मी केवळ माझा विचार करते. माझ्या समूहाचा, कुटुंबाचा विचार माझ्या सामाजिक व्यवहारांमध्ये नसतो. कारण मी योग्य वागले तर साहजिकच माझा समूह आणि माझं कुटुंब योग्य राहणार असते. मी योग्यच वागत असल्यामुळे मला कोणत्याही प्रसंगामधून वाचवण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी अथवा माझ्या कोणत्याही योग्य-अयोग्य कृतीचं समर्थन करण्यासाठी मला माझ्या समूहाची गरजच भासत नाही. परिणामी, माझ्या समूहावर माझ्यामुळे तरी कधी बाका प्रसंग येत नाही.

याचाच अर्थ व्यक्तिकेंद्री व्यवस्थेमधून येणारी मी समाजाचा विचार अधिक करते, असा होत नाही का?

पोस्टात रांगेत मी उभी असताना माझ्यावर गुदरलेल्या एका प्रसंगामुळे माझ्या मनात हे द्वंद्व सुरू झालं आहे. लहानपणी भाषा शिकताना शिकलेल्या ‘मी-आम्ही', ‘तू-तुम्ही' या संबोधनांचा वापर मी आजवर अचूकपणे करत होते. पण ही संबोधनं मला आता व्यक्तिकेंद्री आणि समाजकेंद्री व्यवस्थांची माझ्या डोक्यात सध्या झालेली सरमिसळ दर्शवणारी संबोधनं वाटू लागली आहेत. त्यामुळे ‘मी'चा विचार करताना त्यामध्ये असलेला ‘तू आणि तुम्ही'चा विचार आणि ‘तू आणि तुम्ही'चा विचार करतोय असं दाखवत असताना त्यामध्ये लपलेला फक्त ‘मी'चा विचार आता माझ्या अंगावर येऊ लागला आहे.

(अनुभव, जुलै २०१३च्या अंकातून साभार)

हा लेख वाचल्यावर अनेकांना आपल्यावर गुदरलेले असे प्रसंग आठवले असतील. छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा कधी विनाकारण ही लोक हिंसक बनतात, शिव्या देतात, अपमान करतात, हात उगारतात. आपल्या शहरांमध्ये या घटना वाढताहेत. तुमच्या बाबतीत अशी घटना घडली असेल तर तुम्ही त्याची संगती कशी लावलीत? तुमचे अनुभव जरुर आमच्याकडे पाठवा.

सुचेता कडेठाणकर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results