आम्ही कोण?
आडवा छेद 

धार्मिक भावनांपायी आणखी एका चित्राची माघार

  • सुहास कुलकर्णी
  • 06.01.26
  • वाचनवेळ 5 मि.
tom vattakuzhy

केरळमधील कोची या शहरात सध्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सव भरला आहे. दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवाची ही सहावी आवृत्ती आहे. या महोत्सवाला कोची बिआनाले (किंवा बिनाले) अशी ओळख मिळाली आहे. महोत्सव दर दोन वर्षांनी भरतो म्हणून त्याला बिनाले म्हटलं जातं. कोची शहरातील फोर्ट या शांत आणि आधुनिक शहरापासून तुटलेल्या भागात हा महोत्सव भरतो. जगभरातील कलावंत आपापल्या कलाकृतींसह तिथे येत असल्यामुळे हा कलासमृद्ध सोहळा अनुभवण्यासारखा असतो असं म्हणतात.

पण यंदाच्या महोत्सवात एका कलाकृतीमुळे तिथलं वातावरण ढवळून निघालं आहे. टॉम वट्टकुझी नावाच्या केरळमधील एका प्रसिद्ध चित्रकाराच्या एका पेंटिंगमुळे तिथे गदारोळ उठला आहे. कोची बिनालेची सुरुवात झाली 21 डिसेंबरला आणि आठवड्याभरातच म्हणजे 30 तारखेला कॅथोलिक ख्रिश्चन समाजाच्या एका गटाने टॉम यांच्या चित्रावर जोरदार आक्षेप घेतला आणि हे चित्र प्रदर्शनातून हटवावं, अशी मागणी केली. या चित्रामुळे ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून हे कृत्य हेतूपुरस्सर केलेलं असल्याने पोलिसांकडे रीतसर तक्रार करावी, असंही त्यांचं म्हणणं होतं.

असं काय होतं या चित्रात?

एक स्त्री चित्राच्या मध्यभागी एका टेबलावर अर्धनग्न म्हणजे उघड्या छातीने बसलेली आहे आणि नन्सच्या वेषातील अन्य सहकारी स्त्रिया (पूर्ण कपडे घालून) तिच्यासोबत बसल्या आहेत, असं हे चित्रं आहे. हे चित्र लिओनार्डो दा विन्ची या जगप्रसिद्ध चित्रकाराने काढलेल्या ‘लास्ट सपर’ या चित्रावर बेतलेलं आहे असं बघताक्षणी वाटतं. ‘लास्ट सपर’ या चित्रात बायबलमधील एका प्रसंगाचं चित्रण केलेलं असून त्यात मध्यभागी येशू ख्रिस्त आणि सोबतीला काही प्रेषित आहेत. त्यांच्यासोबतचं येशूचं हे अखेरचं जेवण आहे. या प्रसंगावरून काढलेल्या चित्राची भ्रष्ट कॉपी टॉम वट्टकुझी यांनी केली असून त्यात विपर्यस्त चित्रण केलं आहे असं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं होतं. हे चित्र येशूचा अपमान करणारं, अनादर करणारं आणि विकृत असल्यामुळे हे चित्र हटवावं अशी त्यांची मागणी होती.

ही मागणी आयोजकांनी सुरुवातीला धुडकावून लावली. हे चित्र विचारपूर्वक सादर केलेलं आहे अशी भूमिका त्यांनी घेतली. पण नंतर वातावरण तापू लागलं तसं चित्रं अधिकृतपणे मागे न घेता त्या चित्राशिवाय प्रदर्शन चालू ठेवण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. पण अखेरीस वाढत्या दबावामुळे हे चित्र प्रदर्शनातून मागे घेण्याची घोषणा त्यांना करावी लागली.

या सर्व वादावर चित्रकार टॉम वट्टकुझी यांच्याशी संवाद साधला गेला, तेव्हा ‘आता यावर काय बोलणार!’ अशी हताश प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांचं म्हणणं, ‘लास्ट सपर’ चित्राशी आपल्या चित्राचा काहीही संबंध नाही. आपलं चित्र हे माताहरी या डच नृत्यांगनेवरील एका नाटकावर आधारित आहे. माताहरी नावाची डच नृत्यांगना पहिल्या महायुद्धात गुप्तहेरीच्या आरोपाखाली जिवे मारली गेली, तिचं हे चित्र आहे.

टॉम पुढे म्हणतात की ते स्वत: ख्रिश्चन असून प्रेम, सेवा, करुणा वगैरे ख्रिस्ताने दिलेल्या मूल्यांनी प्रभावित आहेत. माताहरीसारख्या दुर्दैवी व्यक्तीबद्दल कळतं तेव्हा आपल्याला त्यांच्यात येशू दिसतो, पण आजकाल कुणी कुणाचं समजूनच घेत नाही. कोणत्याही कलाकृतीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण हल्ली सार्वजनिक सहिष्णुता कमी झालेली असल्याने असे प्रश्न तयार होत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

टॉम यांचं हे चित्र पहिल्यांदाच वादात अडकलं आहे, असं नव्हे. हेच चित्र 2016 मध्ये ‘मल्याळम मनोरमा’ या माध्यमसंस्थेच्या ‘भाषापोषिणी’ या ख्यातकीर्त नियतकालिकावर झळकलं होतं. तेव्हा त्यावर मोठा वाद होऊन ईशनिंदेचा आरोप केला गेला होता. तेव्हा प्रकाशक-संपादकांनी पहिल्या पानावर माफी मागून तो वाद मिटवला होता. पण गंमत म्हणजे या प्रकरणानंतर काही ख्रिश्चन धर्मतज्ज्ञ पुढे आले होते आणि हा सारा प्रकार गैरसमजातून झाला होता. टॉम यांचं चित्रं धर्मश्रद्धांना धक्का पोहोचवणारं नव्हतं, असं निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. त्यामुळे या चित्राची निर्दोष सुटका झाल्याचं मानलं जात होतं.

पण कोची बिनालेमध्ये हे चित्र झळकल्यावर पुन्हा वाद निर्माण केला गेला आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली. मागे वाद होऊनही आणि आक्षेप नोंदवला जाऊनही हे चित्र प्रदर्शनात मांडलं गेलं, याचा अर्थ मुद्दामहून कुरापत काढण्याचा कुहेतू त्यामागे आहे, असं आक्षेपकांचं म्हणणं पडलं. त्यासमोर आयोजकांना पुन्हा एकदा नमतं घ्यावं लागलं.

धार्मिक भावना दुखावणं हा प्रकार गेल्या काही वर्षांत खूपच वाढीस लागला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका केव्हा, कुणाला बसेल सांगता येत नाही. देव, धर्म, धर्मग्रंथ, पुराणातील किंवा इतिहासातील पात्रं, जातींचे नायक वगैरेंबद्दल प्रस्थापित समजुतीपेक्षा चकार शब्द काढणं आता अशक्य बनलं आहे. त्यामुळे सामाजातील विचारांचंच आदान-प्रदान थांबतं आणि समाजाचं डबक्यात रूपांतर होऊ शकतं, याबद्दल कुणाला घेणं-देणं नाही, असं शहाणीसुरती माणसं सांगत असतात. पण लोंढ्यांच्या गदारोळात त्यांचं ऐकणार कोण? त्यामुळेच गेल्या काही वर्षांत एमएफ हुसेनपासून अकबर पदमसी, श्रीलामंथुला चंद्रमोहन, अक्रम हुसैन, अनिरुद्ध साईनाथ, अनिता दुबेंपर्यंत अनेकजण या भावना दुखावण्याच्या उपक्रमाचे बळी ठरले आहेत. आपल्याकडे चित्रकार सुभाष अवचट यांनाही गणपतीच्या चित्रांवरून लक्ष्य केलं गेलं आहेच.

चित्रकारांना आणि लेखक, कलावंतांना समाजस्वास्थ्यासाठीचे नियम लागू असले, तरी त्यांच्या अभिव्यक्तीसाठी थोडं औदार्यही दाखवायला हवं ही गोष्ट आपल्या समाजात अजून रुजायला तयार नाही. खरं तर आक्षेपार्ह ठरवल्या जाणाऱ्या कृती सर्वसामान्य जनांना तेवढ्याशा आक्षेपार्ह वाटत नसतात. पण राजकीय हेतूंसाठी दबाव तयार करण्याचं एक तंत्र हल्ली तयार केलं गेलं आहे. त्याला कधी सरकारं बळी पडतात, कधी साथही देतात. केरळातही ना सत्तेवर असणाऱ्या कम्युनिस्टांनीही त्यात हस्तक्षेप केला, ना विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसने. या दोन्ही पक्षांचे हितसंबंध ख्रिश्चन मतदारांमध्ये गुंतलेले असल्यामुळे हा उद्योग केला गेला की काय, हे लवकरच कळेल.

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results