पोलिस म्हणजे शिस्त. धाक. ‘सदरक्षणाय; खल निग्रहणाय’ हे पोलिसांचं ब्रीदवाक्य. परंतु बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेला पोलिसांकडून येणारे अनुभव (अपवाद वगळता) हे याच्या अगदी विपरित असतात. त्यामुळे पोलिस दलाची सामान्यांच्या मनातली प्रतिमा गढूळ होऊन जाते. ही प्रतिमा बदलण्यासाठी पोलिसांनी ‘रिॲक्टीव्ह’ होण्यापेक्षा ‘प्रोॲक्टीव्ह’ झालं पाहिजे, या भूमिकेतून जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी ‘ऑपरेशन प्रस्थान’ हा उपक्रम सुरू केला आहे.
यवतमाळच्या आधी कुमार चिंता यांनी जळगाव आणि गडचिरोलीमध्ये काम केलं होतं. गडचिरोलीमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक असताना तिथल्या नागरिकांसोबत संवाद वाढवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. तिथे नागरिक नक्षल आणि पोलिस अशा दुहेरी दबावाखाली असल्याचं त्यांना जाणवतं होतं. तसं न होता नागरिकांनी आपले प्रश्न विश्वासाने पोलिसांकडे यावं यासाठी चिंता यांनी ‘गडचिरोली महोत्सव’ आयोजित केला. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर करण्यासाठी हा गडचिरोली महोत्सव उपयोगी पडत असल्याचं दिसून आलं आहे.
उपक्रमाची सुरुवात
यवतमाळमध्ये आल्यानंतरही नागरिक-पोलिस सुसंवादावर भर देण्याचं काम करत राहायचं, असं चिंता यांनी ठरवलं होतं. विशेषतः तरुणांशी जोडून घेतलं तर त्याचा अधिक उपयोग होईल, असं त्यांच्या लक्षात आलं. बेरोजगारीमुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगार झाल्यानंतर त्यांना पकडण्याऐवजी ते या दिशेला वळूच नयेत यासाठीही पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत, असं त्यांना वाटत होतं. त्यातून त्यांना ‘ऑपरेशन प्रस्थान’ची कल्पना सुचली.
ऑपरेशन प्रस्थानबद्दल चिंता सांगतात, ‘जीवन म्हणजे एक प्रवासच. तो सुकर व्हायचा असेल तर योग्य प्रस्थान आवश्यक असतं. मात्र परिस्थतीमुळे अनेक तरुण चुकीच्या दिशेला वळतात. शिक्षणापासून वंचित राहतात. गुन्हेगारी जगात ओढले जातात. अशा तरुणांशी संवाद साधून त्यांना व्यवसायिक कौशल्याचं प्रशिक्षण द्यायचं, रोजगार मिळवून द्यायचा हा आमचा प्रयत्न आहे.”
विविध कारणांनी शाळा, कॉलेज सोडलेल्या तरुण व तरुणींना ऑपरेशन प्रस्थानच्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण नि:शुल्क दिलं गेलं. राळेगाव इथं ‘प्रथम’ कौशल्य प्रशिक्षण केंद्रात हाऊस कीपिंग, फूड अँड ग्रेव्हरेज सर्विस, दुचाकी व चारचाकी दुरुस्ती, शोरूम होस्ट, टेलरिंग, ब्यूटीशियन, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाइल अशा विविध सेवांसाठी ४५ दिवसांचं प्रशिक्षण दिलं गेलं. जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं गेलं. या मेळाव्यांमध्ये सहा हजार ९९९ युवक आणि ५२६ युवती अशा एकूण सात हजार ५२५ बेरोजगार तरुणांनी उपस्थिती लावली.
या मेळाव्यात ‘जॉब प्लेसमेंट’साठी विविध ठिकाणाहून कंपन्या बोलावल्या गेल्या. निवड झालेल्या तरुणांना साधारण १८ ते २२ हजार रूपये प्रति महिना वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यापैकी काहींची सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून संभाजीनगर, नागपूर, हैद्राबाद आदी शहरात नियुक्ती झाली आहे. साधारण ८० जणांनी हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेतसं असून त्यांना विविध हॉटेलांमध्ये रोजगार मिळाला आहे.
ऑपरेशन प्रस्थानअंतर्गत रोजगारासोबत इतरही अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
क्रीडा स्पर्धांचं आयोजन
नागरिक आणि पोलिस यांच्यातील संबंध वाढावेत यासाठी गाव, पोलिस ठाणे, तालुका, जिल्हा पातळीवर क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल या क्रीडा स्पर्धांचं आयोजनही यवतमाळ पोलिसांकडून केलं जातं. यंदा जवळपास साडेसात हजार तरुण, तरुणींनी या स्पर्धांतील विविध खेळांत भाग घेतला. ही सगळी तरुण मंडळी त्यानिमित्ताने पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. एखाद्या गावात काही समस्या निर्माण झाली, एखादा गुन्हा घडला तर अशा तरुणांमुळे त्या घटना तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचतील, त्यांची तपासात मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी आता गावपातळीवर व्हॉट्सअप समूह तयार करण्याचं कामही सुरू आहे.
ऑपरेशन मुस्कान
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत घरातून पळून गेलेल्या यवतमाळमधील मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना घरी परत आणायचं, असा उद्देश आहे. यवतमाळ पोलिसांनी आतापर्यंत अशा ७०० मुलामुलींना वेगवेगळ्या भागातून शोधून आणून त्यांना यवतमाळमधील त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे. “यामुळे अनेक पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पोलिस विभागाला कामाचं समाधान देणारं आहे,” असं कुमार चिंता म्हणतात.
स्वसंरक्षणाचे धडे
सर्वसामान्य महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आता पोलिस सरसावले आहेत. त्यासाठी यवतमाळच्या पोलिस मुख्यालयात १५ ते ३० वयोगटातील महिला व मुलींसाठी दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करून त्यांना कराटे प्रशिक्षणासोबतच स्वसंरक्षाच्या टिप्स दिल्या जातात.
ऑपरेशन प्रस्थानचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता येत्या काळात, ज्या अल्पवयीन मुलांच्या हातून गुन्हा घडला आहे. अशांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद आणि सहकार्य राहावं यासाठी असे नवनवे उपक्रम राबवण्याचा यवतमाळ पोलिसांचा मनसुबा आहे. त्यांचं हे काम महाराष्ट्रभरातील पोलिसांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरत आहे.
नितीन पखाले | 9403402401
नितीन पखाले हे 'लोकसत्ता'चे यवतमाळ जिल्हा वार्ताहर आहेत. विदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर रिपोर्ताज करण्यात त्यांना रस आहे.
