आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

मराठीच्या नावानं वार्षिक रडगाणं...

  • जयदेव डोळे
  • 05.07.25
  • वाचनवेळ 14 मि.
marathi language

मराठी मरणासन्न अवस्थेत आहे, मराठी कशी जगणार? आपल्या मायबोलीचं काय होणार? असा जाहिरपणे आक्रोश मांडणं, ही मराठी साहित्य संमेलनांची 'खासियत' झाली आहे. ही परंपरा दीर्घकाळ चालू आहे. संमेलनांचे अध्यक्ष तर मराठी भाषेच्या भवितव्याचा उच्चार केल्याशिवाय आपलं भाषण पूर्णच करू शकत नाहीत. विद्यमान संमेलनाध्यक्ष अरुण साधू हेही अनेक वर्षांपासून सातत्याने मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.

मराठीला 'अतिदक्षता विभागा'त भरती केल्याचं हे दृश्य केवळ पुण्या-मुंबईच्या चष्म्यांमधूनच दिसत आहे काय? उर्वरित महाराष्ट्राला याबद्दल काय वाटतं?

आपल्या मराठी भाषेला काहीही झालेलं नाही. अगदी धडधाकट आहे ती. वजन वाढून स्थूल होण्याचा तिला धोकाच नाही, कारण अजूनही ती खूप 'चालते'. रक्तचाप होण्याचा तिला संभव नाही, कारण महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांत ती धावते. तिच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्यांची संख्या वाढली तरी तिची हाडं खिळखिळी झालेली नाहीत. स्मरणशक्ती तिला सोडून जाऊच शकत नाही, कारण अतीतप्रीतीची तिला जुनीच सवय आहे. आता उरला प्रश्न नव्या गोष्टींशी टक्कर घेण्याचा. तर ज्ञानेश्वर, चक्रधर, तुकाराम आदी वस्तादांनी तिला शिकवलेले डाव इतके जबरी आहेत की, तिला चीत करणं केवळ अशक्य. तसा विचारही कोणी मनात आणू नये. मराठीच्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांची कळकळ तशी प्रामाणिक असते. त्यांना जी मराठी दिसते ती खंगलेली, वाकलेली, उपेक्षिलेली. ते जिथे उभे आहेत तिथून ती तशी दिसणे शक्य आहे. अखेर मनुष्य विश्वास ठेवतो कशावर? ऐकीव गोष्टींवर नाही.

त्याच्या आसपास जे असतं तेच व तेवढंच त्याचं विश्व आणि तोच त्याचा अनुभव. पण त्यांची गल्लत होते किंवा झाली ती हा अनुभव सार्वत्रिक करण्याचा त्यांना झालेला साक्षात्कार सत्य आहे हे मानण्यात. एखाद्या गोष्टीत ज्येष्ठत्व वा कौशल्य प्राप्त केलेली अधिकारी माणसं जेव्हा अशी कळकळ दाखवतात तेव्हा त्यांच्या वयाकडे व ज्ञानाकडे पाहून आपल्यासारखी सामान्य माणसं गांगरतात. 'ते म्हणत असतील म्हणजे खरंच असेल,' असा आपला आरंभीचा प्रतिसाद असतो. प्रश्न न विचारण्याचा, मोठ्यांवर संशय न घेण्याचा खास भारतीय रिवाज आपण पाळतो. पण ज्येष्ठांचा दावा आणि आपला अनुभव विसंगत ठरू लागला की, आपण पुन्हा गांगरतो. ज्येष्ठांचा उपमर्द करण्यापेक्षा गप्प बसणं बरं असं ठरवूनही टाकतो.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या बाबतीत असंच झालं. बरोबर ऐंशी वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यात १९२६ साली पहिलं शारदोपासक संमेलन भरलं होतं. त्याच्या अध्यक्षपदी राजवाडे होते. त्यावेळी राजवाड्यांनी "... मराठी भाषेचा संकोच आता इतका अतोनात होऊन गेलेला आहे की, ती यद्यपि अद्याप सपशेल मरून गेलेली नाही, तथापी सध्या ती फक्त धुगधुगी धरून आहे हे कबूल करणे भाग आहे." असं म्हटलं. झाले! महाराष्ट्रभर खळबळ उडाली. महाराष्ट्राचा सर्वांत मोठा-चतुरस्र इतिहासकार व संशोधक असं म्हणतो म्हणजे त्यात तथ्य असलंच पाहिजे! 'मराठीविना इतर भाषेत एक अक्षरही लिहिणार नाही.' अशी प्रतिज्ञा करणाऱ्या विद्वानाचा हा साक्षात्कार महाराष्ट्राला अचंबित करून गेला. सरकार, पारतंत्र्य, मध्यमवर्गाची आवड वगैरे बाबी इतिहासाचार्यांना माहीत होत्या. 'स्वराज्य मिळविलें पाहिजे व शाळा, कोर्ट व रेल्वेचा व्यवहार तुमच्या स्वभाषेतून चालू केला पाहिजे.' असा उपाय त्यांनी सुचवलेला होताही. कदाचित डिवचण्यासाठी, कदाचित स्वतःचं नैराश्य छपवण्यासाठी ते असं बोलले असावेत. परंतु त्यांच्या बाबतीत असं घडलेलं दिसतं की, जे त्यांच्या आसपास घडत होतं तेच सार्वत्रिक सत्य त्यांनी मानलं. वास्तविक राजवाडे फार हिंडत. प्रवास त्यांनी भरपूर केला. आपल्या मृत्यूच्या वर्षीच त्यांनी हे भाषण केलं. तेव्हा ते ६३ वर्षांचे होते. 'अध्यक्ष होण्याचीही मला अलीकडे फार भीती वाटू लागली आहे. घरापुढे पाण्याचा नळ घ्यावयाचा झाला तरीही त्या कृत्याला अलीकडे अध्यक्ष लागू लागला आहे. मोरी उकरली, लेझीम खेळली, शिंक मारली की, सभा भरवायची व अध्यक्ष बोलवावयाचा, असा संप्रदाय बनत चाललेला दिसतो.' अशी टिंगल त्यांनी सदर संमेलनानिमित्ताने केली होती.

मराठीच्या क्षयाने बेचैन झालेली मंडळी आज जी कारणं देतात, तीच नेमकी राजवाड्यांनी तेव्हा दिली होती. त्यांनी म्हटलं होतं, "... गृह, ग्राम, दुर्बल वर्तमानपत्रं व दुर्बलतर पुस्तकं सोडली म्हणजे समाजाच्या व्यवहाराचे जे बाकीचे प्रांत त्यांत मराठी भाषेची झाडून सारी अंगं थंडगार पडून गेली आहेत. देशातली सर्वांत मोठी व अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजे राजसंस्था. तिचा सर्व महत्त्वाचा व्यवहार परकीय भाषेत चालतो. म्हणजे राजकीय, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, दिवाणी, मुलकी, लष्करी, नाविक, तारायांत्रिक, प्रावासिक, स्थापत्यिक वगैरे जे-जे अगणित व्यवहार सरकार करते ते ते इंग्रजी भाषेद्वारा चालतात. तेथे आपल्या मराठीची ओळखही राहिलेली नाही. बाकी राहिले जे गृह्य, ग्राम्य, वर्तमानपत्रीय व ग्रांथिक व्यवहार त्यांच्यात तेवढा मराठीचा उपयोग आपण करतो; त्यांतही शिकलेली म्हणून ज्यांना म्हणतात, ते प्रत्येक दहा शब्दांस पाच-चार इंग्रजी शब्द ढकलून देतात-हौसेने ढकलून देतात, असं नव्हे तर इंग्रजी भाषा रोमरंध्रात बालपणापासून भिनून गेल्यामुळे शिकलेले लोक मनात विचाराचा संकल्प प्रथम इंग्रजी-मराठी मिश्र असा धेडगुजरी अपभ्रंशाच्याद्वारा तोंडातून सहज उच्चारितात. शिक्षितांच्या संसर्गान अशिक्षितांच्या तोंडी इंग्रजी शब्द बसत चालले आहेत. येणेप्रमाणे मराठीची तोंडदाबणी इतकी बेसुमार होत चालली आहे की, तिची डांबणूक अशीच आणीक पाच-पंचवीस वर्षे होत गेल्यास लवकरच सर्व महाराष्ट्र इंग्रजी भाषा शुद्ध किंवा अपभ्रष्ट अशी हाँगकाँगमधील पीज्यन इंग्लिशप्रमाणे बोलू लागेल असा निश्चित अंदाज दिसतो."

पुढील वर्षी १९२७ साली पुण्यातच बारावं मराठी साहित्य संमेलन झालं. त्याच्या अध्यक्षपदावरून श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी राजवाड्यांची भीती निराधार ठरवली. श्री. कृ. कोल्हटकर यांनी राजवाडे यांचं म्हणणं खोडलं विद्यालयांत चवथीपासून पुढे इंग्रजी बोधभाषा असणं, राज्य इंग्रजांचंच असणं, मराठीला विद्यापीठात प्रवेश नसल्यामुळे तिला विद्यापीठांत मान नसणं, विद्वानांनी इंग्रजीत ग्रंथ रचणं, नव्या कल्पना व वस्तू यांना प्रतिशब्द नसल्याने त्यांचा जसाच्या तसा स्वीकार वगैरे मुद्दे त्यांनी मांडले. कोणती भाषा शास्त्रीयदृष्ट्या मुमूर्ष कशी होते हे सांगून त्यांनी मराठीला तसा अजिबात धोका नसल्याचंही स्पष्ट सांगितलं. नंतरचा स्वातंत्र्य व महाराष्ट्र राज्यस्थापना यांचा इतिहास पाहता राजवाडे चुकीचे ठरले हे आपण जाणतोच. मराठीला सरणावर चढलेले बघणारे लोकही हीच चूक करत आहेत. राजवाड्यांना जी मराठी दिसली ती कोणाच्या तोंडात असे? पुणे, मुंबई, नागपूर येथील शहरवासीयांच्याच ना? तेव्हाचं शहरीकरण केवढं, आत्ताचं केवढं? तरीही भयाची उजळणी तशीच याला काय म्हणावं? सध्या निम्मा महाराष्ट्र शहरी म्हटला तरी राजवाडे यांचे विद्यमान विचारधारक किती इंग्रजी ऐकत असतील? पुणे-मुंबई वगळता विद्यापीठ, महाविद्यालयं, बँका, रेल्वे व बसस्थानकं, करमणुकीची केंद्र, प्रसारमाध्यमं, इस्पितळं, बाजार, हॉटेल अशा कैक ठिकाणी दहा टक्केदेखील इंग्रजी बोलली जात नाही. मग अवघा महाराष्ट्र इंग्रजीला फितुर झाला अशी भाषा कशाच्या आधारावर करण्यात आली? न्यायालयं, सरकारी कार्यालयं इथेही आवश्यकता आणि सक्ती असेल तरच (जशी उच्च न्यायालयांची खंडपीठ व विभागीय मुख्यालयं) इंग्रजी बोलली जाते. कॉन्व्हेंट शाळा वाढू लागल्या याचा अर्थ इंग्रजी बोलणारे वाढू लागले असा मुळीच नाही. शाळेतलं इंग्रजी संभाषण शाळेबाहेर सरावासाठीसुद्धा करता येत नाही इतका मराठीचा पगडा अजून महाराष्ट्रभर आहे. त्यातच इंग्रजीविषयी चीड, मत्सर व थट्टा या भावनांचा उद्रेक वारंवार होत असतो. त्यामुळे इच्छा व ज्ञान असूनही कोणी इंग्रजी बोलत नाही.

इंग्रजी चित्रपट जिथे जिथे लागतात तिथे-तिथे सारा प्रेक्षक लैंगिकता व मारधाड यांसाठीच ते पाहतो. हे दोन्ही घटक नसलेले इंग्रजी चित्रपट कुठेच चालत नाहीत. विनोदी इंग्रजी चित्रपट पुण्या-मुंबईबाहेर चालत नाहीत. समजले तर पाहिजेत ना? इंग्रजी टीव्हीलाही असाच प्रतिसाद असतो. विद्यापीठं व महाविद्यालयं यांच्या ग्रंथालयात इंग्रजी पुस्तकांचे वाचक विज्ञान शाखेकडील विद्यार्थीच असतात. प्लेटो, मार्क्स, कांट, डार्विन, माल्थस् स्मिथ, मिल, फ्रॉईड, आंबेडकर, गांधी, टागोर इत्यादी थोर लोक इंग्रजीमधून फारच थोड्यांना भेटतात. हिंदीत, मराठीत उपलब्ध असताना कोण त्यांचं मूळ लिखाण वाचेल? स्पर्धापरीक्षा मराठीत व हिंदीत देण्याची सोय (किंवा हक्क म्हणा) झाल्यावर कोण इंग्रजीचा पत्कर घेऊन पायावर धोंडा हाणून घेईल? भाषांनी महाराष्ट्राचे तुकडे केले असून, केवळ मराठी व केवळ इंग्रजी असे दोन भाग थेट पडलेले दिसतात. त्यातला केवळ मराठी हा विराट प्रदेश आहे. इंग्रजीला जिल्हा फार तर देता येईल एवढीच जागा दिसते. मराठी विज्ञान परिषद, मराठी अर्थशास्त्र परिषद यांप्रमाणे राज्यशास्त्र, इतिहास, वाणिज्य, समाजशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र आदींचे वार्षिक संसार नेमाने भरतात. प्रदूषण, पर्यावरण, वन्यजीवन, जलसंवर्धन, पर्यटन, भागभांडवल व गुंतवणूक अशासारख्या शाखा मराठी ज्ञानवृक्षाला फुटून त्या चांगल्या बहरलेल्या आढळतात. तसं पाहिलं तर पाकक्रिया, ज्योतिष, अध्यात्म व धर्म, काम व शृंगार, सौंदर्य आणि आरोग्य अशा महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तकं इंग्रजीत जास्त वाचली जातील तेव्हाच मराठी मुमूर्षु झाली अशी घोषणा करावी लागेल. अन्यथा काही कारण नाही. पुस्तकांचं सोडा, या कृती आणि त्यांचं ज्ञान जेव्हा इंग्रजीत दिलं-घेतलं जाईल, तेव्हाच मराठी मरणासन्न झाली असं ठामपणे म्हणता येईल.

महाराष्ट्रात नुकत्याच पालिका निवडणुका पार पडल्या. त्यांची किती इंग्रजी माध्यमांनी दखल घेतली? घेण्याचं तसं कारण नाही. कारण पालिका क्षेत्रात या माध्यमांचा वाचक, श्रोता, प्रेक्षक असला तरी ती माध्यमं त्यांची मतं पालटतील इतकी प्रभावी नाहीत व नसतात. पालिकांचा कारभारदेखील इंग्रजीवर अवलंबून नसल्याने त्या भाषेला तिथे मुळीच गि-हाईक नाही. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यांना इंग्रजीचं तर मुळीच सोयरसुतक नाही. एखाददुसरा बातमीदार वा सहसंपादक जिज्ञासू व अभ्यासू असतो. तो तेवढा त्या निवडणुकांची खबर घेईल व काहीतरी लिहील. 'रुरल मार्केट' शहरांपेक्षा जास्त व्यापक, खोल व वैविध्यपूर्ण असल्याचा साक्षात्कार उद्योगपती व व्यावसायिकांना झाला आहे. म्हणून 'ग्रासरूट'च्या राजकीय हालचालींची नोद घेतली जाईल. अन्यथा कंट्रीसाईड, मोफ्यूसिल, इंटेरियर असे शब्द वापरून ग्रामीण महाराष्ट्राची वाट लावता येते.

मराठीविषयी दुखवटा पाळणारे लोक नेमके मुंबई महापालिकेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक समोर आली की, बोलू लागतात असा एक संशय आहे. मुंबई वेगळी काढली जाणार, मुंबईचं स्वतंत्र राज्य होणार, सिंगापूर अथवा शांघाय याप्रमाणे मुंबई होणार अशा आर्त आरोळ्या मारल्या की, बावळट मराठी मतदार पाघळतो. 'मराठी हिताचं रक्षण' करणाऱ्या पक्षाला मतं देतो. आमच्या मराठवाड्यात शिवसेना आली आणि मराठवाड्याचं फार नुकसान झालं. आधीच मराठी, त्यात हिंदुत्वाचा उन्माद चढलेला एक अर्धशिक्षित, अल्पशिक्षित, शेतीतून उखडलेला, परंतु सेवा उद्योगात हातपाय असलेला वर्ग सत्ताधारी -झाला. पुरोगामी सोडा, आधुनिकतेच्या कसल्याच प्रकारांना त्याने उत्तेजन दिलं नाही. इंग्रजी निःसंशय आधुनिक भाषा आहे. पण ती ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या क्रूसाला बांधली गेली, म्हणून यांचा तिला प्रखर विरोध ! बरं, मराठी तरी हे धड बोलतील!! तिलाही सेनेने धर्म, रूढीपरंपरा, परधर्मद्वेष, देवदेवता यांच्या चरणी वाहून टाकलेलं. मराठवाड्यात सेनेचा विस्तार, जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणाची घसरण यांची वाटचाल अक्षरशः समांतर दिसते. बेकारी, बट्ट्याबोळ व बकालीकरण यांच्या मुळाशी मराठी भाषाच आहे हे आता मराठवाड्याला उमगलं आहे. त्यामुळे काहीही करून इंग्रजी आत्मसात करण्याची घाई मराठवाड्यात दिसते. *तशीच अवस्था कोकण, विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात असणार.

मराठी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते समतेचे, निधर्मीपणाचे आणि वैज्ञानिकतेचे पुरस्कर्ते नाहीत असा साक्षात्कार फार उशिराने म्हणजे जवळपास पंधरा-अठरा वर्षांनी मराठवाड्याला झाला. तसाच तो विदर्भ, कोकण यांचाही दिसतो. नेत्याचं वय, मुलाची कुवत, केंद्रातली सत्ता जाणं इ. कारणं सेनेच्या घसरणीमागे नाहीत. मराठी भाषा व तिने अवरुद्ध केलेला विकास हेच आहे. मराठीतून सामाजिक लोकशाही साध्य होऊ शकलेली नाही. आता भांडवली लोकशाही स्वीकारण्यासाठी इंग्रजीचा कैवार घेऊ पाहणारा मराठी समाज भांडवलशाही व लोकशाही यांच्यातील द्वैत पाहून बिचकून गेलेला दिसतो. एकाएकी शारीरिक व मानसिक विकार यांच्याबाबतचे मराठी चित्रपट येण्याचं प्रमाण वाढलं. त्यात तो उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो आहे.

असं असलं तरी, निखळ व सुबोध मराठीत वृत्तपत्रं अजूनही खपतात. जिल्हा पातळीवर नवनवी वृत्तपत्रं व साप्ताहिकं जन्मास येत आहेत. स्टार, झी, सीएन्एन्, आयबीएन्, सकाळ हे माध्यमसमूह मराठी वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात धडाक्याने उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे अथवा अल्पसंख्याकांची व्हायला निघाली आहे, हा विचारच व्यर्थ होय. मराठीची चिंता करणारे राजकीय भूमिकेतून अधिक पाहत आहेत. सेनेच्या आधीचं जे वातावरण होतं ते सेनेला घरघर लागण्याच्या आजच्या काळात पुन्हा स्थापित होऊ पाहतं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा काळ बघा. इंग्रजीतील पायाभूत व उत्कृष्ट ग्रंथांचे अनुवाद त्यांनी करवून घेतले. साहजिकच मूळ इंग्रजीतील उर्वरित पुस्तकांविषयी उत्सुकता वाढून महाराष्ट्र असंख्य परदेशी विचारवंत, शास्त्रज्ञ व साहित्यिक यांना आत्मसात करू लागला. मराठी व इंग्रजी यांचा एकाचवेळी ज्ञानभाषा म्हणून वापर करण्याचा तो काळ होता.

गेल्या दहा वर्षांत अनुवादाचं काम थंडावल्यात जमा आहे.

इंग्रजीकडे दुर्लक्ष आणि मराठीचा अतिरेक यांमुळे अशी वेळ आली. आता मात्र जे-जे इंग्रजीत आहे ते ते सारं मूळ इंग्रजीतच वाचायची ओढ लागलेली दिसते आणि ते वाचलंच पाहिजे. अशा काळात मराठीवर अवकळा पसरल्याचं भोकाड पसरणं म्हणजे ज्ञानाच्या मार्गात अडथळे उभं करणं होय, मराठी थिटी पडते आहे म्हणून इंग्रजीचा स्वीकार होऊ लागला आहे. मराठी निरुपयोगी झाली असा त्याचा अर्थ कोणी काढू नये. मराठी माणूस एवढा कृतघ्न नाही की, तो मातृभाषेचाच त्याग करील. जागतिकीकरणाच्या काळात तो वणिकवृत्ती आत्मसात करतो आहे, त्याचं हे लक्षण. आश्चर्य याचं वाटतं की, ज्यांनी इंग्रजी वातावरणाचा फायदा घेऊन आत्मविकास केला ते आज मराठीच्या टिकाऊपणाची काळजी करत आहेत. त्यांच्या अवतीभवती त्यांचा मराठी माल खपेनासा झाला म्हणून की, काय ते मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र या अखंड मराठी विभागात मराठीचा गजर करीत आहेत. अजीर्ण झालेल्याच्या ताटात आग्रह करकरून पक्वान्न वाढण्यासारखा हा प्रकार झाला!

आम्हां पुण्या-मुंबईबाहेर राहणाऱ्यांना मराठीचं अजीर्ण झालं आहे. गेली कित्येक शतकं आम्ही मराठीचं पीक काढतो... ते पुढेही काढत राहणार. परंतु त्याचे क्षेत्र कमी करणार. इंग्रजीचं 'कॅश क्रॉप' आम्हालाही लावून बघू द्या की! आमच्या प्रदेशात मराठीने फतकल मारल्याने कोणकोणतं नुकसान झालं? येथील मुलांना व त्यांच्या पालकांना हॅरी पॉटर काय प्रकार आहे माहीत नाही. 'टॉम अँड जेरी' यांचा निर्माता जॉन बार्बर वारला, यांना काही सोयरसुतक नाही. ओरहान पामुक या तुर्की लेखकाला साहित्याचं नोबेल लाभलं व भारतीय-तुर्की संस्कृतीचं सख्य बघता सदर लेखक वाचला पाहिजे, याचं गम्यच कोणाला नाही.

अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत झाल्याचं यांच्या गावीही नाही. रशियात पुतीनविरोधी लोक मारले जातात याची खबर त्यांना नाही. किरण देसाई या भारतीय तरुण लेखिकेला बुकर पारितोषिक मिळाल्याचं त्यांना ठाऊक ना अफगाणिस्तानात पुन्हा बराचसा भाग तालिबानच्या ताब्यात गेला आहे याचा त्यांना पत्ता नाही. शेजारच्या बांगला देशात दोन प्रतिस्पर्धी महिला पुढाऱ्यांनी देश वेठीस धरल्याचं ते जाणत नाहीत. पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्ष तूर्त स्थगित असून अमेरिकेन उद्ध्वस्त केलेलं लेबनान हे राष्ट्र नव्या जोमाने उभारणीस लागल्याचं त्यांना ज्ञात नाही. इंग्लंडमध्ये अचानक कायदा बदलल्यामुळे हजारो भारतीयांच्या वास्तव्यास खतरा उत्पन्न झाल्याचं त्यांना ठावे नाही... अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आम्हांला माहीत नाहीत. कारण आमची मराठी पत्रं व मराठी वाहिन्या आमचं माहितीविश्व इतकं मराठीमय करून सोडतात की, हळदी-कुंकवाच्या व नामफलकाच्या अनावरणाच्या हकिकती आम्हाला इत्थंभूत समजतात; पण जगाने कोठून कोठे वळण घेतलं ते कळत नाही. मराठी भाषेने प्रादेशिक वार्ताची कॅप्सूल करून ती केवळ मराठी पाण्याच्या घोटाबरोबरच पोटात टाकण्याची सोय केल्याने मराठीच भुकेला इंग्रजी अन्नाची सवयच उरलेली नाही. मराठीची इतकी तृप्ती आम्हाला आता पुरे, भाकरी टाकून बेकरी पत्करण्याचा तडकाफडकी विचार करणं आम्हांला परवडणार नाही. मात्र भाकरीसोबत बेकरी राहणार यात शंका नाही.

स्वभाषेचा अभिमान बाळगूनही काही गोष्टी स्पष्टपणे मांडायला हव्यात. महाराष्ट्रीय इतिहासाचा अहंकार इथे सर्व जातींत दिसून येतो. टिळक, सावरकर, आंबेडकर, कॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण आदी नेत्यांचे अनुयायी भयंकर अहंकारांनी ग्रस्त असतात. या नेत्यांची थोरवी मराठीतच पुनःपुन्हा मांडावी लागत असल्याने मराठीखेरीज अन्य भाषा त्यांना शत्रूच वाटते. इंग्रजी तर नकोशीच कारण ती अभिजनांची, श्रीमंतांची! कोणती भाषा श्रेष्ठ व कोणती भाषा कनिष्ठ हे ठरवणारे संस्कृतोद्भव ब्राह्मण्य अजून टिकून आहे. महाराष्ट्रात याचा हा ढळढळीत पुरावा. दुसरी बाब मराठीची अतिपरिचयाने होत राहणारी अवहेलना, अवज्ञा आणि विटंबना. त्याकडे तर कोणाचंच लक्ष नाही. खैर, त्याविषयी पुन्हा कधीतरी. शेवटी जोतीबा फुले या महात्म्याने जी 'अखंडादी काव्यरचना' केली, त्यातील काही अखंड प्रोत्साहनार्थ इथे सादर-

(१५)

स्वभाषा लिहावी भाषण करावे ।। सद्गुणी असावें ।। स्वभावांत ।।१ ।।
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ।।शाळा तपासाव्या ।। योग्य वेळी ।।२।।
मुढमांगासह ब्राह्म मुजोर ।। मूळ सत्य सार ।। त्यांस सांगा ।।३ ।।
निर्मीकाचा धर्म एक आहे सत्य ।। व्यर्थ कां पांडीत्य ।। जोती म्हणें ।।४ ।।

(१६)

इंग्रजी लिहावें भाषण करावें ।। जगांत त्यागावें ।। व्यसनास ।।१।।
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ।। शाळा तपासाव्या ।। गावोगावीं ।।२ ।।
आवेशी ख्रिस्तास करा सत्यबोध ।। करावे सावध ।। बंधूपरी ।।३ ।।
सत्यावीण नाही जगीं अन्य धर्म ।। कळवावें वर्म ।। जोती म्हणे ।।४ ।।

(१७)

यवनीं लिहावें भाषण करावें ।। सर्वस्वी त्यागावें व्यसनास ।।१ ।।
चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या ।। शाळा तपासाव्या ।। नगरींच्या ।। २ ।।
सुनीशिया सर्व करा सत्यवादी ।। त्याची जहामर्दी ।। जगाठायी ।।३ ।।
जगामाजी एक सत्यधर्म खास ।। सांगा सर्वत्रांस ।। जोती म्हणे ।।४ ।।

(१८)

तीन भाषेमध्यें सध्या जे निपूण ।। सद्गुणींसंपन्न ।। मानवंत ।।१।।
चाळीशीच्यावर मुख्य दीक्षा घ्यावी ।। गादी सांभाळावी ।। समाजाची ।।२।।
क्षेत्री ख्रिस्ती महंमदी आळवावे ।। सत्य वर्तवावें ।। त्यांचे हस्ते ।। ३ ।।
सत्यावीण नाहीं जगीं अन्य धर्म ।। कळवावें वर्म ।। जोती म्हणे ॥४ ||

(१९)

सर्व भाषेमध्यें सध्या जे निपूण ।। सद्‌गुणीं संपन्न ।। सत्यवादी ।।१ ।।
त्याला नको दीक्षा गादी पाठबळ ।। वर्षांची अगळ ।। त्याला नको ॥२॥
लेखी भावंडे तो अथवा ती सर्व ।। करीना बा गर्व ।। पाखंडाचा ।। ३ ।।
सत्यावीण नाहीं त्यास मुख्य धर्म ।। सत्य ज्याचें कर्म ।। जोती म्हणे ।।४ ।।


जयदेव डोळे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results