१. एक पत्र
बोथट बंगला
निर्विकार रस्ता
भावनानगर
प्रिय मित्र,
स. न. वि. वि.
तुम्हाला माझी दया येत नाही काय? मी लेखक आहे हा जणू माझा अपराध! भोवती जे दिसतं आहे ते मी सांगावं हा तुमचा आग्रह. खरं तर हे सारं अस्वस्थ करणारंच असताना पुन्हा ते सांगणं अधिक क्लेशकारक असतं. प्रत्येक वेळेस दोन रसायनं एकत्र आली की एक नवं रसायन तयार होतं आणि ते अधिक दाहक असतं; पण ते नवं रसायन तयार होताना जे नवं तापमान निर्माण होतं ते साक्षीभाव बाळगणाऱ्या लेखक-निरीक्षकास सोसावं लागतं. आणि त्यातून हे सारं प्रकट करावं असा तुमचा आग्रह आहे. म्हणून म्हटलं, की तुम्हाला माझी दया येत नाही काय?
आपला मित्र
लेखक
२. फर्स्टक्लास - ए-२
रेल्वेचा फर्स्टक्लासचा डबा. वातानुकूलित. आमदारांची गर्दी. परतताहेत ही मंडळी राजधानीकडून. इथं मतदार नाहीये ऐकायला-पाहायला. त्याला प्रभावित करण्याचं इथं प्रयोजन नाही. सगळे सैलावलेत. थोड्या जिभा सैल सुटल्यात. कदाचित मद्याचा परिणाम असावा. आपसात चेष्टामस्करी चाललीय. त्यांचं एकूण म्हणणं असं, की आपली लोकशाही पक्व नाही. असती तर मतदार जनतेनं आपल्या ढुंगणावर लाथा मारून आपल्याला घरी बसवलं असतं. पण इतक्यात अशी वेळ येणार नाही. अजून लोकशाही बाल्यावस्थेत आहे. अजून रांगते आहे. मूलभूत सुविधा देण्याचं आश्वासन दिलं की अजूनही ग्रामीण जनता मतदान करते आहे. आणि त्यांना लागतं तरी काय? निवडणूक आली की मद्य आणि मांस दिलं की नाचणारे मिळतात. ते कुणासाठी नाचतात? तर त्यामागे उद्देश नसतो. ते कुणासाठीही नाचतात, वाद्याच्या तालावर कधी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत, तर कधी आमदारकीच्या निवडणुकीत. ‘पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर जेवढा खर्च होतो तेवढ्या खर्चात कायमस्वरूपी नळयोजना होऊ शकते, तर ती का होत नाही?' असा सवाल जोपर्यंत जनता विचारत नाही तोपर्यंत तिचं शोषण करून लोकशाहीतलं राज्य चालवता येईल. आणि तोपर्यंत आपलंही बरं चालेल. एकाने कबुली दिली, की स्वातंत्र्योत्तर काळात ‘लोकप्रतिनिधी' हा नवा व्यवसाय निर्माण झाला आहे. ज्याला बुद्धी आणि श्रमजीवनात राहायचं नाही (त्यासाठी तो पात्र नाही किंवा स्वत:ला तसं मानत नाही.) तो या नव्या चलाख व्यवसायात अजूनही येऊ शकतो आणि लाटेवर स्वार होऊन जनतेचं शोषण करू शकतो. तर निर्धास्त रहा. अजूनही धोका नाही. अजूनही जनतेला मूर्ख बनवता येतं. नवी नवी खेळणी मात्र द्यावी लागतात. कधी राममंदिर असेल. कधी प्रादेशिक विकास असेल. कधी युद्ध असेल. कधी सीमावाद असेल. कधी नोकरशाहीचे वाढते पगार असतील. या खेळण्यांमुळे जनतारूपी बालक दंग राहू शकतं. तेवढ्या वेळात जे कल्याण साधायचं आहे ते साधून घेता येतं. मग दहा अण्णा हजारे येऊन ओरडून गेले तरी काय फरक पडतो?
इथे आमदारांचं प्रामाणिक आत्मपरीक्षण होतं आहे. चेष्टामस्करीयुक्त. इथे व्यासपीठ नाही. इथे ऐकणारा मतदार राजा नाही. इथं कोणी कोणाला प्रभावित करण्याचा प्रश्न नाही. पण इथं एक लेखक ऐकतो आहे, पेपरमध्ये डोकं खुपसून. या साऱ्यांना प्रामाणिक आत्मभान आहे, हेही महत्त्वाचं वाटतं आहे लेखकाला.
३. उद्धट तरुण
विमनस्क दिसणारा, दहावी नापास असलेला, दिशाहीन असा बेकार तरुण ‘व्हिडिओ पार्लर' चालवण्याचा परवाना घेण्यासाठी आला होता. पैसे मिळवण्यासाठी त्याला हा धंदा बरा वाटला होता. गरजेनुसार अश्लील चित्रपटसुद्धा दाखवण्याची त्याची तयारी होती. शासनदरबारी त्याला परवाना मिळत नव्हता याचा त्याला संताप येत होता. तहसीलदारापासून सगळेच दोषी, भ्रष्ट असं त्याला वाटत होतं. नियमात बसत नाही असं माझं एकट्याचंच प्रकरण तुम्हाला दिसतं काय, असा त्याचा संतप्त सवाल. नंतर युती शासनकाळात हा तरुण मंत्री झाला तेव्हा मंत्रालयात लेखकाला भेटला. आता त्याच्या हातात ‘मोबाइल' होता. कपाळावर मोठा टिळा होता. दाढी वाढवलेली होती. उद्धटपणा वाढला होता. जनसेवक म्हणून तो उभा असला तरी त्याच्या वागण्या-बोलण्यातले तामसी गुण उफाळले होते. त्याच्यामागे त्याच्यापेक्षा जास्त तामसी आणि उद्धट तरुणांची फळी होती. ते सगळे त्याच्या मागोमाग चालत होते, जणू कसल्याशा नशेत असावेत तसे. नशा सत्तेची होती. नशा पैशाची असावी. तुच्छता होतीच. सगळीकडे आपलाच अग्रहक्क मानत होती. लिफ्टवर आपलाच अधिकार. आपल्याला रांगेत उभं राहायचं कारण नाही. दंडेली करून, उद्धटपणे, सभ्यतेचा चोळामोळा करून ही अनुयायांची फळी वागत होती. त्यांचा एक असभ्य, नापास होणारा पण चलाख प्रतिनिधी आता राज्यकर्ता आहे, तेव्हा त्यांनी नियम पाळायची गरज नाही. ते लिफ्टमनला मारहाण करू शकतात. रांग मोडू शकतात. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. प्रत्येकाला एक मस्ती आहे. कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवता हात जोडून जणू यांनाच विनवणी करते आहे. लेखक हे पाहतो आहे, यांचे धक्के खात.
४. अकस्मात भेट
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मनोऱ्यातल्या हिरवळीचा विध्वंस झाला. कारण इथं खूपसे ग्रामीण लोकसंगीतावर नाचले. खूपसा गुलाल उधळला गेला. मनोऱ्यात खूप गर्दी होती. लेखकाला अचानक एक शेतकरी भेटला इथे. लेखक तहसीलदार असताना हा शेतकरी नेहमी येत असे, काही कामानिमित्त. तो गुलालाने माखला होता. झालेला संवाद असा-
लेखक : अरे, इथे कुठे आलात मुंबईत?
शेतकरी : नाचायला आलो!
लेखक : नाचायला?
शेतकरी : नाना मंत्री झाले! त्यांनी आणलं. लई लोक
आलेत- मी एकटा नाही.
लेखक : का आलात तुम्ही ? आणलं म्हणून?
शेतकरी : तिकडं तरी काय आहे? त्यातून ही मुंबैची चकाचक केव्हा पाहणार? तिकडे तर दुष्काळच आहे!
लेखक : कसे आलात?
शेतकरी : त्यांनी बस केली आहे. खाणं-पिणं त्यांच्याचकडं. आपण येऊन फक्त नाचायचं!
लेखक : पिणं पण का?
शेतकरी : (लाजून) हौ!... त्याशिवाय नाचता येत नाही!
लेखक : नाना मंत्री झाले म्हणून तुम्ही नाचण्याचं प्रयोजन काय आहे? तुम्हाला खरोखर आनंद झाला आहे कां?
शेतकरी : पण खायला-प्यायला मिळतं! दुसरं काय?
लेखक : तुम्हाला कोणी आणलं?
शेतकरी : त्यांनी!
त्यांचा संयोजक एक तरुण आहे. तो मेंढरं हाकलण्याच्या अविर्भावात उभा आहे. हातात चाबूक नाही, पण मोबाइल आहे. तो चेहऱ्याने कठोर आहे. तोही ग्रामीण भागातूनच आला असणार. पण इथं येऊन त्याने एक स्थान नक्की केलं असणार. हे स्थान ‘माणसं पुरवणाऱ्याचं' आहे. त्याने कठोरपणे लेखकाकडे पाहिलं. त्याने शेतकऱ्याला म्हटलं, 'चलाऽ!' मग खूपशी उपाशी माणसं त्याच्या मागोमाग गेली. त्यांना खाऊ-पिऊ घालून बसमधून परत पाठवण्याचं त्याचं काम आहे. ‘अडाणी' माणसांचा जथा यंत्रवत त्या संयोजकामागून चालतो आहे. हा संयोजक त्यांच्या निर्बुद्धतेचं आणि अगतिकतेचं शोषण करतो आहे. शेतकरी पांढऱ्याशुभ्र मोठ्या बसगाडीत बसला. बसताना त्याने लेखकाला हात केला. आता त्याचं प्रयोजन संपलं. आता त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला दुष्काळी क्षेत्रात परत पाठवलं जाईल. तो ‘नाचायला' आला होता. नाना मंत्री झाले म्हणून त्याने घाम गाळला. त्याच्याबरोबर ‘लई' लोक आले होते. संयोजक तरुण त्यामुळे यशस्वी झाला होता. लेखकाने शेतकऱ्याला हात उंचावून निरोप दिला.
५. एका स्वच्छ, बुद्धिवादी वाचनालयातली घटना
पुण्यातल्या एका बुद्धिवादी (आणि बुद्धिजीवी) संस्थेमधली स्वच्छ अशी वाचनालयाची इमारत. चकाचक काचेची कपाटं. काचेची शेल्फस. साऊंडप्रुफ वातावरण. टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता. लेखक मासिकं आणि पेपर्स चाळतोय. काही बुद्धिवादी व्यक्ती ‘रिफ्रेशर कोर्स'साठी आले आहेत. त्यांचं हलक्या आवाजातलं कुजबुजणं, हाच काय तो अपवाद. लेखक दचकतो. तो वृत्तपत्रात एक फोटो पाहतो. फोटोत ‘हिंदुहृदयसम्राट' आहेत. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री वाकून नमस्कार करताहेत. वाकणं पंचेचाळीस अंशातलं, नम्र असं. कोण्या बुद्धिवाद्याने रोषाने आणि मौन अशा निषेधाने काळ्या पेनने वाकलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना श्वानाची वाकडी शेपूट काढली आहे. ते रेखाटन छायाचित्रात मिसळून जातंय. खरंच वाटतंय.
लेखक थोडं हसतो. एक बुद्धिवादी दचकतात.
'काय झालं?'
लेखक त्यांना छायाचित्र दाखवतो. बुद्धिवादी हसतो.
'हे म्हणजे न बोलता केलेलं भाष्य आहे!'
'पण हे भ्याड असंही भाष्य आहे! उघडपणे बुद्धिवादी काही स्पष्टपणे का
बोलत नाहीत?'
नंतर दोघं-तिघं जवळ येतात. एक चर्चा होते.
त्याचा मथितार्थ असा-
-उघडपणे बोलणं म्हणजे स्वत:चा घात करून घेणं नव्हे काय?
-वाईटपणा घेणं कोणाला शक्य असतं?
-राज्यकर्ते जरी बुद्धिवाद्यांना ‘यूज ॲण्ड थ्रो' करत असले तरी बुद्धिवाद्यांना राज्यकर्ते जवळचेच वाटतात.
-धोरण पाळावंच लागतं.
एक म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्र्याचं वागणं, वाकून नमस्कार करणं नाटकी आहे, हे ‘हृदयसम्राटांना' पण माहीत असणारच. तिथंही असाच खेळ आहे... यूज ॲण्ड थ्रो!
६. एक पत्र
प्रिय लेखक,
बोथट बंगला,
निर्विकार रस्ता,
भावनानगर,
स.न.वि.वि.
तुमच्या मार्गदर्शनाने आणि सदिच्छेने माझ्या मुलाला नोकरी तर लागली; पण नवाच त्रास त्याला सुरू झाला आहे. हा त्रास जातीयतेचा आहे. आपण म्हणतो, की नगर आणि महानगरात क्रमश: जातीयवाद कमी होत गेला असून ग्रामीण पातळीवर जातीयवाद घट्ट आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की ग्रामीण पातळीवर जातीयवाद प्रामाणिक व स्थूल असून, क्रमश: वर तो अप्रामाणिक आणि सूक्ष्म आहे. भले भले विचारवंत आणि मोठी माणसं अंतिमत: जातीयवादीच सिद्ध होतात ही किती शोकांतिका! मी स्वत:च येऊन चर्चा करीन तुमच्याशी. त्यातून दुसरा त्रास म्हणजे या नव्या पोराला ते सगळे भ्रष्टाचार शिकवत असून ‘बॉस'साठी पैसे घ्यायला लावत आहेत. म्हणजे याला अनैतिक करण्यासाठी तिथली व्यवस्थाच कामाला लागली आहे. नकार दिला तरी त्रास, न दिला तरी त्रास. त्यातून त्यांचा एक ग्रुप आहे. जातीयवाद व्यक्तिगत आहेच, त्याचप्रमाणे तो सामूहिकही आहे. आता या नव्याने नोकरीला लागलेल्या पोराने काय करावं, सांगा बरं!
आपला
७. रामदेवराव
रामदेव दलित तरुण आहे. बुद्धिमान आणि लिहिणारा, वाचणारा आहे. त्याला कायदा समजतो. तो सरकारी नोकरीत आहे. नोकरीत ‘मराठा लॉबी' आहे. सरंजामशाहीचे अवशेष इथं जपले जातात. रामदेव एकटाच दलित आहे इथे. लेखकाने असं ऐकलं, की इकडला उत्कृष्ट अधिकारी त्या सरंजामशहाच्या घरी पाणी भरतोय. म्हणजे अक्षरश: नाही, पण त्यांच्या मागोमाग चालतोय. त्यांची छोटीमोठी कामं करतोय. लेखकाने त्याला छेडलं. लेखक म्हणाला, की प्रतिगामी शक्तींचा अनुनय करून तुझी आणि तुझ्यासारख्या इतरांची वैयक्तिक आणि सामूहिक उन्नती होत नसते. वापरून घेऊन शेवटी ही मंडळी लाथा मारतात. तेव्हा आत्मभान ठेवणं आवश्यक आहे. रामदेवरावाचं त्यावरचं म्हणणं असं, की सत्तेत सहभाग जरी मिळणार नसला तरी सत्ताधाऱ्यांबरोबर ऊठबस महत्त्वाची आहे. त्या निमित्ताने तुम्ही ‘प्रमुख प्रवाहा'शी जोडलेले राहता. स्वाभिमान इत्यादी कल्पना बाळगून ‘मायनॉरिटी'मधली मंडळी तुटलेली राहत आली. त्यांनी या मंडळींबरोबर राहूनच अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे, ही बदलत्या काळाची गरज आहे. त्याचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे. आता तो त्या मराठा अधिकाऱ्यांच्या बरोबर असतो, पण अक्षरश: त्यांच्या मागोमाग चालतो. बहुजन समाजाची चळवळ त्याने दहा वर्षं मागे नेली आहे. लेखक या बदलत्या मानसिकतेला पाहतो आहे.
८. पुन्हा एक पत्र!
प्रिय लेखक,
स. न. वि. वि.
महाराज येऊन गेले. मी तुम्हाला त्यांच्याकडे चला म्हणतोय, पण तुम्ही येत नाही. आल्या आल्या हातातून त्यांनी चांदीची मूर्ती काढली. त्यांना आश्रम काढायचाय. जागा पाहिली आहे. तुमच्यासारख्यांनी आध्यात्मिक शक्तीचा लाभ घेतला पाहिजे. माझी सगळी मुलं त्यांच्या पायाशी आहेत. मुख्यमंत्री येऊन गेले. महाराज अवतार आहेत, महायोगी आहेत. समर्पित व्हा! डिव्होशनशिवाय काहीच मिळत नाही. जय गुरुदेव!
आपला,
९. भाजीपाला आणि सोनंचांदी
भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडले तेव्हा वृत्तपत्रांतून बातम्या येऊ लागल्या. कनिष्ठ मध्यमवर्गाला झळ बसली म्हणे. आणि विक्री होईना म्हणून कष्टकरी-श्रमजीवी विक्रेत्यांना ही झळ बसली आहे. कनिष्ठ पातळीवरची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लेखक भाजी मार्केटमध्ये गेला तर हीच चर्चा. माल येत नाही. जो येतो तो महाग विकला जातो. दलाल लुटतात. अर्थव्यवस्था त्यांच्या हाती आहे. भाजी विकणारे अडचणीत आहेत.
गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे त्याच दिवशी लेखक सराफाच्या दुकानात गेला, बायकोबरोबर. तिथली गर्दी पाहून त्याला धक्का बसला. भाजीपाल्यासारखं सोनं विकलं जात होतं. माणसं नोटांची पुडकी फेकत होती, सोनं विकत घेत होती. उभं राहायला जागा नाही. काउंटरवरून सर्व्हिस देता देता पुरेवाट. प्रत्येक बाई सराफाचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी प्रयत्न करतेय. कोणाला सोनं मोडून जास्तीचं घ्यायचंय. कोणाला मुहूर्त गाठायचाय. कोणाला फक्त दहा ग्रॅम सोनं घ्यायचंय. अंगठ्या, चेन्स, बांगड्या, वळ्या. क्लोज सर्किट कॅमेरा, ए.सी.ची हवा, गर्दी, गोंधळ, नोटांची बंडल्स, चकाकता सोन्याचा धातू, चकाकते डोळे. भारतीय मानसिकता! भारतीय अर्थव्यवस्था!
दरवर्षी लागतात तसे दहावी-बारावीचे निकाल लागले. मुलांना विचारलं गेलं की पुढे काय व्हायचं आहे? सर्वांनी एकमुखी उत्तर दिलं, की त्यांना ‘डॉक्टर-इंजिनियर' व्हायचं आहे. जणू या दोनच वाटा आहेत जगण्याच्या! लेखक बहुजन समाजाच्या आपल्या मित्राला भेटायला गेला. मित्राचा मुलगा बारावी पास झाला होता. पेढे वगैरे खाल्ल्यानंतर-
'काय, मुलाला डॉक्टर करणार?'
'कसं करणार?'
'का? मुलगा हुशार आहे.'
'आहे!... पण या डॉक्टरी नावाच्या बौद्धिक क्षेत्रावर सर्वांनीच हक्क सांगू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे!'
'उगाच चिडताय... कसं ते सांगा.'
'ते पहिल्यांदा म्हणाले, इंग्रजीत पन्नास टक्के पेक्षा जास्त मार्कवाले पात्र... म्हणजे ग्रामीण विद्यार्थी आणि आमच्या बंड्यासारखे विद्यार्थी या परीक्षेला बसूच शकत नव्हते... यू आर ॲटॉमॅटिकली प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ फ्यूज...'
'पण तुम्ही हे इंग्रजीतच बोलताय.'
'आमच्या मुलांना इतकं इंग्रजी येत नाही... पण आता हा नियम बदललाय म्हणेऽ.'
'मग?'
'आता निगेटिव्ह मार्कांची भानगड आहे!'
'पण तोही नियम काढून टाकलाय.'
'टाकलाय... पण ही परीक्षा जास्तीत जास्त अवघड ठेवून सर्वसामान्यांना अशक्यप्राय करण्याचा हा डाव आहे.'
'डाव?'
'डावच!... तुमची मुलं डॉक्टर होऊ नयेत! त्यांनी श्रमाचीच कामं करावीत, आमच्या मुलांनी परदेशात जावं, ज्ञान-प्रसिद्धी आणि पैसा कमवावा, तुम्ही आहात तिथं राहावं...'
'अरे, पण...'
'फारच झालं तर आयुर्वेदात वगैरे वैद्यकी करावी, पण एमबीबीएस काही होऊ देणार नाही आम्ही. कारण त्या बौद्धिक क्षेत्रावर आमची मक्तेदारी आहे!'
लेखकाने मित्राला म्हटलं,
'मग तू काय ठरवलंय?'
'मी? मी मुलाला डॉक्टरच करणार!' मित्राने कडवटपणे म्हटलं.
१०. अजब कोंडमारा
सकाळीच लेखकाकडे काही तरुण आले. ते सल्ला मागायला आले होते. एकाचं म्हणणं, की त्याला नोकरी लागते आहे, पण त्याला कोणीतरी पैसे मागतं आहे.
'कोण? आणि किती?'
'पन्नास हजार!... स्वत: आमदार..'
'देऊ नकोस!'
'मग बेकार बसू? सगळीकडे भ्रष्टाचार आहे!... पण बेरोजगारी स्वीकारून बसू? किती भयानक फ्रस्ट्रेशन येत चाललं आहे!'
'मग?'
'काही तरी व्यवस्था करतो. शेती विकू का, विचारायला आलोय.'
दुसऱ्या एका मुलाला लग्न करायचंय, पण मुलगी ‘खालच्या जाती'तली आहे. विरोध आहे. काय करू, म्हणून विचारतोय. तिसऱ्या मुलाला काहीच सुचत नाहीये. काहीच ‘क्वालिफिकेशन' नाहीये. पत्रकारिता करू की राजकारणात गुंडगिरी करू, की आमदाराचा प्रतिनिधी होऊ, की लाचखोरीतला मध्यस्थ होऊ की काय करू? लेखक नुसतं ऐकतोय. तो बधिरच झालाय.
११. मानसशास्त्र, जातीयवाद आणि एक पत्र
एका विद्वानाची गाठ पडली. विद्वानाला लेखकाने या देशातल्या जातीयवादाबद्दल विचारलं. त्यांचं म्हणणं, की जातीयवाद संस्कार बनून अर्धजागृत मनामध्ये प्रवेश करून आहे. बौद्धिक स्तरावर विचारी माणूस जातीयवाद नाकारत असला तरी व्यक्तिगत जीवनात जातीयवाद नाकारणं त्याला क्लेशकारक असतं. उदाहरणार्थ, दलितांबरोबर रोटी-बेटी व्यवहार, विशेषत: बेटी व्यवहार. सैद्धांतिक पातळीवर जातीयवाद पाळला जातो. म्हणून समाज दोन दांभिक स्तरांवरून जगताना दिसतो. लेखकाने मग या अर्धजागृत चेतन मनाच्या असल्या संस्कारावर उपाय विचारला. विद्वानांकडे यावर उपाय नव्हता. बुद्धाने किंवा बसवेश्वराने उपाय सांगितले आहेत. पण समाजाच्या अर्धजागृत चेतन मनावरच्या जातीयवादी संस्कारावर काही उपाय नाही.
लेखक निरोप घेऊ लागला तेव्हा विद्वान चहाचा आग्रह करू लागले. मग समजलं, की त्यांच्या मुलासाठी स्थळ बघणं चालू आहे. त्यांना मुलगी त्यांच्याच शाखेची पाहिजे आहे. परतल्यावर एक पत्र मिळालं. एका नवीन उमेदीच्या लेखकाचं, छोट्या गावात राहणाऱ्याचं. त्याचं पत्र पुढीलप्रमाणे-
आदरणीय सर,
बोथट बंगल्यावरून निर्विकार रस्त्यावरून जाताना नेहमी भेटायची इच्छा होते, पण हिंमत होत नाही, म्हणून हे पत्र.
छोट्या ठिकाणच्या लेखकाचे प्रॉब्लेम्स असतात. उदाहरणार्थ, मी एकामागोमाग एक पारितोषिकं मिळवत आहे, पण इथली मंडळी दखल घेत नाहीत, कारण त्यांच्यापर्यंत त्याचं महत्त्वच पोहोचत नाही. ही मंडळी उच्चवर्णीय, उच्च जातीची, मूठभर आणि अहंकारी आहेत. कूपमंडूक आहेत. नवं काही वाचतच नाहीत. त्यांना ‘वाचतं' कोण करणार? त्यांचं वाचन साठ सालापलीकडचं नसतं. मी लेखनात नवे नवे प्रवाह आणण्याचा प्रयत्न करतो आहे, हे यांच्या गावीही नाही. आपल्या जातीच्या पलीकडे बघायचं नाही आणि सावरकर-विवेकानंद यापलीकडे जायचं नाही. मग माझी उपेक्षा होणार नाही तर काय?
आपला
ऊर्फ ‘धूमकेतू'
एक टिपण- ‘जातीयवाद व्यक्तिगत असू शकेल, पण तो नव्या युगातसुद्धा सामूहिक कसा असू शकेल? उदाहरणार्थ, एखादा राजकीय पक्ष जातीयवादी कसा असू शकेल? विशेषत: असा पक्ष जेव्हा राज्यकर्ता पक्ष बनतो तेव्हा? तुम्ही जाहीरपणे, धोरणात्मकरीत्या विशिष्टांचे हितसंबंध जोपासण्याची घोषणा करता तेव्हा तुमचं धोरण नैतिक राहतं काय? नसल्यास तरीही तुम्ही राजकीय पक्षाच्या स्वरुपात राहू इच्छिता, हा या शतकातला चमत्कार मानावा लागेल. असे चमत्कार भारतात घडतात. ही विनाशाकडे वाटचाल आहे.'
या टिपणाची कोणीच दखल घेतली नाही, हे लेखकाच्या लक्षात आलं. कारण कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. रथयात्रेची तयारी मात्र सुरू राहिली.
हा देश सुपर पॉवर होईल, अशी घोषणा होते आहे. याला नॉस्त्रादेमसच्या भविष्यवाणीचा आणि काही अन्य भाकितांचा आधार घेतला जातोय. सामान्य माणूस सुखावतोय. त्याच्या ‘हिंदू' असण्यातल्या अहंकाराची तृप्ती होतेय. तो जे वृत्तपत्र वाचतो त्यात सतत मुसलमानविरोधी मजकूर छापला जातोय. सतत जम्मू-काश्मीरबद्दल छापलं जातंय. युद्ध झालं पाहिजे, खोड मोडली पाहिजे, असंही लिहिलं जातंय. सामान्य माणूस हे वाचतोय. बोलतोय. प्रत्यक्ष युद्धाचा आणि त्याचा संबंध नाही. त्याचं युद्ध त्याच्या ‘बॉस'शी आहे, आर्थिक परिस्थितीशी आहे, रोजच्या जगण्याशी आहे, वैयक्तिक दु:खाशी आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात एका सोळा वर्षांच्या मुलीला लेखकाने काही प्रश्न विचारले होते. तिनेही ‘युद्ध व्हावं' असं म्हटलं आहे. राज्यकर्ते या सोळा वर्षांच्या मुलीपेक्षा जास्त बुद्धिमान वाटत नाहीत. त्यांचंही तसंच मत असल्याचं छापलं जातंय. युद्ध झालंच तर आपण पुन्हा मागे फेकले जाऊ, सुपर पॉवर होणं शक्य नाही, तो खर्च आपल्याला झेपणार नाही, असं विद्वान सांगताहेत. पण आपल्याला ‘राम मंदिर' पाहिजे आहे. आपण ‘कोण हा महात्मा?' असा सवाल करतो आहोत. आपण लेख लिहिल्याने दलित-दलितेतर लढाया होत आहेत. भिंती फोडून नोटांची चलनं बाहेर काढली जाताहेत. माजी पंतप्रधान तुरुंगात जायच्या वाटेवर आहेत. रेल्वेचा डबा जाळला जातोय. त्यानंतरच्या दंगलींनंतर पांढरपेशा समाज ‘बरं झालं, त्यांना धडा शिकवा!' अशा घोषणा देतो आहे. जळणाऱ्याचं जळतं आहे, यांचा जातीयवाद अबाधित आहे. आणि तरीही, आपण म्हणतो आहोत की कलकीने जन्म घेतलाय. तो दक्षिणेत वाढतोय. तो दिशा देईल. आपण ‘सुपर पॉवर' होऊ. विश्वशांतीचं मार्गदर्शन आपण जगाला देऊ. इकडे हजारो गरीब उपाशी आहेत, तिकडे आपल्याला ‘सुपर पॉवर' व्हायचं आहे.
लेखक हे सगळं पाहतो, वाचतो, विचार करतो आहे. त्याला क्लेश होताहेत. आणि तुम्ही म्हणता, हे सगळं सांगा? आणि कोणाला सांगा? या पिढ्या ऐकण्याच्या ‘मूड'मध्ये आहेत का? त्यांनी विवेकाचा प्रकाश पाहिला आहे? एक शायर म्हणतो आहे,
इन नई नस्लोंने सूरज आज तक देखा नहीं।
रात हिंदुस्तान में है रात पाकिस्तान में॥
('अनुभव' मासिकातील सप्टेंबर, २००२ च्या अंकातून साभार)
