आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

बोलींचा आहे कुणी वाली?

  • डॉ. सुधीर देवरे
  • 21.02.26
  • वाचनवेळ 14 मि.
boli bhasha

जगातील सर्व भाषांची संख्या अमुक इतकी आहे, असं काटेकोरपणे सांगता येणार नसलं, तरी ती सुमारे ७००० इतकी आहे असा अंदाज वर्तवता येतो. जगातील भाषांपैकी अर्ध्याअधिक भाषा जेमतेम २५०० लोकांपेक्षा कमी लोक बोलतात. अंदमान-निकोबार बेटांवरील ओंगे आणि जारवा जमातीतील लोक तर शंभरपेक्षाही कमी आहेत. २०५०पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा अधिक भाषा समूळ मृतप्राय होतील. त्यातील बऱ्याच भाषा आजच मृत्युपंथाला लागल्यात.

अमेरिकेत १९५१ साली रिचर्ड पिटमन यांनी जगातील भाषांचा कॅटलॉग तयार केला. तो अजूनही एश्नॉलॉग या नावाने दर चार वर्षांनी प्रकाशित होतो. २००४ साली प्रकाशित झालेल्या आवृत्तीत जगातील भाषांची संख्या ६९१२ अशी नोंदली गेली आहे. दर चार वर्षांनी या कॅटलॉगमध्ये नव्याने उजेडात आलेल्या भाषांची नोंद होत भाषांची संख्या एकीकडे वाढताना दिसत असली तरी मृत्यू पावलेल्या भाषांची संख्याही नमूद केलेली आहे. १९९६ ते २००० या काळात ४१४ भाषा मृत झाल्यात, तर २००० ते २००४ या काळात ४९५ भाषा मृत्यू पावलेल्या आहेत. दर पंधरा दिवसांच्या काळात एक भाषा मृत्यू पावत असते, असं यातून अनुमान काढता येतं. या कॅटलॉगवरून एक गोष्ट लक्षात येते, की जगात एकूण किती भाषा होत्या-आहेत हे अजून ठरायचं आहे.

१९६१ सालच्या जनगणनेनुसार भारतातील बोलींची संख्या १६५२ इतकी मोजली गेली. मात्र ही संख्या नेमकी नाही. भारतातील बोली व भाषा यांची एकूण संख्या अंदाजे १८०० इतकी असावी. भारतातील आदिवासी भाषांची संख्या १८० इतकी सांगितली जाते; मात्र हे सर्व आकडे काटेकार नाहीत.

सर जॉर्ज ग्रियर्सन (१८५१-१९४६) यांनी प्रथमत: भारतीय भाषांचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. ‘ए लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया' या नावाने तो खंडश: प्रसिद्ध आहे. पण हा प्रथम प्रयत्न असल्याने व त्यांच्याजवळ साधनांचा तुटवडा असल्यामुळे काही भाषांचं वर्गीकरण चुकीचं झाल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, अहिराणी भाषेचं वर्गीकरण ग्रियर्सन यांनी भिल्ली भाषेत केलं आहे. वस्तुत: अहिराणी बहुजन समाजाची लोकभाषा आहे.

हेही वाचा - लिपी नाही म्हणून आदिवासी भाषेला बेदखल करणार का?

भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. संविधानानुसार अठरा भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असली, तरी इतर सर्व बोली व त्या बोलणाऱ्यांचं अस्तित्व मान्य केलं आहे.

१९६१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बोलींची संख्या ६५ इतकी आहे. मात्र ही संख्या ७५च्या पुढे जाऊ शकते. कोकणीच्या सुमारे २० बोली आढळतात, तर भिल्ली भाषेच्या ३६ बोली समजल्या जातात. खानदेशात जवळजवळ २१ बोलीभाषा आढळतात. या सर्व बोलींवर अहिराणीचा पगडा जाणवतो. वरील सर्व आकडे काटेकोर नसून सर्वसाधारण आहेत. महाराष्ट्रात ४७ आदिवासी जमाती असून त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा आहेत. २५% आदिवासी भाषा मराठीला जवळच्या बोलीभाषा आहेत. त्या मराठी माणसाला ऐकून समजतात. खरं तर सर्व प्रकारच्या बोली या स्वतंत्र भाषाच आहेत. बोली व भाषा हे वर्गीकरण योग्य नव्हे. डांगी, पावरी, राठवी, वंजारी, वडारी, गोंडी, कोरकू, कोलामी, बंजारा, मथवाडी, झाडी, ठाकरांची खिवारी, या बोली सर्वसामान्य मराठी माणसाला समजायला अवघड वाटतात.

एका भाषेच्या संपर्कात येणाऱ्या भाषेत देवाणघेवाण होत राहते, शब्दांची सरमिसळ होत राहते; पण भाषा स्वतंत्र असते. विश्वनाथ खैरे म्हणतात, ‘मानवाचे गट पुंजक्यांनी राहत होते. म्हणून जितके गट तितक्या अगणित बोली जगात नांदत होत्या.'

महाराष्ट्रातील बहुजनांच्या बोली व आदिवासींच्या बोली यांचं वर्गीकरण पुढीलप्रमाणे केलं आहे :

बहुजनांच्या बोली : अहिराणी, माणदेशी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, वैदर्भी, सातारी, पुणेरी (सदाशिव पेठी), दखणी, आगरी, भंडारी, दक्षिण कोकणी, उत्तर कोकणी, घाटी, मावळी, संगमेश्वरी, कुणबी, चित्पावणी, कुडाळी, रायपुरी, गुर्जर, लाडशिवकी, लेवापाटीदार, गुजरी, बडगुजरी, कोल्हापुरी, नेमाडी, मालवणी, भावसारी.

आदिवासी बोली : कोकणा, घाटकोकणी, डांगी, वारली, काटोनी, पावरी, राठवी, तडवी, पाडवी, वळवी, मावची, वंजारी (बंजारा), वडारी, चांभारी, महाराऊ, भिलोरी (भिल्ली), ठाकरी (खिवारी), कातकरी, गोंडी, कोरकू, कोलामी, कुटुबी, हळबी, कामारी, कटिया, कटकारी, करहंडी, मिरगानी, बाणकोटी, दमणी, धनगरी, कोळी, मथवाडी, झाडी, डांगणी, पारूषी (राजपूत भामटा-डागुरी, मांग-अंबुजी), गोलेवार.

बहुजन लोकांच्या बऱ्याच बोली आज मृत्युपंथाला लागल्या आहेत. आपल्याला कोणी गावंढळ, खेडूत, मागासलेला म्हणू नये म्हणून आपल्या बोली न बोलता प्रमाण मराठी बोलण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांना आपल्या बोलींपासून अगदी ठरवून लांब ठेवलं जातं. ती भाषाच काय, पण बोलीतला एखादा शब्द लहान मुलांच्या जिभेवर आला तरी त्याला घरातूनच खडसावलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या अहिराणी भाषक कुटुंबात लहान मूल मराठी बोलत असलं, तरी त्याच्या जिभेवर एखादा अहिराणी शब्द सहज येऊन जातो. “आई, माझ्या बोटाला रंगत निघाले बघ,” हे वाक्य ऐकून आईला मुलाच्या बोटाला झालेल्या जखमेपेक्षा त्याच्या भाषेची काळजी जास्त वाटते. म्हणून आई मुलाला लगेच उपदेश करते, “रंगत नाही म्हणू. रक्त म्हणायचं.” अशा शिकवणुकीने पुढची पिढी बोलीभाषेपासून नुसती लांबच नाही जात, तर ती आपली बोलीच हरवून बसणार आहे. आता बोलीभाषा बोलणारे लोकही आपल्या दैनंदिन व्यवहारात अस्सल बोलीतल्या शब्दांपेक्षा प्रमाण मराठी भाषेतले वा इंग्रजीतले शब्द जास्त प्रमाणात वापरू लागलेत. अशा पद्धतीने बोलीभाषेतले शब्द- अस्सल शब्द आधी मरतात आणि त्यांच्या पाठोपाठ बोलीभाषाही. उदाहरणार्थ, मूळ अहिराणी भाषेतलं वाक्य असं असतं, “तू कथा गयथा?” मात्र अलीकडे अहिराणी सोपी बोलली जाते. आता प्रश्न विचारला जातो, “तू कुठे गयथा?” अहिराणीतला ‘कथा' शब्द हळूहळू वापरेनासा होऊ लागला. ‘कथा'च्या जागी प्रमाण मराठीतला ‘कुठे' अलगद येऊन बसला. अशी असंख्य उदाहरणं देता येतील.

हेही वाचा - मराठीसाठी काम करत राहीन

इंग्रजीचं प्रमाणही बोलीत असंच वाढतं आहे. मूळ अहिराणी वाक्य : ‘मन्ही येरले झीळ फुटनात.' पण आता वाक्य ऐकू येतं : ‘मन्ही येरमा परक्युलेशन व्हयी ऱ्हायनं' ‘झीळ'च्या जागी सहज इंग्रजी ‘परक्युलेशन' शब्द येऊन बसला.

भाषा मृत होऊ देणं म्हणजे लोकपरंपरांना मूठमाती देणं, आपल्या परंपरा आणि भाषा जाणूनबुजून मारणं, आपल्या स्वाभिमानाचा मृत्यू घडवून आणणं. ‘इफ यू किल द लँग्वेज, यू किल द नेशन!' आपली बोलीभाषा जिवंत ठेवत इतर सर्व भाषांचा आदर राखणं- सन्मान करणं म्हणजेच ‘जगा व जगू द्या' सूत्र अंगीकारणं. परस्पर भाषांचा आदर करत माणसं जोडली जातात, प्रांत जोडले जातात, देश जोडले जातात. जग जोडलं जातं. भाषेचा अभ्यास जग जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी मुळीच नाही. दुसऱ्या भाषेला मनाई करून आपली भाषा वाढवता येत नाही, दुसऱ्या भाषेचा आदर करत वाढवता येते. भाषेबद्दल आपपर भाव ठेवणं घातक होऊ शकतं. स्वभाषा जिवंत ठेवायची असेल तर दुसऱ्या भाषेचं नैसर्गिक जगणंही मान्य करावं लागेल.

महाराष्ट्रातील बोलीभाषांची अवस्था आज अतिशय केविलवाणी आहे. जगातील सर्वच बोलींबाबत असं म्हणता येईल. शिक्षणात संस्कृतशरण प्रमाण मराठी व्यवसायात इंग्रजी तसंच विविध टीव्ही चॅनलांवरील हिंदी वाक्यांश वा निदान शब्द तरी प्रचंड प्रमाणात बोलींमध्ये उपयोजित होऊ लागलेत. म्हणून त्या त्या बोलीतले अस्सल शब्द त्या बोली बोलणाऱ्या परिसरातही दिवसेंदिवस समजेनासे होऊ लागलेत. त्यामुळे संवाद सुकर होण्यासाठी बोली बोलताना अस्सल शब्द मुद्दाम टाळले जातात व परिस्थितिशरण शब्द वाक्यात टाकले जातात. याला बोली बोलणाऱ्यांच्या मनात असलेला न्यूनगंड कारणीभूत आहे. आजूबाजूला समाजात व घरातही होणारं तथाकथित शैक्षणिक परिवर्तन यामागे काम करीत असतं. आपण गावढंळ आहोत, असा कोणाचा गैरसमज होऊ नये असं वाटून जाणूनबुजून मुख्य प्रवाहातील भाषा बोलण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसाकडून होत असतो. असं होता होता ग्रामीण भागात नवीन भाषेच्या संपर्कातून वेगळीच शब्दघडणही सामोरी येत असते. यात पूर्णपणे नवीन शब्द अपघाताने वापरले जाऊन नंतर ते व्यापक प्रमाणात वापरले जातात, तर काही दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून रूढ होतात. उदाहरणार्थ, सरकीट (हा शब्द मी चित्रपटातून उद्धृत करत नसून १९८३ साली तो मी स्वत: मित्रांसोबत वापरत असे.), सटल, स्टार रोड (टार रोड), स्टाइल (टाइल्स), ठेसन (स्टेशन), डाका (डकैत), फलाट (फ्लॅट), अशा शब्दांची भर भाषेत नगण्य असते आणि भाषा मृत होण्याचं नुकसान जास्त होत असतं. बोलीभाषा बोलणाऱ्यांच्या मनात अजूनही एक शल्य असतं. काही वेळा ते प्रमाणभाषा बोलणाऱ्या अधिकारी व्यक्तीने त्यांच्या मनात रुजवलेलं असतं. ते हे, की आपण जी बोली बोलतो ती अशुद्ध भाषा आहे आणि प्रमाणभाषा शुद्ध असते. खरं तर जगातील कोणतीच भाषा शुद्ध नाही आणि अशुद्धही नाही. भाषा फक्त भाषाच असते, जिच्याद्वारे आपण संवाद, व्यवहार, संप्रेषण सुरळीत करू शकतो.

भाषांचा संबंध संस्कृतीशी असतो. भौगोलिक क्षेत्र, परिवेश, काळ, राहणी या सर्व घटकांतून भाषा घडत असते. भाषा मानवी जीवनातून अभिव्यक्त होते. ती अधांतरी नसते. भाषा त्या त्या मातीतून उगवलेली असते. भौगोलिक क्षेत्र, नद्या, नैसर्गिक स्थिती, पर्यावरण यातील प्रतीकं, प्रतिमा, म्हणी भाषेत प्रतिबिंबित होत असतात. बा. सी. मर्ढेकरांनी ‘सौंदर्य आणि साहित्य' या आपल्या सौंदर्यशास्त्रीय ग्रंथात एक उदाहरण दिलं आहे ते मी नेहमी भाषेच्या संदर्भात उद्धृत करत असतो. मराठी वाङ्मयात येणारा स्त्रीचा ‘पदर उडणं'चा भाव पाश्चात्त्य लोकांना कळणार नाही, कारण पाश्चात्त्य देशांत स्त्रिया साड्या परिधान करत नाहीत. या शब्दसमुच्चयाचा मथितार्थ फक्त महाराष्ट्रात-भारतातच कळू शकेल. वाङ्मयाचा आस्वाद घेताना अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी महत्त्वाची ठरत असते. अहिराणीत ‘घसड' म्हणजे चढ-उताराचा रस्ता. काही परिसरांत असे घसड असल्याने हा शब्द अहिराणीत वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. ‘घसड'सारखेच ‘ढेंगडे' व ‘ढुब्बे' हे शब्दही फक्त अहिराणीतच आढळतात. ढेंगडे म्हणजे डोंगर नाही, मोठी टेकडी नाही आणि सपाट जमीनही नाही अशी सर्व बाजूंकडून उंच जागा. ‘ढुब्बे' म्हणजे जमिनीवर उगवलेला छोटासा फुगवटा. अशी शब्दसंपत्ती त्या त्या भौगोलिक परिसराची देणगी असते. लोकांचे आचारधर्म व भूप्रदेशांची वैशिष्ट्यं बोलीत खोलवर रुतलेली असतात. सारांश, त्या त्या संस्कृतीचं प्रतिबिंब त्या त्या भाषेत पडलेलं असतं.

हेही वाचा - AI4Bharat: भारतीय भाषांना जोडणारा प्रकल्प

भाषेचं सूत्र लक्षात न घेतल्यामुळे आपल्याकडून भाषेची हेळसांड होत आहे. काव्य, यमके, अनुप्रास, आन्हे, कोडे अशी गूढ व संदिग्ध भाषा आपल्याला आदिमकाळाची देणगी म्हणून परंपरेने प्राप्त झाली आहे. आदिमकाळात भाषा फक्त बोलली जात होती, लिहिण्याचं ज्ञान नव्हतं, लिहिण्याची साधनं उपलब्ध नव्हती आणि भाषांना लिपीही नव्हती. भाषा पाठ करून लक्षात ठेवावी लागे. लिहिणं, टेप करणं, रेकॉर्ड करणं, अशी दस्तावेजीकरणाचं साधनं उपलब्ध नसल्यामुळे भाषा सूत्रबद्धपणे व मौखिक परंपरेने उपयोजित होत होती. म्हणून आदिमकाळी ग्रंथ काव्यात असत. काव्यमय गोष्ट सांगितली की ती लक्षात ठेवून ऐकणारा तिसऱ्याला सहज सांगू शके. आदिमकाळी भाषा सारांशाने, काटकसरीने, थोडक्यात उपयोजित होत असे. आज भाषा लिहिता येऊ लागली, टेप करता येऊ लागली, म्हणून थोडक्यात सांगण्याचे संकेत जाऊन तिचा फापटपसारा वाढला. काव्य वाङ्मयाऐवजी गद्य वाङ्मय वाढलं. भाषा अशी अफाट वाढत असल्यामुळेच सूत्रबद्ध बोलीभाषेचं महत्त्व आज वाटेनासं झालं. आन्ह्या-कोड्यांच्या संदिग्ध भाषेचा खेळ आता कुठंच खेळला जात नाही.

मानवी गटांइतक्या भाषा, पुंजक्यांइतक्या भाषा, सरमिसळीतून पुन्हा नव्या भाषा, पिजीन, क्रिऑल वगैरे. भाषेचं असं होऊ लागल्याने अनेक भाषांतील अनेक शब्द अनेक भाषांत दिसतात. म्हणून अमुक भाषा अमुक भाषेपासून निर्माण झाली, असं संशोधन करता येणार नाही. पण संशोधनाच्या नावाने असे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत राहतो. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अहिराणी भाषेवरील माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. अहिराणीतील अस्सल शब्दांचं विवेचन मी करत होतो. व्याख्यानानंतर एका अभ्यासकाने मला प्रश्न विचारला : “इंग्रजीत नारळाला ‘कोकनट' म्हणतात. नारळाचं उत्पादन कोकणात होतं. ‘कोकण' शब्दावरून इंग्रजीत कोकनट शब्द तयार झाला. यावर आपलं काय मत आहे?” प्रश्न विचारणारी व्यक्ती सर्वसामान्य नव्हती, एक प्राध्यापक होती. त्यांना मी एवढंच सांगू शकलो, “इंग्रजी कोकनट आणि कोकण यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसावा. फक्त आपण त्याला योगायोग म्हणू शकतो.” कोकणचा इंग्रजीत कोकनट झाला असेल तर मराठीत ‘नारळ' शब्द कसा झाला? कुठून आला? अशा पद्धतीने संशोधन होऊ लागलं तर व्यक्तिपरत्वे वेगवेगळी अनुमानं निघू लागतील.

या अनुभवातून उच्चारावरून साम्य असलेल्या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. काही उदाहरणं सोबतच्या तक्त्यात दिलेली आहेत.

boli bhasha

अशा उच्चार साम्य असलेल्या शब्दांची मग काय व्यवस्था लावायची? हे शब्द कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत गेले हे कसं ठरवायचं? संशोधनाच्या नावाखाली आपल्या भाषेतून तो शब्द परक्या भाषेत गेला, असं आपल्या भाषेत आपण अनुमान काढलं तर परका भाषक त्याला कशाला आक्षेप घेईल, असं संशोधन त्याच्यापर्यंत पोचणारच नसेल तर?

शिक्षणाला काही स्तरांवर भाषेचा अडथळा येत असतो. काही वर्षांपूर्वी इयत्ता आठवीपासून सेमी इंग्रजी सुरू झालं. दोन वर्षांपासून तर पाचवीलाच सेमी इंग्रजी सुरू झालं. आमच्या वेळी दहावीपर्यंत इंग्रजी विषय सोडून बाकी सर्व विषय मराठीतून असत. त्यामुळे दहावीनंतर अकरावीच्या अभ्यासात विद्यार्थी गडबडून जात. अभ्यासाचा पाया ज्ञात असूनही एकदम इंग्रजी परिभाषेमुळं शैक्षणिक संवाद होऊ शकत नसे. उदाहरणार्थ, बाष्पीभवन, पचनसंस्था, उत्क्रांती, गुरुत्वाकर्षण, गतीचा नियम, लघुकोन, काटकोन, विशालकोन आदी मूळ संज्ञा त्यांच्या कार्यासह माहीत असूनही अनुक्रमे इव्ह्यापोरेशन, डायजेशन सिस्टीम, इव्होल्युशन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, लॉ ऑफ मोशन, ॲक्युट अँगल, राइट अँगल, ऑबट्युस अँगल, अशा पारिभाषिक नवीन संज्ञा मनात गडबड उडवून देत असत. बहुतांश विद्यार्थ्यांना मूळ बाबी येत असूनही अभ्यास करताना-समजून घेताना परिभाषेशी संघर्ष करावा लागायचा. अशा गोष्टीतच सर्व ऊर्जा खर्च व्हायला लागली तर पुढे काय?

हीच गत बोलीभाषा बोलणाऱ्या बालकांची होत आहे. शाळेत जेव्हा ती पहिलीतच प्रमाणभाषेत शिकू लागतात तेव्हा ती कावरीबावरी होतात. हे जग आपलं नाही अशी त्यांना जाणीव होऊ लागते. शाळा त्यांना परकी वाटू लागते. विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमीचा विचार न करता शिक्षक त्यांच्याशी प्रमाणभाषा बोलतात. शिक्षकांशी बोलताना सवयीमुळे विद्यार्थ्याच्या जिभेवर चुकून बोलीभाषेतला शब्द आला आणि अशा शब्दाला जर शिक्षकाने आक्षेप घेतला अथवा विद्यार्थ्याचा अपमान केला, तर त्याच्या मनात आपल्या भाषेबद्दल न्यूनगंड तयार होतो; अशा अनुभवांमुळे तो विद्यार्थी एक तर आपल्या भाषेला कमी लेखायला सुरुवात करतो नाही तर शिक्षणच अर्ध्यावर सोडून देतो. त्यानंतर आयुष्यभर तो शिक्षणापासून वंचित राहतो. शिक्षणापासून आदिवासी वंचित राहण्याचं इतर कारणांबरोबर भाषा हेही एक महत्त्वाचं कारण आहे.

यावरून एक मुद्दा स्पष्ट होतो : निदान प्राथमिक शिक्षण तरी विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत दिलं जायला हवं. स्थानिक बोलीभाषक शिक्षक प्राथमिक शाळेत नेमला जायला हवा अथवा तो शिक्षक स्थानिक बोलीभाषेचा जाणकार हवा. आपण कितीही प्रगत झालो तरी बोलीभाषांना कमी लेखून चालणार नाही, याचं भान सर्व शिक्षितांनी राखणं अगत्याचं झालं आहे.

बोलीभाषा मरू नयेत, त्यांचं उत्थापन व्हावं असे प्रयत्न जगभरात सुरू असूनही ते तोकडे पडताहेत. बोलीभाषा व लोकसंस्कृती मरणं म्हणजे मानवी सभ्यता व संस्कृतीचा लय होणं, हे फार कमी लोक जाणतात. उदा. काही पशुपक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होणं म्हणजे पर्यायाने समग्र जीवसृष्टीवर संकट येऊ घातल्याचं लक्षण शास्त्रज्ञ मानतात, तसं हे संकट आहे. एखादी सजीव प्रजाती नष्ट होण्याचा धोका अथवा पृथ्वीवरून एकामागोमाग एकक भाषा मृत होण्याचा धोका फार कमी लोकांना प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच हे प्रयत्न अपूर्ण आहेत असं म्हणावं लागेल. जगातील सर्व भाषाभ्यासक-भाषातज्ज्ञ बोलींचं दस्तऐवजीकरण करून आणि त्या त्या बोलिकांना मातृभाषेबद्दल उत्तेजन देऊन वाचवाव्यात, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. अनेक जर्नल्समधून, नियतकालिकांतून, दैनिकांतून आणि भाषाविषयक पुस्तकांतून हा विषय मांडला जात आहे. काहींनी त्यासाठी एनजीओ (अशासकीय संस्था) स्थापन करून बोलींचं लेखन, मुद्रण, ध्वनिमुद्रणादी प्रकारांद्वारे दस्तऐवजीकरणही सुरू केलं आहे.

हेही वाचा - मराठीतला हा एकमेव स्पेलचेकर ९९ टक्के अचूक काम करतो. उरलेला एक टक्का तुमच्या वापराने भरून निघेल..

भारतात मात्र असे प्रयत्न अपवादानेच आढळतात. भारतात इतकी प्रचंड भाषा विविधता असूनही असे प्रयत्न होत नाहीत, हे केवळ खेदजनक नसून भयावह आहे. परस्पर-आपसात भाषा सामंजस्य वाढावं यासाठी कर्नाटकात म्हैसूर येथे स्वातंत्र्यानंतर लगेचच केंद्र शासनद्वारे स्थापन झालेली ‘भाषा संस्थान' प्रयत्नशील असूनही या संस्थेचं कार्य खूप परिणामकारक ठरलं आहे, असं म्हणता येत नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. गणेश देवी यांनी वडोदरा येथे स्थापन केलेल्या ‘भाषा केंद्रा'ने अल्पावधीत भरीव काम करून दाखवलं. ‘भाषा केंद्र' ही एक एनजीओ असून बोलीभाषा व आदिवासी लोकपरंपरांचा अभ्यास या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. भाषा केंद्रातर्फे आतापर्यंत फक्त सहाच बोलीभाषांतील ‘ढोल' नियतकालिकं प्रकाशित होऊनही भारतातील सर्वच बोलींच्या संवर्धनाची प्रातिनिधिक प्रेरणा द्यायला भाषा केंद्र यशस्वी ठरलं आहे. अहिराणी ‘ढोल'मधून अहिराणी माध्यमात सर्व लेखन येत असलं, तरी सगळ्याच बोलींवर प्रकाशझोत टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात मात्र सांघिक प्रयत्नाकडे अंगुलिनिर्देश करता येईल असं भाषाविषयक कामच पाहायला मिळत नाही. जे काही भाषिक काम चाललं आहे ते व्यक्तिगत पातळीवर.

तरीही बोलीचं महत्त्व ओळखणारे द्रष्टे महाराष्ट्रात कमी नाहीत. बोलीभाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकाचा उल्लेख करायचा झाला तर प्रथम संत तुकारामांचा करावा लागेल. त्याआधीच्या काळात डोकवायचं झालं, तर बोलीभाषा लोकव्यवहारात वापरण्याचं बीज चक्रधरस्वामी आणि संत ज्ञानेश्वरांंच्या बोलण्या-लिहिण्यात, कीर्तन-प्रवचनांतही दिसून येतं. आज बोलीभाषक साहित्यिकांत विठ्ठल वाघ (वऱ्हाडी), डॉ. हरिश्चंद्र बोरकर (झाडी), डॉ. सुधीर देवरे (अहिराणी), नजुबाई गावीत (मावची), वाहरू सोनवणे (भिलाऊ) आदी नावं सांगता येतील. ही यादी अजून लांबवता येईल, पण यादी देणं इथं महत्त्वाचं नसल्याने उदाहरणादाखल काही नावं उद्धृत केली आहेत. याव्यतिरिक्त प्रमाण मराठीत लिखाण करूनही बोली जाणीवपूर्वक आणि तरीही सहज उपयोजित करण्याचं काम महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी केलं आहे. त्यात महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव प्रथम घ्यावं लागेल. विश्वनाथ खैरे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, श्री. ना. पेंडसे, सदानंद देशमुख, ऊर्मिला पवार, संतोष पवार, शंकर सखाराम आदींनी आपल्या लिखाणात बोलीभाषा भरभरून उपयोजित केली आहे.

दुर्दैवाने बोलीभाषांना विरोध करणारा व केवळ प्रमाणभाषेतच लेखन व्हावं असं मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे इथं सखेद नमूद करावंसं वाटतं. ही मानसिकता बदलण्यासाठी अजून काय काय करावं लागेल, याचा आवाका समजून केवळ व्यक्तिगत पातळीवरूनच नव्हे तर सांघिकतेने अभ्यास होणं आवश्यक आहे.

(अनुभव, सप्टेंबर २००९च्या अंकातून साभार.)

डॉ. सुधीर देवरे







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Ram Raut21.02.26
अगदी सरळ शब्दात..... बोलीभाषेच महत्त्व सांगीतल्या बद्दल धन्यवाद

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results