आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

मुक्काम साहित्य सहवास

  • सुभाष अवचट
  • 16.03.25
  • वाचनवेळ 34 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
mukkam sahitya sahvas header

बांद्य्रातली साहित्य सहवास कॉलनी म्हणजे सारस्वतांचा मेळा. या कॉलनीने गेल्या पन्नास वर्षांत साहित्यिक-कलावंतांच्या अनेक पिढ्या पाहिल्या आणि अनेक तऱ्हादेखील. ‘साहित्य सहवास'चे रहिवासी असलेल्या चित्रकार सुभाष अवचटांनी अनुभवलेल्या या त्यातल्याच काही तऱ्हा.

मी पुण्याहून मुंबैला शिफ्ट होण्यापाठीमागे माझी मैत्रीण स्मिता पाटील आणि मित्र विनोद खन्ना कारणीभूत होते. त्यापाठी माझा चित्रकलेचा पुढचा प्रवास मोठा व्हावा हेच कारण होते. मुंबैत स्थायिक व्हावे याबाबत माझ्या मनात कोणतीही धाकधूक नव्हती. कारण मुंबै मला नवीन नव्हती. पुणे-मुंबै ही दोन्हीही शहरे मला जवळची होती. दोन्ही ठिकाणी अनेक मित्र होते. फक्त मुंबैला गैल्यामुळे पुण्याची हवा, टेकड्या, संध्याकाळचा फेरफटका, शेजार, लेखक मी मिस करणार होतो. पण मुंबैत गेल्यावर त्याचीही सवय झाली. आठवण झालीच तर मी पुण्याला ब्रेकफास्टसाठी जायचो. अजूनही जातो.

मुंबैत काही काळ मी विनोद खन्नाकडेच राहिलो. स्मिताचे घरही जवळ होते. मलबार हिलवर मला काही काळ स्टुडिओसाठी जागाही मिळाली होती. त्या दक्षिण मुंबैचे वातावरण फार वेगळेच होते. तिथल्या इमारती, माणसे, श्रीमंती, गाड्या, भाषा यांचा काही काळ मला त्रास झाला. ते परके वाटायचे. त्यातील आपलेपणा समजायला फार काळ लागला. हा सारा सवयीचा परिणाम असतो.

अशा वेळी मला मौज, पॉप्युलर प्रकाशन जवळचे वाटायचे. श्री. पु. भागवत, रामदास भटकळ यांना भेटलो की आनंद वाटायचा. जुना मित्र भेटावा तसा तो आनंद असायचा. अशा काळात एकदा अचानक दुपारच्या वेळी मला फोर्टमध्ये अरविंद गोखले भेटले. ते मला आवडायचे. निर्मळ हसायचे आणि दिसायचे. गप्पा मारताना मला म्हणाले, “चला, माझ्या घरी जाऊ.” मला नाहीतरी जवळचा माणूस हवाच होता. आम्ही टॅक्सीने ‘साहित्य सहवासा'त त्यांच्या घरी आलो. तो परिसर पाहताना मला मी पुण्यात आलो असे वाटले. सर्वत्र मोठी झाडे, शांतता, तीन मजली पण आपुलकी वाटणाऱ्या इमारती. कलानगर, पत्रकार नगर, आर्टेक अशा लागून असलेल्या कॉलनीज. गंमत म्हणजे सर्व ठिकाणी माझे मित्र राहायचे. पुण्यातल्या माझ्या स्टुडिओमध्ये अनेकदा त्यांच्या भेटी झालेल्या होत्या. कलानगरातले बेंद्रे, हेब्बर, सातवळेकर, पानसरे म्हणा; साहित्य सहवासातील बहुतेक लेखक म्हणा, पत्रकारनगरमधले अरुण साधूसारखे अनेक पत्रकार किंवा काही आर्किटेक्ट्स यांचा-माझा परिचय त्यांच्या पुस्तकांच्या कव्हर्स करण्यावेळी झालाच होता.

त्या रात्री मी अरविंद गोखल्यांच्या घरी रमलो. उशीर झाला होता. त्या काळी रात्री तिथे टॅक्सीही मिळत नसे. त्यांच्या आग्रहामुळे त्या रात्री माझा मुक्काम तिथेच झाला. झोपताना मला मी पुण्याच्या घरातच आहे असे वाटले.

सकाळी चहा पिताना गोखले मला म्हणाले, “अरे, इथेच राहायला ये, कुठे लांब राहतो!” परत जाताना मला वाटले, अरे, मला कधी कसे कळले नाही, की इथेच राहावे! दक्षिण मुंबैसारखा परकेपणा येथे नाही. सारी आपलीच माणसे आहेत. त्यामुळे त्यानंतर करमले नाही की मी वांद्रे ईस्टमध्ये येऊ लागलो आणि काही वर्षांतच ‘साहित्य सहवासा'त राहायलाच आलो. मजा म्हणजे दक्षिण मुंबैतलीच मित्रमंडळी नंतर माझ्याकडे येऊ लागली.

एका संध्याकाळी मी मलबार हिलहून ‘साहित्य सहवास'मध्ये आलो ते शांताबाई शेळकेंना भेटायला.

‘साहित्य सहवास'मधल्या ‘शाकुंतल' नावाच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरच्या चार क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये त्या राहत होत्या. शांताबाई माझ्या छान ओळखीच्या होत्या. त्यांचा भाऊ राम, त्यांची आई, वहिनी पुण्यातच राहत होते. माझा चांगला घरोबा होता. मी बेल वाजवली तेव्हा शांताबाईंचे मित्र प्रभुणे यांनी दार उघडले. त्यांच्या एका हातात फौंटन पेन होते. शांताबाई आतल्या खोलीत मोठ्या पलंगावर बसून लिहीत होत्या. मी बसलो. प्रभुणेही आत आले. त्यांनी ड्रॉपरने फौंटनपेनमध्ये शाई भरली. पेन बंद करून शांताबाईंच्या डेस्कवर ठेवून ते बाहेर गेले. थोड्या वेळाने चहाचे कप घेऊन आत आले. गप्पा सुरू झाल्या. शांताबाईंनी मला त्यांनी काढलेले मांजराचे चित्र दाखवले. त्यांना स्मिता पाटील फार आवडे. तिचे एक चित्रही त्यांनी छोट्या कागदावर पेनने काढले होते. लाल शाईने तिचे गोल कुंकूही काढले होते. संध्याकाळ होत गेली तशा त्या मला म्हणाल्या, “चला, आता भेळ खाऊ.” शांताबाई तयार झाल्या. प्रभुण्यांनी हात धरून त्यांना चालत कोपऱ्यापासल्या भेळवाल्याकडे आणले. भेळेचे दहा-बारा रुपये त्यांनी मला देऊ दिले नाहीत. माझ्याकडे पाहत त्या म्हणाल्या, “एका कवितेच्या मानधनामध्ये भेळ आली! चला.”

एक दिवस प्रभुणे गेले. शांताबाईंचा आधार गेला. त्यांना एकटेपण आले. तेव्हा रामकाकांनी त्यांना पुण्याच्या बंगल्यात आणले. त्यानंतर त्यांच्या पुण्याच्या घरात माझे वारंवार जाणे-येणे होत गेले.

इकडे मला मुंबैचा खरा झटका मिळाला. विनोद खन्नाचा डिव्होर्स झाला. तो क्लबमध्ये शिफ्ट झाला. मी काही काळ त्याच्याबरोबर राहिलो. नंतर पेडर रोडवर माझा मित्र दिनेश मेहराकडे राहायला गेलो. असे राहण्यात माझी फार कुचंबणा होत असे. रामकाकांना कसे कळले देव जाणे! त्यांनी मला त्यांच्या पुण्याच्या घरी बोलावले. घरातली सारी मंडळी एकत्र बसली होती. त्यांनी ‘साहित्य सहवास'मधल्या ‘4, शाकुंतल'ची किल्ली मला दिली. 1500 रुपये भाडे ठरले. काही वर्षांनी तो फ्लॅट मी विकत घेतला. किंमत त्यांनीच ठरविली. शांताबाईंचे हे घर अंधारे होते. ते सर्व बदलून मी खिडक्या मोठ्या केल्या. त्यामुळे भरपूर प्रकाश आत आला. त्या प्रकाशात मी गेली अनेक वर्षे पेटिंग करीत आहे. या घरातले शांताबाईंचे सारे म्हंजे जे थोडेफार सामान होते ते गेले. फक्त ज्या गादीवर बसून त्यांनी अलौकिक गाणी, कविता लिहिल्या, ती गादी त्यांच्या आठवणीसाठी आजतागायत माझ्या बैठकीत आहे. त्यावर पुढे भारतातले अनेक कलाकार, नट, गायक मैफिली करून गेले.

शांताबाई, रामकाका, वहिनी गेल्या; पण या ‘4 शाकुंतल'मध्ये त्यांच्या अनेक आठवणी माझ्यापाशी ठेवून गेल्या.

सत्यदेव दुबे हा माझा अवलिया मित्र ‘फुलराणी'मध्ये एकटाच राहत असे. त्याला सर्वजण एकेरी नावानेच हाका मारीत असत. ‘साहित्य सहवासा'तील साऱ्यांनी त्याला जवळपास दत्तकच घेतले होते. त्याचे नाटकातले योगदान सर्वांनाच माहीत होते. साऱ्यांना त्याची जाणीव व आदर होता. या प्रेमापोटीच साऱ्यांनी त्याला घरातल्या मेंबरसारखे सामावून घेतले होते. साफसफाई, जेवणखाण, कपडे, झोप अशा गोष्टी त्याच्या खात्यात नव्हत्या. त्याच्या शेजारीच शालिनी प्रधान राहत असत. ते प्रधान कुटुंब शक्यतो त्याची काळजी घेत असे; पण ते पुरेसे नव्हते. त्यामुळे त्याचे कपडे, टॉवेल, चादरी आळीपाळीने वॉशिंग मशिनमध्ये धुऊन त्याला पाठवणे, हा एक शिरस्ता झाला होता. कबुतरांनी तर त्याच्या घराचा उकिरडा केला होता.

दुबे मला अनेकदा समोरच्या टपरीवर भेटायचा. ब्रेड आणि केळी खात उभा असायचा. नाटकांमुळे तो बेरात्री घरी परतायचा. अनेकदा माझ्या घरी झोपायचा. माझ्याच असे नाही, तर कोणाहीकडे, किंवा जिन्यात झोपून सकाळी बिनातक्रार जायचा. त्याला जेवायला अनेकजण घरी बोलवायचे. त्याला जेवायचे कसे हे माहीत नसावे. तो आमटी प्यायचा. नंतर कोरडा भात खायचा. भाजी बकाबका खाऊन कोरडी पोळी खायचा. त्याला तूप आवडे. तो वाटीभर तूप प्यायचा. अन्नाच्या वेगवेगळ्या चवी असतात, त्याही चवीने चाखायच्या असतात हे त्याच्या गावी नसायचे. नाटक हेच त्याच्या डोक्यात असायचे. दुबे आणि नाटक हेच समीकरण त्याच्या मृत्यूपर्यंत टिकून राहिले. तो कधी कधी अपरात्री स्टार हॉटेलमधल्या कॉफीशॉपमध्ये सकाळपर्यंत लिहीत बसलेला असे. मग कोणी तरी त्याला घरी सोडत असे.

एकदा माझा अभिनेता मित्र ओम पुरी ‘साहित्य सहवास'मध्ये दिसला. त्याच्या बरोबर टेम्पोमधून अनेक तरुण कलाकार खाली उतरले. मी विचारले, “ओम्या, हे काय?” तो म्हणाला, “दुबेजी का घर साफ करने आये हैं।” पुढचे चार दिवस साफसफाई चालली होती. फ्रिजमध्ये मेलेली कबुतरे सापडली. अनेक पुस्तके धुळीने माखली होती. घराची रंगरंगोटी करून हे स्टेज कलाकार निघून गेले. नंतर एका रात्री दुबे बागेतल्या बाकड्यावर झोपलेला आढळला.

दुबेचा विरंगुळा म्हंजे एमआयजी या आमच्या ‘साहित्य सहवास'समोरच्या क्लबमध्ये येऊन पत्ते खेळणे. तो कधीही जिंकला नाही. कदाचित पत्ते खेळताना त्याच्या डोक्यात नाटकाचाच विषय असावा. शेवटी क्लबच्या मित्रांनी त्याला पत्ते खेळण्यास बंदी केली. तरीही तो तिथे टेबलावर एकटाच बसायचा. अमरीश पुरी या नटाला त्याने अभिनयाची दीक्षा दिली होती. तो गुरुदक्षिणा म्हणून दरमहा पाच हजार रुपये दुबेला पाठवत असे. दुबे मला कधी एकाकी दिसला नाही. त्याच्याभोवती सतत तरुण कलाकारांचा घोळका असायचा. ‘साहित्य सहवासा'तला दुबे आणि पृथ्वी थिएटरमधला दुबे हे दोन्हीही वेगळे दिसायचे. नाटक आणि सिनेमातल्या अनेक नटांना त्याने शिक्षण दिलेले होते.

कधीमधी तो माझ्या घरी यायचा. माझे पेंटिंग चाललेले असायचे. त्याची-माझी एक आवड कॉमन असे, ती म्हंजे डिटेक्टिव्ह पुस्तके. एखादे पुस्तक घेऊन तो जायचा. जाताना किचनमधल्या डब्यातून दोन-तीन चपात्या घेऊन जायचा. मलाही बरे वाटायचे. चला, किमान आज तरी या फकिराचे पोट भरले!

मग हा दुबे आजारी झाला. चालताना त्याचा तोल जाऊ लागला. आधारासाठी त्याचा हात धरला तर तो झिडकारायचा. त्याही अवस्थेत तो शेवटपर्यंत रिक्षाने पृथ्वी थिएटरला जायचा. त्याचे एक स्वप्न होते. ‘साहित्य सहवास'मधला फ्लॅट विकून लंडनला जायचे. तेथे थिएटर करायचे. दुसरे स्वप्न म्हणजे एक सिनेमा काढायचा. त्याने शूटिंगला सुरुवातही केली होती. पुढे काय झाले माहीत नाही. अखेरीस तो थकला. सोनाली कुलकर्णीने त्याला सांभाळले. शेवटी तो गेला. ‘साहित्य सहवासा'त त्याचे पार्थिव आले. अनेक कलाकारांनी त्याला आदरांजली दिली. दुबेचा प्रवास संपला. मला वाटते, थिएटर हेच त्याचे खरे घर होते. सारे कलाकार हेच त्याचे नातेवाईक, सहोदर होते. ‘साहित्य सहवासा'त आता तो दिसणार नाही. कलाकारांची वर्दळ होणार नाही. अचानक घरी कोणी डोकावणार नाही.

विंदांचा अन्‌‍ माझा परिचय पुण्यातच झाला होता. त्यांच्या लहान मुलांच्या नाटकांच्या काही पुस्तकांची कव्हर्स मी केलेली होती. ‘आनंदवन'मध्ये चौथ्या मजल्यावर ते राहायचे. त्या वेळी तेथे लिफ्ट नव्हती. मला आठवते, मी कॉलेजमध्ये असताना एका उन्हाळी दुपारी ‘साहित्य सहवासा'त आलो होतो. गेटपासल्याच त्यांच्या या इमारतीकडे मी पाहिले. त्या उंच बाल्कनीत विंदा कठड्यावर पाय टाकून बसलेले असावेत. खालून त्यांचे फक्त पायच दिसत होते. कदाचित त्यांची ही बसण्याची, चिंतनाची सवय असावी. मी त्या पायांचा फोटो काढला होता. 200 एम एम लेन्स नसल्याने मला क्लोजअप काढता आला नाही.

पुढे विंदांचा खरा सहवास मिळाला तो तुंबाडच्या प्रवासात. पेंडसे यांच्या ‘तुंबाडचे खोत' या पुस्तकाच्या निमित्ताने. तो सोहळा चक्क तुंबाड येथे एका खोताच्या घरी होता. पुस्तकाचे कव्हर माझे होते. एका मिनी व्हॅनमध्ये विंदा, कॉन्टिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी, सुहासिनी मुळगावकर, मी आणि काही नोकरवर्ग होता. दापोलीपर्यंतचा पल्ला लांब होता. हसत-खेळत, विनोद-गप्पांत तो संपला. विंदांनी कोकणी हेलात मला खूप हसवले.

‘साहित्य सहवासा'त मी राहायला आल्यावर माझा-त्यांचा सहवास वाढला. दररोज ते एकदाच जिना उतरायचे. हातात पिशवी, लांडा पायजमा असायचा. मला पाहून ते म्हणायचे, “अहो अवचट, आज चित्रांचे दुकान बंद का?” अनेकदा आम्ही दोघे भाजीवाल्याकडे, औषधांच्या दुकानात जायचो. भाजीवाल्याशी घासाघीस करणे, चांभाराशी वा मासेवाल्याबाईशी उगीचच टाइमपास करणे हा त्यांचा छंद होता.

एकदा माझ्या घरी रमाझी गायिका मैत्रीण इंदिरा नाईक यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्या वेळी ते आले होते. नंतर भेटल्यावर म्हणायचे, “अहो, त्या इंदिराचा कार्यक्रम ठेवा. भैरवी छान गाते.” अनेकदा निरनिराळे गायक माझ्याकडे येत-जात असत. मैफिल रंगत असे. त्याला ते आवर्जून हजर राहत असत. विमानतळावर जाताना एकदा रात्री उशिरा राशिद खान माझ्याकडे थांबला होता. त्याच्यापाशी स्वरमंडल होतेच. सहजतेने पुरिया धनाश्री सुरू झाला. मी विंदांना फोन केला. त्यांची झोपायची वेळ होती. मला शिव्या मिळणे अपेक्षित हेोते; पण तसे झाले नाही. विंदा आले. पहाटेपर्यंत थांबले. राशिदला ही व्यक्ती कोण हे कसे कळणार? मी ते सांगण्याच्या भानगडीत पडलो नाही. विंदा इतके आनंदी मी एरवी पाहिले नाहीत. पुढे संध्याकाळच्या भेटीत मला म्हणत, “जरा, गाणं करा.” नंतर मात्र त्यांच्या भेटी, जिन्याचा चढ-उतार कमी होत गेला.

त्यांना ज्ञानपीठ मिळाले. साहित्य सहवासात आनंदोत्सवच झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चार मजले चढून मी आणि भटकळ कुटुंब गेलो. ते घरात येऱ्याझाऱ्या घालत होते. पाच मिनिटांतच ते आम्हाला म्हणाले, “चला, निघा आत्ताच!” आम्ही अवाक झालो. आमचे चकित झालेले चेहरे बघताच ते म्हणाले, “तो मुख्यमंत्री येतोय. तुम्ही निघा!” आम्ही जिना उतरत असतानाच मुख्यमंत्री धापा टाकीत जिना चढत होते. विंदा आता मुख्यमंत्र्याला काय म्हणणार या विचारानेच मला हसू आले.

असेच एकदा सकाळी सकाळी कर्तारसिंग थत्ते ‘आनंदवना'खाली हातात काठी घेऊन फिरत होते. काही कारणास्तव ते विंदांवर चिडले होते. त्यांना मारण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले, “अहो, असे का फिरताय?” ते म्हणाले, “मी विंदा यांना साडेनऊची वेळ दिली आहे. नंतरच वरती जाणार!” मी म्हणालो, “अजून वेळ आहे. तोपर्यंत माझ्याकडे चला.” तेवढ्यात विंदा बाल्कनीत आले व ओरडून म्हणाले, “अहो कर्तारसिंग, मी वाट पाहतोय! वर या. वेळेअगोदरच मार खायला मी तयार आहे!”

कर्तारसिंगच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. साडे नऊला जाऊन मारायचे. एकदा ठरले म्हणजे ठरले. शेवटी काठी आपटत ते वर त्यांच्या घरी गेले. पुढे काय झाले ते त्या दोघांनाच माहीत!

एकदा भाजी आणायला जात असताना विंदा म्हणाले, “अहो अवचट, पेंटिंग करायच्या आधी काही स्केच करून ठेवता की नाही?”

मी म्हणालो, “रात्री झोपताना ठरवतो खरा; पण सकाळी मी डायरेक्टच सुरुवात करतो.”

“झोपताना उशाशी पेन आणि कागद ठेवत चला. काही आठवले की लगेच लिहा, खरडा. स्वत:च्या स्मरणशक्तीवर जास्त विसंबू नका. रात्री आठवलेला शब्द सकाळी मरेपर्यंत आठवत नाही. दातांत सुपारीचे खांड अडकल्यासारखा त्रास आयुष्यभर होत जातो.” तेव्हापासून मला उशाशी स्केच पॅड आणि पेन ठेवण्याची सवय झाली आहे. खरे आहे- स्मरणशक्तीवर आपण विसंबून राहू शकत नाही.

विंदांच्या अनेक आठवणी ‘साहित्य सहवास'च्या बाहेरच्यासुद्धा आहेत. त्यांच्याच नव्हे तर ‘साहित्य सहवासा'तल्या अनेक लेखकांच्याही. त्याबद्दल कधी तरी सांगेनच. विंदा गेले आणि शोककळा पसरली. त्यांना सरकारी इतमामाने सलामी मिळाली. त्यांची अंत्ययात्रा गेली. सरकारी ताफा गेला. ‘साहित्य सहवास' रिकामे झाले.

मला अजूनही आठवते, तुंबाडच्या जगबुडी नदीत चांदणे पसरलेले होते. लाँचमध्ये चांदण्यात विंदा कठडा धरून उभे होते. नदीतल्या लाटा चांदण्यात रुपेरी खेळ खेळत होत्या. तुंबाडहून आम्ही अपरात्री मुंबैला पोहोचलो. आजही ते दृश्य मला ‘साहित्य सहवासा'त ‘आनंदवना'जवळून जाताना आठवते.

‘रागिणी'मध्ये अरविंद गोखले राहायचे. तेथेही लिफ्ट नव्हती, पण लिफ्टचा ढाचा तयार करून सोडून दिला होता. हे सारे थोर लेखक आयुष्यभर पायऱ्या चढत-उतरत राहिले. का कुणास ठाऊक, गोखले यांची-माझी खूप जवळची मैत्री झाली. कित्येकदा रात्री आम्ही एकत्र असू. कधी गुत्त्यात, कधी घरी, नाही तर समुद्राजवळच्या त्यांच्या कोणा गोवेकरी मित्रफॅमिलीबरोबर. ते कधीही दुसऱ्या लेखकाबद्दल, त्याच्याच काय पण स्वत:च्या लेखनाबद्दलही बोलले नाहीत. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची ऑफरही त्यांनी नाकारली होती.

त्यांचे मित्रमंडळ मुंबैभर पसरलेले होते. त्यात पारशी, मुस्लिम, ख्रिश्चन अशी अनेक मित्रमंडळी दिसत. मला आठवते, त्यांनी मुंबैवर एक पुस्तक लिहिले. त्यात गावठी बारपासून पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत अनेक गोष्टी होत्या. मी चित्र काढणार होतो. त्यासाठी प्रकाशक, मुद्रक, मी व गोखले दोन रात्री मुंबैभर फिरत होतो. आठवणीत राहाव्यात अशा त्या रात्री होत्या.

त्या काळी जुहूजवळ नारळाच्या झाडीत लपलेला पास्कल नावाचा एक प्रसिद्ध बार होता. बार पेक्षा अड्डा म्हणणे योग्य होईल. त्या वेळच्या हिंदी चित्रपटांतही त्याचा उल्लेख असायचा. तेथे पाऊल टाकण्याला धारिष्ट्य लागायचे. बहुधा पोलिससुद्धा घाबरत असत. आम्ही गोखल्यांबरोबर तिथे गेलो. हिंदी चित्रपटात दाखवले जाते तसेच तिथले वातावरण होते. झावळ्यांच्या त्या समुद्राजवळच्या बंगलीत अनेक व्हिलन आपल्याकडे बघत आहेत, असे मला वाटले होते. निरनिराळे चेहरे दिसत होते. कोळी, व्यापारी, परदेशी माणसे, प्रवासी त्या गुत्त्यात बसले होते. दारूच्या बाटल्या टेबलांवर सर्व्ह केल्या जात होत्या. खांबाला आणि छताच्या बांबूला टांगलेले दिवे, दरवाज्याच्या बाहेर उभे असलेले जाळीच्या बनियन घातलेले बॉडीगार्ड्‌स असे सगळे वातावरण होते.

बाहेर गराजमध्ये उभ्या असलेल्या जुन्या गंजलेल्या गाड्यांमुळेही हे वातावरण परफेक्ट वाटत होते. बाहेरच्या वाळूत बसलेली माणसे, माडाच्या वाऱ्यावर हलणाऱ्या फांद्या, खवळलेला समुद्र, त्यामुळे आलेली बेहोषी. असा खणखणीत दारूचा अड्डा मी कधी पाहिला नव्हता. दारू प्यावी तर अशा ठिकाणी. आम्ही दडपलेलेच होतो. एवढ्यात बांबूचे दार उघडून एक माणूस आला. त्याने गोखल्यांचे हात प्रेमाने हातांत घेतले. गोखल्यांनी आमची ओळख करून दिली. “अरे, हा पास्कल.” गूढ कादंबरीतल्या, दहशत वाटणाऱ्या या पास्कलकडे गोखले कुणा हीरोकडे पाहावे असे पाहत होते. तेवढ्यात त्याने गोखल्यांचा हात धरून त्यांना पाठीमागच्या कौलारू घरात नेले. त्यांच्या मागोमाग मी गेलो. जुन्या वेताच्या फर्निचरवर आम्ही बसलो, तशी त्याची बायको बाहेर येऊन गोखल्यांना ‘गुड इव्हिनिंग' म्हणाली. बैठक जमली. घरातल्या नोकरांनी ग्लास, स्कॉच, मासे सर्व्ह केले. बाहेर गावठी दारूचे भुईनळे उडत असताना गोखल्यांना हा पास्कल स्कॉच देत होता, आदराने आतिथ्य करत होता. गोखलेदेखील घरातल्या माणसाप्रमाणे सर्वांशी गप्पा मारत होते. साऱ्या मुंबैत दहशत असलेल्या पास्कलचे काही दशके पोलिस चौक्यांमध्ये फायलीत नाव होते. अशा पास्कलची आणि गोखल्यांची काय दोस्ती असावी, हे दारूनंतर समजणे अशक्य होते. अर्थातच गोखल्यांना बिल मागण्याची पद्धत पास्कलकडे नसावी.

दुसऱ्या रात्री आठच्या सुमारास आम्ही माहीमच्या गल्ल्यांमध्ये गेलो. तेव्हा तेथे गोव्यासारखी बैठी कौलारू घरे होती. लाकडी जिन्याने आम्ही एका घरात वर गेलो. गोव्यातल्याच सुंदर घरात आल्यासारखे वाटले. जुने दर्जेदार लाकडी फर्निचर, कपाटे, त्यातल्या जुन्या पोर्सोलिनच्या मूर्ती, क्रोकरी, तक्तपोशीला असलेल्या सागवानी तुळया, त्यांच्या आधाराला असलेले बैठे खांब, कमानदार खिडक्या, बाहेर डोकावणारी माडाची झाडे, बाल्कनीत ठेवलेल्या शोभिवंत फुलांच्या कुंड्या, आर्ट डेको स्टाईलचे भिंतींवर असलेले काचेचे लाइट्स, टेबल लँप्स, मधोमध एकच झुंबर, हे पाहून येथे काय दारू प्यायची, असे वाटले. आम्ही व्हरांड्यामध्येच अवघडून उभे राहिलो.

समोरचा काचेचा दरवाजा आतल्या खोलीत जाणारा असावा. उजवीकडे दोन कमानदार खिडक्यांमधील भिंतींपाशी एक पांढरपेशा दिसणारा माणूस भिंतीकडे तोंड करून बसलेला होता. त्याच्या समोरच्या ब्यूरोवर त्याचा ग्लास होता. हॉलकडे पाठ होती. आतल्या खोलीच्या दरवाज्याच्या कोपऱ्यात एक पाळणा होता. पाळण्याच्या दोरीला एक फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली, बॉबकट असलेली पन्नाशीची मॅडम झोका देत बसलेली होती. एका खिडकीपाशी असलेल्या सोफ्यावर भोवती सस्पेंडर्स घातलेली दोन-तीन माणसे बसलेली होती. टेबलावर फ्लॉवरपॉट होताच, पण सुंदर कट ग्लासमध्ये व्हिस्की, डिकेंटर आणि सोड्याने टेबल सजलेले होते.

गोखल्यांना पाहताच मॅडम म्हणाली, “अरे अरविंद, ये. जरा पाळण्याला झोका दे.” एवढे सांगून ती आत गेली. गोखले बसले. पाळण्याला झोका देऊ लागले. आम्ही एका सोफ्यावर दाटीने बसलो. तान्हे बाळ रडत होते. गोखले गुणगुणत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. काही वेळाने एक सडसडीत, काळसर मुलगी बाहेर आली. ‘गुड इव्हिनिंग, अंकल' असे गोखल्यांना म्हणाली व तिने पाळण्याची दोरी हातात घेतली. गोखल्यांनी आम्हाला बोलावले. एक शिसमची काचेची कॅबिनेट त्यांनी उघडली. आत दारूच्या निरनिराळ्या बाटल्या होत्या, ग्लासेस होते. ते म्हणाले, “तुमची आवडती घ्या.” ते आत गेले. पाणी, सोडा, बर्फ घेऊन बाहेर आले. पेग तयार करून म्हणाले, “वेलकम टु बॉम्बे!”

आमचा पेग संपत असतानाच ती सडसडीत मुलगी तान्ह्या बाळाला खांद्यावर थोपटत गोखल्यांपाशी आली आणि म्हणाली, “अंकल, जरा हिला सांभाळा.” गोखले तिला थोपटत घरभर फिरत होते. काही वेळाने ती फिश फ्राय घेऊन आली व तिने मुलीला हातांत घेतले. नंतर मॅडम आली. समोर बसली व म्हणाली, “अरविंद, कसा आहेस? तुझी बायको कशी आहे? तू माझ्या मुलीच्या लग्नानंतर आत्ता आलास? कुठे असतोस?”

दारू पीत असोत वा नसोत, गोखले खुर्चीवर ताठ बसत असत. त्यांचा स्ट्रॉपवाला खोचलेला शर्ट, स्माइल, हातात ग्लास धरण्याची स्टाईल कधीही बिघडायची नाही. जाताना गाडीत मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी सविस्तर दिली. एक म्हणजे गोखले हे त्या घरातले सुखदु:खाचे सभासद होते. त्यांनी आणलेल्या आणि त्या कपाटात ठेवलेल्या बाटल्या ते सहा महिन्यांनंतरही गेले तरी तेथेच असत. भिंतीला तोंड करून बसलेली व्यक्ती अनेक वर्षे तेथेच बसते. नंतर निघून जाते. तो माणूस असा का? पण तो तेथेच येतो. त्याला कोणी डिस्टर्ब करीत नाही. ‘मॅडम माझे कुटुंब आहे. तिच्या मुलीच्या लग्नाला मी हजर होतो. दारू कोठेही पिता येते; पण या सर्वांना भेटले की दारू हा बहाणा उरतो. तेथे व्यवहारापेक्षा नाती असतात. जे घरात पिताना मिळत नाही, ते का कुणास ठाऊक येथे मिळते. विचारांना मोकळीक मिळते.' असे काय काय ते सांगत होते.

अशी अनेक ठिकाणे मला त्यांनी दाखवली. आम्ही ही एक मुंबैंची वेगळीच व्यवस्था बघत होतो. एकदा विमानतळावर जाण्यासाठी मी रात्री वाहन शोधत होतो. त्या काळी वांद्य्रा (पूर्व)मध्ये टॅक्सी, रिक्षा मिळत नसत. रस्त्यावर मिणमिणता उजेड आणि अफाट डास असत. कोपऱ्यावर एखादेच पानपट्टीचे दुकान असे. मी टॅक्सीसाठी तेथे गेलो. गोखले तेथे उभे होते. ते नेहमीसारखे नव्हते. अडखळत होते. मी त्यांचा हात धरून ‘साहित्य सहवास'पाशी सोडले. मी परदेशातून परतल्यानंतर मला कळले, त्यांच्या पत्नीचे निधन झाले. काही दिवसांनंतर मी त्यांच्या घरी गेलो. दुपार होती. घरात ते एकटेच असावेत. मी गप्पा मारीत असताना सहजतेने त्यांनी किचनकडे पाहत बायकोला हाक मारली व ते म्हणाले, “अगं, चित्रकार आलाय! जरा चहा टाक.”

नंतर गोखले गेले. त्यांच्या पुण्याच्या घरातल्या विहिरीत त्यांना तलवारी सापडल्या होत्या. त्यातली एक ते मला देणार होते. ते राहून गेले.

मला माझ्या आजोबांचा सहवास व लाड कधी मिळाले नाहीत; पण नंतर ती कमतरता गोखल्यांसारख्या अनेकांनी भरून काढली. हे सारे आजोबा मनाने आणि मानाने फार मोठे आणि प्रेमळ होते. त्यांपैकीच एक म्हंजे दिनकर साक्रीकर होय. ते ‘झपूर्झा'मध्ये पहिल्या गेटपाशी चौथ्या मजल्यावर राहायचे. हे आजोबा मला कधीच म्हातारे वाटले नाहीत. ते सतत हसत. फिस्कारलेले केस आणि कल्ले. तरुण मुले-मुलींच्या घोळक्यात ते असायचे. अगदी सुहासिनी मुळेपासून अनेक दिग्दर्शक, लेखक, कलाकार आणि कित्येकदा अनेक अनोळखी लोक त्यांचे जिने चढून ये-जा करायचे. त्या वयात कोण कोणासाठी ये-जा करतो? आजोबा शेवटपर्यंत आऊडेटेड झाले नाहीत. मी भेटलो त्याअगोदरच काही वर्षे त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. मला त्या आजींच्या सहवासाचा योग आला नाही.

आजोबांशी माझी मैत्री त्यांनी सुरू केलेल्या ‘पूर्वा' या मासिकामुळे झाली. संपूर्ण अंक मी डिझाइन करायचो. मोबदला कसा मागायचा? मी कानकोंडा असायचो. आजोबा अंक कसे चालवायचे? त्यांना खर्च किती येतो? जाहिराती कशा मिळतात? मदत कोण करताहेत?... असे प्रश्न माझ्यापुढे असायचेच. त्यामुळे मी कधीच पैसे मागितले नाहीत. हे केवळ माझेच आजोबा नव्हते, ते तरुण पिढीतील अनेकांचे होते. दलितांसाठी ते शेवटपर्यंत झगडले. ते उत्तम वक्ता तर होतेच, पण युवा पिढीने एवढे प्रेम केलेला दुसरा कोणीही समाजवादी मी पाहिला नाही.

आमची ओळख मी पुण्यात असल्यापासूनची. डेक्कनवर निळू लिमयांच्या पूनम हॉटेलवर राहायचे. माझ्या स्टुडिओत आणि घरीसुद्धा यायचे. माझा मुलगा ध्रुव त्यांच्या कमरेला मिठी मारून बसत असे. असे काय असावे आजोबांकडे? एक दिवस माझे जहांगीर गॅलरीत प्रदर्शन होते. वर्ष आठवत नाही. अकरा वाजता आजोबा आले. शेजारच्या ‘सामोवार'मध्ये आम्ही सिगारेट्स ओढत आणि चहा घेत चर्चा करीत बसलो. अचानक त्यांनी पिशवीतून काढून मला दहा हजार रुपये दिले. मी म्हणालो, “हे कशाला?” ते म्हणाले, “अरे, प्रदर्शनाला खर्च येतो. तुला मदत होईल.” तो काळ असा होता की माणसे वैचारिक निष्ठांपुढे व्यवहार मोठा मानीत नसत. ‘पूर्वा' मासिक त्यांच्या मृत्यूपर्यंत निघत राहिले. या निष्ठेनेच आजोबांबरोबर मी राहिलो.

आजोबा प्रोग्रेसिव्ह होते. त्यांच्यावर मुखवटे कधीही नव्हते. मुखवटे धारण केलेल्या अनेक लेखकांबरोबर पुढच्या काळात माझा संबंध आला, पण त्यांच्याशी मैत्री मात्र झाली नाही.

आजोबा रम प्यायचे, सिग्रेट्स ओढायचे. यात लपवायचे काय? आजच्या काळात काही आयुर्वेदिक लेखक आहेत; पण चोरून दारू पिताना दिसतात. अशा वेळी मला गडकऱ्यांचे वाक्य आठवते- चांदण्यात कितीदा फिरला तरी ‘गुरखा' कविता करू शकत नाही!

माझे हे आजोबा कधीही गुरखा झाले नाहीत. दलितांसाठी आणि तत्त्वांसाठी लढणारा आजोबा हा एक शिलेदार होता. संध्याकाळी कोणी कोठून एखाद्या मॅग्नेटने खेचावे तसे ‘झपूर्झा'मध्ये अनेकजण त्यांच्याकडे यायचे. किती छोटे घर; पण कोणाची तक्रार नसायची. चर्चा, भांडण, प्रेम, सिनेमा, नाटक, कविता असे सगळे चालायचे. यानंतर आजोबांचा हात धरून लिकिंग रोडवरच्या आमच्या गांधी नावाच्या मित्राच्या ग्रेट पंजाबमध्ये जाणे, पान खाणे, परत आजोबांना घरी पोहोचवणे यात माझ्याकडून कधीही फरक पडला नाही.

सी ग्रेडचे सिनेमे काढणारे, पण इंटलेक्च्युअल असे एक मित्र आजोबांवर प्रेम करणारे होते. पैशासाठी ते सिनेमाचा व्यवसाय करीत, पण अनेक विषयांवर पुस्तकेही लिहीत असत. ‘पूर्वा'साठी ते आजोबांना एक लाखाची मदत करीत.

आजोबांबरोबर अनेक विचारवंतांचा सहवास मला मिळाला. परिणामी, लहान वयात माझा आऊटलुक बदलल्यामुळे मला जगण्यात आणि चित्रकलेत मदत झाली. अखेर मग तो दिवस माझ्या आयुष्यात आला.

माझ्या पुण्याच्या घरी संध्याकाळी आजोबा आले. त्यांच्याबरोबर कोणी स्त्री होती. माझी दोन्ही मुले ‘आजोबा' म्हणत धावत त्यांच्याकडे गेली. त्यांनी काही वेळाने सांगितले, “ही माझी बायको!” आम्ही काही काळ निस्तब्ध झालो. ‘दिनू'ला हे आवडते, ते आवडते, असे ती आजोबांविषयी एकेरी बोलू लागली.

अवघडलेले असे ते माझे आजोबांबरोबरचे शेवटचे जेवण. त्यानंतर मी परदेशी होतो. परतलो तेव्हा कळले, आजोबा गेले. आता कोणाला भेटायचे?

त्यानंतर ‘झपूर्झा'च्या पायऱ्या चढण्याचा योग आजपर्यंत मला आला नाही.

सुभाष भेंडे यांच्या पुस्तकांची मी कव्हर्स केली होती. भेंडे आणि मासे हे समीकरण त्या काळात झोतात होते. भेंडे प्रेमळ होते. साहित्य सहवासात ते माझ्या घरी यायचे. अजातशत्रू म्हणावे लागेल त्यांना. त्यांची एक खासियत होती. ते भेटले की बोलताना हात पकडून ठेवायचे ते सोडायचेच नाहीत. हात अवघडायचा, घामेजायचा; परंतु त्यांच्या प्रेमापोटी मी तो कधी हिसकावून घेतला नाही.

मासे खाण्यासाठी अनेकदा त्यांच्या घरी जयवंत दळवी, माधव गडकरी, रमेश मंत्री, केशवराव कोठावळे असे मासेमारी करणारे लोक जमत. काही वेळा मीही असे. मासे कसे खायचे ही कला मला अवगत नव्हती. तिथे जमलेले बाकीचे सारे माशाचा मधल्या हाडाचा कंगवा करून केस विंचरावे अशा कुशलतेने मासे खात असत.

भेंडे यांनी गोव्यात एक फ्लॅट घेतला होता. तेथे आपण जाऊ, असे प्रेमळ निमंत्रण ते हात न सोडता अनेकदा देत असत; पण तो योग कधी जुळला नाही. त्यांच्या घरातल्या मासे प्रकरणात त्यांच्या मित्रांत एकदा हमरीतुमरी झाली. त्या काळात ते प्रकरण खूप गाजले होते. नंतर मात्र मासे, जेवण कमी होत गेले असावे. मी ‘शाकुंतल'मध्ये शांता शेळक्यांचा फ्लॅट विकत घेतला. तेव्हा ते सेक्रेटरी होते. माझा हात पकडून ते सांगायचे, “अरे, तू तो फ्लॅट नावावर करून घे. मी सही करतो.”

भेंड्यांचा हात कधी निसटला कळलेच नाही. ते गेल्याचेही मला समजले नाही. नंतर कधीतरी त्यांच्या मुलाने मला घरी जेवायला बोलावले होते. तेव्हा मला मासा खाताच आला नाही. मुलगा नाराज झाला. मी काही तरी कारण दिले. खरे तर हात पकडून घरी जेवायला ये, असे सांगणाऱ्या आग्रही भेंड्यांशिवाय मासे खायचे कसे?

‘झपूर्झा 2'मध्ये व. पु. काळे राहत होता. तो खरे तर आर्किटेक्ट होता. मुंबै महापालिकेत कामाला होता. त्याने त्या व्यवसायात काय केले मला माहीत नाही. तो माझा बहिणीकडून नातेवाईक होता.

‘साहित्य सहवासा'तून तो स्कूटरवर ऑफिसला जाताना दिसत असे. एकदा माझ्या पुण्याच्या कॉलेजमध्ये मला भेटायला आला होता. हातात ऑफिसला घेऊन जातात तशी अटॅची होती. त्याने आपल्या वडिलांवर ‘सांगे वडिलांची कीर्ती' असे पुस्तक लिहिले होते. त्याचे कव्हर मी केले होते. स्टाफ रूममध्ये आम्ही बसलो. कव्हरवर ट्रेसिंग पेपर लावणे बाकी होते. वपुने खटके दाबून बॅग उघडली. त्यातून कटर, फेव्हिकॉलची ट्यूब बाहेर काढली व ट्रेसिंग पेपर कव्हरवर लावला. मी म्हणालो, “क्या बात है!” असा लेखक मी प्रथमच पाहत होतो. मी म्हणालो, “बॅगेत अजून काय काय आहे?” त्याने बॅग दाखविली. अनेक रंगाचे, निफांचे, शायांचे पेन्स त्यात होते. छोटी पट्टी, ब्लेड्स, खोडरबर्स होते. ती बॅग म्हणजे छोटे स्टेशनरी दुकान होते. शिवाय टिश्यू पेपर्स, कोलनची एक बाटली, फेस पावडरची एक मिनी डबीही होती.

त्या बॅगसारखेच वपुचे कॅरेक्टर होते. सारे नीटनेटके. लाघवी हसणे आणि डोळे मिचकावणे तर लाजबाव होते. त्याचा एकूण ढंग म्हंजे खरे काय आणि खोटे काय हे नेमके सांगता येणार नाही, असा होता. अनेक वर्षे त्याची-माझी मैत्री राहिली. अनेक वर्षे तो प्रसिद्धीच्या झोतात होता. मी त्याला मराठी लेखकांतला राजेश खन्ना म्हणत असे.

मुंबैत त्याचे सतत कार्यक्रम होत असत. त्यातला पहिला म्हणजे मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करणे हा होय. शशी मेहता हा त्या रसिक गु्रपमधला प्रमुख होता. त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आला. नेहमीप्रमाणे त्याला वपु आणि मित्रमंडळ सरप्राइज देणार होते. (शशीलाही ते माहीत असावे हे दुसरेच!) ग्रुपमधल्या साऱ्या बायकांनी नऊवारी साड्या नेसल्या होत्या. नथ, दागिने घालून त्या नटल्या होत्या. सारे पुरुष रेशमी कुडते घालून तयार होते. बायकांच्या हातांत तबक-निरांजन होते, तर कोणी टेपरेकॉर्डर घेतला होता. त्यात मीच बावळट दिसत होतो. कारण मी झोपेत होतो. गाड्यांमधून आम्ही सेनापती बापट पुतळ्याजवळच्या शशीच्या मोडक बंगल्यातल्या घरी गेलो. बेल वाजवली. शशीने दार उघडले. तो लुंगीत होता. निरांजने पेटवली. बायकांनी त्याला ओवाळले, कुंकू लावले, गुलाबाची फुले दिली. वपुच्या हातात टेपरेकॉर्डर होता तो सुरू केला आणि ‘हॅपी बर्थ डे टु यू'चे गाणे लागले. सारी मज्जाच मज्जा! मग चहापानाचा कार्यक्रम झाला. शशी म्हणाला, “अरे, काय हे! दूधवाला आला असेल म्हणून मी दार उघडले!” शशी सरप्राइज्ड झाला याचा आनंद सर्वांना झाला. मग वपुने त्याची ती जादूची बॅग उघडली. त्यात त्याचे ऑफिसचे कपडे होते. ते बदलून तो ऑफिसला गेला. पुढच्या महिन्यात दुसऱ्या मित्राचा, लागूचा वाढदिवस होता. त्याला पहाटे आश्चर्यचकित केले. त्यात शशीदेखील सामील होता.

वपु शिट्टी वाजवून गाणे म्हणायचा. मुठीवर बोटांनी तबला वाजवून ताल धरायचा. वपुचे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. त्याचे हस्तलिखित पाहण्यासारखे असायचे. त्यात तो निरनिराळ्या रंगांच्या शायांनी लिहायचा. त्याला एकच दु:ख व्हायचे, ते म्हणजे शेवटी पुस्तकात ते काळ्या शाईत छापले जाण्याचे. वपु फोटोग्राफी करायचा. वपुचे अनेक क्षेत्रांतले मित्र होते. विशेषत: नाटकातले नेपथ्य करणारे. डॉक्टर्स, वकील, नट, पोलिससुद्धा त्यात होते. तो पोलिसांच्या वाढदिवसाला स्कूटरवर मिठाई घेऊन ऑफिसला जायचा. बान्द्रे ते व्हीटीमधील रस्त्यातील सर्व पोलिसांना तो मिठाई द्यायचा. ही गोष्ट तो पोलिस सर्वांना सांगत असे.

वपुकडे भन्नाट आयडिया असत. त्याच्या दरवाज्यावरची ‘वपु' नावाची पाटी सतत तो बदलत असे. मार्केटमध्ये आलेल्या नवीन मटेरियलचा तो वापर करीत असे. एकदा तर त्याच्या घरी मी गेलो असताना त्याने टाळी वाजवली, तर काय, सारे दिवे लागले. पुन्हा टाळी वाजवली तर ते बंद झाले. त्यांच्या रसिक ग्रुपमध्ये तर धमाल असायची. एकदा उरळीकांचनच्या द्राक्षांच्या बागांत मला त्याने भर दुपारी नेले. गर्द मांडवाच्या सावलीत मुंबैचे सारे स्त्री-पुरुष सभासद सतरंजी टाकून बसले होते. शशी पालथी मांडी घालून पेटीवर गाणे म्हणत होता. वपुने बोटांनी हातावर ताल धरला. गृहिणींनी डबे उघडून छान जेवण वाढले. असे वनभोजन झाले. बागेचा शेतकरी टोपी सावरत व त्याची शेतकरीण डोक्यावरचा पदर सावरत हा सोहळा बघत होती. कधी महाड, कधी भोर, मुंबैत असेल तर मढ आयलंड अशा अनेक ठिकाणी रसिक ग्रुपचे मला निमंत्रण असे. एखाद्या वेळी मी, वसंत बापट, शंकर वैद्य, शांता शेळके उपस्थित असल्याचे आठवते. एकदा हा कार्यक्रम शिवाजी पार्कमधील वनिता समाजाच्या स्विमिंग पूलमध्येही साजरा करण्यात आला होता.

पुण्यात वपु त्याचे प्रकाशक ‘मेनका'चे पु. वि. बेहेरे यांच्या विजयनगरमधील घरी यायचा. बेहेरे कुटुंब हे माझे जवळचे मित्र होते. त्यामुळे वपुच्या भेटीगाठी होत असत. त्या काळात ‘कथाकथना'ची कल्पना वपुला सुचली. ती त्याच्या आयुष्यातील सर्वांत यशस्वी कल्पना ठरली. ती फळफळली. हजारो प्रयोग झाले. वपु प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला. स्त्रिया त्याच्या विशेष चाहत्या. एकदा दुपारी मी बेहेरे यांच्या घरी गेलो. पंचवीस एक स्त्रिया हॉलमध्ये वर्तुळ करून बसल्या होत्या. मध्यभागी वपु बसला होता. कथाकथन चालू होते. काही स्त्रियांच्या डोळ्यांत अश्रू होते. काय दृश्य होते ते! राजेश खन्नाभोवती जशा बायका गराडा घालायच्या, रक्ताने पत्र लिहायच्या, तसा वपु हा मराठीतला एकमेव लेखक होता. त्याची पुस्तके हातोहात खपायची; पण त्यापेक्षा त्याला कथाकथनात भरघोस पैसे मिळायचे.

तरीही वपु दु:खी होता. कारण टीकाकारांनी त्याला साहित्यिक म्हणून स्थान दिलेले नव्हते. मग त्याने भन्नाट कल्पना काढली. त्याच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन त्याने विमानात केले. रसिक ग्रुपने एक फ्लाइट बुक केली. ते उंच आकाशात झेपावले, तेव्हा एअरहोस्टेसने त्याचे प्रकाशन केले. वपु म्हणाला, “जमिनीवर माझ्या पुस्तकांना उंची गाठता आली नाही, तरी मी 31 हजार फूट उंचीवर जाऊन प्रकाशन केले!”

वपुची बायको म्हणजे वसुधाताईंचे निधन झाले. माझे फार छान नाते त्यांच्याबरोबर होते. त्या गेल्या तेव्हाही मी मुंबैत नव्हतो. त्यानंतर वपु मला भेटला नव्हता. एकदा संध्याकाळी तो आणि दोन-चार स्त्रिया मला टिळक रोडवर माझ्या स्टुडिओपाशी भेटल्या. कथाकथनाच्या कार्यक्रमाला ते निघाले होते. वपुच्या चेहऱ्यावर पावडर जरा जास्त झाली होती. त्याने घातलेला रेशमी कुर्ता थोडा वेगळाच दिसला. मला पाहून सारे थांबले. मी त्याच्या खिशातला हातरुमाल काढून त्याच्या चेहऱ्यावरची पावडर टिपून जरा कमी केली. त्यातली एक स्त्री म्हणाली, “वपु जरा घाईतच निघाले!” मी म्हणालो, “अहो, ते आपलेच आहेत. काळजी करू नका.” मी कुर्ता बघून म्हणालो, “अरे, कुठे घेतलास?”

तो म्हणाला, “अरे, वसू गेली. तिच्या साड्यांचे मी कुर्ते बनवून घालतो. आता कशी ती अंगभर असते माझ्याबरोबर!” उभ्या असलेल्या सर्व स्त्रिया एकदम उच्चारल्या, “वा-व्वा!”

वपुला अशी दाद नेहमीचीच असावी.

पुण्यात वपुचा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा झाला होता. त्याने कोठल्या तरी हॉस्पिटलला देणगी दिली होती. तो स्टेजवर आला आणि वरून गुलाबपाकळ्यांचा अभिषेक झाला. थिएटर गच्च भरले होते. अर्थातच कार्यक्रमाची सूत्रे त्याच्या रसिक ग्रुपच्याच हाती होती. रात्री बेहेरे यांच्या घरच्या पार्टीत तो खूप आनंदी आणि खूष दिसला होता.

पुढे मात्र काय झाले ते मला कळले नाही. त्याच्या प्रसिद्धीला उतरण लागली असावी. त्याचे कार्यक्रमही जवळपास बंद झाले होते. त्याने कथाकथनाचे फ्रँचाइजही दिलेले होते. कोणी तरी कॉलेजच्या मुली तो कार्यक्रम करीत असाव्यात.

नंतर तो स्कूटरवरही कधी दिसला नाही. थकला असावा. कोणी तरी नर्ससारखी स्त्री त्याच्याबरोबर दिसायची. तिच्या हाताला धरून रिक्षामधून तो जायचा. मीही माझ्या प्रदर्शनात गुंतलो होतो. एकदा मी गेटमधून ‘साहित्य सहवासा'त शिरत होतो. एक ॲम्ब्युलन्स बाहेर येत होती, म्हणून मी माझी गाडी रिव्हर्स घेतली. आत आल्यावर वॉचमनला विचारले, “अरे, काय झाले?” तेव्हा कळले. ॲम्ब्युलन्समधून वपुला नेले.

वपुला नेहमी गराड्यात राहायला आवडे. टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारी दाद, शेवटच्या कार्यक्रमात त्याच्यावर झालेली गुलाबाच्या पाकळ्यांची पखरण यांचे त्याला खूप कौतुक हेोते. असा वपु गेला. दोन-चार माणसे त्याबरोबर होती. रसिक ग्रुपचीही माणसे तोपर्यंत जग सोडून गेली होती.

‘झपूर्झा'कडून जाताना अजूनही वाटते, वपुकडे टाळ्या वाजवल्या की लाइट्स लागत होते. आता एकदा टाळी वाजवली की हा वपु कदाचित खाली उतरेलदेखील आणि स्कूटर काढून कथाकथनाच्या कार्यक्रमाला जाईल.

मे.पु. रेगे ‘साहित्य सहवासा'त राहतात हे मला फार उशिराने कळले. त्यांची-माझी भेट लक्ष्मणशास्त्री जोशींच्या प्रज्ञा पाठशाळेतली होती. वाईतल्या त्या नदीकाठच्या घरात उंच जिन्यावरून गेले की त्यांची खोली होती. शे-दोनशे फूट खाली नदीचे पात्र, समोर पसरलेले पसरणीचे डोंगर, नदीतले डोंगराचे प्रतिबिंब असे विहंगम दृश्य दिसत असे. दार उघडले की वाऱ्याने सारे उडून जायचे. तेथे त्यांचे टेबल, खुर्ची, पुस्तके, बेड असे मोजके सामान असायचे. मला तिथे जायला फार आवडे. माझ्याबरोबर ते खिडकीत तोंडात पाइप धरून उभे राहायचे. फार छान हसायचे. त्यांचा चेहरा, कपाळावर आलेले केस पाहून मी त्यांना ग्रेगरी पेक म्हणायचो. वाईत मी आणि शास्त्रीजी पहाटे पसरणी घाटापर्यंत चालत जायचो. येताना दुरून त्यांच्या बाल्कनीत उभी असलेली मेपुंची आकृती दिसायची. सकाळचा चहा, नाश्त्याला ते बरोबर असायचे. नंतर ते बहुतांशी विश्वकोशाच्या लायब्ररीमध्येच असायचे.

संध्याकाळी मात्र शास्त्रीजींच्या अंगणात बैठकीत ते असायचे. त्या अंगणात मोठे झाड होते. भोवती ओट्यावर बैठक जमायची. ज्ञानसत्रच सुरू व्हायचे. या बैठकीत अनेक गायक, लेखक, विचारवंतांना, परदेशी विद्यार्थ्यांना मी भेटलो आहे. मेपुंची व शास्त्रीजींची भरपूर चर्चा व्हायची, ज्यातले मला काही समजायचे नाही. मात्र, रात्री जेवताना वातावरण खेळकर असायचे. मेपुंचे विनोद, एकमेकांविषयीची तत्त्वज्ञानातील टवाळी त्यात सामील असायची.

विश्वकोशाची स्वत:ची अशी कॉलनी पसरणी घाटाच्या पायथ्याशी तयार झालेली होती. तेथे मेपु व आम्ही अनेकदा जायचो. मीही तेथे घर घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. पुढे ते जमले नाही. नंतर शास्त्री गेले. मेपुच त्यांचे उत्तराधिकारी होते. माझे वाईला जाणे जवळजवळ बंद झाले.

एकदा ‘साहित्य सहवासा'तल्या नंबर दोनच्या गेटपाशी अचानक मेपु भेटले. सिग्रेट ओढीत ते आत येत होते. मी त्यांना विचारले, “अरे, तुम्ही इकडे कोठे?”

ते मिश्कील हसले. म्हणाले,“मी येथेच राहतो.”

“अहो, मी पण येथे ‘शाकुंतल'मध्ये राहतो.”

मग ते चहाला घरी आले. वाईविषयीच्या गप्पा झाल्या. त्या गप्पांत तत्त्वज्ञानाबद्दल एक शब्द नव्हता. ते साहित्य सहवासमध्ये फार कमी राहिले. सतत ते वाईलाच असायचे. पण एके दिवशी ते खाली बागेत मला भेटले व म्हणाले, “काय करतोस?”

“काही नाही.”

“मग चला, हनुमान मंदिरात जाऊ.”

मी म्हणालो, “मंदिर? आणि तुम्ही? पण चला.”

ते म्हणाले, “अरे, मी नास्तिक; पण आस्तिक झाल्याशिवाय पुढचे उलगडे होणार नाहीत.”

कमाल आहे! पुढे दोन-तीनदा मी महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक, हाजी अली असा त्यांच्यासोबत गेलो होतो. ते अगदी श्रद्धेने प्रदक्षिणा, नमस्कार, आरतीमध्ये सहभागी व्हायचे.

तत्त्वज्ञानातील हा एक मार्ग त्यांनी शोधला होता. एकाच बाजूने तपासणे त्यांना योग्य वाटत नसावे.

तत्त्वज्ञान हा माझा विषय नव्हता आणि चित्रकला त्यांचा.

पण दोघांमध्ये काही काळ फार देखणा दुवा होता.

परत वाईला मी काही वर्षांनी विश्वकोशात गेलो. शास्त्रीजी गेल्यानंतर कर्ता पुरुष गेल्यानंतर असते तशी भयाण शांतता त्या वाड्यात होती.

माझ्या अनेक आठवणी त्या वाड्यात होत्या. मी अंगणात गेलो. तो उंच लाकडी जिना, त्याला जोडलेली मेपुंची खोली, त्यावर चढलेल्या वेली. मला विचारण्याचे धारिष्ट्य झाले नाही, की मेपु कोठे आहेत.

एकदा बेल वाजली. दार उघडले, तर दारात गौरी देशपांडे उभी होती.

“अरे, मी गप्पा मारायला आलीय!” ती म्हणाली.

“ये ये.” मी म्हणालो. मला तिचा हा मनमोकळेपणा लगेच आवडला. उगाच आढेवेढे नाहीत.

ती घरभर फिरली. काही चित्रांपाशी थांबली.

बसल्यानंतर म्हणाली,

“तू माझ्या पुस्तकांवर माझेच चित्र काढतोस!”

मी म्हणालो, “तू आहेस म्हणून पुस्तक आहे!”

मला काही लेखक आवडतात त्यात गौरी ही एक आहे. तिने मोजकेच लिहिले; ते पण विलक्षण अनुभवांचे, मराठी सीमांपलीकडचे. तिचा प्रवास, तिचे भटके आयुष्य, तिचा स्पष्ट दृष्टिकोन, त्यातली तिची गंभीर, तर कधी अगदी ठाम मतेही. मला तिचे लिखाण आवडायचे. म्हंजे ते मिडिऑकर नसायचे. त्या संध्याकाळी तिने मला विचारले,

“अरे, रम आहे का?”

“म्हंजे काय, आहेच! रमइतके चांगले ड्रिंक कुठे आहे?”

नंतर मनमोकळ्या गप्पा. तिचा परदेश प्रवास, तिचे मित्र, नवरा, मुले, मराठी लिखाण, अशा अनेक गप्पांनी संध्याकाळ रंगत गेली.

‘साहित्य सहवासा'त ती फारशी राहिली नाही. तिच्या मुलींच्या गोंधळात ती रमलीही नाही. फिरतच राहिली. त्याबद्दलही तिने लिहिलेच आहे. माझ्या तिच्या दोन-चारच भेटी झाल्या. त्याही माझ्या घरी. एकदा स्त्रीमुक्ती, डिव्होर्स असा विषय आला. ती जोरात हसली व म्हणाली,

“सारं बकवास आहे! या बायकांना कामधंदे नाहीत. डिव्होर्स कशाला घ्यायचा? कितीही पुरुष बदलले तरी त्यांच्या सवयी, अंगकाठी, वास, स्वभाव थोड्याफार फरकाने सारखेच असतात. एक झोपेत घोरतो तर दुसरा पादतो. त्यापेक्षा नवऱ्यात होणारे बदल पाहत राहावेत. तुम्हाला जसा पाहिजे तसा कोणीही मिळत नाही. स्वत:कडे पाहावे, मग नंतर सारे सुरळीत होत जाते.”

माझी ती संध्याकाळ हसण्यातच गेली.

एकदा दुपारी तिचा फोन आला, “अरे, सिनेमाला जाऊ यात का?”

अर्थातच मी ‘हो' म्हणालो. आम्ही दुपारी टॅक्सीने रिगल थिएटरला गेलो. कुठला तरी भिकार इंग्लिश सिनेमा होता. आम्ही अर्धवट सोडून जहांगीर आर्ट गॅलरीतल्या चिंचोळ्या ‘सामोवर'ला गेलो. चहा-सँडविचेस, गप्पा चालू असतानाच ज्ञानेश्वर नाडकर्णी अवतरले. जहांगीर गॅलरी हे नाडकर्णींचे दुसरे घरच होते. नंतर आमच्या तिघांच्या गप्पा होत होत सायंकाळ झाली. नाडकर्णींनी ऑफर दिली. शेजारच्याच ‘कंदील' रेस्टॉन्टमध्ये बियरबरोबर मैफिल सुरू झाली. रात्री आम्ही टॅक्सीने परतलो. गौरी मला थकलेली दिसली. मला वाटले, तिला दगदग झाली.

नंतर गौरी गायबच झाली. बहुधा तिचे लिखाण चालू असावे, अथवा ती परदेशी गेली असावी. काहीच बातमी लागली नाही. तिच्या मुलीने उडत उडत सांगितले की आता ती विंचुर्णीला राहते.

मी माझ्या प्रदर्शनात गुंतत गेलो. कधीमधी ‘मौजे'तले तिचे लिखाण वाचीत असे. आणि एकदा अचानक गेटपाशी बॅग घेऊन टॅक्सीत बसताना ती भेटली.

“अरे! तू आता विंचुर्णीलाच दोन-तीन दिवस राहायला ये. मला या मुंबैचा आणि माझ्या मुलींचा कंटाळा आलाय!” टॅक्सी गेली. माझी ही विलक्षण प्रतिभेची उंच मैत्रीणही त्यानंतर गेली. मला अजूनही चुकल्यासारखे वाटते. साला, विंचुर्णीला जायला हवे होते. मिस यू, गौरी!

‘साहित्य सहवासा'त येऊन आता अनेक वर्षे झाली. पिढ्या बदलल्या.

मी राहतो त्याच्या वरच्या मजल्यावर धर्मवीर भारती राहत असत. ते जाता-येता माझ्या घरी येऊन बसत. त्यांचे चित्रकलेवर अत्यंत प्रेम होते. ‘धर्मयुग'चे संपादक असताना हुसेनपासून ते त्या पिढीतल्या अनेक चित्रकारांचा त्यांच्याशी संवाद होता. कवी, लेखक, डिरेक्टर्स, अनेक नेते त्यांच्याकडे येत-जात असत. हरिवंश बच्चन त्यांचे जवळचे मित्र होते. दोघांत कौटुंबिक जिव्हाळा होता. अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या घरी येत असे. पुढे माझ्याकडेही यायचा. अटलबिहारी वाजपेयी गुडघे दुखत असताना जिने चढून त्यांच्या घरी आले होते. जयप्रकाश नारायण येत. एकदा मुरली मनोहर जोशी आले होते. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी अनेकदा येत असत. सायंकाळी साहित्य सहवास मजेशीर असायचा. धर्मवीर भारती, म. वि. राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ, म. वा. धोंड, कधीमधी मधुकर तोरडमल फेरफटका करताना दिसायचे. अशोक रानडे आणि त्यांच्या पत्नी बागेत बेंचवर बसलेल्या दिसत. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. कोणाच्या तरी आधाराने हे सारे चालताना दिसत. नंतर एकाएकी दिसेनासे होत. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर, गोवारीकर गेल्याच्या बातम्या कानावर पडत. या प्रत्येकाबरोबर माझे नाते जुळले होते. आमच्या खालच्या कट्ट्यावर सायंकाळी मिसेस गंगाधर गाडगीळ, विजया राजाध्यक्ष आणि अनेक आज्या गप्पा मारताना दिसत. माझा नातू मार्सेल बागेतली फुले तोडून त्यांच्या हातात देत असे. त्याला त्या बाजीराव म्हणायच्या. एका दिवशी खुर्ची रिकामी दिसली. कळले, की गाडगीळ आजी रात्री गेल्या.

येथल्या ग्राऊंडवर सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा. आता मार्सेल आणि त्याचे छोटे मित्र धावत असतात. नवीन पिढीतल्या या लोकांना मी फारसा ओळखत नाही. येथे अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स राहतात. कोणी मोठे वकील. कोणाच्या फॅक्टऱ्या आहेत. पूर्वी एखादी गाडी कॉलनीत असायची. आता महागड्या गाड्यांनी कॉलनी भरलेली असते. ही सर्व त्या लेखकांची मुले आहेत. मीही कधी कॉलनीत फिरतो. प्रत्येक इमारतीची ओळख तेथे राहणाऱ्या लेखकात गुंतलेली आहे.

माझ्याकडे मित्रमंडळी येत असतात. खालच्या कट्ट्यावर आम्ही बसतो. रस्त्यावरच्या पंडिताकडे चहा पितो. या गेलेल्या अनेक मोठ्या लेखकांविषयीच्या गप्पा रंगतात. विंदांची साहित्य दिंडी निघते. त्यात सारे सहभागी होतात. गाण्यांच्या मैफिली होतात, कार्यक्रम होतात. देवराजांनी, भारतीजींनी आणि अनेक लेखकांनी लावलेली झाडे अजून आहेत. त्यांवर पोपट येतात, फुलपाखरे येतात. किलबिलाटात ‘साहित्य सहवासा'त सकाळ होते आणि रात्री या साहित्यकारांची घरे शांत झोपतात.

माझा स्टुडिओ शांत असतो. येथे बसून मी अनेक पेंटिंग्ज केली, लिखाण केले. हा सहवास मला मिळाला. ही पण मजाच आहे. 300 बाय 300 मीटर्स असलेल्या या ‘साहित्य सहवास'ने दहा साहित्य संमेलनांचे अध्यक्ष दिले, तीन साहित्य अकॅडमी अवॉर्डचे लेखक दिले, चार संगीत नाटक अकॅडमीचे विजेते दिले; पद्मश्री, पद्मविभूषण, ज्ञानपीठ सन्मानित दिले. एक भारतरत्नसुद्धा दिला.

अशी कॉलनी इतरत्र असेल असे मला वाटत नाही. ही मुंबै कोणाला मानवते तर अनेकजणांना नाही. गर्दीतल्या लोंढ्यामध्ये तुम्ही ढकलले जाता. किती वर्षे गेली आहेत कळत नाही. मुंबैत घरासाठी लोक वर्षानुवर्षे झगडत राहतात खरे. अगदी नालासोपारापर्यंत घरंगळत जातात. योगायोगाने मी ‘साहित्य सहवासा'त आलो. मला फिरावे लागले नाही. या कॉलनीने मला पेंटिंग करायला, राहायला स्थैर्य दिले, शांतता दिली. अनेक लेखकांनी, रहिवाशांनी प्रेम, आपुलकी दिली. त्यांच्या या मोठ्या, अलौकिक कुटुंबात सामावून घेतलं.

असा या मुंबैतला ‘साहित्य सहवास' इतरत्र नाही. येथे राहावयास भाग्य लागते हे खरे आहे.

(२०१९च्या ‘अनुभव’ दिवाळी अंकातून साभार)

सुभाष अवचट

सुभाष अवचट हे ख्यातनाम चित्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

भालचंद्र गोखले17.03.25
खूप छान आठवणी आहेत.
See More

Select search criteria first for better results