आम्ही कोण?
ले 

इराण-अमेरिका युद्ध स्थगितीः केवळ नाटक?

  • निळू दामले
  • 09.04.26
  • वाचनवेळ 5 मि.
ceasefire

अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण मानवजात नष्ट करण्याचा कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी स्थगित केला आहे. त्यामुळे जगाने सध्या तरी हुश्श केलं आहे. ७ एप्रिलच्या सकाळी आठ वाजता ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा दिला होता. २४ तासांची मुदत देतो, होरमुझ सामुद्रधुनी मोकळी करा, नाही मान्य केलंत तर चोवीस तासात इराण नष्ट करेन, इराण पुन्हा अश्मयुगात जाईल..वगैरे वगैरे.

पाठोपाठ तिकडे इस्लामाबादमधे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ त्यांचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या सोबत चर्चा करू लागले. २८ फेब्रुवारीला अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तेव्हापासूनच शरीफ यांनी सौदी, इजिप्त, तुर्किये, कतार यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी युद्ध कसं थांबवता येईल याबाबत चर्चा सुरू केली होती. चर्चा एकतर्फीच होती. यापैकी कोणाशीही अमेरिका अधिकृतरीत्या बोलत नव्हतं. ट्रम्प यांच्या डोक्यात काय आहे, ते कोणालाच कळत नव्हतं. नंतर इराणने कतार, कुवैत, सौदीवर रॉकेटं सोडायला सुरुवात केल्यानंतर स्थिती अधिक बिकट झाली. आखाती देश बुचकळ्यात पडले. ट्रम्प काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

३० मार्चला वरील सर्व देशांचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमधे जमले. या बैठकीत चीनचा प्रतिनिधी नव्हता. पण चीनचे परराष्ट्रमंत्री सतत शहाबाज शरीफ यांच्या संपर्कात होते. चीनने स्वतंत्रपणे इराणशी संपर्क केला होता आणि युद्ध थांबवण्यासाठी चांगली संधी शोधा असं सांगितलं होतं. चीनचा दबाव अमेरिकेपेक्षा इराणवर अधिक होता. आखाती देशांच्या अर्थव्यवस्था कोसळू लागल्या होत्या. चर्चेमधे अमेरिकेबद्दलचा राग व्यक्त होत होता. लढाई मुळात इस्रायलची आहे, अमेरिका ती खेळतंय आणि त्यात आपल्याला विनाकारण ओढतंय, याचा राग हे परराष्ट्र मंत्री व्यक्त करत होते. अमेरिकेने आपल्याला दिलेलं संरक्षण इराणी हल्ल्यामुळे कुचकामी ठरतय, मग अमेरिकेच्या नादी आपण कशाला लागायचं असा सूर त्या बैठकीमधे उमटत होता. पण कोणतीही ठाम भूमिका घ्यायची हिंमत कोणी करत नव्हतं.

शरीफ यांचे अमेरिका आणि इराण दोघांशीही संबंध होते. त्यांच्या पातळीवर त्यांनी अमेरिकेच्या मागण्या आणि इराणच्या मागण्या मिळवल्या. या मागण्या ते त्या त्या देशांकडे पाठवत होते. पण दोन्ही देश आपल्या भूमिकेवरून ढिम्म हलत नव्हते. इराण किती ताठर आहे याची चांगलीच कल्पना पाकिस्तानला होती, पण ट्रम्प यांच्या डोक्यात काय आहे ते कळत नव्हतं. ट्रम्प थेट कोणाशीही बोलायला तयार नव्हते.

 हेही वाचा - जनतेने ओढवून घेतलेली सत्ताधाऱ्यांची मनमानी

इराणने माघार घेतली नाही तर संपूर्ण मानवजात धोक्यात येईल, हा ट्रम्प यांनी सात तारखेला दिलेला इशारा शरीफ यांना अपेक्षित नव्हता. ट्रम्प चाचपडत आहेत, मागेही फिरता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही या स्थितीत ते काय करतील याचा अंदाज शरीफ किंवा त्यांच्यासोबतच्या आखाती परराष्ट्र मंत्र्यांना येत नव्हता. तरीही शरीफ अमेरिकी लष्कर आणि इराणी आरजीसी या संघटनांच्या संपर्कात होते. लोचा असा की त्या लष्करी संघटनांनाही काही सांगता येत नव्हतं. लष्करांकडे काही योजनाच नाहीये की योजना आहे पण ते सांगत नाहीयेत याचा उलगडा शरीफ यांना होत नव्हता.

या धमकीनंतर इराण शरण येईल, युद्ध थांबवण्याची विनंती करेल अशी ट्रम्पची अपेक्षा होती काय? सीआयएचा इंटेलिजन्स काय सांगत होता? इराण कायमच्या, दीर्घ लढाईची आखणी करत होतं हे सीआयएनं ट्रम्पना सांगितलं नाही? इराण अत्यंत कडवट आहे, कितीही विध्वंस सहन करायला तयार आहे याची कल्पना ट्रम्पना आली होती की नाही? कल्पना आली असूनही ‘देऊन पाहू धमकी’ असा हिशोब ट्रम्पनी केला होता काय? काहीच कळायला मार्ग नव्हता.

सातच्या सकाळच्या घोषणेनंतर शरीफ यांनी धावपळ सुरू झाली. घोषणा करण्याआधी ट्रम्प यांनी आखाती देश, इजिप्त, तुर्किये यापैकी कोणाशीही संपर्क केलेला नव्हता. शरीफ यांनी दुपारनंतर अमेरिकन लष्कराशी संपर्क केला. अमेरिकन सेनापती गप्प. पण शरीफ यांनी प्रयत्न चालू ठेवले.

शरीफ यांनी युद्धबंदीसाठी कोणताही नवा मसुदा दिला नाही. ट्रम्प यांचा १५ कलमी प्रस्ताव आणि इराणचा १० कलमी प्रस्ताव कित्येक दिवसांपासून अमेरिकेकडं पडून होता, त्यावर एक इंचही हालचाल झाली नव्हती. दुपारनंतर कधी तरी ट्रम्पनी पलटी मारायचं ठरवलं. याआधी तीन वेळा तरी ट्रम्पनी पलटी मारलीच होती. त्यामुळे पलटी मारणं ट्रम्पना नवं नव्हतं. त्यात आपली टिंगल होतेय असंही ट्रम्पना वाटणार नव्हतं. फक्त शरीफांनी केलेली विनंती ट्रम्पना तराफा म्हणून उपयोगी पडली.

 हेही वाचा - नेतान्याहूंनी इराणशी लढाई का आरंभलीय?

ट्रम्प यांचे आठवडाभर नेतान्याहू यांच्याशी बोलणी, वाद सुरू होते. नेतान्याहू सांगत होते की काहीही करा युद्ध थांबवू नका. लेबनॉन, गाझा आणि इराणशी ते देश पूर्ण संपेपर्यंत लढायचं असं नेतान्याहूंच्या डोक्यात आहे. त्यामुळे युनो, युरोपीय देश, जगातले अन्य देश यांनी कितीही विनंत्या केल्या तरी नेतान्याहू थांबत नाहीत. गाझात अधिकृत युद्ध स्थगिती झाली असूनही नेतान्याहू दररोज गाझातल्या इमारती, शाळा, हॉस्पिटलं उडवत आहेत, माणसांना मारत आहेत. त्यामुळे नेतान्याहूनी स्थगितीला विरोधच केला असणार.

पण अमेरिकेची खुमखुमी संपली आहे. अमेरिकन लोकमत आणि सेनेचं मत ट्रम्पच्या विरोधात आहे. अमेरिकेला युद्ध आवरतं घेणं मस्ट आहे.

नेतान्याहू स्थगितीला मनापासून तयार नाहीत. ते हल्ले करतच रहातील. त्यामुळे स्थगिती कधी मोडेल सांगता येत नाही.

अमेरिका आणि इस्रायल हल्ले करणार असेल तर इराण प्रत्युत्तर देतच राहील.

स्थगिती किती टिकेल ते कसं सांगावं?

गाझात ट्रम्पनी युद्ध स्थगिती केली, गाजावाजा करून. प्रत्यक्षात गाझातलं युद्ध सुरूच आहे.

इराणमधे काही वेगळं होईल? आजच्या बातम्यांवरून तरी तसं दिसत नाही.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results