सोनं आणि चांदी या धातूंना हजारो वर्षांचा इतिहास आहे. चलन व्यवस्था अस्तित्वात येण्याआधीपासूनच या धातूंना महत्त्वाचं स्थान होतं. आजही बँका, शेअर बाजार, डिजिटल व्यवहार हे सगळं असूनही संकटाच्या काळात माणूस पुन्हा सोन्या-चांदीकडेच वळतो. या धातूंचं मूल्य कोणत्याही सरकारच्या आदेशावर, कोणत्याही बँकेच्या निर्णयावर किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या वक्तव्यावर थेट अवलंबून नसतं, हे त्यामागचं कारण.
अचानक सोन्या-चांदीचे भाव का वाढले आहेत, हा प्रश्न आज जगभरातील गुंतवणूकदारांना पडला आहे. सामान्य माणसासाठी तर हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा आहे. कारण याचा परिणाम सामान्य माणसाच्या बचतीवर, गुंतवणुकीवर होत असतो. शिवाय महागाई, भविष्यातली आर्थिक सुरक्षितता त्यावर अवलंबून असते.
२०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे ५,६०० डॉलरच्या पर्यंत पोहोचला. भारतीय रुपयांत हा भाव जवळपास ४ लाख ६० हजार रुपयांच्या वर आहे. ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला तेव्हा सोन्याचा भाव जवळपास निम्म्याहून कमी होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात सोन्याच्या किमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत.
चांदीच्या बाबतीतही हेच चित्र आहे. २०२५ च्या सुरुवातीला चांदीचा भाव प्रति औंस सुमारे ३० डॉलर म्हणजेच २,५०० रुपयांच्या आसपास होता. आज तो दर ११८ डॉलरपेक्षा जास्त आहे म्हणजे जवळपास ९,८०० रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजे एका वर्षापेक्षा कमी कालावधीत चांदीचा भाव जवळजवळ चारपट वाढलाय.
इटलीतील ‘अँथिलिया’ या गुंतवणूक संस्थेचे सल्लागार ज्युसेप्पे सेर्साले यांनी या भाववाढीला ‘उन्मादाची लक्षणं’ म्हटलं आहे. त्यांच्या मते, बाजारातील हालचाली अतिशय वेगाने होत आहेत. आर्थिक भाषेत याला ‘पॅराबोलिक मूव्हमेंट’ म्हटलं जातं.
पण लोक सोन्या–चांदीमध्ये गुंतवणूक का करत आहेत?
इतिहास पाहिला तर सोन्याकडे नेहमीच एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलं आहे. महागाई वाढते, चलनाची किंमत कमी होते, युद्धाची शक्यता वाढते किंवा सरकारवरचा विश्वास कमी होतो, तेव्हा लोक सोन्याकडे वळतात. कारण सोनं कागदी चलनासारखं छापता येत नाही. त्याची उपलब्धता मर्यादित असते आणि हजारो वर्षांपासून त्याने आपलं मूल्य टिकवून ठेवलेलं आहे.
हेही वाचा - मिळकत-बचत-गुंतवणुकीचे काही ठोकताळे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक अनिश्चितता वाढलेली आहे, हे नक्की. त्यांनी जगातील अनेक देशांसोबत टॅरिफ युद्ध सुरू केलं, इराणसारख्या देशांना लष्करी कारवाईची धमकी दिली, ग्रीनलँडसारख्या प्रदेशांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केली आणि अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवर म्हणजेच फेडरल रिझर्व्हवर दबाव टाकण्याचं काम केलं. या सगळ्यामुळे जागतिक गुंतवणूकदार अस्वस्थ झालेले आहेत.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात कपात करण्यास नकार दिला म्हणून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केलीय. एवढंच नव्हे तर फेडच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी वक्तव्यंही केली आहेत. काही अर्थतज्ज्ञांच्या मते, फेडरल बँकेच्या स्वातंत्र्यावर गदा आली तर महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत पुन्हा महागाई वाढली आणि डॉलरची किंमत घसरली, तर कागदी चलनाची किंमत कमी होऊ शकते. या भीतीला ‘डिबेसमेंट’ म्हणतात. अशा वेळी सोनं खरेदी केलं तर त्याचं मूल्य कायम राहील असा लोकांचा विश्वास आहे. हे बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सींसाठीही लागू होतं. पण तरीही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक वाढलेली दिसत नाहीय. कारण अजूनही क्रिप्टो अनेकांना अस्थिर आणि जोखमीचं वाटतंय. पण सोनं पारंपरिक सुरक्षेचा पर्याय आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक वाढताना दिसतीय.
सोन्याच्या किमती वाढण्यामागे मध्यवर्ती बँकांचाही हात आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या राखीव साठ्यात सोन्याचं प्रमाण वाढवताहेत. यामागे अमेरिकन सरकारी रोखे म्हणजे ट्रेझरी बाँड्सवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा विचार करता अमेरिकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या हमीवर विश्वास ठेवणं अनेक देशांना धोकादायक वाटतंय. म्हणून अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करताहेत.
आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भाव वाढताना पाहून नफा कमावण्यासाठी सध्या जगभरातील किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे सामान्य लोक सोनं आणि चांदी खरेदी करताहेत. ब्रिटनमधील रॉयल मिंटसारख्या संस्थाही सामान्य लोकांना सोन्यात गुंतवणूक करण्याचं आवाहन करत आहेत.
तसंच चांदीचे दर सोन्यापेक्षा कमी असल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना ती अधिक परवडणारी वाटते. त्यामुळे अलीकडच्या काळात चांदीची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतेय. उद्योगांमध्येही चांदीचा वापर होत असल्यामुळे तिची मागणी अपेक्षेपेक्षा जास्त वाढताना दिसत आहे.
या सगळ्याचा परिणाम अमेरिकन डॉलरवरही दिसून येतोय. अमेरिकेच्या धोरणांमुळे डॉलर कमकुवत होतोय. अलीकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत युरो मजबूत झालाय. एक युरो जवळपास १.२० डॉलरपर्यंत गेला होता, म्हणजेच भारतीय रुपयांत साधारण १०० रुपयांच्या आसपास. ब्रिटिश पाउंडही सुमारे १.३८ डॉलर म्हणजेच सुमारे ११५ रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
डॉलर कमकुवत होतोय, याकडे ट्रम्प यांनी फारसं लक्ष दिलेलं नाही. उलट व्यापार तूट कमी करण्यासाठी कमकुवत डॉलर फायदेशीर ठरू शकतो असे संकेत त्यांनी दिले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री मात्र वेगळी भूमिका घेत डॉलर मजबूत करण्यावर भर देत आहेत.
इतकं सगळं होत असूनही अमेरिकेच्या शेअर बाजारात मात्र मोठी घसरण झालेली नाहीय. उलट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमुळे शेअर बाजाराने चांगली कामगिरी केलीय. २०२५ मध्ये एस अँड पी ५०० निर्देशांक जवळपास १८ टक्क्यांनी वाढला आहे.
हेही वाचा - सोनं 1 लाखाच्या वर! भाव वाढीमागचं अर्थकारण आणि भविष्याची दिशा
अनेक तज्ज्ञांना शेअर बाजार घसरण्याची भीती वाटत असली, तरी ‘जोपर्यंत वाढ होत आहे तोपर्यंत शेअर्स खरेदी करत राहा’, या मानसिकतेत गुंतवणूकदार असल्याचं दिसतंय. संभाव्य व्याजदर कपातीमुळेही शेअर बाजारात वाढ होतेय.
सोन्या-चांदीच्या भावाचं आणि शेअर बाजाराचं कनेक्शन थोडं वेगळं असतं. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली चाललेली असते, कंपन्यांचा नफा वाढत असतो, सरकार स्थिर असतं, जागतिक वातावरण शांत असतं तेव्हा लोक शेअर बाजाराकडे वळतात. कारण शेअर्समध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. पण जेव्हा भीती वाढते, युद्ध, मंदी, महागाई, व्याजदरात वाढ, शेअर बाजारात मोठी घसरण, राजकीय गोंधळ वाढतो तेव्हा लोक शेअर्समधून पैसा काढून सोन्या-चांदीमध्ये गुंतवतात.
सध्याच्या परिस्थित भारतात शेअर बाजार कोसळत आहे आणि सोन्या-चांदीचे भाव वाढताना दिसताहेत. अमेरिकेत मात्र शेअर बाजाराला तंत्रज्ञान कंपन्यांमुळे आधार मिळाला आहे, पण भविष्यात अमेरिकन शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण ही तेजी जास्त काळ टिकणारी नाही असे संकेत अमेरिकन अर्थतज्ज्ञांकडून मिळत आहेत.
आता पुढे काय होणार, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. काही मोठ्या गुंतवणूक बँका सोन्याबाबत सकारात्मक आहेत. जेपी मॉर्गन या संस्थेच्या मते, २०२६ च्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति औंस ६,३०० डॉलर म्हणजेच सुमारे ५ लाख २० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यांच्या मते, सोनं हे अजूनही गुंतवणूक पोर्टफोलिओसाठी महत्त्वाचं आहे. डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आणि मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी हे दोन मुख्य घटक पुढील काळातही महत्त्वाचे असणार आहेत.
चांदीबाबतही अशीच अपेक्षा व्यक्त केली जातेय. पण चांदीच्या भावातील चढ-उतार अधिक तीव्र असू शकतात असा अंदाज आहे. चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रातही होत असल्याने तिथे मागणी वाढली तर भाव वाढू शकतात. मागणी कमी झाली की भाव कमी होऊ शकतात, असा अंदाज आहे.
म्हणजे जागतिक बाजारात आणि अर्थव्यवस्थेत स्थिरता येत नाही तोपर्यंत सोन्या चांदीचे भाव वाढत राहण्याची शक्यता आहे.
