
भारतात सोन्याचं केवळ आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्वही आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे. दरवर्षी भारतात ८००-९०० टन सोन्याची मागणी असते, ज्यापैकी बहुतांश सोनं दागिन्यांसाठी वापरलं जातं.
सध्या सोनं रोज नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने पहिल्यांदाच १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक टप्पा पार केला. पण त्यानंतर सोन्याच्या भावात किंचित घसरण होऊन सोनं ९५,००० ते ९८,००० रुपयांमध्ये स्थिरावलं आहे. २०२५ मध्ये सोन्याने जवळपास २९ टक्के परतावा दिला आहे. पण या भाववाढी मागची कारणं काय आहेत?
पहिलं कारणं आहे अमेरिका-चीन ट्रेड वॉर आणि वाढते टॅरिफ.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर शिगेला पोहोचलं आहे. दोन्ही देश एकमेकांवर नवे टॅरिफ (कर) लादत आहेत. जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम होत आहे. अशा अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. जेपी मॉर्गनच्या ताज्या अहवालानुसार, या ट्रेड वॉरमुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.
दुसरं कारण आहे जागतिक मंदीची भीती.
जागतिक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये आर्थिक वाढ कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शेअर मार्केट, रिअल इस्टेट, आणि इतर जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची भीती असते. यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित आणि स्थिर पर्यायाकडे वळत आहेत. मंदी येते त्या काळात सोन्याची मागणी नेहमीच वाढते, कारण सोन्याचं मूल्य इतर मालमत्तांप्रमाणे अचानक घसरत नाही. शिवाय, सोन्याला ‘संकटातील मित्र’ (safe haven asset) म्हणून ओळखलं जातं. जर मंदी खरोखर आली, तर सोन्याच्या किंमती आणखी वाढतील असा अंदाज आहे.
तिसरं कारणं आहे सेंट्रल बँकांची मोठ्या प्रमाणातील खरेदी.
जगभरातील सेंट्रल बँका विशेषतः चीन, रशिया, भारत, आणि तुर्कस्तान – मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये सेंट्रल बँकांची सोन्याची सरासरी मागणी ७१० टन इतकी आहे. या मागणीमुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत. सेंट्रल बँका सोनं खरेदी करतात कारण सोनं हे त्यांच्या चलनाला स्थिरता देतं. विशेषतः अमेरिकन डॉलरवर अवलंबून राहण्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक देश सोन्याचा साठा वाढवत आहेत. भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गेल्या काही वर्षांत सातत्याने सोनं खरेदी करत आहे.
चौथं कारणं आहे महागाई आणि व्याजदरांचा दबाव.
अमेरिकेत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह म्हणजे तिथली सेंट्रल बँक कडक धोरणांचा वापर करत आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करत नाही, त्यामुळे इतर गुंतवणुकीतील परतावा कमी होत आहे. अशा परिस्थितीत, सोनं हे महागाईपासून संरक्षण देणारं साधन मानलं जातं. विशेष म्हणजे महागाई वाढते, तेव्हा पैशांचं मुल्य (व्हॅल्यू) कमी होतं. पण सोन्याचं मुल्य (व्हॅल्यू) कायम राहतं, किंवा काहीवेळा तर ते वाढतं. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला जास्त प्राधान्य देतात.
पाचवं आणि महत्त्वाचं कारणं म्हणजे भू-राजकीय तणाव.
सध्या युक्रेन-रशिया युद्ध, मध्यपूर्वेतील अस्थिरता, आणि इतर भू-राजकीय तणाव यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत, सोन्याची मागणी नेहमीच वाढते. विशेष म्हणजे भू-राजकीय तणाव हा सोन्याच्या किंमतींसाठी ‘ट्रिगर’ म्हणून काम करतो.
२०२५च्या शेवटी आणि २०२६मध्ये सोनं कुठे असेल?
जेपी मॉर्गन आणि गोल्डमॅन सॅक्स या दोन जागतिक संस्थांनी याबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, २०२५मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात सोन्याची सरासरी किंमत डॉलर ३,६७५ प्रति औंस असेल. याचा अर्थ, भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव १,१३,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. विशेषतः दिवाळीच्या सुमारास सोनं हा टप्पा गाठू शकतो. जर मागणी अपेक्षेपेक्षा जास्त वाढली, तर सोन्याचा भाव हा टप्पा लवकरच पार करु शकतो. कारण दिवाळी हा भारतात सोन्याच्या खरेदीचा सर्वात मोठा सण आहे.
तसंच जेपी मॉर्गनने २०२६चा देखील अंदाज व्यक्त केला आहे. अहवालानुसार २०२६मध्ये एप्रिल ते जून या दरम्यान सोन्याची किंमत डॉलर ४,००० प्रति औंसपेक्षा जास्त असेल. याचा अर्थ, भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव १,२३,००० रुपयेपर्यंत पोहोचेल.
गोल्डमॅन सॅक्सने देखील सोन्याच्या वाढीचा अंदाज सांगितला आहे. त्यांच्या मते, जर आर्थिक परिस्थिती खराब झाली, तर सोन्याची किंमत डॉलर ४,५०० प्रति औंसपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ, भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव १,३८,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. गोल्डमॅन सॅक्सचा हा अंदाज ‘वर्स्ट-केस सिनारिओ’वर आधारित आहे.
चांदी ही सोन्याची ‘छोटी बहीण’ मानली जाते, पण तिचं महत्त्व कमी नाही. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, सध्या चांदीच्या किंमतींवर दबाव आहे, कारण इंडस्ट्रियल मागणीत अस्थिरता आहे. पण २०२५ च्या मध्यानंतर चांदीच्या किंमती वाढू शकतात.
२०२५ च्या शेवटी चांदीचा भाव १,२५,००० प्रति किलोच्या आसपास असेल. भारतात चांदीचा वापर दागिन्यांपासून ते सोलर पॅनल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत होतो. जर जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली, तर इंडस्ट्रियल मागणी वाढेल, आणि चांदीच्या किंमतींना गती मिळेल. पण सध्या, चांदीच्या किंमती सोन्याच्या तुलनेत जास्त अस्थिर आहेत, त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहीजे.
भारतात दिवाळी, अक्षय्य तृतीया, आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी प्रचंड वाढते. यामुळे स्थानिक बाजारात किंमती वाढतात. भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी थांबवत नाहीत, कारण भारतात सोनं हे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
नोंद - सोनं-चांदी, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.