आम्ही कोण?
लेखमालिका : गुंतवणूक कुठे कधी किती

'एलआयसी' किंवा जीवनविमा ही गुंतवणूक असते का?

  • प्रसाद शिरगावकर
  • 19.12.25
  • वाचनवेळ 3 मि.
lic

मागच्या लेखात असं म्हटलं होतं,की समजा आपण १०० रुपये महिना कमावतो. त्यातून २० ते ३० टक्के टॅक्स कापला जातो. उरलेल्या ७०-८० रुपयांतले ५०-६० रुपये आपला रोजचा जगण्यासाठीचा खर्च होतो आणि जेमतेम वीस रुपये आपण भविष्यासाठी साठवू शकतो.

हे २० रुपये (किंवा कमाईच्या २० टक्के) कसे गुंतवावेत याच्या पहिल्या तीन प्राधान्यता मागील लेखामध्ये होत्या. बचत खातं,'फिक्स्ड डिपॉझिट्स' आणि 'पीपीएफ' अशा त्या तीन प्राधान्यता विशिष्ट उद्देशांसाठी गुंतवाव्या असं गेल्या पोस्टमध्ये सांगितलं होतं. हे करून झाल्यावरही जेव्हा आपल्याकडे दरमहा कमाईच्या किमान २० टक्के रक्कम बचत/गुंतवणुकीसाठी उरते त्याचं काय करावं? ती कुठे गुंतवावी?

बचत खातं,'एफडी','पीपीएफ' झाल्यानंतर गुंतवणुकीसाठी पुढचे पर्याय असतात ते'एलआयसी',

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनस'(यूलिप) म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स. यातल्या 'एलआयसी' आणि 'यूलिप' बद्दल आधी बोलूया.

'लाईफ टर्म इन्शुरन्स' किंवा जीवनविमा हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा घटक असतो. 'एलआयसी' किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (यूलिप) विकणाऱ्या कंपन्या त्यांचे 'एंडॉमेंट इन्शुरन्स'चे अथवा 'विमा वजा गुंतवणुकीचे'प्लॅन्स आपल्याला सतत विकत असतात. हे प्लॅन्स काहीसे असे असतात-

आपण आपल्या आयुष्याचा लाख-दोन लाख,दहा-वीस लाखांचा विमा उतरवतो. त्यासाठी त्या कंपनीच्या प्लॅननुसार काही हजारांचा प्रीमियम त्यांना देतो. हा प्लॅन सुरू असण्याच्या काळात आपण मरण पावलो तर विम्याची रक्कम आपल्या वारसांना मिळते. प्लॅन संपेपर्यंत जिवंत राहिलो तर विम्याची रक्कम अधिक 'बोनस' आपल्याला परत मिळतो. ही एकदम 'विन विन सिचुएशन'आहे असं आपल्याला वाटतं म्हणून अनेकजण अशा योजनांमध्ये पैसे 'गुंतवत'राहतात.

खरं तर ही फारशी 'विन विन सिचुएशन'असतेच असं नाही. असे 'एंडॉमेंट प्लॅन्स' किंवा ' युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स'असतात त्यात आपण प्रीमियम म्हणून जी रक्कम भरतो त्यातला एक मोठा भाग विमा कंपनी'लाईफ रिस्क फॅक्टर' म्हणून वजा करून त्यांच्याकडे ठेवते. तो भाग वगळता उरलेला भाग मार्केटमध्ये 'इन्व्हेस्ट' करते. त्या 'इन्व्हेस्ट' मधून जो परतावा मिळतो तो आपल्याला बोनस म्हणून परत देते. त्यांनी आपला 'लाईफ रिस्क फॅक्टर ' वगळता उरलेला भाग कुठे आणि कसा 'इन्व्हेस्ट' करावा यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं.

म्हणजे 'एलआयसी'चे 'एंडॉमेंट प्लॅनस', 'मनी बॅक प्लॅनस' किंवा इतर कंपन्यांची 'यूलिप्स'ही 'लाईफ इन्शुरन्स' च्या नावाखाली आपण केलेली अत्यंत आंधळी गुंतवणूक असते.

'लाईफ इन्शुरन्स' किंवा जीवनविमा केला पाहिजेच, तो महत्त्वाचा आहेच. पण तो गुंतवणूक म्हणून न करता खर्च म्हणून केला पाहिजे. तो ' एंडॉमेंट प्लॅनस', मनी बॅक प्लॅनस' किंवा ' यूलिप्स' मध्ये न करता शुद्ध 'इन्शुरन्स प्लॅनस' मध्ये केला पाहिजे.

'इन्शुरन्स प्लॅन'म्हणजे असं असतं की उद्या आपण अचानक आपण 'ऑफ'झालो, अस्तंगत झालो, मरण पावलो तर आपल्या वारसांना काहीतरी रक्कम मिळावी असा प्लॅन. यात आपण आपल्या मरणाच्या शक्यतेनुसारचा काहीएक प्रीमियम भरत राहतो. आपण जिवंत आहोत तोवर तो भरत राहतो (जिवंत आहोत तोवर तो 'वाया'जात राहतो). पण अचानक कैलासवासी झालो तर मात्र आपल्या वारसांना घसघशीत रक्कम मिळते.

अशा जीवनविम्याची किंवा 'टर्म इन्शुरन्स'ची रक्कम किती असावी? तर ती आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जांएवढी तरी किमान असावीच. आपल्या आजच्या आणि भविष्यातल्या जबाबदाऱ्यांएवढीही असावी. म्हणजे आपले आजचे गृहकर्ज,वाहनकर्ज वगैरे त्यात धरावेच,वर भविष्यातला आपल्या मुलांचा उच्चशिक्षणाचा खर्च वगैरेही त्यात धरावा. ही सगळी कर्जे आणि भविष्यातले खर्च धरून जी काही रक्कम येईल तेवढ्याचा जीवनविमा 'टर्म इन्शुरन्स' पद्धतीने उतरवावा. त्याचा हप्ता नियमितपणे भरत राहावा आणि महत्त्वाचं म्हणजे,''तो खर्च आहे, त्यातून काहीही परतावा येणार नाही" हे मनात पक्कं गृहीत धरावं.

विमा महत्त्वाचा असतोच,पण विमा म्हणजे गुंतवणूक नाही हे मनात पक्कं ठेवून तो करावा.

आपल्या दरमहाच्या कमाईतून बचत खाते,'एफडी','पीपीएफ','टर्म इन्शुरन्स'करून वर जे पैसे उरतात त्यांची बचत कशी करावी आणि ते कसे गुंतवावेत याविषयी पुढच्या लेखात. 

प्रसाद शिरगावकर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results