आम्ही कोण?
आडवा छेद 

भारताने जपानला मागे टाकलं याचा अर्थ काय?

  • चंद्रमोहन घोडेस्वार
  • 31.05.25
  • वाचनवेळ 4 मि.
fourth economy india

जपानला मागे टाकत भारत आता जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, अशी बातमी सध्या बरीच चर्चेत आहे. भारताने ही कामगिरी करून दाखवल्यानंतर आता आपल्यापुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश उरले आहेत, असं सांगितलं जात आहे. या बातमीत खोटं असं काहीच नाही. पण आकड्यांच्या पोटात शिरून पाहिलं, तर या बातमीत काही दम नाही, हे लगेच कळतं.

जपानची अर्थव्यवस्था कालपर्यंत जगात चौथ्या क्रमांकावर होती. तिचा ४.१८६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा आकडा भारताने मागे टाकल्याने आपण आता चौथ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. तिसऱ्या क्रमांकावर तूर्त जर्मनी असून त्यांचा आकडा ४.७४ ट्रिलियन डॉलर्स आहे. याचा अर्थ येत्या वर्षात आपण तोही मागे टाकू आणि जगातली तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू. याचा अर्थ आपली घोडदौड चालू आहे आणि आता आपल्याला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असंही सांगितलं जात आहे.

प्रत्यक्षात जीडीपीचे म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे हे आकडे देशाच्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाहिले गेले पाहिजेत. तसं केलं नाही तर आपणच आपली फसगत करत आहोत, असा त्याचा अर्थ होईल.

जपानसारख्या समृद्ध देशाला भारताने जीडीपीच्या आकड्यात मागे टाकलेलं असलं, तरी या दोन देशांच्या लोकसंख्येच्यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचं लक्षात घ्यायला हवं. भारताची लोकसंख्या १४२ कोटी आहे, तर जपानची लोकसंख्या फक्त १२ कोटी आहे. म्हणजेच भारताची लोकसंख्या जपानपेक्षा सुमारे अकरा पटीने जास्त आहे. याचा अर्थ दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांचा आकार समान असला तरी कमी लोकसंख्येमुळे जपान अजूनही भारताच्या अकरा पट श्रीमंत आहे. सोपं करून सांगायचं तर एका जपानी माणसाला एक पोळी मिळणार असेल तर भारतात एका पोळीचे अकरा वाटेकरी असणार आहेत.

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही भारत आणि जपान यांच्यात मोठी दरी आहे. २०२५ मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न सुमारे २,४८१ अमेरिकन डॉलर्स आहे. जपानचं दरडोई उत्पन्न मात्र तब्बल ५२,६४० डॉलर्स आहे. म्हणजे जपानमधील सरासरी व्यक्तीचं उत्पन्न भारताच्या तुलनेत २१ पटीने जास्त आहे. भारताचा जीडीपी जपानपेक्षा मोठा झालेला असला, तरी तो १४२ कोटी लोकांमध्ये विभागला जातो, याचं भान आपल्याला असायला हवं.

जपानशी आणखी एका आकड्यावरून तुलना केली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा विकासदर ६.५ टक्के आहे, तर जपानचा विकासदर फक्त ०.३ टक्के आहे. याचाही अर्थ जपानपेक्षा आपली प्रगती खूप जास्त वेगाने होत आहे, असा समज पसरत आहे. प्रत्यक्षात जपानची अर्थव्यवस्था दीर्घकाळापासून वाढत आलेली आहे आणि तिने प्राप्त परिस्थितीत तिच्या वाढीचा सर्वोच्च टप्पा गाठलेला आहे. परिणामी ती स्थिर आहे आणि तिच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. पण याचा अर्थ जपानपेक्षा आपली प्रगती जास्त वेगाने होते आहे असं नाही. वाढीचा दर तौलनिक नसून त्या त्या देशाच्या संदर्भात आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

भारतात उत्पन्नाची असमानताही जपानपेक्षा बरीच जास्त आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, भारतातील १ टक्का लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे. यामुळे सरासरी दरडोई उत्पन्नात सामान्य माणसाचं खरं चित्र दिसत नाही. जपानमध्येही असमानता आहे, पण ती भारताच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे जपानी माणूस भारतीय माणसापेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारताचं दरडोई उत्पन्न केन्या (२,९५० डॉलर्स) किंवा मोरोक्को (४,२०० डॉलर्स) यांच्यापेक्षाही कमी आहे. यावरून भारताला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे, हे स्पष्ट व्हावं.

येत्या काळात जीडीपीच्या आकड्यात आपण जर्मनीलाही मागे टाकू आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू. यात अशक्य काही नाही. कारण त्यांच्यात आणि आपल्यात जेमतेम ०.६ ट्रिलियन डॉलर्सचा फरक आहे. तसं झाल्यास ज्याला आनंदी व्हायचं त्याने अवश्य व्हावं, पण तीही धूळफेकच असेल.

भारताला खरी स्पर्धा करायची असेल तर ती चीनसोबत करायला हवी. कारण त्यांची आणि आपली लोकसंख्या तुलनेने सारखी आहे. पण त्यांची अर्थव्यवस्था १९ ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि आपली फक्त ४.१८ ट्रिलियन डॉलर्सची. याचा अर्थ चीन अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या दृष्टीने आपल्यापेक्षा जवळपास पाचपट मोठा आहे.

चीनशी स्पर्धा शक्य नसल्याने आपण जपान आणि जर्मनी या लोकसंख्येच्या दृष्टीने किरकोळ असलेल्या देशांना मागे टाकत असल्याबद्दल समाधान मानत आहोत का?

विचार करण्याची गोष्ट आहे. 

चंद्रमोहन घोडेस्वार | yuktirs100@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Sneha Ketkar 31.05.25
लेखातील माहिती पटली, म्हणजे पटण्यासारखीच आहे. तरी ही शेवटचे वाक्य खटकले. आता जपान पेक्षा काही parameters मध्ये, GDP मध्ये आपण पुढे आलो ह्यात आनंद मानायचा की नाही? आपली लोकसंख्या प्रचंड असून ही आपण हे साध्य केले हे तर खरे ना? आता चीनच्या समृद्धीचा विचार आपण भारतासारख्या लोकशाही देशाशी तुलना करून कसा करणार? तिथल्या सारखे one nation one child policy आपण भारतात आणू शकू कां? ह्या policy चा ही बराच विपरित परिणाम झालाय तिथे.......जर्मनीला आणि जपानला ही आत्ता पर्यंत डिफेन्स वरील खर्च शून्य होता. ही बाब ही लेखकाने ठळक पणे नमूद करायला हवी. थोडक्यात सांगायचे तर, एक भारतीय म्हणून मी भारताची कोणतीही achievement साजरी करणारच.... लेखकाला तसें वाटत नसले तरीही.... कारण ह्या लेखातही त्याच्या सोयीच्याच गोष्टी त्याने मांडल्या आहेत.

Select search criteria first for better results