समजा आपण दर महिन्याला १०० रुपये कमावतो. त्यातून २० ते ३० टक्के टॅक्स कापला जातो. उरलेल्या ७०-८० रुपयांतले ५०-६० रुपये आपला जगण्यासाठीचा खर्च होतो आणि जेमतेम वीस रुपये आपण भविष्यासाठी साठवू शकतो.
हे वीस रुपये (उत्पन्नाच्या २० टक्के) कसे साठवावेत आणि गुंतवावेत याचे काही ठोकताळे,काही 'rules of thumb' आहेत. ते पुढील प्राधान्यानुसार करावेत-
प्राधान्य १. बचत खाते (किंवा अल्ट्रा शॉर्ट गुंतवणूक): आपल्या एका महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम आपल्या बचत खात्यात (किंवा जी चोवीस तासांच्या सूचनेवर काढता येते अशा खात्यात) ठेवणे ही पहिली प्राधान्यता. एखाद्या महिन्यात आपला पगार वेळेवर झाला नाही, किंवा व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न ठरावीक दिवशी आले नाही तर वापरण्यासाठी ही रक्कम ठेवावी. आपल्या उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के खर्च होत असेल आणि २० टक्के बचत आपण करू शकत असू तर साधारण तीन महिन्यांत आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो.
प्राधान्य २. मुदत ठेव (Fixed Deposit) : आपल्या सहा महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम 'Fixed Deposits' मध्ये ठेवावी. दरमहा जी बचत होते त्यातून ही 'Fixed Deposits' तयार करत जावीत. अचानक नोकरी गेली, काही मोठी व्यावसायिक अडचण आली आणि आपले नियमित उत्पन्न बंद पडले तर किमान सहा महिने आपण आपल्या सध्याच्या जीवनशैलीचे खर्च भागवू शकू यासाठीची ही गंगाजळी असावी. या सहा महिन्यांच्या खर्चात काहीजण वैद्यकीय आणीबाणीसाठीचे निधीही ठेवतात. तेही मला योग्य वाटते. म्हणजे सहा महिन्यांचा खर्च अधिक वैद्यकीय आणीबाणीसाठीचे पैसे असे दोन्ही मिळून जितके होतात तेवढ्या रकमेची मुदत ठेव करावी. आपल्या उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के रक्कम खर्च होत असेल आणि २० टक्के आपण बचत करू शकत असू तर साधारण अठरा महिन्यांत आपण हे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो.
हे दोन्ही झाल्यानंतर,आपल्या दर महिन्याच्या उत्पन्नातून जी दहा-वीस-तीस टक्के बचत आपण करू शकतो ती कशी गुंतवायची हा प्रश्न समोर येतो.
या गुंतवणुकीसाठी पुढील पर्याय असतात : आणखी जास्त 'FDs', 'PPF', 'LIC' ('Money Back Plans'), 'ULIPs', 'Bonds' (Govt and Corporate), 'Mutual Funds', 'Gold/Silver' (Physical or Bonds), 'Equity/Stocks' (Direct or through 'PMS') इत्यादी.
प्राधान्य ३. भविष्य निर्वाह निधी (PPF): वरील पर्यायांपैकी 'Fixed Deposits', 'PPF' आणि 'Bonds' हे कमी जोखमीचे आणि ठराविक दराने उत्पन्न देणारे पर्याय असतात. यापैकी 'PPF' तर प्रत्येकाने नक्कीच केले पाहिजे. त्यात वर्षाला सध्या जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात आणि त्यावर सध्या ७.१ टक्के करमुक्त व्याज मिळते. शिवाय हे पैसे १५ वर्षे काढता येत नाहीत. त्यामुळे १५ वर्षांनी एकदम घसघशीत रक्कम हातात येते. त्यामुळे आपल्या दरमहा बचत होणाऱ्या पैशांतून पहिल्या दोन प्राधान्यता पूर्ण करून झाल्या की पुढची प्राधान्यता 'PPF' मध्ये पैसे गुंतवणे ही असावी. वर्षाला पूर्ण दीड लाख टाकता येत नसतील तरी हरकत नाही, जेवढे जमतील तेवढे इथे ठेवत जावेत. यासाठी एक ठरावीक रक्कम ठरवून ती दरमहा आपल्या खात्यातून 'PPF' खात्यात जाईल अशी सोय करावी. जे काही हजार-दोन हजार-पाच-दहा हजार आपण ठरवू ती रक्कम 'PPF' मध्ये गुंतवत राहावी. आपण जोवर काही उत्पन्न कमावत आहोत तोवर हे करत राहावे.
आपल्या दर महिन्याच्या बचतीतून वरील तिन्ही पर्याय करून झाल्यानंतर जर काही पैसे बचत/गुंतवणुकीसाठी उरत असतील तर ते उरलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवत राहावेत. आपण उत्पन्नाच्या २० टक्के बचत करू शकत असू तर पहिल्या दोन प्राधान्यता पूर्ण करायला आपल्याला अठरा ते वीस महिने लागतील हे आपण बघितले. १० टक्केच बचत करू शकत असू तर तीन-साडेतीन वर्षे लागतील. काहीच करत नसू तर आपण या गुंतवणुकीच्या शिडीवर कधीच पोहोचणार नाही. उत्पन्नाच्या २० टक्के ऐवजी ३० टक्के, ४० टक्के, ५० टक्के वगैरे बचत करू शकत असू तर गुंतवणुकीच्या शिडीवर अर्थातच लवकर पोहोचू शकूच आणि ती शिडीही भरभर चढू शकू.
आपल्या उत्पन्नाच्या किमान २० टक्के पैशांची बचत करून, त्यातून वरील तिन्ही म्हणजे बचत खाते, 'FD' आणि 'PPF' या प्राधान्यता पूर्ण केल्यावर पुढे काय करायचे? त्यापुढे, त्यानंतर येणाऱ्या आपल्या बचतयोग्य उत्पन्नाची गुंतवणूक काय प्राधान्याने, काय विचार करून करावी, त्याचे काय उद्दिष्ट असावे याविषयी पुढच्या लेखात.
