आजकाल बाजारात 'तंबाखूमुक्त, निकोटिन-फ्री आणि ‘१०० टक्के नॅचरल' असा मोठा शिक्का मारलेल्या हर्बल सिगारेट्सचा सुळसुळाट झालाय. तुळस, पुदिना, लवंग आणि ग्रीन टी यांसारख्या घटकांपासून बनवलेली ही सिगारेट म्हणजे आरोग्यासाठी वरदानच आहे, अशा थाटात तिची जाहिरात केली जाते. ‘आयुर्वेदिक’ म्हणजे गुणकारी अशी आपल्याकडची धारणा आहे. म्हणूनच की काय, अनेक तरुण आणि सिगारेट सोडू इच्छिणारे लोक या हर्बल सिगारेटचे झुरके मारताना दिसतात. यात निकोटिन नाही म्हणजे हे व्यसन नाही आणि व्यसन नाही म्हणजे धोका नाही, असा गोड गैरसमज तयार झाला आहे.
हर्बलच्या नावाखाली ओढला जाणारा धूर खरंच निरोगी आहे, की हा फक्त एक मार्केटिंगचा सापळा आहे?
आयआयटी (गांधीनगर) आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय (अर्बाना-शॅम्पेन) यांच्या संयुक्त संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्बल सिगारेट ओढल्यामुळे शरीरात जाणारे विषारी घटक नेहमीच्या सिगारेट इतकेच, किंबहुना काही पटीने जास्त घातक असतात. हर्बल सिगारेट्सचं 'ऑक्सिडेटिव्ह पोटेंशियल' साध्या सिगारेट्सपेक्षा जास्त असतं. (सोप्या भाषेत सांगायचं तर 'ऑक्सिडेटिव्ह पोटेंशियल' म्हणजे पेशींना निकामी करण्याची आणि शरीरात सूज निर्माण करण्याची धुराची क्षमता.)
हेही वाचा - होय, व्यसनमुक्ती शक्य आहे!
धूर हा शेवटी धूरच असतो. कोणत्याही सेंद्रिय पदार्थाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड हा अत्यंत विषारी वायू आणि ‘टार’ म्हणजेच डांबरासारखा काळा चिकट पदार्थ तयार होतो. तंबाखूमध्ये आढळून येणारं निकोटिन हर्बल सिगारेटमध्ये नसतं हे मान्य, पण हर्बल सिगारेट पेटवली जाते तेव्हा त्यातूनही कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो. हा विषारी वायू रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.
हर्बल सिगारेट्स विडीप्रमाणे तेंदूच्या पानात गुंडाळल्या जातात. कागदापेक्षा या पानांचं ऑक्सिडेटिव्ह पोटेंशियल ५० टक्क्यांनी जास्त असल्याचं या अभ्यासातून समोर आलं. '१००% हर्बल' आणि 'केमिकल फ्री' म्हणून विकल्या जाणाऱ्या तुळशी हर्बल सिगारेटच्या एका ब्रँडमध्ये नेहमीच्या सिगारेटपेक्षाही जास्त प्रमाणात शिसाचे अंश सापडले. शिसं हे मानवी मज्जासंस्थेसाठी आणि हृदयासाठी अत्यंत घातक मानलं जातं. यामुळेच हर्बल सिगारेट ओढल्यानंतर अनेकांना डोकं जड होणं, चक्कर येणं किंवा छातीत कोंडल्यासारखं वाटणं अशा तक्रारी सुरू होतात. शरीराला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे असा तात्पुरता झटका बसतो.
अनेकांचा असाही समज असतो, की हर्बल सिगारेटमुळे तंबाखूयुक्त सिगारेट ओढण्याची सवय सुटते. याबाबत अमेरिकेतील 'कॅन्सर एपिडेमियोलॉजी, बायोमार्कर्स अँड प्रिव्हेंशन' या जर्नलमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यानुसार, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. उलट, हर्बल सिगारेट्स सुरक्षित आहेत या गैरसमजातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात हर्बल सिगारेट ओढल्या जातात. हर्बल सिगारेट तंबाखूमुक्त असली तरी फुफ्फुसात गरम धूर ओढला जातो, सोबतच नेहमीच्या सिगारेटच्या तुलनेत तब्बल २० टक्के जास्त अतिसूक्ष्म कण फुफ्फुसात ओढले जातात. ५०० नॅनोमीटरपेक्षा कमी आकाराचे हे कण फुफ्फुसाची गाळणी ओलांडून थेट रक्तप्रवाहात मिसळतात. यामुळे फुफ्फुसाचा दाह वाढून भविष्यात हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कैकपटीने वाढतो.
हेही वाचा - व्यसनमुक्तीची अशीही गोष्ट...
पुण्यातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. निखिल चिल्लाळ सांगतात, "आम्ही पेशंटना कुठल्याही प्रकारच्या सिगारेटचं सेवन न करण्याचा सल्ला देतो. हर्बल सिगारेट नॉर्मल सिगारेटइतक्याच हानिकारक आहेत. यासंदर्भात पुरेसं संशोधन झालेलं नव्हतं तेव्हाही त्याचे संभाव्य धोके आम्हाला माहीत होते. त्यामुळे आम्ही कधीच नॉर्मल सिगारेटला हर्बलचा पर्याय सांगत नाही."
अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने हर्बल सिगारेट्सच्या पाकिटावर 'हर्बल सिगारेट आरोग्यासाठी घातक आहेत, यातून टार आणि कार्बन मोनॉक्साइड तयार होतो' अशी स्पष्ट चेतावणी छापणं बंधनकारक केलंय. भारतात तंबाखूयुक्त पदार्थांवर सरसकट बंदी नाहीये, मात्र त्यावर चेतावणी छापणं बंधनकारक आहे.
भारतात ‘सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा’ आणि ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’ यांद्वारे तंबाखू उत्पादनांवर नियंत्रण ठेवलं जातं. नियमांनुसार सुट्या सिगारेट विकण्यास बंदी आहे. तसंच १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू उत्पादनं विकण्यास कायद्याने मनाई आहे. शिवाय, तंबाखू उत्पादनांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरातींवर पूर्ण बंदी आहे. मात्र सर्रास विकल्या जाणाऱ्या हर्बल सिगारेट्सच्या उत्पादनांवर कोणतीही चेतावणी छापलेली नसते. भारतात शंभरपेक्षा जास्त हर्बल सिगारेट्सचे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत, ऑनलाइन मार्केटमध्ये ते सहज उपलब्ध आहेत. त्यांची जाहिरातही केली जाते. एका हर्बल सिगारेटसाठी ₹१५० पासून ₹१६०० पर्यंत मोजावे लागतात. विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये या हर्बल सिगारेट्सची क्रेझ वाढतेय.
हेही वाचा - व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येताना
पुण्यातले आयुर्वेदाचार्य डॉ. नीरज जाधव यांच्या मते, "हर्बल आणि आयुर्वेदिक या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. श्वसनमार्गातील जीवाणू संसर्गावर उपाय म्हणून किंवा छातीतील कफ घालवण्यासाठी पंचकर्मात 'धूमपान' नावाची संकल्पना आहे, ज्यात विविध औषधी वनस्पतींचे (नागकेशर, गुग्गुळ इ.) धूर रुग्णांना दिले जातात. मात्र हर्बल सिगारेट आयुर्वेदिक नाही. कुणी 'आयुर्वेदिक' नावाखाली हर्बल पदार्थ विकत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे."
वरील सर्व बाबींचा विचार केला तर सिगारेटला पर्याय म्हणून हर्बल सिगारेट निवडणं म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखं आहे. निकोटिनच्या व्यसनातून सुटका हा हर्बल सिगारेटचा एकमेव फायदा, मात्र त्यामुळे फुफ्फुसाची चाळणच होणार, हे नक्की.
धूम्रपान सोडायचं असल्यास निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी किंवा समुपदेशनाचा मार्ग निवडता येतो. या मार्गांना बगल देऊन हर्बल सिगारेटचा मार्ग स्वीकारणं खरंच फायद्याचं आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे.
मन्सूर मुल्ला
मन्सूर युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून डिजिटल मीडिया हा त्याचा आवडीचा विषय आहे.
