'अँग्लो-झांझिबार युद्ध' हे जगातलं सर्वात छोटं युद्ध म्हणून ओळखलं जातं. हिंद महासागरातील टांगानिकाच्या किनाऱ्यालगतचं एक द्वीप म्हणजे तेव्हाचा झांझिबार देश. आता तो टांझानियाचा भाग आहे. या झांझिबारचा सुलतान खालिद बिन बारघाश आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यात २७ ऑगस्ट १८९६ रोजी युद्ध झालं होतं. सकाळी नऊला चालू झालेलं हे युद्ध अवघ्या ३८ ते ४५ मिनिटांत संपलं.
१८८५ मध्ये सुलतान माजिद बिन सईदच्या नेतृत्वाखाली झांझिबार ओमान पासून वेगळं झालं. त्यानंतर झांझिबार ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आलं. सुलतान राज्य करत असला तरी सत्तेच्या दोऱ्या ब्रिटिशांच्या हाती होत्या ते अनेकांना मान्य होत नव्हतं.
हेही वाचा - दिदिए द्रोग्बा, फुटबॉल आणि नागरी युद्ध
२५ ऑगस्ट १८९६ रोजी तत्कालीन सुलतान हमाद यांचा संशयास्पद मृत्यू झाला. सुलतानाच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचा २९ वर्षीय पुतण्या खालिद बिन बरगाश याने ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय झांझिबारची सत्ता आपल्या हातात घेतली. ब्रिटीशांना ही गोष्ट खटकली. झांझिबारमधील ब्रिटिश कॉन्सुल आणि राजनैतिक एजंट, बेसिल केव्ह आणि जनरल मॅथ्यूज यांनी खालिदला त्याच्या या कृतींबद्दल काळजीपूर्वक विचार करण्याचा इशारा दिला, पण त्याने तो नाकारला. परिणामी ब्रिटिशांनी त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २७ ऑगस्ट १८९६ला सुलतानाच्या राजवाड्यावर नौदलाद्वारे गोळीबार सुरू करत युद्ध पुकारलं. युद्ध सुरू झाल्यावर अवघ्या ४० मिनिटांतच सुलतानाचं सैन्य माघार घेऊन पळून गेलं. सुलतानाकडे ब्रिटीशांना शरण जण्याशिवाय दूसरा पर्यायच उरला नाही. त्याने शरणागती पत्करली आणि युद्धं संपलं.
हे युद्धं इतिहासातील आजवरचं सर्वात कमी वेळ चाललेलं अधिकृत युद्ध मानलं जातं.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.
