आम्ही कोण?
काय सांगता!  

दिदिए द्रोग्बा, फुटबॉल आणि नागरी युद्ध

  • प्रीति छत्रे
  • 30.05.25
  • वाचनवेळ 3 मि.
didier drogba

तुम्हाला आयव्हरी कोस्ट हा आफ्रिकी देश माहिती आहे?

बरं, तुम्हाला दिदिए द्रोग्बा (Didier Drogba) हा फुटबॉल खेळाडू माहिती आहे?

इंग्लिश प्रिमिअर लीगच्या फॅन्सना द्रोग्बा नक्की माहिती असणार. एकेकाळी तो चेल्सीचा स्टार प्लेअर होता.

इंग्लिश प्रिमिअर लीगबाहेरच्या फुटबॉलप्रेमी जगाला दिदिए द्रोग्बा हे नाव पहिल्यांदा समजलं ते २००६ साली जर्मनीत झालेल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत. त्या वर्षी आयव्हरी कोस्टने पहिल्यांदाच वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला होता. द्रोग्बा त्या टीमचा कर्णधार होता. आयव्हरी कोस्ट हा पक्का फुटबॉलवेडा देश. त्यांच्यासाठी ही जबरदस्त घटना होती.

पण ही गोष्ट जर्मनीतल्या फिफा वर्ल्ड कपमधली नाही, तर त्याच्या आधीची आहे.

ऑक्टोबर, २००५. आफ्रिका खंडातल्या फिफा पात्रता फेर्‍या अंतिम टप्प्यात आल्या होत्या. कॅमेरून वि. इजिप्त आणि आयव्हरी कोस्ट वि. सुदान या दोन सामन्यांवर बर्‍याच गोष्टी अवलंबून होत्या... किमान आयव्हरी कोस्ट देशासाठी तरी नक्कीच. कॅमेरूनने इजिप्तला हरवलं असतं तर त्यांना मुख्य फेरीत प्रवेश मिळणार होता. नाहीतर आयव्हरी कोस्टसाठी ऐतिहासिक संधी होती. अर्थात त्यांना सुदानला हरवणंही भाग होतंच.

एकीकडे हे फुटबॉलचं वेड, आणि दुसरीकडे आयव्हरी कोस्ट देशात तीन वर्षांपासून नागरी युद्ध सुरू होतं. उत्तर विरुद्ध दक्षिण असा देश विभागला गेला होता. दक्षिण भाग तत्कालीन अध्यक्षांच्या ताब्यात होता, तर उत्तर भागावर क्रांतिकारकांचा कब्जा होता.

नागरी युद्धग्रस्त देश आणि त्या देशाचे स्टार खेळाडू एकमेकांपासून सहसा शतयोजनं दूर असतात, असं मानलं जातं. दिदिए द्रोग्बा ही समजूत लवकरच चुकीची ठरवणार होता..

तर, त्या दिवशी कॅमेरून-इजिप्त हा सामना अधिक नाट्यमय झाला. आणि अखेर आयव्हरी कोस्टला मुख्य फेरीत प्रवेश मिळाला. (त्या नाट्याची गोष्ट इतकीच रंजक आहे.) आयव्हरी कोस्टच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंनी एकच जल्लोष सुरू केला. इथे द्रोग्बाने एक अनपेक्षित गोष्ट केली.

त्याने एका कॅमेरामनला ड्रेसिंग रूममध्ये बोलावलं, स्वतःच्या हातात माईक घेतला आणि कॅमेरासमोर त्याने आपल्या देशाला उद्देशून एक विलक्षण निवेदन केलं- कृपया शस्त्रं खाली ठेवा आणि निवडणुका घ्या. द्रोग्बाचे सहकारी खेळाडू त्याच्या अवतीभोवती उभे होते. सर्वांनी गुडघ्यावर बसून आपल्या देशाला कळकळीची विनंती केली.

जेमतेम एका मिनिटाचं हे निवेदन यूट्यूबवर आलं. आयव्हरी कोस्ट टेलिव्हिजनवर पुढे अनेक दिवस ते पुनःपुन्हा दाखवलं गेलं. त्याने त्या देशात काहीतरी हलवलं खरं... आणि एक दिवस तिथे शस्त्रसंधीचा करार केला गेला. निवडणुका जाहीर झाल्या; शांततेत पारही पडल्या.

जर्मनीतल्या वर्ल्ड कपमध्ये आयव्हरी कोस्टचा संघ प्राथमिक फेरीत बाहेर पडला. पुढच्या वर्षी पुन्हा पुढच्या वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीचा एक सामना आला. आयव्हरी कोस्ट वि. मादागास्कर. हा सामना आयव्हरी कोस्टमध्ये दक्षिणेकडच्या अबिज्यान शहरात होणार होता. द्रोग्बाच्या विनंतीवरून सामना उत्तरेकडच्या एका ठिकाणी खेळवला गेला. तेव्हा संपूर्ण देश द्रोग्बाच्या प्रेमात होता. द्रोग्बा स्वतः मूळचा दक्षिणेकडचाच. असं असूनही त्याने ही विनंती केली याचं सगळ्यांना प्रचंड कौतुक वाटलं.

आयव्हरी कोस्टने तो सामना ५-० असा जिंकला. स्टेडियममध्ये सरकारचे आणि क्रांतिकारकांचे पाठीराखे चक्क एकत्र मिळून जल्लोष करत असल्याचं अख्ख्या देशाने पाहिलं.

अर्थात, दिदिए द्रोग्बा एकट्याने आपल्या देशाला नागरी युद्धाच्या खाईतून बाहेर काढू शकणार नव्हताच. मात्र त्याने आपल्या जर्जर देशाला आशेचा किरण दाखवला होता. ही निव्वळ द्रोग्बाची किंवा फुटबॉलची करामत नव्हती.. हा क्रीडा-तत्वज्ञानाने घालून दिलेला एक धडा होता.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results