
अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये एका ठिकाणी गेली १२५ वर्षं विजेवरचा एक दिवा अव्याहत सुरू आहे. ‘Centennial Light Bulb’ या नावानेच हा दिवा ओळखला जातो. तो पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
हा दिवा हाताने तयार केला गेला होता. १९व्या शतकाच्या अखेरीस शेल्बी इलेक्ट्रिक कंपनीत त्याची निर्मिती झाली. कॅलिफोर्नियातल्या एका स्थानिक अग्निशमन दलाला तो भेट देण्यात आला होता. आजही तो त्याच अग्निशमन दलाच्या ताब्यात आहे.
हा दिवा आतापर्यंत काही वेळा बंद करून हलवला गेला आहे. मात्र दिव्याच्या दुरुस्तीसाठी नव्हे, तर तो ज्या ठिकाणी लटकवलेला आहे त्या खोलीच्या डागडुजीसाठी किंवा अग्निशमन दलाच्या ताब्यातल्या इतर जागी तो हलवण्याचा निर्णय झाला म्हणून. दिवा इतका टिकण्याचं एकमेव कारण- त्याचं उच्च निर्मितीमूल्य. शिवाय दिवा सतत चालू-बंद न केल्यानेही त्याचा टिकाऊपणा वाढला असल्याचं म्हटलं जातं.
१९७२ मध्ये एका स्थानिक पत्रकारामुळे या दिव्याबद्दलची माहिती जगाला कळली. हा बल्ब तयार झाला तेव्हा 60 watt चा होता. आता त्याची शक्ती कमी झाली आहे. आज तो 4 watt च्या दिव्याइतका प्रकाश देतो. आता या दिव्याच्या देखरेखीसाठी ‘सेंटेनियल लाइट बल्ब कमिटी’ स्थापन झाली आहे. हा दिवा आपणहून प्राण सोडेपर्यंत त्याकडे लक्ष देण्याचा कमिटीचा निर्धार आहे.
जुन्या वस्तूंचं जतन करण्याच्या माणसाच्या असोशीचं अशा वेळी कौतुक करावंसं वाटतं.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.