
युरोप-उत्तर अमेरिकेची अनेक प्रवासवर्णनं आपण वाचतो. त्या तुलनेत दक्षिण अमेरिकी प्रदेश आपल्याला तसा अपरिचितच आणि म्हणूनच अधिक विस्मयचकित करणाराही. दक्षिण अमेरिकेतील एक अद्भुत देश म्हणजे पेरू. प्राचीन सांस्कृतिक इतिहासाच्या खुणा अभिमानाने अंगावर बाळगणाऱ्या या देशाची मराठमोळ्या नजरेतून दिसणारी ही झलक...
सारेच कसे अनपेक्षित, ध्यानीमनी नसलेले घडत गेले. २०१२मध्ये पेरूमधील एक मुलगी भारत दर्शनासाठी आली; पर्यटनव्यवसायात असलेल्या माझ्या मुलाला भेटली; बघता बघता त्यांचे सूर जुळले; त्यांनी लग्न करून पेरूत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, आणि २०१४ च्या नववर्षाच्या प्रथमदिनी मी पेरूकरिता प्रस्थान ठेवले.
पेरू एक असा देश, जिथे आजही फार थोडे भारतीय जातात. या देशाबद्दल किंवा एकूणच दक्षिण अमेरिकेबद्दल आपलाच असे नाही, तर अगदी युरोपियन लोकांचाही समज असतो, की तिकडे एकूण संस्कृतीच गुन्हेगारीची आहे. कदाचित अंतराच्या मोठ्या दुराव्यामुळे असेल पण हे गैरसमज आहेत; आणि ते लक्षात येण्यासाठी त्या प्रदेशाला भेट दिली पाहिजे, तिथल्या लोकांमध्ये मिसळले पाहिजे हेच खरे. हे दोन्ही करण्याची संधी मला मिळाली होती. इथून आधी ८ तासांचा विमानप्रवास करून मी ॲमस्टरडॅम गाठले आणि तिथून पुढे १३ तासांचा लिमाचा विमानप्रवास पार केला. सूर्यास्ताच्या वेळी आमचे विमान प्रचंड अशा ॲमेझॉन नदीवरून आणि आसपासच्या जंगलावरून जात होते. ३५ हजार फुटांवरूनही ॲमेझॉनची विशालता सहज समजत होती.
ज्यासाठी गेलो होतो ते घरचे लग्नकार्य पार पडले आणि मी लिमा व पेरूची भटकंती सुरू केली. माझे व्याही दांपत्य अधूनमधून मला आसपास फिरायला घेऊन जात; कधी तरी मी मुलाबरोबर लिमा शहरातच जात असे. या फिरण्यातून मला लिमा आणि पेरूवासीयांचे, त्यांच्या दैनंदिन जीवनपद्धतीचे थोडेसे दर्शन झाले.
पेरू हा तसा आपल्यासारखाच विकसनशील देश, पण तरीही बऱ्याच बाबतींत आपल्यापेक्षा पुढारलेला वाटला. एकंदर स्वच्छता आपल्यापेक्षा निश्चितच चांगली होती. या बाबतीत पेरूने युरोप-अमेरिका यांचा कित्ता गिरवलेला जाणवतो. लिमाच्या प्रत्येक उपनगराचे वेगळेपण सहजपणे ध्यानात येत होते. काही भागांत रुंद रस्ते होते, तर काही भागांत रस्ते अरुंद पण बागा भरपूर होत्या. हे वेगळेपण का, असे विचारल्यावर समजले, की तेथे प्रत्येक उपनगराच्या स्वतंत्र कौन्सिल्स आहेत आणि त्यांच्यात स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्याला पारितोषिकही दिले जाते. शहराच्या मुख्य व्यापारभागात उंच, गगनचुंबी इमारती आहेत; अन्यत्र उंच इमारती फार दिसत नाहीत. वाहतूक व्यवस्था मुख्यत: बी आर टी, सर्वसाधारण बसेस, टॅक्सी आणि काही प्रमाणात मेट्रो अशा सर्व प्रकारे चालते. बसमध्ये आपल्यासारखीच तुडुंब गर्दी असते. तिथले ड्रायव्हरही बस सुसाट वेगाने पळवत असतात. या भीतिदायक सुसाट वेगामुळे स्थानिक लोकांची बसबद्दल तक्रार आहे. असे असले, तरी बहुतांशी सिग्नलचा मान राखण्यात येतो. आपल्याकडे जसे ट्रॅफिकचे नियम धाब्यावर बसवायची पद्धत आहे तसे तिथे दिसले नाही. त्यामुळे रस्त्यावरचे वादही कोठे दिसले नाहीत. रस्त्यावर भुरट्या चोऱ्या मात्र बऱ्यापैकी होत असाव्यात. कारण मला घरातूनच सूचना मिळाली होती, की गळ्यातला कॅमेरा सांभाळा.
आठ दिवस आम्ही लिमामध्ये भटकलो अन् मग मी बाहेर पडलो ते पेरूचा जगप्रसिद्ध सांस्कृतिक ठेवा ‘माचूपिचू' पाहण्यासाठी. लिमापासून माचूपिचू तब्बल १४०० किलोमीटर दूर आहे. अर्थातच सर्वांनी मला विमानाने जाण्याचा सल्ला दिला; पण मी बसने जाणे पसंत केले. एक तर विमानप्रवासापेक्षा बसप्रवास स्वस्त असतोच, शिवाय भोवतालचा प्रदेशही अनुभवता येतो.
हा बसप्रवास होता तब्बल २१ तासांचा, समुद्रसपाटीच्या लिमापासून आपल्या लेहच्या उंचीवरच्या कुस्को या पेरूतील पुरातन शहरापर्यंतचा. वाटेतल्या घाटात एक अपघात झाला होता, त्यामुळे बस तब्बल ९ तास एकाच जागी अडकून पडली ती एक इंचभरही पुढे सरकू शकली नाही. रस्त्यात अडकलेला एक टँकर जेव्हा विना क्रेन, अन्य वाहनांच्या मदतीने आणि असंख्य लोकांच्या कल्पनाशक्तीने हलवण्यात यश आले तेव्हा कुठे वाहतूक पुन्हा चालू झाली. पण या नऊ तासांत एकही वाहन आपली लेन सोडून विरुद्ध बाजूच्या लेनमध्ये गेले नव्हते. त्यामुळे ज्या क्षणी अडकलेला टँकर बाजूला झाला त्या क्षणी सर्व वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
कुस्कोपर्यंतचा मार्ग समुद्रसपाटीपासून सुमारे १५००० फूट उंचीवरून जात होता. खिडकीतून रस्त्याच्या दोन्ही बाजूंस बर्फ दिसत होते. ३० तासांचा प्रवास झाला तरी थकवा असा वाटत नव्हता, कारण बस सुंदर, आरामदायी होती. सीट १६० अंशांत कलणाऱ्या, अत्यंत मऊ होत्या. त्यामुळे झोप छान होत होती. रस्तेही उत्तम होते, त्यामुळे धक्के बसत नव्हते. प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र टीव्ही स्क्रीन, त्यावर विविध चित्रपट, नाटके, गाणी इत्यादी उपलब्ध होतेच. शिवाय जेथे संपर्क होत असे तिथे तिथे इंटरनेटही मिळत होते. प्रवासात बसतर्फेच नाश्ता, जेवण, चहा-कॉफी सर्व काही दिले गेले. शिवाय टॉयलेटही बसमध्येच होते. (अशा बस आपल्याकडे केव्हा दिसणार?)
इतर वेळी दुपारी तीन वाजता कुस्कोला पोहोचणारी बस त्या दिवशी रात्री १०:३० वाजता पोहोचली. मला उतरवून घ्यायला कुस्कोच्या एका ट्रॅव्हल एजन्सीची बाई आणि तिचा नवरा आले होते. त्यांनी मला हॉटेलवर सोडले, पुढच्या दिवसांचे कार्यक्रम समजावून सांगितले अन् माझा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता मला नेण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीची कार आली आणि माझा माचूपिचूकडे प्रवास सुरू झाला. कारमधून बसमधे आणि बसमधून ओलांथायतँबो या रेल्वे स्टेशनवर आलो. पर्वतांच्या पार्श्वभूमीवर छोटेसे स्टेशन सुंदर दिसत होते. मीटरगेज रेल्वे, दोन डब्यांच्या वा एकाच डब्याच्या गाड्या, गाडीच्या डब्यांना काचेचे छप्पर. उंच प्लॅटफॉर्म हा प्रकार नाही. गाडीत चढण्यासाठी विमानाला जशा पायऱ्या लावतात तशा चार लाकडी पायऱ्या आणून ठेवण्याची पद्धत दिसली. डब्यात शिरतानाच तिकीट आणि कागदपत्रे तपासण्याच्या नियमामुळे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीही तिकीट काढावे लागणे हा प्रकार नव्हता.
गाडी एकाच डब्याची असल्याने मागच्या बाजूने थेट मागे जाणारे रूळ दिसत होते. पारदर्शक छतामुळे सर्व बाजूंनी आसमंत निरखत सुंदर प्रवास झाला. तासाभराने अवास कालियंतेस या शेवटच्या स्टेशनवर आलो तेव्हा सकाळचे ९ वाजलेले होते. हॉटेलमधे स्थिरस्थावर झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या माचूपिचू प्रवासव्यवस्थेची माहिती मिळवण्यासाठी बाहेर पडलो.
अवास कालियंतेस म्हणजे गरम पाण्याचे झरे. या गावात पर्वतावरून बर्फ वितळून येणाऱ्या खळाळत्या प्रवाहात मधेच गरम पाण्याची कुंडे आहेत. पर्यटक त्या व्यवस्थित बांधलेल्या चार कुंडांत मस्त डुंबत असतात. संध्याकाळी पाऊस सुरू झाला होता, तरी मी जाऊन या कुंडांचे आणि त्यात डुंबणाऱ्या पर्यटकांचे दर्शन घेऊन आलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता मला घेऊन जाणारा गाइड येणार होता, पण तो आलाच नाही. माचूपिचू पाहून दुपारी आम्ही परस्पर कुस्कोला जाणार होतो. त्यामुळे पाठीवर सामान चढवले अन् चौकशी करत माचूपिचू पर्वतावर जाणाऱ्या बस जिथून निघतात त्या बसस्थानकावर आलो. आदल्या दिवशीच्या पावसाने माचूपिचूच्या रस्त्यावर कुठे तरी कडा कोसळला होता. त्यामुळे बस निघायला अजून किमान २-३ तास लागतील असे समजले. त्या रस्त्यावर फक्त सरकारी बस जातात, खासगी वाहनांना परवानगी नाही. इतका वेळ त्या स्थानकावरच्या गर्दीत थांबण्यापेक्षा जाऊ चालत, असा विचार करून मी चालायला सुरुवात केली. माझ्यासारखेच अनेक पर्यटक आता चालू लागले होते. सुरुवातीला साध्या पायऱ्या असलेली ती वाट पुढे चांगलीच दमवणारी आहे. छातीवर येणारा चढ आहे. पण संपूर्ण वाटेवर बऱ्यापैकी झाडी असल्याने आणि आता पाऊस थांबलेला असल्याने सुमारे अडीच तासांत आम्ही वर पोहोचलो. तिथल्या नकाशांवर दिलेल्या आकड्यांनुसार पायथ्यापासून माचूपिचू सुमारे १२०० मीटर उंच आहे, पण मला या आकड्याबद्दल शंका वाटते. एवढा छातीवरचा चढ मी अडीच तासांत चढू शकेन असे वाटत नाही. ही उंची निम्मीच असावी. जेथवर वाहन जाऊ शकते, तेथे पर्यटकांवर नियंत्रण राखणारे प्रवेशद्वार आहे. पायथ्यापाशीच वर जाण्याच्या परवानगीची कागदपत्रे, पारपत्र वगैरे तपासले गेलेले असते. तरीही, पुन्हा एकदा या प्रवेशद्वारावर सर्व तपासणी होते. ते उरकून आत गेल्यावर या ठिकाणाची भव्यता जाणवते. या जागेला सांस्कृतिक ठेवा का म्हणतात हेदेखील लगेच लक्षात येते.
माचूपिचू हे इंका संस्कृतीने सन १४५०च्या आसपास एका पर्वताच्या माथ्यावर (२३५० मीटर उंचीवर) बांधलेले ठिकाण, पण जेमतेम १०० वर्षेच ते लोक तिथे राहिले असतील. स्पॅनिश आक्रमणानंतर तेथील वस्ती पूर्णपणे उठली. पुढे त्याभोवती जंगल माजले आणि ते ठिकाण विस्मृतीत गेले. त्यानंतर थेट १९११मध्ये अमेरिकन इतिहास अभ्यासक हीरम बिगहॅम यांनी ते परत शोधून काढले. स्थानिक लोकांना त्याबद्दल कदाचित माहीतही असावे; पण त्यातील गूढता, पवित्र-अपवित्र याबद्दलच्या समाजमान्य समजुती यामुळे ते जगापुढे आले नव्हते. सध्या दिसणारे अवशेष त्या काळातले वैभव विशद करतात. दगडातून बांधलेल्या भिंतींची घरं, मंदिरं आणि कार्यशाळा असा हा परिसर सुमारे १००० लोकांना राहण्यास पुरेसा होता. आता यातल्या भिंती तर शाबूत आहेत, पण कोठेही छप्पर शिल्लक नाही. त्या काळात बहुधा गवताची छपरे केली जात असावीत.
इथल्या डोंगरउतारावर कमी रुंदीचे पण लांबच लांब सपाट करून घेतलेले पट्टे दिसतात. त्या काळात ते शेतीसाठी वापरले जात असावेत. असे पट्टे एकाखाली एक अशा अनेक स्तरांत आहेत. त्यामध्ये पाणी व्यवस्थित वाहून जाण्यासाठी आणि सर्व शेतीपट्ट्यांचे उत्तम सिंचन होण्यासाठी व्यवस्था केलेली दिसते. पिण्याच्या पाण्यासाठीचेही आखीव-रेखीव प्रवाह आहेत. काही भागांत त्या प्रवाहांवर काही पूलही आहेत. यातच एक सुंदर सूर्यमंदिर आहे. अर्थात हे आपल्या कल्पनेतल्या मंदिरासारखे नाही. दगडात कोरलेली एक गुहाच म्हणा ना!
युनेस्कोने माचूपिचू हे स्थान जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेलं आहे. सध्या दर वर्षी इथे साधारण पाच-सात लाख लोक येतात. त्यामुळे येथील पर्यटन म्हणजे पेरूसाठी उत्पन्नाचं एक मोठं साधन आहे. अर्थातच या ठिकाणाची उत्तम देखरेख केली जाते. कमालीची स्वच्छता. मद्यप्राशन इत्यादी करून गोंधळ घालणारे पर्यटक नाहीत. सर्व काही शिस्तबद्ध. (याच गोष्टी सांभाळून आपल्याकडच्या रायगड, राजगडची सुंदर व्यवस्था केली तर ती ठिकाणेही तितकीच अप्रतिम होतील.)
माचूपिचूपासून आणखी १००० फूट वर वायना पिचू नामक अजून एक ठिकाण आहे, पण मी आधीच २००० फूट चढून आल्याने तिथे जायला वेळही नव्हता आणि पायांत त्राणही नव्हते. दुपारची परतीची गाडी पकडायची होती, कारण दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम ठरलेले होते. संध्याकाळपर्यंत परत कुस्को मुक्कामी आलो. तिथल्या ट्रॅव्हल एजंट कुटुंबाने मला संध्याकाळी जेवू घातले. त्यांच्या तीन वर्षांच्या छोट्या मुलीशी माझी गट्टी झाल्याने त्यांनी मला त्यांच्याच घरी मुक्कामाला नेले.
दुसऱ्या दिवशी तिथल्या सेक्रेड व्हॅली ट्रिपसाठी प्रस्थान केले. मुख्यत: पिसाक आणि ओलांथायतँबो या दोन ठिकाणांची ही दिवसभराची ट्रिप. पिसाक येथे बरेच पुरातन अवशेष आहेत. इंका संस्कृतीच्या पद्धतीने डोंगरउतारावर शेतीसाठी सपाट जमिनीचे टप्पेही केलेले दिसले. तेथून समोरच्याच टेकडीच्या उतारावर त्यांचे पुरातन दफनस्थान आहे. तेथे माणसाच्या मृत्यूनंतर गुहेसारखा खड्डा करून त्यात प्रेत सरकवून देत. त्याच्या परलोक प्रवासासाठी अन्न, वस्त्र, सोनं-नाणं ठेवत. परंतु स्पॅनिश लोकांनी आक्रमणानंतर इथे उत्खनन करून सारे सोने पळवले. पिसाकजवळच ‘चांदीचे खनिज ते दागिने' असे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले.
ओलांथायतँबो येथे खरेच आश्चर्य करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. समुद्रसपाटीपासून २८०० मीटर उंचीवरच्या एका टेकडीवर वसलेली (आणि आता कोणी राहत नसलेली) अशी ही वसाहत. शेतीची माचूपिचू / पिसाक इथली पद्धत तर आहेच. शेतांवर लक्ष ठेवण्यासाठी अचूक जागी निरीक्षण मनोरेही उभे केलेले आहेत. त्या मनोऱ्यांत पिण्याच्या पाण्याचे पाट पोहोचवलेले आहेत. तेथील सूर्यमंदिर हे खरेच एक मोठे आश्चर्य आहे. त्यासाठी उभे केलेले सहा महाकाय दगड आजच्या गणिताप्रमाणे प्रत्येकी सहा-सात टन वजनाचे आहेत आणि ते त्या टेकडीवरचे नाहीतच. ते आहेत समोरच्या पर्वताच्या वरच्या भागातले. ते तिथून खाली आणून मधली उरुबंबा नदी पार करून या टेकडीवर आणले कसे हे कोडेच आहे. समोरच्याच पर्वतावर एक मुकुट घातलेल्या राजाच्या चेहऱ्याची नैसर्गिक आकृती दिसते. असे सांगतात, की २२ डिसेंबरला त्या सूर्यमंदिरातून पाहिल्यास सूर्य नेमका या चेहऱ्यापाशी दिसतो.
परतीच्या वाटेवर चिंचोर या गावी बटाट्याची शेती आणि स्थानिक मूलनिवासी कारागिरीचे नमुने, तसेच वनस्पतींच्या विविध वापराचे (अगदी वनस्पतीजन्य लिपस्टिकसकट सर्व) नमुने पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्को आणि तेथील माझ्या छोट्या मैत्रिणीचा निरोप घेऊन १४ तासांच्या बसप्रवासानंतर नाझका या आणखी एका अनोख्या ठिकाणी आलो.
नाझका लाइन्स हे पेरूमधले आणखी एक मोठं कोडं आहे. आकाशातून किंवा जवळच्या पर्वतावरून पाहिलं, तर या ठिकाणी जमिनीवर कोरलेल्या महाकाय आकृत्या दिसतात. या आकृत्या १०० ते २०० मीटर लांबीच्या आहेत. त्यामुळेच त्या आकाशातून पाहिल्याशिवाय समजत नाहीत. (जमिनीवरून हिंडून पाहिलं तर काही कळत नाही.) याचा कालखंड साधारण इ.स. ५०० आहे. पर्यटकांना या आकृत्या पाहता याव्यात यासाठी तेथे ३५ मिनिटांची विमानफेरी असते. त्यासाठीची विमानं छोटेखानी, सहा सीटर अशी असतात. वैमानिक दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना त्या आकृत्या दिसतील अशा पद्धतीने कॉमेंट्री करत विमान हिंडवतो. ५० कि.मी. परिसरात माकड, कोळी, हमिंगबर्ड (९३ मीटर), डायनोसोरचे पिल्लू, अंतराळवीर, पोपट, हात, काँडोर पक्षी (१३४ मीटर), स्पायरल अशा बऱ्याच आकृत्या दिसतात. त्याचबरोबर विमान उतरण्याच्या धावपट्ट्या वाटाव्यात अशा अनेक अगदी सरळसोट पट्ट्या दिसतात. दिशादर्शक बाणांप्रमाणे भासणारे कित्येक प्रचंड त्रिकोणही दिसतात. कोणी बनवल्या या आकृत्या? कशासाठी बनवल्या? अनेकांनी अनेक कल्पना मांडल्या आहेत; पण या कोड्याची उकल झालेली नाही.
नाझकाची सहल संपवून संध्याकाळपर्यंत पॅराकास या समुद्रकिनाऱ्यावरील मुक्कामाच्या ठिकाणी आलो. समुद्रकिनाऱ्याचा फेरफटका मारला अन् मस्त आणि स्वस्त हॉटेलच्या सुंदर खोलीत रात्र घालवली.
सकाळी बोटीने जवळच असलेल्या बॅलेस्टास बेटाकडे जायचे होते. जाताना वाटेत पिस्को किनाऱ्यावरच्या एका वाळूच्या टेकडीवर एक १८२ मीटर लांबीचे आणि ७७ मीटर रुंदीचे प्रचंड आकाराचे चित्र कोरलेले दिसते. पॅराकाससारख्या भरपूर वारा असलेल्या किनाऱ्यावर हे चित्र इ.स.पूर्व २००पासून टिकून आहे. ते एखाद्या कॅक्टसच्या झाडाचे असावे असे काहींचे म्हणणे आहे, तर आपल्याकडच्या काहींना ते त्रिशूळाचे चित्र वाटते. याची दिशा मात्र अगदी अचूक दक्षिणोत्तर आहे. हे कशासाठी आणि कोणी कोरले हे पुन्हा नाझकासारखेच कोडे आहे. एक शक्यता अशी, की लांबून बंदर कोठे आहे हे समजण्यासाठीची ही खूण असावी.
बॅलेस्टास बेटाच्या भोवती बोटीने फेरी मारली जाते. बेटावर मानवी वस्ती नाही, मात्र असंख्य पक्षी आहेत... काँडोर हा काहीसा गिधाडासारखा दिसणारा मोठा पक्षी, आश्चर्य म्हणजे हे ठिकाण अंटार्क्टिकाहून बरेच उत्तरेला असूनही येथे पेंग्विन येतात. ते अर्थात पाहायला मिळालेच. त्याहूनही विशेष म्हणजे येथे प्रचंड संख्येने समुद्रसिंह आहेत. तिथे त्यांचा भरपूर गोंधळ चालू असतो, मादीसाठी मारामाऱ्या चालू असतात. त्यांचेही एक अनोखे जग पाहायला मिळाले. किनाऱ्यावर काही सुंदर जेलीफिशही दिसले.
दुपारी पॅराकास राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. उद्यान म्हणजे झाडं, हे समीकरण आपल्या मनात पक्कं असतं; पण इथं एकही झाड नाही. एका बाजूला पॅसिफिकचा विशाल समुद्र आणि त्याभोवतीच्या जमिनीचा भूगर्भाच्या हालचालीने उंच आलेला किनारा म्हणजे हे राष्ट्रीय उद्यान. हा भूभाग समुद्रातून वर उचलला गेला आहे हे स्पष्ट समजते. कारण कुठंही एखादा दगड घ्या, माती उचला आणि त्याची चव पहा... चक्क मीठ खाल्ल्यासारखं वाटतं. वाहनांसाठीचे रस्ते दिसताना अत्यंत कठीण डांबरी दिसतात, पण येथील क्षारयुक्त मातीवरून वाहने जाऊन ते मार्ग कठीण आणि चकचकीत झालेले आहेत. शिवाय भोवती थोडा शोध घेतला तर सहजपणे शंख, शिंपले, समुद्री जीवांचे अवशेष इत्यादी सापडतात.
संध्याकाळी बसने चार तासांच्या प्रवासानंतर घरी परतलो. पुढील आठ दिवसांत लिमाच्याच जवळचे पचाकामा नामक ठिकाणचे असेच पुराणकालीन अवशेष पाहिले.
आता माझ्या पेरू पर्यटनाची अखेर आली होती.
पेरू आणि भारत- जगाच्या दोन टोकांवरचे दोन देश. मला त्यांच्यात काही साम्यस्थळे दिसली तसेच काही सांस्कृतिक फरकही जाणवले. तेथील लोक मुख्यतः गहूवर्णी आहेत. कुस्को भागातील लोक आपल्या लडाखशी नाते असल्यासारखे, तशीच चेहरेपट्टी असलेले आणि तसाच पेहराव करणारे वाटले. राजधानीचे लिमा हे शहर समुद्रकिनाऱ्याला असूनही तिथे मुंबईसारख्या घामाच्या धारा नसतात. त्याचं कारण असं कळलं, की तेथूनच जवळून पॅसिफिक समुद्रातील एक थंड पाण्याचा प्रवाह वाहतो.
पेरूमधील पुरातन इका आणि इंका संस्कृतीवर स्पॅनिश अतिक्रमण झाल्याने असेल पण येथील बहुतांश लोक स्पॅनिशच बोलतात. (कुस्को भागात अजूनही एक भाषा बोलली जाते.) स्पॅनिश अतिक्रमणामुळेच बहुतांशी लोकांचा धर्म ख्रिश्चन. पण मी ज्या दोन घरांत मुक्काम केला आणि अन्य दोन घरांना भेटी दिल्या, तिथे कोठेही येशू, मेरी यांच्या तसबिरी, मेणबत्त्या असा जामानिमा दिसला नाही. तिथेही एकत्र कुटुंबपद्धत अस्तित्वात आहे. घरची कामे स्त्रीनेच करायची वगैरे पद्धती फारशा नसाव्यात. सर्व कामे सर्वजण करत असतात. लोकांच्या खाण्यापिण्यात साधारणपणे मांसाहार जास्त, भात भरपूर आणि विकत आणलेला ब्रेडही. मांसाहार तिखट, मसालेदार खाण्याची पद्धत नाही. मद्यप्राशनात कोणता न्यूनगंड नाही की फुशारकी नाही. त्यामुळे नशा होईपर्यंत मद्यपान करताना फारसे कुणाला पाहिले नाही.
पेरूमधील माझा मुक्काम तसा अगदी मर्यादित कालावधीसाठी होता. त्यामुळे त्या देशातील अन्य ठिकाणं पाहणं जमलं नाही. मी पाहिले ते पुरातन पेरू. नैसर्गिक पेरू पाहायचं राहून गेलं. अमेझॉन नदी पेरूत उगम पावते. (बरेच उगम आहेत तिचे, त्यापैकी एक पेरूत म्हणा.) जगातील सर्व नद्यांच्या एकूण पाण्याच्या एक पंचमांश पाणी फक्त या नदीत आहे. ४००० किमी लांबीच्या या नदीभोवती अनोखी वनसृष्टी आणि प्राणिसृष्टी आहे. हे सारे पाहायचे आहे... पण ते परत कधी तरी.
(२०१४च्या मुशाफिरी दिवाळी अंकातून साभार)