आम्ही कोण?
लेखमालिका : स्मार्ट‘फोनी'करणाच्या नोंदी

मिशन फॉरवर्ड

  • गौरी कानेटकर
  • 05.03.26
  • वाचनवेळ 3 मि.
smartphones

काल दिवसभरातलं व्हॉट्सॅप तपासा. किती मेसेजसाठी तुम्ही अनाहूत पोस्टमनचं काम केलंत? किती जोक्स फॉरवर्ड केलेत? किती फोटो-किती व्हिडिओ पुढे ढकललेत? किती मेसेज पूर्ण वाचण्याआधीच त्याला अंगठा, टाळ्या दाखवून मोकळे झालात?

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण एकमेकांसोबत नाना गोष्टी शेअर करत असतो. कधी प्लॅटफॉर्म फेसबुक-इन्स्टाग्रामचा असतो, तर कधी व्हॉट्सॅप-टेलिग्रामचा, तर कधी आपल्या जुन्याच मेसेंजरचा. गुडमॉर्निंग-गुडनाइटपासून ते जोक्स आणि प्रेरणादायी सत्य घटनांपर्यंत नाना गोष्टी. हे संदेश आले रे आले की त्याला दहा-बारा ठोकळेबाज इमोजींनी प्रतिसाद द्यायचा आणि ते आणखी दहा लोकांना पाठवून देण्याचं इतिकर्तव्य तातडीने पार पाडायचं. ती आपली प्रतिक्षिप्त क्रियाच झाली आहे जणू. ‘मी एवढे चांगले मेसेज टाकले, पण आपल्या ग्रुपमधलं कोणी साधं लाइकही केलं नाही' अशी गंभीर तक्रार करुन त्यापायी स्वतःचं मनस्वास्थ्य बिघडून घेण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे म्हणजे बघा. पूर्वी ‘हा संदेश दहाजणांना पाठवा, तुमची मनोकामना पूर्ण होईल; पाठवला नाहीत तर काही तरी वाईट घडू शकतं', असा इशारा देणारे संदेश यायचे (किंवा आजही येतात), तेव्हाही कोणी एवढ्या मनोभावे संदेश पाठवणीचं काम केलं नसेल. एखाद्या असेंब्ली लाइनवर काम करणारे कामगार जितक्या यांत्रिकपणे आपापला कामाचा वाटा उचलत असतील तितक्याच यांत्रिकपणे आपण या ‘मिशन फॉरवर्ड'मध्ये गुंतलो आहोत. असं का बरं घडतं आहे? स्वतः काहीही कष्ट न करता किंवा डोकं न चालवता पूर्ण ‘पॅसिव्हली' आपल्याला एका वर्तुळात ‘ॲक्टिव्ह' राहता येतंय, हे त्यामागचं कारण असावं का?

हेही वाचा - रिल्स बघताय? सावधान ! पुढे धोका आहे.

कारण, ना इथे आपल्याला आलेला संदेश कोणी पाठवलाय याचा विचार करण्याची गरज असते, ना त्या संदेशात काय म्हटलंय हे समजून घेण्याची आवश्यकता असते, ना त्या मजकुराची सत्यासत्यता पडताळण्याची. त्या संदेशाला प्रतिसाद देतानाही डोकं चालवण्याची गरज नसतेच. ‘हा जोक मला आवडला नाही, असे जोक्स पाठवत जाऊ नको', असं कुणा मित्र-मैत्रिणीला तुम्ही सांगितल्याचं आठवतंय? बायकांना अपमानास्पद असणारे किती तरी जोक्स बायकांच्याच ग्रुप्सवर फिरत असतात आणि त्याला बायकाच टाळ्या देत असतात. मेसेजबद्दल विचार करण्याची गरज नसते, तशीच त्यावर प्रतिक्रिया देतानाही विचारबिचार करणं अपेक्षित नसतं. जो काही विचार करायचा तो इमोजी तयार करणाऱ्यांनी आधीच केलेला असतो की! आपण फक्त ‘रिसेंटली युज्ड इमोजीं'मधून ‘रँडमली सिलेक्ट' करून टाकायच्या असतात. त्यातल्या प्रत्येक इमोजीचा वेगळा अर्थ आहे का, तोच अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे का वगैरे प्रश्न इथे असंबद्धच. सगळेच जोक आपल्याला छान वाटतात, सगळ्यावरच आपल्याला काही तरी भावना व्यक्त करायच्या असतात आणि त्या भावनांसाठी इमोजीही तयारच असतात. सारं कसं परस्पर होऊन जातं!

हेही वाचा - सोशल मीडियाचा कार्बन फुटप्रिंट

एखाद्या टेलरच्या दुकानात फरशीवरून केरसुणी फिरवली की चिंध्यांचा ढीग तयार होतो. आपल्या मोबाइलमधून अशी केरसुणी फिरवण्याची सोय असती तर काय झालं असतं? हसणाऱ्या-रडणाऱ्या-चित्रविचित्र चेहरे करणाऱ्या, अंगठे दाखवणाऱ्या, हात जोडणाऱ्या नाना इमोजीजचा ढीग तयार झाला असता. या इमोजीज म्हणजे आज आपल्या भावना व्यक्त करण्याचं अत्यावश्यक साधन झालं आहे. पण त्यांचा कचरा तयार व्हावा एवढ्या भावना आपण कशाबद्दल व्यक्त करतोय? असा काय बदल घडलाय आपल्या आयुष्यात? एवढं काय वाचायला मिळतंय आपल्याला की ज्याला सतत टाळ्या द्याव्याशा वाटाव्यात?

..तर या सगळ्या गोंधळात आपल्याला काही ओरिजनल सुचणं, आपल्याला सुचलं आणि खरोखर वाटलं तरच ते चार लोकांना पाठवणं, ज्या विषयांवरचे संदेश फिरतात त्याबद्दल आपलं काही म्हणणं असणं वगैरे लांबच. थोडक्यात काय, तर प्रवाहाबरोबर पोहत राहायचं, एवढंच आपण करत असतो. अर्थात ही काही आजची गोष्ट नव्हे. पण मोबाइलवरच्या आपल्या वर्तनामुळे आपलं प्रवाहपतित अन्‌ मिडिऑकर असणं आणखी ठळक बनलंय का?

(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results