आम्ही कोण?
अनुभव 

पैठण : स्टॉकहोम : कोची

  • सुजाता देशमुख
  • 24.03.26
  • वाचनवेळ 11 मि.
kochi biennale stockholm paithan

खट, खट, खट…

आवाज, लयबद्ध करघ्याचा / हातमागाचा.

टुप, टुप, टुप…

आवाज गोठवणाऱ्या निःशब्द - बर्फाळ प्रदेशातल्या हिमकणांचा. माझ्या मनात हे दोन आवाज सतत एकमेकांना भिडत राहिले.

कधी कधी असे काही आवाज मनात इतके खोल उतरतात ना, की ते केवळ ऐकू येत नाहीत तर मनाच्या आत मुक्कामालाच येतात.

पहिला आवाज विणकराच्या घरातला. जिथे सूत धाग्यांनी गुंततं. हातांनी, पायांनी करघा हलतो. लयबद्ध. एका साध्या खोपटात दिवसागणिक एक एक भरजरी वस्त्र आकार घेत जातं. त्या खट, खट, खट आवाजात घाम आहे, थकवा आहे आणि जगण्याची चिकाटीही आहे!

दुसरा आवाज थंड आहे, निर्जीव आहे आणि जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण करणारा आहे.

हे दोन आवाज एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. एक पैठणच्या हातमागाजवळ, दुसरा स्वीडनमधल्या स्टॉकहोमच्या बर्फाळ शांततेत. तरीही ते दोघे माझ्या मनात एकाचवेळी घुमू लागले. अर्थाअर्थी एकमेकींशी संबंध नसलेल्या या दोन्ही गोष्टी मला मानवी तगमग सांगू लागल्या.

आठवलं ते स्टॉकहोमच्या एका म्युझियममधलं भलं मोठं दालन. त्याच्या चारही भिंतींना नखशिखांत अप्रतिम बर्फाच्छादित परिसराचे फोटो. जणू आपण त्या नीरव एकांतात उभे आहोत. संपूर्ण श्वेत शुष्क निसर्ग. त्या संपूर्ण परिसरात, एका भिंतीवर एका धनाढ्य सरदाराचा अतिशय भव्य प्रासाद. त्यात कुणाला न दिसणारे चार नोकर आणि त्याची एकटी तरुण बायको. वर्षातले आठ महिने तिथे बर्फ. सरदाराच्या अनुपस्थितीत तिच्या आयुष्याभोवती पसरलेली महिनोन महिन्यांची बर्फाळ शांतता. बोलायला माणसं नाहीत. एकाकीपणा आणि हिमकणांचा अव्याहत टुप, टुप, टुप, टुप आवाज. एका टेपरेकॉर्डरद्वारे त्या कमालीच्या शांत दालनात येत असलेला. काळाची टपटप.

kochi biennale stockholm paithan

त्या दोन्ही आवाजांचा एक अनाहत नाद पुन्हा नव्यानं ऐकू आला तो मात्र केरळच्या कोचीमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात. कोची - मुझिरीस बीएनाले मध्ये.

स्त्रीवादी कलाकार लक्ष्मी माधवन यांचे विणकरांवरचे फोटो पाहिले तेव्हा. त्या फोटोंमध्ये हात होते - सूत पकडलेले, करघ्यावर झुकलेले, कष्टांनी कणखर झालेले. त्या हातांतून कापड जन्माला येत होतं, पण त्या प्रत्येक कापडाच्या सौंदर्यामागे श्रम, विवंचना आणि उपेक्षा दडलेली होती.

तेव्हा अचानक मनात एक भलताच धागा जोडला गेला.

कोचीचे विणकर, पैठणचे कारागीर आणि स्टॉकहोमच्या बर्फात अडकलेली एक गर्भश्रीमंत विवाहित तरुणी.

कोची ते स्टॉकहोम व्हाया पैठण.

एकीकडे श्रमाची समिधा. दुसरीकडे वैभवाची शिक्षा. आणि तिसरीकडे परंपरेला धरून जगण्याची अखंड धडपड.

जगाच्या वेगवेगळ्या टोकांवर घडणाऱ्या या तीन कथा जणू एकाच करघ्यावर विणल्या जात आहेत.

कोची- मुजिरिस बीएनाले.

कोचीच्या समुद्री वाऱ्यासारखं मोकळं आणि मुजिरिसच्या इतिहासासारखं खोल. हा महोत्सव म्हणजे रंग, विचार, आवाज आणि शांततेचा एक बहुरंगी जत्रा मंडप. जुनी गोदामं, वाडे, गल्लीबोळ - सगळाच कॅनव्हास. आणि मग कला भिंतींवरून उतरून थेट मनात! ज्याला हवं त्यानं हृदयात म्हणावं.

दक्षिण आशियातल्या सर्वात मोठ्या समकालीन अशा या कलाप्रदर्शनात कला फक्त पाहायची नसते, ती अनुभवायची असते. चित्रं, स्थापत्यकला, व्हिडिओ आर्ट, परफॉर्मन्स, शिल्प - प्रत्येक कलाकृती जगभरच्या प्रश्नांना कोचीच्या मातीचा स्पर्श देत उभी राहते.

थोडक्यात, कोची बिएनाले म्हणजे विचारांना पंख देणारी, आणि संवेदनांना नवा किनारा दाखवणारी कलायात्रा. ही केवळ कलाकृतींची मांडणी नाही, तर काळाच्या प्रवाहातला एक संवाद आहे. इथे जगभरचे कलाकार आपापल्या अनुभवांचे तुकडे घेऊन येतात, आणि कोचीच्या अवकाशाखाली त्याच तुकड्यांची एक मोठी, सामूहिक कथा होते. प्रत्येक दालनात प्रश्नांची कुजबुज आहे, आशेची रंगरेषा आहे, दु:खांचं विस्तीर्ण पटल आहे, तशीच बदलाची चाहूलही आहे. म्हणूनच बिएनाले म्हणजे एक उत्सव- कलेचा, विचारांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा. पाय नको म्हणेपर्यंत चालत राहायचं. दिसेल ते डोळ्यांत साठवत ठेवायचं.

मुजिरिस हे प्राचीन काळातलं एक समृद्ध बंदर. सध्याच्या केरळमधल्या पेरियार नदीकाठी वसलेलं हे शहर रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध ठेवून होतं. मसाले, मोती, हस्तकला यांचा व्यापार इथून जगभर होत असे. विविध संस्कृती, धर्म आणि भाषा यांचा संगम इथे घडला- म्हणून मुजिरिस हे केवळ व्यापारकेंद्र नव्हतं, तर सांस्कृतिक देवाणघेवाणीचंही केंद्र होतं. काळाच्या ओघात पुरासारख्या आणि इतर भूगर्भीय बदलांमुळे हे बंदर लुप्त झालं; पण त्याची स्मृती, आणि त्याचा बहुसांस्कृतिक वारसाच कोची-मुजिरिस बिएनालेच्या नावात आणि आत्म्यात जिवंत आहे. इथल्याच एका दालनात लक्ष्मी माधवन या केरळी कलाकाराची कलाकृती जिवेभावे भेटली.

बळरामपुरममधली सुमारे दोनशे वर्षं जुनी आणि आज संकटात असलेली ‘कसावू’ विणकामाची परंपरा लक्ष्मी नव्यानं उलगडतात. ‘कसावू’ हे केरळमधलं पारंपरिक सोन्याच्या काठाचं वस्त्र. त्यांच्या दृष्टीनं करघा केवळ वस्त्रनिर्मितीचं साधन नाही. तर सहनशक्ती, जवळीक आणि सामूहिक निर्मितीचा एक जिवंत अवकाश आहे. त्या ‘कसावू’कडे केवळ प्रतीकात्मक वस्त्र म्हणून न पाहता, त्या त्याला एक जिवंत अभिलेख मानतात.

त्यांच्या छायाचित्रांतून, हस्तकलेचं केवळ सौंदर्यीकरण करण्याच्या वृत्तीला आव्हान आहे. या कलेमागच्या कठोर, स्नायूंना थकविणाऱ्या अदृश्य श्रमांना त्या पुढे आणू पाहत आहेत. 'कसावू' जणू त्यांच्या मातृवंशीय परंपरेशी जोडणारी नाळ आहे. काळजीपूर्वक, निगुतीनं त्यांच्या माध्यमातून त्या अस्तंगत होत चाललेल्या एका नाजूक हस्तकलेच्या परंपरेला त्या नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करताहेत.

kochi biennale stockholm paithan

तिथेच पैठणमधल्या करघ्याचा खट खट खट आवाज आणि स्टॉकहोमइथल्या बर्फाची टुप टुप टुप मनात सुरू झाली. आणि गंमत म्हणजे कधीतरी वाचलेली एक झेन कथा आठवली.

एकदा एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा गावात एक वृद्ध विणकर राहत असतो. त्याच्या घरात फारसं काहीच नसतं. असतो फक्त एक जुना हातमाग… आणि त्याचा अखंड चालणारा आवाज - खट, खट, खट…

तो विणकर दिवसन्‌दिवस सूत हातात घेऊन त्या धाग्यांतून सुंदर वस्त्रं तयार करत असे. गावातले लोक म्हणत, “तुझ्या हातात जादू आहे. तुझ्या वस्त्रांना शहरात मोठी किंमत मिळते.”

वृद्ध हसे. म्हणे, “मी काही जादू करत नाही, फक्त धागे एकमेकांना भेटू देतो.”

एके दिवशी एक श्रीमंत सरदार त्याच्याकडे येतो. म्हणतो, “माझ्या पत्नीकरिता सर्वात सुंदर, सर्वात महाग वस्त्र वीण. ते पाहून जगानं थक्क व्हायला हवं.”

विणकर मान हलवतो. अनेक दिवस, अनेक रात्री तो करघ्याजवळ बसतो. खट, खट, खट…

धागे एकत्र येत जातात. कापड हळूहळू आकार घेत जातं. त्यात तो आपल्या शांत श्वासांची लय, आपल्या आयुष्यातला संयम, आणि ऊब गुंफतो. काही महिन्यांनी वस्त्र तयार होतं. ते इतकं सुंदर होतं की प्रकाश त्यावर थांबून राहतो. सरदार ते घेऊन जातो.

काही दिवसांनी तो पुन्हा परततो. पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नसतं. तो म्हणतो, “वस्त्र अप्रतिम आहे. पण माझी पत्नी ते घालूनही हसत नाही. तिच्या डोळे भकास दिसतात. तुझ्या वस्त्रांतली ऊब तिच्या मनात पोहोचत का नाही?”

विणकर शांतपणे उठतो. सरदाराला आपल्या घरातल्या जुन्या करघ्याजवळ घेऊन जातो.

“इकडे बघ,” तो म्हणतो.

रिकामा करघा हळूहळू हलत असतो. खट, खट, खट…

“हे काय आहे?” सरदार विचारतो.

विणकर म्हणतो, “हे वस्त्र नाही. माझं आयुष्य आहे. मी जेव्हा विणतो, तेव्हा माझ्या दिवसाचा वेळ, माझ्या शरीराचा श्रम, आणि माझ्या मनाची शांतता या धाग्यांत उतरते. पण ज्याच्यासाठी मी विणतो, त्याचं आयुष्य या वस्त्रात नसतं.”

सरदार गोंधळतो. “म्हणजे?”

विणकर हसतो.

हेही वाचा - कोची बिनाले: काळ आणि स्मृतीचे नाना पदर

“तुम्ही तुमच्या पत्नीसाठी वस्त्र आणलं. पण तुम्ही तिच्यासाठी वेळ विणला का? तिच्यासाठी सहवास विणला का? वस्त्र तात्पुरती ऊब देतं - पण एकटेपण नाही घालवत.”

सरदार काही न बोलता शांतपणे निघून जातो. त्या रात्री, दूर शहरातल्या महालात, ती स्त्री पुन्हा तेच वस्त्र घालून उभी असते. बाहेर बर्फ पडत असतो.

टुप, टुप, टुप… पण फरक एवढाच, की तिच्या सरदाराच्या बाहुपाशात असते.

आणि गावात, डोंगराच्या पायथ्याशी, वृद्ध विणकर पुन्हा करघ्याजवळ बसलेला असतो.

खट, खट, खट…

आणि त्या दोन आवाजांच्या मध्ये, कुठेतरी एक साधं सत्य शांतपणे उभं असतं.

धाग्यांनी वस्त्र विणता येतं…

पण माणसांमध्ये नातं विणायला

हात नव्हे, मन लागतं.

एरवीही विणकाराच्या घरात सकाळ कधी उगवते आणि संध्याकाळ कधी सरते, हे वेळेला देखील कळत नाही. त्या खोलीत दिवसाचा पहिला आवाज असतो - खट, खट, खट… तो आवाज सुरुवातीला साधा वाटतो; पण जरा कान देऊन ऐकलं तर कुठेतरी आत खोलवर दडलेली एक शांत वेदनाही असते. ही वेदना बाळंतिणीच्या वेदनेसारखी नवनिर्मितीची म्हणता येईल. परंतु योग्य मोबदल्याविना वर्षानुवर्षं नवनिर्मितीचं हे अव्याहत चक्र...आनंददायी म्हणता येईल?

कधी कधी खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या तिरप्या रेषा त्या धाग्यांवर पडतात. त्या चमकणाऱ्या धाग्यांकडे पाहिलं की वाटतं - किती सुंदर वस्त्र निर्माण होतंय! पण त्या सौंदर्यामागच्या प्रत्येक इंचामागे एक न ऐकलेली कथा असते - जिला फारशी किंमत नसते.

खट, खट, खट… दिवसभर आवाज .... करघ्याचा? की विणकराच्या श्वासाचा? त्याच्या जगण्याच्या धडपडीचा? त्या आवाजात थकवा आहे. त्याच्या कुटुंबाची भूक आहे. मुलांच्या संगोपनाची चिंता आहे. भविष्याची साशंक-भीती आहे. आयुष्याची शांत स्वीकृती आहे. उद्याच्या जगण्याची बारीकशी आशाही आहे. हातमागावर तयार झालेली देखणी साडी दुकानात, किंवा प्रमदेच्या शरीरावर दिमाखात वावरते, तेव्हा तिच्या धाग्यांतली ही कथा कुणालाच दिसत नाही. लोक त्या साडीचा रंग पाहतात, पोत पाहतात, तिच्या काठाची नक्षी पाहतात, तिचं सौंदर्य पाहतात.

तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी विणकर पुन्हा करघ्याजवळ बसतो. कारण त्याला माहीत असतं - धागे थांबले, तर घराचं जगणंही थांबेल. त्यांच्या जगण्याचा प्रत्येक क्षण करघ्याच्या लयीशी बांधलेला आहे. म्हणून तो पुन्हा एकदा सूत हातात घेतो, पायांनी करघा हलवतो, आणि त्या शांत घरात पुन्हा उमटते - खट, खट, खट…

पुन्हा सुरू आयुष्याचं विणकाम.

हेही वाचा - धार्मिक भावनांपायी आणखी एका चित्राची माघार

करघ्याची खट, खट, खट आणि बर्फाचा टुप, टुप, टुप वास्तविक प्रथमदर्शनी पूर्णपणे वेगळ्या जगातले. पण माझ्या मनात हे दोन अनाहत आवाज एकाकीपणा आणि नियतीच्या कैदेतल्या जगण्याचा श्वास झाले. टुप, टुप, टुप बर्फ पडण्याच्या आवाजात श्रम नाहीत. पण वेदना आहे - एकाकी श्रीमंत तरुण स्त्रीची. तिच्या अंगावरची तलम वस्त्रं अशाच कुठल्यातरी करघ्यामधून विणली गेलेली असतील. दोघंही एकमेकांना पूर्ण अपरिचित. मात्र दोघांच्या आयुष्यात एक अद्भुत साम्य. विणकराला गरीबीने कैद केलं आहे; तर त्या स्त्रीला वैभवाने. एकाला जगण्यासाठी श्रमांची शिक्षा आहे; दुसरीला एकाकीपणाची.

तरीही दोघांमध्ये एक मोठा फरकही आहे. विणकराच्या खटखटीत एक निर्माण आहे - तो धागे विणतो, कापड तयार करतो, काहीतरी घडवतो. त्याच्या श्रमातून सौंदर्य जन्माला येतं. पण बर्फाची टप, टप, टप केवळ काळाचा प्रवाह दाखवते - काहीतरी हळूहळू वितळतं आहे, विरघळतं आहे.

एक आवाज निर्मितीचा, दुसरा निव्वळ कालप्रवाहाचा.

एकात घामाची उष्णता, दुसऱ्यात एकांतवासाचा हीव भरवणारा गारठा.

मात्र दोन्ही आवाजांत आहे ती मानवी जगण्याची लय.

शेवटी उरतात ते फक्त दोन आवाज -

खट, खट, खट… आणि टुप, टुप, टुप…

एक धागा विणत राहतो, दुसरा शांतता विणत राहतो.

आणि या दोन्ही लयींमध्ये अस्तित्वाच्या अवस्था आहेत.

विणकर धाग्यांत वस्त्राला बांधत असतांना, त्याच्या प्रत्येक हालचालीत वेळ गुंतलेला असतांना - खट, खट, खट - म्हणजे माणूस आणि जग यांच्यात चाललेला संवाद आहे. मी आहे, म्हणून काहीतरी निर्माण होत आहे.

पण बर्फाची टुप, टुप, टुप वेगळीच आहे. तिथे निर्मिती नाही. हळूहळू वितळणारा काळ आहे. बर्फाचा प्रत्येक थेंब खाली पडताना सांगतो आहे - वेळ निघून जाते आहे. पण काळाला पकडून ठेवणारी कोणतीही कृती त्यात नाही. तिचं जग स्थिर आहे - इतकं स्थिर, की त्यात जीवनाची हालचालच हरवली आहे. करघ्याचा आवाज म्हणजे अस्तित्व. तर बर्फाचा आवाज म्हणजे अस्तित्वाची पोकळी.

एक माणूस जगाशी गुंतलेला आहे - गरिबीत का होईना, पण त्याचं जगाशी नातं आहे.

दुसरी श्रीमंत असूनही तिच्या आजूबाजूला असलेलं वैभव तिला कुणाशीही जोडत नाही.

इथे एक विलक्षण विरोधाभास उभा राहतो.

गरीब विणकराचं आयुष्य कठीण आहे. पण त्याच्या खट, खट, खट आवाजात एक सामाजिकता आहे - त्याच्या कापडाला कुणीतरी स्पर्श करणार आहे, कुणीतरी ते परिधान करणार आहे, कुणाच्यातरी आयुष्यात ते आनंद निर्माण करणार आहे.

पण त्या स्त्रीच्या जगात निर्मितीचा करघा नसल्यामुळे तो टुप, टुप, टुप आवाज कुणासाठीही नाही. शांततेला निव्वळ अधिक विमनस्क करत नेणारा आहे.

पैठणच्या हातमाग गल्लीत खट, खट, खट….ही करघ्याची ती लय सकाळच्या पहिल्या प्रकाशासोबत सुरू होते आणि संध्याकाळच्या सावल्या लांबू लागेपर्यंत अखंड चालू राहते. त्या आवाजात एक परंपरा विणली जाते, अनेक पिढ्यांच्या स्मृती विणल्या जातात.

kochi biennale stockholm paithan

कधी कधी असं वाटतं - पैठणी काय किंवा ‘कसावू’ काय, ती करघ्याच्या लयीमध्ये जन्मलेली एक कथा आहे. विणकराच्या घरात बसून ऐकलं, तर खट, खट, खट हा आवाज नदीच्या प्रवाहासारखा वाटतो - हळू, सातत्यानं वाहणारा. विणकराला माहीत असतं, त्याच्या हातून निर्माण झालेलं वस्त्र कुणाच्या तरी आयुष्याचा सण होईल, कुणाच्या समारंभात उजळून निघेल, कुणाच्या आठवणीत जपलं जाईल.या कलेच्या मागे एक शांत संघर्ष दडलेला आहे. बाजारात साड्यांच्या किमती आकाशाला भिडतात, पण त्यातला मोठा भाग विणकरांपर्यंत पोहोचत नाही. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा करघ्याजवळ बसतो. कारण त्याला माहीत असतं - धागे थांबले, तर परंपराही थांबेल.

म्हणून पैठणच्या आणि बळरामपुरमच्या त्या शांत घरांत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या कलेची, संयमाची आणि जगण्याच्या चिकाटीची लय अजूनही जिवंत आहे. त्या आवाजात इतिहासही आहे आणि त्याचं भविष्यही.

कोचीच्या बीएनालेमध्ये लक्ष्मी माधवन यांनी टिपलेले विणकरांचे फोटो, स्टॉकहोममधल्या बर्फात हरवलेला प्रासाद आणि पैठणच्या घरांतले करघे - ही प्रथमदर्शनी परस्परांपासून खूप दूर वाटणारी तिन्ही दृश्यं माझ्या मनात मात्र एक अदृश्य धागा निर्माण करून गेली. मानवी अस्तित्वाच्या तगमगीचा. त्यातल्या अपूर्णतेचा.

हेही वाचा - कापसे पैठणी : ग्रामीण रोजगाराची ‘भरजरी’ झेप

तेव्हा कधी कधी मला स्वतःलाच प्रश्न पडतो -

आपण आपल्या आयुष्याचा करघा कसा चालवतो आहोत?

आपल्या अनुभवांची गुंफण त्यात कशी आहे?

आणि मग अचानक लक्षात येतं -

मी एकटीच नाही, तर आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या करघ्याजवळ बसलो आहोत.

कुणाच्या करघ्याचा आवाज मोठा आहे, कुणाचा मंद.

पण शेवटी आपण सगळे एकच काम करतो आहोत.

आपल्या आयुष्याचं एक नाजूक वस्त्र विणतो आहोत.

आणि कदाचित म्हणूनच जगाच्या कुठल्याही टोकाला गेलं,

इतर आवाज असले तरी, तरी दोन आवाज कायम ऐकू येतात -

खट, खट, खट…

आणि दूर कुठेतरी…

टुप, टुप, टुप…

अचानक असं वाटतं -

ही कथा विणकरांची कुठं आहे? ही तर त्या एकाकी स्त्रीचीही नाही.

ही तर आपलीच कथा आहे...

सुजाता देशमुख | sujataira@gmail.com

सुजाता देशमुख या ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि अनुवादक आहेत. त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results