आम्ही कोण?
अनुभव 

कोची बिनाले: काळ आणि स्मृतीचे नाना पदर

  • अक्षय शेलार
  • 17.03.26
  • वाचनवेळ 7 मि.
kochi biennale

समुद्रकिनाऱ्यालगत उभी असलेली एक पांढरी भिंत आणि त्या भिंतीत दिसणारा एक तुटका भाग हे या बिनालेमधील एक ठळक दृश्य. त्यावर लिहिलेले ‘फॉर द टाइम बीइंग’ हे शब्द केवळ त्या इन्स्टॉलेशनची स्थलकालबद्धता दाखवत नाहीत; तर ते आपल्या काळाच्या लवचिक आणि नाजूकपणाकडे लक्ष वेधतात. काळ आणि स्मृती ही या बिनालेमध्ये वारंवार जाणवणारी संकल्पना. अनेक कलाकृतींमध्ये ती वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. कधी वास्तूंच्या भग्न अवशेषांतून, कधी विस्मृतीत गेलेल्या श्रमाच्या खुणांमधून, तर कधी एखाद्या साध्या वस्तूमध्ये दडलेल्या इतिहासातून.

काळाचं पहिलं रूप मनात उभं राहतं ते बिरेंदर यादव यांच्या ‘ओन्ली अर्थ नोज देअर् लेबर’ या कामात. अनामिक कामगारांचा आणि त्यांच्या नुसत्या शोषणाचा नव्हे, तर इतिहासातील अनुल्लेखाने पुसून टाकल्या गेलेल्या अस्तित्वाचा हा मागोवा. कामगार म्हटलं की जात, धर्म, स्थलांतर, मजुरी, आणि तात्पुरत्या वास्तव्याचा प्रश्न हे सगळे मुद्दे लगेच पुढे येतात. यादव यांच्या इन्स्टॉलेशनमध्ये मात्र कामगार प्रत्यक्ष दिसत नाहीत. ते तिथून निघून गेलेले असतात. मागे उरतात त्या केवळ त्यांच्या श्रमांच्या खुणा. विटांच्या भिंती, मातीचा रंग, हातांचे ठसे, रोजच्या वापरातील वस्तूंचे टेराकोटा कास्ट. जणू कामगाराच्या शरीराचेच काही तुकडे त्या वस्तूंमध्ये रूपांतरित झाले आहेत.

kochi biennale

प्रत्येक अवजारावर उरलेला स्पर्श, प्रत्येक विटेवर दिसणारे हातांचे ठसे हे त्या अनाम अस्तित्वाचे पुरावे बनतात. भिंतीवर मांडलेल्या एकसारख्या विटांकडे पाहताना एक विचित्र विरोधाभास जाणवतो. सगळ्या विटा आकाराने सारख्या असल्या तरी त्यांच्यावर उमटलेले हातांचे ठसे वेगवेगळे आहेत. समानतेच्या आवरणाखाली लपलेली व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव. इथे ओळख (आयडेंटिटी), स्थलांतर आणि श्रम यांचं नातं एकाच वेळी दृश्य स्वरूपात समोर येतं. त्या विटा ज्या कामगारांनी तयार केल्या, त्यांचं शरीर मात्र अनुपस्थित आहे. पण त्यांच्या शरीराचे श्रम या मातीमध्ये जणू स्थिरावलेले आहेत. म्हणूनच त्या कामात विचारला गेलेला प्रश्न फारच अस्वस्थ करतो: “Molds without a name are discarded as waste, then what of the laborers whose name was never inscribed?” नाव नसलेले साचे जसे टाकून दिले जातात, तसेच नाव नोंदलं न गेलेले कामगार इतिहासाच्या बाहेर फेकले जात नाहीत का?

हेही वाचा - धार्मिक भावनांपायी आणखी एका चित्राची माघार

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सपाटीकरणाविषयी भाष्य करणारं आणखी एक प्रभावी काम म्हणजे अली अकबर पी.एन. यांची चित्रं आणि इन्स्टॉलेशन. त्यांच्या कामात वास्तूंच्या स्मृतींना एक वेगळं महत्त्व आहे. गुजरातमधील विविध धार्मिक वास्तू, जामा मस्जिद, दर्गे, मंदिरं आणि त्या ठिकाणी दिसणारे शिल्पात्मक घटक त्यांच्या कामात उभे राहतात. मात्र, ते प्रत्यक्ष पुनर्निर्माण नसतं. फोटोग्राफिक संदर्भ, चित्रित अवशेष आणि मूर्त स्वरूपात उभे केलेले खांब यांचा वापर करून ते जणू इतिहासाच्या वेगवेगळ्या स्तरांना एकाच वेळी समोर आणतात.

kochi biennale

हिंदू आणि मुस्लिम मूर्तिकारांनी वापरलेल्या दोन प्रकारच्या दगडांपासून तयार केलेल्या एका भग्न खांबाचा अवशेष त्यांच्या इन्स्टॉलेशनमध्ये मध्यवर्ती ठिकाणी दिसतो. या खांबाचा इतिहास केवळ स्थापत्यकलेचा नसून तो सांस्कृतिक सहअस्तित्वाचा पुरावा आहे. उत्तर-पश्चिम भारतातील अनेक धार्मिक वास्तूंमध्ये वेगवेगळ्या समुदायांचे कारागीर एकत्र काम करत होते. त्यातून निर्माण झालेली स्थापत्यभाषा ही कोणत्याही एका धर्माची किंवा परंपरेची नव्हती. अली अकबर यांच्या कामात हीच बहुपरंपरागतता महत्त्वाची ठरते. पण त्याच वेळी त्या परंपरेच्या विखंडनाचाही दाखला दिसतो. त्यांच्या चित्रांमध्ये दिसणाऱ्या भग्न रेषा आणि तुटलेल्या पृष्ठभागातून जणू इतिहासाच्या तडा गेलेल्या स्मृती उलगडत जातात.

हेही वाचा - सेरेंडीपिटी : डोकं घुसळून काढणारा अनुभव

या संदर्भात त्यांच्या इन्स्टॉलेशनमधील सिंहाची मूर्तीही महत्त्वाची आहे. स्थापत्य परंपरेत सिंह हा शक्ती आणि संरक्षणाचा प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. इंडो-इस्लामिक आणि बौद्ध स्थापत्यामध्ये त्याची विविध रूपांतरं दिसतात. मात्र, आजच्या राजकीय संदर्भात त्याच प्रतिमेला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. शक्तीचं हे प्रतीक आता सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी वर्चस्वाचं प्रतीक बनते. अली अकबर यांच्या कामात हा बदल सूक्ष्मपणे दाखवला जातो. त्यामुळे त्यांच्या कलाकृती इतिहासाचा पुनर्विचार करत असतानाच समकालीन राजकीय वास्तवावरही भाष्य करतात.

kochi biennale

याच धाग्याला केरळच्या सामाजिक इतिहासाशी जोडणारे एक महत्त्वाचं काम म्हणजे ‘Head-Load Transport: Caste, Labour and the Making of Kerala’s Roads’ आणि ‘अंडर कास्ट सर्वेलन्स’ ही मांडणी. केरळमध्ये एकेकाळी वस्तू वाहून नेण्याची पद्धत ही केवळ वाहतुकीशी संबंधित नव्हती, तर ती थेट जातव्यवस्थेशी जोडलेली होती. बैलगाड्या किंवा जनावरांचा वापर न करता वस्तू डोक्यावरून वाहून नेणं ही सामाजिक स्तरावरील सक्ती होती. बाजारात काही समुदायांना आपली वस्तू जमिनीवर ठेवण्याचीही मुभा नव्हती. त्या वस्तू हातात किंवा डोक्यावरच धरून ठेवाव्या लागत. म्हणजेच श्रम, हालचाल, बाजारपेठ आणि सामाजिक स्थान या साऱ्यांवर जातव्यवस्थेने एक अदृश्य, पण कठोर नियंत्रण ठेवले होते. या इतिहासाची आठवण करून देणारं हे काम रस्ते, वाहतूक किंवा पायाभूत सुविधा यांचा इतिहास हा केवळ विकासाचा इतिहास नसून सामाजिक विषमतेचाही इतिहास आहे, याची जाणीव करून देतं.

हेही वाचा - मरिना अब्रामोविच : वेदनेचा अमर्याद कॅनव्हास

या गंभीर आणि ऐतिहासिक संदर्भांच्या दरम्यान केरळमधील पलक्कड गावातील एका कलाकाराचं काम वेगळ्याच कारणाने लक्ष वेधून घेतं. देवू नेनमारा ही वयाच्या साठीतील एक स्त्री. आयुष्यभर मोलमजुरी करून जगलेल्या या स्त्रीने कोविड काळात चित्रकलेला सुरुवात केली. तिच्या चित्रांमध्ये कोणतीही अकादमिक रचना नाही, कोणतंही औपचारिक प्रशिक्षण नाही. मात्र, तिच्या कामात एक विलक्षण उत्स्फूर्तता आहे. जणू तिच्या आसपासचं जग तिने थेट कॅनव्हासवर ओतून टाकलं आहे.

kochi biennale

भवताल, निसर्ग, आणि त्या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया हे तिच्या चित्रांचे मुख्य विषय. कॅनव्हासचा एकही भाग रिकामा राहू नये असा जणू तिचा हट्टच असावा. ठळक रंग, बारीक ठिपके आणि सतत पुनरावृत्ती होणाऱ्या आकृत्यांनी तिची चित्रे भरून गेलेली असतात. या दृश्यात्मक घनतेमुळे तिच्या चित्रांकडे पाहताना एक प्रकारची लय निर्माण होते. त्यातून दिसणारे चेहरे, झाडं, प्राणी आणि घरांच्या आकृत्या मिळून एक संपूर्ण परिसंस्था तयार करतात. त्या परिसंस्थेत देवूचं स्वतःचं आयुष्यही नकळत सामावलेलं दिसतं. ही भरीव चित्रं पाहताक्षणी तुम्हाला भारावून टाकतात आणि बराच काळ मनात रेंगाळतात.

हेही वाचा - धागा धागा रेखाटताना

कलेतिहासाच्या भाषेत अशा प्रकारच्या कामाला ‘आउटसाइडर आर्ट’ किंवा ‘नाइव्ह आर्ट’ असं संबोधलं जातं. पण त्या संज्ञांपलीकडे जाऊन पाहिलं तर देवू नेनमाराच्या चित्रांमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ती ऊर्जा अकादमिक परंपरेतून आलेली नाही; ती जीवनानुभवातून आलेली आहे. त्यामुळे तिची चित्रं केवळ दृश्यरित्या आकर्षक वाटत नाहीत, तर त्या चित्रांमधून एका जगण्याचा निखळ आनंदही व्यक्त होताना दिसतो.

kochi biennale

राजा बोरो यांच्या ‘लँडस्केप्स ऑफ मेमरी’ या मालिकेतही स्मृतीचा वेगळा पैलू दिसतो. आसाममधील बोडो समुदायाच्या जीवनाशी जोडलेले शेती, जमीन आणि निसर्ग यांचे संबंध त्यांच्या चित्रांमध्ये उमटतात. शेतजमिनी, पिकं, ऋतू आणि ग्रामीण जीवन या सगळ्या गोष्टी त्यांच्या कामात केवळ दृश्य घटक म्हणून नसून सांस्कृतिक स्मृतीचे वाहक बनतात. त्यामुळे या चित्रांकडे पाहताना आपल्याला केवळ निसर्गदृश्य दिसत नाही, तर त्या भूमीशी जोडलेल्या जीवनपद्धतींचीही झलकही दिसते.

हेही वाचा - माझ्या कोकणातला लाल-तांबडा

फोर्ट कोची आणि मट्टनचेरीमधल्या वेगवेगळ्या भागातून फिरत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा कलाकृती पाहताना आणखी एक पैलू मनात घर करून राहत होता. तो म्हणजे गंध. बाजारातील भागातून फिरताना लाकडाचे, मसाल्यांचे गंध नाकात शिरत होते. बक्कळ ऊन आणि त्यामुळे निवांत रस्ते, तशा उकाड्यातही कुठेकुठे पहुडलेली माणसं असा सारा भवताल. त्यातून मार्ग काढत मधेच एसी असलेल्या ठिकाणी जाऊन देवू किंवा इतर लोकांची चित्रं नि इन्स्टॉलेशन्स पाहणं म्हणजे दोन निराळी जगं एका झटक्यात अनुभवणं. त्यामुळे याही स्मृती कशा पद्धतीने मेंदूवर कोरल्या जातील, असा प्रश्न अधेमधे पडत होता.

kochi biennale

या सर्व कामांकडे एकत्रितपणे पाहिलं तर कोची बिनालेमध्ये काळ आणि स्मृती यांचे अनेक स्तर उलगडताना दिसतात. कुठे इतिहासाच्या भग्न अवशेषांतून, कुठे अनामिक श्रमांच्या खुणांमधून, तर कुठे एखाद्या साध्या आयुष्याच्या रंगीबेरंगी अभिव्यक्तीतून. या विविध कलाकृती जणू एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारत राहतात: आपण ज्या काळात जगतो, त्या काळाची स्मृती नेमकी कशी जपली जाणार? आणि त्या स्मृतीत कोणाचं नाव राहणार, कोणाचं नाही?

अक्षय शेलार | 8669163542

अक्षय शेलार प्राध्यापक आणि चित्रपट समीक्षक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results