
आपल्याकडे एकंदरितच वाचनाचं प्रमाण कमी आहे. जे लोक वाचतात तेही फार कसदार वाचण्याच्या भानगडीत पडत नाहीत. लेखकांच्या प्रेमात पडून पुस्तकं शेल्फमध्ये ठेवण्याकडेच त्यांचा कल असतो. हा चक्रव्यूह लेखकही भेदताना दिसत नाही.असं का होतंय? वाचनसंस्कृती जोपासण्याची-वाढवण्याची जबाबदारी नेमकी कुणावर आहे आणि ते घटक ही जबाबदारी पार पाडताहेत की नाही, याची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न ‘अनुभव’ मासिकाने १२ वर्षांपूर्वी एका लेखमालिकेतून केला होता. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यातले निवडक लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. आज एका तपानंतर वाचनसंस्कृतीच्या परिस्थितीत काही बदल झाला आहे का हे वाचकांनी ताडून बघावं.
वाचणारे लोकच वेगळे असतात. वाचन या प्रकाराची थोरवी कोणी तरी त्यांना पटवून दिली आहे म्हणून काही त्यांनी वाचनाचा छंद स्वत:ला जडवून घेतलेला नसतो. छंद हा प्रकार कोणी जडवावा लागत नाही. वाचनाची आवड व्यक्तीत मूलत: असावी लागते. निव्वळ वाचनानंद हीच तिच्या वाचनामागची प्रेरणा असते. आजच्या तरुणाला कदाचित ही निरपेक्ष, निर्भेळ भावना समजणार नाही, कारण गेल्या दोन दशकांत उपयुक्तता नावाच्या मूल्याने कलेच्या सर्व व्यवहारांत शिरकाव केला आहे. वाचनक्षेत्रही त्यामधून सुटलेलं नाही. वाचायचं कशासाठी? वाचनामुळे आपल्या करियरला मदत होणार आहे का, आपल्याला नोकरीमध्ये त्यामुळे प्रमोशन वगैरे मिळणार आहे का, परदेशी जाण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. वस्तूच्या उपयुक्ततामूल्यावर आवडीनिवडी बेतल्या जाऊ लागल्या आहेत.
वाचणारे आणि न वाचणारे अशा दोन गटांत आपलं जग विभागलं आहे.
इतर देशांचं वास्तव ठाऊक नाही, पण आपल्या देशात आणि खासकरून मराठी भाषकांचा विचार केला तर पहिल्या गटातली माणसं अल्पसंख्य आहेत. अनेकांचा असा समज आहे, की टीव्ही माध्यमाचं जाळं देशभर पसरल्यापासून आपल्याकडे वाचन या प्रकाराला ओहोटी लागली आहे. वस्तुस्थिती पाहिली तर लक्षात येईल, की वाचनासंदर्भातली अनास्था ही काही अलीकडली गोष्ट नाही. चार दशकांपूर्वीची स्थिती पाहू. शाळेत आमच्या वर्गात पुस्तकं वाचणारी मुलं होती सात-आठ. बाकीची मुलं शाळेने लावलेल्या क्रमिक पुस्तकांखेरीज दुसरं काही हातात घ्यायची नाहीत. त्यातही कल मूळ क्रमिक पुस्तकांपेक्षा साररूपाने त्यातला आशय सांगणारी गाइड वाचण्याकडे. शाळेत छोटेखानी लायब्ररी होती. आम्ही सहा-सातजण मधल्या सुट्टीत लायब्ररीत जाऊन वाचत असू. तिथून ये-जा करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना आम्ही आत बसून काय वाचतोय याचं थोडंही कुतूहल नसायचं. काहींना अशा प्रकारची लायब्ररी आपल्या शाळेत आहे याचाही पत्ता नव्हता. आम्ही शाळेत होतो तेव्हा कुठला आलाय टेलिव्हिजन?
कॉम्प्युटरचा तर ‘क'देखील तेव्हा कुणाला ठाऊक नव्हता.
टीव्हीशून्य, कॉम्प्युटरशून्य, इंटरनेटशून्य असा हा कालखंड; पण वाचनाची स्थिती ही अशी.
आता या काळातल्या वाचनशून्यतेचं समर्थन करण्यासाठी कोणत्या सबबी पुढे करायच्या? शंभरात बारा विद्यार्थी वाचनप्रेमी. संपूर्ण देशात पंधरा ते वीस टक्वे लोकांच्या हातात पुस्तकं. टीव्हीसारख्या नव्या माध्यमाचं आगमन झाल्यामुळे वाचनप्रेमींचं लक्ष काही प्रमाणात वाचनापासून विचलित झालं असेल, नाही असं नाही; पण त्याचा वाचनसंस्कृतीवर परिणाम घडून यावा इतकं काही ते मोठं नव्हतं. टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट या निव्वळ सबबी आहेत.
समाजातली वाङ्मयाविषयीची कमालीची अनास्था केवळ अनाकलनीय आहे. अक्षरओळख असूनही अक्षरांशी वैर करण्याची वृत्ती इथल्या समाजाच्या अंगी फार पूर्वीपासून भिनली आहे. शंभरातले साधारण केवळ पंधरा लोक आवडीने पुस्तकं वाचतात.
कालही जवळजवळ तितकेच लोक पुस्तकं वाचायचे. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे म्हणून शोकसभा घेऊन आसवं ढाळण्याचे प्रकार अलीकडे खूप चालतात. गंमत अशी, की या शोकसभांत स्वत: पुस्तक हातात न धरणारे निर्वाचनी लोकही असतात. या मंडळींना जाहीरपणे भोकाड पसरून रडताना पाहिलं की समाजात बोकाळलेल्या दांभिकतेची कल्पना येते.
वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो, त्याचं जीवन वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतं अशी सर्वसाधारण समजूत आहे; पण या समजुतीच्या खरेपणाविषयी शंका वाटावी असं भोवतालचं वातावरण आहे. वैचारिकदृष्ट्या समृद्धी ही काय चीज आहे? माणसाचा सुसंस्कृतपणा नेमका कशात दडलेला आहे? सुसंस्कृत माणसांचा सुशिक्षितपणा समाजातल्या खालच्या थरातील माणसांशी बोलताना कुठे जातो? वाचन म्हणजे तरी नेमकं कशाचं वाचन? माणसाला बदलून टाकायचं सामर्थ्य खरोखरच वाचनात आहे का?- या प्रश्नांशी न भिडता आपण आपलं सतत घोकत आलो आहोत, की वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. वाचणारी माणसं सुसंस्कृतपणे वागतात आणि न वाचणारे असंस्कृत वर्तन करतात, असं काही आहे का?
अफाट वाचन असलेली काही माणसं इतर व्यक्तींशी अत्यंत तुच्छतेने वागताना आपण पाहतो. समाजात वावरताना लागणारं किमान सौजन्यही त्यांच्यापाशी नसतं. समाजवास्तवाशी ती कायम फटकून वागताना दिसतात. वाचनामुळे माणसापाशी शहाणपण गोळा होतं, हा केवळ भ्रम आहे असं वाटावं अशी स्थिती आहे. तुलनेने वाचनाशी अर्थाअर्थी संबंध नसलेल्या खेडूत शेतकऱ्यापाशी, शहरी कामगारापाशी बऱ्यापैकी सौजन्य आणि शहाणपण आढळतं. अतिवाचनामुळे माणसात उद्धटपणा, अहंकार आणि तुच्छताभाव निर्माण होतो की काय? तो माणूसघाणा आणि गर्विष्ठ बनून जातो की काय? प्रचंड वाचन-व्यासंग असलेल्या बुद्धिमंतांच्या जवळ गेलं की असे प्रश्न पडायला लागतात.
तरी पण वाचनसंस्कृतीबद्दल असलेली प्रचलित पारंपरिक समजूत आपण काही काळ खरी मानू या. वाचनाने व्यक्तीवर मूल्यात्मक संस्कार होतात, साहित्यातील विचारदर्शनाने वाचक अधिक सुसंस्कृत होतात, त्यांच्या वैचारिक समृद्धीत भर पडते, हे सर्व खरं आहे असं गृहीत धरून चालू या आणि वाचनविश्वाकडे थोडं सकारात्मकपणे पाहू या.
काय नजरेला पडतं?
समाजातल्या चार घटकांनी हे विश्व घडवलं आहे. लेखक, प्रकाशक, समीक्षक, वाचक हे वाचनविश्वाचे मुख्य घटक आहेत. आपण ज्याला वाचनसंस्कृती म्हणतो ती या चार घटकांच्या संयुक्त व्यवहारातून आकाराला येते. या घटकांचं परस्परांशी असलेलं नातं काय स्वरूपाचं आहे? एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत? लेखक वाचकांकडे कशा प्रकारे पाहतो? वाचक लेखकांकडे कसं पाहतो? या गोष्टी नीट तपासायला पाहिजेत. अनेक मान्यवर साहित्यिक आवर्जून आणि अभिमानाने सांगत असतात, वाचक डोळ्यांसमोर ठेवून आम्ही लिहीत नाही. म्हणजे या लेखकांना वाचक नको असतात असं नाही, पण त्यांना ते आपल्या प्रतिभेच्या आड यायला नको असतात. या लेखकांच्या मते वाचक अनुनयावर आधारलेलं कोणतंही लेखन हे हीन दर्जाचं असतं. आपल्या प्रतिभेशी प्रामाणिक राहणं हे त्यांना लेखक म्हणून आपलं प्रथम कर्तव्य वाटतं.
साहित्यात लोकप्रिय असलेला दुसरा लेखकवर्ग याच्या उलट म्हणजे वाचकाभिमुख भूमिका घेऊन लेखन करतो. वाचकांचं समाधान हाच आपला आनंद, हे तत्त्व तो समोर ठेवतो. वाचक अनुनय करण्यात तो धन्यता मानत राहतो. लेखकांना प्रकाशात आणणारा प्रकाशक हा घटक म्हणजे वाचक आणि लेखक यांच्यामधला दुवा म्हणायला हरकत नाही. प्रत्येक भाषेतील वाङ्मयीन विश्वाची गुणवत्ता लेखकांच्या अभिरुचीइतकीच प्रकाशकांच्या अभिरुची निर्देशांकावर अवलंबून असते. प्रकाशकांच्या या अभिरुचीविषयी सर्व वर्गांत शंका आहे. बव्हंशी प्रकाशक हा वाचकप्रिय लेखकांच्या मागे असल्याचं दृश्य पाहायला मिळतं. अभिरुचिसंपन्न लिखाणापेक्षा आर्थिक हिताला तो अधिक महत्त्व देताना दिसतो. पुस्तकाची निर्मिती हा त्याचा व्यवसाय असतो, वाचक हे त्याचे ग्राहक असतात, आणि त्यांच्या आवडीनिवडींविरुद्ध जाऊन व्यवसायात धोका पत्करायला तो तयार नसतो. साहित्याची उत्तम समज असलेले प्रकाशक मराठी साहित्य व्यवसायात आहेत. व्यावसायिकता सांभाळून दर्जेदार ग्रंथांची निर्मिती करण्याची त्यांची धडपड चालू असते. व्यापार आणि कला यांचा संगम यशस्वीपणे साधणारे हे प्रकाशक आहेत.
वाङ्मयीन मूल्याच्या आकलनाची आणि साहित्यातले नवे प्रयोग समजण्यासाठी आवश्यक असलेल्या बौद्धिक प्रगल्भतेची अपेक्षा आपण प्रत्येक प्रकाशकाकडून मात्र करू शकत नाही. पण अनेक प्रकाशकांपाशी ही समज नसली तरी समकालीन वाचक अभिरुचीची मात्र त्यांना बऱ्यापैकी जाण असते. वाचकाच्या मानसिकतेत आणि आवडीनिवडीत होणाऱ्या बदलांकडे त्यांचं काटेकोर लक्ष असतं. वाचकांचा एकूण वाचनकल जोखून पुस्तकनिर्मिती करण्याची वृत्ती या मंडळींत अधिक असते. लेखक आणि प्रकाशकातल्या या वाचक अनुनयवृत्तीचा परिणाम साहित्याच्या दर्जावर होत असतो.
सुमार दर्जाचा वाचकवर्ग मोठ्या संख्येने असल्याने त्याला रुचेल, मानवेल असं सुमार दर्जाचं साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत राहिलं तर त्यात आश्चर्य नाही. लोकांना आपल्या लायकीप्रमाणे सरकार मिळतं, तसं वाचकांना त्यांच्या लायकीनुसार साहित्य मिळतं, असं बोलणं कदाचित वाचकांची अवहेलना करणारं ठरेल, पण हे कटू वास्तव नजरेआड करून आजच्या वाचनसंस्कृतीवर बोलता येणार नाही. मराठी साहित्याच्या आजच्या दर्जाला मराठी वाचक मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.
अर्थात तो एकटा या स्थितीला जबाबदार नाही.
प्रत्येक भाषिक वर्तुळातली वाचनसंस्कृती त्या भाषेतल्या प्रकाशकांच्या अभिरुची निर्देशांकावरही तितकीच अवलंबून असते. हुशार आणि जाणकार प्रकाशक वाचकांच्या वाङ्मयीन अभिरुचीला चांगलं वळण देऊ शकतो आणि त्या समाजात अभिरुचिसंपन्न वातावरण निर्माण करू शकतो. मराठी साहित्यात अल्प प्रमाणात का होईना, असे प्रयत्न झाले आहेत. आजही प्रतिकूल वातावरणात साहित्याला वेगळं वळण देणारी काही पुस्तकं निघताहेत. पण हे अपवाद म्हणावे लागतील. वाचकानुनयाचं धोरण या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतं. मोठ्या संख्येने असलेले सुमार वाचक मराठी प्रकाशकांचे ग्रंथव्यवहार नियंत्रित करताहेत अशी दृश्यं आपल्या साहित्यविश्वात जागोजागी पाहायला मिळतात. कोणत्याही समाजातल्या वाचनसंस्कृतीची गुणवत्ता ही अशा प्रकारे मुख्यत्वे त्या समाजातल्या वाचकांच्या गुणवत्तेशी अप्रत्यक्षपणे संबंधित असते.
लेखनाचे विषय, ते मांडायची शैली यातून लेखकाचं वाचकांशी एक नातं तयार होत राहतं, सूर जुळून येतो. प्रत्येक लेखकाने अशी नाती निर्माण केली आहेत आणि आपल्या वाचकांचा एक गोतावळा निर्माण केला आहे. लेखक आपला हा वाचकवर्ग धरून असतो तसा वाचकही आपले लेखक धरून असतो. मग लेखन व्हायच्या आधीच वाचकांच्या मागण्या नोंदवल्या जातात आणि पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशनाच्या आधीच संपते. चित्रकार हुसेन यांच्या चित्रांचे कोरे कॅनव्हासही विकले जात, तसाच हा प्रकार आहे. हे भाग्य अर्थात फार थोड्या मराठी लेखकांच्या वाट्याला येतं, आणि ज्यांच्या वाट्याला येतं त्यांच्या पुस्तकाची आवृत्ती हातोहात संपली याचा अर्थ ती साहित्यकृती फार दर्जेदार असते असं नाही.
पण प्रत्येक लेखक एका विशिष्ट वाचकगटाचा लाडका लेखक असतो. अनेकदा गीता किंवा ज्ञानेश्वरी खरेदी करावी तसा हा वाचकगट त्याच्या आवडत्या लेखकाची पुस्तकं खरेदी करून आपल्या घरच्या बुकशेल्फची शोभा वाढवतो. वाचनसंस्कृतीचा पूर्ण अभाव असणाऱ्या घरात संस्कृतिकोशाचे खंड असतात. कोणाकडे किती पुस्तकं आहेत यावर त्याच्या वाचनआवडीचा अंदाज घेता येत नाही.
वाचनाचं खरंखुरं वेड असणारा एक लहान वर्ग प्रत्येक समाजात असतो. या वर्गात प्रामुख्याने साहित्याचे विद्यार्थी, समाजशास्त्राचे अभ्यासक, लेखक, समीक्षक असतात. या गटातल्या वाचकांची संख्या कमी असली, तरी त्यांच्यापैकी समीक्षक-अभ्यासकांना आपण समाजाचं बौद्धिक, साहित्यिक नेतृत्व करतो आहोत असे भास होत असतात. काहीजण तसं नेतृत्व करतही असतात. मराठी साहित्य या विषयापुरतं बोलायचं झालं तर मध्यमवर्गी सवर्णांचा हा गट आहे. पस्तीस वर्षांपूर्वी दलित साहित्याची लाट आली होती. त्या लाटेत हे सर्व मध्यमवर्गी दलितेतर लेखक वाहून जातील की काय असं वाटलं होतं; पण तसं काही घडलेलं दिसत नाही. दलित साहित्याची लाट आता ओसरल्यातच जमा आहे. नाही म्हणायला काही मोजके दलित कथा-कादंबरीकार, कवी आज टिकून आहेत. जे आहेत ते साहित्यात आघाडीच्या स्थानावर आहेत यात शंका नाही. निव्वळ साहित्यिक गुणवत्तेवर त्यांनी प्रतिष्ठित वाङ्मयीन पुरस्कारही मिळवले आहेत. पण दलित साहित्याचा मोठा प्रवाह खंडित झाला आहे. दलित साहित्याच्या आगमनाने वाचनसंस्कृतीला मोठी चालना मिळाली होती.
ग्रामीण भागात नवा मराठी वाचकवर्ग तयार झाला असल्याचं तेव्हा बोललं जात असे. तसा तो खरोखरच आहे. आज त्याचं संख्याबळ फार मोठं नसलं तरी शहरी वाचकाच्या तुलनेत जास्त आहे एवढंच म्हणता येईल. मराठी प्रकाशकांच्या दृष्टीने सेन्सेक्स वधारल्यासारख्या या बातम्या असतात. या नव्या वातावरणाची व्यावसायिक दखल घेऊन काही प्रस्थापित प्रकाशनगृहांनी ग्रामीण आणि दलित साहित्यकृतींना आता आपल्या प्रकाशन प्रकल्पात स्थान द्यायला सुरुवात केली आहे. नव्याने साक्षर झालेला ग्रामीण समाज, ग्रामीण महाविद्यालयातून बाहेर पडलेले पदवीधर यातून हा नवा वाचकवर्ग निर्माण झाला आहे हेही खरं आहे. शहरातला वाचकवर्ग आंग्लाळलेला असल्याने मराठी वाचक मिळवण्यासाठी शहरी प्रकाशकांनी आता ग्रामीण भागाकडे वळलं पाहिजे. पण शहरी प्रकाशकांचे त्यांच्यापर्यंत पोचण्याचे प्रयत्न वा योजना दिसत नाहीत. नव्या लेखकांच्या लेखनाकडे त्यांचं फारसं लक्ष नाही. अजूनही त्यांच्या लेखक-यादीत साठोत्तरी लेखकांची नावं दिसतात. सभा-समारंभात त्यांनी निवडलेल्या वक्त्यांवरूनही त्यांचं वाचन कोणत्या कालखंडात अडकून पडलं आहे, हे सतत समोर येत राहतं. नव्या लेखकांना पुरस्कार मिळाला की या प्रकाशकांचं त्याच्याकडे लक्ष जातं. मराठी साहित्यात नव्यांची परवड समीक्षाक्षेत्रातही मागील पानावरून पुढे चालू आहे.
पुरस्कार मिळाल्याविना समीक्षकांनाही नव्या लेखकांची थोरवी कळत नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे आणि समीक्षकाच्या वाङ्मयीन पातळीवर प्रतिकूल भाष्य करणारा आहे. पुस्तक आणि वाचक यांच्यात मैत्रीपूर्ण नातेसंबंध निर्माण करायची जबाबदारी समीक्षकावर असते. पण आजची समीक्षा वाचली की समीक्षक हा घटक वाचक आणि पुस्तक यातली समृद्ध अडगळ बनून गेला आहे की काय असं वाटायला लागतं. समीक्षकांचं पुस्तकांशी जवळचं नातं असायला हवं; पण प्रत्यक्षात ते असतं लेखकांशी. समीक्षेतून अनेकदा समीक्षकांच्या लेखकांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांचं दर्शन घडतं. समीक्षकांचं प्रकाशकाशी जे नातं असतं त्याची तुलना औषधांचे दुकानदार आणि औषध कंपन्यांचे सेल्समन यांच्याशी करता येईल. साहित्याच्या दुनियेतल्या या सगळ्या व्यावसायिक नात्यागोत्यांत एकमेकांशी वेगळेच हितसंबंध गुंतले असतील तर ते संबंध वाचनसंस्कृतीच्या वर्धनाच्या आड येणार नाहीत तर काय? आधीच मराठी वाचनसंस्कृती दिवसेंदिवस संकुचित होत चालली आहे, त्यात या साहित्यसृष्टीत सुमारांची ही बेसुमार सद्दी.
जे प्रगल्भ साहित्य तयार होतं ते वाचलं जात नाही. लहान वर्तुळात ते गौरवलं जातं. या साहित्यकृतींना पुरस्कार मिळतात पण वाचक मिळत नाहीत, अशी आज तरुण आणि सुजाण लेखकांची आणि त्यांच्या लेखनाची अवस्था आहे.
म्हणजे आपण शेवटी वाचकांची साहित्यिक समज वाढवण्याच्या मुद्द्याशी येऊन पोहोचतो. विशिष्ट भाषिक समाजात किती लोक वाचतात याच्याइतकंच ते काय स्वरूपाचं लेखन वाचू पाहातात, कोणत्या गटातले लोक काय वाचतात, कोणत्या प्रकारचं वाङ्मय स्त्रियांत वाचलं जातं, वेगवेगळ्या आर्थिक गटांच्या वाचनाच्या आवडीनिवडी भिन्न असतात का याचा रीतसर अभ्यास व्हायला पाहिजे. साहित्य संमेलनात इतक्या कोटी रुपयांची पुस्तकं विकली म्हणजे वाचनसंस्कृती फोफावली गेली, असं मानून नाचण्यात अर्थ नाही. कोणती पुस्तकं काय प्रमाणात विकली गेली, कोणत्या पुस्तकांना वाचनप्रेमींनी स्पर्श केला नाही याचा तपशील जाहीर व्हायला पाहिजे.
आज समाजातल्या एका मोठ्या समूहात वाचन चालतं ते पोथ्या-पुराणाचं, इतिहासाचं. वर्तमानकालीन भकास, नैराश्यमय वातावरणामुळे भूतकाळाला कवटाळून बसण्याची ही वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. समाज केवळ इतिहास वाचत राहील तर त्याला नवं काही दिसणं, समाजात नवे विचार रुजणं याची शक्यता मंदावत जाते. वाचणारा जो लहानसा समाज आहे त्याची अवस्था अशी असेल तर तो डोळ्यांसमोर ठेवून वाचनामुळे समाजाचं प्रबोधन होतं, समाज शहाणा होतो, अशा वल्गना करणं म्हणजे आत्मवंचना करून घेणं. वाचणारे समाजाला मार्गदर्शन करतात हे खरं मानलं तर अशा प्रकारच्या वाचनावर पोसलेले पंडित समाजाला कुठे घेऊन जाणार, काय प्रकारचं प्रबोधन करणार, हा प्रश्न निर्माण होतो.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी केव्हा तरी वाचक-लेखक-समीक्षक-प्रकाशक यांनी एकत्रितपणे एक संमेलन भरवावं आणि त्यात एकमेकांना वचनामृत पाजण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं. काहीही म्हटलं तरी या मंडळींच्या सु-समन्वयावरच उद्याच्या वाचनसंस्कृतीचं भवितव्य अवलंबून आहे. समकालीन साहित्याचं चित्र हे लोक मिळून रेखाटतात हे आपण विसरता कामा नये. काळाशी जुळवून घेता आलं नाही म्हणून एकापाठोपाठ एक संस्कृती झपाट्याने नष्ट होत चालल्या आहेत. अस्तंगत होत चाललेल्या या संस्कृतींमध्ये आणखी एका संस्कृतीची भर पडू नये अशी इच्छा असेल तर या संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या समाजघटकांनी व्यक्तिगत हित आणि व्यावसायिक नफ्याचं गणित यांच्या पलीकडे पाहून काही परिवर्तनशील निर्णय घेतले पाहिजेत. एकूण वाङ्मयीन व्यवहारात आधुनिकता आणल्याखेरीज वाचनसंस्कृतीत चैतन्य आणण्याच्या वल्गना व्यर्थ ठरतील.
आधुनिकता या शब्दाचा उच्चार झाला की आपल्यापैकी अनेकांना संगणक आठवतो. संगणकाच्या पडद्यावर का होईना, मुलं वाचताहेत ना, काही तरी लिहिताहेत ना, या भावनेने सुखावणारा एक गट आपल्यात आहे. पण या मुलांनी लिहिलेला चॅट, फेसबुकवरला मजकूर वाचला की या प्रभावी माध्यमांचा आपल्याकडे किती बालिश विनियोग चालला आहे हे जाणवतं. माध्यम महत्त्वाचं नाही, अभिव्यक्ती महत्त्वाची हे सगळं खरं. पण अभिव्यक्ती थोडी वरच्या इयत्तेतली असायला काय हरकत आहे?
संगणकपटावरचं आजचं वाङ्मय पाहिलं की वाचनसंस्कृतीच्या भवितव्याविषयी चिंता वाटू लागते, पण त्याचबरोबर या प्रतिकूल वातावरणातही नव्या माध्यमाचा चतुर उपयोग करून तरुणवर्गातलं एखादं पुस्तकप्रेमी मित्रमंडळ एक दिवस वाचक चळवळ उभी करू शकेल, अशी आशाही वाटते. अर्थात हे मित्रमंडळ म्हणजे फेसबुकातले फ्रेण्ड नव्हे. फेसबुक फ्रेण्ड संगणकासमोर झुकलेली आपली मान वर उचलून असं काही करू शकतील, असं आज तरी वाटत नाही.