आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

हेतूपासून भरकटलेला साहित्यमेळा

  • वसुंधरा पेंडसे-नाईक
  • 22.02.25
  • वाचनवेळ 10 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
zadazadati sahitya sammelan

आपली वाचनसंस्कृती दिवसेंदिवस आक्रसत चालली असल्याची तक्रार सतत होत असते. वाचनसंस्कृती जोपासण्याची-वाढवण्याची जबाबदारी नेमकी कुणावर आहे आणि ते घटक ही जबाबदारी पार पाडताहेत की नाही, याची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न ‘अनुभव’ मासिकाने १२ वर्षांपूर्वी एका लेखमालिकेतून केला होता. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना लिहितं केलं होतं. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यातले निवडक लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. आज एका तपानंतर वाचनसंस्कृतीच्या परिस्थितीत काही बदल झाला आहे का हे वाचकांनी ताडून बघावं. साहित्यविषयक विचारांची देवाणघेवाण व वाचनसंस्कृतीची जोपासना हे साहित्य संमेलनाचे मूळ हेतू. पण सध्याची साहित्य संमेलने या हेतूपासून भरकटलेली दिसतात.

मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवण्याची कल्पनाच मुळी साहित्यविषयक विचारांची देवाणघेवाण करणे आणि वाचनसंस्कृती वाढवणे ही होती. १८७८ पासून हीच कल्पना पुढे चालू राहिली आहे, पण तिचा आविष्कार बदलत गेला. साहित्य-संस्कृतीच्या या महोत्सवासाठी आयोजकांकडे स्वत:ची आर्थिक पुंजी नव्हती. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे, सरदार यांच्याकडून अ. भा. मराठी साहित्य संमेलानाची आर्थिक सोय व्हायची. आता ती भूमिका स्थानिक राजकारणी किंवा धनिक बजावताना दिसतात. मग आदरातिथ्याचा भपका करण्यात अहमहमिका लागते आणि त्यात संमेलनाचा मूळ हेतू पातळ होताना दिसतो आहे.

पूर्वीच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनांचे स्वरूप पाहिले की लक्षात येईल, साहित्य संमेलन म्हणजे गांभीर्य आणि मनोरंजन यांचा मेळ असे. अध्यक्षीय भाषण साहित्य-संस्कृतीविषयक विशिष्ट भूमिका मांडणारे आणि विचारांना दिशा देणारे असे, पण अन्य कार्यक्रमांत तसा आग्रह नसे. त्यामुळे साहित्य संमेलन हा ज्ञान-रंजनाचा सुरेख मेळ साधणारा उत्सव असे. पण काही गोष्टी रुंदावत जाताना त्याची रुंदी ज्यामानाने वाढत जाते त्यामानाने उंची वाढत नाही. तिथे जरा गडबड होते. हा मेळ बिघडतो, म्हणजे त्याचे प्रमाण बदलते. तसे काहीसे आता होत असताना दिसते. त्यातून वाचक हा जो या व्यवहाराचा केंद्रबिंदू, तो दुर्लक्षित होतो. संमेलनांना वाचक मोठ्या उत्साहाने येतात. जेथे संमेलन असते त्या आसपासच्या गावांतील वाचक मोठ्या उमेदीने येतात. पुस्तकांच्या मांडवात रमतात. पुस्तकांनी भरलेल्या मोठ्या पिशव्या घेऊन फिरताना ते दिसतात. या उत्साही वाचकांना समृद्ध करणारे, त्यांची अभिरुची वाढवणारे विचार आपण किती देतो याचा विचार संमेलन-आयोजकांनी गांभीर्याने केला पाहिजे. म्हणजे वरवर बघता आपण हल्ली एका मांडवाखाली चार-चार व्यासपीठे थाटतो, चौपट विषयांची चर्चा होते; पण किती खोलात मंथन होते, किती थेट भूमिका किंवा संदेश पोहोचवला जातो याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. बऱ्याच विषयांना स्पर्श करण्यात समाधान मानले तर वाचकांची उंची कशी वाढेल? दर्दी वाचकांचे समाधान कसे होईल? मुळात अ. भा. मराठी साहित्य संमेलनासारख्या मोठ्या मानाच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली आहे, तर मी अभ्यासपूर्ण बोलीन, गांभीर्याने घेईन, असे प्रत्येक वक्त्याने ठरवले तरच श्रोत्यांना नवे विचार देणारे काही तेथे मांडले जाईल. आज तरी असा दृष्टिकोन ठेवणारे अपवादानेच सापडतात. त्यामुळे या व्यासपीठावरून श्रोत्यांच्या विचारांना नवी दिशा मिळणे क्वचितच घडते.

संमेलनाकडून एकंदर समाजाच्या अपेक्षा असतात. समाज आणि साहित्य हे दोन्ही प्रांत एकमेकांच्या हातात हात घालून चालत असतात. समाजाचे प्रश्न साहित्यात उमटतात, साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेवर पगडा घालतात. साहजिकच त्याचे प्रतिबिंब संमेलनात उमटते. पूर्वीपासून ही परंपरा आहे. म्हणजे बघा, १९३१-३२ मध्ये स्वा.सावरकरांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आणला तो अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्याच व्यासपीठावरूनच. समाजाला व्यापणारे विषय साहित्य संमेलनात चर्चिले जाण्याची प्रक्रिया आजही चालू आहे, नाही असे नाही. उदाहरण द्यायचे तर मला आठवतंय, मी १९९९ ते २००१ या काळात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची अध्यक्ष होते. तेव्हा त्या वेळचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या अकरावी-बारावीला मराठी विषयाला माहिती तंत्रज्ञान हा विषय पर्याय देण्याच्या निर्णयावरून वाद चालला होता. आम्ही तो विषय साहित्य संमेलनात चर्चेला घेतला होता. त्यावर खडाजंगी चर्चा संमेलनाच्या व्यासपीठावरून झाली होती. त्या वेळी रामकृष्ण मोरे यांनी एक मार्मिक प्रश्न त्या व्यासपीठावरून मराठी साहित्यिकांना विचारला होता. त्यांच्या विचारण्याचा आशय असा होता, की ‘आमच्या ग्रामीण भागातील मुलांनी ‘कुरणावरती वडाखालती गायी वळत बैसतो' अशा कविता म्हणत कायम गुरे वळत बसायचे आणि तुमची मुले मात्र श्रीमंत इंग्रजी शाळेतून शिक्षण घेऊन अमेरिकेकडे वळणार. असे किती काळ चालू द्यायचे?' काही मराठी साहित्यिक “माझी नात माझी कथा वाचत नाही, तिला मराठी वाचता येत नाही,' असे कौतुकाने सांगण्यात धन्यता मानतात, आणि श्रोतेही अशी वक्तव्ये निमूटपणे ऐकून घेतात! साहित्यिकांनाच मराठीची आस्था कमी झाली असेल, तर मग सर्वसामान्य समाजाला का दोष द्यायचा?'

नव्या पिढीला साहित्य संमेलनात रुची वाटत नाही, याचं एक महत्त्वाचं कारण त्यांच्या परिघातले विषय आपण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्राधान्याने घेत नाही. वर्षानुवर्षे संतसाहित्याबद्दल बोलून कसे चालेल? नवे, ताजे विषय चर्चेला घ्यायला पाहिजेत. अलीकडच्या काळात काही संमेलनांत समकालीन विषयांवर परिसंवाद झाले आहेत. उदाहरणं द्यायची झाली, तर न्यायव्यवस्थेत मराठीचा अंतर्भाव, मराठी शाळांचे प्रश्न, संगणक वापरातील मराठीची स्थिती, चाकोरीबाहेरच्या विषयांची मराठी साहित्यातील हाताळणी, जागतिकीकरण, चंगळवाद, औद्योगिकीकरण (सेझ) अशा विषयांचे मराठी साहित्यात पडणारे प्रतिबिंब, प्रसारमाध्यमातील मराठीचा बदलता चेहरा, असे अनेक विषय चर्चिले गेले; पण त्यातले काही विषय गेली अनेक वर्षे परत परत चर्चेला येताना दिसतात. ही पुनरावृत्ती टाळली पाहिजे. यापैकी काही विषयांवर संमेलनांतून भूमिका घेतली गेली. ठराव झाले, पण गुळमुळीतपणे. त्या ठरावांचा पाठपुरावा होत नाही. ते ठराव म्हणजे नुसती औपचारिकता झाली आहे. त्यांचे पुढे काहीच होताना दिसत नाही. वाचकांच्या-रसिकांच्या अपेक्षा असतात, की साहित्य संमेलानासारख्या व्यापक आणि महत्त्वाच्या व्यासपीठावरून काही ठरवले जातेय ते प्रत्यक्षात यावे. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे कोणी मनावर घेत नाही याचा खेद वाटतो.

साहित्य संमेलन हा सरस्वतीचा उत्सव असतो. तिथे साहित्यविषयक चर्चा, ग्रंथप्रदर्शन अशी मेजवानी वाचकांना मिळते. एकाच ग्रंथप्रदर्शनात राज्यभरातून आलेल्या अनेक प्रकाशकांची दालने असतात. शासकीय प्रकाशनेही असतात. भरपूर पुस्तके बघायला मिळतात. पण साहित्यिक तेथे येऊन वाचकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताहेत, असे चित्र क्वचितच दिसते. बहुतांश साहित्यिक मंडळी साहित्य संमेलनाला येतच नाहीत. ज्यांचा कार्यक्रमात सहभाग असतो तेवढेच साहित्यिक संमेलनाला येतात. बाकीचे कित्येक साहित्यिक फिरकतही नाहीत. खरे तर साहित्य संमेलन ही साहित्यिकांसाठी त्यांच्या वाचकांना वर्षातून एकदा तरी थेट भेटण्याची अपूर्व संधी असते. पण तरी त्यांना इतकी अनास्था का? वाचकभेटीच्या संधीचा लाभ उठवावा असे साहित्यिकांना का वाटत नाही? त्यांची वाचकांशी इतकी बांधिलकी का नसावी?

अलीकडच्या काही वर्षांत तर ग्रंथ प्रदर्शनाच्या मांडवातून कुरबुरी ऐकू येतात. नागपूर, ठाणे येथील संमेलनांत तर ग्रंथप्रकाशक, विक्रेते आणि आयोजक यांच्यात हमरीतुमरीचे प्रसंग घडले. ग्रंथ प्रकाशक आणि आयोजक यांच्यात अशी दुही का निर्माण झाली? कुठे गेला ग्रंथप्रसाराला चालना देण्याचा मूळ हेतू? नेमक्या काय त्रुटी राहताहेत म्हणून असे प्रकार घडताहेत? ग्रंथप्रसारकांना समाधानकारक वातावरण का मिळत नाहीये? याचा नीट विचार व्हायला हवा. संमेलनापूर्वी ग्रंथ-प्रकाशकांना भेटून त्यांच्या अपेक्षांबद्दल चर्चा केली तर असे प्रकार टाळता येतील. संमेलनात नवीन प्रकाशनांसाठी खास व्यासपीठ ठेवता येईल. गेल्या वर्षी ठाण्याच्या संमेलनात अशा प्रकारचा प्रकाशन कट्टा होता. तिथे किती तरी प्रकाशने सतत होत राहिली होती. लहान मुलांच्या साहित्याची प्रकाशनेही तेथे झाली होती. असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले तर संमेलनाला जमलेल्या वाचकांना नवीन पुस्तकांची ओळख होऊ शकेल. प्रकाशकांनाही लगेच वाचकांपर्यंत पोहोचता येईल. तसेच संमेलनात समकालीन विषयांवरील परिसंवाद आणि नवे विषय हाताळणारे नवे लेखक अधिक प्रमाणात असतील, असे पाहायला हवे. तसेच अशा परिसंवादात त्या विषयांवरील पुस्तकांची दखल मुद्दाम घेतली तर श्रोत्यांना त्या पुस्तकांचा परिचय होऊ शकतो.

साहित्य संमेलनातून वाचनसंस्कृती रुजावी अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त होताना दिसते. पण एक लक्षात घेतले पाहिजे, की वाचनसंस्कृतीची रुजवात कधी अशा २-४ दिवसांत होऊ शकत नाही. वाचनसंस्कृती मुळात घरातून निर्माण व्हावी लागते. ज्यांच्या घरी पालक वाचताना दिसतात किंवा मुलांना वाचण्यासाठी प्रोत्साहन देतात, ती मुलं वाचतात. वाचनाचा संस्कार असलेल्या व्यक्तींना साहित्य संमेलनासारख्या निमित्तातून अधिक चालना मिळू शकते, नवे आणि वेगळे काही वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. साहित्य संमेलनाचे वातावरण छान असते. त्याचा परिणाम म्हणून वाचकांना अधिक पुस्तके घेण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

एकाच संमेलनात चार-चार मांडव घालून वेगवेगळे चार कार्यक्रम एकाच वेळी ठेवण्याचा जो प्रघात गेल्या काही वर्षांत पडला आहे त्याचा पुनर्विचार व्हावा असे मला वाटतं. कारण त्यामुळे रसिकांना एका वेळी एकाहून अधिक ठिकाणी आकर्षक वाटतील असे कार्यक्रम असू शकतात त्यांची पंचाईत होते. शिवाय साहित्यिक, साहित्य रसिक विखुरले जातात. त्यापेक्षा एका वेळी एकच कार्यक्रम असायला हवा. मोजके परिसंवाद असावेत. त्यांचे नियोजन नेटके असावे. सहभागी वक्त्याची नीट पूर्वतयारी असावी. त्यांनी पूर्ण तयारीने आणि गांभीर्याने सहभागी व्हावे. म्हणजे दर वेळी मंचावर गंभीर वातावरण असावे, असे माझे म्हणणे नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे, संमेलनात सखोल चर्चा आणि रंजन यांचा मिलाफ असावा, पण जे मांडायचे त्याला खोली असावी, त्यात उथळपणा नसावा. अलीकडे संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबत चालला आहे. त्यात अध्यक्षीय भाषणाला पुरेसा वेळ आणि महत्त्व मिळत नाही. त्यामुळे उद्घाटनाचा सोहळा आटोपशीरच असावा.

आपणाला अनेकदा असे दिसून येते, की साहित्य संमेलने साहित्यबाह्य गोष्टींमुळेच जास्त गाजतात. पण खरे पाहिले तर माध्यमांद्वारेच ती गाजवली जातात. विशेषतः सतत रोचक बातमीच्या शोधात असलेली माध्यमे काही तरी खोदून काढतात, त्या किंचितशा तथ्यात भरपूर हवा भरतात आणि संमेलन गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा बातम्या साहित्य-संस्कृतीच्या प्रसारासाठी विधायक नाही, तर विघातक ठरतात. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाला एखाद्या ‘इव्हेंट'सारखे स्वरूप येत चालले आहे. त्याबरोबर माध्यमांचेही त्याकडे जास्त लक्ष वळले आहे.

आणि एक झाले आहे, साहित्य संमेलनाचा पसारा इतका वाढत चालला आहे की आयोजनाच्या जबाबदाऱ्या अवाढव्य वाढल्या आहेत. साहजिकच त्यात अग्रक्रम चुकू लागले आहेत. आयोजनाचा व्याप सावरताना साहित्यप्रसारासाठी पूरक अशा अनेक बारीकसारीक पण महत्त्वाच्या गोष्टींकडे आयोजकांचे दुर्लक्ष होत आहे.

एकामागोमाग एक भारंभार कार्यक्रम, असे जे स्वरूप सध्या असते त्याचा पुनर्विचार करावा असे वाटते. कार्यक्रमांची संख्या वाढल्याने अनेकदा वेळेचे नियोजन कोलमडते. काही कार्यक्रम उपचारापुरते साजरे केले जातात, कसेबसे उरकले जातात. अशाने सहभागी नाराज होतात आणि रसिकांचा हिरमोड होतो. मोजके कार्यक्रम आणि नेटके आयोजन, असा प्रयोग आता करून बघितला पाहिजे. कार्यक्रमपत्रिकेत काही विषय परत परत येत राहतात. त्याऐवजी नवनवीन विषय आले पाहिजेत.

महामंडळाच्या घटकसंस्थांचे व संलग्न संस्थांचे प्रतिनिधी आणि संमेलनाध्यक्ष यांनी फक्त वर्षातून एकदा हा सोहळा साजरा करणे पुरेसे नसून वर्षभर या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काही कार्यक्रम, उपक्रम करत राहिले पाहिजे असे वाटते. अलीकडे मुख्य संमेलनाच्या आधी महिलांसाठी साहित्य संमेलन होते, विद्यार्थ्यांसाठी संमेलन होते; पण हेही पुरेसे नाही. गावोगावी वाचक वाढत आहेत. साहित्य मंडळांकडून त्यांना सतत काही तरी खाद्य मिळेल असे काम त्यांच्याकडून व्हायला हवे. सर्व स्तरांचे प्रतिनिधित्व संमेलनात असावे. साहित्य महामंडळाने सर्व प्रवाहांतील साहित्यिकांना अगत्याने व आग्रहाने बोलवावे आणि सर्व साहित्यिकांनीही खुल्या मनाने सहभागी व्हावे.

आता मोठ्या शहरांतून मराठीची आस्था कमी होताना दिसते आहे, पण छोट्या शहरांत अजून तसे चित्र नाही. एकंदर वाचकवर्ग वाढतोय, तो खूप बदलतोयसुद्धा. त्याची पुरेशी दखल अजून साहित्य संमेलनांनी घेतलेली नाही. आता कित्येक वाचक नवी माध्यमे वापरत आहेत. नियतकालिके, वृत्तपत्र पुरवण्या, ई-बुक, ब्लॉग यांच्या रूपात आज किती तरी साहित्य निर्माण होतेय, ते आवडीने वाचले जातेय. जो हातात पुस्तक धरून वाचतो तोच वाचक, ही व्याख्या आता बदलली आहे. या आधुनिक वाचकांना आपण आपल्या साहित्य व्यवहारात कसे सामावून घेणार याचा विचार व्हायला हवा.

आज अनेक तरुण विविध आधुनिक माध्यमांतून वेगवेगळ्या विषयांवर लिहीत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र अशा विषयांवर मराठीत लिहिले जात आहे. त्यातून मराठीत नवीन शब्दांची भर पडत आहे. नव्या संकल्पना, नवे विचार साहित्यात येत आहेत. अशा विषयांवर लिहिण्यात रुची असणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेता येतील. या विषयांतील तज्ज्ञ साहित्यिकांचे संवादी कार्यक्रम आयोजित करून बघायला हवेत. मुळात आपली मानसिकता बदलली पाहिजे. साहित्य संमेलनाच्या आयोजनात जरा प्रयोगशीलता आणणे आवश्यक आहे. तोचतोचपणा टाळून त्याला नवे रूप द्यायला हवे.

आणखी एक सुचवावेसे वाटते. अ. भा. मराठी साहित्य संमेलन दर वर्षी घेण्याऐवजी दर दोन वर्षांनी घेतले तर?

साहित्य संमेलन मूळ हेतूपासून दूर सरकले आहे का, याचे व्यवस्थित विश्लेषण करून आता त्याचे पुढचे स्वरूप नव्याने आखण्याची वेळ आली आहे. जरा धाडसाने काही बदल करायला हवेत. नवे प्रयोग करून बघायला हवेत. वाचणाऱ्या नवीन पिढीला सामावून घ्यायचे असेल, वाचनसंस्कृतीची लांबी-रुंदी वाढवायची तर आपली रूढ मानसिकता बदलून नवे प्रयोग करण्याला पर्याय नाही.

वसुंधरा पेंडसे-नाईक







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results