
26-3-2012, सकाळ. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे. पहिला मजला.
आयसीयूच्या बाहेर नेहमीचंच वातावरण. अजून कुणाला काही माहितीय असं दिसत नाहीये. दार उघडून मी आयसीयूच्या आत जातोय.
उजवीकडच्या कोचावर मिथिला बसलेली. गेल्या काही दिवसांतल्या अपार ताणाने ती थकून गेलीय. साहजिकच आहे. ती डॉक्टर. त्यामुळे जे घडतंय ते कळतंय; ते तसं घडू नये अशी मनोमन इच्छा आहे, पण हातात काहीच नाही. केवळ फरफट. जवळच्या माणसाच्या प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा त्याच्या मृत्यूची वाट बघत ताटकळणं अत्यंद क्लेशद. यातना सहन करणारा एकटाच असतो. तो एकटाच जगलेला असतो आणि जाणारही एकटाच असतो, एवढंच सत्य. त्याचं दु:ख वाटून घेणं, त्यात सामील होणं, वेदनांचं ओझं हलकं करणं वगैरे गोष्टी अगदी साफ खोट्या. फार तर, तात्पुरत्या सांत्वनाला, दिलाशाला ठीक. सोबतच्या लोकांना संभाषणात चघळायला बऱ्या; पण आत्ता, या घडीला त्यांचा उपयोग शून्य.... ही जाणीव प्रकर्षाने करून देणारा, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा, रोग्याच्या खोलीबाहेर वाट बघत थांबण्याचा हा कालखंड. रोग्याच्या तब्येतीतल्या छोट्या-मोठ्या चढ-उतारांवर सतत हिंदोळवणारा.
एकीकडे सहन करणाऱ्या माणसाच्या यातना संपाव्यात असं वाटत राहतं, त्याच्या हाल-अपेष्टांनी सतत जीव खंतावतो आणि दुसरीकडे तो माणूस गेला तरी त्याच्या जाण्याचंही वाईट वाटतं. विन-विन सिच्युएशनसारखी ही लूज-लूज सिच्यएशन. काही केलं तरी पदरी फक्त अपयशच. केवळ वाट बघत थांबायचं.
करणार काय?
संपलं आता.
तिच्याकडे बघत मी कसनुसा हसतो. पुढे होत शेजारच्या खुर्चीवर टेकतो. बोलण्यासारखं काहीच नाही. ज्याची अपेक्षा होती, वाट बघत होतो ते घडलं. आता काय सांगणार एकमेकांना?
‘आज खीर दिली दोन चमचे. पेन कमी आहे थोडा... सकाळी लिव्हर फंक्शन टेस्ट झाल्या... भारतीवहिनींचा रोज फोन येतोय... शी इज सो कन्सर्न्ड...! काल रात्री ब्रीदिंग करणंही अवघड झालं होतं... अँड यू नो, ही वॉज सो व्हॉयलंट... आयव्ही, सीव्हीपी सगळ्या नळ्या ओढून काढायला बघत होते. सो ही वॉज टाईड टु द कॉट. आफ्टर इंजेक्टेबल पेनकिलर, देन ही वेन्ट टु... जरा गुंगी आल्यावरही ही वॉज रिसायटिंग करुणाष्टकं. सारखी म्हणत होते ते, आणि ते म्हणताना त्यांचा चेहरा इतका शांत होता ना, की या माणसाला असं काही झालंय असं वाटतही नव्हतं. मी म्हटलं तेव्हा त्यांना, ‘दादा, तुम्ही सगळ्या लोकांना ज्ञानेश्वर, रामदास समजावून सांगता, शिकवता आज मला सांगा.' ही कुड नॉट अंडरस्टँड अ वर्ड....जस्ट स्माइल्ड ॲट मी अँड सेड, ‘खूप दुखतंय गं....कळणारच नाही तुम्हाला कुणाला!' पुन्हा आता काहीच नाही यातलं.
काय शेअर करणार आता एकमेकांत?
मग थोडा वेळ असाच जातो. आता काही तरी बोलायलाच हवं अशी कुणी तरी जबरदस्ती केल्यासारखं ‘माय फादर वॉज व्हेरी हँडसम... डोण्ट यू थिंक?' असं निरालंब प्रश्नार्थी विधान ती करते आणि हातातल्या छोट्या रुमालाने डोळ्यांच्या कडा टिपायला लागते.
बांधकामात सिमेंटच्या मधल्या जागा भरून काढण्यासाठी जशा विटा वापरल्या जातात, तशी ही काही वाक्यं; अप्रस्तुत वाटावीत अशी, परंतु दोन अवघडलेल्या माणसांमधला काळ काही अंशी तरी भरून काढणारी. अर्थाशी त्यांचं अनुसंधान असलंच पाह्यजे, हा हट्ट अनाठायीच.
मनात येतं, सर हँडसम होते का नाही कल्पना नाही. ती ज्याची त्याची व्याख्या. पण ज्ञानोबा म्हणतात तसं, ‘...ज्याला पुढचं दिसतं तो देखणा', या अर्थाने सर देखणे नक्की होते. पुढचं, म्हणजे केवळ कालानुक्रमानुसार नंतरचं, असंंच नाही तर काळाच्याही परे असणारं. वेगळ्या मितीतलं, विभिन्न जगातलं, स्वत:तलं, स्मृतिपरंपरेला संपूर्णपणे धुडकावून लावणारं, आताचं, किंवा अगदी पुरातन, प्राचीनही.
मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...
कालांच्या आणि अवस्थांच्याही संधिकालातलं म्हणणं मांडणारं नितांतसुंदर देखणेपण सरांकडे होतच होतं. कदाचित मिथिलेला हेच म्हणायचं असावं. आणि नसलं म्हणायचं तसं, तरी आपण घेऊ यात, काय हरकत आहे?
तिच्याकडे बघत मी हुंकार देतो. काही क्षण आम्ही एकमेकांकडे बघत थांबतो. मग दोघांत पुन्हा शांतता पसरत जाते. त्या शांततेला सामोरं जाणं, ती सहन करणं असह्य होतं म्हणून मी उठतो, तेव्हा मिथिला आतल्या दिशेने हात करते. आत कुठे जायचंय ते मला महिती आहे.
क्षणभर वाटतं, इथूनच मागे फिरावं.
काय करणारोत आता आत जाऊन?
आर्थिक दृष्टीने अनुत्पादक असलेल्या सर्जनशील आणि सृजनशील अशा प्रमेयांबाबत कुणाशी विचारविनिमय करणारोत? कुणाशी बोलणार आहोत कवितेबद्दल?
........हे रक्त वाढताना
मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्या
तो कृष्ण नागडा होता
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता...
ह्या ओळींमधल्या महाभारतातल्या प्रतिमांची आदिम घडण, वस्त्रहरणाच्या संदर्भात दौपदी आणि कृष्ण यांची झालेली अपरिहार्य उलटापालट, त्याचा आईशी असलेला संबंध आणि त्यांची कलेतून होणारी पुनर्निर्मिती कुणाकडून समजावून घेणार आहोत?
कोण आता जी.ए.कुलकर्णी, आरती प्रभू अशा सहोदरांचा उल्लेख करत, ‘या भाषेत ‘काजळमायेचं' काजळ कधी तरी कुणी डोळ्यांत रेखतो का हो, आणि कुणाच्या दिवसाच्या एका तरी श्वासात ‘गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने', हे गुणगुणलं जातं का, सांगा बर मला' असं आतड्याच्या ओल्या मायेने मांडणार आहे?
बोरिस पास्तरनाक समोर ठेवलेल्या ‘तू या देशात रहा किंवा नोबेल पारितोषिक स्वीकार,' या पर्यायांचा समानधर्मा आपुलकीने उल्लेख करत, त्याच्या अनुषंगाने, ‘राजपुत्र आणि डार्लिंग'मधल्या
‘ज्या भाषेत जन्मलो त्या भाषेत अनाथ वाटते मला..'
या स्वत:च्याच ओळींचा अनुबंध विस्तृतपणे कोण आपल्यासमोर पसरणार आहे?
‘रेव्हरंड सर, इथून पुढचा जन्म कुठेही आला तरी चालेल मला, पण एकच विनंती आहे माझी त्या परमेश्वराला, टू माय लॉर्ड अँड माय मास्टर ....या मराठी भाषेत पुन्हा जन्माला घालू नकोस. विद्वेषाने भरलेल्या ह्या नरकात माझी त्वचा सोलण्याची जोखीम पुन्हा तू माझ्यावर टाकू नकोस.'
संभाषणादरम्यान अवकाश उभ्या करणाऱ्या हाताच्या नानाविध लयबद्ध हालचाली. समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीला सर, गुरुजी, डॉक्टर सरपासून ते पार रेव्हरंडपर्यंत आत्यंतिक आपुलकीने वापरली जाणारी नानाविध संबोधनं.
‘तुम्हाला सांगतो गुरुजी, तीस-पस्तीस वर्षं ज्या भाषेतले ज्ञानेश्वर, चक्रधर, केशवसुत, कुसुाग्रजांपासून ते पार ढसाळ, सुर्वे, चित्र्यांपर्यंतचे सगळे लेखक-कवी त्यांची आदब सांभाळत राजेशाही शोभिवंत शालीनतेने मी शिकवले त्या भाषेत माझ्या वाट्याला काय आलं सर, फक्त विद्वेष आणि विद्वेषच. दुर्बोधतेचा, ऑब्स्क्युरिटीचा शिक्का मारून दिला माझ्यावर, माझ्या कवितेवर. दु:ख नाही मला त्याचं, खंत जरूर आहे. आय ॲम द पोएट ऑफ माय ओन साइज अँड स्टेचर. नथिंग लेस, नथिंग मोर. म्हणूनच माझं मागणं आहे सर, पुन्हा वेळ आली तर हा प्रांतही नको आणि ही भाषाही. शंकरमहाराजांच्या मठात बसून मी त्यांना विनवलंय आज सकाळी-
‘शबे फुरसत का जागा हूं फरिश्तों अब तो सोने दो,
कभी फुरसत में कर लेना हिसाब आहिस्ता आहिस्ता।'
असं खोलीतल्या टीव्हीवर ठेवलेल्या शंकरमहाराजांच्या छोट्याशा फोटोला नमस्कार करून कोण आता बोलणार आहे?
गेले काही महिने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आठवा मजला, सन्माननीय कक्ष, उजवीकडची पहिली खोली, हाच सरांचा पत्ता होता आणि हेच सरांचं घरही.
एव्हाना तर ती खोली आवरायला सुरुवातही झाली असेल.
तिथे असलेल्या सगळ्या गोष्टी, गेले काही दिवस सर सर्वत्र वापरत असलेली टोपी, ‘ई-साहित्यसंमेलनाच्या' अध्यक्षपदासंदर्भातल्या विविध भावमुद्रांचे तसंच इतर कार्यक्रमांचे सगळ्या भिंतींवर विखरून लावलेले फोटो, इंक स्केचची फ्रेम, एवढ्यातच मोठा करून आणलेला फोटो, नव्या पुस्तकाचं जॅकेट, मिळालेली स्मरणचिन्हं, पारितोषिकं, नरसोबाच्या वाडीवरनं वाडीकरांनी आवर्जून आणलेला प्रसाद, कुणी कुणी मायेने आणलेल्या नानाविध गोष्टी, ज्यूसची बाटली, सूपचा झाकलेला बाऊल, चांदीच्या डब्यातल्या भाजलेल्या लवंगा.... सगळं आता गोळा केलं जाईल. उगीच कशाला ठेवायचं, आता या काय अर्थ आहे या सगळ्याला, असं म्हणत त्याच्या उच्चाटनाच्या सगळ्या तयाऱ्या झाल्याही असतील आत्तापर्यंत पूर्ण.
स्वच्छता, फ्युमिगेशन, नवं बेडशीट, नवी पांघरुणं, नव्या उशा, फ्लॉवरपॉटमधली नवीन फुलं, नवे चार्ट्स, नवी औषधं... नवीन पेशंट.
‘सर या खोलीत आहेत आणि सर या खोलीत होते....'
वर्तमान आणि भूतकाळ या दोघांदरम्यान पसरून राह्यलेला निमिषातला अनंताचा प्रवास.
सरांच्या नागपूरातल्या घरावर असलेल्या पाटीविषयी (आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल) वारंवार बोललं आणि लिहिलं गेलंय.
ती तशी पाटी ही नागपुरातल्या त्यांच्या वास्तव्याची गरज होती की स्वत:च्या प्रतिमेवरच्या प्रेमाची जाहीर अभिव्यक्ती, माहिती नाही. कदाचित नागपुरात, आपल्या वैयक्तिक प्रदेशात कारण नसताना वावरणाऱ्या, तिथली शांतता भंग करणाऱ्या ट्रेसपासर्सबाबत त्यांना खरोखरीचं भय, नकोसंपण दाटून आलेलं असू शकतं आणि त्याविरुद्ध म्हणून उभारलेली संरक्षणात्मक तटबंदी, ही अशी पाटी.... कुणास ठाऊक!
मात्र, अशी कुठलीही सूचना किंवा पुसटसा संकेतही आठव्या मजल्यावरच्या खोलीच्या दारावर नव्हता.
एवढंच कशाला, सरांच्या इथल्या वास्तव्यात त्या खोलीचं दार बंद असलेलंसुद्धा कुणी पाह्यलेलं नाही. वॉर्डबॉय, सिस्टर, ब्रदर, डॉक्टर, ओळखीचे, अनोळखी चाहते, कुणीही रूममधे गेलं की तोंडभरून ‘या' म्हणत, प्रसन्न हसत सर स्वागत करायचे.
जी प्रतिमा आपल्यापर्यंत पोहोचली तसा हा माणूस नव्हताच का? एकदम असं कसं म्हणता येईल की तो माणूस पूर्ण वेगळा होता? ते तेव्हा खरं असेल, जसं हे आत्ता.
मरणभयाच्या या टप्प्यावर आत्मरततेचे, एकान्तसाधनेचे सगळे तथाकथित पीळ संपून गेले आणि पैलतीरावरच्या मावळत चाललेल्या दिव्यांचे संदर्भ उपजत जीवनेच्छेला आतून हादरवून गेले का?
त्यातनं मग ती जाणीव, ती जीवनेच्छा माणसांना हाका मारण्यासाठी उद्युक्त करू लागली?
हळूहळू नाकारावे
अद्वैताचे गूढ,
आत्म्यालाही कुडी द्यावी
देहाचीच गाढ ...
प्रत्यक्ष आणि प्रतिमा यातल्या अशा या सगळ्या संदिग्ध जागांबाबत सरांना प्रश्न विचारावेत असं कित्येकदा मनात यायचं. अनेक प्रश्नही सामोरे उभे रहायचे. पण त्यांची शारीरिक स्थिती बघता त्यांना मुद्दाम बोचेल, ओरखडा काढेल असं काही विचारायला जीव झाला नाही हे खरं. त्यांचा सहवास हे आपल्या वाट्याला आलेलं अवचित संचित असं म्हणत, शुभंकर पद्धतीने त्याचा केवळ स्वीकार करत गेलो, कोणत्याही प्रश्नाशिवाय.
स्पर्श करता येईल इतक्या अंतरावर मरण उभं राह्यलं त्या वेळी या देहातला कवीपेक्षा सदेह माणूस ठळक होत गेला आणि जगण्याला धरून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करू लागला हे खरं.
महर्षी पतंजली योगसूत्रात नि:संदिग्धपणे सांगतातच, ‘अभिनिवेश' (प्रबळ उपजत जीवनेच्छा, मरणभय, जगणं गच्च धरून ठेवण्याची खटपट) हा सर्वांत महत्त्वाचा क्लेश कुणालाही चुकलेला नाही.
‘ते स्वरसवाही तथारूढोऽभिनिवेषा:।'
विद्वान, ज्ञानी, पंडित, सुज्ञ, शहाणे लोकही या क्लेशापासून सुटत नाहीत. त्यांची जीवनेच्छा सरत नाही.
सकाळच्या गप्पा (खरं तर वर्गच) झाल्यावर निघताना म्हटलं, ‘दुपारी चक्कर मारतो सर, सगळं काम संपल्यावर...' की सर हातात हात घ्यायचे.
‘येस सर... मी तर तुम्हाला रोजचं आमंत्रण देतोय. ज्या घरात सारे पंथ, साऱ्या वाटा, सारे चकवे आणि सगळे भ्रम विरामाला येतात त्या ‘पंथविराम' या माझ्या नागपुरातल्या घरात राहायला या. ॲज अँड व्हेन यू फील... ॲज अँड व्हेन यू आर फ्री... प्लीज डू कम.... इथे या किंवा तिथे. कधीही. यू आर ऑलवेज वेलकम.'
साधारण तीस वर्षांपूर्वी आमंत्रणाची वाटही न पाहता या कवीला भेटायला पहिल्यांदा निघालो होतो मी. आजची ही शेवटची भेट. लौकिकातला ऋणानुबंध संपला.
ज्या खोलीत सरांचा मृतदेह ठेवला आहे त्या खोलीचं दार समोर दिसतं आहे. पाय अगदी जडशीळ झालेत. या खोलीत येण्याचं आमंत्रण आपल्याकडे नाही; मात्र, आपली इच्छा असो वा नसो, तरीही आपण त्या खोलीत जाणार आहोत; आपल्याला जावं लागणारच आहे.
आयसीयूमधल्या एका काउंटरचा आधार घेत मी उभा राहतो.
पांढऱ्या शुभ्र हत्तींचा रानातुन कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतहि मिसळुन गेला
त्या गूढ उतरत्या मशिदी पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडता आभाळ लपेटुन बुडल्या
पांढऱ्या शुभ्र हत्तींनी मग डोंगर उचलुन धरले
अन् तसे काळजाखाली अस्थींचे झुंबर फुटले
पांढरे शुभ्र हत्ती मग अंधारबनातुन गेले
ते जिथे थांबले होते ते वृक्षहि पांढरे झाले
पहिल्यांदा ही कविता वाचल्यानंतर अक्षरश: तिरीमिरीत नागपूरला जायला निघालो होतो.
ही कविता ठरवून लिहिता येणं शक्य नाही. कवीला ही दिसलेली कविता आहे. कवीला जवळपास वगळून ही कागदावर उतरलीय. शब्दाला शब्द लावत आणि यमकांचे आडाखे साधत ही रचना आकाराला आलेली नाही. निव्वळ वर्णनापुरती सीमित असलेली, माफक रसिकतेला सोसेलशी, मानवेलशी आणि गुदगुली करणारी ही कविता नाही. ह्यात काही तरी कमालीचं वेगळं आहे. आपल्या समोर चित्र उभं राहतंय, पण त्या चित्राच्या परे जाणाऱ्या किती धूसर, काहीशा ॲबस्ट्रॅक्ट प्रतिमा कुठनं कोण जाणे, आपल्या आसपास तरळताहेत. आपली काही तरी विचित्रच पण कमालीची विलक्षण अशी भावावस्था झालीये. कवितेतल्या गूढ शब्दांचा रूढार्थ मदतीला घेत ‘गूढ' म्हणता येईल असं काहीसं जाणवलं होतं.
इतक्या वर्षांनंतर आजही असंच वाटतं.
या एकाच कवितेने असं नव्हे, तर या कवीच्या जवळपास सगळ्याच रचनांनी.
मेंदूलाही वसंतनाद असतो तो मागतो मोगरा...
डोळे खुडून पहावा असा पाऊस मोकळा....
ने दुडुनि अंगण इथले,
घन आले रे गोपाला;
पाण्याचे अवगुण म्हणजे
कनकाचा दग्ध उन्हाळा.
पाणियाच्या तुकड्यात दिसे चंद्राचे जावळ,
म्हणू नये निळाईला सांडपाण्याचा ओहळ...
काळीज धुक्याने उडते
तू चंद्र जमविले हाती
वाराही असल्या वेळी
वाहून आणतो माती....
किती रचनांचे उल्लेख करणार?
तेव्हा, त्या वयात या कवितेतलं काय कळलं, कवितेतनं काय दिलं, कशासाठी ही कविता वाचायची, असलं काहीही लक्षात आलं नव्हतं. कोणतीही दिशा न घेता, कोणत्याही अपेक्षांशिवाय, सुबोधता-दुर्बोधता ह्यातल्या कोणत्याही निवाड्यांशिवाय वाचत गेलो होतो. एकापाठोपाठ एक. ‘संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, चर्चबेल्स, मितवा, सांध्यपर्वातील वैष्णवी......' वाचता वाचता एका क्षणाला लक्षात आलं, की ही कविता किंवा लिखाण नाहीचे. आसमंत उभी करणारी ही ध्वनिकंपनं आहेत केवळ. योगशास्त्रातल्या बीजमंत्रांसारखी. ॐ हं,क्षं वगैरे जसे बीजमंत्र आहेत तसंच हे लिखाण आहे. कोणताही मंत्र रचला जात नाही तर तो दिसलेला असतो. (म्हणूनच तो मंत्र या उपाधीला सार्थ होतो.) त्यामागे ऋषी स्वत:च्या तपस्येतून अर्थ उभा करत असतो. तसंच काहीसं हे लिखाण आहे. दिसलेलं. ह्या ध्वनिकंपनांचा विचारांशी संबंधच येत नाहीये. ह्या नादाने निर्मिलेला अवकाश थेट मनात उतरत आपल्याला अशा अवस्थेत घेऊन जातोय जिचं वर्णन अशक्य आहे. आपल्याला काय वाटतंय हे सांगता येणार नाही, पण या लिखाणातलं काही तरी आपल्याला सारखं खुणावून बोलावतं आहे आणि आपण मंतरलेला बाण आपल्यावर आदळल्यासारखे त्या नादाच्या मागे मागे जातोहोत. जवळपास परावलंबी झाल्यासारखे. आपल्याही नकळत आपल्या अस्तित्वाचा संपूर्ण ताबा या नादाने, त्या ध्वनिकंपनांनी घेतलाय. केवळ नादानुसंधानी अशी विलक्षण अवस्था. ही अवस्था कविता संपल्यानंतरही किती एक काळ पांघरून राह्यल्यासारखी राहतीय, असा भयचकित करणारा अनुभव होता तो.
त्यातली रचना, रचनेवरचं प्रभुत्व, त्यातले आघात, उमलत येणारी लय, गणवृत्तमात्रांचे तोल, त्यातून प्रकटणारा अनुभव ह्याने विस्मित व्हायला होत होतंच; पण ह्या कशाहीपेक्षा जागृत संमोहनावस्था म्हणता येईल अशी ती अवस्था असे. आपल्या सर्वसामान्य जाणिवेच्या परे जाणारं काही तरी या शब्दगारुडात आहे... ते काय असावं हे मग शोधत राह्यलो.
देह सुकुमार बाई,
त्याला मायेने सोलावा
ज्याला पुरती वल्कले,
तोची शोभतो नागवा
यातल्या वृत्ताचं, लयीचं महत्त्व आहे ते आपल्या जागी, पण त्यापेक्षाही पहिल्यांदा हादरायला झालं होतं ते त्यातल्या नादाने, त्यानंतर त्यातल्या अनुभवमांडणीने, मग वापरलेल्या रूपकांनी, प्रतिमांनी, त्यांच्या जीवघेण्या उलटापालटींनी आणि त्यातून अंतिमत: प्रकट होणाऱ्या संपूर्ण वेगळ्याच अनुभूतीने.
तशीच आणखी एक कविता-
हिवाळ्याच्या लेकी बाई
हिवाळ्याच्या लेकी ।
गावामध्ये येता येता
गेल्या परलोकी...
रांजणात वाजताती
पाचोळ्यांचे ध्वनी;
हिवाळ्यात लेकींचीही
रडे हिरकणी.....
‘ज्या घरात माझा जन्म झाला तिथे कणग्यांत, रांजणांत कितीदा तरी छोट्या छोट्या, दिवस-दोन दिवसांच्या लेकरांचे मृतदेह सापडायचे... कुणाची मुलं, कशी मेली, कुणी मारली ....काही पत्ता नाही....नुसतंच आक्रंदन.'
सर, हे तुम्ही समजावून सांगितलं नसतं तरी कवितेने करायची ती किमया केलीच होती. आरशासारखी ती समोर उभी ठाकली होतीच. आधी कळायचं नाही, जे समोर दिसतंय ते आपणच आहोत, आपलंच प्रतिबिंब आहे ते म्हणून. जेव्हा लक्षात यायला लागलं तेव्हा अधिकाधिकच त्यात गुंतत गेलो, स्वत:चे अर्थ शोधत राह्यलो आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीत ती कविता लिहिली, त्यामागे काय साठलेलं होतं, तिचा अनुबंध कुणाशी होता... हे सगळं दूर राह्यलं आणि आमच्यापुरती दर वेळी नवनव्या परिप्रेक्ष्यात ही कविता उलगडत गेली.
या कवीच्या कवितांनी, ललितबंधांनी कवितांच्या आकलनाचे पारंपरिक निकष आमच्यापुरते उखडूनच टाकले होते त्या काळी. स्मृति-परंपरेच्या असह्य ओझ्यातून सुटका झाल्यामुळे कोणत्याही कवितेला सामोरं जाताना विलक्षण हलकं वाटायचं तेव्हा. बाहेरून घेतलेलं अन्न ज्या सहजपणाने आपल्या शरीराचा भाग होत रक्त होतं, आपलं एखादं इंद्रियच बनून जातं, तशी काहीशी या कवीची कविता आहे असं झालं. त्यातल्या ओळी फार सहजपणाने आपल्या स्मरणात थांबलेल्या आहेत, हेही आकस्मितपणेच लक्षात यायचं.
त्या टप्प्यावर कविता कवीपासून संपूर्ण सुटी झाली आणि आमचीच होऊन गेली.
कविता हा शब्दांतून व्यक्त होणारा परंतु शब्दातीत अनुभवाचं सूचन करणारा आकृतिबंध आहे. ती अनुभूतीची संपूर्ण वेगळ्या मितीतून, परिमाणातून केलेली अभिव्यक्ती. त्यामुळेच तिच्यासाठी आकलनाचा प्रचलित मार्ग थिटा पडतो असं वाटतं.
घरट्यांचे डोंगर रचता
बगळ्यांच्या तुटल्या माना;
झाडीच्या मागुन येतो
हा पाउस माझा राणा
कसं सामोरं जायचं या ओळींना?
कवितेतला प्रत्येक शब्द किंवा शब्द समुच्चय फोडून त्यातला अर्थ बाहेर काढणं, मग त्या अर्थाचा धागा सरळ, एकपेडी, दुपेडी, तिपेडी वाटेल तसा पण सरळ गुंफत, तर्कशास्त्रीय विचारधारेचा आधार घेत कवीच्या म्हणण्याचा अन्वय शोधणं, शेवटी सगळ्याचा मिळून एक अनुभव विषद करणं.... ही विघटन-पुनर्घटनाची निव्वळ अर्थानुगामी वाटेने जाण्याची पारंपरिक प्रक्रिया हनुमंताने प्रत्येक मोत्यात राम शोधण्याच्या कृतीइतकीच निरर्थक आहे. हे असलं सव्यापसव्य हनुमंताला, त्याच्या नि:संदिग्ध भक्तिप्रपंचाला उणेपण तर आणतंच, सोबत रामाबद्दल, त्याच्या सर्वव्यापक उपस्थितीबाबत संदिग्धताही प्रकट करतं.
तेच कवितेबाबतही खरं आहे.
शब्द आणि त्याचा अर्थ या साखळीची आपल्या स्मृतीत नोंद असते. शब्दाचं दर्शन झालं, कोणत्याही स्वरूपात शब्द सामोरा आला की त्याला लगटूनच अर्थ प्रकट होतो. एवढंच नव्हे, तर अर्थाच्या विनिमयासाठी शब्दांचा उपयोग केला जातो. तशीच वाक्यं, तसेच वाक्प्रचार, तसेच परिच्छेद......शब्दांच्या निमित्ताने प्रचलित अर्थाचं प्रकटन.
या प्रचलित भाषेच्या तलावाचा पलीकडचा काठ आपल्याला दिसत नाही, आणि तो दिसला नाही म्हणून आपल्याला काही फरकही पडत नाही. सर्वसामान्यपणे अर्थाच्या तितपत नोंदीवर जगणं निभून जातं. मात्र, कवीसाठी ही मोठी अडचण ठरू शकते. त्याला त्याचा जाच वाटतो, आणि मग अभिव्यक्तीच्या अपरिहार्यतेपोटी तो नव्या भाषेत, नव्या भाषेच्या घडणीत उतरू लागतो. त्या भाषेत शब्द कदाचित तेच असतात, पण त्यासोबतची प्रतिमा नित्यनूतन, अगदी वेगळी असते. त्यातून प्रकट होणारा अनुभवही सर्वस्वी अपरिचित प्रदेशातला असतो.
तू हसलिस तेव्हा माझ्या
दु:खात मिसळली जाई
तू दूर तरीही घेते
मज कुशीत संध्यामाई.....
असं म्हणणारा कवी महत्त्वाचा का? तर तो आपल्या प्रचितीचा पर्वत आधाराला घेत, अर्थाच्या कजाग पकडीतून शब्द सुटा करतो. तो केवळ शब्द मोकळा करतो असं नाही, तर शब्दाची अर्थाच्या चिरेबंदी नजरकैदेतून सुटकाही करतो. रूढार्थाच्या मर्यादित अवकाशाचा पिंजरा मोडून टाकत तो शब्दाला संपूर्ण नवा अवकाश उपलब्ध करून देतो.
यालाही उत्तर असते कवितेच्या भासामधले
ढळताना जे अडखळले ते फूलच असते सडले
असं कवीच सहज सांगू शकतो.
आपण मात्र कवितेला किंवा कोणत्याही कलाकृतीला ‘जुन्या भाषेतून' किंवा स्मृतीच्या आपल्याला उपलब्ध असलेल्या आपल्याकडच्या (मर्यादित) साठ्यातूनच सामोरे जातो. अशा या स्मृतिनोंदींकडून कवितेत उतरणं म्हणजे खिडकीतल्या आकाशाच्या तुकड्याला आकाश म्हणून गृहीत धरत संपूर्ण आकाशावर भाष्य करणं, किंवा विस्तीर्ण आकाशाच्या असणेपणाची शक्यताच टाळणं आणि खिडकीतलंच आकाश हे संपूर्ण होय, असा हट्टाग्रह धरणं. त्यामुळेच आपल्या मर्यादित स्मृतीच्या परिघातून कवितेला-कलाकृतीला सामोरं जाणं दुस्तर तर असतंच, सोबत त्या कलाकृतीला दुखावणारं, काही अंशी तिचा अपमानही करणारं असतं.
शब्द-शब्दार्थाच्या सापळ्यात, त्यातल्या ओळखीच्या प्रतिमांच्या रचनेत कविता नसते, तर कवितेपुढे शब्द-शब्दार्थाचा सापळा अस्तित्वहीन आणि निरर्थकच ठरत असतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. शब्द-शब्दार्थांचं आक्रस्ताळं ऊन मावळल्यानंतरच न-अर्थापूर्वीच्या संधिकालात कविता प्रकटते आणि आपल्याही नकळत आपल्याला सोबत घेत, अनुभवाच्या डोहात खोल घेऊन जाते आणि सांगायला लागते,
मज भावते साजणी, फक्त अशी संध्याकाळ,
बाळमुठींना लागतो, जिथे आसवांचा तळ....
किंवा कधी तरी आणखी सुलभतेने म्हणते,
या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे, मी आपुले हात उजळतो
स्मृती हा मानवी आयुष्यातला एक मोठा क्लेश आहे. ती इतर क्लेशांसाठीची भूमी जशी! ही स्मृतीच आस्वादनासाठी मर्यादा उभी करते. ज्या क्षणी आपला स्मृतिसाठा अपुरा पडतो त्या क्षणी आपण स्वत:ला तपासण्याऐवजी अधिकाधिक आक्रमक होत सामोऱ्या जात असलेल्या कवितेला किंवा कलाकृतीला दुर्बोध ठरवायला लागतो.
‘जे मला कळत नाही ते दुर्बोध' इतकी बाळबोध, भोळी आणि भाबडी व्याख्या आहे आपली दुर्बोधतेची.
हा प्रश्न जिवाला छळतो
टिचलेले बिल्वर रडती
कोणत्या फुलातुन गळते
कोणत्या कळीची माती ?
असा प्रश्न विचारणारा कवी आपल्याला ‘कन्व्हिनियंट' असणारी भाषा किंवा आपल्या आवाक्यातला अनुभव वापरत नसल्याने तो आपल्यासाठी, आपल्या सर्वसाधारण उद्घोषित रसिकतेसाठी ‘इनकन्व्हिनियंट' व्हायला लागतो. आपण त्याच्यापासनं, त्याच्या कवितेपासनं अंतर ठेवायला लागतो ‘आम्हाला नाही बुवा तो कवी कळत. कदाचित आमची ती मर्यादा असेल, पण नाही ...अगदीच नाही कळत...' असल्या अभिप्रायांना प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागते आणि कवी, एका प्रकारे अतिशय सफाईने, बाह्यत: आदराचा बुरखा पांघरत बहिष्कृत केला जातो आणि मग नकळत दुर्बोधपणाच्या समाजघोषित कोषात बंदिवान होऊन जातो.
सच्च्या कवीचं हे दुर्दैवी भागधेय म्हणायला हवं.
कवितेला सामोरं जायचं तर नागडं व्हायला हवं. स्मृतीचे चष्मे आणि कपडे उतरवून ठेवायला हवेत. जे सामोरं उभं राहतंय त्याला जसंच्या तसं, कोणत्याही पूर्वअटींशिवाय आपल्या चित्तकक्षात झिरपण्याची मुभा उपलब्ध हवी. त्यासाठी प्रसंगी आपल्या संपूर्ण आकलनव्यवस्थेची पुनर्रचना करावी लागली, ती मोडून टाकावी लागली तरी बेहत्तर, मागे हटता कामा नये.
शब्द, शब्दातून आणि शब्दामुळे जन्म घेणारा विचार, त्यातून निपजणारा काळ, त्यातनं आकाराला येणारी स्मृती, त्यावर आधारलेली निर्णयांची आणि तुलनांची पारंपरिक पद्धत, त्यातून घडत जाणारे गंड आणि पूर्वग्रह.....ह्यातलं काहीही मधे न आणता कविता आणि आपण एवढेच थेट, साक्षात आणि समक्ष त्या क्षणात उपस्थित असणं म्हणजे कवितेला सामोरं जाणं.
आमच्या कॉलेजमधे गणेशोत्सवात तीन अंकी नाटक करण्याचा प्रघात होता. उन्हाळी सुट्यांनंतर कॉलेज सुरू झालं की नेहमीचा ग्रुप नाटकाच्या आसपास घोटाळायला लागायचा. त्या जमण्यातला नाटक करणं हा एक भाग असायचा; पण केवळ तेवढंच, असं ते कधी उरायचं नाही. सगळ्या बऱ्या-वाईट बघितलेल्या-वाचलेल्या गोष्टींबद्दल जोरजोराने चर्चा सुरू व्हायच्या. एकीकडे नाटक निवडलं जायचं, तालमी सुरू व्हायच्या. सोबत या नाटकबाह्य चर्चाही तापायला लागायच्या. रंगमंचावर नाटकाची तालीम करणारे साताठ आणि खाली वीस-पंचवीस असं प्रमाण असायचं.
तेव्हा आयन रँड फॅशनमधे होती. तिच्या ॲटलास श्रग्ड, अन्थेमपासनं, नाइट ऑफ जॅन्युअरी सिक्स्टिन्थपर्यंत; दुसरीकडे रजनीश, फ्रॉईड, फ्रॉ पासनं ते सार्त्र, मारिया रायनर रिल्केसकट ग्रेस, चित्र्यांपर्यंतच्या सगळ्यांच्या लिखाणावर, मतांवर (त्यातलं अक्षरश: काडीचही कळत नसताना, आपल्याला खूप काही कळलंय असं गृहीत धरूनच) उहापोह व्हायचे.
कुणीतरी एखादा कवितासंग्रह घेऊन यायचं आणि मग त्याच्या अनुषंगाने तो लेखक समजावून घेण्याचा प्रयत्न सुरू व्हायचे.
थेंब उणे ऊन
माळावर जळे
काचेवर तडे
श्रावणाच्या.
तज्ज्ञ वाटणारी मंडळी काहीबाही बोलायची. ऊन, काच, श्रावण, माळ.... प्रतिमा समजावून घेऊ बघायची.
‘आसपास पसरून राह्यलेलं, काहिली करणारं रखरखीत वास्तव. कोणत्याही ओलाव्याचा इवलासाही संदर्भ नसलेलं. निव्वळ कोरडं ठक्क. सगळ्या प्रश्नांना व्यवहारातली तयार आणि चोख उत्तरं देणारं. हे आधीही असंच होतं आणि नंतरही असंच असणार आहे, हे आणि एवढंच खरं. श्रावणाच्या त्त्या काचेला पावसाने अजून तडकवलेलं नाही. त्या ओल्या थेंबाने करकरीत काचेचं तथाकथित शील अजून भ्रष्ट झालेलं नाही.'
चाळीस पानी वहीसारख्या दिसणाऱ्या, पद्मा सहस्त्रबुद्धे ह्यांच्या तपकिरी ब्रश स्ट्रोक्सनं चितारलेलं मुखपृष्ठ असलेल्या, ‘संध्याकाळच्या कवितां'ची पहिली भेट झाली ती इथेच.
स्तनांवर माझ्या
जांभळाची झाक
‘कवितेतली ही जी कुणी मुलगी आहे ती म्हणतीय, माझ्या स्तनाग्रांभोवती एक जांभुळकी झाक दिसू लागलेली आहे.' गर्भारावस्थेत पहिल्यांदा जाणवणाऱ्या काही बदलांपैकीचा हा एक विशेष बदल असतो, हे मेडिकलला असल्यामुळे नीट माहिती होतं. त्याची काव्यात्म अभिव्यक्ती होऊ शकते ही जाणीव जवळपास साक्षात्कारीच होती.
स्तनांवर माझ्या
जांभळाची झाक
ओली आणभाक
आठवते.
‘स्तनाग्रांमधे आणि त्याच्या आसपास झालेला हा बदल निरखत असताना, तो आतून जाणवत असताना, हा बदल घडण्यासाठीची जी जवळीक घडली ती वेळ, तो क्षण, ती ओली आठवण, ते मिसळलेले शब्द आणि गुंफलेले श्वास, सगळं मला आठवतं आहे. ज्याने हे बीजदान केलं तो कदाचित तिच्या आसपास आहे, किंवा हे दान तिच्या गर्भाशयात टाकून तो परागंदा झालेला असू शकतो. पण म्हणून त्या ओल्या आणाभाकांचं मोल कुठे कमी होतं?
सृजनाच्या प्रक्रियेतलं पहिलं प्रकटन आणि त्यासाठी त्यापाठी पसरून राह्यलेल्या दीर्घ कळा, स्वत:ला मोडून घेणं, स्वत:ला विलीन करणं, स्वत:ला ओवाळून टाकणं.....ही कविता पहिल्या कवितेचीही आणि कवितेमागचीही असू शकते. एक बाह्यात्कारी संकेत आहे तर दुसरा अंतर्गामी निर्देश करणारा संदर्भ आहे....'
तुमच्या कवितेविषयी आपुलकीने रात्र-रात्र चर्चा व्हायच्या सर.
त्यामुळेच आपल्या भेटीत तुम्ही जेव्हा पहिल्यांदा म्हणालात, की माझी कविता कुणी वाचत असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं, तेव्हा जोरदार धक्का बसला होता. तुम्ही थेट खोटं बोलताय, स्वत:चा उदो उदो करून घेत तुम्हाला स्वत:समोर आरती ओवाळून घ्यायचीय की काय, तसं काही तुमच्या मनात आहे का, असं तरळून गेलं होतं. आपलं कोणी नाही; आपण अनाथ, पोरके, अनुवंशहीन, अनुबंधहीन असं स्वत:च ठरवून घ्यायचं; मग त्याचं दु:ख उभं करायचं आणि नंतर त्याला स्वत:च भव्यता देत कुरवाळून घ्यायचं, अशी आयडिया तुम्ही वापरताय की काय, असा संशयही आला होता. तुमच्या लाडक्या आत्मलुब्धतेची ही आणखी एक जरा वेगळी पद्धत, असंही मनात आलं होतं. पण कित्येक साधी साधी मंडळी जेव्हा तुम्हाला या आठव्या मजल्यावरच्या पहिल्या खोलीत भेटायची, तुमच्या कवितेने आम्हाला जगताना केवढं तरी बळ दिलं, कित्येक प्रसंगांत साथ दिली असं सांगायची, या कवितेचा आम्हाला आधार वाटतो असं म्हणायची, तेव्हा तुम्हाला झालेला आनंद धादांत खोटा होता असं मला नाही म्हणवत. त्यात सत्याचा अंश होता.
कवितासंग्रह, चर्चबेल्स वाचल्यानंतर या कवीला भेटायला हवं, एवढी एकच ऊर्मी होती म्हणून थेट नागपूरलाच जायचं ठरवलं. कवींशी काहीही ओळखदेख नव्हती, परिचय नव्हता. नागपूरला तर आयुष्यात पहिल्यांदाच जाणार होतो. तिथली काहीही माहिती नव्हती.
विचार सोपा होता. गावात उतरायचं, विचारत विचारत कवीच्या घरी जायचं.
त्यांना सांगायचं, ‘आम्हाला तुमची कविता फार आवडते. त्यातली गेयता, शब्द आणि सूर यांत असणारी सीमा पुसून टाकत शब्दांना नादाच्या शिखरावर नेण्याची तुमची किमया आम्हाला अद्भुत वाटते. तुम्ही आम्हाला फार आनंद दिलेला आहे.'
त्या पावली उलट फिरायचं आणि परत यायचं. सगळा आराखडाच संपूर्ण भाबडा. त्या वयाला शोभेसा.
पण नाही गेलो. घाबरलो.
‘घाबरलो' पेक्षाही काही लोकांनी घाबरवलं. रोखलं. खरं तर असं म्हणण्यात काय अर्थ आहे? चूक माझीच होती. मीच निर्णय त्यांच्या हातात सोपवला होता. दोष त्यांचा नाही.
‘मुळीच जाऊ नकोस. ते पूर्ण विक्षिप्त आहेत. तुला मारतील, घरात घेणार नाहीत, प्रश्न विचारतील. तुला काय कळलंय लेका कवितेतलं? त्यांनी तुला विचारलं, की ‘तू सजून धरावी हृदये घोड्यांचे कौतुक करता, की जळे पिपासा अवघी ही घागर भरता भरता....' ह्या ओळींचा अर्थ काय, तर निव्वळ शब्दार्थ तरी सांगता येणारेत का तुला? अरे, ज्याने ‘राजपुत्र आणि डार्लिंग' हा कवितासंग्रह ज्या जी.ए. कुलकर्णींना, ‘तू मला मित्र मानलेस' असं म्हणत अर्पण केलाय, त्या जीएंना जो समक्ष, प्रत्यक्ष भेटत नाही तो कवी तू असा अचानक गेल्यावर ‘या या' म्हणणारे का? तुला जेवायला घालणार आहे का? तो माणूस भेटावा असा मुळीच नाही. त्याच्या कविता वाच, त्याचं लिखाण वाच. बास. त्याला भेटण्याचा चुकूनसुद्धा विचार करू नकोस.' या काही लिहिता येतील अशा गोष्टी.
इतरही अनेक होत्या.
सरांबाबतच्या दंतकथांची तेव्हाच पहिली भेट झाली.
एकच झालं, तेव्हा दचकून मी नागपूरला गेलो नाही.
पण पुढे दर वेळी नवीन कविता, नवीन ललितबंधाचं पुस्तक वाचलं की मनात यायचं,
‘कधी तरी भेट व्हायला हवी.'
अगदी गेल्या दिवाळीत ‘अनुभव' दिवाळी अंकाच्या कवितेतलं कडवं-
बिंबातले थेंब थेंबातले बिंब तसे संधिकालीन का हे तळे जळवंतीचा रंग लाभूनही निळेच्या निळे अन् पुन्हा सावळे.....
वाचल्यावरही कवींना भेटायला हवं, असं झालं.
स्वत:शीच हसलो आणि म्हणालो, ‘लगेच!'
आता सोपं होतं. निर्णय माझ्याच हातात होता. तेव्हा थांबवणारी माणसं आता कोणत्याही कवितेपासून कोसो दूर होती. स्वत:च्याही नकळत आठव्या मजल्यावरच्या उजवीकडच्या पहिल्या खोलीच्या दारात उभा राह्यलो,
‘या रेव्हरंडजी, या.....फोनच करत होतो तुम्हाला. ‘अनुभव'चा दिवाळी अंक आलाय ताजा. तुमची कथाय आणि आमची कविता!' सरांनी स्वागत केलं.
आता ती वाट नाही, ते आमंत्रणही नाही आणि तसं, समोरच्याला स्वत:च्या स्तरावर उभं करत स्वागतही नाही.
मृतदेह ठेवलेल्या खोलीत कधी तरी आत जायलाच हवं. टाळता तर येणार नाहीये. किती काळ असे नुसतेच आयसीयूत थांबून राहणारोत?
जन्म-मृत्यू या गोष्टी सातत्याने घडत असतातच, हे माहिती नाही का आपल्याला? डॉक्टर म्हणून तर त्याचा अतिपरिचय म्हणावी अशी गत आहे. अशा कितीएक प्रसंगांना सामोरेही गेलोय की आपण. किंबहुना, हे व्हावं, कोणतीही यातना न होता सहजपणाने पार पडावं, मृत्यूची पालखी तिच्या सगळ्या तथाकथित लावण्यासह, या कवीच्या डिग्निटीला साजेशी अशी पण जरा त्वरेने यावी यासाठी आपणच तर आतल्या आत मनापासनं प्रार्थना केलीय गेले सहा-सात दिवस. मग आता हे खरंच घडलं, प्रत्यक्ष आकाराला आलंय, तेव्हा....
अवकाश थंड हाताशी
दु:खाचा जैसा व्याप
काळाच्या करुणेमधुनी
सुख गळते आपोआप
काळाची करुणा ही करुणा म्हणून स्वीकारायला आता आपलं मन का तयार नाहीये? बुद्धीला कळतंय पण मनाचा आतून आणि निकराचा नकारच का उमटतो आहे? का कुणास ठाऊक पण आपल्यातलंच काही तरी जसं संपून गेलंय, आपणच थोडेफार मरून गेलोय असं काहीसं....
माझ्या पायांत चपला नाहीयेत. जमिनीचा थंडगार स्पर्श नकोसा झालाय. थेट शवागारातल्या थंडपणाच्या असीम आणि अनुल्लंघ्य विस्तीर्ण लादीवरनं आपण चालत निघालेलो आहोत आणि पायाखालची ही बर्फाळ जमीन कधीही संपणार नाही असं काही मनात तरळतंय. तसं झालं तरी हरकत नाही, पण शेवटी ती खोली येऊच आणि आली तरी आपण त्या खोलीत जाऊच नये.....
तरीही पावलं आतल्या दिशेने वळतात.
दहा पावलांचाच, तेवढंच चालावं लागणारा परंतु प्रदीर्घ लांब वाटणारा कॉरिडॉर.
आसपास आयसीयूमधल्या मॉनिटर्सचे, ट्रीटमेंट संदर्भात होत असलेल्या चर्चांचे आवाज कानावर येताहेत. डोळ्यांच्या अगदी बाहेरच्या कडेला कुणाला ऑक्सिजन मास्क लावलेला, कुणाला आयव्ही लावलेलं, कुणी शांत पडलेलं दिसतंय. मधल्या किंचित उंचावलेल्या प्लॅटफॉर्मवर आयसीयूतले रजिस्ट्रार, इतर काही डॉक्टर हलक्या आवाजात एकमेकांशी बोलताहेत. डॉ. प्रसाद ऐकू येईल इतपतच मोठ्यांदा खोलीचा क्रमांक सांगतोय.
‘थोडा वेळ झाला.' आठव्या मजल्यावर सरांना हवं- नको बघणारी सिस्टर स्वत:शीच पुटपुटल्यासारखी पुटपुटते आणि पुढे होत माझ्यासोबत चालायला लागते.
‘पोएट्री इज नॉट माय अचीव्हमेंट. इट इज ए कम्पल्सिव्ह गिफ्ट ऑफ माय मदर ॲंड माय मास्टर, सर...' असं म्हणणारा हा कवी अनंताच्या वाटेने निघून गेला. आपण भेटायला चाललोय ते त्याच्या गतप्राण देहाला... ज्याचे जीवनेच्छेचे सारे संदर्भच आता संपून गेलेत, आणि म्हणूनच त्या देहातून प्रकटणारी कविताही आता पूर्णविरामाला पोहोचलीय. त्या देहाचा आता इथून पुढे कवितेच्या प्रकटनासाठी, अभिव्यक्तीसाठी कधीही वापर होणार नाही हे निश्चित.
मग आपण कशाला जातोय? जाऊ या परत.
तरीही माझी पावलं आय.सी.यू.तनं पुढे सरकतात.
कधी कधी वाटतं, एका टप्प्यावर कवी की कविता, कला की कलाकार, असा चॉइस उभा राह्यला तर आपल्याकडून काय निवड होईल? बहुधा कवितेचाच चॉइस होईल, कलेलाच प्राधान्य मिळेल. कवी, कलाकार बाजूलाच ठेवला जाईल.
खरं सांगायचं तर कोणत्याही तथाकथित प्रसिद्ध कलाकार आणि मोठ्या माणसांबाबतचा माझा पूर्वानुभव फारसा बरा नाही. त्यात त्यांचा दोष आहे असं मुळीच नाही; पण शक्यतो त्या फंदात पडू नये, ही माझी अनुभूतीतून घडलेली धारणा आहे. त्यामुळे पूर्वीपासनंच कवी अथवा कोणताही कलाकार दोन रूपांतच बघायची स्वत:साठी सोय लावून घेतलीय.
एक कवी, कलाकार, कलाकृतीचा निर्माता आणि दुसरा माणूस म्हणून.
त्यात गल्लत करायची नाही. कोणत्याही कारणाने ह्याला तो आणि त्याला हा, हे असं समजायचं नाही हे पक्कं. चुकूनही तसं झालं तर त्या संबंधातला कुणी तरी अनिवार्यपणे नातेसंबंधातील मालकी हक्काच्या सापळ्याचा बळी होतो आणि मग कलावंत तर दुरावतोच, पण कलाकृतीही नकोशी होते. नात्यात सांडलेल्या रक्ताचे ठसे कलाकृतीवर, प्रत्येक अभिव्यक्तीवर स्पष्ट दिसत राहतात. आपण एक्स्प्लॉइट केलो जातो आहोत हे जाणवून सलत रहातं. त्यातनं सावरणं दुरापास्त होऊन बसतं.
नुसत्या कवितेला सामोरं जायचं निश्चित केलं तर हे तरी टळतं. हा मार्ग भला नाही हे खरं, पण त्यातनं फार प्रश्न उभे राहत नाहीत. कलावंताचे मातीत बरबटलेले पाय बघणं काही अंशी तरी टाळता येतं.
वैयक्तिक संबंधात उभ्या राहणाऱ्या अवघड जागांतून सहज सुटकेचा मार्गही उपलब्ध राहतो.
यदाकदाचित ती वाट वापरायची वेळ आलीच, तर
शहाण्या मुलांनी रडावे कशाला?
दु:खास व्हावे असे पारखे....
अशी स्वत:ची समजूतही काढता येते आणि स्वत:लाच होणाऱ्या वेदनेला मर्यादेत ठेवता येतं.
मात्र, कवितेची-कलाकृतीची निवड केली की सगळं आलबेल असं मुळीच होत नाही. त्यात वेगळाच व्यूह सामोरा येतो. अशा निवडीतनं केवळ उपलब्ध साहित्यच आधाराला घ्यायचं आणि त्याच्या निर्मिकाकडे म्हणजेच या माणसाकडे, त्याच्या व्यथा- वेदना-यातना-क्लेश सगळ्याकडे डोळे झाकून घ्यायचे, आपला संबंध फक्त क्रिएटिव्हिटीशी, असं म्हणत साध्या साध्या मानवी प्रतिसादांसाठी तडफडणाऱ्या देहाकडे दुर्लक्ष करायचं का, असा प्रश्न छळायला लागतो.
त्यात आमच्या वैद्यकीय व्यवसायाचं स्वरूपच असंय, की पहिल्यांदा सामोरा येतो तो माणूस आणि त्याच्या वेदना
ओळखीच्या वाऱ्या
तुझे घर कुठे सांग
गरुडाच्या पंखांमधे
डोंगरांची रांग
या ओळी लिहिणाऱ्या ज्या माणसाने लिहिल्यात ना, ते हे गृहस्थ. त्यांना लिव्हरचा रोग झालाय, असं आपापसात कधी बोललं जात नाही. त्याऐवजी, ह्यांना लिव्हर मॅलिग्नसी आहे, सेकंडरीज आल्यात, असायटिस व्हायला लागलाय... हे म्हणजे, तुला आठवतंय का ‘ओळखीच्या वाऱ्या...'? चंद्रमाधवीचे प्रदेश किंवा ती गेली तेव्हा रिमझिम ......त्या ओळी ह्यांच्या अशाच अपरिहार्यपणे प्रकट होतं. दुर्दैवाने माणसांपेक्षा त्यांचे रोग हीच त्यांची ओळख बनते.
सगळ्या श्रेष्ठ कलावंतांचं हे भागधेय म्हणायचं का प्राक्तन? का त्यांनी ओढवून घेतलेली परिस्थिती?
आपल्याला भेटला तो कोण? कवी, माणूस, का कविता लिहिणारा माणूस?
सरांच्या आवडत्या श्री चक्रधरांच्या भाषेत म्हणायचं तर, हे हत्ती आणि जन्मांधांच्या दृष्टांतासारखं आहे.
वाट्याला येईल ते रूप हा वर्णनाचा आधार; परंतु सगळी वर्णनं अपुरी, अपूर्ण. आणि सगळ्या वर्णनांची बेरीजही त्यातल्या चैतन्याचा संदर्भ घेत नाही तोवर अपूर्णच.
तसंच कुणाही माणसाला भेटणं. तुकड्यातुकड्यांतच माणूस आपल्या वाट्याला येतो. त्याचं ते रूप पूर्ण नसेल. नव्हे, नसतंच कधीही; पण म्हणून ते खोटं असतं असंही मुळीच नाही. त्या अपूर्ण रूपातही जिताजागता माणूसच वाट्याला आलेला असतो. त्याला समजून घेण्यासाठी आपल्या आकलनाच्या मर्यादा कितपत विस्तीर्ण करता येताहेत हा ज्याच्या त्याच्या क्षमतांचा भाग. क्षमतांचा आणि इच्छांचाही. वैद्यकीय व्यवसायात ह्या क्षमता, हे भान नंतर नंतर मर्यादित व्हायला लागतं. रोग आणि उपचार हाच संबंधांचा पाया बनतो आणि त्यात भली भली माणसं लीनदीन होऊन जातात.
समोरची खोली. उघडं दार.
दारासमोरच असलेला, डोळ्यांत थेट घुसणारा पण आता संपूर्ण शांत असलेला ईसीजीचा मॉनिटर. तो चालू आहे एवढं दाखवणारा दिवा वगळता त्यावर इतर काहीही दिसत नाही. हा मॉनिटर उणा केला तर ही आयसीयूची रूम वाटू नये इतकी साधी खोली आहे.
कॉटवर ठेवलेला देह. पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला. गळ्यापर्यंत साधी चादर ओढलेला.
राघव (सरांचा मुलगा) तिथे उभा आहे. मी त्याच्या जवळ जातो. खांद्याभोवती हात टाकतो. त्याचा हात माझ्या हातावर विसावतो.
‘ॲगनी तो खतम हो गयी।' दीर्घ सुस्कारा सोडत तो म्हणतो. ‘आता कोल्ड रूमला ठेवू. मग दुपारी नागपूरला....' तो आपुलकीने सांगतो.
मी नुसतीच मान डोलावतो. काही क्षणांनी तो बाहेर जातो. त्याच्यासोबत आलेली सिस्टरही.
आता त्या खोलीत मी आणि तो देह.
गावात पोचलो तेव्हा
उशीर झाला नव्हता
झाडाच्या खाली एक
संन्याशी निजला होता
असं म्हणणारा हा माणूस आत्ता माझ्यासमोर पडलाय. मला उशीर झालाय आणि तो कायमकरता निजून गेलाय.
‘मी द्वैती. आय ॲम अ ड्युॲलिस्ट. भक्तीची भावना मला समजते. ज्यांच्याकडे ती आहे त्यांचं मला कौतुक आहे. मी तिचा आदरही करतो. आणि म्हणूनच सामीप्य, सारुप्य, सायुज्य असं करत मी परमेेश्वर होण्याची कल्पना मला मान्यच नाही. मी तूच झालो तर मी गुणगान कुणाचं गाऊ आणि प्रार्थना कुणाची करू? नो सर, तो तो आहे आणि मी मी आहे. तुमच्या या सुंदर मराठी भाषेतला छोटा कवी.
छोटा, पण लहान नाही.'
पुढे होत मी कपाळावर हात ठेवतो.
अंगभर सरसरत जाणारा थंडगार स्पर्श. हा शवाचा स्पर्श. प्राण गेल्यानंतरच्या अचेतन शरीराचा स्पर्श.
हा मला परिचित आहे. देह कुणाचाही असला तरी हा मात्र सगळ्यांचा सारखाच असतो.
सगळे जगताना वेगवेगळे, एकमेकांपासनं दूर, कुणाचाही कुठल्याही प्रकारचा स्पर्शसंपर्क टाळत, स्वत:च्या वेगळेपणाचे ढोल बडवत किंवा त्याने खंतावत आपापल्या बेटांवर जगतात; पण शेवटी कोणत्याही स्पर्शाच्या पार निघून जात थंडगार होऊन जातात.
नाग, कूर्म, क्रुकर, देवदत्त आणि धनंजय या पाच उपवायूंपैकी धनंजयाची ही उपस्थिती.
मृत्यूनंतरच्या देहाच्या अवस्थेला, त्या फुगण्याला तोच कारणीभूत.
गच्च ओठ आवळून उभाय मी. एकीकडे मला जे घडलंय त्याचं आकलन नेमकेपणाने झालंय. हा माणूस संपला. ह्यात कोणताही बदल संभवत नाही. आपण ह्या माणसाशी पुन्हा कधीही बोलू शकणार नाही हे मला निखालस नि:संदिग्धपणे कळलंय, आणि तरीही मूर्ख, बावळट, अक्कलशून्यपणे समोरच्या त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या देहाला मी मनातल्या मनात पुन्हा पुन्हा विचारतोय,
‘कसे आहात सर?'
‘ मी ग्रेससारखाच आहे. जराही कमी नाही आणि किंचितही अधिक नाही,' असं उत्तर येईल अशी माझी अतार्किक अपेक्षा आहे.
सरांना फोन केला आणि तुम्ही कसे आहात, असं विचारलं की त्यांच्या बाजूने हमखास होणारी ही संवादाची सुरुवात. आपण पुढे काही म्हणायच्या, कोणतंही उत्तर द्यायच्या आत सर पुढे बोलायला सुरुवात करायचे,
‘मी आणखी कसा असू शकतो ना सर, ग्रेससारखाच असणार. मी ग्रेससारखाच आहे, ग्रेससारखाच राहतोय आणि ग्रेससारखाच टिकतोय. एवढं तर सांभाळायला हवं ना सर या आजूबाजूच्या नरकात?'
फोनवरचं संभाषण असूनदेखील समोर बसून बोलत असल्यासारखी उत्कटता, अतिशय आपुलकीचा स्वर. चुकूनही अरेतुरेची भाषा नाही,
‘कार्यक्रमाचं ऐकलं सर. ‘अज्ञात झऱ्यावरती रात्री, मज ऐकू येतो पावा' आधीच्या ओळीसकट का नाही घेतलं?' आपण विचारलं की, मनापासनं हसत,
‘मला अपेक्षा होतीच तुम्ही हे विचाराल म्हणून!' हे उत्तर यायचं आणि लगोलग,
मन कशाऽऽऽऽत लागत नाही
अदमास कशाऽऽऽचा घ्यावाऽऽऽऽऽ
अज्ञाऽऽऽत झऱ्यावरती रात्रीऽऽऽऽ
मज ऐऽऽऽऽकू येतो पावा...'
असं सांगत सर चरण पुरा करायचे.
‘इचलकरंजीला अचानक सुरू झालेला सिलसिला आहे सर. कल्पनाही नव्हती असं काही होणार आहे म्हणून. हृदयनाथच्या आग्रहाने सामोरा गेलो. सगळं श्रेय त्याचं. आज आठवतही नाही, कधी सुरुवात झाली, काय बोललो, कोणतीच पूर्वतयारी नाही. सगळं उत्स्फूर्त... कवितेसारखंच. बट माय मास्टर इज व्हेरी काइंड सर...ही सेव्ह्ड मी... ही सेव्ह्ड हिज ग्रेस. हिज अँड माइन टू... आताही तसंच आहे. काय होणार, काय बोलणार याचा अंदाज नाही. शोभा झाली नाही म्हणजे मिळवलं. कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारल्यापासनंच ॲटॅक आलाय. खोल गर्तेत आहे सर.. प्रचंड डिप्रेशन.... अंगभर पसरून राह्यलेलं, पार पेशीपेशींना ठणका लावणारं... अफाट डिप्रेशन... काही सुचेनासं झालं म्हणून इथे माझ्या आवडत्या मंदिरात आलोय सर.... ए सेक्रेड प्लेस व्हेअर ऑल ऑफ अस आर इक्वल अँड अवर हार्ट्स सरेंडर टु दि... दुवा मांग रहा हूँ सबके लिए...अपनी बेइज्जतीसे कुछ फर्क नहीं पडता, लेकिन उसका... दॅट मास्टर अँड माय मदर हू गिफ्टेड मी द सो कॉल्ड पोएट्री इन युअर ब्यूटिफुल लँग्वेज मराठी... उनकी... उनकी इज्जत का तो खयाल रखना चाहिए सर.... पत्रिका पोहोचली का तुमच्याकडे?'
‘अजून नाही, पण मिळेल. ट्रान्झिटमधे असेल सर '
‘आय विल कुरियर इट जस्ट नाऊ. तुम्हाला दोन पत्रिका मिळाल्या तर हरकत नाही, पण मिळाली नाही असं होता कामा नाही. माझी अटच आहे. मी कार्यक्रमाला उभा राहणार असेन तर माझ्या मेलिंग लिस्टला पत्रिका पोहोचल्याचं कन्फर्मेशन यायलाच हवं. आणि अशी आहे तरी किती माणसांची माझी लिस्ट?'
प्रार्थनेतून कणाकणाने परमेश्वरच झरत असतो, असं म्हणणारे माझे हे मित्र मग इतर चौकशा करत. हवापाण्याच्या गप्पा, होऊ घातलेल्या एखाद्या कार्यक्रमाविषयी, त्याच्या तपशीलांविषयी काही बोलणं आणि शेवटी,
‘प्लीज प्रे फॉर मी इफ यू कॅन. असलात पुण्यात तर नक्की कार्यक्रमाला या. ऐन वेळी रंगमंचावर कोसळायला झालं तर आपली चार माणसं सावरायला, आवरायला, उचलायला आणि खांदा द्यायला तर हवीत. त्यासाठी तरी या.' असं आग्रहाचं आमंत्रण.
आता सर, तुम्ही कायमचे कोसळलात. आता खरंच खांदा द्यायची वेळ आली.
तुमचं लिखाण आमच्यासोबत आहे, तुमच्या कविता आहेत, वगैरे सगळं बोलायला बरंय.
पण असं काही नसतं. तुम्ही गेलात म्हणजे गेलात.
‘रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेलं तेव्हा सीता त्या वाटेवर दागिने सोडत गेली. लक्ष्मणाने ते दागिने ओळखले आणि सीतेला पळवून नेताना कुठली वाट वापरली याचं अनुमान रामाला सांगितलं.
लक्ष्मणाला दागिनेच ओळखता आले सर, सीता नाही. आणि रामाला सीता ओळखता आली पण तिच्या हट्टासमोर निग्रहाचा नकार उभा करता आला नाही. ही स्खलनशीलता नव्हे तर पुढे घडणार आहे त्याची नांदी, जवळजवळ पूर्वअटच सर. आता हे घडल्यामुळे पुढे घडलं काय, तर सीताच उणी होऊन गेली रामाच्या, लक्ष्मणाच्या आणि त्या वनाच्याही आयुष्यातनं.... तिला पुन्हा आयुष्यात प्रस्थापित करायला, त्या वेदनेवर उपाय योजायला रामाला युद्ध करावं लागलं. ही रामायणातली वेदना आणि हेच कलाकृतीचं रामायण सर. हेच आणि असंच उणेपणाचं रामायण कलाकृतीबाबतही घडत असतं सर.
कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीच्या क्षणात त्या कलाकाराच्या अवयवपिंडाचा काहीएक भाग कायमकरता उणा होत असतो. तो कधीच भरून येत नाही. कलावंताच्या देहाचं ते शाश्वत नुकसान असतं सर. तुम्हाला सांगतो, माडगूळकरांनी एक लखलखती सौदामिनी ओळ लिहून ठेवलीय... ‘उमा म्हणे लग्नी माझे जळाले माहेर...' काय ओळ आहे! लग्न हा कलाकृतीच्या निपजाचा संभवक्षण, त्यात जळून जाणारं माहेर, हा कवीचा शारीर भाग आणि उमा ही ती प्रतिभा. त्या भोळ्या शंकराची पार्वती आणि शंभूची शांभवीही तीच. मी माझ्याच कवितेत लिहिलंय ना, की माझ्या आईचं नाव सुमित्रा होतं. मग मला सौमित्र म्हणा ना.... हा जसा माझा आईबाबतचा प्रश्न आहे ना, तसंच शंकराला भैरव म्हणता तर उमेला भैरवी का नाही हो? तुमचा कुठला भैरव विचारतोय का उमेला,
तू हलकेच मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा;
संन्यस्त सुखाच्या काठी
वळिवाचा पाउस यावा.....'
कुणीही बोलणार नाही हे आमच्याशी.
एक भाग संपून गेला. कायमचा. जाऊ द्यात.
तुमची वेदना तरी संपली. त्याचंच जरा मोल. तेच आळवून आळवून बोलायला लागणार.
आम्ही बोलूही. ज्यात तुमचा काडीचाही सहभाग नव्हता त्या कॅन्सरच्या दुखण्याशी तुम्ही कसे शौर्याने झुंजलात याची वर्णनं काही काळ चोखतही राहू. असं काही नव्हतं हे नक्की. आणि कशाला असावं?
तुम्हाला खूप त्रास झाला हे खरं.
गेले पाचएक महिने तुमचं पहिलं वाक्य असायचं,
‘फ्रोझन पेन..... फ्रोझन पेन आहे सर पायात. तळपायापासनं ते वरपर्यंत. बर्फाच्या लादीच्या आत कुणी तरी एखादी ज्योत पेटवून ठेवावी अशी.'
शेवटच्या सोनोग्राफीच्या वेळी तुम्ही खरंच खचून गेला होतात. यातनेने तुम्हाला रडू फुटलं होतं.
‘आय डोन्ट थिंक, आय विल कम आऊट ऑफ इट' म्हणाला होतात. काही तरी समजूत घालायची म्हणून काही तरी बोलत होतो. एका क्षणाला तुम्ही हातावर हात ठेवलात आणि म्हणालात,
‘गुरुजी...
वेदनेत नसते वीण
पडछाया तुडवित जाणे
अंगाईत फक्त मुलींना
तू सांग एवढे गाणे
मी खरेच दूर निघालो
तू येउ नको ना मागे
पाऊल कुठे तरि वाजे
हृदयाचे तुटती धागे
मला किती दुखतंय तुम्हा कुणाला कळणारच नाही.... कळणारच नाही.'
तेच आपलं शेवटचं बोलणं. नंतर तुम्ही काहीही कळण्याच्या पारच निघून गेलात. देह झगडत राह्यला.
फिकुटलेली पिवळसर त्वचा, खोल गेलेले, मिटलेले डोळे. नाकात कापूस. गेल्या काही दिवसांत पूर्वीच्या दिवसांची आठवण देणारी वाढलेली दाढी. डोक्यावरही आलेले केस. ओठ थोडे उघडे. प्राण तिथनंच गेला असावा असं वाटवणारे. कपाळावर दोन तपकिरी खुणा. छोट्या बिस्किटाच्या आकाराच्या. हलकीशी आठी. कदाचित अंतिम वेदनेची शेवटची खूण.
माझ्याकडे पळून जाण्याचं धैर्य नाही आणि नुसतं उभं राहण्याची हिंमतही नाही अशी विचित्र कात्री.
Hardly had passed the funeral train,
so long delayed by wind and snow..
how they will reach the destination
perhaps tomorrows dawn may know....
‘वुदरिंग हाइट्स' लिहिणाऱ्या एमिली ब्राँटेची ओळख तिच्या या वचनाने तर करून दिली होती. ‘राजपुत्र आणि डार्लिंग'मधे होतं हे बहुतेक. असा ‘संध्याकाळच्या कवितां'मधे सॉमरसेट मॉम होता. कवीच्या देखण्या अक्षरातनं, हस्ताक्षरातनं सांगत होता,
It is not the pity that men become old or die, but cease to love......
पहिल्यांदा माझ्या डोळ्यांत अपरिचितपण उमटतं. हा तो देह नाही, जो म्हणाला होता,
‘पर्यटकाची पादत्राणे झिजत असतातच. यात्रिकाचे पाय खडावांनी रक्तबंबाळ होतात. पादत्राणे मुळातूनच पर्यायी असतात. त्या खडावा आणि त्यांना तोलून धरणारी ती जमीन यांतल्या द्रौपदीच्या चिंधीएवढ्या अंतरअंतरायात सीतेसारखे स्वयंभू शिल्प जन्माला येत असते.'
हा तो लेखक नाही, जो अत्यंत आपुलकीने, क्वचित अतिरेकी हळवेपणाने, सकाळच्या वेळी,
‘शिशिरमुद्रांना जपण्याचा प्रश्न सुरक्षित राहू शकतो
तळहातावरून शीळ गेली की पानगळीचा कोमल वारा?
शर्यतीत थकलेले घोडे कुरण सोडून भटकतात,
बघता बघता चार माणसं ढगांना खांद्यावर घेत दूर निघून जातात...'
असं म्हणत शब्दांचं शिल्प, नादाचं गारूड उभं करायचा.
हा जिताजागता देह कालपर्यंत मी बघितलेला आहे. त्याचा हात हातात घेतलेला आहे, त्याला स्पर्श केलेला आहे. उजव्या हातातल्या पहिल्या बोटातली अंगठी आत्ता नसली, मनगटावर चढवलेली तीन कडी नसली तरी हे शव मी सरावाने ओळखू शकतोय.
मात्र
जीव फकिराचा मोज । जीव पासरीने मोज ।
बाळ भिक्षेला निघाले । स्तन वाढताती रोज ।
हे म्हणणाऱ्या आणि ‘कलावंताचं नेतृत्व फक्त आणि फक्त त्याची कलाकृतीच करीत असते' असं वारंवार ठासून मांडणाऱ्या त्या कवीचं हे कलेवर नाही.
हा आठव्या मजल्यावरच्या उजवीकडच्या पहिल्या खोलीतला हा माणूस नाही.
कसा असेल? ही कुठे ती खोली आहे? हे आयसीयू....
हा लिव्हर कॅन्सरने नुकत्याच गेलेल्या ग्रेस नावाच्या माणसाचा देह.
मी त्या कपाळावरनं हात फिरवतो. स्वत:च स्वत:ची समजूत काढणं, दुसरं काय?
नमस्कार करतो आणि बाहेर येतो.
आत एकटा देह.
मिथिला अजूनही कोचावर बसलीय. मी तिच्या शेजारी जाऊन बसतो. पुन्हा शांतता.
ती हातावर हात ठेवते आणि मोठ्या बहिणीने सांगावं तशी सांगते,
‘नो कंडोलन्सेस समीर. ही इज देअर. झाडात, पानात, फुलात, फळात, नदीत, पर्वतात....ही इज एव्हरीव्हेअर. प्लीज.'
मी काय बोलणार?
मागून स्ट्रेचरचा आवाज येतो म्हणून मी वळून बघतो.
पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला सरांचा देह स्ट्रेचरवर आहे. तोंडदेखील आता झाकून घेतलंय. त्यामुळे हे कोण आहे, देह कुणाचा, काहीही कळत नाही. आसपासच्या माणसांनाही अंदाज लागत नाही.
नकळत उठून त्या स्ट्रेचरसोबत मी चालू लागतो, शवागाराच्या दिशेने.
दरवाज्यातनं उजवीकडे वळताना मागे विशिष्ट उथळ पद्धतीने विचारलेला प्रश्न कानावर येतो,
‘किती वर्षांचे होते ते?' ती मुलगी मीडियातली आहे हे स्पष्टपणे जाहीर करण्यासाठी यापेक्षा वेगळ्या कोणत्याही उद्घोषणेची आवश्यकता नाही. तिच्याशेजारनंच तर आम्ही पुढे आलो. पोहोचली ही मंडळी.
‘चौऱ्याहत्तर.....सेव्हन्टी फोर...' मिथिलेचं उत्तर संपत असतानाच आम्ही आणखी चार पावलं पुढे गेलोय.
‘ओके' अतिशय कृत्रिम स्वरातला आभारवाचक तुकडा भिरभिरत अंगावर पडतो.
मृत्यूचा तवा तापायला झाली सुरुवात.
आता सगळ्यांची, कणकेच्या त्या एका तुकड्यासाठीची लसलस आणि आपल्याच अर्ध्या कच्च्या पोळीच्या प्रथमपणासाठीची कंठाळी जाहिरात..... मरणाचा उत्सव सुरू.
ब्रेकिंग न्यूज, बातम्यातनं सतत घसाफोड, मोठ्यामोठ्यांच्या मोठ्यामोठ्या प्रतिक्रिया; त्यांना झालेल्या उदात्त, भव्य दु:खांविषयीच्या आपल्या व्हॉयुरिस्टिक अपेक्षा पुऱ्या करणाऱ्या रचना, गेल्या माणसाच्या निमित्ताने स्वत:च्या मोठेपणाच्या आरतीचं जाहीर प्रदर्शन, जुन्या मुलाखती, त्या त्या माणसांबरोबरचे फोटो, पुस्तकांची कव्हरं.... सगळं आता सतत दिसणार. कवितांचं वाचन किंवा गायन. तीच तीच दृश्यं आणि तसंच दु:खाकरताचं वारंवार आक्रस्ताळी आवाहन. सगळं चालू.
यातल्या कितीकांच्या लेखी
दु:ख भराला आले म्हणजे चंद्र नदीवर येतो
पाण्याचे अस्तर सोलुन बिंब तळाशी नेतो
असं सांगणाऱ्या एका कवीचं संपून जाणं थोडंफार महत्त्वाचं आहे? कुणाला त्या गेलेल्या कवीविषयी, त्याच्या कवितेविषयी सवंग बातम्यांपलीकडे थोडी तरी आपुलकी आहे?
जातिवंत कवीचा मृत्यू ही भाषेच्या आत्म्याला झालेली दुखापत असते ह्याच्याशी कुणाला काय घेणं पडलंय? कितीजणांना जाणवतं, की कवी जातो तेव्हा भाषेच्या भिंतीतला फार महत्त्वाचा चिरा निखळून पडत असतो? कुणाला मनात तरी येतंय का, की आपल्या अस्तित्वामुळे आणि विचारामुळे जन्माला आलेल्या या काळाला पेलून धरणाऱ्या, त्याचं उन्नयन करणाऱ्या आणि त्याच्या समृद्धीत विधायक भर घालणाऱ्या भाषेचं, आपल्या जगण्याचं आणि वैयक्तिक स्तरावर आपलंही आता कायमकरता मोठं नुकसान झालेलं आहे म्हणून, भाषेने स्वत:चा एखादा महत्त्वाचा अवयवच गमावलाय म्हणून?
थोड्याफार सुखद-दु:खद रंजकतेपलीकडे कुठल्या तरी कवीला आपल्या जगण्यात काही थोडं स्थान तरी आहे का? कसला कवी न कसलं काय....जेवढ्यास तेवढं सगळं...! जरा मजा आली, वेळ बरा गेला.....बास !
आपली तरी का अपेक्षा आहे सगळ्यांकडून संवेदनशीलतेची? अशी अपेक्षा करणारे आपण कोण शहाणे?
तेवढ्यात खिशातला मोबाइल वाजतो.
‘डॉक्टर, मला चार कविता सांगा ना, आणि एखादी आठवण ....म्हणजे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला प्रोजेक्ट करणाऱ्या अशा काही गोष्टी, म्हणजे फार कळणार नाहीत अशा नको, पण अगदी रूटिनली पॉप्युलर असलेल्याही नकोत. जरा डिफरण्ट... उद्याच्या एडिशनसाठी.'
शरमेने मान खाली घालत खिशात हात घालून मी मोबाइलचा गळा आवळतो.
माझ्या त्या खिशात आत्ता, या क्षणी अठ्ठावीस जानेवारी वीसशे बारा अशी तारीख घातलेली एक चिठ्ठी आहे.
साहित्य अकादमी पारितोषिक स्वीकारताना करण्याच्या भाषणात तो मजकूर घालायचा का, अशी सरांची तेव्हा पृच्छा होती. तीत सरांनी लिहिलंय,
28 th Jan, 2012
`The time has come to say goodbye,
when I linger at this spot with a feel of melancholy.....
Nevertheless,
यह ठीक है मरता नहीं कोई जुदाई में
खुदा किसीको मगर किसीसे
जुदा न करें ।
मी ;
ग्रेस