आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

विनोद कुमार शुक्ल : शब्दांचा अद्भुत किमयागार

  • आसाराम लोमटे
  • 22.03.25
  • वाचनवेळ 21 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
vinodkumar shukla

प्रसिद्ध लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्या वयाची ऐंशी वर्षं उलटलेली आहेत. एखाद्या ओझ्याने दबून गेल्यासारखे जरा झुकलेले त्यांचे खांदे, जाड भिंगांच्या चष्म्यातूनही लकाकणारे निरागस डोळे... विनोदजींचं बोलणंही जणू त्यांच्या पुस्तकांच्या शैलीसारखंच प्रवाही, अकृत्रिम आणि सहज असतं. मी त्यांचं बहुतेक साहित्य तर वाचलेलं आहेच. त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याचा योगही तीन-चार वर्षांपूर्वी जुळून आला होता. विनोद कुमार शुक्ल यांच्या लेखनातलं सूत्र आणि त्या वेळी झालेल्या गप्पांमधून उकललेले काही धागे असा या लेखाचा ऐवज आहे.

विनोदजी हे हिंदीतले आजचे सर्वांत महत्वाचे लेखक आहेत. त्यांच्या कविता-कादंबऱ्यांची भाषांतरं केवळ भारतीय भाषांमध्येच नाही तर इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन अशा जगभरातल्या भाषांमध्ये झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांना आणि कवितांनाही पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शकांनी केलंय. त्यांच्या निर्मितीबद्दल वाचकांमध्ये प्रचंड कुतूहल असतं. त्यांच्या अनोख्या शैलीचे चाहते देशभर आहेत. या साऱ्या लौकिकाचा वारा विनोदजींना जराही स्पर्श करत नाही. ते स्वतःला ‘राष्ट्रीय' वा ‘जागतिक' समजून बोलतही नाहीत. त्यांची संवादाची पद्धत तर अगदी एखाद्या बुजुर्ग माणसाने आपल्या आयुष्याची गुपितं कोणताही खळखळ न करता उकलून दाखवावीत अशी. सध्या सगळीकडेच अष्टौप्रहर जणू आपल्याला कॅमेऱ्यासमोरच बोलायचं असल्यासारख्या थाटात बोललं जातं, स्वतःच्या निर्मितीसंबंधी कृतक विधानं केली जातात. त्या पार्श्वभूमीवर विनोदजींचं बोलणं अत्यंत नितळ, पारदर्शी वाटू लागतं. त्यांच्यातल्या माणूसपणाचा आरपार प्रत्यय येत राहतो.

...रायपुरात शिरल्यानंतर विनोदजींच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जरा शोधाशोध करावी लागते. कुठल्याही मध्यमवर्गीय माणसासारखं साधं घर. समोरच्या छोट्या हॉलमध्ये भिंतीवर लावलेली काही अमूर्त शैलीतली चित्रं. एका खुर्चीत विनोदजी बसलेले. अत्यंत आवडता लेखक समजून घेण्याचं आपलं अधीरपण किती तरी प्रश्नांच्या रूपाने बाहेर पडण्यासाठी धडपडत असतं. प्रामाणिक, नितळ शब्दांतल्या उत्तरांमधून अशा अनेक प्रश्नांचं निराकरण होतं.

विनोदजींचा जन्म राजनांदगावचा. तिथल्या कृष्णा टॉकीजसमोरच त्यांचं घर होतं. आई त्यांना सांगायची, ‘ज्या दिवशी कृष्णा टॉकीजचं उद्घाटन झालं त्याच दिवशी तुझा जन्म झाला...' आईविषयी त्यांच्या भावविश्वात खूप जागा आहे. त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी हे याआधीही सांगितलंय. आमच्या या गप्पांमध्येही त्यांनी आपल्या आईचा एक संदर्भ सांगितला- “पूर्वी जन्माची तिथी-तारीख कुणी काळजीपूर्वक लिहून ठेवायचं नाही. कुठल्या तरी नैसर्गिक घटनेशी वा एखाद्या ठळक प्रसंगाशी ते जोडलेलं असायचं. आमची आई हळद लावलेल्या धाग्यात एक बारीकसा हळदीचा तुकडा बांधायची. तीच ‘वर्षगाठ'... पुढे बोलाचालीत तेच ‘बसगठ' असं झालं. आम्हा तिघा भावांचेही हे धागे वेगवेगळे होते. प्रत्येक वाढदिवसाला या धाग्यात एक बारीकसा हळकुंडाचा तुकडा बांधला जायचा. आई थकत चालली तेव्हा तिच्या लक्षात यायचं नाही. जन्मदिवस माझा असायचा आणि गाठ माझ्या भावाच्या धाग्यात बांधली जायची.” हे सांगताना विनोदजी मंद असं हसतात.

vinodkumar shukla

विनोदजींना बोलतं केलं तेव्हा ते उलगडत गेले... लिहिण्याबद्दल ते बोलत राहिले. “जेव्हा तुम्ही लिहिणं सुरू करता तेव्हा न लिहिण्याचं जे एकटेपण असतं ते घालवण्यासाठी बराच काळ जातो. घरात जसं कुणी आल्यानंतर आपलं एकटेपण दूर होतं तसं. लिहिण्याच्या आरंभी तर हे एकटेपण पात्रांचं असतं. मग आपण विचार करतो, काही पात्रं नजरेत येतात. त्यातून कथेचं सूत्र मिळतं. लेखक सुरुवातीला ती पात्रं सोबत घेऊनच चालू लागतो. चल बाबा, तू चल माझ्यासोबत. नंतर पात्रं स्वतंत्र होतात. मग पात्रांमागे लेखक चालू लागतो. पात्र सांगतं की मी आता हे करू पाहतोय. मग लेखक तसं लिहीत जातो... आता कोणाचा रेटा असेल तर लिहितो, नसता मग स्वतःला इथे-तिथे हरवून बसतो.”

सुरुवातीला विनोद कुमार शुक्ल यांची ‘दीवार में एक खिड़की रहती थी' ही कादंबरी वाचली होती. (या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचं मराठी भाषांतरही साहित्य अकादमीनेच प्रकाशित केलं आहे.) त्याचा एक अमिट असा परिणाम मनावर उमटला होता. जे वाचलं ते सारंच अद्भुत होतं. तसं आपण वाचतो शब्दांच्याच माध्यमातून; पण इथे केवळ शब्द नव्हते, शब्दांच्या रूपाने चित्र होतं, संगीत होतं, दृश्य होतं. एवढी जादू खरोखर शब्दांमध्ये असते? स्वतःलाच चमकून प्रश्न पडावा अशा असंख्य जागा त्या कादंबरीत होत्या.

गोष्ट साधी होती, पण कथानकाच्या रूढ चौकटीला मोडणारी होती. या कादंबरीत ना मोठी उलथापालथ, ना वेगवान घटना, ना धक्का देणारं काही... तरीही कादंबरीने मनाचा ठाव घेतला होता. आपल्याच भोवतीची दुनिया जणू एका जादूत परावर्तित झाली असावी. कविता, कथा, नाट्य असं सारं काही या कादंबरीत सामावलंय असं वाटलं. रघुवरप्रसाद आणि सोनसी या नवविवाहित जोडप्याची ही गोष्ट. रघुवरप्रसाद एका छोट्या शहरात प्राध्यापक आहेत. एका छोट्या खोलीत या दोघांचा संसार सजलेला आहे. कधी गावाकडून आई-वडीलही येतात. पोराचा संसार पाहून त्यांना बरं वाटतं. या संसारात अभावही आहेत, पण त्याबद्दल कोणाचीच तक्रार नसते. हे जगणं त्यांनी आनंदाने स्वीकारलंय. याच खोलीच्या एका भिंतीत छोटी खिडकी आहे, जिच्यातून उडी मारून रघुवरप्रसाद आणि सोनसी बाहेर पडतात. त्या खिडकीच्या पलीकडे असलेलं जग जणू सुंदर स्वप्नासारखं आहे. या जगात पहाड आहेत, नदी आहे, पक्ष्यांचा कलरव आहे, तलाव आहे, त्यात विलसित झालेली कमळं आहेत, आल्हाददायी हवा आहे. एकान्तातले किती तरी क्षण दोघंही या ठिकाणी घालवतात. तलावात मनसोक्त डुंबतात, न्हातात. पण ही केवळ विवाहित जोडप्याची प्रेमकथा नाही. अतिशय साध्या-साध्या तपशिलात सौंदर्याच्या अनेक जागा इथे भरलेल्या दिसतात.

रघुवरप्रसाद महाविद्यालयात शिकवायला जातात. तेव्हा एके दिवशी त्यांना जायला टेम्पो मिळत नाही, पण त्यांना एक हत्ती दिसतो. हत्तीवर बसलेला साधू त्यांना बोलावतो आणि हत्तीवर बसवून महाविद्यालयात सोडतो. पुढे जणू हाच रघुवरप्रसाद यांचा दिनक्रम बनतो. हे त्यांचं बाहेरचं जग आणि घराच्या खिडकीतून उडी मारून ज्यात कधीही प्रवेश करता येईल असं स्वप्नवत जग, या दोन जगांची अजोड अशी सरमिसळ या कादंबरीत आहे. विनोद कुमारांच्या भाषेच्या छटा अक्षरशः मोहित करतात. यात अनेक गमतीच्या जागा आहेत. म्हणजे रघुवरप्रसाद आणि सोनसी मनाच्या भाषेत बोलू पाहतात. सोनसी एक सांगते, रघुवरप्रसाद वेगळंच ऐकतात, ते जे बोलतात त्यापेक्षा सोनसी वेगळंच ऐकते. दोघंही असं ऐकतात जे ओठावर आलेल्यापेक्षा किती तरी वेगळं आहे.

‘नौकर की कमीज' ही त्यांची पहिली कादंबरी १९७९ साली प्रसिद्ध झाली. या कादंबरीची निर्मितिप्रक्रियाही त्यांच्याच तोंडून ऐकली होती. “कादंबरीच्या निर्मितीमागचं कारण मोठं मजेशीर आहे. तेव्हा मला मुक्तिबोध फेलोशिप मिळाली होती. एक वर्षाची सुट्टी घेऊन ही कादंबरी लिहायची होती. त्या वेळी दरमहा एक हजार रुपये मिळणार होते. हे पैसे खूप होते. त्या काळी मी एवढ्या पैशांत सहा एकर जमीन घेऊ शकलो असतो, एवढं त्याचं मूल्य होतं. म्हटलंं, बरेच लोक टायपिंग मशिनवरच लिहितात, आपणही टायपिंग शिकावं. त्यात सहा महिनेे गेले. एकही ओळ लिहून झाली नव्हती. मग त्या वेळचेे सांस्कृतिक सचिव अशोक वाजपेयी यांना कळवलं, की मी सहा महिन्यांत काहीच लिहिलं नाही. हे सहा हजार रुपये मी परत करू इच्छितो. काही दिवस गेल्यानंतर वाजपेयींनी लिहून कळवलं, की तुम्ही लिहा किंवा लिहू नका, आम्ही तुम्हाला ही फेलोशिप दिलीय. मग मी विचार केला, अजूनही सहा महिने उरले आहेत. ते माझ्यावर एवढा विश्वास टाकतायत, तर लिहू... आणि लिहून झालं.”

कादंबरी लिहून पूर्ण झाली. निर्धारित कालावधीत हे काम संपवून एखादा प्रबंध सादर करण्यासाठी जावं तसे ते भोपाळला गेले. १३ फेब्रुवारीला मुदत संपत होती. विनोदजी ११ फेब्रुवारीला वाजपेयी यांच्या कार्यालयात पोहोचले. पण त्या दिवशी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचा मृत्यू झाला होता. दुखवटा पाळला गेल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. आता काय करावं असा प्रश्न त्यांना पडला. मग दुसऱ्या दिवशी ते पत्ता हुडकत अशोक वाजपेयी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. वाजपेयींनी त्यांना आत बोलावून घेतलं. चहा वगैरे झाला. ‘नौकर की कमीज' ही कादंबरी त्यांनी चाळली आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या भोपाळमधल्या सर्व मित्रांना त्यांनी घरी बोलावून घेतलं. त्याच ठिकाणी कादंबरीचं वाचन करण्यात आलं.

‘नौकर की कमीज'चं कथानक वेगळं, पण विनोदकुमार यांच्या खास आस्थेचं आणि अनुभवविश्वातलंच. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाचीच ही गोष्ट. या कादंबरीतही तशी कोणतीच विशेष अशी घटना नाही. खूप छोटे छोटे प्रसंग आहेत, पण त्यांना साखळीसारखं गुंफूनच एक सृष्टी उभी राहते. संतुबाबू हे सरकारी कार्यालयातले लिपिक. घर आणि कार्यालय अशा दोन टोकांवर ताणलेल्या तारेवर चालतानाचा हा त्यांचा प्रवास. तोल सावरणं हेच या कसरतीचं वैशिष्ट्य आणि ध्येयसुद्धा! कार्यालयाला सुट्टी असते तेव्हा संतुबाबू बेचैन असतात. ही सुट्टी काही केल्या अंगवळणी पडत नाही. सुट्टीचा दिवस बेकारीची आठवण करून देतो. जणू नोकरीपासून आपल्याला वेगळं केलंय असं वाटत राहतं. सुट्टीच्या दिवशीही ते कार्यालयात पोहोचतात. आपली नोकरी सुरक्षित असल्याचीच जणू खातरजमा करतात. कार्यालयाला तर कुलूप असतं. ते कामकाज करू शकत नाहीत. बाहेरच्या काचेवर खटखट वाजवतात, सरकारी फायलींवरच्या उंदरांना हुसकावून लावतात. त्यांना वाटतं, हेही सरकारी कामच आहे. आपल्या कार्यालयीन कामाचा भागच आहे. संतुबाबू इमानदार आहेत, पण त्यांचं इमानदार असणंच त्यांना अप्रस्तुत ठरवू पाहतं. आपण एकटे ही व्यवस्था तोडू शकत नाही, ती मजबूत आणि जटिल आहे. व्यवस्थेशी एकट्याने भिडणं शक्य नाही, हे ते जाणतात.

आपल्या नोकरशाहीचं आतून कुरतडलेलं जग या कादंबरीत दिसतं. व्यवस्थेशी विद्रोह करता येत नाही, पण आपल्या छोट्या वर्तुळात संतुबाबूंचा संघर्ष चाललेला असतो. जे अभावग्रस्त आहेत त्यांच्यात विद्रोहाची साधी ठिणगीही पेटणार नाही याची दक्षता घेत आपला वर्तनव्यवहार ठरवणारे धनिक या कादंबरीत येतात. आपण जे खातो त्या अन्नाची चवसुद्धा या लोकांच्या जिभेवर कधी जाता कामा नये. कारण हा स्वाद घेतल्यानंतर ते संघर्षाचा पवित्रा घेतील, इतपत ही खबरदारी घेतली जाते. थोडक्यात काय, तर ‘व्यवस्था' आणि ‘आम आदमी' यांच्यात चाललेल्या एका झटापटीचं चित्रण ‘नौकर की कमीज' या कादंबरीत येतं. नोकरशाहीवरचं तिरकस भाष्य, कल्पना आणि वास्तव यांच्या सरमिसळीतून साकारणाऱ्या कुरूप व्यवस्थेवरचा एक झगझगीत कटाक्ष यामुळे ही कादंबरी लक्षात राहते. शब्दांतलं वास्तव जणू एखाद्या अर्कचित्राप्रमाणे आपल्यासमोर रेषेतल्या फटकाऱ्यानिशी उभं राहतं. बाकी, या कादंबरीतही विनोदकुमार यांच्या भाषेची जादू आहेच. कादंबरीची सुरुवातच अशी होते, ‘कितना सुख था कि हर बार घर लौटकर आने के लिए मैं बार-बार घर से बाहर निकलूंगा।'

... ‘दीवार में एक खिड़की रहती थी' आणि ‘खिलेगा तो देखेंगे' या दोन्ही कादंबऱ्या विनोदजींनी एकाच वर्षात लिहिल्या आहेत. ‘नौकर की कमीज' हिंदी भाषेत प्रकाशित झाल्यानंतर १६ वर्षांनी म्हणजे १९९६ साली मराठी भाषेत या कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला. निशिकांत ठकार यांनी केलेल्या या अनुवादाला १९९९ चा साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे विष्णू खरे यांनी केवळ मराठी अनुवादाच्या पहिल्या आवृत्तीला प्रस्तावना लिहिलेली आहे. ‘कनिष्ठ मध्यमवर्गाची विसंगती गाथा' असं या कादंबरीचं त्यांनी वर्णन केलं आहे. ‘बहुतांश भारतीय समाज तऱ्हेतऱ्हेच्या मानसिक आणि भौतिक रोगांनी ग्रासला आहे, कारण तो अनेक पातळ्यांवर दहशत आणि असुरक्षितता यांनी वेढलेला आहे. त्याला आपल्या प्रत्येक हालचालीची भीती वाटते. आपल्या निष्क्रियतेची आणि डोक्याची पण भीती वाटते, कारण तो विचार करायचा कधी थांबत नाही. ‘नौकर की कमीज'मध्ये तो सगळा विद्रूपपणा, उपहास, परस्परविरोधी आकर्षण आणि दहशत आपल्या भयानक प्रामाणिकपणासह व्यक्त झालेली आहे', हे विष्णू खरे यांनी या कादंबरीसंदर्भात नोंदवलेलं निरीक्षण महत्त्वाचं वाटतं.

‘खिलेगा तो देखेंगे' ही विनोद कुमार शुक्ल यांची अफलातून कादंबरी आहे. या कादंबरीतला गाव, त्या गावातली माणसं एकाच वेळी वास्तवाच्या पटलावर आणि कल्पनेतही जगत असतात. खऱ्याखुऱ्या वास्तविक जगातले कोणतेच रूढ साचे या माणसांच्या जगण्याला नाहीत. कादंबरीतल्या माणसांची दुनिया वेगळी आहे. जणू एका जादुई अशा गावातच हे सर्व कथानक घडतं. विनोदजींच्या अद्भुत शैलीचा प्रत्यय याही कादंबरीत येतो. कादंबरीतल्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात वेगळ्या, वेधक अशा काही ओळींनी होते. या ओळी कवितेच्या जवळ जाणाऱ्या आहेत. या ओळींमध्ये विलक्षण तरलता आहे. एका प्रकरणाच्या सुरुवातीला पुढील ओळी येतात. त्यावरून विनोदजींच्या भाषिक सामर्थ्याचा प्रत्यय येतो.

तळ्याच्या वरच्या अंधारात आणि
पाण्याच्या आतल्या अंधारात काही
विशेष फरक नसावा. त्यामुळे
माशांना वरचा अंधारही पाणी वाटत असेल
पाण्यातल्या अंधारात पाणी होतं
जमिनीवरच्या अंधारात पाणी नव्हतं

‘दीवार में एक खिड़की रहती थी' आणि ‘खिलेगा तो देखेंगे' या दोन्ही कादंबऱ्याही निशिकांत ठकार यांनीच मराठीत अनुवादित केल्या आहेत (‘भिंतीत एक खिडकी असायची', ‘फुलेल तेव्हा बघू'). ‘पेड़ पर कमरा' या त्यांच्या कथासंग्रहाचा अनुवाद (‘झाडावर खोली') रमेश राऊत यांनी केलाय, तर प्रफुल्ल शिलेदार यांनी विनोदजींच्या ‘अतिरिक्त नहीं'चा अनुवाद ‘जास्तीचे नाही' या नावाने केलाय. विनोदजींचा वेधक परिचय मराठी वाचकांना पहिल्यांदा करून दिला तो ज्येष्ठ कवी, अनुवादक चंद्रकांत पाटील यांनी. ‘चौकटीबाहेरचे चेहरे' या पुस्तकात त्यांनी विनोदजींचं नेमकं व्यक्तिचित्र साकारलंय. यातून त्यांच्या लेखनाची सामर्थ्यस्थळं आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व या दोन्हींचाही परिचय होतो. विनोदजींच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह हिंदीतून मराठीत आणताना अनुवाद करवून घेण्यापासून ते छपाईपर्यंतच्या कामात चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा महत्त्वाचा आहे. त्यांनीच सातत्याने लक्ष पुरवून हे काम त्या-त्या वेळी करवून घेतलं. त्यांच्यामुळेच ‘नोकराचा सदरा' ही कादंबरी सुरुवातीला बाबा भांड यांच्या साकेत प्रकाशनामार्फत प्रकाशित झाली होती. गेल्या काही वर्षांत वाचकांसाठी ती उपलब्ध होत नव्हती. आता गेल्याच वर्षी समकालीन प्रकाशनाने ‘नोकराचा सदरा' आणि ‘फुलेल तेव्हा बघू' या दोन्ही कादंबऱ्या आकर्षक स्वरूपात मराठीत आणल्या आहेत.

गजानन माधव मुक्तिबोध यांच्या व्यक्तित्वाला विनोदजींच्या भावविश्वात विशेष असं स्थान आहे. विनोदजींनी या भेटीत त्यांच्या काही आठवणी जागवल्या होत्या...‘मुक्तिबोध आधी कप चाय को सिंगल कहते थे' असं सांगून त्यांनी थेट त्यांची चहा पिण्याची पद्धत ऐकवली. “मोठ्या चकचकीत हॉटेलात चहा पिणं मुक्तिबोध यांना आवडत नसे. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर ते जात आणि तिथे गेल्यानंतर ते अगदी आरामात बसत. असं बसणं त्यांना खूप प्रशस्त वाटायचं. मुक्तिबोध स्वतःला जास्तीत जास्त लपवत असत... यासाठी की अधिकाधिक एकान्त मिळावा. टपरीवर बसल्यानंतर ते म्हणायचे, ‘एक-एक सिंगल गरम लाना और साथ में ठंडा पानी लाना।' आधी थंड पाणी प्यायचे, त्यानंतर गरम चहा.”

स्वतः विद्यार्थी असल्यापासून विनोदजी मुक्तिबोध यांना ओळखायचे. अगदी १९५८ झाली ते राजनांदगावला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते तेव्हापासून. विनोदजींचे मोठे भाऊ मुक्तिबोध यांचे विद्यार्थी होते. एकदा त्यांनीच मुक्तिबोध यांना सांगितलं की माझा एक छोटा भाऊही लिहितो, कविता वगैरे करतो. तेव्हा मुक्तिबोध फारसे परिचित नव्हते. लोक ‘अज्ञेय', ‘भवानीप्रसाद मिश्र' यांना ओळखायचे. मुक्तिबोधांशी असलेल्या परिचयाचे धागे विनोदजी उलगडत होते- “मी आठ-दहा वर्षांचा असतानाच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. छोट्या काकांनीच आम्हाला सांभाळलं. घरात लिहिण्या-वाचण्याचं वातावरण होतं. ‘चांद', ‘माधुरी', ‘सरस्वती' यासारख्या पत्रिका त्या वेळी घरी येत असत. मुक्तिबोधांशी संबंध असण्याचं आणखी एक कारण होतं. माझे मोठे चुलत बंधू वैकुंठनाथ शुक्ल हे त्या वेळी नागपुरात राहायचे. वैकुंठपुर या भागात त्यांचं वास्तव्य होतं. मुक्तिबोधांशी त्यांचे थेट संबंध होते. मी साहित्याचा विद्यार्थी कधीच नव्हतो. हिंदीत तर नेहमी नापास व्हायचो, कधीच चांगल्या मार्काने पास झालो नाही. गुरुजी तर नेहमीच रागावत- तू चांगल्या पद्धतीने हिंदीसुद्धा लिहू शकत नाहीस. पुढे कृषिशास्त्रात अभ्यास करताना तिथे काही हिंदी नव्हती. तेव्हा मात्र चांगल्या मार्काने पास होत राहिलो.”

मुक्तिबोधांचे विद्यार्थी असलेल्या भावाने त्यांना विनोदजींबद्दल सांगितलं होतंच. मग एके दिवशी स्वतःच्या कविता घेऊन ते मुक्तिबोधांच्या घरी पोहोचले. मुक्तिबोधांची त्यांची पहिली भेट झाली तेव्हा विनोदजींनी दिलेल्या कविता मुक्तिबोधांनी पाहिल्या. कवितेबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत. जाता जाता विनोदजींना म्हणाले, “देखो भाई, तुम अच्छे से पढ़ाई-लिखाई कर लो। कविता तो होती रहती है। कमाने लग जाओगे तो कविता कर लेना। अभी कविता मत लिखो।” या बोलण्यानंतर विनोदजींना वाटलं, कदाचित आपल्या कविता त्यांना आवडल्या नसाव्यात. मग सुट्टीत ते यायचे, पण मुक्तिबोधांना भेटायचेच नाहीत. एकदा मोठ्या भावानेच सांगितलं, “अरे मुक्तिबोधजी तुझ्याबद्दल विचारतायत, तर तू त्यांना भेटत का नाहीस.” मग पुन्हा विनोदजींनी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली. कधी त्यांच्या कविता ऐकायच्या, तर कधी आपल्या कविता त्यांना वाचून दाखवायच्या, असं सारं चाललेलं होतं.

“.. मग एकदा माझ्या आठ कविता त्यांनी श्रीकांत वर्मा काढत असलेल्या ‘कृति' या नियतकालिकासाठी पाठवून दिल्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी शांताजींना सांगितलं, की अगं, याचं तोंड गोड कर. याचा संग्रह निघालाय. आता गेल्या काही दिवसांत मी याचा अंदाज लावतोय की माझ्या आठ कविता छापून येण्याला ते संग्रह का म्हणाले असतील... मुक्तिबोध स्वतः दीर्घ कविता लिहायचे. बऱ्याचदा त्या केवळ दीर्घ असल्याने छापल्या जात नसत. त्यांना ते बरं वाटत नसायचं. छोटी कविता लिहायचाही प्रयत्न करायचे, पण ते लिहू शकत नसत. त्यांना सांगायचं खूप असे आणि कमी शब्दांत ते सामावणं कठीण होतं. जेव्हा ते अगदी मरणाच्या दारात होते तेव्हा त्यांचा पहिला कवितासंग्रह छापून आला. तो ते धड पाहूही शकले नाहीत. त्यांना ते माहीतही झालं नाही.” मुक्तिबोधांनी श्रीकांत वर्मा यांना २ मे १९६० या दिवशी लिहिलेलं एक पत्र आहे. ‘विनोद कुमार हा एक बुद्धिमान तरुण असून त्याच्याकडे विशेष अशी काव्यप्रतिभा आहे. या हिऱ्याला पैलू पाडावे लागतील. त्याच्या कविता आवडल्या तर जरूर प्रकाशित करा,' असं या पत्रात मुक्तिबोधांनी नमूद केलं होतं. विनोदजींच्या लेखनसामर्थ्याची चमक खूप आधीच मुक्तिबोधांनी पारखली होती असं या निमित्ताने म्हणता येईल.

...मृत्यूच्या दाढेत असलेल्या मुक्तिबोधांचा तो काळ जणू विनोदजी वाचत असावेत, इतक्या बारकाईने सारे तपशील त्यांनी सांगितले. “सुरुवातीला मुक्तिबोधांना भोपाळला नेण्यात आलं. श्रीकांत वर्मा तेव्हा काँग्रेसचे महासचिव होते. एक पत्रकार म्हणूनही त्यांची पोहोच होती. मुक्तिबोधांना मग दिल्लीला नेण्यात आलं. अशोक वाजपेयीही होते त्या प्रक्रियेत. रोज सकाळी आकाशवाणीवर मुक्तिबोधांच्या प्रकृतीविषयी ‘बुलेटिन' दिलं जायचं. असं कधी कोणाबाबत घडलं नाही...” विनोदजींच्या बोलण्यातून मुक्तिबोधांचं हे मोठेपण वारंवार प्रतीत होत होतं. त्यांच्या एका विधानातून याची सार्थकता आणखी पटेल. “मैं तो कहता हूँ,

अपने बाएँ हाथ को जैसे बीते हुए समय में पचास साल तक कहीं ले जाऊँ और अपने दाहिने हाथ को आनेवाले पचास साल में बढाऊँ तो सौ साल मुझे मुक्तिबोध जैसा कोई दिखता नहीं,” असं विनोदजी सांगू लागतात तेव्हा पुन्हा त्यांच्या शब्दांत एखादं शिल्प साकारण्याच्या कलेचा साक्षात्कार होतो.

vinodkumar shukla

गद्यलेखन आणि कविता यातला फरक विनोदजी अतिशय मौलिक पद्धतीने सांगतात- “कादंबरीचं कसं असतं, की दीर्घकाळ तुम्ही एखाद्या कथानकाशी जोडलेले असता. त्याची साथ न सोडता, ते तुमची साथ सोडणार आहे असं वाटलं तरीही ती सुटू न देणं, एका अतूट बंधनात राहण्याचा प्रयत्न करणं, तेव्हा मग ती कादंबरी होते. कादंबरीला काही सूत्र तर नक्कीच असतं. कथा खूप कमी काळ तुमच्यासोबत असते. याउलट कवितेचं आहे. लिहायची म्हणून कविता लिहिणं खूप अवघड आहे. गद्य लिहिता लिहिता कविता सुचू शकते असा माझा अनुभव आहे. गद्य एक बहाना है कविता लिखने का... गद्य लिहिणं जवळजवळ ओबडधोबड रस्त्यावर चालल्यासारखं आहे. कवितेत मात्र अचानक ‘गहराई' येते. कमी शब्दांत तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त अभिव्यक्त करू शकता. कविता लिहिणं जवळपास लपाछपीचा खेळ आहे. गद्याचं तसं नाही. कधी कधी तर कविता एखाद्या न बोलावलेल्या पाहुण्यासारखी येते. असं वाटतं की कोण आलंय! आणि दरवाजा उघडल्यानंतर असं दिसतं, की अरे, ही तर कविता आहे! समजा एखादी कविता मला लिहायची आहे आणि ती मी आता लिहिली नाही, नंतर कधी तरी ती लिहिली, तर ती दुसरी कविता होईल.”

विनोदजींच्या कादंबऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी कविता आढळतात. गद्याची भाषा अचानक मितव्ययी रूप धारण करते. हा संक्षेप अर्थपूर्ण असतो. तसंच त्यांच्या कवितेतही कथ्य आढळतं. या कविता दुर्बोध नसतात. त्यांच्या कवितेला शब्दांचा अतिरेकी सोसही नाही. ती वाटते सहज-सोपी-साधी; पण जेव्हा आपण ती वाचून पूर्ण करतो तेव्हा तिने आपल्या अंतरंगाला भेदलंय याची जाणीव होते. भाषेतली जादुगिरी इथेही आहेच. माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आकांक्षांचा वेध ते कवितेतही घेतात. त्यांच्या कवितेत आदिवासींचं जग येतं, बिनचेहऱ्याची असंख्य सामान्य माणसं येतात. निसर्ग येतो तोसुद्धा मानवी संवेदनेच्या तरलस्पर्शी भावनेतून. एका कवितेत ते म्हणतात, ‘जे माझ्या घरी आजवर कधीच आले नाहीत, त्यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या जवळ जाईन. एक उधाणलेली नदी कधीच येणार नाही माझ्या घरी. नदीसारख्या लोकांना भेटण्यासाठी मी नदीकिनारी जाईन.' मग ज्यांना ज्यांना भेटण्याची असोशी आहे- त्यात पर्वत, तलाव, असंख्य झाडं, शेत असं सारं काही येतं- या सर्वांना मी एखाद्या जरुरी कामासारखं भेटेन, असं ते या कवितेत म्हणतात. ‘इसे मैं अकेली आखिरी इच्छा की तरह सबसे पहिली इच्छा रखना चाहूँगा-' इथे त्यांच्या भाषेतली कारागिरी आपल्याला मोहून टाकते. किंवा ‘आजकल उठने के लिए मैं सिर्फ नींद पर भरोसा करता हूँ।' हे विधान आपल्याला चकित करून टाकतं. किती तरी अमूर्त अशा गोष्टी विनोदजींच्या कवितेत मूर्तरूप धारण करतात.

मानवी संवेदनेला बधीर करणाऱ्या बाजारविश्वाचं चित्रण त्यांच्या कवितेत अनेकदा येतं. मानवी संबंधातला कोरडेपणा जाऊन जगण्यातली ओल टिकून राहावी याचं भान त्यांच्या कवितेत सदैव जाणवत राहतं. ‘हताशा से एक व्यक्ति बैठ गया था' ही तर त्यांची प्रसिद्ध कविता आहे. ‘निराशेने ग्रासलेल्या त्या व्यक्तीला मी ओळखत नव्हतो, पण त्याच्या निराशेला ओळखत होतो. म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. मी हात पुढे केला. माझा हात धरून तो उभा राहिला. मला तो ओळखत नव्हता, पण माझ्या हात पुढे करण्याला तो ओळखत होता. आम्ही दोघं सोबत निघालो. दोघं एक-दुसऱ्याला ओळखत नव्हतो, पण सोबत चालणं ओळखत होतो.' अशी ही कविता. सोबतीची ऊब आणि सकारात्मकता थेट आपल्यापर्यंत पोहोचते, हे विनोदजींच्या कवितेचं वैशिष्ट्य. एखाद्या वस्तूने आपली चमक दाखवून अदृश्य व्हावं, मात्र ती अनुभूती आपण कायम जवळ बाळगावी अशी, असं त्यांच्या कविता वाचताना कायम जाणवतं.

विनोदजींच्या कवितेत गरीब, दुर्बल, आवाज नसलेली माणसं येत राहतात. मात्र, ते आपल्या कवितेत त्यांचं हे दौर्बल्य घालवून टाकतात, त्यांना एक ठसठशीत ओळख प्राप्त करून देतात. त्यांच्या जगण्यातल्या अभावांनाही ते सुंदर करून टाकतात. माणसाचं जगणं गुदमरवून टाकणारं, त्याची घुसमट वाढवणारं पर्यावरणही विनोदजींच्या कवितेत येतं, पण ते त्यांच्या खास शैलीत. ‘सब की तरफ से वह बोलेगा, वही तो! कुछ बात नहीं कि जिसने मुझसे, चाय पीते हम दोनों सडक पर खड़े रहे चुपचाप वही!!' आणि मग त्यानंतर कवितेच्या शेवटी या दोन ओळी येतात, ज्या कवितेला असाधारण अशा स्थानी घेऊन जातात- ‘जब की पिछले दिनों कुछ गुंडों ने उसकी जुबान काट दी।' अर्थात, हे जीभ छाटणं प्रतीकात्मकही असू शकतं.

कादंबरीकार म्हणून असलेलं त्यांचं स्थान मोठंच आहे, पण त्यांच्या कवितेचाही स्वतःचा चेहरा आहे. ‘लगभग जय हिंद' (१९७१) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहानंतर ‘सबकुछ होना बचा रहेगा', ‘अतिरिक्त नहीं', ‘कभी के बाद अभी' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. यात ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहनकर विचार की तरह' यासारख्या लांबलचक शीर्षकाचा कवितासंग्रहही आहे. याशिवाय निवडक कवितांची काही संकलनंही आहेत.

विनोदजींच्या साहित्यकृतींची माध्यमांतरं झाली आहेत. आजही कुणी कुणी येतं, भेटून जातं, त्यांच्या कवितांचं अभिवाचन आपल्या आवाजात ‘यूट्युब'वर वगैरे टाकतं. कुणी एखाद्या कथेवर लघुपट करतो. नाट्यरूपांतरं चाललेली असतात. या साऱ्या नव्या पिढीच्या धडपडीत त्यांना मणी कौल यांची आठवण होते. एक हळुवार आठवण ते सांगू लागतात- “मणी कौल यांनी माझ्या ‘बोज', ‘पेड पर कमरा' या कथांवर लघुपटांची निर्मिती केली. ‘नौकर की कमीज'वर तर त्यांनी चित्रपट केला. पण ‘दीवार में एक खिड़की रहती थी' या कादंबरीवरही त्यांना चित्रपट करायचा होता. त्यांनी इंग्रजी पटकथा लिहिली. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला फोन आला होता. म्हणाले, मी आता तुमच्याकडे येऊ शकणार नाही आणि हा चित्रपटही आता बनवू शकणार नाही... मला वाटलं, चित्रपटासाठी काही आर्थिक अडचण असेल. मी म्हटलं, तुम्हाला जेव्हा चित्रपट करायचा तेव्हा करा... तर म्हणाले नाही, आता मी करू शकणार नाही. माझी पटकथा सांभाळून ठेवा, कोणाला देऊ नका, दाखवू नका... मला कॅन्सर झालाय. आता मी तुमच्याशी बोलतोय. आत्ताही मला बोलताना खूप त्रास होतोय.... मी फोनवर त्यांना म्हणत राहिलो, नाही... नाही. तसं काही होणार नाही... आपण बरे व्हाल. पण ते मात्र जास्त बोलू शकत नव्हते...” या सांगण्यानंतर काही क्षण एक पोकळी जाणवते. कोणीच काही बोलत नाही. त्यानंतर विनोदजींचा शब्द उमटतो, “त्यांची मुलगी शांभवी अमेरिकेतल्या एका विद्यापीठात असते. कालांतराने मग मी ती स्क्रिप्ट तिच्याकडे देऊन टाकली. मी म्हटलं, यावर माझा कोणताही हक्क नाही. त्या स्क्रिप्टची झेरॉक्स प्रत माझ्याकडे आहे, पण ती असून नसल्यासारखी... मी ती कोणालाही दाखवत नाही. आता ते दाखवण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे ...पण मणी कौल यांनी जी स्क्रिप्ट तयार केली होती ती अप्रतिम होती. वाचताना असं वाटतं की तुम्ही सिनेमा पाहताय. मणि कौल खरं तर सिनेमा कसा पाहायला हवा याचा एक दर्शकवर्ग तयार करू लागले होते... पण त्यांचं काम दृष्टिपथात येत असतानाच ते निघून गेले.” एका दिग्दर्शकाला दिलेला शब्द, त्यातून जाणवणारा निग्रह आणि शब्दांशी पक्कं राहण्याचा नेकपणा त्यांच्या बोलण्यातून दिसू लागतो.

लेखकाला स्वतःचा शोध आधी घेता आला पाहिजे. त्याची वाट त्याने एकट्यानेच निश्चित केली पाहिजे, असं आपण नेहमीच म्हणतो. साहित्याचं प्राणतत्त्व काय असावं याबद्दल विनोदजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले- “... सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहिण्याला मौलिकता प्राप्त कशी करून देता येईल ही आहे, आणि हे अवघड आहे. प्रभाव तर कोणाचा ना कोणाचा तरी पडतच असतो. कोणीच असं म्हणू शकत नाही की आमच्यावर कोणाचा प्रभाव नाही. पण तुम्ही जे लिहिता आणि जी गोष्ट सांगता ती मात्र तुमचीच असायला हवी. त्यासाठी जी चाळणी लागणार आहे ती कुठून आणणार?”

लिहिण्याच्या जबाबदारीबद्दल विनोदजींनी खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. “जे सांगायचं ते कधी संपत नसतं. छापल्यानंतर असं वाटतं की आपली सुटका झालीय; पण तसं होत नाही, पुन्हा लिहायची इच्छा होते. कोणताच लेखक त्याच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ असं लेखन करत नाही. सतत लिहिण्याचं तेच तर कारण असतं. आपण आतापर्यंत जे लिहिलंय ते चांगलं नाही असं समजूनच चाललं पाहिजे. आपण लिहिलेलं वगळून सर्वश्रेष्ठ असं लिहिण्याची जबाबदारी ही येणाऱ्या पिढ्यांची आहे असं मानलं पाहिजे,” असं ते मानतात.

अस्सल भारतीयत्व हा विनोदजींच्या साहित्याचा विशेष आहे. प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू यांच्यानंतर भारतीयतेचं प्राणतत्त्व जपणारं लेखन कोणाचं, असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर ‘विनोद कुमार शुक्ल' हेच आहे. व्यवस्थेच्या अक्राळविक्राळ जबड्यापुढे स्वतःला वाचवण्याची प्राणांतिक धडपड करणारा, जगण्याची अहर्निश झटापट करत स्वतःचं सत्त्व राखणारा त्यांच्या साहित्यातला आम माणूस जिवंत अशा संवेदनशीलतेचं आश्वासन देणारा आहे. आपल्या अनोख्या दृष्टीने काळ वाचणाऱ्या आणि या गुंतागुंतीच्या काळाला अद्भुत शब्दकळेत लिपिबद्ध करणाऱ्या या लेखकाचा ‘पेन नबोकोव' पुरस्काराने आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्थ गौरव झाला आहे. त्याचबरोबर या निमित्ताने श्रेष्ठ अशा भारतीय साहित्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं ही मोठीच उपलब्धी मानता येईल.

(अनुभव एप्रिल २०२३ मधून साभार)

आसाराम लोमटे | aasaramlomte@gmail.com

आसाराम लोमटे हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त परभणीस्थित लेखक-पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 6

Sham Kuljarni.24.03.25
Asaramji maza tumcha parichay nahi. Mi Sanju cha motha bhau Sham Kulkarni. Tumche loksatta madhale sagle lekh mi vachale aahet.Khup chan likhan aahe. Ha lekh thidya vela purvi Shreedhar ne dila mhunun he lihile. Asecha lekh tumhi pudhe lihavet hi apeksha. Dhanyawad.
Sunil manikrao jadhav Jadhav23.03.25
सर खुपच सुंदर
राजाराम झोडगे22.03.25
विनोदकुमार शुक्ल यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या लेखनाचा नेमका परिचय लेखाच्या माध्यमातून झाला.तसेच त्यांचे साहित्य वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारी आसारामजी लोमटे सर यांची शैली भावली...
Anna jagtap Jagtap22.03.25
जे सांगायचे ते कधी संपत नसतं ।।।।।
स सिद्धेश्वर एकनाथ नवलाखे बुलढाणा22.03.25
खुप सुंदर लिहिलंय.विनोद कुमार शुक्ला यांच्या समग्र साहित्याचा अत्यंत कमी शब्दात वस्तुनिष्ठ परिचय तुम्ही करून दिला आहे धन्यवाद
SHAMIN PADALKAR22.03.25
हिंदीमधील उत्तम लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मराठी भाषांतरे मिळवून वाचीन.
See More

Select search criteria first for better results