
मधमाशा म्हणजे कीटकांच्या दुनियेतील कुतूहलाचा खजिना. त्यांचं जग अनुभवायला मिळावं, त्यांचा स्नेह मिळावा यासाठी केलेल्या धडपडीची ही गोष्ट.
२ मार्च २०१९. मधमाशांनी भरलेली एक पेटी घेऊन आम्ही घरी चाललो होतो. गडहिंग्लजचे मधमाशीतज्ज्ञ पाटीलसरांनी आम्हाला राणीमाशीचा हा संसार थाटून दिला होता. याला पेटी भरणं म्हणतात. दिवसभर मधुरस गोळा करणाऱ्या मधमाशा संध्याकाळ झाली की पेटीत परत येतात. तो त्यांच्या शिस्तशीर जीवनक्रमाचा भाग आहे. मधमाशा पाळायला आणायच्या असतील, तर त्या पेटीत आल्यावर पेटी नीट बंद करून रातोरात आणाव्या लागतात. त्या रात्री आम्ही गाडीत चार माणसं आणि हजारो मधमाशा एकत्र बसून आलो. पेटी हलू नये, म्हणून रस्त्यातले खड्डे चुकवत, गाडीचा वेग अगदी कमी ठेवून आम्ही येत होतो. त्यामुळे तासाच्या प्रवासाला आम्हाला अडीच तास लागले. मधमाशीचा दंश ज्यांनी सोसला असेल, ते आमच्यासारख्या या क्षेत्रातील नवख्यांच्या या प्रवासातलं साहस समजू शकतील. पण ट्रेकिंग, रात्रीची जंगल भ्रमंती मला आवडते. त्यामुळे मधमाशांबरोबरचा प्रवासही मला थ्रिलिंग वाटला.
पेटी ठेवण्यासाठी आमच्या घराच्या मागच्या अंगणात एक टेबल ठेवलं होतं. पेटीवर रात्री कुठूनही प्रकाश पडणार नाही अशी जागा लागते. कारण प्रकाश पडला तर या कामसू बाया लगेच कामाला लागतात. मग त्यांची विश्रांती होत नाही. पेटी स्थानापन्न करताना आमच्या अंगणात आम्हीच चोरासारखे अंधारात काम करत होतो. मोबाइलचा प्रकाशही त्यांना चालत नव्हता. प्रकाश पडला की बंद पेटीतून सांघिक आवाज यायचा. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले. मला तर त्या रात्री झोपच आली नाही. मधमाशा जाग्या होतील तेव्हा आपण या नव्या जागेत कशा काय आलो, असा प्रश्न त्यांना पडेल का? या नव्या जागेत त्या आपलं काम सुरू ठेवतील ना? आपण त्यांना सांभाळू शकतो ना? असे नाना प्रश्न.
सकाळी फटफटायच्या आधी मी या पेटीचं क्वीनगेट सुलटं करून आले. आता हे क्वीनगेट म्हणजे काय? मधमाशांच्या पेटीला समोरच्या बाजूला तळाला एक भोकाभोकांची धातूची पट्टी असते. ती लाकडात बसवलेली असते. त्या पट्टीला क्विनगेट म्हणतात. फक्त कामकरी माशा आत बाहेर करू शकतील एवढाच या भोकांचा आकार असतो. त्यातून राणीमाशी किंवा नर बाहेर येऊ शकत नाहीत. क्वीनगेट लावून मी मधमाशा बाहेर येण्याची वाट बघत तिथेच थांबले. रात्री प्रवास करून आलेलं त्यांचं बिऱ्हाड थकलं असणार! काहीतरी बदललंय, हे त्यांना जाणवत असणार. पण तरीही रात्रभराच्या विश्रांतीनंतर आता त्या स्थिरावल्या असतील, अशी मला आशा होती.
सकाळी सात वाजता आठ-दहा माशा गेटमधून बाहेर येऊन पेटीभोवती फिरताना दिसल्या. त्या इकडे तिकडे पाहत होत्या आणि आत पळत होत्या. त्या नेमका काय संदेश देत होत्या, कोण जाणे! साडेदहा वाजता येऊन पाहिलं, तर आता पन्नास-साठ मधमाशा बाहेर घोंघावत होत्या. मी जरा घाबरलेच. घरात पळाले आणि खिडकीतून पाहू लागले. थोड्या वेळाने त्या कमी कमी होऊ लागल्या. त्यांचा गोंधळ संपला. काही आत गेल्या, काही बाहेर. एकुणात हेही त्यांचं रूटीनच असावं. कारण ठराविक वेळी मधमाशा बाहेर येऊन उन्हात नाचतात, हे मी पुढेही अनेकदा पाहिलं. अकराच्या सुमारास पेटीवर चांगलंच ऊन येऊ लागलं होतं. उन्हाळ्याचेच दिवस होते ते. मीही त्यांच्या सोबत सगळी दुपार उन्हातच काढली. काय करणार? घरात चैनच पडत नव्हतं.
संध्याकाळचे साडेसात वाजले. अंधार पडला. आमच्या अंगणातला त्यांचा पहिला दिवस पार पडला. पण बऱ्याचशा मधमाशा अगदी गठ्ठा करून दाराशी घट्ट बसून होत्या. आत जायचं नाव नाही. आठ वाजून गेले तरी त्या बाहेरच. शेवटी वाट बघून मी पाटील सरांना फोन केला. ते म्हणाले, 'उन्हाळ्यात त्या अशा वाऱ्याला बाहेर बसतात. काळजी करू नका. अकरा वाजता आत जातील.' आणि खरोखर सरांनी सांगितल्यानुसार अकराच्या सुमाराला त्या पेटीत गेल्या.
मधमाशा पाळायच्या असं खूप दिवस मनात होतं. त्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या पुण्यातील 'राष्ट्रीय मधुमक्षिका अनुसंधान आणि प्रशिक्षण' या संस्थेतून मी आठवड्याभराचं प्रशिक्षण घेऊन आले होते. वयाच्या साठीत नव्याने विद्यार्थी झाले होते. या प्रशिक्षणात मधमाशांबद्दलची थिअरी कळली. भारतात आढळणाऱ्या एपिस सिराना इंडिका, एपिस फ्लोरिया, एपिस डोरसाटा, एपिस मेलिफेरा वगैरे माशांच्या जातींविषयी कळलं. मधमाशांच्या शरीररचना, त्यांची भ्रमणकक्षा, जीवनक्रम अशा अनेक गोष्टी शिकलो. त्यामुळे मधमाशांविषयीची ओढ आणखीच वाढली.
आपल्याला कुठल्याही झाडांवर दिसणारं किंवा इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या आग्या मधमाशांचं मोहोळ बघून माहीत असतं. या मधमाशांचा दंश विषारी असतो. त्या पाठलाग करतात हेही ऐकून माहीत होतं. या माशांनाच शास्त्रीय भाषेत डोरसाटा म्हणतात. मेलिफेरा ही युरोपियन माशी आहे. खाणं कमी पडलं तरी घर सोडून जाण्याची तिची प्रवृत्ती नसते. हा तिचा कुटुंबवत्सलपणा मला वेगळा वाटला. ती स्वतःला पाळून घेते, याची गंमत वाटली. तिच्या आकारमानामुळे तिच्या पेटीची रचना थोडी वेगळी असते. फ्लोरिया अगदी लहानशी माशी. स्वभावाने तिखट असते. तिला अंधार आवडत नाही. ती स्वतःला पाळून घेत नाही, खुल्या जागेत घर करते, हे जेव्हा कळलं तेव्हा बागेत एकदा लहानशा फांदीला वाटीच्या आकाराचं पोळं दिसलं होतं ते हिचंच हे लक्षात आलं.
आमच्या कोल्हापूर भागात एपिस सिराना इंडिका ही भारतीय माशी टिकते, असं सरांच्या बोलण्यात आलं. सिराना इंडिकाला मराठीत सातेरी माशी म्हणतात. ती एका ठिकाणी लागून लागून सात पोळी बांधते, म्हणून सातेरी. तिची घरबांधणी अंधाऱ्या जागेत चालते. मधाच्या कणाकणासाठी ही मधमाशी दोन ते अडीच किलोमीटर अंतर पार करते. एक थेंब मकरंद मिळवण्यासाठी प्रत्येकीला पाच-पन्नास फुलांवर बसावं लागतं. अशा अनेक अद्भुत गोष्टी मला या प्रशिक्षणात कळल्या होत्या. पुण्याच्या प्रशिक्षणातून आल्या आल्याच आमच्या शेतात मी शेवग्याची चाळीसभर रोपं लावून टाकली. शेवग्याच्या फुलांवर मधमाशा भरपूर काम करतात, हे शिकून आले होते ना! शिवाय शेवगा भराभर वाढतो. म्हणजे पुढच्या वर्षी माझ्या मधमाशांची चंगळ. माझ्या स्वप्नांचा वेग और होता..
माझ्या मुलीने, रसियाने मधमाशी पालनाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामुळे या क्षेत्रात ती माझी गुरू होती. पण आमचे गुरुजी प्रॅक्टिकलमध्ये बेताचे होते. त्यामुळे पेटी घरी आल्यावर आम्हाला बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागलं. रसिया जेवढं कळेल तेवढं मार्गदर्शन करत होती. ते दिवस उन्हाळ्याचे होते. मधमाशांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने त्यांच्यासाठी पेटीबाहेर बशीत पाणी भरून ठेवलं होतं. तर काय! दुसऱ्या दिवशी बशीतच पाच-सहा माशा मारून पडल्या होत्या. झालं, आम्ही आपल्या हळहळत बसलो. बऱ्याचशा माशा पेटीच्या बाहेरच थांबत होत्या. त्यावरून त्यांना आत पुरेशी जागा नसणार, असंही रसियाचं मत पडलं. मधमाशांना आणून केवळ तीन दिवस झाल्यानंतर संध्याकाळी पेटीचं झाकण उघडून पाहिलं तर छताच्या आतल्या बाजूला असंख्य माशा बसलेल्या होत्या. रसिया म्हणाली, 'मला वाटतंय सुपर चेंबर ठेवायला पाहिजे!'
सुपर चेंबर म्हणजे काय? मधमाशा वाढल्या आणि परिसरातून त्यांना मकरंद, परागकण भरपूर मिळत असतील तर मधमाशीच्या पेटीवर सुपर चेंबर ठेवतात. सुपर चेंबर ही एक छोटी पेटीच असते. या पेटीतही सात फ्रेम्स असतात. फरक एवढाच की पेटीतल्या फ्रेम्सना आधारापुरता मेणपत्रा लावलेला असतो, तर सुपर चेंबरच्या फ्रेम्सना पूर्ण उंचीचा मेणपत्रा असतो. मुख्य फ्रेममध्ये मधमाशांची अंडी, अळ्या, कोष आणि शिशु माशा असा सगळा कुटुंबकबिला असतो. कामकरी माशांची नियोजित कामं सुरू असतात. राणी माशी फक्त अंडी घालत पोळंभर फिरत असते. तिच्या चहूबाजूस कामकरी माशांचा गराडा पडलेला असतो. आमच्याकडे बराच जुना म्हणजे रसियाच्या शिक्षणावेळचा थोडा मेणपत्रा होता. त्याच्या मेणपट्ट्या काढून आम्ही त्या सुपरचेंबरला लावल्या आणि ताबडतोब तो मुख्य पेटीवर ठेवून टाकला. त्या रात्री मधमाशा बाहेर बसल्या नाहीत. त्याअर्थी रसियाचा अंदाज बरोबर असणार. मेणपत्रा लावण्याची रीत मजेदार आहे. पसरट पातेल्यात पाणी उकळायचं, त्यात मेण घालायचं. ते वितळलं की ते गरम गरम पातळ मेण चमच्याने फ्रेमच्या वरच्या फटीत घालायचं. त्यावर मेणपत्रा लावायचा. गरम पातळ मेण मेणपत्र्याला चिकटतं. ते गार होतं की झालं काम! एकदा शिकून घेतल्यावर मला ते जमलं.
मधमाशांसमवेत असा महिना गेला. मला रसियाचा आधार, रसियाला पुस्तकाचा! येणाऱ्या अडचणी सोडवणं आम्हाला जमलं नाही, तर पाटील सरांना फोन. ते कधी गडहिंग्लजला, तर कधी पुण्याला असायचे. एकदा म्हणाले, 'तुमच्या सांगण्यावरून डिव्हिजन घ्यायला हवी असं वाटतंय! पण फार जुना मेणपत्रा असेल तर त्या पोळी नाही ओढणार. मेणपत्रा गुळगुळीत नाही चालणार.' डिव्हिजन घेणं म्हणजे यातल्या काही मधमाशांना दुसरा घरोबा करून देणं! थोडक्यात दुसरी पेटी. आता काय करावं? दुसरी पेटी आमच्याकडे नव्हती. कोल्हापुरात कुठे मिळेल, त्याचा पत्ता नाही. मग कधी पुणे ऑफिसला फोन कर, कधी युट्यूबवर माणसं शोध असा उद्योग सुरू केला. पण माझ्या एका पेटीच्या मागणीकडे व्यावसायिक माणसं कशाला लक्ष देतील? अपुरी सामुग्री, साधारण ज्ञान, शून्य कौशल्य आणि मार्गदर्शनाचा अभाव अशी माझी अवस्था होती. पण शोध घेता घेता कोल्हापुरात पेट्या बनवणाऱ्या सावर्डेकरांचा फोन नंबर मिळाला. त्यांच्याकडे पेटीही होती आणि मेणपत्राही. मी दुसऱ्या दिवशी त्यांना नाश्त्यालाच बोलावलं. खाणं-पिणं झाल्यावर मी त्यांना अंगणातल्या पेटीकडे नेऊ लागले. तर म्हणाले, 'मी फक्त पेट्या बनवतो. मधमाशांबद्दल मला काहीच माहिती नाही.' पण माझी तडफड त्यांना जाणवली असावी. त्यांनी माने नावाच्या एका जाणकारांना फोन केला. तेही लगेच येतो म्हणाले. तसे अर्ध्या-पाऊण तासात आलेही.
माने सर मधमाशीपालन विभागातून नुकतेच रिटायर झाले होते. त्यांनी पेटी उघडली. शांतपणे हाताळली. पेटीत रिकामे झालेले क्वीनसेल होते. ते त्यांनी काढले. (क्वीनसेल म्हणजे काय ते पुढे कळेलच.) त्यांनी सूचना केल्या. क्वीनगेट घट्ट बंद ठेवा. त्याला फट असता कामा नये. सकाळी सहा ते साडेसहा गेट उघडत जा, म्हणजे ड्रोन (मधमाशांमधले नर) बाहेर पडतील. पेटीवर जास्त ऊन पडतंय. आज रात्री गेट घट्ट बंद करून पेटी सावलीत न्या. सकाळी गेट उघडा. वीस दिवसांनी माशा वाढतील. तेव्हा सुपर ठेवा. सध्या नको.. असं बरंच काही. अंडी, अळ्या, कोष कसे ओळखायचे हेही त्यांनी मला दाखवलं. माने सर भेटल्यामुळे मला एकदम हुरूप आला.
त्या दिवशी झाडाच्या फांद्यांच्या आधाराने मी छान छत तयार केलं. आणि रात्री पेटी त्याखाली ठेवली. माने सरांच्या सूचनेनुसार दुसऱ्या दिवशी गेट सुलटं केलं. माशा बाहेर आल्या; पण पेटीच्या पहिल्या जागेपाशी घोटाळत राहिल्या. या जागेला पुढे २४ तास राणीमाशीचा वास येत राहतो म्हणे! खरं तर राणीमाशी त्यांच्याच पेटीत होती. पण मधमाशांचा बराचसा व्यवहार वासावर चालतो ना. एकदा आमच्याकडे मधमाशा बघायला आलेल्या एका पाहुण्यांच्या भोवती अचानक माशा घोंघावू लागल्या. का, तर त्यांनी अत्तर लावलं होतं. मधमाशांना कोणतेही तीव्र वास चालत नाहीत. त्या पाहुण्यांना आम्ही कसंबसं सुखरूप घरात आणलं म्हणून बरं.
दोन दिवसांनी सकाळी क्वीनगेट उघडलं, तर सटासट पन्नासेक ड्रोन बाहेर पडले. माने सर भेटल्याने मधमाशांशी मैत्री करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होईल, असं वाटायला लागलं.
माझी मधमाशांशी आणि त्यांची आमच्या अंगणाशी ओळख होईपर्यंत उन्हाळा संपला अन् पावसाळा सुरू झाला. रोज नवे प्रयोग सुरूच होते. पावसाळ्यात मधमाशांना अन्नाची कमतरता भासते. त्यांना पेटीत टिकवण्यासाठी साखरपाणी द्यावं लागतं, असं मी वाचलं होतं. त्यानुसार मी पेटीत साखरपाण्याची खोलगट बशी ठेवली. त्यात स्वच्छ धुतलेल्या तरंगत्या लाकडी काड्या टाकल्या. दोन दिवसांनी पेटी उघडून पाहिली, तर त्या ताटलीत ३० ते ४० मधमाशा बुडून मेल्या होत्या. मला फार वाईट वाटलं. माझं अज्ञान त्यांच्या मृत्यूला कारण ठरलं होतं. मी पुन्हा तातडीने माने सरांना बोलावणं पाठवलं. त्यांनी गार झालेल्या साखरपाण्यात भरपूर सुकलेली पानं घातली. त्या तरंगत्या पानांवर बसून मधमाशा साखरपाणी घेतात, हे नवं ज्ञान त्यादिवशी मला मिळालं. हळूहळू पाणी, साखर, त्यातली पानं असं सगळ्याचं प्रमाण साधायला जमू लागलं. अधूनमधून साखरपाणी पाजून त्या पावसाळ्यात आम्ही पेटी जगवली.
हिवाळ्याच्या दिवसांत मधमाशांना अन्न मिळू लागतं. अन्नपुरवठा वाढला की राणीमाशी दररोज पाचशे ते एक हजार अंडी घालते. पोळ्यातल्या त्या प्रत्येक षटकोनी घरात राणीने एक अंडं घातलेलं असतं. तिसऱ्या दिवशी अंड्यातून अळी जन्मते. ती जन्मताक्षणी कामकरी माशा तिला खाऊ घालू लागतात. पाच दिवसांनी अळीच्या घरावर कामकरी माशा मेणाचा पातळ पापुद्रा चढवतात. ही त्यांची कोषावस्था असते. माशीची पूर्ण वाढ झाली की ती तोंडाने पापुद्रा कुरतडून बाहेर येते. अंडं घातल्यापासून कामकरी माशी तयार व्हायला २१ दिवस लागतात. राणीला जन्मण्यासाठी १५ दिवस, तर नरांना २४ दिवस लागतात. त्यांचा आयुष्यकाळही वेगवेगळा असतो. कामकरी माशा सहा महिने जगतात, नर एक-दोन महिने जगतात, तर राणीमाशी तीन वर्षंही जगू शकते. राणीमाशी गर्भार होऊन घरात आल्यावर ती पुन्हा कधीच घराबाहेर पडत नाही. अंडी घालणं आणि आपल्या पोळ्यावर नियंत्रण ठेवणं हेच तिचं काम.
आता पावसाळा संपला होता. त्यामुळे पेटीतल्या माशाही वाढल्या होत्या. पेटीतल्या सातही फ्रेम अंडी, अळ्या, कोश, मध आणि नरांच्या घरांनी भरल्या होत्या. पेटी उघडताच स्वच्छ-शुद्ध वास यायचा. मी राणी शोधायचे. खूप साऱ्या मधमाशांच्या गराड्यात साधारण मधल्या फ्रेमवर मला राणी दिसायची. तिचा आकार सगळ्या माशांपेक्षा जाणवण्याइतका मोठा असतो. पोटाचा भाग लांब. सोनेरी पाय, शांत हालचाल. राणी दिसली की मला फार आनंद व्हायचा. पेटी हे तिचं राज्य होतं. तिचा घरंदाजपणा विलोभनीय वाटायचा.
नोव्हेंबरमध्ये पेटी आमच्या अंगणात येऊन नऊ महिने झाले. आता डिव्हिजन घेतलेली चालणार होती. आम्ही निळ्या रंगाची नवी पेटी आणली. तिचं नाव ठेवलं निळूबाई. या निळूबाईत राणी माशीसह तीन फ्रेम्स ठेवल्या. जुन्या पिवळ्या पेटीत चार फ्रेम्स राहिल्या. या पिवळ्या पेटीतल्या माशांना हा फरक कळला असावा. त्या रात्रभर पेटीच्या बाहेरच्या बाजूला गठ्ठा करून बसल्या होत्या. त्यांच्या पेटीत राणी नव्हती. त्या घाबरल्या होत्या की पुढचं नियोजन करत होत्या? माहीत नाही. मी मात्र अस्वस्थ झाले. मध्यरात्री अंगणात येऊन पाहून गेले, तेव्हाही त्या तिथेच होत्या. पण पहाटे पाच वाजता पाहिलं, तर सगळ्याजणी आत गेल्या होत्या. त्या दुसऱ्या नव्या पेटीतही शांतता होती. उन्हं वर आली तशी क्वचित एखादी बाहेर येऊन जायची. दिवसभर हेच दृश्य होतं. नव्या पेटीत कामकरी माशा थोड्याच होत्या; पण त्यांच्यासोबत राणी होती.
मग राणीमाशी नसलेल्या दुसऱ्या पेटीचं काय? २४ तासात पेटीतला राणीमाशीचा गंध संपतो. इथे राणी नाही, हे कामकरी माशांना कळतं. त्यांना नवी राणी हवी असते. मग त्या पेटीतल्या सुदृढ अंड्यावर क्वीनसेल ओढू लागतात. क्वीनसेल पेरभर उंचीचं असतं. आता या पिवळ्या पेटीत त्यांनी तीन-चार क्वीनसेल ओढले होते. आठवड्याभराने पेटी उघडली, तर त्यात एक राणी जन्मली होती. म्हणजे राजकुमारीच. शरीराने तरुण तजेलदार दिसत होती. आता तिचं स्वयंवर होणं गरजेचं होतं. हेही एक भन्नाट प्रकरण. पेटीत बरेच नर असूनही त्यांचं मीलन पेटीत, गर्दीमध्ये होत नाही. राजकुमारी तिच्या मर्जीने बाहेर पडते. परिसराचा अंदाज घेते. मग दुसऱ्या दिवशी काही कामकरी माशांचा लवाजमा घेऊन उंच उंच भरारी घेते. तिच्या वासाने त्या पेटीतले किंवा इतरही पेट्यांतले नर तिचा पाठलाग करतात. मोकळ्या आकाशात, आल्हाददायक हवेत ती गर्भार होते. मीलन झाल्या झाल्या नर मरून जातात. राजकुमारी राणी होऊन आपल्या पेटीकडे परत येते. यातली मेख मला पुढे कळली ती अशी, की राजकुमारीचा संयोग दुसऱ्या कुळातल्या नराबरोबर झाला तर पुढची पिढी सुदृढ निपजते.
एक राणीमाशी तयार झाल्यावरही पेटीत आणखी दोन-तीन क्वीनसेल्स होते. माने सर म्हणाले, 'क्वीनसेल मिळताहेत, तर आणखी एक पेटी वाढवूया का?' मी काय तयारच होते. आता तिसरी पांढरी पेटी आणली. त्यात क्वीनसेल असलेली फ्रेम ठेवली. पिवळ्या पेटीत नवी राजकुमारी होती. राजकुमारीसाठी क्वीनगेट उघडून ठेवलं. आता अंगणात तीन पेट्या झाल्या. निळ्या पेटीत जुनी राणी, पिवळ्या पेटीत राजकुमारी आणि पांढऱ्या पेटीत क्वीनसेल. सगळ्या पेट्यांमध्ये पुरेशा कामकरी माशा आणि थोडे नर. तिन्ही पेट्या अंगणात तीन बाजूंना एकमेकींपासून दूर ठेवल्या होत्या.
एकदा का मधमाशा संध्याकाळी घरी आल्या की त्यांच्या विश्रांतीची वेळ होते. पेटीचं तोंड पूर्वेकडे ठेवलेलं असतं. सकाळी सूर्याची चाहूल लागताच त्यांना कामाला लागायचं असतं. त्यांच्या विश्रांतीसाठी रात्र फारच मोलाची असते. पेटीवर थोडा जरी उजेड पडला, तरी गस्त घालणाऱ्या माशा बाहेर येऊन बघतात. काही तर कामालाही निघतात. त्यामुळे पेटीवर रात्री उजेड पडू द्यायचा नाही, हे पथ्य आम्ही फार पाळलं. पेट्यांची संख्या वाढू लागली तेव्हा सगळ्या पेट्यांमध्ये योग्य अंतर ठेवायचं म्हणून पांढरी पेटी समोरच्या अंगणात एका कडेला आणून ठेवली. त्या पेटीवर रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश पडत होता. तो थेट किंवा प्रखर नसल्यामुळे रात्री माशा बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत. पण पंधरा दिवसांनी पेटी उघडली तरी ती बाळसं धरताना दिसेना. अंडीही वाढली नव्हती. बहुधा त्या रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडाचा त्यांना त्रास झाला असणार. मग रातोरात पेटी मागच्या अंगणात हलवली.
तर आता पिवळ्या पेटीतल्या स्वयंवरोत्सुक राजकुमारीकडे लक्ष ठेवायचं होतं. पण ते ठेवणार कसं?
पहाटे सूर्य उगवण्याआधीच माशा बाहेर येऊन पेटीपुढे धावाधाव करतात. दहा-पंधरा मिनिटांतच त्यांचं काहीतरी ठरतं. मग अतिशय डौलदार उड्डाण घेत त्यांच्या भराऱ्या सुरू होतात. सुरांच्या वेलांट्या दिसाव्यात, तसं अतिशय सुरेख लहरणं चाललेलं असतं. साधारण अकराच्या सुमारास मोठ्या संख्येने त्या पेटीबाहेर जमतात. खूप गोंधळ घालतात. घोंघावतात. दमून पुन्हा पेटीमध्ये जातात. पुन्हा संथगती जाणं-येणं सुरू होतं. उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांचं वेळापत्रक बदलतं. दुपारी त्या कामं थांबवून विश्रांती घेतात, तेव्हा त्या चकाट्या पिटत असल्यासारख्या वाटतात. ऊन मऊ झालं की पुन्हा कामाला लागतात. सूर्य मावळून प्रकाश संपेपर्यंत त्यांचं पेटीकडे येणं चाललेलं असतं. पेटी उघडून तपासण्यासाठी ही मावळतीची वेळ योग्य असते.
पेटीची तपासणी म्हणजे काय? एखाद्या पेटीत फ्रेमची संख्या कमी असली तर दुसऱ्या पेटीतली अंडी, अळ्या भरपूर असलेली एक फ्रेम निवडायची. त्यावर माशाही असतातच. ती फ्रेम बाहेर काढून दाराशी अडवून ठेवायची की थोड्या वेळात माश्या फ्रेम सोडून पेटीत जाऊ लागतात. कधी कधी फ्रेमच्या चौकटीला हलक्या टिचक्या मारून त्यांना आत जाण्याची सूचना देता येते. फ्रेमवर हळुवार फुंकर घालूनही त्यांना आत पाठवता येतं. मग ही लेकुरवाळी फ्रेम दुसऱ्या पेटी ठेवायची. तिथल्या माशा त्यांचं संगोपन करतात. नवी पिढी या कुळाची होते. माशामाशांमध्ये घराण्याचं वैर असलं तरी देवकीचा कृष्ण गोकुळात यशोदेकडे आनंदाने वाढत असतो. आणि सगळ्या पेट्या तंदुरुस्त राहतात. त्यासाठी पेटीची तपासणी.
एव्हाना आपली राजकुमारी स्वयंवराला जाऊन आली असणार, तिने अंडी घालायला सुरुवात केली असणार, असं मानून हा नवा संसार डोळे भरून पाहण्यासाठी आम्ही पेटी उघडली. सोबत माने सरही होते. पेटी उघडताच माने सरांच्या लक्षात आलं की पेटीत कामकरी माशांनी नवीन क्वीनसेल ओढायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ स्वयंवराला गेलेली राजकुमारी परत आलेली नव्हती. माझं मन उदास झालं. काय झालं असेल राजकुमारीचं? परत येताना वाट चुकली असेल का? की वाटेत कुणा पक्ष्याने तिला खाल्लं असेल? असंही वाचनात आलं होतं की कधी कधी मीलनावेळी राणी जमिनीवर आपटते आणि मरू शकते. कोणता अपघात घडला असेल तिच्यासोबत? आता ती परत येणार नव्हती, हे नक्की. त्या रात्री मला झोप लागली नाही. पण कामकरी माशांनी तिचं न येणं स्वीकारून नवीन क्वीनसेल तयार करायला सुरुवात केली होती. आपल्यासाठी त्यांनी राणी मिळवण्याचं काम सुरू केलं होतं.
दुसरीकडे आता पांढऱ्या पेटीत राजकुमारी जन्मली होती. त्यामुळे आता त्या पेटीची काळजी सुरू झाली. एका सकाळी मी त्या पांढऱ्या पेटीपाशी बसले होते, तर बाहेर टिकल्याएवढी पांढुरकी टोपणं पडलेली होती. आता हे काय? कोणी वेगळा कीटक तर नव्हे? त्या टोपणाचा फोटो काढून माने सरांना पाठवला. ते म्हणाले, 'पेटीत नर जन्मले आहेत. त्यांची घरं मोठी असतात. त्यातून नर बाहेर येतात, तेव्हा अशी टोपणं पडतात. त्यांना टरफलं म्हणतात. आता क्वीनगेट उघडून ठेवा, म्हणजे नर बाहेर पडतील.'
असंच एकदा पेटीकडे बघत होते तर दोन माशा क्वीनगेटच्या समोरच्या पाटावर बसल्या होत्या. पेटीतून एक माशी बाहेर आली. तिने त्या दोघींभोवती फिरून त्यांना निरखलं. मग ती आत गेली. आतून आणखी बऱ्याच माशा बाहेर आल्या. त्यांनी त्या दोघींवर हल्ला चढवला. त्यांना टोचून टोचून जीवे मारलं. बहुतेक त्या दोघी वेगळ्या पेटीच्या नागरिक असाव्यात. त्या चुकून किंवा मधाची चोरी करायला पेटीपाशी आल्या असाव्यात.
एकदा काय झालं, एका पेटीचं गेट नीट बसवत होते. घोंगावणाऱ्या माशांतून हात घालणं भिववणारं असतं. एखादी माशी चावतेच. ती चिमटीत धरून काढावी लागते. ओढून काढली तरी तिची नांगी आपल्या शरीरात घुसून राहते. चावल्याजागी फार वेदना होतात. ती जागा सुजते. पुढे दोन दिवस दंश झालेल्या भागावर हात फिरवत रहावासा वाटतो. त्यादिवशी गडबडीने दार बंद केलं, तर नेमक्या दाराच्या फटीत दोन माशा सापडल्या. मी काही करायच्या आत मेल्या. ‘अरेरे, माझ्यामुळे मेल्या बिचाऱ्या' असा विचार मनात येतो ना येतो तोच आतून आठ-दहा माशा बाहेर आल्या. मेलेल्या माशांभोवती गोळा झाल्या. त्या आता पुन्हा उडू शकणार नाहीत, हे लक्षात आल्यावर आत निघून गेल्या. थोडावेळ कोणीच बाहेर आलं नाही. आत त्यांचा दुखवटा सुरू असेल का? पण थोड्यावेळाने पुन्हा व्यवहार सुरू झाले.
कोणत्याही वेळी बाहेरून घरी आलं की आधी मधमाशांच्या पेट्यांकडे चक्कर टाकायची सवय लागली होती. एका संध्याकाळी घरी आले आणि मागच्या अंगणात गेले तर पेटीवरचं झाकण काढलेलं. सातही फ्रेम्स ‘आ' वासून आकाशाकडे पहात होत्या. त्यात माशा होत्या. पण सगळ्या आहेत, की काही उडून गेल्या हे कसं कळणार? मी एकदम गडबडलेच! हे काय? कोणी केलं हे? असा विचार करत करतच आधी पेटीचं झाकण लावलं. तशीच तरातरा घरात गेले. घरातल्या कुणालाच काही माहीत नव्हतं. माझी थोडी चिडचिड झाली. माशांचं काय झालं असेल कोण जाणे! माशा निघून तर गेल्या नसतील ना? माकडं येऊन गेली असतील का? पण माकडांना मध आवडतो असं कधी कुठे वाचनात आलं नव्हतं. आणि माकडं अशी शिस्तीत पेटी उघडणार नाहीत. त्यांचा विध्वंसच जास्त.
रात्री उशिरापर्यंत माझी जासुसी सुरू होती. एकदम डोक्यात चमकलं! त्यादिवशी दुपारी मी दाराला कुलूप लावत असताना बारा-तेरा वर्षांची दोन मुलं पतंग शोधत आली होती. त्यांचा पतंग आमच्या अंगणात नाही, असं मी सांगून त्यांना कुठलं पटायला? ही मुलं कुंपणावरून आत शिरली असणार आणि कुतूहलापोटी त्यांनी पेटी उघडली असणार. आत आमची अगम्य, भीतीदायक फौज. झाकण तसंच टाकून पोरं पळाली असणार. नशिबाने माशा कुठेही गेल्या नव्हत्या. जाणं-न जाणं हा राणीमाशीचाच निर्णय असतो. म्हणजे तिने माझ्या अंगणात थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी मनातल्या मनात तिला थँक्स म्हटलं.
आता मधमाशा आमच्याकडे स्थिरस्थावर झाल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही. चार पेट्या होत्या. या पेट्या म्हणजे माझी छोटीशी अपियरीच होती. मधुबन!
चारपैकी दोन पेट्या फार कामसू आहेत, असं माझ्या लक्षात आलं. त्यांची राणी तरुण होती ना! पहाटे मधमाशांच्या आधी उठून त्यांच्या उठण्याचा कार्यक्रम कसा असतो हे पाहण्याचा मी खूपदा प्रयत्न करायचे. पण त्या कायमच माझ्या आधी उठलेल्या असायच्या. एका पहाटे तर त्यातल्या एका पेटीमधून चालत्या कूलरसारखा सू असा आवाज येत होता. त्या आवाजाचं कारण मला काही काळानंतर कळलं. मधमाशा वेगाने पंख हलवून आणलेल्या मधातलं पाणी घालवत असतात. त्यांनी अन्न बनवण्यासाठी आणलेल्या मकरंदात ८० टक्के पाणी असतं. त्याचं बाष्पीभवन करून उरलेला मध त्या जमा करतात. त्यावेळी त्यांच्या पंखवेगाचा तो आवाज असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे हा आवाज रोज नसतो. तो नेमका कधी असतो, किती दिवसांनी असतो, याचं उत्तर मात्र मला अजून मिळालेलं नाही.
तर अंगणातल्या त्या दोन पेट्या पहाटेपासून कामाला सुरुवात करायच्या. अगदी सकाळपासून परागकणाच्या पिशव्याच्या पिशव्या भरून आणायच्या. मधमाशांच्या पायाजवळ केसाळ रचना असते. जणूकाही छोट्या पिशव्याच. नुकत्याच उमललेल्या फुलात लोळून त्यातील पराग त्या अंगाला माखून घेतात. मग समोरच्या पायांनी ते माखलेले कण गोळा करतात. त्या हालचालीमुळे परागकणाचे लहान लहान लाडू होतात. माशा हे लाडू आपल्या मागच्या पायाजवळच्या पिशवीत भरतात आणि ते ओझं पेटीकडे घेऊन येतात. चांगलं पाऊण ते एक किलोमीटर अंतरावरून त्या हे आणत असतात. माशा पेटीच्या तळपाटावर उतरल्या की क्वीनगेटमधून त्यांच्या पिशव्या ओढत नेताना पायातले परागकण अगदी नीट दिसतात. सकाळी मधमाशांचे असे जथ्थेच्या जथ्थे पेटीकडे वेगाने येत असतात. पेटीत घुसत असतात. त्याच वेगाने काहीजणी आतून बाहेर झेपावत असतात. कधीकधी आतून बाहेर जाणारी मधमाशी तळपायावर कोलांटीउडी घेते. सगळ्याच मधमाशांना असं करावं लागत नाही. मग काहींनाच का बरं करावं लागतं? बाहेर जाण्यासाठी त्यांना आतून कोणी हाकलत असतं का? की त्या नवख्या असतात? सर्वांसारखं सफाईदार झेपावणं अजून त्यांना येत नसतं? की ती त्यांची गंमत सुरू असते? काही म्हणा मधमाशांची ही कोलांटीउडी पहायला मात्र मजा येते खरी!
अंगणातल्या उरलेल्या दोन पेट्या मात्र थोड्या नरम-गरम होत्या. एकातली राणी आता म्हातारी झाली असणार. तिचं अंडी घालणं थंडावलं असणार. नव्या माशा तयार होण्याचं प्रमाणही कमी झालं असणार. त्या पेटीतून मधमाशांची जा-ये कमी झालेली दिसत होती. आणखी एक पेटी अजून बाल्यावस्थेतच होती. मनात आलं, या माशांना सहल घडवून आणली तर?
शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलं आजोळी किंवा आणखी कुठल्या गावाला जातात, तिथे रानमेवा चापतात. तसंच मधमाशांसाठीही उन्हाळा म्हणजे हनी फ्लो सिझन असतो. या दिवसांत त्यांना भरपूर मध मिळतो. मधमाशांच्या सहलीला एपियरीच्या भाषेत मायग्रेशन, म्हणजेच स्थलांतर म्हणतात. मधमाशांना आम्ही आमच्या शेतावरच नेण्याचं ठरवलं. कारण त्या परिसरात आता चिंच, करंज फुलू लागले होते. थोड्याच दिवसांत कडुलिंब फुलला असता. कडुलिंबाचा मकरंद आणि पराग मधमाशांना आवडतो. मधमाशांच्या सहलीपूर्वी मी शेताच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. शेतावर पेटी कुठे ठेवायची ती जागा मुक्रर केली. त्या परिसराची स्वच्छता केली. जमीन सपाट करून त्यावर स्टॅण्ड ठेवला. मधाला मुंग्या लागू नयेत यासाठी स्टॅण्डच्या पायाखाली पाण्याच्या वाट्या ठेवल्या. दिवसभर माझी तयारी सुरू होती.
मधमाशांना सहलीला न्यायचं म्हणजे रात्रीचा प्रवास करावा लागतो. संध्याकाळी सगळ्या मधमाशा पेटीत परत आल्यावर पेटीचं दार बंद करायचं, पेटीतून त्या कुठूनही बाहेर येऊ शकणार नाहीत याची खबरदारी घ्यायची आणि निघायचं. हा सगळा उद्योग अंधारातच करायचा. चारही पेट्यांचं स्थलांतर करा, असं माने सर म्हणत होते. पण मी ठरवलं, दोन पेट्या शेतावर राहू देत, दोन पेट्या अंगणात. इतक्या दिवसांची त्यांची सवय झालेली, मला काही त्यांना सोडवेना. आणि ऐन वेळी मी फक्त म्हाताऱ्या राणीची पेटी शेतावर नेली. त्या पेटीची आणि आपली ताटातूट होणार म्हणून मी अस्वस्थ होते. अंधार पडू लागला. रात्र होऊ लागली. एव्हाना सगळ्या माशा परत आल्या असणार असं मानून मी पेटीचं क्वीनगेट बंद केलं. ते घट्ट राहावं म्हणून खुंट्या अडकवल्या. पेटी दोरीने नीट बांधली आणि गाडीत ठेवली. पेटीत अगदी शांतता होती. माशांचा सांघिक आवाज नाही की फट शोधून बाहेर पडण्याचा प्रयत्न नाही. गाडी अगदी हळू चालवत आम्ही शेतावर पोचलो. शेतावरच्या गुडूप अंधारात पेटी जागेवर ठेवली. मग क्वीनगेट सुलटं केलं.
पेटीच्या स्थलांतराचं मला तसं दडपण झालं होतं. पण या मधमाशांनी सहकार्य केलं. त्यांना सहलीला जाण्याचा सुगावा लागला होता की काय? की त्या घाबरून गप्प बसल्या होत्या? आम्ही घरचे सगळे त्या रात्री शेतावरच राहिलो. सकाळ उजाडली ती पावसाच्या सरींसह. मधमाशांसाठी नवी जागा, त्यात हा पाऊस. मधमाशा आणि सूर्य यांचं नातं अनोखं असतं. फुलांचे ताटवे शोधण्यासाठी वाटाड्या मधमाशा सूर्य आणि ताटवे यांचा कोन करून पोळ्यावर नाच करून इतर माशांना रस्ता सांगतात. आज तर सूर्याचा पत्ताच नव्हता. पेटीतून एखादी एखादी माशी बाहेर डोकावून जायची. बाकी शांतता होती. तासभराने वातावरण निवळलं. मग मधमाशांचा व्यवहार सुरू झाला. आमच्या शेताची त्यांनी ओळख करून घेतली. परागकणांच्या पिशव्या वाहण्याचा त्यांचा उद्योग सुरू झाला. माझा जीव भांड्यात पडला.
मधमाशा शेतावर रहायला गेल्यापासून तिथे वेडेराघू दिसू लागले. पहिल्यांदा हे नवे पाहुणे वाटले. नंतर लक्षात आलं, संध्याकाळ झाली की पेटीसमोर ते रांग लावून बसायचे. मधमाशा पेटीकडे झेपावताना क्वीनगेट बंद असल्याने त्यांचा वेग एकदम कमी होतो. त्या तळपाटावर टेकण्यापूर्वीच समोर बसलेला वेडाराघू एखाद्या माशीवर झडप घालून तिला मटकावायचा. राघूंपासून मधमाशांना वाचवण्यासाठी मी शक्कल लढवली. पेटीवर मोठी छानशी छत्री बांधून टाकली.
शेतावर गेले की मी आधी पेटीकडे जायचे. काही ठराविक वेळी मधमाशांची भरपूर ये-जा असायची. पेटीसोबत काम करताना एवढ्या मोठ्या परिसरात मी एकटीच असायचे, त्यामुळे पेटी उघडली तरी फारशी हलवाहलव करत नसे. या मधमाशांच्या मनात काय येईल ते कुणी सांगावं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर? नाही म्हटलं तरी, मनात थोडी भीती असायचीच.
पावसाळा सुरू झाला. गवतांचे पुंजके पायघड्या घालू लागले. मधमाशांना गवताची फुलंही आवडतात. पण गवताला फुलं यायला अजून किमान तीन महिने होते. मधमाशांना सतत खाद्य मिळत रहायला हवं म्हणून मी उन्हाळ्यातच वेलभाज्यांसाठी मांडव घातले होते. रोहिण्या पडताच दोडकी, कारली, काकडी, पडवळ, दुधी लावून टाकले. त्यावर्षी पाऊस लांबला, तेव्हा पाणी घालून त्यांना जगवलं. हौसेने सूर्यफुलांच्या दोन रांगा लावल्या. दोन सरी मका घातला.
काही म्हणा, या माशांमुळे माझी झाडांशी मैत्री वाढली होती. शेतात आम्ही बरीच झाडं लावली होती. त्याबरोबर आपोआप येणारी झाडंही वाढली होती. या झाडांना फुलं कधी येतात, फुलांचं पुढे काय होतं, त्यांच्या शेंगा होतात की फळं होतात, हे मी कधी पाहिलंच नव्हतं. आता मात्र त्याकडे माझं लक्ष जायला लागलं. इतके दिवस कानाडोळा केलेली शिसवाची झाडं आता पांढऱ्या झुबक्यांनी फुलारली होती. शिसव हे खास मधमाशांचं झाड असतं म्हणे. त्याच्या नेक्टर पोलनवर मधमाशा खुश. शिसव बहरल्यावर मी त्याला सांगून आले, या मधमाशांनी तुमची ओळख करून दिली. आता तुमच्या अंगाखांद्यावर मधमाशांची पोळी सांभाळा. आम्ही कधीच कीटकनाशकाची फवारणी करत नाही. तेव्हा तुमच्या खुल्या फांद्यांवर सांभाळा त्यांना. हे शिसवाचे झुबके म्हणजे आठवणींचे मोहोळ झाले आहेत. पुढे शेतात झाडाच्या फांद्यांवर मला दोन-चार पोळी दिसली. खरं तर दरवर्षी होत असतील ती. आता मी त्यांना पाहू लागले आहे.
जुलै महिन्यात पावसाने जोर धरला. हा सगळा लॉकडाउनचा काळ होता. बारा-पंधरा दिवस शेतात जाणं झालंच नाही. एका सकाळी जाऊन पाहिलं तर पेटीतली ये-जा पूर्ण थांबली होती. क्वीनगेट बंद होतं. म्हणजे राणी आतच असणार. ती आत असेपर्यंत कामकरी बाया तिला सोडणार नव्हत्या. पेटी उघडून पहायला नकोच वाटत होतं. अखेर कलत्या दुपारी पेटी उघडली. पेटीच्या बेचक्या-बेचक्यात मेणकिडे म्हणजेच मॅक्समॉथ बसले होते. सगळी पोळी काळी पडली होती. जळमटांनी भरली होती. तळपाटावर मधमाशा मरून पडल्या होत्या. कॅप्टन राणीसह अनेक मधमाशांनी समाधी घेतली होती. माझं मन उदास झालं. का झालं असं? उपासमार? मेणकिड्यांचा हल्ला? आपलं दुर्लक्ष? की म्हाताऱ्या राणीचा नैसर्गिक मृत्यू? मधमाशांनी नवं क्वीनसेल घातलं असलं तरी गेट बंद असल्यामुळे राजकुमारी स्वयंवराला बाहेर पडू शकली नसेल? काय झालं असेल? माझं मन मला खात राहिलं. पेटीभोवती लावलेल्या सूर्यफुलांना आता कळ्या लागल्या होत्या. पुढे रोज फुलं उमलत राहिली. पण त्यावर बसणाऱ्या माशा आता उरल्या नव्हत्या.
माझ्या मधमाशीपालन छंदाविषयी कळलं की कोणी कोणी मला कुतूहलाने प्रश्न विचारायचे. मी त्यांना थाटात उत्तरं द्यायचे. याच काळात एका सधन शेतकऱ्याकडून माझ्याकडे पेटीसाठी विचारणा झाली. आता ठिकठिकाणी आपल्या पेट्या जाणार याने मी खुश! ठरल्याप्रमाणे एका दुपारी येऊन ते पेटी पाहून गेले. दोन दिवसांनी रात्री आपली पेटी नेण्यासाठी ते आले. त्यांचा विशी-बाविशीचा मुलगा फारच सहज सगळं हाताळत होता. तो पहिल्यांदाच पेटी हाताळत असूनही मधमाशांचा घोंघव, त्यांची ती झुंबड, एखादीचं चावणं, कशाचंच त्याला काही वाटत नव्हतं. मला ते जमायला एक वर्ष लागलं होतं.
ही पेटी गेली, पाठोपाठ शेतावरची पेटीही संपली. अंगणात दोनच पेट्या राहिल्या. पावसाळ्यात फुलोरा कमी असतो. त्यामुळे पेट्या जगवणं अवघड असतं. आमची एक पेटी पहिल्यापासून बाळसं धरत नव्हती. मी त्या माशांना कधी साखरपाणी द्यायचे, कधी दुसऱ्या पेटीतली एखादी नवी फ्रेम द्यायचे. पण ती कायम अशक्तच राहिली. मार्च महिन्यात माझी मी डिव्हिजन घेऊन ही पेटी तयार केली होती. सगळा कार्यक्रम यशस्वी झाला होता. पण पेटीतल्या माशा का वाढत नाहीत याची काळजी होती. ऐन पावसाळ्यात माशांनी ती पेटी सोडली. माझं काय चुकलं हे मला कळलंच नाही. लॉकडाऊनमुळे माने सरही येऊ शकले नाहीत. त्या पेटीची जागा आता रिकामी दिसत होती. मला वाटायचं आपला परिसर हिरवागार आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडं आहेत. पण तीन-चार पेट्या पोसल्या जाण्याइतकी मकरंदाने भरलेली फुलं इथे वर्षभर नाहीत हे आता माझ्या लक्षात आलं. मी एकाच्या चार पेट्या करत नेल्या आणि आता चारातून एकेक वजा होत माझ्याकडे एकच पेटी राहिली.
या पेटीतली राणी जानेवारी २०२० मध्ये जन्मलेली होती. मला कळत होतं की ही एकमेव राणी आपल्याकडे आहे, ती नीट राहायला हवी. आता पुढची डिव्हिजन यशस्वी व्हायला हवी. पण आधीच्या फसलेल्या अनुभवामुळे डिव्हिजन घेण्याचं माझं धाडस होईना. आणखी एका जाणकाराला शोधून काढलं. आधीचा अनुभव सांगितला. त्यांच्याशी बोलताना माझी काय चूक झाली होती ते समजलं. डिव्हिजन घेताना राणी नव्या पेटीतच जायला हवी, जुन्या पेटीच्या सवयीने तिथल्या माशा क्वीनसेल ओढतात. नव्या पेटीत वातावरण वेगळं, कामकरी माशांची संख्या अपुरी, त्यांना नव्याशी जुळवून घेणं अवघड जातं. माने सर डिव्हिजन घेताना राणी का शोधत असायचे, ते आता मला समजलं.
डिसेंबरच्या मध्यात माने सर आले. त्यांनी पेटी उघडली. पेटीत नर फार जन्मले होते. ते कशाचं चिन्ह? सरांनी चहूबाजूला नजर टाकली. म्हणाले, इथं फुलं कमी आहेत हो! पेटीचं स्थलांतर करता का पहा. पण या एकमेव पेटीला नजरेआड करायची माझी तयारी नव्हती. मग सरांच्याच सल्ल्याने पेटी अंगणातच थोडी दूर ठेवायची, तळपट साफ करायचा, नंतर दोन दिवस गेट उघडून ठेवून नरांना बाहेर पडू द्यायचं, मग डिव्हिजन घ्यायची, असं मी ठरवलं. त्याच रात्री मी आधी पेटीचं गेट पक्क बंद केलं. लगेच जागा बदलली आणि सकाळी आठच्या पुढे गेट सुलटं केलं. अशा वेळी भसाभसा माशा बाहेर पडतात. कारण त्या रात्रभर आत कोंडलेल्या असतात. पण तसं काही झालं नाही. माशांचा व्यवहार थेट दुपारनंतर सुरू झाला, तो देखील अगदीच किरकोळ. मी काळजीत पडले.
आणि नको तेच घडलं. दोन दिवसांनी घरासमोरचा दुकानदार म्हणाला, 'ताई तुमच्या मधमाशा गेल्या ना! माशांचा ढगासारखा घोळका वरून निघाला तर रस्त्यावरून पायी जाणारी माणसं एकदम खाली बसली.' ही माझ्यासाठी ब्रेकिंग न्यूज होती. मी क्वीनगेट काढून ठेवलं आणि राणीमाशी आपले शिपाई घेऊन निघून गेली. याला राणीचा उठाव म्हणतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी पेटी उघडून पाहिली तर खरंच उठाव झाला होता. निम्म्या माशा अजून पेटीत होत्या. पण पेटीत एकही क्वीनसेल नव्हतं आणि राणीही नव्हती. म्हणजे नव्या प्रजेच्या निर्मितीच्या शक्यता संपल्या होत्या. मी फार हिरमुसले. सगळा दिवस पेटीच्या अवतीभवती होते. क्वचित एखादी बिच्चारी माशी बाहेर जाताना आणि आत येताना दिसत होती. मी त्यांचा केवढा तोरा पाहिला होता पूर्वी. ती लगबग, ते कोलांट्या घेत झेपावणं, ती दहशत, आज ते सगळंच विस्कटलं होतं. संध्याकाळी पेटीत साखरपाण्याची ताटली ठेवली. मनाला कळत होतं की मी पेटीला हे निरोपाचं जेवण देत आहे. तरीही उमेदीची धुगधुगी होती. राहिलेल्या माशा पेटी सांभाळण्यासाठी काही करतील का? सध्या पेटीत असलेल्या अंड्यांवर त्या क्वीनसेल ओढतील का?
दुसऱ्या दिवशी पुन्हा पेटी उघडून पाहिली तर साखरपाणी तसंच होतं. माने सरांना फोन करून घडलेली हकिगत सांगितली. त्यांनी येऊन पेटी उघडून पहिली. पेटीला मेणकीडा लागला होता. पेटीतल्या सहापैकी तीन फ्रेम्स खराब झाल्या होत्या. पेटी टिकणं अवघड होतं. मग मी सगळ्या फ्रेम्स बाहेर काढल्या. बऱ्या असणाऱ्या तीन फ्रेम्स अधिक स्वच्छ करून नव्या पेटीत ठेवल्या. पेटी बदलताना सगळ्या माशा अगदी गरीब झाल्या होत्या. निमूटपणे सगळं काही करून घेत होत्या. दोन दिवसांनी पेटी उघडली तर आणखी एक फ्रेम खराब झालेली दिसली. असं करता करता आठवड्याभरात पेटीत केवळ एक फ्रेमच राहिली. त्या एकमेव फ्रेमला माशा धरून राहिल्या होत्या.
मी बारकाईने विचार करू लागले. नक्की काय चुकलं असेल आपलं? सर्वात मोठी चूक, म्हणजे एकच पेटी असताना मी वेळेवर डिव्हिजन घेतली नाही. डिव्हिजनमध्ये चूक होऊन ते अयशस्वी होण्याची भीती मला नडली. एक पेटी कमकुवत झाली तर दुसऱ्या पेटीतल्या लेकुरवाळ्या फ्रेम्स तिला देता येतात. हे मी केलं होतं. पण शेवटी एकच पेटी राहिली तेव्हा माझ्याकडे त्या पेटीच्या भरणपोषणासाठी फ्रेम्स नव्हत्या. त्या पेटीचं संपणं मला पाहात राहावं लागलं.
दुसरं कारण, आधी म्हटलं तसं मधमाशा टिकवायच्या असतील तर घराभोवतीच्या शोभेच्या बागा पुरत नाहीत. मधमाशांसाठी जंगली, वेगवेगळ्या दिवसांत फुलणारी झाडं हवीत. किमान शेवगा, नारळ तर हवेतच हवेत. तसंच, स्थलांतर हा मधमाशांचा नैसर्गिक स्वभाव आहे. एरवी फुलोरा जिथे असेल त्याप्रमाणे त्या स्थलांतर करतात. म्हणून पेटीतून आपण त्यांना न्यायला हवं. मी एकदाच त्यांना अशी सहल घडवली. पण त्यांच्या स्थलांतराचा आणखी बारकाईने अभ्यास करायला हवा होता.
तिसरी चूक झाली ती जुन्या पोळ्यांच्या बाबतीत. वर्षभरात पोळी खराब होतात. काळसर दिसायला लागतात. त्यांना भोकं पडतात. अशी पोळी निग्रहाने काढून टाकावी लागतात. मला ते जीवावर यायचं. वाटायचं, इतक्या मेहनतीने बनवलेलं घर कशाला मोडायचं? पण त्यामुळेच पेटीला मेणकिडा लागला.
मधमाशांची रिकामी झालेली शेवटची पेटी आवरत असताना माझ्या लक्षात आलं, की या आनंद संगोपनाचाही मनावर ताण असतो. घरातल्यांना आणि घरी आलेल्यांना मधमाशा चावू नयेत ही मला माझी जबाबदारी वाटत असे. गेली अनेक वर्षं आमच्या अंगणात आमच्या बालवाडीतल्या मुलांची अधूनमधून अंगत-पंगत होत असे. मुलं अंगणात स्वयंपाक करायची, एकत्र जेवायची, सारा दिवस अंगणात घालवायची. या दोन वर्षांत मात्र मधमाशांमुळे मुलं आमच्या अंगणात खेळायला, जेवायला येऊ शकली नाहीत. लॉकडाउनच्या काळात नव्वदीच्या आसपास असणारे माझे आई-वडील काही दिवस आमच्या घरी होते. ते उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री ते अंगणात किंवा व्हरांड्यात वाचत बसले तर मधमाशांना उजेड चालत नाही याची आठवण मी त्यांना करून देत असे. आमची चांदणी भोजनं आणि मैफिलीही या काळात गोठवल्या गेल्या होत्या. माझ्या छंदामुळे मी घरातल्या सगळ्यांना थोडंफार वेठीला धरलं होतं याचीही मला चुटपुट असायचीच.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या अनुभवातून मधमाशांबद्दलच्या काही गोष्टी मला नव्याने उमगल्या. मधमाशा पाळीव नाहीत. त्यांची संघभावना, कार्यपद्धती या त्यांच्या स्वभावधर्माचा आपण फायदा घेतो आणि त्यांना पाळतो. सर्वच पाळीव प्राणी पाळकाशी प्रेमसंबंध निर्माण करतात तसं मधमाशा करताना दिसत नाहीत. दुसरं, मधमाशा स्वतःसाठी अन्नसाठा म्हणून मधाची कोठारं भरून ठेवतात. फुलोऱ्याच्या दिवसात त्यांना भरपूर मध मिळतो म्हणून आपण सुपर चेंबर ठेवून त्यांना मध साठवायला प्रोत्साहन देतो. सुपर चेंबरमधल्या मधात त्यांची अंडी, अळ्या, कोश नसतात म्हणून त्यातला मध आपण काढून घेतो. त्यामुळे हत्या होत नसली तरी त्यांची ही एक प्रकारे फसवणूक नाही का?
पण मधमाशांमुळे परागीभवन होतं, त्यामुळे फळं, भाज्या, तेलबियांचं उत्पन्न वाढतं, हे आता सिद्ध झालं आहे. मधमाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर फारच थोड्या काळात माणसाच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल, असं आइन्स्टाईन म्हणाले होते. केवळ मधासाठी नव्हे, तर या व्यापक परिणामासाठी मधमाशांच्या नैसर्गिक वसाहती टिकवण्याचा प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं आहे.