
भारत हा प्रामुख्याने शाकाहारी देश आहे आणि मांसाहार करणं चुकीचं आहे, असं बिंबवण्याचा प्रयत्न अलीकडे सतत सुरू असतो. पण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे या सरकारी सर्वेक्षणातून मात्र प्रत्यक्षातली परिस्थिती त्याउलट असल्याची माहिती समोर येते आहे.
या सर्वेक्षणानुसार भारतात मांसाहाराचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतंय. २००६ साली मांसाहार करणाऱ्यांचं प्रमाण ७४ टक्के होतं, ते २०२१ साली ८० टक्यांवर गेलं आहे. देशातील (१५ ते ४९ या वयातल्या) दर दहा व्यक्तींमागे आठ व्यक्ती मांसाहारी आहेत. यात ८७ टक्के पुरुष आणि ७५ टक्के महिलांचा समावेश आहे. मांसाहारातही भारतीयांची सर्वाधिक पसंती अंड्यांना आहे. ७८ टक्के भारतीय अंडी खातात. ७५ टक्के चिकन किंवा अन्य मांसाहार करतात, तर ७२ टक्के लोक मासे खातात. यातील दहापैकी एक व्यक्ती दररोज मांसाहार करते, तर दहापैकी सहा व्यक्ती आठवड्यातून एकदा मांसाहार करतात.
हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्यं वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मांसाहाराचं प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये मांसाहाराचं प्रमाण अनुक्रमे ४७, ३८, ४०, ५० टक्के आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशातले ६४ टक्के लोक मांसाहारी आहेत. ईशान्येकडील जवळपास सर्व राज्यांमध्ये शंभर टक्के लोक मांसाहारी आहेत, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मांसाहाराचं प्रमाण बरंच आहेत. तिथे केरळमध्ये ९९ टक्के, तमिळनाडूमध्ये ९७ टक्के, तर तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये ९८ टक्के व्यक्ती मांसाहारी आहेत. कर्नाटाकात मात्र हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे ८८ टक्के आहे. तर महाराष्ट्रात ८२ टक्के लोक मांसाहारी आहेत.
धर्म नेहमीच आहाराच्या सवयींमध्ये महत्वाची भूमिका बजावत आला आहे. क्वचित अपवाद वगळता सर्व मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध/नव-बौद्ध मांसाहार करतात. पण हिंदूंमध्येदेखील ७५ टक्क्यांहून जास्त लोक मांसाहार करतात, तर २५ टक्के जैन आणि ५० टक्के शीखही मांसाहारी असल्याचं या सर्वेक्षणात दिसून येतंय. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये अनुक्रमे ८७ टक्के आणि ८८ टक्के लोक मांसाहारी आहेत.
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये मांसाहाराचं प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात ज्या कुटुंबांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यामध्ये मांसाहाराचं प्रमाणदेखील जास्त असल्याचं दिसून येतं. याउलट शहरात मात्र श्रीमंत वर्गांमध्ये तुलनेने मांसाहाराचं प्रमाण कमी आहे. देशातल्या सर्वात गरीब वर्गातील दहापैकी नऊ लोक, तर सर्वात श्रीमंत गटातील दहापैकी सात लोक मांसाहार करतात, असं हा सर्व्हे सांगतो.
काही राज्यांमध्ये अन्नधान्यावरच्या खर्चाचा मोठा वाटा मांसाहारावर खर्च केला जातो. उदाहरणार्थ, ईशान्येकडील राज्यं त्यांच्या अन्नधान्याच्या एकूण खर्चापैकी २० ते २५ टक्के खर्च मांसाहारावर करतात. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये अन्नधान्याच्या खर्चापैकी २० टक्यांहून जास्त खर्च मांसाहारावर होतो, तर केरळ, गोवा आणि नागालँडमध्ये मांसाहारावर भाजीपाल्यापेक्षा दुप्पट खर्च केला जातो. पण वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी पाहता भारत मांसाहारी देश असल्याचं स्पष्ट होतंय.
मयूर पटारे | 9970355105 | mayur355105@gmail.com
युनिक फीचर्स मध्ये पत्रकार. कष्टकरी समूहात फिरून त्यातील माणसांचं जगणं समजून घ्यायला आवडतं.