
रेल्वेप्रवास केला नाही, असा माणूस विरळा. रेल्वेप्रवासातल्या कटकटींबद्दल आपण बोलतोच. थोडं त्यातल्या गमतीजमतींबद्दलही बोलू. कारण या प्रवासात तिकिटाबरोबर करमणूक फ्री असते.
वेळ : सकाळचे ०८:३५. रेल्वे स्टेशनवरच्या तिकीटआरक्षण खिडकीसमोर लांबलचक रांग लावून उभी असलेली माणसं. बहुतेकांच्या हातात आरक्षणाचे फॉर्म्स. मी रांगेत सर्वांत शेवटची. माझ्याकडे फॉर्म नाही.
खिडकी उघडते. पहिले दोघं-तिघंजण जग जिंकल्याच्या थाटात सरसावून उभे राहतात. माझ्या मागे अजून कुणीही आलेलं नाही. मला प्रश्न पडतो- फॉर्म घ्यायला खिडकीशी जावं, तर आपल्या जागेवर कुणी तरी येऊन उभं राहणार. मग काय करायचं?
काहीही करायचं नाही. शांतपणे काही मिनिटं जाऊ द्यायची. कुणी ना कुणी येतंच. मग त्याला ‘मेरा नंबर है इधर...' असं सांगून खिडकीपाशी जायचं.
मी तेच करते. मागून कुणी तरी ओरडतं “मॅडम, लैन में आव।” मी खिडकीत डोकावून फॉर्म मागते. आतला माणूस तिथल्याच एका गठ्ठ्यातला बचकभर ऐवज माझ्या हातात कोंबतो. मी परतते.
आता फॉर्म भरण्याचं काम. ‘ट्रेन नंबर' या रकान्यापाशी नेहमीप्रमाणे माझी गाडी अडते. पुन्हा मागच्या माणसावर माझ्या ‘नंबर'ची राखणदारी सोपवून मी ‘समयसारिणी'च्या मोठ्या फलकासमोर जाऊन उभी राहते. साठ-सत्तर गाड्यांमधून आपल्याला हवी ती गाडी उभ्या उभ्या शोधून काढायला मला जरा प्रयासच पडतात. दरम्यान माझ्या लक्षात येतं, की खिडकीतल्या माणसाने माझ्या हातात तब्बल तीन फॉर्म्स कोंबलेले आहेत. कागदरूपी राष्ट्रसंपत्ती बेदरकारपणे वाया घालवण्याच्या या वृत्तीचा निषेध करेपर्यंत मला आठवतं, की आपल्याला परतीचं आरक्षणही करायचं आहेच आणि त्यासाठी अजून एक फॉर्म लागेलच. मूक निषेधाचा ठराव मनोमन मागे घेत मी फलकावरची परतीची गाडीही शोधते. तेवढ्यात गर्दीतल्या कुणाचा तरी जोरात धक्का लागतो आणि माझ्या हातातले फॉर्म्स, पेन, खाली धरायला घरून आणलेलं मासिक, सगळंच खाली पडतं. मी त्रासिक चेहरा करून ते सगळं उचलून घेते, फॉर्म्सवर गाड्यांचे क्रमांक लिहिते आणि समाधानाने पुन्हा रांगेत येऊन उभी राहते.
एक तास उलटतो. आता रांगेत माझ्या पुढे केवळ एक मनुष्य उरलेला. मी पर्समधे व्यवस्थित घडी करून ठेवलेले फॉर्म्स बाहेर काढते, त्यावरून अखेरची नजर फिरवते आणि पाहते तो काय! मी गाड्यांचे क्रमांक बरोबर उलट-सुलट टाकलेले असतात आणि खाडाखोड करून दुरुस्ती करण्याइतकीही जागा शिल्लक नसते! ‘सहा बॉल्स, एक रन'वरून परिस्थिती अचानक ‘एक बॉल, सहा रन्स' अशी होऊन जाते!
आपल्या देशातल्या कुठल्याही ट्रेन प्रवासाची नांदी ही बहुतेक वेळेला अशीच एखाद्या गमतीदार प्रसंगाने होते. तिकीट काढलं, गाडी पकडली, ठरलेल्या ठिकाणी वेळेत उतरलो, इतका निमूट प्रवास फार क्वचितच घडतो.
अशी नांदी होते, मग प्रवासाचा दिवस येऊन ठेपतो. आपण स्टेशनवर पोहोचतो. गाडीची वेळ होते. ‘वन-झीरो-सेवन-नाइन-फाइव्ह डाऊन अमुकतमुक एक्स्प्रेस...' अशा प्रकारची घोषणा होते. ते ऐकलं, की मला ‘हर हर महादेव'चंच स्फुरण चढतं. गाडी येते.‘प्रवास' नामक शौर्यगाथेचा पहिला महत्त्वाचा अध्याय सुरू झालेला असतो.
एकदा आम्ही याच अध्यायासाठी गुजरातमधल्या आमच्या स्टेशनवर जय्यत तयारीनिशी उभे होतो. दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. प्लॅटफॉर्मवरच्या चहावाल्याला विचारून आमचा डबा साधारण तिथेच येणार याची आम्ही खात्री करून घेतलेली होती. तिथे ही माहिती मिळवण्याचा अन्य काहीच मार्ग नव्हता. बरोबर भरपूर सामान, लहान मूल. गाडी आली. आम्ही पुढे झालो, तर पुढ्यात आलेल्या डब्यावर खडूने तीन निरनिराळे आकडे लिहिलेले, आणि त्यातला एकही आमच्या तिकिटावर नाही! रिझर्वेशन चार्टही गायब! आम्ही दोन पावलं मागे. चेहरे बावळट. अखेर, आत्ता इथे चढू, पुढल्या स्टेशनवर डबा बदलू, हा सर्वमान्य तोडगाच आम्हीही काढला आणि गाडीत घुसलो. पण गर्दीत आम्ही असे काही अडकलो, की ते ‘डबा-बदलू' पुढलं स्टेशन आलंच नाही आणि हातात रिझर्वेशन असूनही अख्खा प्रवास आम्हाला उभ्याने करावा लागला.
दरम्यान टी.सी. आला, आमचं तिकीट त्याने पाहिलं.
“आपका तो रिजर्वेसन है एस-नाइनमें...”
“हम उधर ही खडे थे, लेकिन एस-नाइन उधर आया ही नहीं!” आमचा सूर निषेधाचा.
“हाँ, वो बोगी का जरा गड़बड़ है आज...”
“और बाहर तीन-तीन अलग नंबर थे।” आता निषेध कमी, राग जास्त.
टी.सी.च्या चेहऱ्यावर ओशाळं हसू. “वो कल और परसो के हैं।”
“और चार्ट?”
“लगाया था... हवा से उड गया होगा।”
आता काय बोलणार याच्यावर?
बरं, आतल्या आत डबा बदलावा म्हटलं, तर एस-नाइन ज्या दिशेला होता त्या दिशेचं दार ‘शटर खराब है, इसके लिए बंद ही रखा है' अशी माहिती टी. सी. महाशयांनीच पुरवलेली. थोडक्यात झालं काय, तर आमची फजिती आणि डब्यातल्या इतर प्रवाशांची करमणूक!
करमणूक होण्यासाठी असा एखादा प्रसंगच घडला पाहिजे अशी काही सक्ती नसते. अर्थात, नुसती आसपासची माणसं निरखली तरी पुरेसं असतं. ट्रेन प्रवासात हे निरखणं कसं चहुअंगांनी- शब्दश: आणि अलंकारिकरीत्याही- करता येतं. कारण आपल्या अवतीभोवती माणसं नुसती शिंपडलेली असतात... बसलेली, उभी असलेली, झोपलेली, बसल्याबसल्या झोपणारी, आडवी पडूनही जागी असणारी, खाणारी, पिणारी, गाणारी, आपापसात गप्पा मारणारी, पत्ते खेळणारी, वाचन करणारी, चौकश्यांनी आपल्याला नको जीव करून सोडणारी, आपण सहज विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला त्रोटक उत्तर देऊन मान फिरवणारी, मख्ख चेहऱ्याची, मनमिळाऊ स्वभावाची, गप्पिष्ट, घुमी, शिष्ठ, गोंधळलेली, मिष्कील, हसतमुख, रासवट देह बोलीची, गरीब गाय भासणारी....नाना प्रकार, नाना तऱ्हा!
एकदा प्रवासात माझ्या समोरच्या सीटवर एक आजी होत्या. त्या एकट्याच प्रवास करत होत्या. उर्वरित जागेत एक ऐसपैस गुजराती कुटुंब ठासून भरलेलं होते. ते सतत काही ना काही खात होतं. आम्हा दोघींनाही देऊ करत होते. मी दर वेळी ‘नो, थँक्स' म्हणून शिष्टनकार देत होते. आजी मात्र याच्या एकदम विरुद्ध. त्यांनी आधी समोर आलेल्या सफरचंदाच्या दोन फोडी खाल्ल्या. मग चुरमुरे, चिवडा असं काही तरी आलं ते खाल्लं. बिस्किटं खाल्ली. काही वेळाने कुटुंबातल्या एका चिमुरड्याने त्यांच्यासमोर चिक्कीचं पाकीट धरलं. त्या पोराची आई पटकन त्याला म्हणाली, “ऱ्हेवा दे, पेलू कडक छे!” आजींनी तिला ‘असू दे, असू दे' असा हात केला, चिक्कीचा एक तुकडा तोंडात टाकला आणि माझ्याकडे पाहत डोळे मिचकावत त्या हळूच म्हणाल्या, “मी कुणाला शक्यतो नाही, म्हणत नाही, नाही तर या वयात मग कुणी विचारेनासंच होतं हो!” त्यांच्या प्रांजळ वक्त्यव्यामागच्या जळजळीत वास्तवाची जाणीव झाली आणि मी शहारलेच क्षणभर.
अर्थात असं शहारणं क्वचित, गमतीचं अधिक. त्यात रात्रीच्या प्रवासातल्या गमती आणिक निराळ्या.
प्रवासातही टापटिपीने राहणारी माणसं पाहायची असतील, तर रात्रीच्या रेल्वे प्रवासात पाहावीत. असे लोक साग्रसंगीत नाइट ड्रेस वगैरे घालून झोपतात. त्यांच्याकडे हात-पाय पुसायला वेगवेगळे नॅपकिन्स असतात. जवळ ‘सोप स्ट्रिप्स' असतात. सर्व जीवनावश्यक औषधांचा भरपूर साठा असतो. त्यांनी उशी-पांघरूण सगळं सोबत आणलेलं असतं. थोडक्यात, प्रवासातही ते स्वत:ला शिस्तीच्या, काटेकोरपणाच्या साखळदंडातून मुक्त करू शकत नाहीत.
एकदा रात्रीच्या प्रवासात एका माणसाने आपणहून मला त्याचा खालचा बर्थ देऊ केला आणि बदल्यात माझा मधला बर्थ मागून घेतला. मी खूष आणि अवाक, दोन्ही! त्याने मधला बर्थ उघडला, त्यावर पद्धतशीरपणे आपलं अंथरूण पसरलं आणि मला ‘थॅन्क्स म्हणून तो त्यावर स्वार झाला. उशाला त्याने घरूनच कपडे, टॉवेल इत्यादीची मोठी घडी करून आणलेली होती. पुढला जवळजवळ अर्धा तास तो ते उसं मनासारखं करण्यात व्यग्र होता. घड्या उलट्यापालट्या करून झाल्या. आतले कपडे बाहेर, बाहेरचा टॉवेल आत करून झाला. बर्थच्या दोन्ही टोकांवर निरनिराळ्या पद्धतीने तो गठ्ठा ठेवून झाला, एकदा या कुशीवर, मग त्या कुशीवर. एकदा पाय इकडे, मग तिकडे, सर्व प्रकार करून झाले. तरी त्याचं समाधान काही होईना. आणि हे सगळं त्या मधल्या बर्थच्या तुटपुंज्या अवकाशात, म्हणजे बघा! पाठ टेकण्याइतपत जागा मिळावी, डोळे दिपतील इतका उजेड आसपास नसावा, इतक्या माफक अपेक्षा ठेवून अशी मंडळी प्रवास करूच शकत नाहीत बहुधा.
कधीतरी सटीसामाशी प्रवास करणाऱ्यांच्या अशा तऱ्हा, तर कामानिमित्त वरच्यावर फेऱ्या करणाऱ्यांच्या अजून निराळ्या तऱ्हा. ‘केवल पासधारकों के लिए' असं लिहिलेल्या डब्यात त्या पाहायला मिळतात.
मुंबई-बलसाड मार्गावर अशा डब्यांमधे चुकूनमाकून अन्य प्रवासी घुसलाच, तर त्याला हुसकून लावलं जातं, दहशतीचा अवलंब केला जातो, असं कानावर येत असतं. मला मात्र बारा-पंधरा वर्षांत एकदाही असा अनुभव आला नाही. त्या डब्यात आपण अल्पसंख्याकांप्रमाणे असतो. तेवढं एक ओळखून कुणाच्याही खिजगणतीत न येण्याचं कसब प्राप्त केलं की झालं. मग जी करमणूक होते ती फक्त तुमची आणि तुमची असते. तिथे कुणाचं अतिक्रमण होत नाही.
हे पासधारक कधीही ‘बोम्बे थी' प्रवास करत नाहीत, तर अंधेरी किंवा ‘बोरीऽऽवली स्टेसनपरथी' चढतात. त्यांच्या ‘बोरीवली'तली ‘री' कायम ओढलेली असते, ‘व'देखील संपूर्ण रूपात असतो. ‘बोरिव्ली' हा उच्चार त्यांना चालत नाही. त्यांच्या तोंडून सूरत- इथेही ओढलेला दीर्घ उकार - वलसाड, वडोदरा, अमदावाद ही नावं ऐकू आली, गाडीत चढल्याच्या दुसऱ्या मिनिटाला आपापसात ‘जय श्रीक्रिस्न'ची देवाणघेवाण झाली, दहाव्या मिनिटाला त्यांच्या हातात कागदात गुंडाळलेलं ‘खम्मण' दिसलं आणि साडेतेराव्या मिनिटाला गुटख्याची पुडी सुटली, की समजावं, गडी गुजरातमधे राहणारा गुजराती आहे. खमण विकणाराही बरोबर त्यांच्या गटाजवळ जाऊनच उभा राहतो. कोण किती खमण मागवून खाणार हे त्याला पक्कं ठाऊक असतं. आपल्यालाही भूक लागलेली असते. मग त्या गुज्जूगलक्यात आपण आपला आवाज मिसळायचा, त्याच्याकडे खमण मागायचं. तो आधी आपल्याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. आपण चिवटपणे आपली मागणी लावून धरायची. अखेर एक खमण आपल्या पदरी पडतं. त्यावर आपण ‘कितने का?' असं विचारलं रे विचारलं की आपल्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. त्यातही इतर गुजरात्यांचं तुमच्याकडे लक्षही नसतं पण खमणवाल्याच्या उत्तर प्रदेशी अथवा बिहारी नजरेत असा काही खाक्या असतो, की वाटावं, ‘आमच्या मुंबईतून' गुजरातला निघालेल्या गाडीत आपण चढलो म्हणजे काही तरी मोठं पापच केलं.
पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेसमधे इडली-वडे विकायला एक मनुष्य यायचा. तरुण, होतकरू होता. चेहऱ्यावरून प्रामाणिक, कष्टकरी वाटायचा. त्याच्याकडचे इडली-वडेही अगदी चविष्ट असायचे. हातोहात खपायचे. त्याला व्यवसायाचा उत्तम सूर गवसला आहे असं वाटायचं. हे असंच सुरू राहिलं तर मेहनतीच्या जोरावर हा नक्की प्रगती करेल अशी आशाही वाटायची. दोन-तीन वर्षं तो दिसत राहिला आम्ही त्याच्याकडचे इडली-वडे नियमित खात राहिलो. मग एका प्रवासाच्या वेळी तो आला नाही, आणि त्यानंतर कधीच दिसला नाही. त्या दिवशीचे इडली-वडे चापायचे जे राहिले ते अखेर राहूनच गेले. पुढल्या एक-दोन प्रवासाच्या वेळी त्याची हटकून आठवण झाली. नंतर तीदेखील बंद झाली.
मुंबई-सुरत फ्लाइंग रानी एक्स्प्रेसच्या महिलांच्या डब्यात एक बाई नाश्त्याचे सुके पदार्थ नियमित विकायला येत असे. ती चांगली जाडगेली, खात्या-पित्या घरची वाटेल अशी होती. गरिबीने गांजलेली, नाइलाजास्तव हा व्यवसाय करणारी मुळीच वाटायची नाही. मुंबई सेन्ट्रल स्टेशनवर अगदी गाडी सुटता सुटता डब्यात चढायची. लगोलग सोबतच्या महिला प्रवाशांशी ‘क्यूँ भाभी, कल दिखी नहीं तुम?' अशा गप्पा मारायला सुरुवात करायची. ती प्रथम दिसली, तेव्हा ‘जरा सरकून घ्या, ये किसका बॅग है? जरा तिकडे घ्या...' या तिच्या सलामीच्या वाक्यांमुळे मला ती प्रवाशांपैकीच एक वाटली होती. तिच्याकडचे पदार्थही हातोहात खपायचे. तिच्या खाती बार्गेनिंग वगैरे कशालाही थारा नसायचा, पण तरीही बायका तिची वाट बघत असायच्या. पदार्थांची खरेदी झाली, की त्यांचे आपापसात आदल्या दिवशीचे, आदल्या आठवड्याचे, असे पैशांचे हिशोब चालायचे. कुठलीही लिखापढी नसूनही सगळं बारीकसारीक त्या बाईच्या लक्षात असायचं. हे हिशोब, त्यांच्या इतर गप्पा, गरजू असूनही त्या बाईचं खमकं असणं, त्या खमकेपणाचा इतरांनी केलेला स्वीकार, यातून त्यांच्यात एक अनाम नातं तयार झालेलं जाणवायचं. भले मग ते तात्पुरतं, त्या चार-पाच तासांसाठीचंच का असेना.
तात्पुरत्या एकत्र आलेल्या अशा रेल्वे प्रवासीसमूहाला एकच एक चेहरा नसतो आणि त्यात अंतर्गत प्रकार किती असावेत यालाही काही गणती नसते...
एक फाटका मनुष्य जवळची बारीकशी पिशवी गुपचूप आपल्या सामानात सरकवून पुढे सटकल्याचं लक्षात येताच पुढे झेपावून त्या माणसाला धरणारा कुणी जागरूक प्रवासी त्यात असतो. त्याच्या कृतीमागचा उद्देश आधी लक्षात न आल्याने नामानिराळे राहून त्या दोघांच्यातली बाचाबाची शांतपणे पाहणारे आसपासचे प्रवासी असतात. ‘त्या पिशवीत बॉम्ब वगैरे असता तर...' ही शक्यता लक्षात आणून दिली जाताच ‘कसा रे बाबा देवासारखा धावून आलास' अशा नजरेने तेच नंतर त्या जागरूक प्रवाशाचं तोंड भरून कौतुक करतात. पलीकडच्या भागात आपल्या नवऱ्याबरोबर प्रथमच मुंबईला निघालेली कुणी तरुणी चढलेली असते. शेजारच्या महिलेच्या ‘मुंबईत कुठे उतरणार, दादर की सेण्ट्रल?' या भोचक प्रश्नाला तिच्याकडे उत्तर नसतं. नुसतं ‘बॉम्बे' म्हणून भागत नाही, ही माहिती तिला नव्यानेच कळलेली असते. त्या दुसऱ्या महिलेबरोबर तिची शाळकरी मुलगीही असते. ती तिला मधल्या बर्थवर स्वतंत्रपणे झोपवते. झोपेत लोळत ती खाली पडू नये म्हणून बर्थच्या दोन पट्ट्यांना लांबलचक नायलॉनची दोरी उलटसुलट बांधून मस्तपैकी अडसर तयार करते. ते पाहून तर त्या तरुणीला तिच्याविषयी वाटणाऱ्या आदरात टना-दोन टनांची भर पडलेली असते. कुठे कुणी शिष्टासारखं जाडजूड इंग्रजी पुस्तक काढून वाचत बसलेलं असतं. तिकिटाच्या किमतीतच खाद्यपदार्थ मिळणार आहेत हे लक्षात ठेवून कुणी पॅण्ट्रीतून येणारा प्रत्येक पदार्थ आपल्यासाठीच आहे, या समजुतीने त्यावर काळवेळ न बघता झडप घालत असतं. कुणी आपल्या आरक्षित जागेवर बसलेल्याला टेचात उठवत असतं. कुणी सहप्रवाशांमधल्या एखाद्या प्रेक्षणीय चेहऱ्यावर एक डोळा ठेवून असतं. आपण आपल्या हातावर बसलेला किडा जो उडवला. तो नेमका त्या प्रेक्षणीय चेहऱ्याच्या हातातल्या कॉफीच्या कपात जाऊन पडल्याचं पाहून हळहळतं. या निमित्ताने त्या चेहऱ्याशी बोलावं का, परिचय करून घ्यावा का, या विचारात पडलेलं असतं...
मोठी मौज असते हे सगळं निरखण्यात!
यातला प्रत्येक नमुना त्या समूहातून फुटून आपापल्या स्टेशनवर उतरून निघून जाणार असतो. पुढल्या वेळी अजून कुठल्या तरी समूहाचा हिस्सा बनणार असतो. त्या वेळी त्याच्या व्यक्तिमत्त्वातला कुठला तरी निराळाच कंगोरा बाकीच्यांना दिसणार असतो.
प्रवाशांप्रमाणेच रेल्वे प्रवासात स्टेशनंही निरनिराळी रूपं घेऊन अवतरतात. दिवसाच्या प्रवासातली स्टेशनं रात्रीच्या अंधारातही आपल्या परिचित खुणा झाकून ठेवूच शकत नाहीत. मात्र, रात्रीच्या प्रवासातली सवयीची, अस्पष्टतेतूनच आपापल्या खुणा पटवणारी स्टेशनं कधी चुकूनमाकून दिवसा समोर आलीच, तर ओळखू येणार नाहीत इतकी परकी वाटतात. वाटेतल्या स्टेशनांवरची गर्दीही अशीच परकी राहते, जोपर्यंत ती माणसं आपल्या गाडीत चढत नाहीत तोपर्यंत. अर्थात, याला काही मोजके परिस्थितिजन्य अपवादही असतात, ज्याची आपण इतर वेळी कल्पनाही करू शकत नाही.
१९९४ सालच्या ऑगस्टमध्ये सुरत शहरात प्लेगच्या साथीने हलकल्लोळ माजवलेला होता, माणसं शहर सोडून निघाली होती, आणि त्याच सुमाराला आम्ही काही घरगुती निमित्ताने महाराष्ट्रात यायला निघालो होतो. रात्री एक-दीडच्या सुमाराला सुरत स्टेशनमध्ये गाडी शिरताच प्रथम नजरेत भरली ती तिथल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरची खचाखच गर्दी. येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या खिडक्यांमधून ते लोक डोकावत होते, कुठे चढायला जागा मिळते का ते पाहत होते. गाडीतले बहुतेक प्रवासी तेव्हा झोपेत असलेले. माझ्यासारखे जे जागे होते ते स्वत:ला स्टेशनवरच्या गर्दीत नसल्याने नशीबवान समजत असतील का बाहेरचे लोक आतल्यांचा हेवा करत असतील असा एक विचार मनाला चाटून गेला. त्या विचाराने काहीसं अपराधीही वाटलं. किमान त्या दिवशी तरी ‘आतले' आणि ‘बाहेरचे' यांच्यात कुठलाही भेदभाव असू नये, बाहेरच्यांवर ओढवलेल्या परिस्थितीची आतल्यांना पूर्ण जाणीव आणि सहानुभूतीही आहे हे बाहेरच्यांपर्यंत पोहोचवावं, असं काहीबाही फार कळकळीने वाटलं.
भावूक करून सोडणारे असे प्रसंग अवचित कधीतरी वाट्याला येतात आणि गडबड, गोंधळ, गलका, अनिश्चितता यांचा वरचष्मा असलेल्या ‘भारतीय रेल'नामक या अजस्त्र व्यवस्थेला एक नवी मिती देऊन जातात. नवा दिवस उजाडतो. अधिक गर्दी, अधिक गलका सामावून घेण्यासाठी ती व्यवस्था नव्यानं सिद्ध होते. कारण पुन्हा एकदा सुट्ट्या, सणवार येणार असतात; लग्नकार्यं, भेटीगाठी ठरणार असतात; पुन्हा एकदा प्रवासाचे बेत आखले जाणार असतात आणि पुन्हा एकदा तिकिट-आरक्षण खिडक्यांसमोर लांबलचक रांगा लागणार असतात.